गांधीजींचे पुनरागमन

गांधीजींचे पुनरागमन
सुसाट आणि पिसाट माणसाला रोखणारी प्रेरणा…

विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्‍या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते.

दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात परतल्याचे शतक यावर्षीच्या ९ जानेवारीला पूर्ण झाले आणि केंद्र सरकारने त्या निमित्ताने जाहीर कार्यक्रमही आयोजित केले होते. यापूर्वीच्या केंद्रातील काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ९ जानेवारी हा दिवस ‘प्रवासी भारतीय दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवून त्यानुसार नियोजन केले आणि सुरुवातही केली. या निमित्ताने अनिवासी भारतीय भारतात येतात, संवाद करतात आणि मग परत आपल्या मुक्कामाला जातात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने या संदर्भात भारतात अनिवासी भारतीयांनी येऊन उद्योगधंद्यात गुंतवणूक करावी, भारतप्रधान पर्यटनाला चालना द्यावी, या हेतूने काही उपक्रम आखण्यात आले होते. यापूर्वीच्या केंद्र सरकारने प्रवासी भारतीय दिवस सुरु करताना पर्यटनाला चालना हाच मुद्दा ठळकपणे समोर ठेवला होता. यापुढेही दरवर्षी जानेवारीच्या ९ तारखेला प्रवासी भारतीय दिवस आपण साजरा करू आणि खरे-खोटे का होईना गांधीजींचे स्मरण करत राहू.

गांधीजींचे स्मरण विद्यमान केंद्र सरकार सातत्याने करत असले तरी त्यांच्या विचारांशी सुसंगत असा व्यवहार करताना हे सरकार काहीसे गोंधळून गेले आहे किंवा काही वेळेला तर उफराटाच व्यवहार चालू आहे, असे दिसते. या पार्श्वभूमीवर गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेतील लढा आणि तेथून भारतात परतल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे केलेले नेतृत्व यांचा खोलवर विचार केला पाहिजे. एक व्यावसायिक म्हणून वकीलाच्या नात्याने ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते, मात्र तेथील वास्तव्यात भारतीयांवर होणार्‍या अन्यायाने ते व्यथित झाले आणि त्यातूनच त्यांना अन्यायाविरुद्ध लढा उभा करण्याचे महान उद्दिष्ट गवसले. साधारणत: १८९३ ते १९१४ असा २०/२१ वर्षांचा काळ त्यांनी दक्षिण आफ्रिकेत व्यतीत केला.

एका चरित्रकाराने असे म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेतील लोक सांगतात – ‘‘भारताने मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक बॅरिस्टर आमच्याकडे पाठविला, आम्ही आफ्रिकेतून त्यांना महात्मा बनवून पाठविले.’’ तेथील प्रदीर्घ वास्तव्यात गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली, यावर काही वर्षांपूर्वी विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ‘मेकिंग ऑफ महात्मा’ हा बोलपट प्रसारित केला होता. तेथील त्यांचे योगदान, सविनय कायदेभंगाच्या स्वरूपात सुरु केलेले अहिंसक आंदोलन यामुळे भारत आणि युरोपात गांधीजींच्या संदर्भात विशेष उत्सुकता निर्माण झाली होती. त्या अर्थाने दक्षिण आफ्रिकेतील लढा हा गांधीजींच्या जीवनपटातील मैलाचा दगड म्हटला पाहिजे.

अर्थातच सत्याग्रहाचा लढा हाही अभिनव होता आणि अहिंसक भूमिकेमुळे त्याला एक विशेष महत्त्व आले होते. विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्‍या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी लष्करी राजवटीचे प्रमुख असलेले जनरल स्मट्स आणि बोथा यांना या अहिंसक आंदोलनामुळे अक्षरश: जेरीस आणले होते आणि नेतृत्व करणारा साधा व सरळ असा भारतीय एकही शब्द रागाने अथवा अविवेकाने उच्चारत नव्हता ही त्याहून अधिक चिंतेची बाब होती. गांधी नावाच्या अजब रसायनाची हीच तर खासीयत होती!

आफ्रिकेतील दादा अब्दुल्ला शेठ यांच्या पेढीचे काम वर्षभरात संपवून भारतात परतण्याचा विचार गांधीजींनी केला होता. परंतु तसे व्हायचेच नव्हते. एकदा रेल्वेतून प्रवास करताना विशेष श्रेणीचे तिकिट असूनही मार्टिझबर्ग स्टेशनवर त्यांना ते भारतीय वर्णाचे आहेत, म्हणून पोलिसांच्या मदतीने तिकिट तपासनिसाने भर थंडीच्या रात्री अक्षरश: सामानासह फलाटावर फेकून दिले होते. या प्रसंगाने त्यांच्यातला न्यायप्रेमी आणि सत्यनिष्ठ माणूस जागा झाला आणि त्यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आपले प्रयत्न सुरु केले. या घटनेपूर्वी तेथील आरंभीच्या दिवसात एकदा न्यायालयात ते पगडी घालून कामासाठी आले होते, त्यावेळी न्यायाधीशाने पगडी काढा असे त्यांना सुनावले. त्यावेळी पगडी न काढता न्यायालयाबाहेर जाणे त्यांनी पसंत केले.

त्यामुळेच कंत्राटी स्वरूपातील कामावर तेथे असलेले हजारो भारतीय कामगार यांना जी अन्यायाची वागणूक मिळत होती, त्यामुळे हे कामगार आशेने बॅरिस्टर गांधींकडे पाहू लागले होते. अब्दुल्ला शेठच्या पेढीचे काम संपल्यावर त्यांनी भारतात परतण्याची तयारी सुरु केली होती, तथापि, तेथील भारतीयांनी त्यांना एकमुखाने साद घातली – ‘‘गांधीभाई तुम्ही थांबा.’’
यानंतरचा काळ मग बॅरिस्टर गांधींच्या नेतृत्वाखाली वर्णभेदी राजवटीला विरोध करणार्‍या आंदोलनांचाच राहिला. कंत्राटी नोकर्‍या असल्यामुळे अनेक कामगारांना गोर्‍या मालकांचा जाच आणि मार सहन करावा लागे. अशाच एके दिवशी तोंड रक्तबंबाळ झालेला बाला सुंदरम नावाचा कंत्राटी कामगार गांधींना भेटायला त्यांच्या कचेरीत आला. त्यांनी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा त्याची सुश्रुषा केली, औषधोपचार केले. हा एक मद्रासी कामगार होता आणि त्याला त्याच्या गोर्‍या मालकाने इतके मारले की त्यात त्याचे दोन दातही पडले. नंतर हा विषय बॅरिस्टर गांधींनी न्यायालयाकडे नेला. तेथील नियमानुसार एखाद्या गोर्‍या मालकाने त्या कामगाराला काम नाकारले तर दुसरा गोरा मालक त्याला कामावर घेत नसे. त्यामुळे गांधींनी हा विषय न्यायालयात नेला तरी बाला सुंदरमला दुसर्‍या गोर्‍या मालकाकडे कशी नोकरी मिळेल, याच्या तडजोडीचे प्रयत्न केले. कंत्राटावर काम करणार्‍या अशा कामगारांना नेहमीच गोर्‍या मालकांच्या कृपेवर आणि त्यांच्या इच्छेवर काम मिळे आणि ते किती काळ ठेवायचे हे अवलंबून असे. एकूणच असे अनेक विषय उत्तम वकिली व्यवसाय करणार्‍या बॅरिस्टर गांधींपुढे सतत येत होते आणि त्यांतून मार्ग कसे काढायचे, त्यासाठी संघटनात्मक बांधणी कशी करायची, याचे प्रयत्न आणि नियोजन त्यांनी सुरु केले.

तेथील वर्णभेदी राजवटीने भारतीयांवर लादलेला तीन पौंडांचा कर आणि नोंदणीची सक्ती करणारा कायदा याच्या विरोधात गांधीजींनी लोकांना संघटित करायला सुरुवात केली. साधारणत: १९०६ पासून सुरु केलेले सत्याग्रहाचे आंदोलन हे डिसेंबर १९१३ पर्यंत सुरु राहिले. यात २ ते ३ हजार लोक तुरुंगात गेले. काही वेळा गोळीबार झाल्यामुळे काही भारतीय मरणही पावले. तरी या एकूण लढ्यातील अहिंसकता आणि सविनय कायदेभंगाची भूमिका यांमुळे भारतातील ब्रिटिश राजवट, येथील काँगे्रसचे ज्येष्ठ नेते आणि युरोपातील अनेक संस्था आणि व्यक्ती यांचे लक्ष गांधींकडे लागले होते. सत्याग्रह या नावाने अहिंसक आंदोलन कसे उभे करता येते, याचे आश्चर्य युरोपातील अनेक गटांमध्ये आणि देशांमध्ये व्यक्त होत होते. अर्थातच गांधीजींची भूमिका स्पष्ट होती आणि तितकीच ती कायद्याच्या मार्गावरील विश्वास वाढविणारी होती.

दक्षिण आफ्रिकेतील शेवटचा लाँग मार्च त्यांच्या नेतृत्वाखाली जो निघाला, त्यामुळे तेथील विविध प्रांतांतील भारतीयांमध्ये अर्थातच मुख्यत: भारतीय कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. अनेकांनी तुरुंगात जाण्याची तयारी दर्शविली होती. या लाँग मार्चच्या एकूण प्रक्रियेत गांधीजींना वारंवार अटक होत होती. प्रतिबंधित क्षेत्राच्या पुढे सत्याग्रही गेले तर त्यांनाही अटक करून तुरुंगवासाची शिक्षा दिली जात असे. आपल्या अन्यायाविरुद्ध आपण उभे राहिले पाहिजे आणि त्यासाठी संघटनात्मक कामाची मोठी गरज आहे, हे गांधीजी वारंवार सांगत होते.

या प्रदीर्घ लढ्याच्या काळात थोर देशभक्त नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मार्गदर्शन गांधीजींना मिळत होते. आपल्या सार्वजनिक जीवनाच्या आरंभी गोखले यांच्याकडून काही मार्गदर्शनाचे धडे त्यांनी घेतले होते. गोखले स्वत: प्रकृती बरी नसतानाही आफ्रिकेच्या दौर्‍यावर आले होते आणि तेथील भारतीयांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. गांधीजींच्या नेतृत्वगुणांचे कौतुकही त्यांनी जाहीरपणे केले होते. त्यांच्यामुळे भारतातील काँग्रेसच्या अधिवेशनात सातत्याने दक्षिण आफ्रिकेतील लढ्याला जाहीर पाठिंबा दिला जात होता. काँग्रेसची १९०१आणि १९०६ या दोन्ही वर्षी भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात आणि नंतर १९१३ साली कराचीत भरलेल्या अधिवेशनात दक्षिण आफ्रिकेतील लढ्याला पाठिंबा देण्यात आला होता.
डिसेंबर १९१४ मध्ये मद्रासला (आजची चेन्नई) भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाला गांधीजी उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र या अधिवेशनाने गांधीजींच्या आफ्रिकेतील योगदानाची पुढील शब्दांत नोंद घेतली : “It’s warm appreciation of and admiration for the heroic endeavours of Mr. Gandhi and his followers and their unparalleled sacrifice and suffering in their struggle for the maintenance of the self  respect of India and the redress of Indian grievances.”
दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवालच्या लाँग मार्चनंतर तेथील राजवटीचे प्रमुख आणि गांधीजी यांच्यातील वाटाघाटी सुरु झाल्या. यानंतरही असाच एक सत्याग्रह करावा, हे गांधीजींच्या योजनेत होते. तथापि, नामदार गोखले यांनी त्यांना आता हे थांबवा आणि भारतात परत या, असा सल्ला दिला. त्यानुसार मग गांधीजींनी भारतात परतण्याची तयारी सुरु केली. गोखले प्रकृती अस्वास्थ्यामुळे लंडनमध्ये होते, त्यामुळे त्यांनी लंडनमार्गे भारतात परता असे सुचविले होते.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचा निरोप घेताना गांधीजींनी काहीसे परखड असे निवेदन जाहीरपणे केले. त्यात त्यांनी म्हटले होते – ‘‘आपल्यातले काहीजण अतिशय घाणेरडे वागतात आणि लालसा तर कमालीची आहे. त्यामुळे तेथील गोरे लोक यांनाही ही प्रवृत्ती सहन होत नाही, हे लक्षात घ्या आणि बदलण्याचा प्रयत्न करा.’’

‘‘आपल्या भारतीयांपैकी काहींनी सोन्याची तस्करी सुरु केली आहे आणि तिचे प्रमाण वाढले आहे. कारण अनेकांना लगेच श्रीमंत व्हायचे आहे. पण हे थांबवले पाहिजे, नाहीतर भारतीयांची बदनामी होईल आणि तिला रोखले केवळ अशक्य ठरेल. आपल्या या कृत्यामुळे संबंधित व्यक्ती अडचणीत सापडतील, हे आणखीनच वेगळे.’’

‘‘मी माझ्या मातृभूमीसाठी दक्षिण आफ्रिका सोडत असलो तरी या प्रदेशाला मी कधी विसरू शकणार नाही. माझ्या ज्या ज्या मित्रांना भारतात यायचे असेल, तेव्हा त्यांनी आल्यावर मला अवश्य भेटावे. भविष्यकाळातही येथील लोकांना वाटत असेल तर मी आणखी चांगली सेवा देण्यासाठी तत्पर आहे. या कामासाठी लागणारी स्टेशनरी, टपालखर्च, छपाईचा खर्च या सगळ्यांसाठी निश्चित आर्थिक तरतूद केली पाहिजे.’’

‘‘या सर्वांखेरीज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य मिळविले पाहिजे, आणि त्यासाठी एकमेव हत्यार म्हणून सत्याग्रहाचाच मार्ग अवलंबिला पाहिजे, असे माझे मत आहे. माझ्या इथल्या मुक्कामात मी कळत-नकळत कोणाला दुखावले असेल, तर मी परमेश्वरापाशी क्षमायाचना करतो. ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला त्यांचीही मी माफी मागतो.

‘‘मी स्वत:ला अखेरपर्यंत सत्याग्रहीच मानत राहणार आहे. तरीही मागील वर्षी मला गिरमिट्या (कंत्राटी कामगार) असे संबोधिले गेले. मी अखेरपर्यंत तुम्हा सर्वांचा गिरमिट्या म्हणूनच काम करीत राहणार आहे.’’

या पत्राखाली मोहनदास करमचंद गांधी असे त्यांचे नाव टंकित केलेले होते.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवरचा तीन पौंडांचा कर रद्द करण्यात आला होता. याखेरीज नोंदणीची सक्ती उठविण्यात आली होती. तुरुंगातील कामगारांना मुक्त करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात यश संपादन करून, अन्याय अधिकाधिक दूर होईल, असे आश्वासन स्मट्स-बोथा राजवटीकडून कायद्याच्या स्वरूपात घेऊन गांधीजी निघाले होते. एक मोठा कालखंड त्यांच्या मागे उभा होता आणि तीच पार्श्वभूमी घेऊन ते भारताकडे लंडनमार्गे निघाले होते.

केनटाऊन बंदरातून किल्फॉल्स कॅसल या बोटीने १८ जुलै १९१४ रोजी गांधीजी कस्तुरबा आणि आपले स्नेही हर्मन कॅलेनबॅक यांच्यासह लंडनला निघाले. लंडनला त्यांनी गोखले यांची भेट घेतली आणि काही दिवस मुक्कामही केला. तथापि, गेल्या काही वर्षातील वारंवारची उपोषणे आणि केवळ फलाहारामुळे त्यांना आजारपण सुरु झाले होते. शेवटी तेथील काही नामवंतांनी भारताच्या हवेतच तुमची प्रकृती सुधारेल, असा सल्ला दिल्यावर भारताच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान काही दिवसांपूर्वीच युरोपातील पहिल्या महायुद्धाचा भडका उडालेला होता.

लंडनमधील वाढते आजारपण लक्षात घेऊन गांधी कस्तुरबा व कॅलनबॅक यांच्यासह भारतात येण्याची तयारी करीत होते. तथापि, कॅलनबॅक यांना भारतात प्रवेशाचा परवाना न मिळाल्याने कस्तुरबांसह गांधी भारताकडे निघाले. लंडनहून अरेबिया बोटीने १९ डिसेंबर १९१४ रोजी गांधी दांपत्य भारताकडे रवाना झाले. दि. ९ जानेवारी १९१५ रोजी पश्चिम किनार्‍यावरील मुंबईजवळच्या अपोलो बंदरावर विशेष परवानगीने गांधीजींचे जहाज थांबविण्यात आले. तेथे भारतातील अनेक नामवंत गांधी दांपत्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. नरोत्तम मोरारजी, जे.बी.पेटिट, बी.जी.हॉर्निमन यांच्या मंडळाने काठेवाडी पोशाखातील गांधींचे स्वागत केले. त्यानंतर बंदरावरून उघड्या घोडागाडीत गांधी व कस्तुरबांची मिरवणूक काढण्यात आली.

यानंतर १२ जानेवारीला एका सत्कारसभेत फिरोजशहा मेहता यांच्या उपस्थितीत गांधींचे स्वागत करण्यात आले. कस्तुरबाईंनी गांधीजींना जी साथ दिली, त्याबद्दल फिरोजशहांनी या सभेत त्यांचा विशेष गौरव केला. यानंतर गुजराती समाजाने मोहंमदअली जीना यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीजींचा सत्कार केला. या सभेतील सर्व भाषणे इंग‘जीत झाल्यामुळे गांधींनी आपल्या भाषणात नापसंती व्यक्त केली आणि गुजरातीत भाषण केले.

भारतातील सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याच्या भूमिकेसाठी मार्गदर्शन घेण्याच्या हेतूने यानंतर गांधीजी नामदार गोखले यांना भेटायला पुण्यात आले. तेथे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीत त्यांनी सदस्य व्हावे, ही त्यांची इच्छा होती. तथापि, सोसायटी सदस्यांत त्याबाबत मतभेद होते. तुम्ही सदस्य असलात-नसलात तरी ही सोसायटी तुमची आहे, असे मी मानतो, या आपुलकीच्या शब्दांनी गांधींचे बळ वाढविले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षी गोखले यांचे निधन झाल्यावर पुन्हा एकदा गांधींनी सदस्यत्वासाठी प्रयत्न केले, पण तेव्हाही काही सदस्यांचा विरोध कायम राहिल्यामुळे तेथून ते बाहेर पडले. यानंतर चंपारण्याचा लढा आणि लोकमान्य टिळकांच्या निधनानंतरचे असहकार आंदोलन यांचे नेतृत्व गांधीजींनी केले  आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली देशाने स्वातंत्र्य मिळविले, हा इतिहास आता नवा राहिलेला नाही.

दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात परतले तो दिवस प्रवासी भारतीय म्हणून सरकारी पातळीवर साजरा होतो. तथापि, गांधीजींनी सांगितलेल्या अनेक मार्गांचा आणि मूल्यांचा  ज्याप्रमाणे भारतात विसर पडला आहे, त्याहून अधिक विसर अनिवासी भारतीयांच्या संबंधित देशातही पडला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. पंतप्रधानांनी खादी वापरण्याचा सल्ला दिला असला तरी आजही देशातील खादी उत्पादनात विक‘मी वाढ झालेली नाही. आपल्या गावातच आपला विकास करा, हा आग‘ह गांधीजींनी धरला. भारताच्या १९९१ पासूनच्या सरकारांनी गांधीजींचा हा आग‘ह कस्पटासमान लेखून विकास प्रकल्पांच्या नावाखाली पाणी, जमीन आणि खाणसंपत्ती यांच्यावर असलेली सर्वसामान्यांची गरजानुकूल अशी सत्ता संकुचित करून त्यांच्या जीवनशैलीवर मोठे आघात केले आणि यातच समाजाचे अनेक वर्ग परागंदा होत आहेत. प्रवासी भारतीय दिवस साजरा करताना गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील कंत्राटी भारतीय कामगारांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी प्रदीर्घ सत्याग‘ह केला. आज या मार्गापासून आपण सारेच ढळलो आहोत आणि एका अनावर हव्यासाच्या वाटेकडे पळत सुटलो आहोत. म्हणून तरी आज गांधीजींची आठवण आपल्यातला हा सुसाट आणि पिसाट झालेला माणूस थांबविण्यासाठी तरी करावीशी वाटते का, असा एक प्रश्न मनात निर्माण होतो आणि मग अनेक प्रश्न त्यापाठोपाठ समोर येतात. त्यांची आठवण पुसट होते. धूसर होते पण पूर्णत: पुसली मात्र जात नाही.

दक्षिण आफ्रिका सोडत असताना गांधींबद्दल हिब्बर्ट जर्नलमध्ये गिलबर्ट मुर्रे यांनी जे लिहिले होते, ते सत्ताधार्‍यांना उद्देशून होते, जे आजही तितकेच कालसापेक्ष आहे, असे मला वाटते. मुर्रे यांनी लिहिले होते,  “Persons in power should be very careful, how they deal with a man, who cares nothing for sensual pleasure, nothing for riches, nothing for comfort or praise or promotion, but is simply  determined to do what he believes to be right. He is a dangerous and uncomfortable enemy, because his body which you can always conquer, gives you so little, purchase upon his soul.”

अवघ्या ४५वर्षांच्या सत्याग्रही गांधींबाबत वरील विधाने केली गेली. गांधीजी 78 व्या वर्षी नथुरामच्या गोळ्यांनी मारले गेले, तरीही वर जे म्हटले आहे, त्यातला शब्दही आजही बदलता येत नाही.

– अरुण खोरेे,
ज्येष्ठ पत्रकार, पुणे
भ्रमणध्वनी : ९८९०६२५८८०
पूर्वप्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक २०१५

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा