अनुभव नाहीये? खचू नका! मग फ्रेशरनी अशी मिळवावी नोकरी

नुकताच पत्राने आपलं पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. आता गरज होती ती नोकरी मिळवण्याची. एखादी कमी पगाराची का होईना पण नोकरीची सुरूवात महत्त्वाची होती. पत्रा नोकरीच्या शोधात होती. नोकरीसाठी आपल्या शालेय, महाविद्यालयीन आणि पदवी काळातील मिळवलेली प्रमाणपत्रे, प्रशस्तीपत्रे आणि बायोडाटा घेऊन एका कंपनीत गेली. तिला आशा होती की, तिला नोकरी मिळेल आणि थोडी मनात भीतीदेखील होती. मुलाखतीसाठीची तिची ही पहिलीच वेळ होती. पत्रा तशी हुशार होती पण तिच्या बुद्धिकौशल्याचा ताळमेळ तिच्या अनुभवाशी बसेना. कंपनीने ‘अनुभवी लोक हवेत,’ असे थेट सांगून टाकले पण गप्प बसेल ती पत्रा कसली? तिनेही मुलाखतकाराला खडे बोल सुनावले. पत्रा म्हणाली, ‘मी फ्रेशर आहे, हे मान्य आहे पण लगेच अनुभव कोठून आणणार? अनुभव येण्यासाठी कुणीतरी आधी नोकरी देणे गरजेचे आहे ना? जर नोकरी कुणीच नाही दिली तर अनुभव कसा येणार?’

पत्राला आलेला हा अविस्मरणीय प्रसंग आहे. असेच प्रसंग अनेकांवर ओढावत असणार. ही झाली अनुभवाची गोष्ट. पत्रा तर नोकरीसाठी प्रयत्न करतच राहिली पण असे काही लोक आहेत, जे नोकरी न मिळाल्याने खचून जातात. काही वेळेला बेरोजगारीला सामोरे जातात पण मित्रांनो, कधीच निराश होऊ नका. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’. प्रयत्न करत राहिल्यास तुम्हाला यश नक्की मिळणार पण त्यासाठी मानसिक खच्चीकरण होऊ द्यायचं नाही. जितकं तुम्ही प्रयत्नशील राहाल, मन प्रसन्न ठेवाल, तितका तुमचा मेंदू कार्यक्षम होईल आणि तुम्हाला पुढचा मार्ग दिसत जाईल.

आजच्या स्पर्धेच्या युगात इतकी स्पर्धा वाढलीय की नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. शिक्षण, अनुभव तर महत्त्वाचे आहेच पण याशिवाय सर्वात महत्त्वाचे आहे ते धैर्य ठेवणे. म्हणतात ना ‘प्रयत्नांती परमेश्वर’! प्रयत्न, बुद्धिकौशल्य आणि सहनशीलता या त्रयी गोष्टींवर तुम्ही फ्रेशरदेखील ‘पूर्ण अनुभवी’ ठरू शकतात.

पूर्वी फ्रेशरना कंपनीकडून प्रशिक्षण दिले जायचे आणि त्याच कंपनीमध्ये नोकरीही दिली जायची. फ्रेशरना नोकरी मिळाली तरी ते फार काळ तिथे टिकत नसत कारण दुसरीकडे नोकरीची ऑफर आली की, फ्रेशर आहे ती नोकरी सोडून दुसरीकडे जात असत. आता परिस्थिती बदललेली आहे. कंपन्या फ्रेशरसाठी आपला वेळ खर्ची करत नाहीत. केवळ वेळच नाही तर अन्यही काही गोष्टी आहेत ज्या एम्प्लॉईंना देणे कंपनीला परवडत नाही. या सर्व गोष्टी कंपनीच्या गणिताशी निगडित आहेत. असो. त्यामुळे अनुभवी लोकांनाच अधिक पगार देऊन त्यांना नोकरी दिली जाते. यामुळे कंपनीला कोणताही तोटा अथवा नुकसान होत नाही वा प्रशिक्षण देण्यात आपला वेळ खर्ची घालवावा लागत नाही. पहिल्या दिवसापासून अनुभवी लोक कंपनीसाठी आपला अनुभव देत असतात, जो कंपनीच्या फायद्याच्या कोट्यात भर टाकत असतात. असो! मग फ्रेशरनी काय केलं पाहिजे? नोकरी मिळवण्यासाठी आपलं स्किल दाखवणे किती महत्त्वाचे आहे ते बघा. गलेलठ्ठ पगारासाठी ढीगभर अनुभवासोबत टेक्नॉलॉजीचे ज्ञानदेखील असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे टेक्नोसॅव्ही बनणे आताच्या काळाची गरज आहे.

एम्प्लॉएबल स्किल मिळवा

आज अनेक संस्था व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर देत असतात. शिक्षण घेत असताना आपण आपल्या पुढील करिअरविषयी विचार केला पाहिजे. त्यानुसार त्या-त्या विषयाचे स्किल मिळवणे फार गरजेचे आहे. आज पदवी मिळवणे फार सोपे झालेले आहे पण नोकरीचे स्किल मिळवणे फार कठीण होऊन बसले आहे. तंत्रज्ञान आणि इतरांच्यापेक्षा माझ्याकडे अधिक ज्ञान आणि स्किल आहे, हे समोरच्याला दाखवून द्यायला हवं. आपल्याकडे एम्प्लॉएबल स्किल असेल तर तुम्ही कंपनीला पटवून देऊ शकता की, तुमच्या स्किलचा कंपनीला कसा फायदा होईल? शिवाय इतरांपेक्षा तुमच्याकडे अधिक ज्ञान आहे, जे कंपनीसाठी फायदेशीर ठरेल, असेही तुम्ही सांगू शकता.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या

आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना आपले शिक्षक, तज्ज्ञ, मार्गदर्शक यांना विचारा. त्यांचे मार्गदर्शन घ्या. आपण मुलाखतीला स्वत:ला कसे सिद्ध कराल, यासाठी त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

परफेक्ट नियोजन करा

आपल्याला नोकरी मिळवायचीच आहे, हा ठाम विश्वास गृहित धरा. यासाठी नियोजन करा. मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले जातील? ऑफबीट विषय असतील का? लेखी परीक्षा आणि मुलाखत कशी असेल, याचा अंदाज लावून आधीपासूनच तयारी सुरू करा. कोणताही गोंधळ न घालता आणि संभ्रम न ठेवता तुम्हाला जे काही येतं, ते प्रामाणिकपणे सांगा. येथे आपल्या व्यक्तिमत्त्वाचाही थोडा भाग येतो. कपडे नीटनेटके असावेत. बेढब किंवा विचित्र असू नयेत. प्रोफेशन दिसण्यासाठी तशा कपड्यांची निवड करा.

उत्तम बायोडाटा तयार करा

अनुभव नसला तरी उत्तम बायोडाटा तयार करा. आपला बायोडाटा पाहून वाचणारा प्रभावित होईल, अशा पद्धतीने बायोडाटा तयार करा. तुमच्या सोशल अकाऊंट्सची माहिती द्या. पुढे छोटा पॅरेग्राफ लिहून स्वत:बद्दल माहिती द्या. फ्रेशर असल्यामुळे बायोडाटामध्ये तुम्हाला काय काय येतं, तुमच्याकडे कोणते स्किल्स आहेत याविषयी लिहा. जितके तुमच्याकडे स्किल अधिक तितकी तुम्हाला नोकरी लागण्याची शक्यता अधिक असते. तुमच्या शिक्षणाविषयी माहिती लिहा. तुम्हाला कशाकशाची आवड, छंद आहे तसेच तुम्हाला आणखी काय करायला आवडेल हे देखील लिहा. तुम्ही केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी, सामाजिक उपक्रमांबद्दल लिहू शकता. तुमची खासियत काय आहे, याविषयीही तुम्ही लिहू शकता. तुमचे स्किल कंपनीला कसे फायदेशीर ठरू शकते, हे देखील तुम्ही नमूद करू शकता.

– स्वालिया शिकलगार

कोल्हापूर । 8421343539

उपसंपादक-दै. ‘पुढारी’ ऑनलाईन आणि लेखिका

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा