माइंड रीडर (कथा) – राजीव तांबे

जागतिक कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सॅम बर्डींनी फोन घेतला. भारताचे पंतप्रधान म्हणाले, ‘‘एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गोपनीय कामासाठी तुमची मदत हवी आहे. लगेचच दिल्लीत पोहोचा. आता यानंतर श्री. अशोक शर्मा तुमच्याशी संपर्क साधतील.’’


थोड्याच वेळात डॉ. सॅम बर्डींच्या दाराशी एक काळी गाडी येऊन थांबली. बर्डी तयारच होते.
गाडीतून उतरणार्‍या माणसाने, ‘‘मी अशोक शर्मा’’ असं म्हणताच बर्डी गाडीत बसले. तिथून जवळच्या विमानतळावर आणि तिथूनच ते खास विमानाने दिल्लीला रवाना झाले.
त्याच दिवशी संध्याकाळी संरक्षण मंत्री, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार श्री. सेनगुप्ता आणि रॉ चे प्रमुख सी. माधव यांच्यासोबत डॉ. बर्डींची मिटींग सुरू झाली.
सेनगुप्ता बोलू लागले, ‘‘आता मी जे सांगणार आहे ते फक्त आपल्यातच रा v CV. B. Popहिलं पाहिजे.’’
‘‘आपल्या देशापुढे एक महाप्रचंड संकट उभे आहे आणि यातून मार्ग कसा काढावा हेच आम्हाला कळत नाहीए. डॉ. बर्डी आम्हाला यासाठीच तुमची मदत हवी आहे. पाक दहशतवाद्यांनी एक मोठा लोखंडी पेटारा समुद्रमार्गे भारतात आणला आहे. हा पेटारा त्यांनी गुजरातच्या किनारपट्टीवर उतरवला. तिथून तो ट्रकमधून दिल्लीच्या दिशेने घेऊन जात होते. हा पेटारा त्यांनी ट्रकमधे कपाटं, खुर्च्या, टेबलं आणि काही खोके यामधे बेमालूम लपवला होता. जणू काही तो ट्रक घरातलं सामान घेऊन जात आहे, असं वाटत होतं. तो पेटारा दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. सोबत वेशांतर केलेले चार दहशतवादी होते! पण एका जकात नाक्यावर संशय आल्याने त्यांनी तो ट्रक तपासला.  इतका मोठा पेटारा पाहून त्यांनी तो उघडून दाखवायची विनंती केली. एका दहशतवाद्यांने त्या माणसावर पिस्तूल रोखून त्याला खाली ढकलून दिलं. ट्रक पळाला. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. नंबर प्लेट खोटी असल्याने ट्रक शोधणं अवघड झालं. पुढे नाकाबंदीमध्ये तो ट्रक लोकेट झाला. आधी ट्रकमधून आमच्यावर अनपेक्षित हल्ला झाला. आपणही फायरींग केलं! पण अंधाराचा फायदा घेऊन तीन दहशतवादी पळून गेले. एक आपल्या ताब्यात आहे.’’
‘‘आता प्रॉब्लेम असा आहे की… हा पेटारा 9 फूट लांब आणि 5 फूट उंच आहे. या पेटार्‍याला कुलूप नाही. तिथे 12 डिजीटस् असणारे डिजीटल लॉक आहे. त्याचा कोड नंबर आपल्याला माहीत नाही. त्यामुळे तो पेटारा उघडता येत नाही. चौथा दहशतवादी अस्लम याला पोलिसी इंगा दाखवल्यावर तो कोड नंबर सांगायला तयार आहे…’’
डॉ. बर्डी म्हणाले, ‘‘म… प्रॉब्लेम काय आहे? कोड नंबर टाका आणि पेटारा उघडा.’’
‘‘प्रॉब्लेम तिथेच आहे सर.’’ सेनगुप्ता पुढे बोलू लागले, ‘‘जर त्या कोडमधला एक जरी डिजीट चुकला तर त्या पेटार्‍याबचा स्फोट होऊ शकतो. त्या पेटार्‍यात ऑटो केमिकल वेपन्स आहेत. प्रथम स्फोट होऊन तो पेटारा फुटेल आणि मग ती ऑटो केमिकल वेपन्स जवळच्या 50 किलोमिटरच्या प्रदेशात उधळली जातील. प्रदेश बेचिराख तर होईलच पण जी लोकं वाचली आहेत ती महाभयानक रोगांना बळी पडतील.’’
‘‘अस्लम हा प्रशिक्षित मानवी बॉम्ब आहे. त्याला मरणाची भीती नाही. त्याने आम्हाला तो सिक्रेट कोड नंबर सांगितला पण तो खरा आहे, हे कसं कळणार? म्हणून आम्ही त्याला ‘लाय डिटेक्टर’ला जोडलं. लाय डिटेक्टर हा मेंदूत होणार्‍या रासायनिक क्रियांचा वेध घेत असतो… पण… इथेही लाय डिटेक्टर संभ्रमित होतो किंवा काही वेळा एका क्षणाकरिता अस्लम खरं बोलतो आहे असंही सांगतो. त्यामुळे आम्हाला…’’
सेनगुप्तांना थांबवत डॉ. बर्डी म्हणाले, ‘‘जर असं होत असेल तर काम सोपं आहे. मला थोड्या वेगळ्या पद्धतीने संशोधन करावे लागेल. तातडीने काही मशीन्स लागतील तर काही मला नव्याने तयार करावी लागतील पण मला खातरी आहे की मी अस्लमच्या मदतीने तो सिक्रेट पासवर्ड क्रॅक करू शकतो.’’
अतिशय भारावून जात सेनगुप्ता म्हणाले, ‘‘सर… सर आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, म्हणून तर तुम्हाला बोलावलं आहे! पण सर, मला आणखी दोन गोष्टी सांगायच्या आहेत, त्या सांगू का?’’
बर्डी विचारातच गुंतले होते.
सी. माधव यांनी खूण करतातच सेनगुप्ता पुढे बोलू लागले. ‘‘त्या पेटार्‍यात 192 तासांचा टायमर लावलेला आहे, अशी पण एक शक्यता आहे…’’
‘‘तुम्हाला कसं कळलं हे?’’ माधव यांनी विचारलं.
‘‘तो पेटारा म्हणजे तो वेपन बॉक्स प्रवासात कसा हाताळावा याबाबत सूचना देणारी एक हस्तपुस्तिका आम्हाला त्या ट्रकमध्ये मिळाली. त्यामुळे कोडनंबर सोडून बाकी डिटेल्स आम्हाला अगदी थोडक्यात तरी कळू शकले. आता आपल्याकडे फक्त 118 तास बाकी आहेत.’’
‘‘आणि दुसरी गोष्ट कुठली?’’
‘‘या वेपन बॉक्समध्ये असलेली ऑटो केमिकल वेपन्स आपल्याला निकामी करावी लागतील. तशी यंत्रणा आपण विकसित केली आहे. पण जर का ही वेपन्स 111.389.689 पेक्षा वेगळ्या कोड व्हर्जनची असतील तर आपल्याला त्यासाठी वेगळा शोध घ्यावा लागेल. जोपर्यंत हा वेपन बॉक्स उघडत नाही तोपर्यंत आपल्याला वेपन्सचा व्हर्जन कोड कळणार नाही. अशी सगळी गुंतागुंत आहे.’’
‘‘बर्डी सर, यासाठी तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा…’’
‘‘हा देश तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. सर मला भीती…’’
‘‘तुम्ही बोलत असतानाच मला हवी असणार्‍या  मशीन्सची आणि इतर सामानाची यादी मी तुम्हाला मेल केली आहे’’ बर्डी आपल्या लॅपटॉपवर काम करत बोलत होते.
‘‘सर हे सर्व तुम्हाला लगेचच मिळेल. तुम्हाला आणखी काय हवं आहे?’’
‘‘मला अस्लमचे सर्व मेडिकल रिपोर्टस हवे आहेत. विशेषत: त्याला लाय डिटेक्टरला कनेक्ट करण्याआधी व नंतर त्याचं ब्रेन मॅपिंग आणि ब्रेन स्कॅनिंग करून ते रिपोटर्स मला लगेचच द्या. ब्रेन मॅपिंग आणि ब्रेन स्कॅनिंग करणारा एक हुशार तज्ज्ञ मला हवा आहे! पण… त्याला आपल्या कामाची व मी कोण आहे याची अजिबात कल्पना देऊ नका’’ बर्डींचं बोलणं सुरू असतानाच सेनगुप्तांच्या फोनवर मेसेज झळकला.
मेसेज वाचून सेनगुप्ता म्हणाले, ‘‘सर आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी तयार आहेत. आपण काम सुरू करू शकता. मी आपल्या आत्ताच्या मिटींगचा रिपोर्ट लगेचच पंतप्रधानांना देत आहे. या ऑटो केमिकल वेपन्समुळे सगळेच तणावाखाली आहेत सर.’’
अचानक सी. माधव यांच्याकडे वळून बर्डी म्हणाले, ‘‘या संशोधनासाठी मला एक अत्यंत विश्वासू मदतनीस हवा आहे.’’
माधव म्हणाले, ‘‘येस सर. डॉ. अरविंद तुमच्या मदतीला येतील.’’
मिटींग संपली तेव्हा तीन तास संपले होते. फक्त 115 तास उरले होते.
बर्डी तडक प्रयोगशाळेत पोहोचले. तिथे डॉ. अरविंद त्यांची वाटच पाहत होते.
बर्डींनी सांगितल्याप्रमाणे तिथे व्होकल कॉर्ड नलायझर, व्हॉइस सेन्सो डॉपलर, न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग आणि ब्रेन ग्राफ नलायझर ही चार मशीन्स आणली होती.
तोपर्यंत अस्लमचे मेडिकल रिपोर्टस मिळाले.
बर्डींना एक नवीनच मशीन तयार करायचं होतं आणि त्याची चाचणी त्यांना डॉ. अरविंद यांच्यावर घ्यायची होती.
अस्लमचे ब्रेन स्कॅनिंग आणि मॅपिंगचे रिझल्ट पाहिल्यावर त्यांच्या मनात एक योजना घोळू लागली. बर्डींना लाय डिटेक्टर मशीनच्या पुढे एक पाऊल जाऊन त्यांना ‘ट्रूथ फाइंडर’ शोधायचा होता. बर्डींनी ‘ट्रूथ फाइंडर’ मशीनचा आराखडा कागदावर तयार केला. यासाठी लागणार्‍याच गोष्टींची यादी त्यांनी अरविंदना दिली.
‘‘अरविंद प्लीज ती व्हॉइस सेन्सो डॉपलर सिंक्रोमॅश, न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग मशीन्स ताबडतोब डिसमेंटल करा.’’
‘‘हो सर’’ अरविंद म्हणाले आणि कामाला लागले.
हे खरंच शास्त्रज्ञ आहेत की जरा वेडसर आहेत? हे अरविंदना कळेना. चांगली मशीन्स उगाचच डिसमेंटल करणं हा वेडेपणाच आहे, असं अरविंद यांचं मत होतं.
खरोखर दहाच मिनिटांत बर्डी यांनी मागवलेल्या सगळ्या गोष्टी आल्या.
अरविंद भुकेने कासविस झाले होते. डॉ. बर्डींची परवानगी घेऊनच ते जेवायला गेले.
आणलेल्या सामानातून आणि उघडलेल्या मशीन्समधील काही भाग वापरून बर्डींनी ‘एको व्हॉइस डॉपलर’ आणि ‘व्हॉइस वेव्हज् कनव्हर्टर’ अशी दोन मशीन्स तयार केली. या सगळ्यांना सेनर्सस कॉर्डस् जोडल्या.
न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग मशीनमध्ये त्यांनी सुधारणा करताना ते इतर मशीन्सशी लॅन तर होईलच पण ते सिंक्रोनाइज होत असताना त्याची नॅलॅटिकल पॉवर वाढावी यासाठी त्यात त्यांनी काही नवीन भाग जोडले.

ही दोन नवीनच मशीन्स पाहून अरविंद चाटच पडले. बर्डी आता ट्रूथ फाइंडर मशीनच्या जवळ पोहोचले होते. हे मशीन म्हणजे एक कॉम्बो पॅक होता. अनेक मशीन्स एकमेकांना सिंक्रोनाइज करून त्याचा अंतिम रिझल्ट ट्रूथ फाइंडरच्या स्क्रीनवर दिसणार होता.
आता इथपर्यंत आणखी 108 तास आणि 20 मिनिटं बाकी होती. अस्लमच्या मेंदूत होणार्‍या रासायनिक क्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रेन मॅपिंग आणि ब्रेन स्कॅनिंगच्या सिडी मागवल्या.
सुधारित न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग मशीनमध्ये त्यांनी त्या सिडी लोड केल्या. त्यांचं विश्लेषण करण्याची जवाबदारी त्यांनी डॉ. अरविंदांवर टाकली.
आता शेवटचे 100 तास आणि 05 मिनिटं राहिली होती. आता डॉ. बर्डींना विश्रांतीची नितांत गरज होती.  किमान सहा तास तरी झोप आवश्यक होती. अरविंदांना गुड नाईट करून ते झोपायच्या खोलीत गेले. शेवटचे 92 तास बाकी होते तेव्हा ते पुन्हा कामाला लागले. अरविंदांनी केलेल्या विश्लेषणांवर त्यांनी नजर टाकली. डॉ. बर्डींनी प्रथम अरवींदांवरच प्रयोग करायचं ठरवलं.

अरविंदांना लायडिटेक्टर मशीन कनेक्ट केलं. ब्रेन मॅपिंग आणि ब्रेन स्कॅनिंग तज्ज्ञ पवनकुमार तिथे आले आणि त्यांनी आपल्या मशीन्सचा ताबा घेतला. आता ‘एको व्हॉईस डॉपलर’ आणि ‘व्हॉईस वेव्हज् कनव्हर्टर’ अशी दोन मशीन्स त्यांना जोडली. त्याच्या गळ्याजवळ आणि डोक्याला त्याच्या सेनर्सस कॉडस् जोडल्या. शेवटचे मशीन जोडण्या अगोदर डॉ. बर्डींनी अरविंदांच्या कानात काहीतरी सांगितले.
मग त्यांनी सुधारित न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग मशीन सर्व मशीन्स सोबत सींक केलं. त्यांनी पवनकुमारांना त्यांच्या काचेच्या ऑपरेटींग रूममध्ये जाऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे बर्डी अरविंदांशी काय बोलत आहेत ते पवनकुमारांना ऐकू येऊ नये अशी व्यवस्था केली आणि सर्व मशीन्स सुरू झाली.
डॉ. बर्डी अरविंदांच्या समोर उभे राहून बायकांची नावे ठराविक अंतराने घेऊ लागले.
कमला.., विमला.., अर्चना.., सुजाता.., निता.., रेखा…, वासंती…, सुवर्णा…, नीलिमा…, जया…, स्वाती…, सुषमा…, दूर्गा…
आणि त्याचवेळी ऑपरेटींग रूममधून पवनकुमारांनी ग्रीन सिग्नल दिला.
आणि…
सुधारित न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग मशीनच्या स्क्रीनवर ‘सुधा’ हे नाव चमकलं. बर्डींनी सर्व मशीन्स थांबवली. त्यांनी डॉ. अरविंदांना विचारलं, ‘‘तुमच्या आईचं नाव ‘सुधा’ आहे का?’
अरविंद अवाक् झाले! त्यांना या गोष्टीवर विश्वासच बसेना.
डॉ. बर्डींचा हात घट्ट धरत त्यांनी विचारलं, ‘‘तुम्ही माझ्या मनातलं कसं ओळखलं? हे कसं शक्यं आहे? हा तर चमत्कार आहे. हे मशीन म्हणजे ‘माइंड रीडर’ आहे. मला सांगा हे कसं काय शक्य झालं?’’
बर्डी आनंदाने खूर्चीत कोसळले. आता शेवटचे 89 तास शिल्लक होते. सगळे जमले आणि बर्डी बोलू लागले.
‘‘जेव्हा मला सेनगुप्ता म्हणाले, ‘की अस्लमला ‘लाय डिटेक्टर’ला जोडलं. लाय डिटेक्टर हा मेंदूत होणार्‍या. रासायनिक क्रियांचा वेध घेत असतो पण इथेही लाय डिटेक्टर संभ्रमित होतो किंवा काहीवेळा एका क्षणाकरिता अस्लम खरं बोलतो आहे असं ही सांगतो. मी याच मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं. तो कोड नंबर 12 डिजीटसचा आहे. तो जर तो विसरला तर त्याचे पण मरण अटळ आहे. तो मानवी बॉम्ब आहे व त्याला मरणाची भीती नाही हे जरी मान्य केलं तरी जेव्हा सोबतचे साथीदार पळून जातात, वाचतात, जिवंत राहतात… तर मग आपण का मरायचं? असाही तो विचार करत असावा. त्यामुळे तो 12 डिजिटसचा कोड आपण विसरू नये म्हणून अस्लम तो कोड मनातल्या मनात म्हणत असणार. त्यावेळी लाय डिटेक्टर पॉझीटिव्ह दाखवत असणार कारण त्याचवेळी मेंदूतील न्युरॉन्स सकारात्मक बदल दाखवत असणार. म्हणून मग… मी ‘एको व्हॉईस डॉपलर’ आणि ‘व्हॉइस वेव्हज् कनव्हर्टर’ अशी दोन मशीन्स तयार केली. यां सगळ्यांना सेनर्सस कॉर्डस् जोडल्या. न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग मशीनची अ‍ॅनलायझींग पॉवर फारच कमी होती. थोडे साहस करून त्याला एक स्क्रीन जोडून मशीनची नॅलॅटिकल पॉवर वाढवली. सर्व मशीन्स एकमेकांना सिंक करून घेतली. मग मी डॉ. अरविंदांना सांगितलं की, ‘कृपया तुमच्या आईचं नाव मनात सतत घेत राहा. जोपर्यंत मी थांबा सांगत नाही तोपर्यंत नाव घेतच राहा.’ मी त्यांच्या समोर उभं राहून वेगवेगळ्या बायकांची नावं घेत होतो. म्हणजे डॉ. अरविंद कानाने एक नाव ऐकत होते तर मनात दुसरेच नाव घेत होते. त्याचवेळी पवनकुमार त्यांच्या मेंदूतील रासायनिक क्रियांवर लक्ष ठेवून होते. मनातल्या मनात जरी नाव पुटपुटले तरी गळ्यातील व्हॉइसकॉर्डस् अत्यंत सूक्ष्म रूपात थरथरतात. ही थरथर व्होकल कॉर्ड अ‍ॅनलायझरने टिपली आणि ती व्हॉइस सेन्सो डॉपलरकडे पाठवली. खूप वेळ झाला तरी आईचे नाव येत नाही तेव्हा त्यांनी अधिक जोरात आपल्या आईचे नाव मनातल्या मनातच घेतले. हीच थरथर एको व्हॉइस डॉपलर मशीनने पकडली. त्याचवेळी मेंदूतील रासायनिक क्रियांनी सकारात्मक बदल दाखवला. व्हॉइस वेव्हज् कनव्हर्टरच्या मदतीने या वेव्हजचे चुंबकीय लहरीत रूपांतर करता आलं आणि ते शक्य झालं.’’
सेनगुप्तांनी आनंदाने डॉ. बर्डींना मिठी मारली.
शेवटचे 83 तास शिल्लक होते.
सेनगुप्ता म्हणाले ‘‘आता अस्लमची पाळी.’’
Lie detector थोड्याच वेळात म्हणजे केवळ 9 मिनिटांतच अस्लमला हजर केलं गेलं. वेगवेगळी मशीन्स, वायरींगचे गुंते, विविध प्रकारच्या कॉर्डस् आणि काचेची ऑपरेटींग रूम पाहून अस्लम घाबरला. आता आपलं नक्की काय होणार त्याला कळेना.
माधव त्याला म्हणाले, ‘‘अस्लम तुझ्याकरता ही शेवटची संधी आहे. तुझे तिनही मित्र सहीसलामत पाकिस्तानला पोहोचले आहेत. ते जिवंत आहेत पण आता तुझी मरण्याची वेळ झाली आहे. आता आम्ही ही पेटी एका बोटीत ठेवणार आहोत. या पेटीवर तुला तारेने बांधून ठेवणार आहोत आणि बोट खोल समुद्रात सोडून देणार आहोत आणि अर्थात या सार्‍याचं चित्रीकरण करून आम्ही ते टिव्हीवर तर दाखवणार आहोतच पण तुझ्या घरच्यांनाही पाठवणार आहोत. तर आता तयार हो.’’
अस्लम धायमोकलून रडू लागला. ‘‘सोबतचे तिघे गद्दार आहेत, त्यांनी मला फसवलं,’’ असं सांगू लागला.
अचानक हात जोडून म्हणाला, ‘‘मला पण जिवंत राहायचं आहे. माझी बेअब्रू करू नका. मी तुम्हाला कोडनंबर सांगायला तयार आहे पण मी बरोबर कोड नंबर सांगितल्यानंतर ‘मला तुम्ही जिवंत ठेवणार’ असं वचन द्या.”
सेनगुप्तांनी त्याचा उजवा हात हातात घेऊन अस्लमला वचन दिलं. अस्लम लाय डिटेक्टरच्या खुर्चीत बसला. आता सगळे श्वास रोखून पाहू लागले.
डॉ. बर्डी त्याला म्हणाले, ‘‘अस्लम घाबरू नकोस.’’
‘‘मला भीती वाटते की, तू तो बारा अंकी नंबर विसरशील.  म्हणून आपण त्याचे दोन-दोन प्रमाणे सहा भाग करूया. मी सांगितलं की तू पहिले दोन अंक मनात म्हणत राहायचे.  काही बोलायचं नाही. मी दोन-दोन अंक म्हणत राहीन. माझं समाधान झालं की थांबेन. मग मी तुला पुढचे दोन अंक मनात म्हण म्हणून सांगेन बस्स! तू काही काळजी करू नकोस. तू जिवंत राहावास आणि आपल्या घरी परत जावास अशीच आमची इच्छा आहे. आता रिलॅक्स हो.’’
अस्लमच्या समोर फक्त बर्डी राहिले. बाकी सर्व ऑपरेटींग रूममध्ये गेले. सर्व मशीन्स सुरू झाली.
अस्लमच्या चेहेर्‍यावर पूर्ण तणाव दिसत होता. आपण कोड नंबर सांगायला तयार आहोत पण हे ऐकायला तयार नाहीत. तर ते म्हणत आहेत की, ‘‘तू मनात तो कोड नंबर म्हण! हे कसं काय शक्य आहे? म्हणजे हा मला मारायचाच प्लॅन असणार! मी न सांगता त्यांना कोड नंबर कळणार कसा? आणि त्यांना कोड नंबर न कळल्याने माझं मरण आणि बेअब्रू तर होणारच होणार.’’
इतक्यात…
डॉ. बर्डींनी हात वर करून सर्व मशीन्स थांबवण्याचा इशारा दिला.
अस्लम आणखीनच घाबरला. भीतीने पांढराफटक पडला.
बर्डी त्याच्या जवळ जात म्हणाले, ‘‘तू का घाबरला आहेस ते मला समजलंय. कोड नंबर सांगितलाच नाही तर तो आम्हाला कळणार कसा? असं तुला वाटतंय… हो ना?’’
अस्लमचा चेहरा निवळला आणि तो म्हणाला, ‘‘हो… हो...’’
ऑपरेटींग रूममधून पवनकुमारनी ग्रीन सिग्नल दिला.  याचा अर्थ सगळी मशीन्स व्यवस्थित काम करत आहेत.
बर्डी म्हणाले, ‘‘माझं चुकलंच. आपण असं करूया, तू तो 12 आकडी कोड नंबर या कागदावर लिही. तो तुझ्या डोळ्यासमोर ठेव…’’


अस्लम आता भलताच घाबरला होता. तो थरथरत म्हणाला, ‘‘मी तुम्हाला खोटं सांगितलं की तो कोड नंबर माला पाठ आहे पण तसं नाही. मला तो थोडा फार आठवतो आहे पण आम्ही विसरलो तर गडबड होऊ नये म्हणून तो कोड नंबर एका कागदावर लिहिला आहे आणि तो कागद घडी करून एका पातळ पिशवीत घालून तो माझ्या शर्टाच्या आतील बाजूस शिवला आहे.’’
अस्लमने थरथरत आपला शर्ट काढला. तो शिवलेली पिशवी शोधू लागला पण त्याला ती कुठेच मिळाली नाही. इतक्यात सेनगुप्ता आत आले. त्यांनी खिशातून पिस्तूल काढलं. रूमालाने पुसलं आणि पुन्हा खिशात ठेवलं.
अस्लमचे पाय लटपटू लागले. तो म्हणाला, ‘‘हा माझा शर्ट नाही. माझे कपडे तुमच्या पोलीस चौकीत आहेत. हा इंडीयन शर्ट माझा नाही.’
आता मोठाच पेच निर्माण झाला. अस्लमचा शर्ट होता गुजरातच्या पोलीस चौकीत आणि अस्लम होता दिल्लीत.
डॉ. अरविंद कामाला लागले.
बर्डी म्हणाले, ‘‘हरकत नाही.  तुला जेवढा नंबर आठवतो तेवढा मनात म्हण. बाकीचं मग पाहू. घाबरू नकोस. शांत राहा आणि खरं बोल.’’
पुन्हा सर्व मशीन्स सुरू झाली.
अस्लम एकदम डोळे चमकवत म्हणाला, ‘‘मला पहिले काही अंक आठवतात…’’
बर्डी म्हणाले, ‘‘शाबास. पहिले दोनच अंक डोळ्यासमोर आण. मनातल्या मनात म्हणत राहा.’
आणि बर्डी अंक म्हणू लागले,
56,
76,
13,
98,
48,
43,
54,
01,
77,
88,
99,
55,
86…
सुधारित न्युरॉन्स लोकेटिंग अ‍ॅण्ड बुस्टींग मशीनच्या स्क्रीनवर 31 हा अंक झळकला त्याचवेळी पवनकुमारांनी ग्रीन सिग्नल दिला.
बर्डी त्याला धीर देत म्हणाले, ‘‘आता पुढचे दोन अंक मनात म्हणत राहा…’’
पुन्हा तीच प्रोसेस सुरू झाली.
सुमारे 42 अंक म्हणून झाल्यावर स्क्रीनवर 32 हा अंक झळकला, सोबत ग्रीन सिग्नल. पुढचा अंक तुलनेने लवकरच कळला. 59.
सातवा आणि आठवा अंक अस्लम आठवत होता. अंक आठवण्यासाठी त्याला सुमारे 29 मिनिटं लागली आणि तो अंक होता 74.
आता चार अंक बाकी होते.
अस्लम म्हणाला ‘‘मला अजिबात आठवत नाही.’’
बर्डी अत्यंत विश्वासाने म्हणाले, ‘‘तो अंक मला माहीत आहे कारण मी तुझ्या बॉसबरोबर काम केलं आहे.’
‘‘कोण? अफ्ताब बरोबर?’’
‘‘हो.’’
‘‘तू बरोबर ओळखलंस.’’
‘‘अफ्ताब शिराज रोडवर राहतो ना?’’
अस्लमला काहीच कळेना.
खरं म्हणजे अफ्ताबसारखा मोठा माणूस लाहोरमधल्या प्रतिष्ठीत शिराज रोडवरच राहात असणार असा त्याचा समज होता. अस्लमने मान हलवली.
बर्डींनी अंक म्हणायला सुरूवात केली आणि अस्लमने डोक्याला ताण देत अंक आठवायला सुरूवात केली. सुमारे 48 मिनिटांनंतर स्क्रीनवर 20 हा अंक झळकला.
आता अस्लम थकला होता. त्याने चहा मागितला. त्याला थोडी हुशारी वाटली. तो गयावया करत म्हणाला, ‘‘सरजी मुझे मार डालो! पण आता यापुढे मला काहीच आठवत नाही. काही म्हणजे काहीच आठवत नाही. मला मारा. मला ठार मारा. करा माझी बेअब्रू जगभर. करा करा…’’ आणि तो रडायलाच लागला.
बर्डी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले.
इतक्यात सेनगुप्तांना गुजरातहून मेसेज आला. गुजरातच्या पोलिसांनी अस्लमचा शर्ट बाजूलाच ठेवला होता. त्यांनी शर्टाला आतून शिवलेली चिठ्ठी शोधली पण समुद्रातून प्रवास करताना त्याची कुणाशी तरी झटापट झाली असणार कारण तो शर्ट थोडा फाटला होता. शिवण उसवली होती. ती कोड नंबर लिहिलेली चिठ्ठी पाण्यात अर्धवट भिजली होती.
मेसेज वाचताना सेनगुप्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. डॉ बर्डींनी त्यांच्या माइंड रीडरवर शोधलेले सर्व अंक अचूक होते.
‘‘दुसर्‍याच्या मनातली गोष्ट समोरच्या स्क्रीनवर अचूकपणे वाचून दाखवणे’ हा चमत्कार केवळ बर्डीच करू शकतात. गर्व आहे की असा माणूस भारतीय आहे.’’
इतक्यात एक घोटाळा त्यांच्या लक्षात आला.
त्या चिठ्ठीवरचा अकरावा अंक 3 होता! पण… बारावा अंक पाण्याने पुसला गेला होता आणि तिथे शाई पसरली होती. मोठाच बिकट प्रश्न निर्माण झाला.
कोड नंबरमधला एकही अंक चुकणं परवडणारं नव्हतं.
सेनगुप्ता आणि माधव यांनी अस्लमला शेवटचा अंक आठवण्याची पुन्हा पुन्हा विनंती केली पण अस्लमने फक्त कपाळावर हात मारून घेतला.
आता हातातोंडाशी आलेला घास जातो की काय? वेपन बॉक्स तिथेच असल्याने आता इथे महाप्रलय होतो की काय? सगळेच चिंतेत पडले.
बर्डी म्हणाले, ‘‘मला थोडा वेळ द्या. मी शोधतो तो शेवटचा अंक.’’
बर्डी लॅपटॉप घेऊन आकृत्या काढून त्यातून काही आकडेमोड करू लागले पण काही निष्पन्न होईना.
त्यांच्या मनात एक शंका आली आणि थोड्या वेगळ्याप्रकारे विचार करता करता त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
डॉ. बर्डी आनंदाने ओरडले, ‘‘शेवटचा बारावा अंक 7 आहे. नक्कीच 7 आहे.’’
त्याक्षणी पवनकुमारांनी आतून ग्रीन सिग्नल तर दिलाच पण स्क्रीनवर पण 7 हा अंक झळकू लागला. सगळेच भारावून गेले.
बर्डी म्हणाले, ‘‘ही अगदीच सोपी ट्रिक आहे. खरं म्हणजे याआधीच हे मला सुचायला हवे होते. 31.32.59 आणि 74.20.37 ही लाहोरची अक्षांश रेखांश पोझीशन आहे. कमॉन ओपन द वेपन बॉक्स.’’
वेपन बॉक्स ओपन झाला.
सुदैवाने ऑटो केमिकल वेपन्स ही अत्यंत जुन्या व्हर्शनची असल्याने ती निकामी करण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे होतेच.
आणि महाप्रलय टळला!
सेनगुप्तांनी आनंदाने डॉ. बर्डींना मिठीच मारली.
तोपर्यंत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री पण हजर झाले.
डॉ. बर्डींची पाठ थोपटत पंतप्रधान म्हणाले, ‘‘मलाच काय या देशाला तुमचा अभिमान वाटतो. प्रत्येकवेळी नवनवीन कल्पना शोधून त्या प्रत्यक्षात आणणं आणि त्याचा उपयोग मानव कल्याणासाठी करणं, हे केवळ तुम्हीच करू शकता. प्रत्येक भारतीयासाठी तुम्ही आयकॉन आहात. उद्या विज्ञानभवनात तुमचा मोठा सत्कार करूया. आणखी काय करूया?’’
डॉ. बर्डी हात जोडत म्हणाले, ‘‘माझ्यासाठी दोन गोष्टी करा…’’
‘‘अहो डॉक्टर तुमच्यासठी दोनच काय पण दोन हजार गोष्टी जरी केल्या तरी त्या कमीच आहेत हो. सांगा…’’
‘‘मी खूप थकलो आहे. मला विश्रांतीची प्रचंड गरज आहे. माझी लगेचच निघण्याची व्यवस्था करा आणि दुसरं म्हणजे, आपण या अस्लमला जिवंत ठेवण्याचं वचन दिलं आहे, ते पाळा.’’
अस्लमने धावत येऊन बर्डींना मिठी मारली आणि म्हणाला, ‘‘चुकलंच माझं. तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या देशात असती तर मी या मार्गाला गेलो नसतो. डॉक्टर तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर!’’
डॉक्टर अस्लमकडे पाहत गंमतीने म्हणाले, ‘‘अस्लम लाय डिटेक्टर लावल्यावर पण हेच वाक्य बोलशील ना?’’
त्यानंतर सगळे खदखदून हसले.

– राजीव तांबे.

पूर्व प्रसिद्धी – ‘लाडोबा’ दिवाळी अंक २०२२

ही कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा