कष्ट-त्याग-समर्पणाची गाथा- ‘अग्निदिव्य’

एका स्त्रीचा स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ ‘अग्नितांडव’ न राहता तो ‘अग्निदिव्य’ कसा बनत गेला, याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रात्मक पुस्तकात आहेत. एका महिलेने व तिच्या मुलाने केलेला संघर्ष म्हणजे हे पुस्तक अशीच प्राथमिक ओळख या पुस्तकाची करून द्यावी लागेल.

दोन वर्षांपूर्वी लेखक आशिष निनगुरकर यांच्या आयुष्यात एक मित्र आला. मुंबईच्या साकिनाका डाक कार्यालयात काम करताना त्यांना भेटलेला हा मित्र अभिषेक कांबळे. त्याचा जीवनप्रवास ऐकल्यावर लेखकाला राहावले नाही. अभिषेकच्या मनात त्याच्या भूतकाळाविषयी अनेक प्रश्न होते, त्या सर्व  प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न लेखकाने चालू केला. मित्रत्व स्वीकारलं की सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सुख-दुःख वाटून घ्यावे लागतात. तशी त्यांची ती प्रोसेस सुरू झाली. तेव्हाच या विषयावर लिहावे, हे लेखकाने मनाशी पक्के केले असावे. अभिषेक त्याच्या भूतकाळात पूर्णपणे अडकला होता. कदाचित त्याला मन मोकळे करायचे होते आणि त्याला मन मोकळं करण्याला लेखकाची हक्काची जागा भेटली. त्याने सांगितलेली त्याची व त्याच्या आईची वास्तव चित्तरकथा म्हणजेच हे ‘अग्निदिव्य.’

‘अग्निदिव्य’ या पुस्तकाची दर्जेदार निर्मिती ‘चपराक’ प्रकाशनने केली आहे. जेव्हा चपराकचे प्रकाशक-संपादक घनश्याम पाटील यांनी हा विषय ऐकला, तेव्हाच तत्काळ या पुस्तकाला होकार दिला आणि ‘अग्निदिव्य’चा जन्म झाला. एका महिलेचा संघर्ष, माहेर-सासर जबाबदारी, त्यातून वाढलेल्या अनेक गोष्टी या सर्व परिस्थितीतून एका स्त्रीला कशाप्रकारे सर्व गोष्टींमधून जावे लागते. सासर व माहेरची दोन्ही नाती कशी सांभाळावी लागतात. हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न या चरित्रातून दिसून येतो. रमाबाई कांबळे यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता तसेच त्यांच्या वाटेत प्रत्येकवेळी काटेच आले आहेत. तरी त्यांनी आत्महत्या न करता, प्रत्येक संकटाला झुगारून सर्व गोष्टींचा सामना केला. हार मानली नाही.

अग्निदिव्य

अभिषेक व त्यांच्या आईचा जीवनपट किती काळीज फाडून दुःख देणारा आहे, हे पुस्तक वाचल्यावरच तुम्हाला कळू शकेल; पण खरं सांगू तर अशी वेळ कुणावर येऊ नये, असे वाटते. एक स्त्री आपल्यावर आलेल्या सर्व संकटावर कशी मात करते, वेळप्रसंगी पळ न काढता प्रत्येक गोष्टीला कशी सामोरी जाते, तोंड देते, कुणाच्या खोट्या आश्वासनांना बळी पडत नाही.
प्रत्येकाच्या जीवनात अनेक चढउतार येत असतात. आयुष्य हे असेच चित्रविचित्र गुंतागुंतीचे बनलेले आहे. कुठलाही रस्ता सरळ नसतो आणि सहजसोप्या पद्धतीने काहीच मिळत नसते आणि सहजसोपे काही मिळाले तरी त्याची किंमत नसते. कोणतेही मोठे दुःख झाले तरी आत्महत्या करणे हा शेवट असता कामा नये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ‘अग्निदिव्य’ वाचून मिळू शकतात. फक्त आपण ती शोधायला हवीत. आत्मचिंतन करायला हवे. हे पुस्तक वाचून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि ती आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जगात जगायला बळ देईल. नात्यांची वस्तुस्थिती कळेल. या पुस्तकासाठी अभिषेक व त्यांच्या आई रमाबाई यांचे मला कौतुक वाटते. त्यांनी स्वतःच्या जीवनाचे चांगले-वाईट अनुभव अगदी खरेपणाने लेखक आशिष यांच्याजवळ व्यक्त केले आहेत आणि लेखकाने कुठलीही अलंकारिक किंवा अतिशयोक्ती न करता अगदी साधेपणाने ही चरित्रागाथा मांडली आहे. त्यामुळे हा जीवनपट वाचताना डोळे पाणावतात व जगण्याची नवी उमेद देतात.

‘चपराक प्रकाशन’चे संपादक घनश्याम पाटील यांचे या पुस्तकाची निर्मिती केल्याबद्दल जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. त्यांच्या कल्पक, अभ्यासू, वैचारिक व रसिक वृत्तीमुळे या पुस्तकाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. संतोष घोंगडे यांनी उत्तम असे मुखपृष्ठ साकारले आहे. एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे सांगणारी ही वास्तव कथा. लागोपाठच्या संकटांनी तिच्या आयुष्याची परवड झाली. त्यातही ती खंबीरपणे उभी राहिली. संकटांशी दोन हात केले. आपल्या मुलासाठी संघर्ष केला. अनंत अडचणींवर मात केली. मुलाला अर्थार्जनासाठी सक्षम केलं. त्याच्या पायावर उभं केलं. एका आईचं कर्तव्य पार पाडलं, कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपलं अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. अजूनही तिची वाटचाल संपलेली नाही. अजूनही तिची वाटचाल सुरूच आहे. तिच्या कष्ट-त्याग- समर्पणाचीच ही एक गाथा-गाथा अग्निदिव्याची. आवर्जून वाचावे, असे हे चरित्रात्मक पुस्तक. आपण या पुस्तकाचे स्वागत कराल, हीच निर्मळ अपेक्षा…

– अशोक कुंदप, (सातारा)
पूर्वप्रसिद्धी – दै. सकाळ १० मार्च २०२३

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा