ईश्वराने जगाची निर्मिती करून या भूतलावर मानवाचं अस्तित्व अबाधित ठेवलं. त्याचं कारण हेच असावं कदाचित की, त्या मानवाकडून नेहमीच सर्जनाची निर्मिती व्हावी आणि एकमेकांमध्ये असलेला ‘माणूसपणाचा’ दुवा जपला जावा. ईश्वराच्या या संकल्पनेला मूर्त रूप देणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामोजी राव. नुकतंच त्यांचं निधन झालं. त्या दिवशीचा सूर्योदय अमावस्येची काळी रात्र घेऊन आल्याचा अनुभव देऊन गेला.
2003 सालापर्यंतच्या पत्रकारितेत मी वृत्तपत्रसृष्टीत काम करत होतो. त्यावेळी मराठीमधून तासा-तासाला बातमीपत्रं प्रसारित करणारे चॅनेल म्हणून ईटीव्ही मराठीचा लौकिक पसरत होता. त्यावेळी बातमीपत्राचे वाचन करणारे वृत्तनिवेदक सागर गोखले, माधुरी गुंटी यांना टीव्ही स्क्रीनवर पाहिलं की, मनात एक विचार यायचा, आपणही इथे काम करू शकतो का? प्रश्नार्थक प्रकाराने सुरु झालेल्या विचाराने शेवटी माझ्या मनाला ठणकावून सांगितलं की, आता विचार नाही निर्धार कर की तुला ईटीव्हीत काम करायला जायचंच आहे. रितसर अर्ज करून त्यांच्या परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा पूर्ण करून ऑगस्ट 2003 रोजी मी ईटीव्हीत रुजू झालो.
रामोजी राव, हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केवळ मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातच नव्हे तर विविध व्यावसायिक उपक्रमांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी मार्गदर्शी चिट फंड, कलांजली मॉल, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि उषा किरण मुव्हीज यासारख्या यशस्वी उद्योगांची स्थापना केली आणि त्यांचे नेतृत्व केले. चित्रपट उद्योगात, विशेषत: तेलुगू चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आणि प्रभावी होते. त्यांचे वृत्तपत्र, इनाडू, एक उत्कृष्ट यशोगाथा बनले ज्याने त्यांची अभिनव भावना आणि पत्रकारितेची बांधिलकी दर्शविली.
वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी मीडियाची नीतिमत्ता आणि मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. प्रेक्षक आणि वाचकांसाठी त्यांची व्यावसायिकता आणि अतूट बांधिलकी नेहमीच दिसून आली.
रामोजी राव प्रेमळ होते. बैठकांच्या रूपाने तुम्ही सतत त्यांच्या संपर्कात आलात की, कुठेही भेटल्यानंतर ते नेहमी तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारायचे. ‘आपण मालक आणि तुम्ही नोकर’ अशा भावनेतून त्यांनी आपल्या कर्मचार्यांकडे कधीच पाहिलं नाही. उलट ते त्यांना आपल्या कुटुंबाचा एक घटक मानायचे.
ईटीव्हीच्या बहुभाषिक चॅनेलवरील भाषेतील अडथळे दूर करणे हा त्यांचा सर्वात अभिनव उपक्रम होता. आम्हाला दररोज 900 हून अधिक फीड मिळत असत. त्यातून वेगवेगळ्या प्रदेशातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि मानव-हिताच्या बातम्या सर्व चॅनेलना (अर्थात ईटीव्हीच्या) कशा शेअर केल्या जाऊ शकतात याची खातरी करण्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली. त्यांनी प्रत्येक भाषिक चॅनेलमधून दोन उपसंपादक निवडले, जे इंग्रजी आणि त्यांची मातृभाषा दोन्हीत अस्खलित आहे, त्यांच्या मातृभाषेतील निवडक कथा इंग्रजीत अनुवादित करण्यासाठी आणि व्हिज्युअल संपादित करण्यासाठी. हा प्रयोग जबरदस्त यशस्वी ठरला ज्याने चॅनेलना भाषेतील अडथळे ओलांडून महत्त्वाच्या बातम्या एकमेकांमध्ये देवाण-घेवाण करण्यास सक्षम केले. या डेस्कला त्यांनी नाव दिले होते ‘नॅशनल डेस्क’.
रामोजी राव नेहमी त्यांच्या आवडत्या पांढर्या सफारी सूटमध्ये दिसायचे. जो त्यांच्या शिस्त आणि वक्तशीरपणाचा एक द्योतक आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे रामोजी फिल्म सिटीची निर्मिती झाली. ही त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्टतेची बांधिलकी दर्शवणारी ऐतिहासिक कामगिरी होती.
ईटीव्हीचे काम पाहताना त्यांनी एक शिरस्ता केला होता. दर तीन महिन्यांनी प्रत्येक चॅनेलच्या कामगिरीचा आढावा घ्यायचा. त्यामध्ये त्या चॅनेलला काम करणार्या प्रत्येकाला त्या तीन महिन्यातील कामाचे अवलोकन करणारे आपले मत मांडायला संधी मिळायची. (अर्थात हे सगळं लेखी स्वरूपात) पण त्या दरम्यान चॅनेलप्रमुखांनी घेतलेले निर्णय, काही झालेल्या चुका, तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर तेही तुम्ही थेट त्या अहवालात मांडू शकत होता. यात तुमचं काही मत नसलं तरी, अहवाल लेखनात तुमचा सहभाग असायलाच हवा असा त्यांचा व्होरा होता. त्यातून चॅनेलमधून प्रत्येकांनी लिहिलेल्या मुद्यांचे ते बारकाईने वाचन करत. त्यात त्यांना एखादी गोष्ट खटकली तर त्याला अधोरेखित करून संबंधित कर्मचार्याला चॅनेलच्या मीटिंगमध्ये बोलावून त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जायचं. त्या बैठकीला चॅनेल चालवणारे सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असायचे. त्यामुळे तो मुद्दा लगेच तिथे निकाली निघायचा. एवढंच नाही तर त्यावर चॅनल प्रमुखांनी काय बदल केला याचा अहवाल त्यांना रामोजी राव यांना सादर करावा लागायचा.
टीव्ही चॅनेलसाठी गावोगावी बातमीदार नेमून त्यांच्या बातमीदारीला अधिक प्राधान्यक्रम देण्याचं पहिलं काम केलं असेल ते रामोजी राव यांनी. ते कायम म्हणायचे, ज्यांच्या जिवावर आपण इथे बसलो आहोत त्याची बातमी गावातल्या माणसाला जोडलेली असते. त्यामुळे माणूसपण टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. टीव्ही मीडियात ‘स्ट्रिंजर’ ही संकल्पना त्यांनी रुजवली आणि ती यशस्वी करून दाखवली.
26 जुलै 2005 ला मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडला होता. शिवाय कोकणासह महाराष्ट्रातल्या अनेक भागात मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी सलग 2-3 दिवस आम्ही कार्यालयातच राहून प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक अपडेट बातमीपत्रांमधून प्रसारित करत होतो. आमच्यासारखेच प्रत्यक्ष घटनास्थळावर त्या-त्या ठिकाणचे बातमीदार तैनात होते. या कामाचे कौतुक करताना रामोजी राव यांनी पहिल्यांदा त्यांच्या सहीच्या पत्रातून आम्हा सगळ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. ते पत्र आजही माझ्या वैयक्तिक कागदपत्रांमध्ये जोडलेले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
रामोजी राव यांनी ईटीव्हीत असताना काम कसे करावे याचे जे संस्कार आमच्यावर केले त्याचा आमच्या वाटचालीत निरंतर उपयोग होत गेला आणि होतो आहे. अशी माणसे क्वचितच या पृथ्वीतलावर जन्माला येतात आणि अस्तित्वाचा सुगंध चिरंतन पसरवून जातात.
भावपूर्ण श्रद्धांजली रामोजी राव गारु!
ज्येष्ठ पत्रकार
9930461337