पुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती!

पुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती!

फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपूर्ण बुद्धीनिष्ठेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देऊ शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजणारे हे शतमूर्ख ज्ञानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळूनही विद्वत-अडाणी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हणजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातून हे लोक बाहेर कधी येतील ते येओत.

वाद या शब्दाचा अर्थ तरी यांना नीट कधी समजला आहे काय? वाद तुल्यबळ वैचारिक पक्षांमध्येच होऊ शकतो. ज्यांना मुळात विचार कशाशी खातात याचेच ज्ञान नाही त्यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात पडून स्वत:चेच नाक छाटून घ्यायचा चंग बांधला आहे. अर्धवट ज्ञानावर आधारीत हे पुस्तके लिहितात, स्वत:च्या समाजात विचारवंत म्हणून मिरवून घेतात, त्यावर कोणीही टीका केली तर लगेच भटाळलेला, आरएसएसने दत्तक घेतलेला वगैरे शेलकी विशेषणे वापरुन मोकळे होतात. यात या मंडळींना काय विकृत आनंद होत असेल तो असो, पण बहुजन म्हणवणार्‍यांचे वाटोळे मात्र करण्यात आज ब्राह्मण नव्हेत तर असेच उथळ बहुजनीय विचारवंत आघाडीवर आहेत हे दुर्दैव आहे.

ज्ञानसत्ता निर्माण करण्यात एक ज्ञानावरील निष्ठा लागते. ब्राह्मणांचे वर्चस्व झुगारायचे असेल तर त्याच तोडीचे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ज्ञान निर्माण करावे लागते याचा विसर सर्वच समाजाला पडला आहे. फुले-बाबासाहेबांना अंतिम मानत कधीही ज्ञानवृद्धी होणार नाही हे यांच्या गावीही नाही. त्यांचे काय मानावे? तर त्यांची अगाध ज्ञाननिष्ठा, तर्ककठोर होत स्वत:ची मते तपासत पुढे जाण्याची प्रवृत्ती. यांना फुले-आंबेडकर मुळात समजलेलेच नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. अपवाद असतात… पण अपवादांनीच नियम सिद्ध होतो.

जुनी दैवते नष्ट करायचा अथक प्रयत्न करायचा आणि नवी दैवते निर्माण करण्यात मात्र कुचराई करायची नाही आणि वर म्हणे हिंदू धर्म संपवायचा… हे असे करत राहिले तर बापजन्मी त्यांना हिंदू धर्म संपवता येणार नाही. नवीन धर्म स्थापन करायचा… सर्वांना प्रिय वाटेल म्हणून शिव हे नावही द्यायचे… मग मुळात जो शैव धर्म पुरातन काळापासून अस्तित्त्वात आहे, एवढे अवाढव्य तत्त्वज्ञान उपनिषदे, तंत्रशास्त्रे ते आदी शंकराचार्यांनीच निर्माण करुन ठेवले आहे. त्यांचाच उद्घोष करायचा सोडून हे नवीन धर्म आणि नवी धर्मसंहिता तयार करत बसणार. म्हणजे त्यांना अभिप्रेत शिव हा शिवशंकर नसून अन्य कोणीतरी शिव या जातीयवाद्यांना अभिप्रेत असावा असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. मग शिव हा देशाला जोडणारा धागा आहे असे म्हणणे गैर आहे. काहीतरी दडवण्याची ही चाल आहे.

गौतम बुद्धाला पुराणकारांनी विष्णुचा दहावा अवतार का ठरवले यावर यांनी खरे तर मूलभूत विचार करायला हवा. असुरांमध्ये मायामोह निर्माण करुन त्यांना पथभ्रष्ट करण्याचे कार्य बुद्धाने केले म्हणून बुद्ध हा दहावा अवतार (काही पुराणांत नववा अवतार) ठरवण्यात आला हे यांच्या गांवीही नसते… कारण अभ्यास कोणी करायचा? पुराणे जाळून टाका हे म्हणने सोपे असते परंतु त्यांचा तटस्थ अभ्यास करत त्यांतील खोट वा सत्य शोधायचे कोणी?

ब्राह्मणांना वेदांची-स्मृतींची चिकित्सा कधीच मान्य नव्हती. आम्हालाही बहुजनीय महापुरुष, त्यांनी स्थापलेले धर्म वा त्यांच्या विचारांची चिकित्सा मुळीच मान्य नाही. काय फरक उरला? ज्ञान फक्त चिकित्सेनेच पुढे जाऊ शकते याचे भान नको की काय? ब्राह्मण समाज शिव्या घालायला सोपे टार्गेट आहे. त्यांना शिव्या द्यायला फार धाडसाची गरज नसते. त्यांनाही अशा शिव्यांमुळे काही एक फरक पडत नाही. उलट ते आत्मकेंद्रित होत एक दिवस अत्यंत थंड डोक्याने बहुजनांचा असा बौद्धिक काटा काढतील की हे सैरभैर होत भरकटत जातील. उथळ लोक सांस्कृतिक संघर्ष कधीच जिंकू शकत नसतात हा जगाचा इतिहास आहे. ब्राह्मण काही आकाशातून पडलेले नाहीत… किंवा ते बाहेरुनही आलेले नाहीत. समजा ते आले असले तरी मग त्यांच्याबरोबर कथित क्षत्रिय, वैश्यही आलेच की! मग तुम्ही क्षत्रिय-वैश्यांना कोणत्या नियमांनी एतद्देशीय ठरवता? तेही तुमच्याइतकेच याच देशाचे, संस्कृतीचे भाग आहेत, होते आणि राहतील.

गतकाळातील ज्ञात-अज्ञात अन्यायांबद्दल गळे काढणे सोपे असते. ब्राह्मणांनी शिक्षणबंदी घातली… ठीक आहे. मग एवढ्या बहुजनीय संतांनी आपापले अभंग लिहिले कसे? का प्रत्येक संताला एक ब्राह्मण लेखनिक भेटला होता? भेटला असेल तर ब्राह्मणांना बहुजनांचे अभंग लिहिण्यात कमीपणा वाटला नाही हे तरी सिद्ध होते किंवा त्यांना लिहिण्या-वाचण्यावर बंदी नव्हती एवढेच सिद्ध होते. चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, बंका हे जर अस्पृश्य होते तर कोण ब्राह्मण त्यांचे अभंग लिहून घ्यायला जाईल? म्हणजे चोखादि संतांना लिहिता येत होते. त्यांच्यावर असलीच तर वेदबंदी होती… ज्ञानबंदी नव्हती. वेदबंदीने तसाही काही फरक पडणार नव्हता कारण ते त्यांच्या धर्माचे प्रतीक नव्हतेच! शिकायच्या बाबतीत बहुजन समाज आजही आळशी आहे. शाळांतून गळत्या होतात त्या यांच्याच. तेथे काही प्रबोधन करायचे नाही आणि सारं खापर दुसर्‍या जातीवर थोपून मोकळे व्हायचे हा धंदा कसा चालेल?

मी याला संभ्रमावस्था म्हणतो. संभ्रमी समाजाचा अंततः विनाशच होतो. एखाद दुसर्‍याबाबत संभ्रम आपण समजू शकतो पण जे ज्ञान नव्हे तर फक्त संभ्रम निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनले आहेत ते समाजघातकी आहेत असेच म्हणावे लागते.

स्वत:च्या टिर्‍या बडवत ज्ञानसाधना होत नसते. ज्ञानाला शुद्ध करायचे की अर्धवट ज्ञानाने विकृत कृती करायच्या? बाबासाहेबांनी जे काही लिहिले ते साधार व सप्रमाण लिहिले. कोठेही कधीही अश्लाघ्य भाषा वापरली नाही. फुलेंनी तर्ककठोर युक्तिवाद करत बहुजनवादाचा पाया घातला. आज बहुजनवादाचा गळा घोटण्याचे कार्य फुले-आंबेडकरांचेच नाव घेत केले जात आहे याचा खेद आहे.

आजचा बहुजनवाद हा सृजनशील नाही आणि सृजनात्मक विचारधारा जे निर्माण करु शकत नाहीत त्यांचा विनाश हा अटळ असतो. कत्तली, दंगली, तोडफोड अशी भाषा करायला अक्कल लागत नाही… पण मग अशी भाषा करत बाबासाहेबांच्या संविधानात्मक तरतुदींचाच घोर अवमान करत असतो हे कधी समजणार?

आपलीच आराध्ये पायतळी तुडवणार्‍या अशा महामूर्खांना आपल्या अशा कृत्यांची-विधानांची शरम कधी वाटणार?

इतिहास हा धादांत असत्ये ठोकत नव्याने लिहावा लागत नसतो तर त्याची परखड चिकित्सा करत समोर आणावा लागतो. इतिहास ही गोष्ट भेळ-भजी खाण्याची वा चकाट्या पिटण्याची बाब नसते.

सर्वात महत्त्वाची बाब असते ती ही की इतिहास तपासायला तर हवा पण त्याचा उपयोग इतिहास घडवणारे कार्य करण्यासाठी असतो हे यांच्या गावीही नाही. नव्या पिढ्यांना भावनिक आत्मविश्वास देणारा… दिगंताकडे पुढे जायला प्रेरीत करणारा इतिहास घडवू शकणारे विचारवंत नाहीत हे दुर्दैव आहे. बरे, यांना पुढचा नवा विचार मांडणारे विचारवंतही चालत नाहीत. ब्राह्मण दुर्लक्षाने मारतात असा आरोप हे करतात, मग हे तरी वेगळे काय करतात? आपली दुकाने बंद होऊ नयेत म्हणून एकाच तत्त्वधारेला आयुष्यभर चिकटून बसत फायदे उकळू पाहणारे हे कसले पुरोगामी विचारवंत? मुळात बहुजन हा शब्दच चुकीचा आहे हे यांना कधी समजणार? ऊरबडवी, आमच्यावर हजारो वर्षे अन्याय झाला ही बोंब ठोकत रहायचे, सत्य इतिहासाकडे दुर्लक्ष करायचे हा यांचा धंदा झाला आहे आणि म्हणूनच हे विचारवंत कसलीही सामाजिक क्रांती घडवू शकलेले नाहीत.

आज हे बहुजनीय म्हणवणारे विचारवंत जो इतिहास घडवत आहेत त्यावर पुढील पिढ्याच थुंकतील… इतकी अवनती या बहुजन पुरोगामी विचारवंत म्हणवणार्‍या पण प्रत्यक्षात प्रतिगामीच असणार्‍या विचारवंतांची झाली आहे.
ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हाच एक दिवस कायमचा इतिहासात जमा होईल!

संजय सोनवणी

साहित्यिक आणि संशोधक
9860991205

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “पुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती!”

  1. Aanand

    Atishay chaan lekh

  2. Sarthak Joshi

    अभ्यासपूर्ण निरीक्षणाचे यथायोग्य विश्लेषण.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा