सिद्धी : कथा – सुनील माळी

तो घाईघाईतच रात्री नवाच्या सुमारास आपल्या ऑफिसमधून बाहेर पडला. तसा उशीरच झाला होता पण न जाऊन चालणार नव्हते. त्याच्या जवळच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाचे रिसेप्शन होते रामकृष्ण गार्डनला. पत्रिकेवर दिलेली वेळ संध्याकाळी सात ते दहा अशी होती पण जेवढ्या लवकर आपण पोहोचू तेवढी जास्त माणसे भेटतील, आता आपण निघालो तर किमान एक तास तरी मिळेल, या अपेक्षेने त्याने गाडीला किक मारली.

रामकृष्ण गार्डनमध्ये अजूनही गर्दी होती. ओळखीच्यांना हात करत, कुठे कुणाजवळ थोडे थांबत तो मंचावर पोचला.

‘‘या… दुर्गेशराव…’’

त्याच्या मित्राने त्याचे तोंडभरून स्वागत केले. मग नेहमीचे फोटोसेशन झाल्यानंतर तो बुफेच्या टेबलांकडे वळला. डीश घेऊन तो मित्रमंडळींना जाऊन मिळाला. यथास्थित जेवण झाल्यावर त्याने टेबलावरचे पान उचलले आणि परत मित्राचा निरोप घेऊन तो गाडीकडे वळला. आता घराकडे परतताना त्याने शॉर्टकट घेतला आणि टु-व्हीलर हरेकृष्ण सोसायटीच्या बोळात घातली. हरिकृष्ण ही बंगले आणि अपार्टमेंट्सचे मिश्रण असलेली मोठी सोसायटी. तिच्या एका बाजूला महापालिकेच्या कर्मचार्‍यांची वसाहत तर दुसर्‍या टोकाला मुख्य रस्ता. सोसायटीचे सर्वच रस्ते एकसारखे आणि फारसे रूंद नसलेले असे.

सोसायटीच्या रस्त्यांवर विजेचे खांब होते खरे पण त्यांची देखभाल न झाल्याने त्यातले नव्वद टक्के दिवे बंदच असायचे. त्यामुळे अंधार्‍या अशा त्या रस्त्यांवरून जाताना फक्त गाडीच्या दिव्यावरच भरवसा ठेवावा लागत होता. सोसायटीच्या उभ्या रस्त्यावरून तो आडव्या रस्त्यावर वळला. तो रस्ता तर अगदी टोकाला असल्याने तिथे अधिकच अंधार होता. दुर्गेश वळला आणि गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात हळूहळू गाडी चालवू लागला…

कस्तुरीगंध

एवढ्यात… एवढ्यात त्याने गाडीला ब्रेक लावला कारण समोरून कुणीतरी मानवी आकृती हळूहळू पुढे सरकत होती. गाडीचा पिवळा प्रकाश त्या आकृतीवर पडला. त्या व्यक्तिने भगवा झब्बा घातला होता. मोठे, वाढलेले केस खांद्यापर्यंत आले होते. कपाळावर केशरी गंधाचा टिळा होता. हे पाहत असतानाच दुर्गेशची नजर तिच्या डोळ्यांकडे गेली. त्या डोळ्यांशी त्याची नजरानजर झाली मात्र, दुर्गेश एकदम शहारला. विलक्षण चमकणारे असे ते डोळे होते. दुर्गेशने तिच्या डोळ्यांत पाहिले अन् त्याची नजर आतआत रूतत गेली. त्याला ती बाहेर काढताच येईना. खोलखोल विवरात आपण बुडत चाललो आहोत, असा भास त्याला झाला. अंधार्‍या तळापर्यंत तो गेला आणि एकदम भानावर आला. ती व्यक्ती आता दुर्गेशच्या गाडीला जवळपास खेटूनच उभी होती आणि त्याच्याकडे बारकाईने पाहत होती. दुर्गेशने गाडी एका बाजूला कलती केली आणि त्याने तिथून जाण्यासाठी ब्रेकवरचा पाय काढला. तेवढ्यात ती व्यक्ती त्याला म्हणाली, ‘‘हे घे…’’ तिचा आवाज गंभीर, भारदस्त असा होता. आता हे काय ते दुर्गेशला समजेना. त्याने पुन्हा त्याच्या नजरेला नजर भिडवत प्रश्नार्थक चेहरा केला. छे… विलक्षणरित्या ओढून घेणारे ते डोळे होते. त्याचा श्वास वेगाने होऊ लागला आणि काहीतरी भलतेच घडते आहे, हे जाणवून त्याने गाडीला वेग दिला. त्या अंधार्‍या बोळातून मुख्य रस्त्यावरच्या लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात आल्यावर दुर्गेशला जरा बरे वाटले पण तो विलक्षण घाबरला असल्याने त्याने गाडी सुसाट काढली आणि पुलावरून आपल्या घराच्या दिशेने वळवली. अर्ध्या तासात तो घरी पोहोचला. तोंड धुवून, फ्रेश होऊन तो अंथरूणावर पडला तरीही ते डोळे, ती भेदक नजर त्याच्या अंत:चक्षुपासून हटत नव्हती. बर्‍याच वेळाने त्याचा डोळा लागला…

ही घटना होऊन आता चार दिवस झाले होते. त्या घटनेचा दुर्गेशच्या मनावरील परिणाम हळूहळू कमी होऊ लागला. तो आपल्या कामामध्ये गुंतून गेल्याने त्याला त्या नजरेचाही विसर पडला. ऑफिसातले सर्व सहकारी मिटिंग हॉलमध्ये एकत्र जेवण करीत. दुपारच्या जेवणाबरोबर गप्पांनाही रंग चढे. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे त्याने डबा उघडला. त्याच्या सर्व सहकार्‍यांनीही आपापले डबे उघडले पण रमेश आपल्याच विचारात बुडून समोरच्या भिंतीकडे पाहात होता. त्याला त्याच्या तंद्रीतून जागे करीत दुर्गेश मोठ्याने म्हणाला, ‘‘अरे रमेश, कसला विचार करतो आहेस? डबा उघड ना…’’

रमेश तंद्रीतून जागा झाला आणि त्याने यंत्रवत डबा उघडला. सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या पण रमेश गप्पच होता. हे सगळ्यांच्याच लक्षात आले. कुणीतरी त्याला विचारले, ‘‘रमेश, अरे झालं काय तुला?’’

प्रतिशोध

एवढा वेळ गप्प असलेल्या रमेशच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. तो बोलू लागला. ‘‘अरे, स्मिताच्या छातीत एक गाठ आल्याचं लक्षात आलं. ती गाठ कॅन्सरची असावी, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. स्कोपी केलीये पण त्याचा रिपोर्ट अजून यायचाच. म्हणून टेन्शनमध्ये आहे.’’

...एवढा वेळ ऐकणारा दुर्गेश एकदम ताठ बसला. त्याचे डोळे चमकू लागले. त्याला तेच ते विवर दिसू लागले. त्या भगव्या कपड्यातल्या व्यक्तिच्या डोळ्यांमधले. तो एकदम म्हणाला, ‘‘रमेश, ती गाठ कॅन्सरची नाहिये… छातीच्या डाव्या बाजूला सुपारीएवढी अशी ती गाठ म्हणजे स्नायूंना आलेली सूज आहे…’’

हे वाक्य त्याच्या तोंडातून बाहेर पडले अन् तो एकदम भानावर आला. त्याने आजूबाजूला बघितले तर सगळेजण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.

‘‘का पाहताय माझ्याकडे?’’

‘‘दुर्गेश, तू आता ज्या आवाजात बोललास, तो आवाज तुझा नेहमीचा नव्हता. एकदम धीरगंभीर, खर्जातून येणारा असा तो होता. काय झालंय तुला?’’

दिनेशने दुर्गेशला विचारले.

त्याचे वाक्य संपते न संपते तोच रमेश बोलला, ‘‘ते जाऊ दे… पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बायकोच्या छातीच्या डाव्या बाजूला गाठ आहे आणि तीही सुपारीएवढी ही माहिती तुला कशी कळली ते आधी सांग.’’

आता सगळ्यांच्या नजरा दुर्गेशवर खिळल्या. दुर्गेश गांगरला. तो चाचरत म्हणाला, ‘‘मला काहीच माहिती नाही. माझ्या तोंडून ते वाक्य कसं गेलं, त्याचीही मला कल्पना नाही…’’

सगळ्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य होते. ते घेऊनच सगळेजण आपापल्या टेबलाकडे वळले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास रमेश पळतच दुर्गेशच्या टेबलाकडे आला.

‘‘दुर्गेश, तुझा अंदाज खरा ठरला. ती कॅन्सरची गाठ नव्हतीच… थँक्स…’’

रमेशची पाठ वळली पण दुर्गेशच्या मनात विचारांचे काहूर सुरू झाले. ते वाक्य आपल्या तोंडातून कसे बाहेर पडले असेल आणि रमेशच्या बायकोच्या छातीत डाव्या बाजूला गाठ असल्याची माहिती आपण कशी देऊ शकलो? तसेच आपला आवाज नेमका त्याच वेळेस कसा बदलला? प्रश्न आणि प्रश्न… त्याची उत्तरे दुर्गेशकडे नव्हती.

तो रविवार होता आणि दुपारी छानशी डुलकी घेऊन दुर्गेश दिवाणखान्यातील सोफ्यावर चहाची वाट पाहत बसला होता. नलिनीने म्हणजे त्याच्या बायकोने चहा आणला. त्याचे घुटके घेत असतानाच निशात फोनवर बोलत तिथं आला अन् तिथल्या एका खुर्चीवर पसरला. निशात उर्फ पप्पू हा दुर्गेश-नलिनीचा कॉलेजला जाणारा मुलगा. तो त्याच्या मित्राशी जोरजोरात बोलत होता… ‘‘अरे, त्या कोहलीचं काही सांगू नकोस मला. त्याचा फॉर्म गेलाय. गेल्या चार-पाच मॅचेसमध्ये त्यानं किती रन्स काढल्यात माहितीये ना तुला? एकदा 4, एकदा झिरो, एकदा 21 आणि एकदा 12… आता उद्याच्या मॅचमध्ये तो काय दिवे लावणार आहे?’’

पप्पूचे म्हणणे दुर्गेश नीट ऐकत होता.

‘‘बीट लाव माझ्याशी. कोहली फेल जाणार!’’ पप्पूचा ताव सुरूच होता. दुर्गेश अस्वस्थ झाला… अन् त्याच वेळी ते घडले. त्याचे डोळे चकाकू लागले. तो शांतपणानं बोलू लागला.

‘‘पप्पू, ऐक. अशी बीट लावू नकोस. हरशील तू. अरे, उद्याच्या साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या मॅचमध्ये कोहली 69 रन्स करेल, बघ.’’

दुर्गेशचा आवाज एकदम खोल विहिरीतून आलेल्या आवाजासारखा झाला होता. पप्पू आणि त्याची मम्मी दोघेही एकदम चमकले.

‘‘दुर्गेश…’’

तिने हाक मारली तसा दुर्गेश भानावर आला. तो वेळ मारून नेण्यासाठी म्हणाला, ‘‘अरे, गम्मत केली तुझी. माझा आपला मटका…’’ असे म्हणून त्याने डोळे मिचकावले. ती वेळ तर त्याने काही बाही बोलून मारून नेली होती पण खरी गंमत तर दुसर्‍याच दिवशी झाली. दुसर्‍या दिवशीची मॅच दुपारी होती आणि दुर्गेश त्यावेळी ऑफिसमध्ये आपल्या कामात गुंतलेला होता. अचानक त्याचा मोबाईल वाजू लागला. ‘‘पप्पा, अहो कोहली आऊट झाला आताच.’’

आभास

‘‘अरे, मग ही काय फोनवर सांगायची गोष्ट आहे का? आपली टीम खेळायला लागली अन् एक आऊट झाला की दुसरा कधी होईल, ते सांगता येतच नाही.’’

दुर्गेश आपली भविष्यवाणी विसरूनच गेला होता.

‘‘नाही पप्पा. खरी गंमत तर सांगायचीच राहिली. काय झालं ते ऐका. रोहित आणि राहुल एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले. त्यानंतर कोहली आला. तो आला तेच मुळी बॅट फिरवत. त्याच्या बॅटीतून आज रन्स नुसत्या वाहातच होत्या. पप्पा, तो आता आऊट झाला ते बरोबर 69 रन्स करून. तुम्ही रन्सचा एवढा अ‍ॅक्युरेट आकडा कसा सांगितलात ते सांगा.’’

दुर्गेशच्या हातातून मोबाईल पडतापडता वाचला. तो एकदम मटकन खुर्चीत बसला. त्याला आता जाणीव होऊ लागली की आपल्याला भविष्यात होणार्‍या घटना आधी कळतात. तो विचार करू लागला. हे कशामुळे झाले असेल? हे कधीपासून घडू लागले? पहिल्यांदा रमेशच्या बायकोच्या छातीतली गाठ कॅन्सरची नाही, असे आपण सांगितले ते बरोबर आले आणि आता कोहली 69 रन्स करणार, हेही खरे ठरले. त्याला आठवण झाली ती त्या लग्नाच्या रिसेप्शनची, तिथून घराकडे केलेल्या प्रवासाची, त्या प्रवासात भेटलेल्या त्या भगव्या वेशधारी आकृतीची, त्याच्या खोलखोल तेजस्वी डोळ्यांची, त्याने ‘हे घे’ म्हणून आपल्याकडे फैलावलेल्या हातांची. त्यानंतरच या दोन्ही घटना घडल्या होत्या. म्हणजेच त्या आकृतीने दिलेले जे काही होते ती होती सिद्धी भविष्यवाचनाच्या क्षमतेची. म्हणजे आपल्याला भविष्य कळते? कुणाच्या पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची आपल्याला आधी जाणीव होते? आपल्याला काहीतरी अतिंद्रिय शक्ती प्राप्त झाली आहे की काय? दुर्गेश विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला आणि पहिल्यांदा घाबरलाच. असे काही आपल्याला आधी कळत असेल तर मग? हे चांगले आहे की वाईट, याचे उत्तरही त्याला देता आले नाही मात्र आता पुन्हा आपण आपलीच परीक्षा घ्यायची, असे त्याने ठरवले. एक आठवडा लोटला. नेहमीप्रमाणे रात्री कामावरून परत आल्यावर त्याने आपल्या सोसायटीत गाडी पार्क केली आणि तो लिफ्टकडे वळला. लिफ्टचे बटण दाबले तशी लिफ्ट खाली आली. तिचे दार उघडले गेले तर दुसर्‍या मजल्यावरचे सोमण काका बाहेर आले. ‘‘काय सोमणकाका? रात्रीचं कुठं निघालात एवढ्या?’’

दुर्गेशने सहज विचारले पण सोमणांचे एक नव्हते की दोन नव्हते. त्यांचा चेहरा पडला होता. ते फारसे बोलायच्या मनःस्थितीत दिसत नव्हते. ‘‘काका, बोला ना? बोलत का नाही?’’

दुर्गेशने पुन्हा प्रयत्न केला. मोठ्या अनिच्छेनेच त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, ‘‘माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत आत्ता. काय होईल ते सांगता येत नाहीये. डेबिट कार्ड घ्यायला मी आलो होतो घरी. आता परत चाललोय हॉस्पिटलमध्ये.’’

सोमण म्हणाले आणि दुर्गेशकडे न पाहताच आपल्या कारकडे निघाले. ते कारपर्यंत पोचले मात्र दुर्गेशचा आवाज त्या पार्किंगमध्ये घुमला.

‘‘सोमणकाका, काळजी करू नका. दोन दिवसांनी बाबांचा व्हेंटिलेटर निघेल आणि पुढच्या सोमवारी ते घरीही येतील.’’

दुर्गेश आपली समजूत काढतो आहे, हे सोमणकाकांना समजले होते. त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अस्फुटपणाने ते धीर दिल्याबद्दल ‘थँक्स’ असे काहीतरी पुटपुटले. त्यांनी गाडीला चावी लावली आणि गाडी हॉस्पिटलकडे धावू लागली. दुर्गेशचा पुढचा आठवडा विलक्षण धावपळीचा होता. त्यांच्या कंपनीचे मोठे साहेब जेव्हाजेव्हा मुंबईहून येत तेव्हा तेव्हा आठ-आठ दिवस त्यांच्या कामाचा आढावा घेत. त्यांना प्रत्येक फायलीवर खुलासा हवा असे. त्या फायली अपडेट करण्यात दुर्गेशचे दिवस भुर्रकन उडत होते. त्याला रविवारीही ऑफिसला जावे लागले. सोमवारही असाच गेला आणि मंगळवारी सकाळी व्यायामाला जाण्यासाठी तो तयार होत होता तेवढ्यात दाराची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर सोमणकाका.

‘‘काका तुम्ही? एवढ्या सकाळी?’’

दुर्गेशला जरा आश्चर्यच वाटले. काकांचा चेहरा विलक्षण उजळला होता. दुर्गेशचे प्रश्न संपण्याच्या आतच ते उत्साहाने बोलू लागले. ‘‘दुर्गेश, अरे बाबांचा व्हेंटिलेटर हटला, त्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्यानं सुधारत गेली आणि कालच त्यांना घरी आणलंय.’’

‘‘अरे वा, वा. ते येतील घरी म्हणून मी तुम्हाला धीर दिलाच होता. छान झालं,’’ दुर्गेश मनापासून तोंडभरून बोलला.

‘‘मुद्दा तो आहेच दुर्गेश पण मला सांग दोन दिवसांनी व्हेंटिलेटर हटेल आणि सोमवारी ते घरी येतील, असं तू ठामपणानं कसं सांगितलंस?’’

‘‘अहो काही नाही, काका. तुम्हाला धीर देण्यासाठीच बोललो मी दोन-तीन दिवसांनी व्हेंटिलेटर हटेल म्हणून. ते जाऊ द्या. तुम्ही आनंदाची बातमी आणलीत, चहा घेणार ना?’’

‘‘अरे नाही, नाही. आत्ता नाही. मला आत्ता बाबांच्या गोळ्या आणायला जायचंय. पुन्हा कधीतरी वहिनींच्या हातचा चहा घ्यायला येईन मी.’’ असे ते म्हणाले आणि झटकन उठून बाहेर पडलेही. सोमणकाका बाहेर पडले खरे पण आतून हे सगळे ऐकत असलेली नलिनी बाहेर आली आणि तिने दुर्गेशकडे रोखून पाहिले. दुर्गेश अस्वस्थ झाला.

‘‘फारच उकडतंय आज. नाही का?’’

त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण नलिनीचे डोळे त्याच्या चेहर्‍याचाच वेध घेत होते. शेवटी तिने मौन सोडले.

‘‘दुर्गेश, मला खर सांग. तुला पुढच्या गोष्टी कळायला लागल्यात का?’’

‘‘छे, गं. आपलं बोलाफुलाची गाठ. त्यात काय फार सिरियस घेण्यासारखं नाही,’’ दुर्गेशने सारवासारव केली खरी पण नलिनीने विषय सोडला नाही.

‘‘दुर्गेश, मला थापा मारू नकोस. त्या दिवशी तू अंघोळीला गेला होतास तेव्हा तुमच्या ऑफिसमधल्या रमेशचा फोन होता तुला. तो सांगत होता, त्याच्या बायकोची गाठ कॅन्सरची नाही, असं तू ठामपणानं त्याला सांगितलंस. तसंच त्या दिवशी कोहली 69 रन्स करणार, असं तू पप्पूला सांगितलंस. आजही सोमणकाकांच्या बाबांच्या बाबत घडलेला प्रकारही तसाच. काय झालंय तुला? मला मोकळेपणानं सांग.’’

आता मात्र दुर्गेश शरण आला. त्याने तिच्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाला, ‘‘बस!’’ मग त्याने तिला त्याला आलेला अनुभव सविस्तर विस्कटून सांगितला. त्या दिवशी त्याने रात्रीच्या रिसेप्शनला लावलेली हजेरी, त्यानंतर अंधार्‍या रस्त्यांवर केलेला प्रवास, त्यात त्याला भेटलेली ती भगवी वेशधारी आकृती, तिचे ते तेजस्वी डोळे, त्यात त्याचे खोलखोल रूतत जाणे, त्याने ‘घे’ म्हणून त्याच्याकडे फैलावलेले हात… आणि त्यानंतर त्याला येत गेलेले भविष्य समजण्याचे अनुभव… नलिनी शांतपणाने, लक्ष देऊन दुर्गेशचे बोलणे ऐकत होती. तिचा चेहरा आता गंभीर झाला होता. ती बराच वेळ काहीच न बोलता बसून राहिली. तिचे ते तसे शांत बसणे दुर्गेशला विचित्र वाटले. तो म्हणाला, ‘‘का गं. शांत का?’’

‘‘नाही, विचार करतेय.’’

‘‘काही विचार-बिचार करू नकोस. मी ठरवलंय. आता कुणाच्याही बाबतीत काहीच भाकितं करायची नाहीत. मला काही समजलं तरी गप्प बसायचं.’’

‘‘गप्प बसायचं? काय वेडा-बिडा आहेस की काय? ऐक, मी काय म्हणते ते!’’ नलिनीचा आवाज आता निश्चयी होऊ लागला. तिचा चेहरा निग्रही झाला. तिच्यातल्या त्या बदलाने दुर्गेश आश्चर्यचकित झाला.

‘‘म्हणजे?’’

‘‘म्हणजे, म्हणजे वाघाचे पंजे. माझं ऐक आता. मी गप्प बसले त्याचं कारण मी काही एक ठरवत होते. आता मी सांगते तसं करायचं. बावळटासारखं वागायचं नाही.’’

‘‘म्हणजे? काय करायचं म्हणतेस तू?’’

दुर्गेशला काही अंदाजच येईना.

‘‘हे बघ. भविष्य समजण्याची शक्ती आली आहे तुझ्यात. ती त्या भगव्या वेशधारी आकृतीनं दिली असेल, या तुझ्या म्हणण्यात तथ्य वाटतंय मला पण आता ते महत्त्वाचं नाही. आता महत्त्वाचं आहे तुझ्या शक्तिचा उपयोग करणं. या शक्तिचा उपयोग केला तर आपण लोकांच्या उपयोगीही पडू आणि…’’

‘‘आणि ? आणि काय गं?’’

‘‘आणि त्यामुळं आपली ही ओढ-ग्रस्तीची परिस्थितीही बदलेल.’’

‘‘म्हणजे? आपण भविष्य सांगण्याचे पैसे घ्यायचे?’’

‘‘हो… काय वाईट आहे? आणि कोण घेत नाही? माझ्या बहिणीच्या-बंटीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आपण त्या कोणत्या ज्योतिष्याकडे गेलो होतो, आठवतंय का? त्याने खाटकन तीन प्रश्नांचे दोन हजार रूपये घेतले आपल्याकडनं. त्यांचं ज्ञान आहे आणि आपण ते घेतो आहोत. तसंच आपण घ्यायचे. ‘सर्व्हिस चार्ज’ समज हवं तर. पेपरात ज्योतिषविषयक या कॉलमखाली रोज किती जाहिराती छापून येतात, पाहिलंय ना ? त्यांच्याकडे लोक जातात आणि पैसे देतात, म्हणूनच तर त्यांना जाहिराती देणं परवडतं ना? सगळी घडी नीट बसली तर आपण कुठच्या कुठं जाऊ? तुला फोर व्हिलर घ्यायचीये, पप्पू किती दिवस मोटार-सायकलसाठी अडून बसलाय. आपल्या हाऊस लोनचा हप्ता फेडतानाच आपला निम्मा पगार संपतो आणि निम्मा संपतो रेशन-दुधात. मलाही काही हौस-मौज आहे की नाही…?’’

नलिनीच्या तोंडाचा पट्टा सुरू होता आणि त्या एकएक गोष्टीच्या दडपणाखाली दुर्गेश रूतत होता. त्याला असे भविष्य सांगणे कसेतरीच वाटत होते, पण बायकोपुढे काय करणार? आणि त्या पुढच्याच आठवड्यात गावातल्या सर्वाधिक खपाच्या पेपरात एक जाहिरात झळकली. ‘तुमच्या कोणत्याही तीन प्रश्नांची अचूक उत्तरे तारखेसह मिळतील. फक्त रविवारी. केवळ फोनवरून अपॉईंटमेंट. पुढील क्रमांकाला फोन करा आणि तुमच्या अडचणी सोडवा.’

ही जाहिरात छापून आल्यावरच नलिनीने दुर्गेशला दाखवली. त्याचे डोकेच भणाणून गेले. त्यानंतरचा रविवार आला आणि सकाळी उठल्यावर नलिनीने दुर्गेशला सांगितले, ‘‘आपल्या आज तीन अपॉइंटमेंट आहेत. सकाळी 11, दुपारी 4 आणि संध्याकाळी 5.’’

दुर्गेशला काय उत्तर द्यावे ते सुचेना. सकाळी अकरा वाजता त्यांची बेल वाजली आणि एक जोडपे समोर उभे राहिले…

यानंतर एक वर्ष उलटले. पहिल्या महिन्यात त्यांच्याकडे पेपरमधली जाहिरात वाचून दहा जण आले पण पुढच्या महिन्यात पेपरमधल्या जाहिरातीपेक्षा आधी अनुभव घेतलेल्यांनी त्यांच्या परिचयाच्या मंडळींना फोन नंबर दिलेल्यांची संख्या अधिक होती. ‘माऊथ पब्लिसिटी’चा अनुभव दुर्गेश-नलिनीला येत गेला. सहा महिन्यांनंतर तर नलिनीने फक्त महिन्यातून एकदाच जाहिरात देणे सुरू केले कारण दुर्गेशच्या या सिद्धीची ‘माऊथ पब्लिसिटी’ खूपच वेगाने झाली होती. कुणाची गाडी चोरीला गेली, कुणाच्या मुलीचे लग्न जमत नाही, कुणाचा मुलगा वेड्यासारखा वागतो, कुणाच्या पत्नीचे दुखणे कधी संपणार?, कुणाला नोकरी कधी मिळणार?, कुणाला शेअर मार्केटमध्ये यश मिळणार का?, कुणाचे नवे घर कधी होणार? तर कुणाला प्रमोशन कधी मिळेल…?

दुर्गेश या प्रत्येकाच्या प्रश्नाचे दिनांकासह उत्तर देत होता. ‘तुमच्या मुलीचे लग्न डिसेंबरमध्ये होईल, तुम्हाला या वर्षी नोकरीचा योग नाही पण पुढच्या वर्षीच्या 25 मार्चला नव्या नोकरीचे पत्र येईल…’ त्याने सांगितल्याबरहुकूम त्याच दिनांकांना त्या त्या गोष्टी होत होत्या. त्या गोष्टी झाल्या की ती व्यक्ती तो अनुभव पन्नास जणांना सांगत होती आणि त्या पन्नासपैकी तीस जण नलिनीला फोन करीत होते. आता दुर्गेशने त्याचे वन बीएचकेचे घर विकले होते आणि एका आलिशान सोसायटीतला थ्री बीएचकेचा डबल पार्किंगचा मोठा फ्लँट घेतला होता. त्याच्याकडे आता एक एसयुव्ही आली होती, पप्पूला नवी रेसर टु व्हीलर मिळाली होती तर नलिनीची महिला मंडळाच्या गलेलठ्ठ रकमेच्या भिशीच्या कार्यक्रमांची धावपळ सुरू होती.

एका रविवारी संध्याकाळी सगळ्या अपॉइंटमेंट संपवून दुर्गेश दमून बसला होता. नलिनीही महिला मंडळातून नुकतीच परतली होती. तिने चांगल्या दुकानातून उंची केक आणले होते. चहाबरोबर ते केक खात असताना दुर्गेश म्हणाला, ‘‘नलिनी, अगं रविवार हा पूर्वी माझा हक्काचा सुट्टीचा, आरामाचा दिवस होता. आठवडाभर ऑफिसमध्ये काम केल्यावरचा तो एक दिवस हवाहवासा वाटायचा. आता रविवारी सकाळपासून अपॉइंटमेंट्स सुरू होतात आणि संध्याकाळी संपतात. मला माझ्यासाठी वेळच राहात नाहीये.’’

नलिनी हसली.

‘‘हो रे राजा… मी तुझ्याशी बोलणारच होते. मला काय वाटतं, सांगू? तू आता नोकरी सोडावीस. आता आपला जम चांगला बसलाय या व्यवसायात. मग काय तू कधीही सुटी घेऊ शकतोस…’’

दुर्गेशला त्या सिद्धीची संभावना व्यवसाय म्हणून झालेली ऐकून कसेसेच झाले. तो काहीच बोलला नाही.

‘‘पाहूया…’’

एवढंच म्हणून त्याने सुस्कारा सोडला… अन्… अन् त्यानंतरच्याच रविवारी ती घटना घडली. …एक चाळिशीतली महिला आपल्या लहान मुलाला घेऊन दुर्गेशकडे आली होती. अपॉईंटमेंट आणि फी स्वीकारणे या गोष्टी नलिनीने आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. ती दोघे जण आली आणि तिच्याशी पहिल्यांदा नलिनी बोलली.

‘‘अहो, फी आधी द्यावी लागेल, हे तुम्हाला फोनवर सांगितलंच आहे.’’

‘‘पण मॅडम, आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, मी तुमचे पैसे बुडवणार नाही पण माझ्या मुलाकडे पाहा आणि मला मदत करा.’’

दुर्गेश समोर बसून हे सगळे ऐकत होता. त्याला कणव आली. तो काही बोलू जाणार तेवढ्यात नलिनी म्हणाली, ‘‘सॉरी. तुम्ही पैसे आधी जमवा, मग या.’’

ती दोघे गेली, पण त्या आईच्या नजरेतील आर्त भावना दुर्गेशला छळत राहिली. असेच काही दिवस गेले अन् एका संध्याकाळी दुर्गेश घाईघाईने घरी आला आणि नलिनीला म्हणाला, ‘‘नलिनी, राजूनं मला जेवायला बोलावलंय आज रात्री… मी उशिराच येईन…’’

‘‘पण जाणार कसे? तुमची फोर व्हीलर तर पप्पूनं नेलीये…’’

‘‘ओ… ठीके… मी माझ्या टु व्हीलरनंच जाईन.’’

दुर्गेश राजूकडे म्हणजे त्याच्या मित्राकडे जेवायला गेला. बर्‍याच दिवसांनी त्या दोन मित्रांची गाठ पडत होती. जेवणाबरोबरच त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यांच्या गप्पा सुरू असतानाच वीज गेली तेव्हा राजूने लगेचच इमर्जन्सी लाईट लावला आणि गप्पांना पुन्हा सुरूवात झाली. रात्र चढत गेली तसा दुर्गेश भानावर आला.

‘‘मी येतो रे राजू आता. गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही…’’

वीज आलेलीच नव्हती. टॉर्च घेऊन राजू त्याला सोडायला गाडीपर्यंत आला. त्याने गाडी काढली आणि रस्त्यावर आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्या भागात कुठेच वीज नव्हती. गाडी हळूहळू चालवत तो पुढे निघाला. काळाकुट्ट अंधार. रस्त्याच्या समोर दिसेल तेवढ्याच भागापुरते पुढे जायचे आणि मग पुढे पाहायचे, असे करतकरत तो पुढे सरकत होता. त्याचे घर सहा-सात किलोमीटर अंतरावर होते पण गावात कुठेच वीज दिसत नव्हती. अंधार्‍या रस्त्याने तो पुढे जात होता. एका वळणावर त्याने गाडी वळवली आणि त्याला वेग कमी करावाच लागला.

त्याच्यापासून वीस-पंचवीस फुटांवर रस्त्याच्या कडेला एक मानवी आकृती होती. गाडीचा प्रकाश त्या आकृतीवर पडला आणि तो शहारला. तीच ती आकृती होती. भगवे वेशधारी, लांब केस, कपाळावर टिळा. ती आकृती जवळ आली तशी तिच्याशी दुर्गेशची नजरानजर झाली. तेच तेजस्वी डोळे. त्याच्या डोळ्यांतून आरपास शिरणारे. संमोहित झाल्याप्रमाणे दुर्गेश जागेवरच उभा राहिला. यावेळेला ती आकृती दुर्गेशच्या आणखी जवळ आली होती. काही क्षण तसेच गेले… आणि एकदम ती आकृती बोलू लागली.

‘‘दुर्गेश… मी तुला सिद्धी दिली होती…’’

तिचा आवाज तसाच धीरगंभीर, खर्जातून आलेला. दुर्गेश ऐकत होता.

‘‘माझं नाव तुम्हाला कसं माहिती?’’

‘‘हं…’’ असे म्हणत त्या आकृतीने स्मितहास्य केले.

‘‘मला काहीही माहिती होऊ शकते… मी मनात आणलं तर…’’

‘‘तुम्ही कोण आहात?’’

उत्तरादाखल तिने पुन्हा स्मित केले. दोन क्षण गेले अन् ती बोलू लागली.

‘‘मी… मी आहे एक साधक पण या अनंत विश्वातलं माझं अस्तित्त्व नगण्य आहे. अर्थात नगण्य आहेही आणि नाहीही…’’

दुर्गेशला काही अर्थबोध होईना. त्याच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव उमटले मात्र अंधारामुळे ते भाव त्या आकृतीला दिसणे अशक्य होते. तरी आश्चर्य म्हणजे त्याची अवस्था तिने अचूक ओळखली.

गवसणी

‘‘तुला मी काय म्हणतोय ते समजलं नाही ना? हे बघ, या विश्वाचं अनंतत्व तुला माहितीये. विश्वाच्या तुलनेत माझ्या पार्थिवाचं अस्तित्त्व काहीच नाही! पण माझ्यातलं चैतन्य हा या विश्वाचाच एक भाग आहे आणि या विश्वाचं स्वरूप अखंड एकच आहे, त्यामुळे मीच विश्व आहे… माझ्यातही तू आहेस आणि तुझ्यातही मी आहे. आपण सगळेच अनंत, अविनाशी आहोत. अविनाशी आहे या सगळ्या विश्वातलं चैतन्य. त्या चैतन्याला ओळख. त्याच्याशी तुझा असलेला एकात्म धागा जाण. हा प्रवास आहे, ही यात्रा आहे. ही यात्रा आहे पण त्यासाठी कुठलाही रस्ता नाही. ही यात्रा आहे ती एकाच ठिकाणी थांबून करण्याची. निर्विचार, शून्यस्वरूप अस्तित्त्वाची अनुभूती घेण्याची. अनुभूती हा फार मोठा शब्द आहे पण किमान अनुभव घेण्याची असं आपण म्हणू. तू बाहेर बघण्यापेक्षा आत बघ. एका असीम शांततेचा अनुभव तुला येईल. आनंदस्वरूप परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर आनंदाच्या लाटांनी तू न्हाऊन निघशील. त्या सद्चिदानंदाशी तू आदिम काळापासून जोडला गेलेला आहेस. नव्हे, नव्हे, तू सद्चिदानंदस्वरूपच आहेस…

या प्रवासात तुला हे समजत जाईल. त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांत वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. काही सिद्धी आपण दुसर्‍या कुणात संक्रमित करू शकतो. तशीच भविष्यकथनाची सिद्धी मी तुला दिली होती.’’

त्या शांत, अंधार्‍या रात्री त्या आकृतीचा धीरगंभीर आवाज भरून राहिला होता. दुर्गेश भान विसरून ऐकत होता. त्याच्या मनी एक प्रश्न उभा ठाकला. तो काही बोलू जाणार तेवढ्यात ती आकृती पुन्हा बोलू लागली.

‘‘मी ही भविष्यकथनाची सिद्धी देण्यासाठी तुझीच निवड का केली, असा प्रश्न तुला पडेल.’’

आपल्या मनातलाच प्रश्न त्या आकृतीने कसा ओळखला, असा प्रश्न पडून दुर्गेश आश्चर्यचकित झाला पण आश्चर्य दाखवणे त्याने सोडूनच दिले होते.

‘‘दुसर्‍याच्या मनातले विचार समजण्याची सिद्धीही मला प्राप्त आहे पण ते सोड. मी काही महिन्यांपूर्वी तुझी निवड सिद्धी देण्यासाठी केली पण आतापर्यंत फक्त तुझीच निवड केली नाही तर याआधीही अनेकांना मी ही सिद्धी दिलीये. या सिद्धीचा सद्उपयोग व्हावा, समाजाचं कल्याण व्हावं, असं मला वाटतं. एकाला सिद्धी दिल्यानंतर त्याच्यावर माझं बारकाईनं लक्ष असतं. तो त्या सिद्धीचा योग्य वापर करतो का, हे तपासत राहतो. ज्याच्याकडून समाजाला उपयोग होत नाही, जो या सिद्धीचा केवळ धनाच्या लालसेने वापर करतो, त्याच्याकडून ती सिद्धी मी काढून घेतो.

तू आपल्या बायकोच्या आहारी जाऊन सिद्धीचा धंदाच सुरू केलास. शेवटी तर गरजू महिलेला, तिच्या मुलाला आपल्या सिद्धीची मदत देण्यास नकार दिलास. त्यामुळं मी तुझी सिद्धी काढून घेतो आहे. ही सिद्धी मी उपयोगात आणत नाही, याचंही कारण आहे. त्यात मी गुंतलो तर माझ्या साधनेत व्यत्यय येईल, म्हणूनच मी ती संक्रमित करतो. असो.’’

त्या आकृतीने आपले हात फैलावले आणि दुर्गेशच्या दिशेकडून स्वत:कडे हाताची ओंजळ तीनदा वळवली.

‘‘आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर अनेक सिद्धी तुम्हाला आपोआप प्राप्त होतात. त्या सिद्धीमध्येच अनेकजण अडकून पडतात. मग त्यांची वाटचाल थांबते. कोणतीही अपेक्षा न ठेवता, निष्कामतेने साधना सुरू ठेवावी. तुझी सिद्धी मी परत घेतली असली तरी तू साधना करू शकतोस. त्याने तू श्रीमंतांपेक्षा श्रीमंत होशील. लौकिकार्थानं, पार्थिवत्वाच्या अर्थानं नव्हे तर आत्म- स्थितीच्या अर्थानं. तू समृद्ध होत जाशील. ही समृद्धी तुला मोक्षाकडे, कैवल्याकडे घेऊन जाईल… चल, माझी जायची वेळ झाली सिद्धी प्रदानासाठी पुढच्या सत्पात्रीला भेटण्याची. त्याला शोधण्याची गरज नाही. तू भेटलास तसाच त्याच्या भेटीचा योगही लवकरच आहे. साधना कर. अर्थात कर म्हटलं की करण्याचं ते कर्मकांड नाही. तो सहजयोग आहे. साधना करावी लागत नाही, साधना घडते. ध्यान लावावं लागत नाही, ते लागतं…’’

ती आकृती वेगाने वळली अन् त्या अंधार्‍या रस्त्यावर दिसेनाशी झाली. ती गेली त्या दिशेला दुर्गेश डोळे फाडून पाहत राहिला. काही मिनिटांनी तो भानावर आला आणि गाडी घराकडे वळवली. तर असं सगळं झालं. दुर्गेशने नलिनीला सगळा प्रवास ऐकवला.

‘‘अर्थातच आता मी नोकरी सोडणार नाहीये आणि आता भविष्य कथनासाठीच्या अपॉइंटमेंट बंद करणार आहे.’’

दुर्गेश बोलला. नलिनी गप्प बसून ऐकत होती. ऑफिसमधून परत येत असताना नेहमीच नजरेला पडणारी ‘ध्यान केंद्र’ ही पाटी त्याला आता खुणावत होती. ध्यानाद्वारे साधनेचा प्रवास आता त्याला सुरू करायचा होता…

सुनील माळी  पुणे । 9822914580

निवासी संपादक ‘पुढारी’, पुणे

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा