भूमिका न घेणं हीच भूमिका!

Share this post on:

मराठी भाषा दिन साजरा करताना आपण फक्त भाषेविषयी चिंता व्यक्त करणं किंवा फुकाचा अभिमान बाळगणं यापेक्षा काही मूलभूत चिंतन करून भाषेला बळ दिलं, लेखक-प्रकाशकांना प्रोत्साहन दिलं तरच ही परिस्थिती बदलू शकेल.

मराठीतल्या बहुतेक प्राध्यापकांची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिकत असतात. हेच लोक ‘मायमराठी वाचवा’ म्हणून भाषणं करत फिरतात, अनेक पुरस्कार लाटत असतात, सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती पदरात पाडून घेतात. असे विद्यापीठीय आणि विविध मालिकांसाठी रतीब टाकणारे लोकच आजच्या काळात भाव खाऊन जातात, पैसा-प्रसिद्धी मिळवतात आणि वाचन संस्कृतीविषयी कायम नकारघंटा वाजवतात. ‘लेखकांनी सरकारविरूद्ध तुटून पडायला हवं’ असं त्यांना वाटत असतं. त्यांनी स्वत:च अर्ज भरावेत, पुस्तकं पाठवावीत आणि सरकारकडून पुरस्कार मागून घ्यावेत. नंतर ‘पुरस्कार वापसी’च्या लाटेवर स्वार व्हावं. या काळात त्यांचं हे दुटप्पी वागणं मुद्दाम अधोरेखित करावंसं वाटतं.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कितीसे लेखक रस्त्यावर गोळ्या छातीवर झेलायला उभे राहिले? १९७२ ला मोठा दुष्काळ पडला, हाहाकार उडाला. महाराष्ट्र होरपळून निघाला. तेव्हाही सामान्य माणसाच्या मदतीसाठी कुणी लेखक रस्त्यावर उतरला नाही. त्यानं कोणत्या संघटनेत काम केलं नाही की कसला मदतनिधी गोळा केला नाही. अणीबाणीच्या काळात मराठी लेखकांनी माफीनामे  लिहून देणार नाही असे ठणकावत तुरूंगवास सहन केला नाही, आपला मराठी बाणा दाखवला नाही. रणजित देसाई, बाबा कदम, वसंत कानेटकर ज्यांची नाटकं फार प्रक्षोभक आहेत म्हणून उल्लेख केला जातो ते विजय तेेंडुलकर, ज्यांना क्रांतिकारी समजलं जातं ते दि. पु. चित्रे असे कोणीही कुठल्या आंदोलनात सहभागी झाल्याचं वाचलं नाही. लांब रहायचं, आडोशाला उभं रहायचं, पाऊस बघायचा आणि पावसावरच कविता लिहायच्या हेच काम मराठी लेखकांनी केलं.

१९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाला, दंगल उसळली! पण त्यावेळी कोणता मराठी लेखक बाहेर पडला नाही. याच वर्षी आमच्या किल्लारीत भूकंप झाला. या भूकंपात सर्वाधिक सहन करावं लागलं ते घरातील बाईला. मात्र हे सहन करणं, हे बदल अनुभवणं एकाही स्थानिक महिलेच्या लेखणीतून शब्दबद्ध झालं नाही. २००८ ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. तेव्हाही कोणत्या मराठी लेखकानं पुस्तक लिहून याचा निषेध केला नाही. त्यामुळं समाजमनाचा विचार करून लेखक कधी भूमिका घेत होते, आपल्या कल्पनाविलासातून बाहेर पडून सामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांवर फुंकर घालत होते असं समजण्याचं कारण नाही.

आपल्या मराठी लेखकांचं अनुभवविश्व समृद्ध नाही, त्यांचं आयुष्य तोकडं आहे आणि वाचनही तितकसं दांडगं नाही हे आजवर अनेकांनी सांगितलंय. त्यामुळंच मराठी लेखक जागतिक स्तरावर पोहोचू शकले नाहीत. असा लेखक मराठीला मिळाला असता तर तो नोबेलपर्यंत गेला असता. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांत मराठी ही दहाव्या क्रमांकावर असताना लेखनाच्या जीवावर कोणी मराठी लेखक जॅग्वार, ऑडीसारख्या महागड्या गाड्यांमधून फिरतोय, नरिमन पॉईंट, दादरला किमान त्यानं एखादा वन बीएचके फ्लॅट घेतलाय असं चित्र दिसत नाही. मराठी लेखकाचा इथल्या सर्वसामान्य माणसाच्या सुख-दु:खाशी, त्याच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही.

महाराष्ट्राचं ग्रामीण जीवन समृद्ध असल्यानं त्यावर आणखी दखलपात्र लेखन येण्याची गरज आहे. जे जगले, माणूस म्हणून जे अनुभवले ते आपल्या अनेक लेखकांना शब्दात मांडता येत नाही. शे-पाचशे पानांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं की आपल्या लेखकांकडं सांगण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही. जीवनाचे विविध रंग त्यांना अनुभवता येत नाहीत. अद्वितीय आयुष्य जगण्याचं धाडस खूप कमी लोकांकडं असतं. मराठी माणूस याबाबत कच खातो. दरवर्षी साहित्य संमेलनातच सीमा प्रश्नाबाबत ठराव मांडणारा मराठी लेखक वर्षभर त्यावर काहीच भूमिका घेत नाही. किंबहुना कोणतीच भूमिका घ्यायची नाही एवढी एकच भूमिका आपले मराठी लेखक प्रामाणिकपणे घेत आलेत. ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी घोषणा वर्षात एकदा दिली की मराठी लेखकांची जबाबदारी संपते का? सीमा भागात जाऊन आपले लेखक काही साहित्यिक उपक्रम का राबवत नाहीत?

प्रशासकीय अधिकारी असलेले काही लेखक आपल्याकडे पदाचा वापर करून लोकप्रिय झाले. त्यांच्या साहित्यात काहीच दम नाही. त्यातले काहीजण तर संमेलनाध्यक्षही झाले. मराठी बाणा दाखवणार्‍या दुर्गाबाई भागवत, पु. ल. देशपांडे यांच्यासारखे काही अपवाद आहेत. त्यांचीही इथल्या व्यवस्थेनं ससेहोलपट केली. मराठीतील सुमार लेखकांनी व्यवस्थेच्या विरूद्ध कधीच बंड पुकारलं नाही. कुठं फार प्रवास केला नाही. संशोधन-अभ्यास याच्याशी तर त्याचा काही संबंधच येत नाही. म्हणूनच इतर क्षेत्रात जे लोक काम करतात आणि लेखनाशिवाय ज्यांच्या उपजिविकेचं काही साधन आहे तेच लोक त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी म्हणून लिहित असतात आणि तेच लेखक म्हणून सर्वत्र सन्मानानं मिरवतात. आपल्या या वृत्तीमुळंच ‘पूर्णवेळ लेखन’ हे अनेकांना भिकेच्या डोहाळ्याचं लक्षण वाटतं. संत साहित्याची, लोकसाहित्याची मोठी परंपरा असतानाही मराठी साहित्य पुढे तेवढं बहरू शकलं नाही. एकनाथांची भारूडं किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगातील विद्रोह पुन्हा कुणाच्या लेखनात दिसला नाही. मराठीचा अभिमान असलेले लेखक कमी झाल्यानं ही दुरवस्था ओढवली.

संजय राठोड किंवा धनंजय मुंडे यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलं तरी उत्तम कादंबरी होईल पण आपले लेखक सामाजिक, राजकीय घडामोडींकडे डोळसपणे बघतच नाहीत. सेक्स आणि व्हायलंस असलेले असे विषय आपण दुर्लक्षित ठेवतो. पुण्यामुंबईत बसून मराठी बाणा दाखवता येणार नाही. त्यासाठी सातारला, चंद्रपूरला, भंडारा-गोंदियाला गेलं पाहिजे. आमच्या लातूर-सोलापूरला आलात तर मराठी बाण्याशिवाय दुसरं काही दिसणार नाही. सामान्य माणसात, शेतकर्‍यांत, कामगारांत, कष्टकर्‍यात मिसळल्याशिवाय तुम्ही उत्तम लिहू शकणार नाही.

उत्तमोत्तम लिहिणार्‍या लेखकांच्या पाठिशी मराठी वाचकांनीही उभं राहिले पाहिजे. नवनव्या लेखकांची पुस्तकं आपण विकत घेतली तर त्यांना बळ मिळेल. चांगले लेखक पुढं यायचे असतील तर हे व्हायला हवं. आपण नको त्या पुढार्‍यांच्या चार-चार पिढया जगवल्यात. चांगल्या लेखकांच्या पाठिशी आपण उभं राहिलं तर चांगले लेखक पुढे येऊ शकतील. मराठी भाषा दिन साजरा करताना आपण फक्त भाषेविषयी चिंता व्यक्त करणं किंवा फुकाचा अभिमान बाळगणं यापेक्षा काही मूलभूत चिंतन करून भाषेला बळ दिलं, लेखक-प्रकाशकांना प्रोत्साहन दिलं तरच ही परिस्थिती बदलू शकेल.

(प्रसिद्धी – दै. पुण्यनगरी, २७ फेब्रुवारी २०२१)
– घनश्याम पाटील
संपर्क : ७०५७२९२०९२

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

One Comment

  1. जळजळीत सत्य अतिशय परखडपणे मांडले आहे सर. डोळ्यात अंजन घालणारा लेख.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!