ग्रामीण जीवनातील खेळ

खेळ ही काही चांगल्या प्रकारे वेळ घालविण्याची आणि आनंद मिळविण्याची किंवा करमणुकीची साधी गोष्ट नाही. माणसाचे आरोग्य आणि खेळ खांचा घनिष्ठ आणि आंतरिक संबंध आहे. आपल्या पंचेद्रियांची सक्षमता, कौशल्यविकास याच्याशी तो निगडित आहे. खेळ हा क्षणार्धात अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेचा ऊर्जा घटक आहे. मुक्त हालचालीसाठी शरीर चापल्य याच्याशी तो निगडित आहे. खेळ हा सांघिक भावनेला सशक्त करणारा एकमेव घटक आहे. एवढेच नव्हे तर माणसाची जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी तुम्ही कोणता खेळ खेळता यावर अवलंबून असते.

प्रदेश बदलला की, समाजातील खेळांचा प्राधान्यक्रम बदलतो. राष्ट्र बदलले की खेळांचा क्रम बदलतो. इंग्लंडसारखा देश केवळ एका चेंडूभोवती धावतो आहे. जगातले अनेक देश क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत आणि टेनिसपासून गोल्फपर्यंत जे खेळ खेळतात; ते सारे एका चेंडूभोवती आखलेले आहेत. फक्त त्या चेंडूचा आकार कमी अधिक झालेला असेल एवढंच! चेंडूबरोबर खेळावयाच्या खर्चिक खेळापेक्षा साठ-सत्तर वर्षांपूर्वी ग्रामीण जीवनात जे नानाविध खेळ खेळले जात होते ते कौशल्य, चापल्य, नैपुण्य आणि संघभावना या दृष्टिने खरोखर अद्वितीय असे होते. शिवाय या ग्रामीण खेळांना तयार केलेल्या मैदानाची गरज नसते. खर्चिक साधनांची आवश्कता नसते. बिनखर्चाच्या, परिसरातील उपलब्ध वस्तूंच्या आधारे हे सारे खेळ खेळले जात होते.

आट्या पाट्या
लंगडी
कबड्डी
सूर पारंब्या
लेझीम

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात जे खेळ खेळले जात होते ते दोन गटात विभागले जात. ते दोन गट म्हणजे एक सांघिक खेळ आणि दुसरा वैयक्तिक कौशल्यावर आधारित खेळ. वैयक्तिक खेळामध्येही चार-सहा मुलांचा सहभाग असायचा. आट्यापाट्या, कबड्डी, लेझीम, लंगडी, सूरपारंब्या या खेळांना सांघिक रूप असायचे. एकेका संघात सातपासून दहा-अकरापर्यंत खेळाडू असायचे आणि असे दोन संघ परस्परांविरूद्ध खेळ खेळत. लेझीम खेळात

गडी बाद करणे असला प्रकार नसतो. सारेजण एका ओळीत, एका ठेक्यात, एका लयीत आणि वाकून-झुकून, पुढे-मागे एकाचेवळी मोहक हालचाली करत जेव्हा हातातले लेझिम वाजवतात त्यावेळी बघणार्‍यांचे देहभान हरपून जाते. ठेक्यात उचललेले अर्धवट पाऊल, त्याची पुढे-मागे होणारी नखरेल हालचाल, सार्‍या देहाची लयबद्ध हालचाल आणि सोबतीला असलेल्या वाद्यांचा गजर यामुळे लेझिम खेळाचे दृश्य डोळ्यात मावता मावत नाही. यातल्या एका जरी गड्याचा पाऊल चुकला किंवा उशीरा पडला तरी त्याचा बेरंग होतो. अनेकदा असे भासते की, या खेळातले पदन्यास म्हणजे भरतनाट्य, कुचिपुडी अशा भारतीय नृत्याचे ग्रामीण रूप होय. त्यामुळे हा खेळ कुणालाही खेळता येत नाही. एकतर छानपैकी लेझीम वाजवता आला पाहिजे. देहाला चपळाई असली पाहिजे. संगीताचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे आणि आपल्या शरीराची ठेवण सडपातळ, कणखर, प्रमाणशील असली पाहिजे. प्राथमिक शाळेत असताना आमच्या वर्गातला एक वसंता नावाचा मुलगा देहाने टोमॅटोसारखा लंबगोलाकार असा होता. त्याचे शरीर स्थूल वाटावे असे होते. उंचीला कमी असल्यामुळे तो अधिक जाड वाटायचा. स्थूल शरीरामुळे त्याच्या हालचाली मंद व्हायच्या. त्यामुळे त्याला या आमच्या लेझीम पथकात फारसे कोणी घेत नसत. कारण आम्ही सारे वाद्यांच्या ठेक्यावर स्वतः भोवती गर्रकन वळून मूळ स्थितीला आलो तरी या वसंताचे वळणे त्यावेळपर्यंत अर्धेच व्हायचे. जेव्हा आमचे तोंड पूर्वेला वळलेले असे, तेव्हा तो पश्चिमेकडे तोंड करून उभा असायचा. शिवाय त्याला एवढा मोठा बोला घेऊन नाचावे लागत असल्याने लवकर दम लागायचा. त्यामुळे तो या खेळापुरता बाद व्हायचा. म्हणून लेझीम हा खेळ संगीत आणि नृत्य यांचा झालेला सुरेख संगम म्हणता येईल. या खेळाला झिंग आणणारी उत्कटता आहे. शिवाय या खेळात ‘पाहणे’ आणि ‘ऐकणे’ यांचा संगम झालेला असल्याने त्याची येणारी नशा काही औरच आहे. बघणारा माणूस नकळत आपल्या पायाचा ठेका सुरू करतो. त्या नादात व नृत्यात स्वतःला पार हरपून जातो. संगीत आणि नृत्य या कला इतर कलांच्या तुलनेने सौंदर्याचा दिव्य साक्षात्कार घडविण्याबाबत श्रेष्ठ मानाव्या लागतात. प्राथमिक शाळेतील आम्ही विद्यार्थ्यांनी या लेझीम खेळातून अशा साक्षात्काराचा अनुभव तृप्तपणे घेतलेला आहे. ग्रामदैवतेची यात्रा, लग्नाची मिरवणूक, एखादा धार्मिक विधी झाल्यावर निघणारी गावफेरी, देवाचा रथ किंवा पालखीची मिरवणूक अशा निमित्ताने या लेझीम खेळाचा आनंद आम्ही आमच्या बालपणी आकंठ उपभोगला आहे. ग्रामीण भागातल्या आजकालच्या मिरवणूका आता डीजीच्या कर्णकर्कश आवाजात दहावीस गांधील माशा चावल्यावर एखाद्याने थयथयाट करावा अशा कुरूप नृत्यातून साजर्‍या केला जातात. या नृत्यात धांगडधिंगा अधिक असतो. मोहकता आणि नृत्याची अंगभूत नजाकतता फारशी आढळत नाही.
किशोर वयामध्ये खेळला जाणारा ग्रामीण जीवनातला लोकप्रिय खेळ म्हणजे लंगडी हा होय. हा खेळ प्रामुख्याने शाळा-विद्यालयातील मुले-मुली खेळतात. तरूण व प्रौढ पुरूषांनी वा स्त्रियांनी हा खेळ खेळला तर तो टिंगलीचा विषय ठरतो. हास्याचा विषय बनतो. या खेळासाठी चार-सहा विद्यार्थी असले तरी चालू शकतात. जादा असले तरी ते सामावून घेतले जातात. या खेळाचे वैशिष्ट्य असे की, याला कुठलीही खर्चिक साधन-सामुग्री लागत नाही. कशाचीही मदत लागत नाही. शाळेच्या पटांगणामध्ये सुमारे बारा ते पंधरा फूट व्यासाचे एक वर्तूळ आखले की, हा खेळ खेळला जातो. वर्तुळाची रेषा स्पष्ट दिसावी म्हणून काही वेळा चुन्याची भुकटी टाकली जाते व ज्याच्यावर ‘राज्य’ येते तो लंगडी घालत वर्तुळात असलेल्या मुलांना पकडण्याचा प्रयत्न करीत असतो. पळणारा गडी झुकांडी देऊन लंगडी घालणार्‍याला फसवतो, चकवतो. त्याला सापडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो.

समूदादा

यासाठी कमालीची चपळाई लागते. बुद्घिचा वापर करत त्याला फसवावे लागते. पकडणार्‍या गड्याची दमछाक होईल अशी वेडीवाकडी पळापळी करावी लागते आणि पळताना आपला पाय त्या सीमारेषेला लागणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. लंगडी घालणार्‍या मुलाच्या मनातील हेतू ओळखण्याची सावधानता लागते. हा खेळ म्हणजे समोरा-समोर युद्ध करणार्‍या कलेचे ट्रेनिंगच म्हणावे लागेल. द्वंद युद्धाची पूर्व तयारी करून घेणारा हा खेळ आहे. यासाठी चपळाई हवी असते. वेगाने पळता यावे लागते. पाठलाग करणार्‍याला फसवावे लागते आणि अनुकूलता नसलेल्या ठिकाणी कसे लढावे याचे ते जणू प्रात्यक्षिकच असते.
लंगडी घालणार्‍या गड्याजवळही एका पायावर दीर्घकाळ पळणे वा झेपावण्याची क्षमता असावी लागते. उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाने दोन्ही पायांनी पळणार्‍या मुलास पकडणे वाटते तेवढे सोपे नसते. त्यालाही क्षमता हवी. दम हवा. बुद्धी चातुर्य हवे असते. लंगडी घालणारा गडी ज्याला धरतो तो खेळाडू बाद होतो आणि त्याला रिंंगणाबाहेर येऊन बसावे लागते. माझ्या वर्गातील माझ्यासह असे काही ‘निष्णात’ धावपटू होते की पहिल्या एक दोन मिनिटांतच आम्ही त्याच्या पंज्यात सापडायचो. एका गोळीत तीनचार माणसे मारावीत तसे तो लंगडी बहाद्दूर आम्हा मेंढरांना एका ढांगेत चौघांना बाद करायचा. अनेकदा पळताना आम्हीच एकमेकांच्या अंगावर आदळायचो आणि जमिनीवर पसरलेल्या आम्हास विनासायास तो बाद करायचा. हा खेळ आपल्या सर्व अवयवांनी व्यायाम होण्याच्या दृष्टिने जसा उपयुक्त आहे, तितकाच कठीण प्रसंगी कसे वागावे, आपली सुटका कशी करून घ्यावी याचे मार्गदर्शन करणारा आहे. थोड्याफार प्रमाणात हा खेळ आजही खेळला जातो.
आमच्या ग्रामीण जीवनातही जवळजवळ नामशेष झालेला अन् विस्मरणात गेलेला खेळ म्हणजे लगोरीचा खेळ! हा खेळ म्हणजे आजच्या क्रिकेटचे ग्रामीण रूप होय. वा क्रिकेट खेळाचा प्रथमावतार म्हणावा लागेल. या खेळात क्रिकेटच्या तीन दांड्याऐवजी एकच लगोर रचलेली असते. लगोर म्हणजे तळहाताएवढा आकार असलेली मातीची भांडी एकावर एक रचून त्याचा टोकदार होत जाणारा कळस तयार करावा; त्याप्रमाणे हे आकाराणे छोटे छोटे असणारे चपटे दगड रचून ठेवले जातात. शेवटी साधारणतः पेरूच्या आकाराचा दगड ठेवून या लगोरी भोवती आयाताकृती चौकोन तयार केला जातो. म्हणजे चारी बाजूंनी बोटांनी रेघा मारल्या जातात. त्या लगोरीच्या मागे मोकळी जागा असते. साधारणपणे आठ-दहा फूट रूंद असलेल्या रस्त्यावर, त्यापेक्षा कमी रूंद असलेल्या पायवाटेवर अथवा चावडी-देवळासमोर मोकळ्या असलेल्या जागेमध्ये हा खेळ खेळला जातो. या लगोरीच्या एका बाजूला पन्नास ते साठ फुटांवर खुणेसाठी एक दगड ठेवलेला असतो. क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणारा खेळाडू कोठून चेंडू फेकायचा याची जशी खूण करणे तसा हा दगड असतो. लगोरीच्या मागच्या बाजूला चेंडू पकडण्यासाठी चार-पाच गडी गुडघ्यावर कोपर ठेवून खास तयारीत असतात. खूण केलेल्या दगडापासून एक खेळाडू त्या लगोरीला नेम धरून हातातला चेंडू वेगाने मारतो आणि नेम चुकला तर मागचा गडी तो पकडून परत टाकतो. नेम जर अचूक लागला नि लगोर कोसळली तर त्याला त्यापोटी काही गुण मिळतात. काही भागात, लगोर फुटल्यावर त्या चेंडूने गोलंदाजाच्या संघातला एखादा खेळाडू बाद करण्याची प्रथा आहे. लगोरीसाठी असलेला चेंडू खास ‘ग्रामीण’ निर्मिती असते. उकिरड्यावर पडलेल्या फाटक्या चिंध्या, किंवा शिंप्याच्या दुकानात कापून टाकलेले तुकडे हा सारा ऐवज गोळा केला जातो. त्याला चेंडुसारखा गोलाकार दिला जातो. त्या चिंध्या विस्कटून जाऊ नये म्हणून त्याला एखादे जुनाट फडके गुंडाळले जाते आणि त्यावर दोरा अथवा सुतळीने गच्च आवळून बांधले जाते. झाला लगोरीचा चेंडू! यासाठी चार पैसेही खर्च होत नाहीत. लगोरीचे दगड रस्त्याच्या कडेचे; चेंडूच्या चिंध्या उकिरड्यावरच्या असा माहोल असतो.
साठ-सत्तर वर्षांपूर्वी प्रत्येक खेड्यामध्ये हा खेळ खेळला जायचा. तो तसा लोकप्रिय सुद्धा होता. यातूनच चांगले नेमबाज तयार व्हायचे. यासाठी अचूक नेमबाजी आणि एकाग्रता यांची गरज असते, अन् जगण्यासाठीही तिचा वापर होतो. लगोरीचा खेळ काय किंवा कोणताही ग्रामीण खेळ काय, परिसरातील उपलब्ध वस्तूंचा वापर करून तो खेळ खेळला जातो. त्यासाठी खर्च होऊ नये अशी काळजी घेतली जाते. परावलंबित्व टाळण्याची भावना असते. याचाच अर्थ असा की ग्रामीण माणसाकडे असणारी कल्पकता मोठी विलक्षण म्हणावी लागेल. उद्दाम कल्पकता, वस्तूंचा वापर करण्याची सूक्ष्म दृष्टी, उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर ही या सार्‍या खेळांची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
सुट्टीच्या दिवशी मनसोक्तपणे खेळला जाणारा खेळ म्हणजे सूरपारंब्याचा खेळ. या खेळासारखा सर्वांगसुंदर खेळ दुसरा नसावा. रविवारच्या सुटीमध्ये आणि उन्हाळा-दिवाळीच्या सुटीमध्ये आम्ही सहावी-सातवीतले विद्यार्थी नदीच्या काठी असलेल्या एका विशाल आणि वयोवृद्ध वडाखाली अभ्यासासाठी जमायचो. हा गावाचा वड म्हणजे आमच्या गावाबाहेरचे दुसरे गावच असायचा. या वडाच्या सावलीत म्हातारी-कोतारी घास-मुटका खाऊन हिरव्या गवतावर ऐसपैस पसरलेली असतात. जोडीला चवदार तंबाखू आणि चवदार गावगप्पा तोंडात साठवलेल्या. निवड-टिपण करणार्‍या म्हातार्‍या घोळक्यानं एका कोपर्‍यात बसलेल्या असायच्या. चार दोन शेळ्या व कोकरं वडाखालचा चिमणचारा खात फिरायच्या. त्यातच आमचा सूरपारंब्याचा खेळ रंगायचा. जुना वड असल्याने ह्याच्या चारी बाजूंनी बोटापासून मनगटाच्या जाडीपर्यंतच्या पारंब्या अगदी जमिनीला टेकलेल्या असायच्या. या खेळासाठीही कसलीच साधनसामग्री लागत नसे. बोटाच्या आकाराची एक-दीड फुटी काटकी असली की झाले. वडाखाली एक छोटेसे रिंगण काढून हा तुकडा त्यात ठेवला जाई. त्यामध्ये ज्याच्यावर डाव आला असेल असा गडी उभा राही. उरलेले त्याच्या भोवती गोलाकार थांबत. एकाने डावा पाय वर घेऊन उजव्या हाताने पायाखालून तो लाकडी तुकडा जोरात फेकायचा. जास्तीत जास्त लांब जाईल अशी काळजी घेतली जाई. तो लांब फेकलेला तुकडा आणून त्या वर्तुळात ठेवण्यासाठी जेव्हा तो गडी धावे तेवढ्या वेळात उरलेले सारे खेळाडू पारंबीच्या आधारे झाडावर चढत. काही मूळ खोडावरून फांद्याच्या आधारे अगदी शेंड्याजवळ जाऊन बसत. दूरवर फेकलेली काटकी आणून त्या रिंगणात ठेवल्यावर कोणत्या गड्याला पकडता येईल; कोणता पोरगा लवकर सापडेल; याचा अंदाज घेऊन हा डाव घेतलेला खेळाडू झाडावर चढत असे. तो आपल्या जवळ येतोय असे दिसताच तो खेळाडू माकडासारख्या टणाटण उड्या मारत दुसर्‍या फांदीवर जाई. तिथपर्यंत तो आला तर आणखी वेगळ्या फांदीला लोंबकळे. काही मुले तर एका फांदीला लोेंबकाळून दुसर्‍या फांदीवर झेप घेत असत. झाडावर चढण्याचे कौशल्य कमी असलेला पोरगा एखाद्या बेसावध क्षणी नेमका पकडला जाई. असा त्याला पकडला की अगदी उंच शेंड्यापर्यंत असलेले सारे खेळाडू पुन्हा सरासरा एखाद्या खारीप्रमाणे जमिनीवर येत आणि रिंगणाभोवती गोळा होत. आता ज्याला बाद केलेले आहे तो फेकलेली काटकी आणून रिंगणात ठेऊन झाडावरच्या या मानवी ‘माकडांना’ धरण्याचा आटापिटा करी. लांबवर फेकलेली काटकी रिंगणात आणायला अवघे दीड-दोन मिनिटे लागत. या दोन मिनिटांत पुन्हा पारंब्यांना धरून फांदीवर चढणे आणि अवघड ठिकाणी बसणे याला कमालीची चपळाई लागते. हातावर सार्‍या शरीराचे वजन तोलून वरती जाणे ही साधी गोष्ट नाही. फांदीवरून दुसर्‍या फांदीकडे झेपावून तिथे तिला घट्ट पकडणे ही सुद्धा साधी गोष्ट नाही. पाय घसरण्याची शक्यता असते. हात निसटण्याची शक्यता. धरलेली फांदी मोडून खाली कोसळण्याची शक्यता असते. पकडण्यासाठी गड्याला जवळ येता येऊ नये अशी फांदी निवडावी लागते; पण आम्ही सारी मुले यात इतकी तरबेज होतो की जमिनीवरून चालत जावे इतक्या सहजपणे एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर जात असू. पुन्हा फांदीचा कोवळा शेंडा पकडून चालत नाही. तो तुटण्याची शक्यता असते. अनेकदा या फांदीवर मोठमोठ्या मुंगळ्यांची एवढी रांग असते की ते आपल्याला चावू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागते. तरीही पारंबीला धरून खाली उतरणारा एखादा गडी कोवळी पारंबी तुटल्यामुळे जमिनीवर आदळत असे. नशीब एवढे चांगले की जमिनीपासून ते अंतर चार-पाच फुटांचे असल्याने कुणी जायबंदी होत नसे. हाता पायाची हाडे मोडण्याची दुर्घटना घडत नसे. अशाप्रकारचा हा सूरपारंबीचा खेळ लिंब, पिंपळ, वड, पिपरणी, आंबा अशा मोठ्या झाडावरतीच खेळता येतो. सुमारे एक तासभरातच सारे खेळणारे पार पेकाळून जात. पार थकून जात. या खेळासाठी चढण्या-उतरण्याचे कौशल्य आवश्यक असते. चपळाईने झेप घेण्याचे कौशल्य आवश्यक असते. झाडाचा गुणधर्म ओळखणे आवश्यक असते. म्हणजे कोणती फांदी चिवट आहे आणि कोणती पोकळ आहे, नाजूक आहे हे ओळखणे गरजेचे असते. तुमचे अवघे शरीर एखाद्या रबरासारखे लवचिक असणे व ते वाकवता येणे आवश्यक असते. म्हणूनच असे वाटते की, जो माणूस कुमार वयात सूरपारंबी खेळात पारंगत असेल तर त्याला कुठलीही गोष्ट अवघड वाटणार नाही. त्याचा आत्मविश्वास वाढलेला असणार. त्याचे आत्मबल वाढलेले असणार. त्यांची बुद्धी अधिक तल्लख झालेली असणार आणि त्याची शरीरशक्ती अमर्याद अशी वाढलेली असणार. जगण्यातले सारे चढउतार त्याला सहजपणे पार करता येणार यात शंकाच नाही.

खेड्यामध्ये प्रत्येक गल्लीबोळाच्या रस्त्यावर खेळला जाणारा आणखी एक खेळ म्हणजे आंब्याच्या कोयीबरोबरचा खेळ. हा खेळ उन्हाळ्यामध्ये आणि त्यातही आंब्याचा मोसम जोरात सुरू असताना खेळला जातो. आंब्याची वाळलेली कोय किंवा कोया हे या खेळाचे भांडवल किंवा साधन. आमरसाच्या दिवसात अशा कोयांना तोटा नसतो. या कोया खेळामध्ये जिंकण्याची जबरदस्त इर्षा प्रत्येक पोराच्या मनात दाटलेली असते. आपल्या जवळच्या सहा-सात कोया घेऊन त्या आधारे प्रतिस्पर्ध्याला पार ‘निष्कांचन’ करण्यात जो आनंद मिळतो; तो रस्त्यावरच्या वेचलेल्या कोयांमध्ये नसतो. हा खेळ थोडाफार लगोरीच्या खेळासारखाच आहे. चार ते पाच बोटे रूंदीची आणि फूट-सव्वा फूट लांबीचा एक आयाताकृती चौकोन सपाट जमिनीवर रेघ मारत तयार केला जातो. या चौकोनात खेळात भाग घेणारा स्पर्धक आपला हिस्सा म्हणून प्रत्येकी दोन किंवा तीन कोया ओळीने मांडतो आणि चांगल्या तीस-पस्तीस फुटावरून हातातल्या जाड कोयीने रांगेतल्या कोयावर तो नेम धरतो. एवढ्या दूरच्या अंतरावरून नेम धरून त्या कोया चौकटीच्या बाहेर काढायच्या असतात. जेवढ्या कोया त्या चौकटीबाहेर येतील त्या त्याने जिंकल्या असे समजले जाते. एखादी कोय तर पूर्णपणे त्या रेषेबाहेर नसेल म्हणजे अर्धी आत नि अर्धी बाहेर असेल तर ती जिंकलेली नाही असे समजून ती रेषेमध्ये ठेवली जाते. ज्याचा नेम अचूक आहे, ज्याचा हात स्थिर व हलका आहे असा गडी एकाचवेळी तीन-चार कोया बाहेर काढतो नि खिशात टाकतो; पण अनेकांना ते जमत नाही. नेम चुकतो. खड्यात कोय पडून, उडून बाजुला तरी जाते. हातात मारण्यासाठी धरलेली कोय दिशाहीन वेगात बाजूला पडते. एकाने असा खेळ केला की त्याच्या जागी दुसरा येतो. त्यानंतर तिसरा स्पर्धक येतो. अशाप्रकारे त्या चौकातल्या कोया संपेपर्यंत हा खेळ सुरू ठेवला जातो. सार्‍या कोया जिंकून झाल्यानंतर पुन्हा प्रत्येकजण आपल्या वाटणीच्या दोन किंवा तीन कोया त्या चौकारात ठेवून नव्याने स्पर्धेला सुरूवात करतात. नेमबाजीत निष्णात असलेला एखादा मुलगा जवळच्या चार-दोन कोयांच्या भांडवलावर पाच-पन्नास कोया जिंकून टाकतो. हा खेळ प्राथमिक शाळेत असताना मी खेळलो आहे पण माझा नेम इतका ‘भारी’ असायचा की फेकून मारायची माझी कोय त्या चौकोनापासून चांगली फुटभर बाजूला जायची. त्यामुळे हा खेळ खेळताना मी घरातून पँटचे दोन्ही खिसे भरून कोया नेल्या तरी परत येताना त्यातली एकही शिल्लक राहिलेली नसायची. या खेळात मी कायमचा कफल्लक होत असे अन् त्यावेळेपुरते त्याचे फार वाईटही वाटायचे. या खेळात एखादा कच्चा सवंगडी असला तरच माझे भांडवल शाबूत राहत असे. चिंचोक्याचा खेळही याचप्रकारे खेळला जातो. चौकोनातले चिंचोके मारताना फक्त खापराचा रूपयाएवढा छोटासा तुकडा वापरला जातो एवढाच काय तो फरक!

गोट्या

श्रावण-भाद्रपदामध्ये गोट्या खेळणे आणि भोवरे खेळणे यांना मानाचे स्थान मिळायचे. गोट्या खेळताना दोन प्रकारे तो खेळला जाई. छोट्याशा गलीमध्ये म्हणजे लिंबाच्या आकाराच्या छोट्याशा खोबणीमध्ये आपल्या मोठ्या गोटीने नेम धरून प्रतिस्पर्ध्याच्या गोट्या त्या खोबणीत घालणे असा हा प्रकार असतो. यालाही नेम हवा. गोटी किती जोरात मारायची याचा अनुभव हवा. गोटीला नेमकी दिशा कशी द्यायची याचे भान हवे. जवळपासच्या गोट्या अडथळा निर्माण करतील का याचाही अंदाज घ्यावा लागतो. एका विशिष्ट दिशेने एका जवळच्या गोटीला मारून त्या गोटीद्वारे गलीजवळची दुसरीच गोटी जिंकणे यासाठी नैपुण्य हवे. हा खेळ खेळताना भूमितीचा अभ्यास उपयोगी पडतो. गोटीला लावलेली शक्ती महत्त्वाची ठरते. गोटी आणि गलीतले अंतर याचा विचार करावा लागतो. तीनचार आघाड्यांवर बारकाईने विचार करत हा खेळ खेळावा लागतो. यात निष्णात असलेली मुले चांगली दहा फुटावरची गोटी बरोबर उडवतात, हे मी पाहिले आहे.
यातला दुसरा प्रकार म्हणजे ओंजळीच्या आकाराची गल तयार करून त्यामध्ये दूर अंतरावरून गोटी ढकलणे हा आहे. याला फारसे कौशल्य लागत नसते.
पावसाळ्यात खेड्यातल्या प्रत्येक मुलाच्या खिशात भोवरा आणि त्याला गुंडाळावयाची सुतळी किंवा दोरी ही सापडणारच. अनेकांच्या जवळ छोट्या मोठ्या आकाराचे तीन-चार भोवरे असत. या खेळात छोट्याशा वर्तुळात मध्यभागी ठेवलेला भोवरा आपल्या हातातल्या भोवर्‍याने वर्तुळाच्या बाहेर काढणे याला महत्त्व असते अन् कौशल्यही हवे असते. शिवाय आपला भोवना दीर्घकाळ जमिनीवर फिरला पाहिजे यासाठी कौशल्य लागते. काहींना भोवर्‍याला रस्सी नीटपणे गुंडाळता येत नाही. काहींना खाली जमिनीवर सोडताना भोवर्‍याची दिशा, कोण कसा असावा हे समजत नाही. काहींना किती ताकत लावावी हे कळत नाही तर काहींचा नेमही चुकत असतो. त्यामुळे एखादा मुलगा वीस-पंचवीस सेकंद भोवरा फिरवतो तर आमच्यासारखे बावळट भोवरा असा फेकतात की तो फिरतच नाही. अपघातातला माणूस जागेवर कोसळावा तसा याचा भोवरा माथा जमिनीकडे व आरी आकाशाकडे या स्थितीत क्षणभर गरगरतो. अनेक निष्णात बहाद्दूर असे असतात की, खाली जमिनीवर विलक्षण वेगात फिरणारा भोवरा अलगदपणे आपल्या तळहातावर घेतात. थोडावेळ तळहातावर फिरवतात आणि पुन्हा जमिनीवर ठेवतात. जमिनीवर ठेवल्यावरही तो चांगला फिरत असतो. हे सारे कौशल्य तुम्ही भोवर्‍याला दोरी कशी गुंडाळता आणि जमिनीवर सोडताना तो कसा सोडता, त्याला किती ताकत लावता यावर अवलंबून असते. खेड्यामध्ये सुद्धा फार कमी लोकांकडे हे कौशल्य असते. शहरात आयुष्य गेलेल्या मुलाना हा खेळही माहीत नसतो आणि तो कसा खेळायचा याचीही कल्पना नसते.
याशिवाय पूर्वीच्या काळी आणखी किती तरी खेळ खेड्यामध्ये प्रचलित होते आणि तितकेच लोकप्रियही होते. प्राथमिक शाळेत असताना आम्ही आट्यापाट्या सारखे खेळ खेळत होतो. अजूनही ते रूढ आहेत. त्यासाठी डावपेच करता आले पाहिजेत. चपळाईने पळता आले पाहिजे. डोहातल्या स्थिर पाण्यात किंवा विहिरीमध्ये पाण्यात बुडून पोहणार्‍या गड्याला पकडणे असा ‘शिवणापाणी’ खेळही आम्ही खेळत होतो. एखाद्या हाताला येणार्‍या फांदीवर वटवाघुळासारखे पाय अडकावून खाली लोंबकळणे असला वेड्यासारखा खेळही खेळत होतो. फांदीत अडकवलेले पाय सैल पडले की त्याचा कपाळमोक्ष हा ठरलेलाच. गलोलीने पक्षी मारणे असला खेळ खेळलो आहे. तळ्याच्या पाण्यावरील पृष्ठभागावर चपटा दगड मारून तो कितीवेळा पाण्याला स्पर्श करून बुडतो हा कौशल्याची मागणी करणारा खेळही आम्ही खेळलो आहे. घरामध्ये असलेली काठी घेऊन ती दोन्ही पायांमध्ये घालून पुढच्या टोकाला पकडून, घोडदौड करावी तसा खेळ खेळलो होतो. तो खेळताना घोड्यसारखे खिंकाळायलाही कमी केले नव्हते. एका पोराला कमरेत वाकून गुडघ्यावर हात ठेवायला सांगायचे आणि एकाने लांबवरून पळत येत त्याच्या पाठीवरून अल्लद उडी मारणे हा खेळ आम्ही खेळलो आहे. गल्लीतल्या बच्चे कंपनीला गोळा करून त्यांच्या उंचीप्रमाणे त्यांना एका ओळीत उभे करायचे अन् मागच्याने पुढच्याची कंबर पकडायची आणि सर्वात पुढे असलेल्या मुलाने इंजिन होऊन रेल्वे इंजिनची शिट्टी वाजवली की, इंजिनाचा भकभक आवाज करीत मागच्या मुलांनी स्वतःला आगगाडीचे डबे समजून आवाज करीत धावायचे, असला ‘आगीनगाडी‘चा खेळही खेळलो आहे. हा खेळ खेळताना रेल्वे स्टेशन आले असे समजून नाना वस्तू आणि पदार्थ विकणार्‍या फेरीवाल्याचे आवाजही आम्ही काढत असू. गावातली चार वात्रट आणि टारगट पोरांच्या नादाने उकिरड्यावर चरणार्‍या गाढवाला पकडून त्याच्या शेपटीला पत्रा बांधायचा आणि त्याला गावभर पिटाळायचे असला वेडा खेळही खेळल्याचे आठवते; आणि खेळायला कोणी नसेल तर पाण्यात साबन कालवून त्या पाण्यावर सणकाडीने साबणाचे फुगे फुगवत बसणे असला उद्योग खेळ म्हणून केला आहे.
या सार्‍या खेळांमुळे खेड्यातल्या प्रत्येक मुलांचे बालपण मोठे समृद्ध व श्रीमंत झालेले असते. जी मुले पावसात नाचतात, वार्‍याबरोबर धावतात, उन्हात भटकतात, पाण्यात खेळतात, झाडा-वेलीशी मैत्री जोडतात, कोकरा-वासरांच्या गळ्यात पडतात, फळा-फुलांच्या सुगंधात वावरतात आणि निसर्गाशी, परिसराशी, तिथल्या वातावरणाशी सहजपणे एकरूप होऊन जातात, त्यांचे आयुष्य कमालीचे अनुभव समृद्ध बनते. जी मुले खेड्यातले, तिथल्या मातीतून जन्माला आलेले खेळ खेळतात त्यांच्या ठिकाणी वाघाची चपळाई येते. वार्‍याची गती येते. बौद्धिक विकास झपाट्याने होतो. नेमबाजीत, डावपेचात, कठीण प्रसंगात, संकटावेळी, शत्रू आपल्यावर चालून आला तर आपण कसे सामोरे जायचे याचे उत्तम ज्ञान या खेळातून प्राप्त होत जाते. आज हे खेळ खेड्यांमध्येही लोप पावत चालले आहेत. दूरदर्शनच्या खोक्यासमोर बुद्धी गहाण टाकून बसणे, मोबाईलवर गाणी ऐकणे, किंवा त्यावरचे खेळ खेळणे, शेजारच्या मित्राशी न बोलता दूरच्या मित्रांना लघुसंदेश पाठवणे यासारखे नवे खेळ नवीन पिढी खेळत असल्याने शरीर चापल्य, अनुभव समृद्धी, कणखर शरीरयष्टी, बुद्धी विकास, सांघिक भावना आणि प्रसंगावधान यासारख्या जीवनाला श्रीमंत करणार्‍या गुणांची त्याच्याकडे उणीव भासते. सकाळी दोन शिकवण्या, दुपारी शाळेचे तास, शेवटी जादा तास आणि रात्री उरलेल्या शिकवण्या यातच त्याचे बालपण संपून जाते. अशा माणसाला त्याचे बालपण जराही संस्मरणीय वाटत नाही, ही खरी शोकांतिका! ही शोकांतिका केवळ चार-दोन माणसांपुरती राहिली नाही; सार्‍या समाजालाच ती घेरते आहे, गिळून टाकते आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर ग्रामीण खेळांचे मोठेपण मला तरी फार अपूर्वाईचे आणि आनंदाचे वाटते.

– प्रा. द. ता. भोसले, पंढरपूर

पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक २०१५

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा