वाचन ही ‘संस्कृती’ आहे काय? – घनश्याम पाटील

भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मनाने किंवा धनाने खूप श्रीमंतच आहेत असंही चित्र नाही. मग तरूण, महाविद्यालयीन मुलं-मुली काय वाचतात आणि त्यांना या वाचनाचा काय लाभ होतो, याचा विचार करता येईल.


‘ज्या दिवशी देवळाकडे जाणारी पाऊले ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी समाजाची योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. ‘कोणत्याही देशातील तरूणांच्या तोंडात कोणती गाणी आहेत ते सांगा म्हणजे मी त्या देशाचं भवितव्य सांगतो,’ असंही म्हटलं जातं. म्हणजे समाज काय वाचतो, त्या समाजातील विचारवंत काय बोलतात, काय लिहितात हे पाहणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे ठरते. ‘शब्द हे शस्त्र आहे, त्यामुळे ते जपून वापरावे,’ अशी शिकवण आपल्याला बालपणापासून देण्यात येते. हे शस्त्र तयार करण्याचे कारखाने मात्र पुरेसे ताकतीने धडधडत नाहीत. हे शस्त्र चालवावे कसे, याचेही ज्ञान आजच्या पिढीला दिले जात नाही. त्यामुळे शब्दरूपी शस्त्रं गंजत चालली आहेत. त्यांची धार बोथट होत चाललीय. साहित्य असेल किंवा पत्रकारिता…! गुळगुळीत कागदावरील बुळबुळीत मजकुरांमुळे वाचकांचे ना धड मनोरंजन होते, माहिती मिळते, ना त्यांना पुरेसे ज्ञान मिळते. खून, मारामारी, बलात्कार, अपहरण, दरोडे, अपघात, नट-नट्यांची लफडी, राजकीय आरोप-प्रत्यारोप अशा नकारात्मक घडामोडींनीच वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले जातात. नकारात्मक बातम्याच प्राधान्याने द्यायच्या, अशी मानसिकता दुर्दैवाने आपल्याकडे रुजली आहे. त्यात सकारात्मकतेचा पोत हरवला आहे.

या महिन्यात जागतिक पुस्तक दिन आहे. मराठी भाषेचा विचार करता दरवर्षी आपल्याकडे अक्षरशः हजारो अनुवादित पुस्तके येतात. मराठीतील किती पुस्तके इतर भाषेत अनुवादित झाली आहेत? आपल्याकडील किती लेखक जागतिक पातळीवर गेले आणि तिकडे यशस्वी झाले? विशेषतः यात महिलांचे प्रमाण किती? मग मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत दहाव्या क्रमांकावर असेल आणि या भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचे धड पोटही भरत नसेल तर हे अपयश कुणाचे? एकीकडे सर्वच राजकीय पक्ष मराठीच्या नावाने राजकारण करतात. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर मानले जाते. या शहरात बारावीनंतर ‘मराठी’ हा विषय घेणारे किती विद्यार्थी असावेत? हा आकडा ऐकूनही कोणत्याही राजकीय पक्षाला लाज वाटणार नाही. तितका निर्लज्जपणा त्यांच्या अंगीभूत आहे. संपूर्ण पुणे शहरात मराठी विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जेममेम तीनशेच्या आत आहे!! ही अशी भीषण वस्तुस्थिती दुर्लक्षित ठेवून मराठीच्या नावाने सतत राजकारण होणार असेल तर यांना कोणत्या जोड्याने मारावे?

कन्नडमधील एस. एल. भैरप्पांच्या मराठीत अनुवाद केलेल्या कादंबऱ्यांवर उड्या पडतात. सुधा मुर्तींची अनुवादित पुस्तके आपल्याकडे खपतात पण आपल्याकडील साहित्य तिकडे जात नाही आणि गेले तरी ते यशस्वी होत नाही. आपल्या लेखकांचे चिंतन, अभ्यास कमी पडतो की त्यांचे अनुभवविश्वच खुरटे आहे? चेतन भगतसारख्या लेखकाची ‘हाफ गर्लफ्रेंड’ ही कादंबरी येते आणि पहिल्या झटक्यात तिच्या सत्तर लाख प्रती खपतात हे आपण बघितले. या कादंबरीची जाहिरात अनेक राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रात पूर्ण पूर्ण पान होती. एका दिवसात पुस्तकाच्या जाहिरातीसाठी त्यांनी जितके पैसे खर्च केले तितकी संपूर्ण मराठी ग्रंथव्यवहाराची वार्षिक उलाढालही नाही. मराठीत पुस्तकाची आवृत्ती दहा हजारांचीही नाही. एक हजाराहून ती आता पाचशेवर आल्याचे अनेक मान्यवर प्रकाशक कबूल करतात. या पाचशे प्रती विकण्यासाठी त्यांना चार-दोन वर्षे ‘मेहनत’ घ्यावी लागते. ‘वाचक कमी होताहेत’ अशी सातत्याने बोंब मारणारे मराठी प्रकाशक ते वाढावेत यासाठी काय प्रयत्न करतात? ज्या मराठी कलाकृतीवर चित्रपटनिर्मिती होते त्या कलाकृतीच्या लेखक आणि प्रकाशकालाही फुटकळ मानधन मिळते. त्या चित्रपटाच्या जाहिरातीवर जितका खर्च केला जातो त्यात त्या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी नक्की होतील. तसे व्हावे असे वाटणारा वर्ग मात्र नगण्य आहे.

मराठीतील महत्त्वाची वृत्तपत्रे अजूनही रविवार पुरवणीत पुस्तकांचा परिचय देतात. यात चारशे-साडेचारशे शब्दांची दोन किंवा तीन पुस्तके असतात. जागेनुसार चार-दोन पुस्तकांचे चार चार ओळीत स्वागत केले जाते. वर्षातील 52 पुरवण्या गृहित धरल्या तरी जेमतेम दीड-दोनशे पुस्तकांचा सारांशात्मक परिचय वाचकांपर्यंत पोहोचतो. यापेक्षा जास्त पुस्तके तर दरवर्षी ‘चपराक’चीच होतात. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके अपवाद वगळता किमान समाजमाध्यमांचा वापर करत आपापल्या पुस्तकांच्या जाहिराती कराव्यात असेही आपल्याकडच्या प्रकाशकांना वाटत नाही. म्हणूनच वाचनाला ‘संस्कृती’ म्हणण्याचा नैतिक अधिकार यांच्याकडे उरत नाही. काही सरकारी टेंडर मिळवून आणि ग्रंथव्यवहारातील अपप्रवृत्तींना खतपाणी घालत यांचा हा ‘पोटापाण्याचा व्यवसाय’ मात्र होऊ शकतो. अगदी त्यापुढे जाऊन सांगायचे तर काही लोकांची ही हौस, आवड किंवा छंद ठरू शकतो.

हा छंद आपल्याला नैराश्यापासून दूर नेतो. कितीही मोठे संकट आले तरी त्यातून बाहेर पडण्याचे बळ देतो. आपल्यात आत्मविश्वास पेरतो. माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून देतो. मनात प्रेरणेचे आणि मांगल्याचे दिवे चेतवतो. अपयशाचं मळभ दूर सारून स्वतःला सिद्ध करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जागवतो. पोट भरणं ही जशी शरीराची गरज आहे तशी वाचन ही मनाची, भावनांची गरज असते. ती पूर्ण झाल्याने ही सर्वेाच्च साधना ठरू शकते. मन आनंदी, उत्साही राहावे आणि ज्ञानाचा खजिना उपलब्ध व्हावा यासाठीचा हा सकस व्यायाम म्हणता येईल. चांगले ते स्वीकारायचे आणि वाईट ते अव्हेरायचे याची समज वाचनामुळे येते. भले ही संस्कृती नसेल पण आपण सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात जी सभ्यता पाळावी लागते ती वाचनातून आणि अर्थातच त्यातून आलेल्या प्रगल्भतेतून वृद्धिंगत होते. म्हणूनच जगण्यासाठी रोज आहार घेणे जसे गरजेचे आहे तसे निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी रोज काहीतरी वाचणे आणि मुख्य म्हणजे त्यावर चिंतन करणे आवश्यक ठरते.

रोज शेकड्यांनी पुस्तके प्रकाशित होत असताना काय वाचावं? याचं भान मात्र आपल्याकडं असायला हवं. जागतिक पुस्तक दिन साजरा करत असताना ही जाण आणि भान वृद्धिंगत व्हावे इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून वाचकांना विचार करण्यास भाग पाडतील अशी उत्तमोत्तम पुस्तके सातत्याने आपल्या भेटीस आणू याची ग्वाही देतो.

– घनश्याम पाटील

लेखक, संपादक, प्रकाशक ‘चपराक’

‘साहित्य चपराक’ मासिक एप्रिल २०२४

साहित्य चपराक मासिकाचा सभासद होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Sahitya Chaprak Membership

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा