भीमसेनास्त्र

Share this post on:

पौराणिक काळात अशी काही अस्त्रे होती की जेंव्हा कोणावर सोडली जात ती तेव्हांच थांबत ज्यावेळी ज्यांच्यावर सोडली आहेत ते त्या अस्त्राला संपूर्ण शरण जातील. ‘भीमसेनास्त्र’ हे असे अस्त्र आहे की ते वारंवार आपल्यावर यावे म्हणून जगभर लाखो रसिक वर्षानुवर्षे त्यांना शरण जात आहेत. काही नावे फारच समर्पक आहेत. भीमसेन हे त्यातलेच एक नाव.

त्यांच्या गाण्यात, वागण्यात नेहमी ही भीमसेनी ताकद जाणवत असे. बालगंधर्वांना राजहंस कुळात जन्म मिळावा व आपल्या बासरीने सर्वत्र प्रसिद्ध असलेले अमुल्यज्योती तथा पन्नालालजी यांचे आडनाव ‘घोष’ असावे हे ही सुंदर व सार्थ योगायोग आहेत.

भीमसेनजींचे पहिले स्वर कानावर पडले ते अर्थातच आकाशवाणी पुणे केंद्रावरून. माझी आई माझ्या लहान पणापासून रोज सकाळी रेडिओ लावत असे. ‘ हे आकाशवाणी पुणे केंद्र आहे सकाळचे ५ वाजून पन्नास मिनिटे झाली आहेत , आता ऐका ……. हे रोज कानावर पडत असे. पहिल्या निवेदनानंतर उ.बिस्मिला खान साहेब यांच्या सनईच्या सकाळच्या रागांच्या रेकॉर्ड वाजत व नंतर भक्ती संगीत असे. यामध्ये ‘अधिक देखणे तरी’, अणुरणीया थोकडा , इंद्रायणी काठी ही व इतर पंडितजींची गाणी कानावर पडत होती. यामध्ये आपले भाग्य असेल तर पंडितजींचे गुरु सवाई गंधर्व यांच्याही ‘झणी धाव आता’ व धाव घाली माझे आई या ध्वनिमुद्रिका ऐकायला मिळत. आता इंटरनेटवर सर्व काही आहे परंतु माझ्या लहानपणी सवाई गंधर्व यांचा आवाज ऐकायला मिळणे ही असंभव गोष्ट होती. मास्तर कृष्णराव यांचेही कधी भक्तीगीत ऐकायला मिळत असे. हे सर्व खूप छान वाटायचे. नकळत हे स्वरसंस्कार मनावर होत होते. संगीत सरिता , अनुरंजनी या विविध भारती केंद्रावरील कार्यक्रमात सुद्धा भीमसेनजींचे छोटे राग प्रसारित होत असत. नंतर थोडी समज आल्यानंतर आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे ‘नॅशनल प्रोग्रॅम’ ऐकू लागलो. हे दीड तासाचे असत. त्यावेळी ‘नॅशनल प्रोग्रॅम’ मध्ये गाणे हा कलाकाराचा मोठा सन्मान होता. सर्व भारतातील संगीतप्रेमी या कार्यक्रमावर कान ठेऊन असत. काही मित्रमंडळी एकत्र जमूनही ऐकत असत. पुण्यातील सुप्रसिद्ध तबला शिक्षक जी.एल.सामंत हे रेडिओवर थिरकवा खान साहेब, आमीर हुसेन खान साहेब किंवा मोठ्या कलाकाराचे तबला वादन असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून ऐकायला सांगत असत. ही गोष्ट मला सामंत सरांचे विद्यार्थी व आता वयाची ८२ वर्षे पूर्ण केलेले अत्यंत उत्साही पुण्यातील ज्येष्ठ भजनगुरु श्री. माधवराव लिमये यांनी मला सांगितली आहे. असे हे रेडिओ महात्म्य फार मोठे होते. आता या सर्व दंतकथा वाटतात.

१९५० च्या अलीकडे पलीकडे पं.भीमसेन जोशी यांच्या HMV कंपनीच्या ७८ आर.पी.एम रेकॉर्ड प्रकाशित झाल्या. यामध्ये मुलतानी, भैरवी, शंकरा , सुहा कानडा, बसंत, मिया मल्हार, पूरिया, शुद्ध कल्याण हे राग आहेत. तसेच काही कानडी पण निघाल्या. यात जलाधरा या , उत्तर ध्रुव दिन (कानडी उच्चारासाठी क्षमस्व ) व इतर आहेत. यासर्व मुळातच खूप ऐकण्यासारख्या आहेत. तरुणपणीचा आवाज व सवाई गंधर्वांचा जाणवणारा प्रभाव आनंददायी आहे. १९६० च्या एल.पी. रेकॉर्ड प्रसारित होऊ लागल्या. या दोन्ही बाजू मिळून ४५ मि. चालत असत. याचा कालावधी मोठा असल्याने व ध्वनिमुद्रण चांगले असल्याने त्या फार लोकप्रिय झाल्या. एल.पी. रेकॉर्ड व रेकॉर्ड प्लेयर घरी असणे हे प्रतिष्ठेचे मानले जात होते.

या १९६० पासूनच्या काळात भीमसेनजींच्या मिया मल्हार, पूरिया कल्याण, ललत, शुद्ध कल्याण,मालकं+स, मारू बिहाग अशी एकाहून एक सरस स्वररत्ने एल.पी. रेकॉर्ड द्वारा प्रसिद्ध झाली. भीमसेन जोशी यांचे एक फार वैशिष्ठ्य होते. ३, ७, २२ 1/२ मिनिटाच्या रेकॉर्ड असुदेत किंवा ३ तासाची मैफल असुदे त्याचे गाणे त्या त्या माध्यमाला अनुकूल असेच असे. किती वेळात किती व कसे गावे याचे ते एक उत्तम वस्तुपाठच होते. रेकॉर्ड असो किंवा मेहफिल असो गाणे परिपूर्ण असे.

२००६ साली सारेगामा इंडिया (पूर्वीची HMV) या कंपनीने माझ्याकडील ७८ आर.पी.एम.रेकॉर्डवरून ‘कोहिनूर” हा २ CD चा अल्बम प्रकाशित केला होता. सुप्रसिद्ध गायिका योजना शिवानंद या त्यावेळी सारेगामा इंडिया मध्ये अधिकारी होत्या. त्यांनी हे सर्व काम केले होते. यासाठी भीमसेनजींचे शिष्य व सवाई गंधर्वांचे नातू सुप्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे यांनी माझ्याकडे रेकॉर्ड आहेत असे योजना शिवानंद यांना सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी मला संपर्क केला व हा अल्बम पूर्णत्वाला नेला. श्रीकांत देशपांडे यांचा व माझा चांगला परिचय होता आजही त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी शीलाताई देशपांडे यांचेशी माझा परिचय आहे.

कुठल्याही साउंड सिस्टीम मध्ये भीमसेनजी गात असत. त्यांची कधी तक्रार नसे व हे वाढवा ते कमी करा अशा सूचनाही नसत. पुण्यातील जुन्या काळापासून ते आजपर्यंत साउंड सिस्टीम मध्ये कार्यरत असलेल्या नानासाहेब आपटे, सुरेश जुन्नरकर, खोडे, प्रदीप माळी यांचेही हेच मत असावे असे मला वाटते.

बडोदा येथील श्री.श्याम भागवत यांचा तेथे साउंड सिस्टीमचा व्यवसाय होता. ते सांगायचे की माझ्या सुरवातीच्या काळात १०० रुपये किमतीपासून ते पुढे जगातील सर्वश्रेष्ठ शुअर कंपनीच्या मायक्रोफोन पर्यंत अनेक प्रकारचे मायक्रोफोन मी पंडितजींच्या वेगवेगळ्या कालावधीतल्या कार्यक्रमात लावले आहेत पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांची खासियत अशी होती की कोणताही मायक्रोफोन असो पहिला स्वर लावल्यावर त्यांना त्याचा अंदाज येत असे की आवाज कसा पोचत असेल, त्याप्रमाणे ते गात असात. भीमसेनजींचे कार्यक्रम बडोद्यात नेहमीच्या ठिकाणापासून ते श्रीमंत गायकवाड सरकार यांच्या ‘लक्ष्मी विलास’ पॅलेस पर्यंत सर्व ठिकाणी झाले आहेत.

आकाशवाणीच्या देशातील बहुतेक सर्व केंद्रावर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. पुणे आकाशवाणी केद्रातल्या नव्या स्टुडिओचे उद्घाटन भीमसेनजींच्या गाण्याने झाले होते व ते चालू असताना पुणे केंद्रावरून प्रसारीतही केले जात होते. मी संध्याकाळी पुणे केंद्र लावले व गाणे ऐकायला लागलो. दोनच मिनिटे ऐकले, असे काही गात होते की क्या बात है. मला राहवेना. मी रेडिओ बंद केला तातडीने स्कूटर काढली व पुणे केंद्र गाठले. फार अंतर नसल्याने मी थोड्याच वेळात तेथे पोहोचलो. गेलो खरा पण निमंत्रण / पास वगैरे काही असेल तर? काय करायचे. असा विचार करू लागलो. पण मला काहीही अडचण आली नाही व पुढील गाणे मी प्रत्यक्ष तेथे बसून ऐकले. हे अनेक वर्षानंतर आठवल्यावर छान वाटते.

पुण्यात त्यांच्या मैफली अनेक ठिकाणी ऐकल्या. जुन्या लक्षी क्रीडा मंदिरात व गरवारे कॉलेज मध्ये ‘सुरेल सभा’ या संस्थेच्या अनेक मैफली होत असत. रजनीकांत कर्णिक हे त्याचे संचालक होते. साधारण १५ ऑगस्टच्या सुमारास पं.भीमसेन जोशी यांचे गाणे असे. पावसाळी वातावरण असे. लक्षी क्रीडा मंदिराची एक गंमत होती. सर्व गैरसोयी असलेले ते ठिकाण होते. स्टेजवर प्रेक्षक बसत व समोर गायक असे. तरीही तेथे अनेक वर्षे अनेक उत्तम कार्यक्रम रंगले आहेत. एका सकाळच्या गाण्याला अचानक मधेच काही वेळ लाईट गेली. भीमसेनजींनी प्रेक्षकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले की थांबू का चालू राहूदे या अर्थाने. गाणे छान चालले होते. अर्थातच लाऊड स्पिकर शिवाय गाणे चालू राहिले. तो त्यांचा आवाज अत्यंत स्पष्ट व छान येत होता. त्यादिवशी मल्हार चे अनेक प्रकार त्यांनी ऐकवले, ही एक पर्वणीच होती.

देशातील व पुण्यातील असे अनेक संगीत महोत्सव आहेत की यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांचा सहभाग असणे महत्वाचे असायचे, २५/३० किंवा अधिक वर्षे सलग अशा महोत्सवात पंडितजी गायले आहेत. वज्रदेही मंडळ, शिवाजी मंदिर,

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचा गुढीपाडवा ते रामनवमी असे अनेक आहेत.

१९८५ साली श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचा गुढीपाडवा ते रामनवमी या उत्सवात शेवटच्या दिवशी ‘संतवाणी’ चा कार्यक्रम होता. रामनवमी असल्यामुळे नूतन मराठी विद्यालयात सुधीर फडके यांचे ‘गीत रामायण’ होते व शनिवार असल्याने विश्रामबागवाड्यासमोर असलेल्या श्री झांजले विठ्ठल मंदिरात श्री.कृष्णराव मेहेंदळे यांचे भजन होते. माझ्यासमोर तीन पर्याय होते. मी संतवाणी ऐकायला गेलो. प्रचंड गर्दी होती. गणपती उत्सवात दगडूशेठ गणपतीचा मांडव जेथे असतो तेथे स्टेज होते व सध्या जेथे मंदिर आहे त्या फरासखान्यापर्यंत गर्दी होती. पहिल्या ‘जय जय राम कृष्ण हरी ‘ या गजरापासूनच असा काही आवाज लागला होता की पुछो मत. फार सुंदर तीन चार तास गाणे झाले. याचे ध्वनिमुद्रण मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण आजपर्यंत मिळाले नाही.

आता एका हुकलेल्या मैफिलीबद्दल सांगतो. सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिर येथे गणेश उत्सवात नेहमी गाण्याचे कार्यक्रम होत असत. खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम नाटक, कीर्तन मुलाखती सुद्धा होत असत. एके वर्षी पं.भीमसेन जोशी यांचे रात्रीचे गाणे होते. ९ ते १०-३० या वेळात प्रचंड पाऊस पडला होता. मी नुकतीच गाणी ऐकायला सुरवात केली होती. एवढा सरावला नव्हतो. त्यामुळे वाटले की एवढा पाऊस पडला आहे की, आता गाणे काही होणार नाही. फोन वगैरे काही नव्हतेच. तसेच भीमसेनजी ही काय चीज आहे हे माहित नव्हते. उशीराने पाऊस थांबला व गाणे झाले. माझे मात्र न गेल्यामुळे हुकले.

याच शिवाजी मंदिराच्या पाठीमागच्या दारासमोर उपाशी विठोबा हे पेशवेकालीन मंदिर आहे. आषाढी एकादशीपासून पुढे ८ दिवस उत्सव असतो. यां गायन, कीर्तने नेहमीच होत असत , आजही होतात. यामध्ये बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, वसंतराव देशपांडे, मालिनी राजूरकर, उषा मंगेशकर यांची गाणी, व गजाननबुवा राईलकर अशा अनेक नामवंत कीर्तनकार यांची कीर्तने झाली आहेत. जुन्या काळात रामकृष्णबुवा वझे शेजारीच रहात होते त्यांचेही गाणे झाले असेल पण नक्की माहीत नाही. साठे कुटुंबीय हे सर्व देवळातले उत्सव करतात. त्यातील बंडोपंत साठे हे सुप्रसिद्ध पेटीवादक होते व ते भीमसेनजी, कुमारजी, वसंतराव देशपांडे अशा अशा अनेक नामवंत गायकांची साथ करत असत. १९९० च्या दरम्यान कुमार गंधर्व यांचे बरोबर वझेबुवांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यावेळी कुमारजींनी बंडोपंत साठे यांचे आठवण काढली होतो हे आठवले. अशाच एका वर्षी पं.भीमसेन जोशी यांचे गाणे या उत्सवात होते. देवळाचा सभामंडप लहान आहे. त्यामुळे बोर्डावर जाहीर केले नव्हते. पण आम्हाला खबर लागली होती. त्यामुळे गाणे ऐकायला मी व माझा संगीतप्रेमी मित्र व तबला पखवाज वादक अविनाश तिकोनकर आम्ही गेलो होतो. आम्ही भीमसेनजींच्या इतक्या जवळ बसलो होतो की त्यांचा हात गाताना आम्हाला लागेल काय असे वाटावे. गाणे अर्थातच चांगले झाले. असे ते दिवस होते.

याउलट संतवाणीचा एक कार्यक्रम मुंबईच्या जुन्या दोन बाल्कनी असलेल्या षण्मुखानंद थिएटर मध्ये सुद्धा हाऊस फुल झालेला ऐकला होता. त्यावेळी फिल्म फेअर अॅवार्ड कार्यक्रम तेथे होत असत , यावरून कल्पना येईल.सवाई गंधर्व महोत्सवातील गाणे हे तर त्यांचे होम पीच होते. यातील त्यांचे गायन व उभारणीत त्यांचा सहभाग याला तोड नाही.

सवाई गंधर्व महोत्सवाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी अनेक वर्षे रमणबागेत जात असे. फार छान वातावरण असे. मांडव, कोच , खुर्च्या , भारतीय बैठक यांची मांडणी चालू असे. साउंड सिस्टीमची चाचणी चालू असे. सर्व संबंधित माणसांची ये जा चालू असे, टेम्पो, गाड्या येत असत. मुख्य म्हणजे ही सर्व व्यवस्था नीट होते आहे का हे या महोत्सवाचे सर्वेसर्वा पं.भीमसेन जोशी जातीने पहात असत.

माझे मित्र व सुप्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे १९८३ पासून आजपर्यंत या महोत्सवाचे फोटो काढत आहेत. त्यांनी पं.भीमसेनजींच्या अत्यंत सुंदर फोटोंचे एक कॅलेंडर व त्यांच्या फोटो व विचारांचे (मराठी, इंग्रजी व कानडी भाषेत ) मिळून एका कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. एवढ्या वर्षात सतीशने भीमसेनजींच्या काढलेल्या फोटोंची संख्या हजारांच्या घरात असेल. मला वाटते भीमसेनजींचे एवढे फोटो काढणारे सतीश पाकणीकर हे एकमेव फोटोग्राफर असतील.

भीमसेनजींचे गाड्यांचे प्रेम तर सर्वश्रुत आहे. पूर्वी त्यांच्याकडे एक Fiat ( 1100 D) ही गाडी होती. याचे दरवाजे उलटे उघडत असत. ही गाडी स्वत: चालवत असताना ते नेहमी दिसत असत. मला तर त्याचा नंबर अजूनही आठवतो आहे MRX – 7013. त्यांनी ही गाडी जेंव्हा विकली तेंव्हा ती घेणारेही जोशीच होते. लक्ष्मी रोडवरील टॅक्स सल्लागार व्ही.एन.जोशी .

मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट आहे. एका कार्यक्रमात भीमसेनजी प्रमुख पाहुणे आले होते. बोलताना ते सहज म्हणाले सध्या जोशी लोकांची चलती आहे. असे मार्मिक ते नेहमी बोलत असत. एकदा सवाई मधील त्यांच्या गाण्याच्या आधी ग्रीन रूम मध्ये गाणे चालू होते. त्यांचे एक ज्येष्ठ शिष्य तंबोऱ्याच्या साथीला होते. त्यावेळी शिष्याचा आवाज छान लागला होता. त्यावर पंडितजी आपल्या नर्मविनोद शैलीत म्हणाले की आज गुरु महाराज माझ्यावर प्रसन्न आहेत.

बाजीराव रोडवर अनेक वर्षांपासून वैद्य सायकल मार्ट नावाचे सायकल दुरुस्तीचे दुकान होते. त्या दुकानात भीमसेनजी नेहमी येत असावा. त्यांचा आणि वैद्य काका यांचा जुना परिचय असावा. वैद्य काका सवाई गंधर्व महोत्सवात स्वयंसेवकाचे काम करीत असत. या दुकानाच्या समोर असलेल्या सुप्रसिद्ध भारत गायन समाजात एके संध्याकाळी भीमसेन जोशी आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे होते. असा योग फारच क्वचित येत असेल. दोघे थोडा थोडा वे गायले. गाणे झाल्यावर मन्सुरांनी आपल्या खिशातील बिडीचे कट्टल काढले व दोघांनी तेथेच एक एक बिडी शिलगावली. दोघांचे एकमेकांवर फार प्रेम होते.

असेच प्रेम सुप्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल व भीमसेनजी यांचे होते. लहान भाऊ व मोठी बहिण असेच ते नाते होते. एका सवाई महोत्सवाच्या काही दिवस आधी भीमसेनजी पुण्यातून कोठे गेले कोणालाच माहित नव्हते. सर्वजण काळजीत होते. त्यावेळी ते हुबळीला देशपांडे नगर मधील गंगुबाई हनगल याचे घरी गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी आमचे श्रेष्ठी रामभाऊ कोल्हटकर साहेब, त्यांचे मित्र ज्येष्ठ लेखक व पत्रकार श्री.विनय हर्डीकर आणि मी हुबळीला गंगुबाई हनगल याचे घरी गेले होतो. त्यावेळी अक्कांनी आम्हाला खूप किस्से सांगितले.

गंगुबाई एकदा पुण्याला आल्या होत्या. त्यांना कोणता पुरस्कार देण्यात येणार होता.

त्यावेळी भीमसेनजींची प्रकुती ठीक नव्हती , त्यामुळे गंगुबाई त्यांना भेटायला घरी गेल्या होत्या. तो फोटो पेपरमध्ये आला होता. त्यांच्या दुसऱ्या दिवशी मी गंगुबाईंना भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की तुम्हा दोघांचा फोटो आला आहे. त्यावेळी त्या म्हणाला की भीमसेन त्यांना म्हणाले अक्का यावर्षी सवाईमध्ये गायला या. आता माझे वय किती आहे,शक्य आहे का. त्यावर मी त्यांना म्हणालो की तुमचे प्रेम सर्वांनाच आहे, तुम्ही नुसत्या आलात तरी सर्वांना आनंद होईल, यावर त्या खुश झाल्या.

श्री. रामभाऊ कोल्हटकर यांची एक कल्पना होती. भीमसेनजींच्या व्हिडिओ वरून ललत पासून सुरवात करून सकाळ, संध्याकाळ,रात्र यानुसार राग निवडून एक चक्र तयार करून कार्यक्रम करावा. सर्वांना ही कल्पना फार आवडली. खुद्द भीमसेनजी यांनाही आवडली. त्यासाठी तयारी सुरु झाली. मी आणि कॅमेरामन महेश गायकवाड जवळजवळ १५ दिवस रोज ‘कलाश्री’ या भीमसेन जोशी यांच्या घरी जात होतो.

सर्व व्हीडिओ चेक करत होतो. एक वरची खोली आम्हाला दिली होती. जाताना त्यांची विश्रांती झालेली असायची. ते हॉलमध्ये असायचे. चहापाणी झाले का याची जातीने चौकशी करायचे. झाले असले तरी आग्रहाने पुन्हा आपल्यासमोर चहा व इतर काही मागवायचे. खूप वेगळा अनुभव होता.

माझ्या मुलाच्या मुंजीची पत्रिका द्यायला मी व माझी पत्नी श्रद्धा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. कुलदैवत, ग्रामदैवत आणि आमचे अधिक प्रेमाचे हे स्वरदैवत.

पंडितजींची एक खासियत होती. कुणीही निमंत्रण दिले की ते सांगत मी येतो. विषय पूर्ण करत असत. नाहीतर चर्चा, आग्रह हा कधी न संपणाराच असे. पत्रिका दिल्यावर ते माझ्या पत्नीला म्हणाले की तुम्हाला किती मुले ? तिने सांगितले एकच. त्यावर ते विनोदाने म्हणाले काय कोकणस्थीपणा करताय. आम्ही बघा ११ भाऊ आहोत. त्यानंतर त्यांच्या घरी असलेल्या कलकत्ता येथील उत्कृष्ट मिठाईच्या भल्या मोठ्या वड्या आम्हाला दिल्या. माझ्या पत्नीने थोडे खाल्ले. त्यावर त्यांनी प्रेमाने जणू दमच दिला, हे सर्व माझ्यासमोर संपवायचे. त्यांची नजरच अशी होती की नाही म्हणणे शक्यच नव्हते.

नंतर पुन्हा केव्हातरी काही कामानिमित्ताने भीमसेनजींच्या घरी जाण्याच्या योग आला. काम झाल्यावर मी विचारले , पंडितजी मला बालगंधर्वांच्या गाण्याचे रेकॉर्डिंग मिळाले आहे. आपली तब्येत आणि आपल्याला, वेळ असेल तेव्हा आपण ऐकाल का ? पंडितजी म्हणाले ,” जरूर , मला ऐकायला खूप आवडेल. मी तुम्हाला सांगेन माझी वेळ ‘’. त्यानंतर त्यांनी विचारले त्या रेकॉर्डिंग मध्ये ” नृपकन्या तव जाया ” हे भैरवी मधले पद आहे का. मला फार आवडते. पण त्या रेकॉर्डिंग मध्ये हे पद नव्हते. या पदाच्या व बालगंधर्वांच्या आठवणीने भीमसेनजी एकदम पन्नास एक वर्षे मागे गेले. यावेळी त्यांचा चेहरा अतिशय आनंदी दिसत होता. आपले सर्व आजार ते विसरले आणि त्यांना कानावर हात ठेऊन गाणारे आणि श्रोत्यांचे व गाताना स्वतःचे भान हरपणारे बालगंधर्व दिसायला लागले व आपण स्वतः त्या बैठकीत समोर बसून गाणे ऐकत आहोत असा भाव दिसत होता. या पदात भीमसेनजी इतके रमले की त्यांनी ते पद म्हणण्यास सुरवात केली व नारायणराव बालगंधर्व कशा जागा घेत असत, त्यांच्या हरकती या फार मोलाच्या व त्यांच्या मर्मबंधातील गोष्टी मला सांगितल्या व काही वेळ हे पद ते गायले. गाणारे होते भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि ऐकणारा या विश्वातला भाग्यवान श्रोता मी एकटाच. ही भीमसेनजींची भैरवी मी आयुष्यभर मनात ठेवली आहे. पूर्वी सवाई गंधर्व महोत्सव संपल्यानंतर सुद्धा काही दिवस आपल्या कानात ते संगीत सारखे वाजत आहे असे वाटायचे. आज भीमसेन जोशी आपल्यातून गेले त्याला जवळजवळ एक तप व्हायला आले तरीही आपल्या कानात त्यांचे संगीत वाजतच आहे व राहील. तर असे हे ‘भीमसेनास्त्र’ संगीत रसिकांवर कायमच मोहिनी घालत राहील.

संजय संत, पुणे

9604272937

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!