अशी ही सातार्‍याची तर्‍हा

‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या कुशीत वसलेलं, प्राचीन-ऐतिहासिक वारसा लाभलेलं ‘सातारा’ दक्षिण महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर! छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्या’चं ‘तोरण’ बांधलं ते याच भूमीतल्या ‘रायरेश्वर’च्या पठारावर! ‘स्वराज्या’चा नाश करण्यासाठी आलेल्या आदिलशाही सरदार अफझलखानाचा वध छ. शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी केला. ‘स्वराज्या’च्या सीमा अरबी समुद्रापर्यंत भिडवल्या, त्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार असलेली भूमी हीच! सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते याच भूमीतले! आलमगीर औरंगजेबाला शूर मराठ्यांनी झुंजवलं, त्याच्या मोगल साम्राज्याला खग्रास ग्रहण लागलं तेही याच परिसरात! १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या निधड्या-निर्भय सहकार्‍यांनी ‘ब्रिटिशांची’ सत्ता उखडून टाकून ‘पत्री सरकार’ स्थापन केलं होतं, तेही याच परिसरात! स्वातंत्र्यापूर्वी आपल्या प्रजेला लोकशाहीचे, स्वराज्याचे हक्क बहाल करणारा बाळासाहेब पंतप्रतिनिधी हा मुलूखावेगळा राजा-औंध संस्थानचा अधिपती होता! मराठ्यांची ही एकेकाळची राजधानी. भारताचा राज्यकारभार इथल्याच अदालत वाड्यातनं छ. शाहू महाराजांच्या आदेशानं पेशवे करीत होते.

पूर्वीचा हा उत्तर सातारा जिल्हा. दक्षिण सातारा-सांगलीचा भाग होता. जिल्हा पुनर्रचनेनंतर सध्याचा सातारा जिल्हा झाला. सह्याद्रीच्या उंच पर्वतराजीतनं उगम पावणार्‍या नद्या, पश्चिम भागातली घनदाट जंगलं. वाई-फलटण-कराड, पाली, शिखर शिंगणापूर ही तीर्थस्थळं! सज्जनगड, वसंतगड, प्रतापगड, भूषणगड, भैरवगड, मकरंदगड, कमळगड, गुणवंतगड, चंदन-वंदन, जंगली जयगड, संतोषगड, राजेगड, सुंदरगड, नांदगिरी उर्फ कल्याणगड, वैराटगड, पांडवगड, वर्धनगड, वारगड, वासोटा, सदाशिवगड, महिमानगड हे ऐतिहासिक किल्ले. महाबळेश्वर-पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं. महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीला वरदान ठरलेलं कोयना धरण. पूर्वेला दुष्काळी माणदेश. पुणे-कोल्हापूर-सोलापूर-कोकणचे मध्यवर्ती केंद्र! आपला सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, शैक्षणिक वारसा जपत आपलं वेगळंपण जपणारा जिल्हा ‘सातारा’!

कोयना धरण, सातारा

दक्षिण महाराष्ट्राचा केंद्रबिंदू असलेल्या सातारा जिल्ह्याला पुणे, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्याच्या सीमा भिडतात. भौगोलिकदृष्ट्या कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी हे तालुके डोंगराळ, अतिपावसाचे, निसर्ग संपत्तीचं वरदान लाभलेलं. तर माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण हे तालुके अवर्षणग्रस्त, कायमचे दुष्काळी! कोयना धरणाच्या विजेवर महाराष्ट्रात विजेचा लखलखाट झाला. लाखो एकर जमीन पाण्याखाली आली. शेती फुलली पण या धरणाचा लाभ मात्र शेजारच्या जिल्ह्याला झाला. पाटण तालुक्यातील दुर्गम गावं विकास-वीज-नागरी सुधारणांपासून अद्यापही वंचित राहिली. पंचावन्न वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या धरणामुळं विस्थापित झालेल्या हजारो धरणग्रस्तांची ससेहोलपट संपलेली नाही. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात कृष्णा खोर्‍यातल्या नद्यांवर उरमोडी, धोम, महू-हातगेघर, कण्हेर धरणांची कालव्यांची बांधकामं सुरु झाली. ते सरकार गेलं आणि ही कामं रखडली-रेंगाळली. या ‘अपुर्‍या अर्धवट धरणांची कालव्यांची बांधकामं जलदगतीनं पूर्ण होतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा आश्वासनांचा वर्षाव होतो. निधी मात्र मिळत नाही.’ धरणं-कालवे पूर्ण होत नाहीत. सातारा जिल्ह्यातल्या कण्हेर धरणांचं पाणी कालव्यातनं सांगली जिल्ह्यात जाते. दुष्काळी तालुक्यांना मात्र जिल्ह्यातल्या धरणांचं पाणी मिळत नाही.

अधूनमधून त्यासाठी आंदोलने होतात. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ दुष्काळी भागाला आश्वासनाचं पाणी पुढारी-मंत्री पाजत राहतात. दुष्काळी तालुक्यातल्या कोरड्या नद्यांच्या पात्रातल्या वाळूतल्या साठ्याचे ‘लिलाव’ करून सरकार दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा महसूल मिळवते. बेकायदा वाळूचा उपसा करून ठेकेदार गब्बर झाले. वाळूतनं मिळणार्‍या पैशानं श्रीमंत झालेल्या मूठभरांच्या टोळ्यात संघर्ष सुरु झाला. ‘वाळू माफिया’त हाणामार्‍या सुरु झाल्या; पण या भागाला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार काही करीत नाही. बेभरवशाच्या पावसानं हे तालुके अविकसित राहिले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ५० वर्षांनंतरही ही स्थिती बदलली नाही. दुष्काळात शेकडो गावांना टँकरनं पाण्याचा पुरवठा होतो, जनावरांसाठी सरकारला ‘छावण्या’ सुरु कराव्या लागतात. पाणी टँकरवाल्यांची टोळी श्रीमंत झाली. दुष्काळी भागातली जनता घोटभर पाण्यासाठी वणवणत नशिबाला दोष देत राहिली.

सरकारच्या आर्थिक निधीअभावी सातारा जिल्ह्याच्या विकासाचा गाडा रखडला पण सरकारच्याच महात्मा गांधी ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, ग्रामस्वराज्य, वनीकरण, तंटामुक्ती अशा सर्व अभियानात जिल्ह्यातल्या शेकडो गावांनी भाग घेऊन सामुदायिक श्रमदानानं गावच्या सर्वांगीण विकासाची कास धरली. कोट्यवधी रुपयांची विकासकामं ग्रामस्थांनी पूर्ण करून आपली गावे स्वावलंबी केली आहेत. मान्याचीवाडी, धामणेर यासह अनेक गावांनी ग्रामस्वच्छता अभियानात राज्य राष्ट्रीय पातळीवरचे लक्षावधी रुपयांचे पुरस्कार मिळवले. या सर्व अभियानात जिल्ह्याचा झेंडा राज्यात आणि देशात फडकतो आहे.

कृष्णा-वेण्णा-नीरा-उरमोडी नद्यांच्या पाण्यावर पश्चिम भागात ऊसाचं पीक हजारो एकरात घेतलं जातं. फलटण, सातारा, कराड, वाई, पाटण तालुक्यातल्या सहकारी साखर कारखान्यात लाखो मेट्रिक टन ऊसाचं गाळपं होतं. फलटण तालुक्याला लोणंद परिसर ‘कांदा’ उत्पादनात आघाडीवर, महाबळेश्वर तालुक्यातली ‘स्ट्रॉबेरी’, शिरवळ भागातली अंजिरं, खटाव-माण तालुक्यातली ‘डाळींब’ आणि ‘कोरेगाव’ तालुक्यातला वाघ्या घेवडा देशभर प्रसिद्ध! या भागातल्या घेवड्याला दिल्ली आणि उत्तर भारतात प्रचंड मागणी. त्याला तिथं ‘राजमा’ म्हणतात. गेल्या काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाने शेकडो ग्रीनहाऊस उभारली गेली. ‘फुलशेती’ही बहरली!

शिखर शिंगणापूर-शंभू महादेव, म्हसवड-सिद्धनाथ, जोतिबा, पालीचा खंडोबा, मांढरदेवची काळूबाई, पुसेगाव-सेवागिरी महाराज, गोंदवले-गोंदवलेकर महाराज, सज्जनगड-श्री समर्थ रामदास, शाहू महाराजांचे राजगुरु असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींचं धावडशी, ही सातारा जिल्ह्यातली मुख्य तीर्थस्थळं! या तीर्थस्थळांच्या वार्षिक यात्रांना लाखो भाविकांची गर्दी होते. सहा वर्षांपूर्वी मांढरदेवीच्या यात्रेत चेंगराचेंगरीत ३५० भाविकांचे बळी गेले होते. तिथं हजारो बकर्‍यांचे बळी द्यायची प्रथा होती. त्या दुर्घटनेनंतर ती बंद झाली. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सर्वच यात्रा महोत्सवात सरकारनं उपाययोजना सुरु केली. शिंगणापूरच्या यात्रेत मुंगी घाट चढून कावडीनं देवीला पाणी नेणं, सेवागिरी उत्सवातल्या रथयात्रेत ‘रथावर’ नोटांच्या माळा घालणं हे वैशिष्ट्य! बावधनचं भैरवनाथ यात्रेतलं बगाड पहायला राज्यभरातनं हजारो भाविकांची गर्दी उसळते.

सातारा जिल्ह्याच्या सर्वच भागात लोकसंस्कृती-लोकपरंपरा जनतेनं आधुनिक युगातही जपली आहे. गावोगावच्या देव-देवतांच्या वार्षिक यात्रांचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरु होतो. एप्रिल अखेर संपतो. वाईच्या कृष्णेच्या सात घाटांवर ‘कृष्णाबाई’ महोत्सव महिनाभर चालतो. ग्रामीण भागातल्या यात्रेत ‘तमाशा’चे फड, कुस्त्यांची मैदानं, पालख्या बघायला हजारोंची  झुंबड उडते. नातेवाईक-मित्रमंडळींना आपुलकीनं ‘सामिष’ भोजनासाठी बोलावलं जातं. कुसुंबी, जननीमाता, कालभैरव, नवलाई देवी, घाटजाई, बिरदेव, बाळसिद्ध, नाईकबा, भीम-कुंती, रामवरदायिनी या ग्रामदेवतांच्या वार्षिक यात्रांना मुंबई आणि अन्यत्र पोटापाण्यासाठी गेलेले चाकरमाने मातीच्या ओढीनं गावी येतात, यात्रेचा आनंद लुटतात.

उपग्रह वाहिन्यांच्या प्रसारानंतरही सातारा जिल्ह्यात लोकप्रबोधनाचा, जनजागरणांचा, व्याख्यानं आणि व्याख्यानमालांचा वारसा जपला आहे. सातारा, फलटण, कराड, कोरेगाव, वाई, पाटण, शिरवळ या शहरासह ग्रामीण भागात वर्षभर व्याख्यानाचं सत्र सुरु असतं. व्याख्यानांच वेड इतकं की गावातल्या सोसायटीच्या वार्षिक सभेतही प्रसिद्ध वक्त्यांची भाषणं होतात. विवाह समारंभातही नेत्यांच्या प्रतिष्ठितांच्या स्वागतासाठी ‘सूत्रसंचालक’ असतो. प्रतिष्ठितांचं पुष्पहार घालून स्वागत केलं जाते. त्यासाठी ‘मुहूर्त’ टळला तरी चालतो. सभा-समारंभांचं हे वेड आता ग्रामीण भागातही चांगलंच रुजलं आहे.

सातारकर आणि जिल्ह्यातल्या जनतेला पुस्तक वाचायचंही वेड अफाट! वाचकांची ही सांस्कृतिक-बौद्धिक भूक भागवायसाठी ग्रंथमित्र शिवाजीराव चव्हाण यांनी ‘सातारा जिल्हा ग्रंथोत्सवाची’ अभिनव संकल्पना सातारा शहरात अंमलात आणली. सरकारी अनुदानाशिवाय जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सुरु झालेला महाराष्ट्रातला हा पहिलाच उपक्रम. दरवर्षी जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या विशाल क्रीडांगणावर उभारलेल्या भव्य मंडपात सलग चार दिवस या ‘ग्रंथमहोत्सवात’ हजारो ग्रंथप्रेमी, साहित्य रसिकांची झुंबड उडते. प्रकाशक आणि पुस्तक विके्रत्यांच्या १०० वर स्टॉल्सवर पुस्तके विकत घेणारे साहित्य रसिक रात्री १० वाजेपर्यंत गर्दी करतात. कोट्यवधी रुपयांच्या ग्रंथांची विक्री होते. साहित्य विषयक परिसंवाद, चर्चासत्रे, करमणुकीचे कार्यक्रम, कवी संमेलने अशा विविध वैशिष्ट्यांनी या ‘ग्रंथोत्सवा’चे साहित्य संमेलनात रुपांतर झाले आहे. आता राज्य सरकारनेही याच वर्षापासून तीन दिवसाचा ‘जिल्हा ग्रंथ महोत्सव’ उपक्रम सुरु केला, तर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातही ‘ग्रंथोत्सव’ व्हायला लागले आहेत. त्याचं मूळ आहे ते मात्र ‘सातारा ग्रंथोत्सवात!’ ग्रंथोत्सवाशिवाय सातारा शहरात पुस्तक प्रदर्शने भरतात. रोज दहा बारा हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. पुस्तक विकत घेऊन वाचणार्‍यांचं वेड सातारा शहराला असलं तरी, हवी ती पुस्तकं मिळणारं मोठं पुस्तकाचं दुकान मात्र इथं नाही. ‘सातारी कंदी पेढे’ राज्यभर प्रसिद्ध! मोदी आणि लाटकर घराण्यांचा ‘कंदी पेढे’ बनवणं हा परंपरागत व्यवसाय! ‘मोदी’च्या दुकानावर ‘मिठाईचे जगप्रसिद्ध कारखानदार’ ही बिरुदावली! ‘राजपुरोहित’ची मिठाई, पाणीपुरी, समोसाही लोकप्रिय झालाय! सातारा शहराची विशिष्ट खाद्य परंपरा नाही, विशिष्ट पदार्थही नाही. पन्नास-साठ वर्षाची परंपरा असलेली जुनी हॉटेल्स तेवढी आहेत!

कंदी पेढे

छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत केल्यावर पुढं ब्रिटिशांनी सातारचं राज्य खालसा केलं. राजाचे अधिकार गेले पण राजघराण्याबद्दलचा सातारकरांचा आदर मात्र दोन शतकानंतरही कायमच आहे. छत्रपती हे जनतेचं दैवत आहे. सातार्‍यावर पुण्याच्या संस्कृतीची छाप असली तरी, सातारा आणि सातारकरांनी आपलं वेगळेपण मात्र कायम ठेवलं हे विशेष! मुंबई-पुण्याची घाईगर्दी-गडबड इथं नाही. सकाळी 10 वाजता शहरातले व्यवहार सुरु होतात. रात्री 6 नंतर रस्त्यावरची वाहनांची, माणसांची वर्दळ कमी व्हायला लागते. तासाभरानं शहर शांत होतं. सातारचे लोक स्वभावानं शांत, अगत्यशील, आपलं मराठमोळंपण जपणारे! जुन्या शहरावर पुण्याच्या ‘ब्राह्मणी’ संस्कृतीची छाप जाणवते. आता उपनगरांचाही विस्तार वाढतो आहे. बिहारी-उत्तर प्रदेशच्या श्रमिकांची संख्याही असली तरी जाणवण्यासारखी नाही. सातारी माणूस सहनशील, दुसर्‍यांना त्रास होऊ नये अशा वृत्तीचा, पण रांगडा. मूळचे सातारचे नागरिक नोकरीच्या निमित्तानं देशभर जातील. निवृत्तीनंतर मात्र आपल्या गावाची ओढ त्यांना लागते. ते पुन्हा सातारला रहायला येतात. ‘पेन्शनरांच गाव’ ही सातारची प्रसिद्धी कायम राहिली, ती या ज्येष्ठ नागरिकांच्या मुळंच! शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या चार संघटना वेगवेगळे उपक्रम राबवतात. सकाळी-संध्याकाळी पेन्शनरांच्या गप्पांचे फड त्यांच्या अड्ड्यावर रंगतात. सातारची भाषाशैलीही पुण्या-मुंबईपेक्षा वेगळी. ही भाऊ-काका-मामा अशी ही सार्वजनिक नावं. अनोळखी माणसांनाही याच नावानं विचारणं, उत्तर देणं हे वैशिष्ट्य! सातार्‍यात घर-वस्तू सापडत नाहीत. भेटतात. पाहुण्यानं पत्ता विचारल्यास सातारचा माणूस सांगणार, मधल्या रस्त्यानं वर जा, तिथं ‘पाचशे एक पाटी’ जवळ तुम्हाला हा पत्ता-भेटेल! पण ही पाचशे एक पाटी त्या रस्त्यावर नाही. कधी काळी होती पण त्या भागाची ओळख मात्र तिच राहिली. पोवई नाका, राजवाडा, मंगळवार पेठ, फुटका तलाव, अदालतवाडा, समर्थ मंदिर, गोल मारुती, गोलबाग, जलमंदिर, बुधवार पेठ, शनिवार पेठ, केसरकर पेठ, शांतीमंदिर, मोती चौक, तांदूळ आळी, खण आळी, देवी चौक ही भागांची नावं! वरचा रस्ता (राजपथ), बाजारपेठेतनं जाणारा मधला रस्ता आणि खालचा रस्ता. या रस्त्याचं नाव गणपतराव तपासे मार्ग, पण राधिका रोड याच नावानं ओळखला जातो. पूर्व-पश्चिम असे हे तीन मुख्य रस्ते. जुन्या सातारा शहराच्या मध्यभागातले-शहरातले अधिक रहदारीचे! काही गल्ल्यात-भागात पिण्याचं पाणी आलं नाही तर पालिका, टँकरनं पाणी पुरवठा करते. ही समस्या वारंवार तक्रारी करूनही सुटत नाही, तेव्हा महिला मंडळ रस्त्यावर उतरतं, नगरपालिका-प्राधिकरणाला धारेवर धरतं. शहरात एरव्ही फारशी आंदोलनं होत नाहीत. ‘शहराचा विकास खुंटला’ या विषयावर तासन् तास सत्ताधार्‍यांवर टिकेची झोड उठवणारी माणसं कृती काही करीत नाहीत. विकास रखडला, त्याची खंत नाही. कमालीचा सोशिकपणा हे सातारकरांच्या शांत स्वभावाचं वैशिष्ट्य!

सुपनेकरांच्या ‘मोबाईल’ हॉटेलातलं पॅटीस आणि सुपनेकर भोजनालयातलं ‘सुग्रास’ भोजन, राधिका पॅलेसमधली ‘गुजराथी थाळी’ राजतारातील बटरचिकन, कणसे धाब्यातली काजूकरी, मराठा बहारमधली मटण-भाकरी, लेक व्ह्यू मधली चिकन रामपूर, तेजसमधलं मटण ताट, मोनार्कमधलं मालवणी ताट खवय्यांच्या आवडीचं आहे. महामार्गावरचे बहुतांश धाबे बटरचिकनसाठी प्रसिद्ध! सातारला सरकारी, व्यापारी कामासाठी येणारी माणसं झणझणीत तिखट कोल्हापुरी पद्धतीचं  मटणाचं ताट हाणतात. पूर्वी ‘सातारा’ शहरातल्या राजवाडा परिसरातल्या चौपाटी हातगाड्यावर सायंकाळी भेळ-पाणीपुरी, वडा-पाव, चायनीजवर ताव मारायसाठी येत. आता ही चौपाटी या ‘खाद्य’गाड्यांनीच व्यापून टाकली आहे. सकाळी १० पासून रात्री उशिरापर्यंत या परिसरात आपल्या आवडीचे पदार्थ खायला येणार्‍यांची झुंबड असते. चायनीज, बर्गर, पिझ्झा हे पदार्थ युवक-युवतींच्या आवडीचे झाले आहेत. पाटणचे बोकडाचं मटण, कोयनेतला ‘मरळ’ मासा, सातारी ठेचा, भरलं वांग, माणदेशी बांगडा, मटण बिर्याणी, वाईतली झणझणीत मिसळ ही सातारच्या पारंपरिक खाद्य संस्कृतीची वैशिष्ट्ये! भाव्यांची सुपारी, सातारी जर्दा महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे!

स्वातंत्र्य आंदोलनात ‘सातारा’ शहर आणि जिल्हा स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र होतं. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहकार्‍यांनी याच जिल्ह्यात ‘प्रति सरकारची’ स्थापना केली होती. या भागातल्या गुंड-सावकारावर ‘प्रति सरकारची’ दहशत होती. सावकार-गुन्हेगारांच्या तळपायावर लाठ्यांचा चोप द्यायची शिक्षा क्रांतिकारक देत. त्यामुळं ‘पत्री’ सरकार असा या चळवळीचा लौकिक झाला होता. काँग्रेस पक्षाचा प्रभावही जिल्ह्यावर होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात फलटणचे मालोजीराजे नाईक निंबाळकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांनी जिल्ह्यात नेतृत्व केलं. कराड परिसरात शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव होता पण यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणात ह्या पक्षाचे नेते यशवंतराव मोहिते यांच्यासह बरेच विरोधी नेते, कार्यकर्ते काँगे्रसवासी झाले. विरोधी पक्षांचा दबदबाही संपला. जिल्ह्यात आणि शहरात विरोधी पक्षाचं अस्तित्व जाणवतं ते फक्त निवडणुकीपुरतं! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव होता. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या ‘माढा’ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातले काही तालुके असल्यानं, सातारा जिल्ह्याचं नेतृत्व राष्ट्रीय राजकारणात होतं इतकंच! पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते आणि त्यांचे वडील बरीच वर्षे केंद्रात मंत्री होते. हे पिता-पुत्र कराडचे असल्याने सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरानं दोन मुख्यमंत्री दिल्याचा अभिमान जनतेला वाटतो.

सातारा शहरातल्या राजकारणाची सूत्रं ‘राजेभोसले’ राजघराण्याकडं गेल्यावर माजी मंत्री श्रीमंत अभयसिंहराजे भोसले आणि  श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्यात सत्ता-संघर्ष सुरु झाला. दोघांनी परस्परांविरुद्ध निवडणुकही लढवली. अभयसिंहराजेंच्या निधनानंतर श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांनी ‘अदालत वाड्यात’ श्रीमंत छ. उदयनराजे आणि श्रीमंत छ. अभयसिंहराजेंचेे चिरंजीव आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले या भावा-भावात ‘मनोमिलन’ घडवून आणलं. सातारा शहर आणि तालुक्याची सत्ता पूर्णपणे राजघराण्याकडं गेली. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे ‘विधानसभेत’, श्रीमंत छ. उदयनराजे ‘लोकसभेत’, या राजकीय करारानुसार मनोमीलनाचं हे राजकारण सुरु आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘मनोमिलन’ आघाडीचे १७ नगरसेवक बिनविरोध निवडून गेले. शहरावर राजघराण्याची सत्ता असली तरी एक काळ ‘पेन्शनरांचं’ गाव असा लौकिक असलेल्या सातारा शहराचा चौफेर विकास मात्र झालेला नाही. फलटण, कराड शहरांनी विकास घडवला. शेजारचं पवारांचं ‘बारामती’ शहर विकासात आघाडीवर राहिलं पण ‘सातारा’ मात्र दुर्लक्षितच आहे. शहरातले रस्ते उखडलेले, उरमोडी, वेण्णा-कृष्णा नद्यांचं आणि कास तलावातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. नगरपालिका जलप्राधिकरणंही शहराला पाणी पुरवते, पण पाणी टंचाईची समस्या काही सुटत नाही. ‘स्वच्छ-सुंदर-सातारा’ घोषणा झाल्या, हवेत विरल्या, शहर अधिकच ‘बेरुप’ झालं आहे.

पुणे-बंगलोर महामार्गावरच्या सातारा शहर परिसरात उद्योगाच्या विकासासाठी सर्व पायाभूत सुविधा असतानाही एकही मोठा उद्योग इथं येत नाही. सातारा जिल्ह्याच्या दक्षिण महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पाया घालणारा ‘कूपर’ कारखाना इंजिनिअरिंग क्षेत्रात सध्याही आघाडीवर आहे. ओगलेवाडीचा काच कारखाना पस्तीस वर्षांपूर्वी बंद पडला. त्यापाठोपाठ छोट्या उद्योगांना घरघर लागली. शिरवळ-खंडाळा परिसरात उद्योगाचं क्षेत्र वाढत आहे. महाबळेश्वर-पाचगणी ही पर्यटनस्थळे देशात प्रसिद्ध असली तरी, सामान्य माणसाला ‘सुटीचा आनंद’ मिळवायला ती परवडणारी नाहीत. ‘हाय-फाय’ कल्चर आणि श्रीमंतांनाच महाबळेश्वरच्या महागड्या हॉटेलात राहणं आणि चैनबाजी करणं परवडतं. सातारा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर कास पठारावर पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलं फुलतात. महाराष्ट्राचं ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ अशी प्रसिद्धी झालेल्या या फुलांचं मनमोहक सौंदर्य पहायसाठी गेल्या दोन वर्षात हजारो पर्यटकांची झुंबड उडते.कोयना-कृष्णेच्या खोर्‍यातल्या निसर्ग संपत्तीच्या वरदानाबरोबरच ऐतिहासिक वारसाही आहे. ऐतिहासिक किल्ले, सेनापती संताजीराव घोरपडे, हंबीरराव मोहिते यांची समाधीस्थाने, पाटेश्वरच्या डोंगरातील प्राचीन शिवलेणी, कराडजवळची बौद्धलेणी ही पर्यटनस्थळे जिल्ह्याचं ऐतिहासिक वैभवच!

याच भूमित कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘स्वावलंबी शिक्षणाचा’ मूलमंत्र देत रयत शिक्षण संस्था सुरु केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अनवाणी पायानं आयुष्यभर हिंडून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात-शाळा, महाविद्यालये सुरु केली. शिक्षण प्रसाराचा नवा मानदंड निर्माण केला. तळागाळातल्या उपेक्षितांना सामाजिक न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी जीवन समर्पित केलेल्या महात्मा फुले यांचे जन्मगाव ‘खटगुण’ आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव ‘नायगाव’, गोपाळ गणेश आगरकर यांच जन्मगाव ‘टेंभू’ हे याच जिल्ह्यात आहे. राज्यघटनेेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारच्या छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झालं. त्याच हायस्कूलमध्ये न्यायमूर्ती गजेंद्रगडकर, साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांच्यासह अनेक दिग्गज शिकले होते. धनजीशहा कूपर मुंंबई प्रांताचे काही काळ मुख्यमंत्री, तर भाऊसाहेब सोमण असेंब्लीचे ‘स्पीकर’ होते. इतिहासकार दत्तात्रय पारसनीस यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह केला. आता तो औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहे.

गेल्या काही वर्षात विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या सातारा परिसरात वाढते आहे. लाख-सव्वा लाख वस्तीच्या या शहरात बारा अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयं सुरु आहेत. इंग्रजी माध्यमातनं मुलं शिकली म्हणजे, त्यांचं भवितव्य उज्ज्वल, अशी मानसिकता पालकांमध्ये वाढायला लागल्यानं भरमसाठ फी च्या ‘इंटरनॅशनल’ स्कूल बरोबरच, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांची ‘स्कूल्स’ हेही वैशिष्ट्य ठरावं!

बदलत्या काळाबरोबर सातारा, कराड, फलटण, वाई, शिरवळ या शहरांनी कात टाकली. आधुनिकतेच्या प्रवाहात जुनी मराठमोळी संस्कृती, वेशभूषा, ग्रामीण भागात पहायला मिळते. सातारा शहरातले जुने वाडे हळूहळू नामशेष व्हायला लागले. जुन्या वाड्यांच्या जाग्यावर अपार्टमेंटस बांधली गेली. वन बी. एच. के., टूू बी. एच. के. हे शब्द सामान्यांनाही परिचित झाले. शहराचं जुनेपण हरवायला लागलं. मध्यमवर्गाची आर्थिक स्थिती सुधारली. मोटरसायकली, मोटारी, बंगले, फ्लॅट ही सामाजिक ‘प्रतिष्ठे’ची लक्षणं झाली. पुण्याच्या नवसंस्कृतीची लागण झाली. आता ती रुजली. पिस्ता, बर्गर, चायनीज ही नव्या पिढीची ‘खाद्यसंस्कृती’ झपाट्याने वाढली. मोटरसायकल-बाईक, खाजगी क्लासेस, मोबाईल हे युवा पिढीचे ‘स्टेट सिंबॉल’ झाले. पुण्या-मुंबईच्या आणि हिंंदी चित्रपट-टीव्हीतल्या नट्यांचं अनुकरण करणार्‍या मुलींना आधुनिक फॅशननं झपाटलं. तीस-चाळीस वर्षांपूर्वी मुला-मुलींनी परस्परांशी बोलणं हा सामाजिक चर्चेचा विषय होता. आता जीन्स घातलेल्या, हातात सतत मोबाईल मिरवणार्‍या मुली, युवतींची संख्या अधिक झाली. ग्रामीण भागातनंही झाली. महाविद्यालयात येणार्‍या शालेय, महाविद्यालयीन मुलींनाही नव्या फॅशन्सचं आकर्षण वाटायला लागलं. ग्रामीण भागातही या नव्या फॅशन्सचा प्रसार झाला. मुला-मुलीतलं सामाजिक बंधनाचं अंतर हळूहळू कमी होत होत ते ‘मुक्त’ झालं. तोंडाला रुमाल बांधून मित्रांबरोबर मोटरसायकलनं फिरायला जाणार्‍या मुली, ही काही अपूर्वाई राहिली नाही. सातारा शहरात तर मोबाईल हातात नसलेल्या किंवा रस्त्यानं पायी जाताना मोबाईलवर बोलत राहणार्‍या मुली न दिसणं दुर्मिळ झालं आहे.

पाटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, वाई या पश्चिम भागातल्या डोंगराळ, दुर्गम तालुक्यात रोजगारांची साधनं नाहीत, विकास नाही. परिणामी पोटासाठी या भागातले हजारो श्रमिक मुंबईत ‘माथाडी’ कामगार आहेत. खटाव-माण-दहिवडी दुष्काळी तालुक्यातल्या मेंढपाळाच्या टोळ्या वर्षभर मेंढ्यांच्या कळपासह आज इथं, उद्या तिथं भटकतात. हा ‘माण’देशी माणूस राकट-जिद्दी, कष्टाळू! आपल्या भागात कधी तरी कायमस्वरुपी पाणी येईल, असं त्याला वाटतं! पोटासाठी वर्षातला बहुतांश काळ आपल्या मुलूख, गावापासून दूर राहणार्‍या या श्रमिकांना मातीची, गावपंढरीची ओढ मात्र कायम आहे! गावची जत्रा-यात्रा तो कधी चुकवत नाही. मित्र-परिवाराच्या संगती चार दिवस आनंदात राहून तो पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणाला जातो. गावची, आप्तांची हुरहुर काळजात जपत!

‘मिलिटरी अपशिंगे’ हे गाव सातार्‍यापासून २० किलोमीटर अंतरावर. इथल्या प्रत्येक घरातला माणूस लष्करात आहे. ‘क्षात्र तेजाची परंपरा जपणारं’ असा या गावाचा देशभर लौकिक आहे.

कृष्णेकाठी वसलेलं ‘वाई’ दक्षिण महाराष्ट्राची काशी! मंदिरांचं गाव. प्राचीन काळापासून वेदविद्येच्या अध्ययनाचं प्रमुख केंद्र. भिकाजी रास्ते नाईक यांनी आपली मुलगी गोपिकाबाई बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना दिली. पेशव्यांनी आपल्या व्याह्यांना वाईसह १५ लाखांचा सरंजाम दिला. सरदार रास्ते वाईला मोठा वाडा बांधून राहयला लागले. १६७१ ते १८१८ या पन्नास वर्षांच्या काळात त्यांनी वाईचा कायापालट केला. ‘कृष्णे’च्या उत्तरेला नवं शहर त्यांनी वसवलं. ‘वाई’चे अनभिषिक्त राजे झालेल्या रास्त्यांच्या आश्रितांनीही वाडे बांधले. वाईचा सर्वांगीण विकास केला तो रास्त्यांनीच! ओढ्याला बंधारे घालून बागायती शेतीच्या पाण्याची सोय, ‘कृष्णे’वर सुंदर घाट, अनेक मंदिरे त्यांनी बांधली. उमामहेश्वर, महागणपती, काशी विश्वेश्वर, गोविंद रामेश्वर, विष्णू अशी पेशवेकालीन शैलीची मंदिरे वाईच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात. मंदिरांच्या आणि वाड्यातल्या भिंतीवर अद्यापही टिकून असलेली पाचशेच्यावर ‘मराठा चित्रशैली’तली रंगीत चित्रे, हा ‘वाई’ च्या इतिहासाचा ठेवा आहे. ‘कृष्णा’ नदीवरच्या लांबच लांब घाटांनी ‘वाई’च्या सौंदर्याचं, ‘मराठी वास्तुशिल्प’ कलेचं दर्शन घडतं. ‘वाई’तली बहुतांश वस्ती ‘ब्राह्मणांची’. ब्राह्मणपुरी, गंगापुरी ही पेठांची नावं जुनपणं टिकवून आहेत. केवलानंद सरस्वतींनी स्थापन केलेल्या ‘प्राज्ञपाठशाळे’नं हिंदू धर्माच्या प्राचीन विद्यांच्या अभ्यासाला गती मिळाली. वेणीमाधव शास्त्रींनी सुरु केलेल्या ‘धर्मकोशा’चे संपादनही या संस्थेतर्फे सुरु आहे. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’तर्फे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी विश्वकोश’ निर्मितीचं काम सुरु झालं.

वाई-महाबळेश्वर-पाचगणीच्या ऐतिहासिक, निसर्गरम्य परिसरात हिंदी-मराठी-चित्रपटात चित्रीकरण होते. स्थानिक कलाकार तंत्रज्ञानाही काम मिळतं. ‘वाई’च्या प्रतिक थिएटर्स ‘नाट्य’संस्थेमार्फत दरवर्षी राज्यपातळीवरच्या ‘एकांकिका’ स्पर्धा घेतल्या जातात. जिल्ह्याची नाट्यपरंपरा या संस्थेनं पुढं सुरु ठेवली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील

१९८० ते २०१० या तीस वर्षाच्या कालावधीत विश्वकोशाचे १८ खंड प्रसिद्ध झाले आहेत. ‘विश्वकोशा’च्या विषयवार नोंदीसाठी नेमणुका झालेले अभ्यागत संपादक वाईतच राहयला आले. वाईकर झाले. वाईच्या साहित्य-सांस्कृतिक प्रवाहाला गती आली. ‘ज्ञानकोश’कार श्री. व्यं. केतकर यांनी ‘महाराष्ट्र  ज्ञानकोश’ चे २० खंड १५ वर्षात संपादन करून प्रसिद्ध केले, पण प्रचंड सरकारी अर्थसहाय्य, स्वतंत्र मुद्रणालय, ग्रंथालय, अनेक विद्वान मंडळी असतानाही ‘विश्वकोश’ ६० वर्षात पूर्ण झालेला नाही. ‘तर्कतीर्थां’च्या निधनानंतर ‘विश्वकोश’ मंडळाचं अस्तित्व तेवढं वाईत जाणवतं! इथल्या जुन्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरात, जुन्या-दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह तर आहेच, पण वाचनालयातर्फे ‘वसंत व्याख्यानमालेचं’ ज्ञानसत्रही अखंड सुरु आहे. पुरोगामी विचारवंत, प्रबोधनकार रा. ना. चव्हाण यांनी ‘ब्राह्मो समाजाची’ परंपरा सुरु ठेवली होती. आता त्यांच्या चिरंजीवांनी त्यांचं समग्र साहित्य प्रकाशित केलं आहे.

सातारा आणि महाबळेश्वरच्या मध्यावरच्या ‘वाई’ शहराचं ऐतिहासिक जुनेपण आता बदलत्या प्रवाहात हरवू लागलंय! जुने वाडे पाडून तिथं ‘अपार्टमेंट’ व सिमेंट काँक्रिटच्या इमारती उभ्या राहायला लागल्या. शहर सुधारणा सुरु झाली. शहराचं सांडपाणी थेट कृष्णेत सोडलं जातं. वीस-चाळीस वर्षांपूर्वी ‘सुंदर-स्वच्छ’ असलेली ‘वाई’ आता विद्रूप व्हायला लागली आहे.
‘वाई’पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘मेणवली’ गावात नाना फडणीसांच्या वाड्यातली मराठा शैलीतील भित्तीचित्रे अद्यापही शाबूत आहेत. कृष्णा नदीवर नाना फडणीसांनी सुंदर घाट बांधला पण या मोठ्या वाड्यात त्यांचं वास्तव्य मात्र झालं नाही.

निंबाळकर वाडा, फलटण Credit : To the rightful owner

‘फलटण’ हे जिल्ह्यातलं ऐतिहासिक शहर! महानुभव चांगदेव राऊळांच वास्तव्य इथंच होतं. ‘महानुभवांचा’ ऐतिहासिक मठ-मंदिरही इथं आहे. शहरातील श्रीराम, जबरेश्वर, माणकेश्वर, श्रीकृष्ण, महादेव, चंद्रप्रभू, दत्त ही मंदिरे शहराच्या धार्मिक परंपरेचा वारसा सांगतात.
राजस्थानातून परमार घराण्यातल्या ‘निंबराज’ या कुलपुरुषानं १२७० मध्ये दक्षिणेची वाट धरली. सध्याच्या फलटण परिसरात त्यानं नवं गाव वसवून त्याला ‘निंबळक’ नाव दिलं. या गावावरूनच पुढे या घराण्याचं नाव  ‘निंबाळकर’पडलं असावं.
‘निंबेजाई’ ही या घराण्याची कुलदेवता आहे. याच घराण्यातल्या राजांनी ‘फलटण’वर स्वातंत्र्यापर्यंत आपली सत्ता कायम ठेवली. सलग सातशे वर्षांहून अधिक काळ अधिसत्ता गाजवणारं ‘नाईक-निंबाळकर’ हे देशातलं एकमेव राजघराणं असावं. छ. शिवरायांच्या पत्नी सईबाई या ‘फलटणकर’ घराण्यातल्या होत्या. अनेक शाह्या आल्या, गेल्या. निंबाळकरांची सत्ता कायम राहिली. मुधोजीराव उर्फ बापूसाहेब नाईक-निंबाळकर यांनी १८६० ते १९१६ या काळात फलटणचा झपाट्यानं विकास केला. त्यांचे उत्तराधिकारी मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी विकासाचा तोच वारसा पुढं चालवला. १९४८ मध्ये ६५ लाख रुपयांच्या खजिन्यासह त्यांनी आपलं संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केलं. ‘राजा’चे अधिकार सोडल्यावर ते काँग्रेसच्या राजकारणात राहून, सामान्य प्रजेची काळजी करीत राहिले. याच घराण्याचे वारसदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याचे मंत्री होते. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री असलेल्या रामराजेंनी सातारा जिल्ह्यातले कृष्णा खोर्‍यातले रखडलेले धरणे-कालव्यांचे प्रकल्प मार्गी लावले. खंडाळा-फलटणच्या भागात कालव्याचं पाणी आणलं!

‘फलटण’च्या लोकजीवनावर छाप आहे ती पुण्याची! ‘सातार’ पेक्षा फलटणकरांचे पुणे-बारामतीशी अधिक व्यापारी संबंध आहेत. ‘फलटण’ शहर वाढत्या वस्तीला अपुरं पडायला लागल्यानं, परिसरात नव्या वसाहती. ‘टाऊनशिप’ही व्हायला लागली. हे शहर तसं शांत, सर्वांशी गुण्या-गोविंदानं राहणार्‍या इथल्या माणसांचे राजघराण्यावर प्रेम कायम आहे.सातारा जिल्ह्यातला पुण्याजवळचा तालुका खंडाळा-बावडा-राष्ट्रीय महामार्गावरच्या ‘शिरवळ’ परिसरात औद्योगिकरणाला वेग आला.  पुण्याला जवळ असल्यानं पुण्यात ‘फ्लॅट’ विकत घेणं परवडत नसलेल्या नोकरदारांनी ‘शिरवळ’मध्ये तळ ठोकायला सुरवात केली. परिणामी ‘गृहबांधणी’ उद्योगही वाढला. महामार्गाच्या बाजूला उपनगरं झाली. आधुनिकीकरणानं या वाढत्या रहदारीनं या ऐतिहासिक गावाचा चेहरामोहराही झपाट्यानं बदलतो आहे!

कृष्णा कोयना प्रीतीसंगम

कृष्णा आणि कोयनेच्या जगातल्या एकमेव ‘प्रीतिसंगमा’वरच शहर ‘कराड’, दोन हजार वर्षाचा प्राचीन वारसा जपणारं, सातारा जिल्ह्यातलं व्यापारी, शैक्षणिक केंद्र! प्रागतिककालीन मानवी वसाहतीचे त्या काळात या परिसरात असल्याचे पुरावे सापडल्याने सातवाहनपूर्वकालीन, सातवाहनकालीन इतिहासाचा धागा जोडला गेला. चालुक्य, राष्ट्रकुल घराण्याचं राज्य या परिसरावर होते. सातवाहनकालीन नाणी आणि रोमन प्राचीन वस्तुही उत्खननात सापडल्यात. या शहराचा त्या काळात रोमशी व्यापार असावा, असा निष्कर्ष इतिहास संशोधकांनी काढला. कोकण-कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्याचं मध्यवर्ती शहर असलेल्या ‘कराड’चा लौकिक वाढवला तो स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाने! कराडच्याच लोकमान्य टिळक विद्यालयात शिकलेल्या यशवंतरावांनी स्वातंत्र्य संग्राम चळवळीतही नेतृत्व केलं होतं. महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार असलेले चव्हाणसाहेब पुढं केंद्रस्थानी गेले. संरक्षण, अर्थ, परराष्ट्र मंत्रिपदे  त्यांनी भूषवली. उपपंतप्रधान झाले. प्रचंड प्रसिद्धी, लोकप्रियता मिळालेल्या या नेत्यांची मायभूमीची ओढ कायम होती. राजकारणातल्या निवृत्तीनंतर ‘कराड’ला राहायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठी या शहरात ‘विरंगुळा’ बंगला बांधला. त्यांच्या पत्नी सौ. वेणुताई गेल्या आणि यशवंतराव ‘एकाकी’ झाले. पुढं वर्षभरातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांनी बांधलेल्या ‘निवासस्थाना’त सौ. वेणूताई चव्हाण प्रतिष्ठाननं, यशवंतरावांची सारी ग्रंथसंपदा, वस्तू, साहित्य जपून अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केलं आहे. प्रीतिसंगमावर बांधलेली त्यांची समाधी या सुसंस्कृत राजकारण्याची, साहित्यिकांची स्मृती जागवत आहे.

५० च्या वर मंदिरे असलेल्या कराड शहरातल्या ‘वेद पाठशाळेनं’ संग्रहीत केलेली प्राचीन संस्कृत मराठी कोशांच्या संग्रहासाठी स्थापन केलेले ‘ग्रंथालय’ प्राचीन इतिहासाच्या अभ्यासक्रमांना महत्त्वपूर्ण ठरलं! कृष्णेच्या काठावरचा ‘पंताचा गोट’, भुईकोट किल्ला ढासळला असला तरी, ‘नकट्या रावळाची पुरातन विहीर, संत सखूसह शहरातली पन्नासच्यावर मंदिरे या शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवतात. परिसरातील जखिणवाडी, कराड आगाशिव, चचेगावची बौद्ध लेणी, बौद्ध संस्कृतीची ‘मुद्रा’ या परिसरावर असल्याचं दाखवून देतात.

नकट्या रावळाची पुरातन विहीर

शहराच्या उत्तरेला कृष्णेच्या पलीकडं अभियांत्रिकी, फार्मसी, विज्ञान, कला शाखेच्या महाविद्यालयांमुळं ही विद्यानगरी झाली. सातारा जिल्ह्यातलं सर्वात मोठे व्यापारीकेंद्र हेच! या शहराचा औद्योगिक विकास, शहराचा योजनाबद्ध आधुनिक विकास, सलग ५० वर्षे नगराध्यक्षपद भूषवलेल्या पी. डी. पाटील यांनी घडवला. ‘कराड’ शहर देखणं-सुंदर केलं! सातारा जिल्ह्यात व्यापार-शैक्षणिक क्षेत्रात हे शहर अद्यापही आघाडीवर आहे. लोकसंस्कृतीचा जुना वारसा जपत, आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.

सातारा, डोंगराळ भागातला माणदेशातला ‘सातारी’ माणूस स्वाभिमानी, सातारच्या भूमिचा त्याला विलक्षण अभिमान! शांत पण प्रसंगी पेटून उठणारा-बंडखोर वृत्तीचा, त्याच्या मनातलं सहसा ओळखता येत नाही. आधुनिकता स्वीकारणारा, जुनपणं जपणारा, इतिहासाच्या वारशाचं मोठेपण मिरवणारा, उदारवृत्तीचा आहे! सातारच्या भूमिची नस भल्याभल्या राजकारणी दिग्गजांनाही सापडत नाही. सध्याच्या आधुनिक प्रवाहातही सातारकरांचा नेमका स्वभाव सांगणं अवघड! त्यामुळच ‘अशी ही सातार्‍याची तर्‍हा’! हेच खरे!!

वासुदेव कुलकर्णी, सातारा
मो.९४२२६०२७५२
पूर्वप्रसिद्धी : मासिक ‘साहित्य चपराक’, दिवाळी अंक २०१५

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “अशी ही सातार्‍याची तर्‍हा”

  1. Rakesh Shantilal Shete

    माझ्या सातारा जिल्ह्याचा खूप अभ्यासपूर्ण, एवढा विस्तृत आढावा पहिल्यांदाच वाचायला मिळाला.. धन्यवाद!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा