खडतर प्रवासाची प्रेरक कथा

अवघ्या एका रूपयांसाठी तुंबलेली गटारं साफ करणं, उकिरडे तोडणं, शेतमजुरी करणं, दारूच्या दुकानात काम करणं, शिक्षणासाठी मित्राच्या रूममध्ये रहायला मिळावं म्हणून धुणी-भांडी, स्वयंपाक करणं, पायात शूज नाहीत म्हणून अनवाणी पळणं, मेडिकल टेस्ट करण्यासाठी पैसे नसल्यानं भाजी मंडईत हमाली करणं हे सगळं खरंच सोपं नसतं. हे सगळं का करायचं? तर आयुष्याची दिशा ठरली होती की काहीही झालं तरी भारतीय सैन्य दलात सहभागी होऊन देशाची सेवा करायची… भारतीय सेनेतील जवान ते कर्नल या अधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाचा यशस्वी संघर्ष यापेक्षा सर्वश्रेष्ठ साहित्य ते कोणते? म्हणूनच कर्नल मच्छिंद्र राधाकिसन शिरसाठ यांचा हा लेख प्रकाशित करून सैन्य दलाविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहोत.

अठराविश्व दारिद्य्र म्हणजे काय हे मला सांगायची गरज नाही कारण त्यातच मी वाढलो. चारही दिशांनी डोंगररांगा असलेले ठाणगांव हे माझे गाव. ह्याच गावात पुंजाजी रामजी भोर हे विद्यालय आहे आणि त्यामध्ये माझे पाचवी ते दहावी शिक्षण पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण केले. घरी गरिबी असल्यामुळे शाळेच्या खर्चासाठी पैसे देण्याची आईवडिलांची कुवत नव्हती. म्हणून मला गावातील मोठ्या शेतकर्यांच्या शेतीमध्ये किंवा घरी जाऊन कामे करावी लागत किंबहुना काही शिक्षकांच्या घरी आईबरोबर धुणीभांडी सुद्धा करावी लागत.

माझ्या आईवडिलांना देवपूजा करण्याची खूप आवड होती आणि साहजिकच ती आवड माझ्यामध्ये पण आली. आईबरोबर सकाळी चार वाजता उठायचो. नदीवर जाऊन थंड पाण्यामध्ये अंघोळ करायचो. त्यानंतर आमच्या गल्लीतील देवीच्या मंदिरात काकड आरती होत असे. या काकड आरतीत फक्त स्त्रियाच असायच्या आणि मी एक मुलगा. त्याच्यानंतर लगेच आपले पुस्तक घेऊन आडवाडी, भिकारवाडी, गुंडांचा मळा, उंबरदरी, केदार देव अशा गावाच्या एकांत ठिकाणी जाऊन अभ्यास करायचो! अभ्यास करण्यासाठी फक्त पुस्तकच. नवनीत वगैरे घ्यायची ऐपत नव्हती.

चुलीसाठी लागणारे इंधन म्हणजे गौर्या किंवा  लाकडं. हे इंधन आणण्यासाठी माझी आई, बहीण आणि मी कधी तीन वाजता, कधी चार वाजता उठून आडवाडीकडील डोंगररांगेमध्ये अनवाणी पायांनी फिरायचो. जनावरांचे वाळलेले शेण पोत्यांमध्ये भरून दिवस उगवायच्या आत घरी घेऊन यायचो. त्यावर त्या दिवसाचे जेवण तयार होणे अवलंबून असायचे. तेव्हा पायामध्ये खूप काटे भरायचे आणि काट्यानेच काटा काढून तसेच पुढे चालत राहायचे.

ठाणगावमधील बर्‍याच लोकांच्या विहिरी खोदण्यामध्ये माझा सहभाग आहे. वयाच्या अकरा-बारा वर्षापासूनच ही अशा प्रकारची कामे केली. त्याला बालमजुरी म्हणतात हे माहितीही नव्हते. काम करायचे ते फक्त जगण्यासाठी, फक्त पोटापाण्याकरता, थोडेफार पैसे मिळतील आणि बहिणी-भावांची  शाळेची फी देता यावी यासाठी.

दिवाळीचा सण जवळ आला म्हणजे सर्व लोकांमध्ये आपापले घर सजवण्यासाठी एक ओढ लागलेली असायची. मला त्या वेळेस दुपटीने आनंद व्हायचा. त्याचे कारणही तसेच. दुसर्याचे ओटे खोदून दिल्यामुळे आम्हाला पैसे मिळायचे. एक दिवस भरत आंधळे आणि मी दामू नारायणाचा ओटा खोदण्याचे काम घेतले. बरं हे काम आमच्या अंगावर घेतले होते कारण ते काम संपवून लगेच आपण आपले दुसरे काम किंवा अभ्यास करू शकतो. काम करण्यामध्ये मला कधी तशी शरम नव्हती आणि मी तसा चपळही होतो. म्हणून भरत आंधळे आणि मी ते ओटा खोदण्याचे काम लवकरच पूर्ण केले आणि आम्ही पैसे मागायला म्हातारीकडे गेलो. तिच्या म्हणण्याप्रमाणे ‘‘एक रूपया हा पूर्ण दिवसाकरता दिला जातो आणि तुम्ही लवकरच काम संपवलं म्हणून मी तुम्हाला दुसरं काम देते’’ असं ती म्हणाली आणि आम्ही थोडा वेळ थांबलो. तिने आमच्याजवळ फावडे आणि दोन टोकरी आणून दिल्या आणि आम्हाला सांगितले, ‘‘गावाच्या खालच्या बाजूला आमचा शेताजवळ उकिरडा आहे. तो जाऊन तोडा आणि तिकडे बैलगाडी आल्यावर त्याच्यामध्ये भरून द्या.’’ 

आमचा दोघांचा एक एक रूपया त्यांच्याकडे अडकल्यामुळे आम्हाला ते काम करणे भागच होते. म्हणून नाईलाजाने आम्ही दोघेही त्यांच्याकडे गेलो आणि तो संपूर्ण उकिरडा रात होईपर्यंत तोडला. तरीपण ते आम्हाला सोडायला तयार नव्हते परंतु आम्ही मान खाली घालून उभं राहिलो आणि म्हणालो, ‘‘आम्हाला आमचे पैसे पाहिजेत.’’ 

कसंबसं तोंड वाकडं करून त्यांनी आम्हाला एक रूपया दिला आणि आम्ही तो घेऊन तिथून पळून गेलो.

सफेद शर्ट, खाकी पँट आणि डोक्याला टोपी असा आमचा शाळेचा ड्रेस. आता हे कपडे काही माझ्याकडे नवीन नव्हतेच. कायम आपले जुने कपडे घालायचे आणि बर्याचदा खाकी पँटवरती ठिगळ असायचे. कधीकधी ठिगळ सुद्धा फाटलेले असायचे. अशा ड्रेसमध्ये लोकांमधून कधी गेलं तर ते पाठीमागे ठिगळ असलेल्या जागी फटका मारायचे आणि एकदम वाकडे तोंड करून गरिबीची थट्टा उडवायचे. आमच्या गावाची गटारं साफ करणारा माणूस म्हणजे पुंजा वडारी. हा माणूस आमच्या गल्लीत पण गटार साफ करायला यायचा. एक दिवस त्याच्याकडे बघून वडिलांना लगेच एक युक्ती सुचली. ते मला ग्रामपंचायतींमध्ये घेऊन गेले. सरपंचाबरोबर बोलणं करून त्यांनी मला पुंजा वडारीबरोबर गावातील गटारी साफ करायला लावून दिले. हे सर्व काम करत असताना माझ्या कामाबद्दल किती पैसे मिळत आहेत ते मला काहीच माहीत नव्हतं कारण ते पैसे पूर्णपणे वडीलच घ्यायचे. ते एवढेच सांगत होते की कधी दोन रूपये तर कधी चार रूपये असा मोबदला मिळायचा. गटारी साफ करण्याचे काम मी बरेच दिवस केले परंतु एक दिवस सरपंच स्वतःहूनच म्हणाले की, ‘‘तू आमच्या शेतावर कामाला ये.’’ 

त्याप्रमाणे मी सकाळी प्रथम सरपंचांच्या घरी जायचो आणि तिथून मग त्यांच्या शेतामध्ये जात होतो. घरी गेल्यावर एखादा तास घरातले जे काम असेल ते करून नंतर मग मी शेतात जायचो. शेतामध्ये कधी कांदे काढणे, कधी टमाटे बांधणे, कधी वावरामध्ये सरी पाडून पाणी देणे, कधी जनावरांना घेऊन जाऊन त्यांना पाणी पाजणे, कोबीचे कांदे पोत्यांमध्ये भरणे, पोती उचलून गाडीमध्ये टाकणे अशी कामं करायचो. त्यानंतर त्यांच्याकडे द्राक्षाची बाग असल्यामुळे द्राक्षाच्या बागांमध्ये पण भरपूर कामं असायचं. असं हे मजूरीचं चक्र सुट्टीत सकाळी आठ वाजल्यापासून सुरू व्हायचं ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालायचं. त्यांच्या शेतामध्ये जर काम संपलं तर मग दुसरीकडे कोणाच्या तरी शेतामध्ये कामाला जायचं परंतु हे सर्व काम केल्यानंतर याचा एक फायदा व्हायचा की मला माझ्या शाळेची फी भरता यायची.

1991 आणि 1992 च्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी मात्र माझा मित्र अमित पानसरे याच्या देशी दारूच्या दुकानावर जाऊन बसायला लागलो. देशी दारूच्या दुकानावरती एक एक पेग भरून दारू वाटणे त्याचप्रमाणे काही काही ग्राहकांना क्वॉटर देणे किंवा पूर्ण बाटलीचा खंबा देणे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन गल्ल्यांमध्ये ठेवणे हे माझे काम! परंतु इमानदारी इतकी होती की अमित पानसरेने कधी माझ्यावर काही शंका घेतली नाही आणि मी पण कधी त्या पैशाची अफरातफर  केली नाही. त्या पैशांकडे कधी चोरीच्या नजरेनं पाहिलं नाही. दिवसभर पूर्ण झालेला गल्ला मी संध्याकाळी त्याला देत होतो. त्यामुळे तो माझा महिन्याचा पगार वाढून द्यायचा. या दारूच्या दुकानामध्ये मला अनेक अनुभव आले. काही लोक आपला शौक म्हणून दारू प्यायला यायचे, काही लोक मजा म्हणून दारू पिण्यासाठी यायचे, काही व्यसनापायी आपलं पूर्ण घरदार लुटून त्या दुकानात यायचे. बर्‍याच वेळा त्यांच्या बायका, त्यांची मुलं, त्यांचे वडील दारूड्यांना घरी घेऊन जायला त्या दुकानावर यायचे. अशावेळेस माझी मात्र तारांबळ उडायची कारण बर्‍याचदा त्यांना असं वाटायचं की मीच लोकांना दारू पाजतो. अशावेळी मी सगळ्यांना दुकानातून बाहेर काढायचो आणि आतून दुकान बंद करून घ्यायचो. नाही तर उगाच लोकांनी मलाच मारलं असतं. त्यानंतर अमित पानसरेला फोन करायचो. तो मग काही वेळानंतर दुकानावर यायचा. अमित पानसरे हे दुकानाचे मालक असल्यामुळे त्यांना कोणी काही म्हणायचे नाही. तिथून सर्व जण चुपचाप निघून जायचे

अशाच धकाधकीत दुकानावर काम करता करता मी दहावीच्या निकालाची वाट पाहत बसलो. जून 1992 मध्ये दहावीचा निकाल लागला. मी गावात पहिल्या नंबरने पास झालो. आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग मी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरायला सुरूवात केली. मुख्य म्हणजे आयटीआय आणि डीएडचे त्यावेळेस खूपच वेड होते. म्हणून मी ते दोन्ही फॉर्म भरून दिले. दहावीला मला 77 टक्के मार्क पडले होते म्हणून माझा डीएडला पण नंबर लागला आणि आयटीआयमध्ये पण नंबर लागला. डीएडसाठी माझा नंबर मालेगावला लागला होता परंतु त्या कॉलेजमध्ये महिन्याचे 90 रूपये फी होती म्हणून वडिलांनी मला तिकडे पाठवले नाही आणि इकडे आयटीआयकडे कारखान्याकडून महिन्याला पंचवीस रूपये मला स्टायपेंड मिळणार होता. म्हणून वडिलांनी आयटीआयला पाठवले. मी आयटीआयला ॅडमिशन घेतले आणि शिकायला सुरूवात केली. अमित पानसरे म्हणाला की, ‘‘तू आयटीआय इथून जाऊन येऊनच कर, गाडी डायरेक्ट आहे.’’ 

जवळजवळ दोन महिने मी आयटीआय ठाणगाववरून नाशिकला जाऊन येऊनच केलं परंतु त्यामध्ये पूर्ण दिवस जाऊ लागला म्हणून नाशिकला कुठेतरी जाऊन राहायचे ठरवले. नाशिकला मोरवाडीला आम्ही एक रूम घेतली आणि त्या रूममध्ये मी, भरत आंधळे, नंदू आंधळे, तुकाराम दोंड असे आम्ही चौघेजण राहायला लागलो. मी घरीच धुणीभांडी करत असल्यामुळे मला त्या रूमवर पण तशी काही समस्या नव्हती आणि मी तिथेही पूर्णपणे धुणीभांडी, स्वयंपाक सगळं काही करत होतो. काही दिवस रूमपासून आयटीआयपर्यंत पायीच केले. रूमपासून आयटीआयचे अंतर जवळजवळ सहासात किलोमीटर होते. नंतर मग एक सेकंडहॅन्ड सायकल घेतली आणि सायकलवर जायला सुरूवात केली. आयटीआयमध्ये मला फिटर ट्रेड भेटला होता आणि फिटर तर त्यावेळेस म्हणजे सर्वात अव्वल असायचा परंतु  आयटीआयमध्ये त्या फिटर नावाच्या शिक्षणामध्ये आम्हाला खूप लोखंड घासायला लागायचे. फाईल लोखंड घासून जॉब बनवायचे आणि शिक्षकांना दाखवायचे. मी आयटीआयमध्ये पण चॅम्पियन होतो त्या एका बॅचचा. आयटीआयमध्ये मला ह्या सर्व लोखंड घासून घासून करण्याच्या कामाचा कंटाळा आला होता. आयटीआयमध्ये माझा एक मित्र बनला होता शिंदे. शिंदेनी मला आयडिया दिली की ‘‘तू एवढा हेल्दी आणि फिट माणूस आहेस, पळतो पण चांगला घरापासून आयटीआयपर्यंत. मग मिलीटरीसाठी ॅप्लिकेशन दे.’’ 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी फॉर्म घेतला अशोकस्तंभवरून आणि भरून पाठवून दिला पोस्टाने मुंबईला. फॉर्म भरण्याच्या पंधरावीस दिवसांनी माझे वडील म्हणजे दादा तो कॉल लेटर घेऊन आयटीआयवर आले. ते कॉल लेटर सर्व इंग्लिशमधून होते आणि म्हणून दादांनी मला विचारले की, ‘‘हे काय आहे?’’ मी म्हटलं ‘‘मुंबईला एका कंपनीत कॉल आला आहे. तिकडे त्यांनी मला मुलाखतीसाठी बोलावले आहे.’’ 

मला माहीत होते की जर मी म्हटलो असते कीमिलिटरीचा कॉल आहेतर त्यांनी लगेच परत घेतले असते आणि मला दिले नसते. कॉललेटर देऊन दादा पुन्हा निघून गेले. हा साधारण मे 1993 चा महिना. कॉल लेटरप्रमाणे माझ्याकडे तयारी करण्यासाठी फक्त एकच महिना राहिला होता कारण कॉललेटरमध्ये जी तारीख दिली होती त्या तारखेप्रमाणे तिथे जाऊन रिपोर्ट करायचा होता. सकाळी चार वाजता उठून मोरवाडी ते अंबड पोलीस स्टेशन आणि तेथून स्टेट बँक ते पुन्हा मोरवाडी असा रस्ता पळायला सुरूवात केली. रनिंग करण्यासाठी पायामध्ये शूज नव्हते म्हणून अनवाणी पायांनीच मी सकाळी जवळजवळ एक ते दीड तास पळत होतो. त्याचप्रमाणे ठाणगावला चकोर बाबांबरोबर काही दिवस व्यायाम केल्यामुळे दंड, बैठका आणि सिटअप्स कसे काढायचे हे मला माहीत होते. म्हणून रनिंग केल्यानंतर ते पण करायचो. ठाणगांववरून नाशिकला येणे ही माझी पहिली वेळ. आता इथून पुढे मुंबईला जायचं म्हटल्यानंतर माझी एकदम चिंता वाढली. मी धाडस केले आणि अमित पानसरेबरोबर फोनवर बोलल्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मामाच्या घरी मी रहायचे ठरवले. त्याच्या मामाचे घर बांद्य्राला होते. ठरल्याप्रमाणे मी लगेच मुंबईकडे जाणार्या मुंबई नाक्यावर येऊन उभा राहिलो कारण जायचं एकच साधन होतं ते म्हणजे ट्रक. ट्रकने मला कसारापर्यंत सोडले आणि कसारापासून पुढे लोकलने जायचे होते. जवळ तेवढे पैसे नव्हते की मी सगळ्या ठिकाणी तिकिटाचे पैसे देऊन त्याप्रमाणे प्रवास करणार होतो. लोकल ट्रेन आली आणि मी त्या ट्रेनमध्ये बसलो. माझ्याकडे काही तिकिट नव्हते. टीसी वगैरे कोणी जर चेक करायला आला तर आपल्या जागेवरून उठून लगेच इकडे तिकडे पळायला सुरूवात करत होतो. कधी ह्या तर कधी त्या डब्यात असे करत करत मी दादर स्टेशनला पोहोचलो. तेथून पुन्हा लोकांनाकुलाब्याला जायचे, कोणत्या बसमध्ये बसायचं?’ हे विचारून आणि ती बस धरून मी नेव्हीनगरला निघालो. नेव्हीनगरला पोहचल्यावर तिथूनच कुलाब्याला एका मिलिटरी भरतीच्या ऑफिसमध्ये पोहचलो. त्या ऑफिसमध्ये एक रांग लागली होती. त्या रांगेत उभा राहिलो. ती रांग होती सगळी कागदपत्रे चेक करण्याची. कॉललेटर दिल्याप्रमाणे मी सर्व कागदपत्रे तयार करून आपल्याबरोबर घेऊन गेलो होतो. सर्व कागदपत्रे चेक झाल्यावर त्यांनी आम्हाला दोन दिवसांनी सकाळी सहा वाजताच मैदानावर यायला सांगितले होते. मी त्या दिवशी सकाळी चार वाजता उठून आणि तिथून एक बस पकडून सकाळी सहाला पोहोचलो. सुरूवातीला त्यांनी रनिंगची परीक्षा ठेवली होती. तिथे असणार्या बर्याच मुलांच्या पायामध्ये चांगल्या प्रकारचे शूज होते. माझ्या पायामध्ये एक तुटलेली स्लीपर होती. तिथल्या एका मिलिटरीवाल्या माणसाने आम्हाला सांगितले की ज्यांच्या पायात शूज नाहीये त्यांना पळता येणार नाही परंतु मी विनंती करून त्यांना सांगितले की मी पायात चप्पल घालून पळणार नाही. मी अशाच नंग्या पायांनी पळेल तर त्यांनी नाही नाही म्हणत मला परवानगी देऊन टाकली. वन पॉईंट सिक्स किलोमीटरची रनिंग होती. ती रनिंग पूर्ण केल्यानंतर माझ्या पायांना फोड आले होते परंतु आनंद ह्या गोष्टीचा होता की मी ती रनिंग पास झालो होतो. त्याच्यानंतर दंडबैठका, सिटअप्स, चीन ॅप्स, फाईव्ह मीटर शटल असे अनेक व्यायामाचे प्रकार केले. त्या सर्वांमध्ये मी पास झालो. रनिंगमध्ये फेल झालेल्या मुलांना बाजूला करून त्यांना लगेच घरी जाण्यासाठी सांगितले होते आणि शेवटी सर्व प्रकारचे व्यायाम करून जेवढी मुलं पास झाली त्यांना बाजूला केलं होतं. पास झालेल्यापैकी मी एक मुलगा म्हणून मला खूप आनंद झाला. त्यानंतर त्यांनी आमची नावे लिहून घेतली आणि आम्हाला सांगितले की तुम्ही आता मेडिकल करण्यासाठी तीन दिवसांनी यायचे आहे

ते तीन दिवस मी अमित पानसरेच्या मामाच्या घरीच राहायला होतो. मेडिकल करायचे म्हणजे माणसाचे वजन त्या वेळी पन्नास किलो पाहिजे होते आणि माझे वजन 49 किलो होते. केळी खाल्ल्यामुळे वजन वाढते असं मला सांगण्यात आलं होतं. त्यातल्या त्यात अमित पानसरे यांच्या मामांचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता म्हणून मी त्यांना विनंती केली की मी फक्त केळी खाल्ल्या तरच माझं वजन वाढेल म्हणून मला केळी खाऊ द्या. अशाप्रमाणे मी केळी खाल्ली आणि आपला व्यायामपण चालू ठेवला. सकाळी दिलेल्या वेळेनुसार  मी कुलाब्याला भरती केंद्रावर पोहोचलो. तेथे डॉक्टरांनी पूर्णपणे आमचे मेडिकल केले आणि मला कानामध्ये जास्त मळ असल्यामुळे  मेडिकलमध्ये अनफिट केले. त्यामुळे मी खूप नाराज झालो परंतु ‘‘सर्व मुलांचे मेडिकल संपल्यानंतर अनफिट घोषित करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांनी पुन्हा बोलावले आणि सांगितले की हा फॉर्म भरा आणि इथे जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा मेडिकल टेस्ट करून घ्या.’’ 

अनफिट झालेल्या मुलांपैकी प्रत्येकाची समस्या वेगळी होती. मला डॉक्टरांनी सांगितले होते की ‘‘तू तिथे जाऊन आपला कान साफ करून आणि पुन्हा मेडिकल करू शकतोस. कदाचित तू फिट होऊन जाशील.’’ 

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तो फॉर्म भरून मी जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी माझे कान साफ करण्याची फी 50 रूपये सांगितली. माझ्याकडे पन्नास रूपये नव्हते म्हणून मी त्यांना म्हटलं ‘‘मी उद्या येतो.’’ 

कुलाबाच्या बस स्टॉपजवळ सब्जी मंडी होती. मी तिथे गेलो आणि विचारलं ‘‘काही काम असेल तर सांगा मला. मी काम करून देतो.’’ मला एका भाजीवाल्याने लगेच सांगितले, ‘‘त्या गाडीतून पोते वाहून येथे आणून टाकून दे. तुला काही पैसे देईल.’’ 

त्याप्रमाणे ते पोते मध्ये टाकले आणि त्याने मला पाच रूपये दिले. म्हणून मी त्या मंडीतील जवळजवळ नऊ ते दहा गाड्यामध्ये हमाली करून संध्याकाळपर्यंत जवळजवळ शंभर रूपये कमावले होते. त्याच्या नंतर दुसर्या दिवशी मी पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या कानातील मळ काढून आणि कान साफ करून घेतले आणि त्या फॉर्मवर त्या डॉक्टरांची सही घेऊन मी तो फॉर्म घेऊन भरतीच्या ऑफिसमध्ये येऊन जमा केला. दोन तासानंतर मला सांगण्यात आले की ‘‘तुम्ही मेडिकल फिट झाले आहात. आता तुम्हाला लेखी परीक्षेसाठी यावे लागेल.’’ लेखी परीक्षासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील ह्याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. म्हणूनच मी लगेच तिथल्याच एका फौजीला विचारले की ‘‘लेखी परीक्षेकरता तयारी कशी करायची?’’ 

त्याने मला विचारले ‘‘तुम्ही कोणत्या ट्रेडकरता ॅप्लीकेशन दिले होते?’’ 

मी सांगितले की ‘‘मी क्लार्कसाठी ॅप्लीकेशन दिले आहे.’’ 

त्याप्रमाणे त्या फौजी माणसाने मला मार्गदर्शन केले आणि सांगितले की ‘‘बुक स्टॉलमध्ये पुस्तक मिळून जाईल. तेवढं घेऊन ते वाचून काढा. त्यातलेच प्रश्न विचारले जातील.’’ 

सांगितल्याप्रमाणे मी तिथेच नेव्हीनगरला एका बुक शॉपमध्ये गेलो आणि आर्मीमध्ये क्लेरिकल टेस्टसाठी लागणारे एक पुस्तक विकत घेतले. ते पुस्तक घेऊन मी पुन्हा मामाच्या घरी आलो. लेखी परीक्षेकरता जवळजवळ एक महिन्यांचा अवकाश होता. ते आम्हाला एका पत्राद्वारे कळविणार होते म्हणून मी रात्रीचा प्रवास करून नाशिकला परत आलो. दुसर्या दिवसापासून पुन्हा आयटीआयला जायला सुरूवात केली. आयटीआयचा अभ्यास आणि लेखी परीक्षेचा अभ्यास बरोबर चालू ठेवला. नाशिकला अशोक स्तंभावरून बुक स्टॉलमधून मी अजून दोन पुस्तके घेतली. ती पुस्तकं पण वाचून काढलीे. अशाप्रकारे इंग्लिश, गणित, सामान्य ज्ञानचा चांगल्याप्रकारे अभ्यास केला.

पत्रकाद्वारे कुलाब्याच्या भरती ऑफिसने आम्हाला लेखी परीक्षेकरता बोलावून घेतले. मला वाटते तो ऑगस्ट 1993 चा महिना होता. ह्या वेळेस फक्त एकच दिवसाचे काम होते म्हणून मी डायरेक्ट कुलाब्याला जाऊन आणि परीक्षा देऊन पुन्हा नाशिकला यायचे ठरवले होते. मुंबईला जायला ट्रकने जास्त पैसे लागायचे आणि प्रवासही व्यवस्थित होत नव्हता म्हणून मी माहिती काढून ट्रेनने प्रवास करायचे ठरवले. ह्यावेळी मात्र मी लाल कलरचा शर्ट बरोबर न्यायचं ठरवलं कारण पैसे कमी पडले की थोडी फार हमाली करून पैसे कमवायचे. पंचवटी मेलने मी पुन्हा मुंबईला गेलो आणि भरती केंद्राला जाऊन लेखी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की तुम्ही जर पास झालात तर तुम्हाला कॉलिंग लेटरद्वारे कळविण्यात येईल. त्या कॉलिंग लेटरमध्ये तुम्हाला कुठे रिपोर्ट करायचा, कधी रिपोर्ट करायचा याबद्दल सर्व माहिती दिलेली असेल. त्याप्रमाणे तुम्ही पुढचे पाऊल उचलावे. परीक्षा मी अगदी चांगल्याप्रकारे दिल्यामुळे मला पूर्ण खातरी होती की मी पास होईल. मिलिटरी भरतीसाठी लागणारी तिसरी पायरी मी सफलतापूर्वक पार करेल असा मला विश्वास होता परंतु हे सर्व मी घरी आईवडिलांना किंवा बहिणीभावांना आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा कोणाला सांगितले नव्हते. तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे कमी होते म्हणून ह्यावेळी लाल शर्ट कामी आला. मी नाशिकला परतलो. असो. पुन्हा आपला आयटीआयचे रोजचे रूटिन सुरू झाले.

ऑक्टोबर 1993 मध्ये साधारण 07 ऑक्टोबरच्या आसपास मला कॉलिंग लेटर मिळाले आणि 29 ऑक्टोबर 1993 ला त्या कुलाब्याच्या भरती केंद्रावर मला रिपोर्ट करायचा होता. हे कॉल लेटर सुद्धा वडिलांनी घेऊन माझ्याकडे आयटीआयवर आले होते. ह्या वेळी मी त्यांना सर्व काही सांगितले आणि म्हटले की ‘‘मला तुमच्याबरोबर लगेच गावाला यायचे आहे.’’ 

मी ही सर्व माहिती माझ्या रूमवरील मित्रांना सांगितली होती. मी आयटीआय सोडून आता मिलिटरीमध्ये कोणत्याही परिस्थितीत जायचे ठरवले होते म्हणून ठाणगावला येऊन आईला आणि वडिलांना तसेच शेजारील लोकांना भेटून आणि वज्रेश्वरी मातेचे आणि पीरबाबाचे दर्शन घेऊन मी 25 ऑक्टोबरला पुन्हा मोरवाडीला येऊन पोहोचलो. 28 ऑक्टोबर 1993 ला रात्री पुन्हा ट्रेनने प्रवास करून मी 29 ऑक्टोबर 1993 या तारखेला सकाळी आठ वाजता कुलाब्याला भरती केंद्रामध्ये रिपोर्ट केला होता. तेथे त्यांनी पुन्हा काही कागदपत्रे तयार करून आम्हाला सोपवली आणि सगळ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग सेंटर सांगून दिले

माझ्याकरता नाशिक रोड हे ट्रेनिंग सेंटर दिले होते. येथून आम्हाला त्यांनी त्यांच्या मिलिटरीमधल्या गाडीने दादर स्टेशनला नेऊन सोडले. तेथून प्रत्येकाने कोणकोणत्या ट्रेनमध्ये जायचे हे त्यांनी सर्वांना सांगितले परंतु रिझर्वेशन नव्हते म्हणून मिलिटरीच्या बोगीमध्ये जावे असे सांगितले होते. माझ्याकरता मात्र तेवढे काही अवघड नव्हते. मी त्याच रात्री पुन्हा ट्रेनने नाशिकला आलो आणि सांगितल्याप्रमाणे मिलिटरीच्या गाडीने नाशिक रोडला आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये रिपोर्ट केला. अशाप्रमाणे मी ट्रेनिंग केल्यानंतर भारतीय सेनेत एक जवान म्हणून रूजू झालो. जवाननंतर अधिकारी बनण्याचा प्रवासही तितकाच खडतर आहे, तो पुढच्या भागात बघू

जय हिंद!

कर्नल मच्छिंद्र राधाकिसन शिरसाठ

(भारतीय सेना) – 8288084105

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा