सुप्रसिद्ध कवी आणि शिवव्याख्याते जावेद शेख लिखित अम्मी अब्बूच्या कविता हा काव्यसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. काव्यसंग्रह मनोमन खोलवर भावला. अंतर्मुख आणि अस्वस्थ करून गेला.
पुण्याच्या चपराक प्रकाशनाने अतिशय दर्जेदार स्वरूपात हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. तब्बल ३७ कविता या काव्यसंग्रहात आहेत. काव्यसंग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ करणारे चित्रकार श्री राहुल पगारे तसेच प्रत्येक कवितेला अतिशय देखणी आणि समर्पक अशी दर्जेदार रेखाचित्रे श्री प्रवीण उगले यांनी केली असून काव्यसंग्रहाची सुंदरता त्यामुळे अधिक वाढली आहे. ज्येष्ठ कवी माननीय विवेक उगलमुगले यांनी या काव्यसंग्रहाची उत्तम अशी पाठराखण केली आहे .
काव्यसंग्रहाला अम्मी अब्बूच्या कविता असे म्हटले असले तरी या एकूणच कविता सामाजिक विषय आणि आशयाला स्पर्श करणा-या आहेत. माणूस ही जात आणि माणूसकी हाच मोठा धर्म आहे हीच शिकवण देणारी ही कविता जशी आहे तशीच ती मुक्या जीवावर प्रेम करण्याची शिकवण देणा-या अम्मी अब्बूच्या या कविता आहेत.
कवीच्या अम्मी अब्बूच्या संघर्षमय जीवनाच्या या कविता वाचताना वाचकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. गरिबीतही नेटाने संसार करणारी अम्मी आणि जगण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे अब्बू हे कवी जावेद शेख यांच्यासाठी प्रेरणास्थानी आहेत. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सतत कवीला प्रेरणा देणारे आहेत.
मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंब , घरातील वातावरण , परस्परांशी असलेले नातेसंबंध , त्यांचे धार्मिक संस्कार , परंपरा , सणवार, बोली आणि इतर धर्मियांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचे अस्सल आणि जीवंत चित्रण कवितेत पानोपानी असल्याने या कविता ख-या वाटतात.
मध्यमवर्गीय कुटुंबव्यवस्था ते समाजव्यवस्था असा कवितेचा प्रवास होताना दिसतो . त्यामुळे ही कविता केवळ कवीची न राहता वाचकांची होऊन जाते. ही कविता एकूणच आपल्याला सकारात्मकतेची शिकवण देते. प्रतिकूल परिस्थितीतही उभे राहण्याची जिद्द मनात निर्माण करते. समता , बंधूंभाव आणि एकतेची ज्योत मनात प्रज्वलित करते.
कवी जावेद शेख यांच्या कवितेचा पोत खरोखरीच वेगळा आहे . त्यांच्या कविता वाचून वाचक अंतर्मुख होऊन जातो. कधी सुन्न होऊन जातो. अम्मी आणि अब्बूमध्ये अनेक वाचकांना जगण्यासाठी असाच संघर्ष करणा-या आणि काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या आई वडिलांचे दर्शन घडते .
कवितेचा मुख्य बाज हा मुक्तछंदात्मक आहे. तरीही ती आशयघन आहे. त्यात नाद आहे. गेयता आहे. प्रवाही आहे. वाचनीय आहे. ती रंजनवादी किंवा कुठल्याही स्वप्नांच्या दुनियेत रमणारी नाही तर आयुष्यातील कठोर वास्तव्याला अधोरेखित करणा-या या कविता आहेत. प्रत्येक कवितेला सुटसुटीत आणि समर्पक असे शीर्षक आहे.
अम्मी अब्बूच्या जशा या कविता आहेत तशा कवी जावेद शेख यांच्या आयुष्याचे दर्शनही या कवितेतून घडत जाते.
हा कवी संवेदनशील आहे. आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे तर तो पाहतोच पण आयुष्यात हातून कळत नकळत घडलेल्या चुकांही तो प्रांजळपणे मान्य करतो.
कवी जावेद शेख हे कुठल्याही कल्पनेच्या दुनियेत रमणारे कवी नाही. कविता लिहिण्यासाठी त्यांना निसर्ग अथवा कपोलकल्पित गोष्टींपेक्षा अम्मी अब्बू हेच त्यांच्या कवितेचा विषय होतात . हे मोठे प्रशंसनीय आहे.
कवी जावेद शेख यांच्या या कविता वाचून त्यांचा भविष्यकाळ उज्वल असल्याची खातरी वाटते. एक उत्तम आणि हद्यस्पर्शी काव्यसंग्रह!!
कवी जावेद शेख यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील काव्य प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!!
सुनील पांडे
नीरा (पुणे )
मो. 9817829898
अम्मी अब्बूच्या कविता
पाने – 112, मूल्य – 130
घरपोच मागविण्यासाठी आमच्या shop.chaprak.com या संकेतस्थळाला भेट द्या
संपर्क : 7057292092
जावेद शेख सर हे खूप छान कविता करतात, त्यांचे विचार आणि भावना ह्या कवितेतून व्यक्त होताना दिसतात, कविता मध्ये समाजातील घडणाऱ्या घटनांचे फार छान चित्रण असलेले दिसून येते😊🌹👌