फाटकावर थांबूनच त्याने हवेली डोळाभर न्याहाळली. मोठ्या झाडाची पानगळ झाली तरी त्याचा भक्कमपणा गळत नसतो असंच काहीसं वाटलं त्याला. हवेलीचं जुनं वैभव जरी खंगलं होतं तरी तिची ऐट काही कमी झाली नव्हती. श्रीमंती उपभोगलेल्या किंचित प्रौढ बाईसारखी वाटत होती ती.
‘‘कलेक्टर साहेबानं पाठवलं का तुम्हाला?’’ कुणीतरी त्याला बोललं म्हणून तो भानावर आला. त्यानं त्यांच्याकडं बघितलं. एक म्हातारा माणूस, अरे हे तर दामूअण्णा!
‘‘हो.’’
‘‘या साहेब, या’’ असं म्हणत दामुने त्याची बॅग घेतली अन् वाड्याकडे चालू लागला. तोही त्याच्या पाठोपाठ चालू लागला.
‘‘किती दिवस थांबावे लागेल?’’
‘‘दोन-चार दिवसात होतील सगळे व्यवहार.’’
हवेलीच्या डाव्या कोपर्यात पाहुण्यांसाठी एक टुमदार घर बांधलेलं होतं पण तिने कधी तिथे पाहुण्याना राहू दिलं नाही, त्याचे पाय आपसूक तिकडे वळले.
‘‘ओ साहेब, तिकडे नाही, तिकडे कुणीच रहात नाही, तुमची व्यवस्था हवेलीत केलीय.’’
‘‘आणि कौस…ल…?’’ त्याने पुढचं वाक्य ओठातच गिळलं.
‘‘काय… काय… म्हटले…?’’
‘‘काही नाही. चला.’’ अन् तो पुन्हा हवेलीकडे वळला. त्याला राहून राहून वाटत होतं की घराच्या खिडकीतून कुणीतरी आपल्याला बघतंय, चार-दोन पावलं चालून झाले अन् त्याच्या कानावर मंजुळ बोल पडले.’’
‘‘हाकेस साद माझ्या केव्हातरी मिळावी.’’
त्याने दचकून मागे पाहिलं. खिडकीत कुणीच नव्हतं. सकाळच्या गारव्यातही त्याला घाम फुटला.
‘‘काय झालं साहेब?’’ तो पुन्हा दामूच्या आवाजाने दचकला. कपाळावरचा घाम पुसत तो बोलला, ‘‘काही नाही, चला!’’
खोलीत दामूने त्याचं सामान एका बाजूला ठेवलं. खूप वर्षानंतर आजच साफ केल्यासारखी वाटत होती खोली. एक कुबट वास येत होता. एका भिंतीला लागून दोन पुरूष आरामात झोपू शकतील असा भक्कम सागवानी दिवाण होता. त्याच्या बाजूला एक खुर्ची. एका कोपर्यात लाकडी तिपाईवर माठ अन् त्यावर पितळी गडवा. सदरा काढत त्यानं दामूला विचारलं, ‘‘एवढा शुकशुकाट का? कोणीच राहत नाही का इथे?’’
या प्रश्नावर दामू चरकला.
‘‘साहेब थकला असाल तुम्ही. आराम करा. मी जेवणाचं बघतो’’ अन् तो लगेच तिथून निघाला.
त्याला दामूचं वागणं कळलं नाही. विचाराच्या तंद्रीत त्यानं कपडे काढून लुंगी नेसत दिवाणावर अंग झोकलं. प्रवासाच्या थकव्यामुळे त्याचा लगेच डोळा लागला. भूतकाळ अंधारवाटेने विचारांची तंद्री व्यापू लागला.
‘‘अक्कासाहेब ही रानकेवड्याची फुलं बघा मी आणली तुमच्यासाठी.’’
‘‘पुरू… तुला कितीदा सांगितलं की मला अक्कासाहेब म्हणू नको म्हणून… मी काही खूप मोठी नाही तुझ्याहून? अडीच वर्ष म्हणजे असते तरी किती?’’
‘‘नको! धाकटे मालक रागावतात मग.’’
‘‘मग त्यांच्यादेखत म्हणायचं नुसतं, मी कशी तुला पुरू म्हणते… पुरूषोत्तम म्हणते का?’’
‘‘बरं!’’
‘‘काय म्हणशील मग?’’
‘‘कौशल्या… दुसरं काय?’’
‘‘नको.’’
‘‘मग?’’
‘‘कौसल म्हण.’’
‘‘बरं.’’
‘‘आण ती फुलं इकडं. त्यातलं एक मोठं फुल घे अन् माझ्या वेणीत घाल.’’
‘‘मी…?’’
‘‘मग दुसरं कोण, ये घाबरू नको. तुला एक गम्मत दाखवते.’’
चौदा पंधरा वर्षाचा पुरू घाबरत कौसलकडे गेला. ती आरशाकडे तोंड करून बसली.
त्याने एक फूल घेतलं आणि तिच्या लांबसडक वेणीत खोवू लागला. त्याला ते नीट जमेना म्हणून तिने तिचे दोन्ही हात बगलेतून मागच्या बाजूने वर करत पुरूचे दोन्ही हात धरून फुलाचं देठ वेणीत खोवलं. त्यावेळी पुरूने आरशात बघितलं. हात वरून मागे केल्याने तिची छाती अधिकच पुढे आल्यासारखी वाटली. तो थरथरला. कपाळावर घाम आला त्याच्या. हाताला जोरात झटका देऊन तो धूम ठोकत त्याच्या खोलीकडे धावला. कौसल त्याला धावत बघताना खोडकर हसली.
कौशल्या सर्जेराव जमीनदाराची एकुलती एक मुलगी. अठरा एकोणीस वर्षाची असेल. हवेलीत कुणी मुलं यायची नाही अन् तिला बाहेर जाण्याची परवानगी नसे किंवा कुण्या मोठ्यासोबतच बाहेर पडावं लागायचं. पुरूचे वडील सर्जेरावांच्या मालमत्तेचा हिशोब ठेवणारे कारकून होते. त्यांना हवेलीच्या पाठीमागे एक घर दिलेलं होतं. तोच एकमेव तिचा सवंगडी होता.
पाहुण्यांसाठी बांधलेल्या खोलीत दोघे तास न् तास घालवायचे. अभ्यास, खेळ, गाण्याचा रियाज सगळं तिथंच. दिवस आल्यापावली जात होते. वर्ष-दोन वर्षे सरली. पुरूही जरा जाणता झाला होता. कोवळी मिशी काळी होऊ लागली होती. पुरू रोज तिला केवड्याची फुलं आणून द्यायचा. आता त्याला म्हणायची गरज नव्हती. त्यानं फुलं आणली की कौसल आरशापुढं जाऊन बसायची आणि तो आपसूक एखादं टबून फूल वेणीत तर कधी बुचड्यात माळायचा. तेव्हा तिच्या मानेला बोटं लागायची अन् त्याच्या सर्वांगात एक वीज उठायची. तिच्या मानेवरचे भुरके केस उभे राहायचे. हे नित्यनेमाने व्हायचं. तिच्या मानेभोवतालचा गंध पुरूला वेडापिसा करायचा. एकदा तिची पाठ पुरूच्या छातीला लागली होती तेव्हा किती तांडव उडालं होतं अंगात. पुरूला भीती वाटायची आपण अयोग्य करतो म्हणून अन् कौसलला वाटायचं पुरू तर लहान आहे आपल्यापेक्षा पण तारूण्य कोसळू लागलं की झूठ ठरतात असे प्रश्न. स्पर्शातला उन्माद अन् गोडी झुगारून देत असते नीतिनियम.
हलक्या सरी बरसत होत्या. हवेत गारवा होता. सकाळची सूर्यकिरणे ढगांनी गिळली होती. पुरू नित्यनेमाने तिच्यासाठी फुले घेऊन अर्धओला होत आला होता. कौसल नवीन शिवलेला ब्लाउज घालून बघत होती. का कोण जाणे आज तिला साडी घालावी वाटत होती. तो दरवाजा न वाजवता आत आला तसं तिने मागे वळून बघितलं. खाली पडलेला पदर तिने घाईत वर घेतला. वरचं बटन लागत नव्हतं. तिच्यावर पडलेली नजर मागे घेत खाली बघत तो बोलला, ‘‘अगं, मी फुलं घेऊन आलो होतो.’’
‘‘मग बस ना.’’
‘‘नको.’’
‘‘आज माझ्या वेणीत नाही माळणार फूल?’’ ती जरा सरसावली होती.
‘‘नको.’’
‘‘का?’’
‘‘माहीत नाही, येतो मी.’’
‘‘पुरू… ऐक ना, तुला माझी शप्पथ आहे’’ आणि ती आरशापुढे जाऊन उभी राहिली. ओढ विश्वाचा विसर पडायला मजबूर करत असते. पुरूचा नाईलाज झाला.
तिने बुचडा बांधला होता. त्याने एक फुल घेतलं. तिच्याजवळ गेला. घाईतच फूल खोवू लागला. बाहेर पावसाने पाय उचलला होता. छप्पर संगीत वाजवू लागलं. त्या मानेभोवतालचा गंधात नवीन चोळीच्या वासाची भर पडली होती. त्याने आरशात बघितलं कौसल आज अधिक उठावदार दिसत होती.
कामुक स्त्री सर्वाधिक सुंदर दिसत असते. ती अजून मागे सरकली. अंतर घटलं. तिची पाठ त्याच्या छातीवर टेकली गेली. पदर ढळला. त्याने त्याचे हात तिच्या उघड्या खांद्यावर ठेवले. पाऊस चेकाळला. पुरूला आपण हलके होऊन तरंगतो आहोत असं वाटलं. कौसलच्या अंगात शहारे दौडले. तिने मान मागे झुकवत त्याच्या खांद्याजवळ टेकली.
दोन देह एक होऊ लागले…
पाऊस बेभान होऊ लागला होता.
टक टक टक… दरवाजा वाजला.
‘‘साहेब…’’
दामूअन्नाच्या आवाजाने त्याचा डोळा उघडला.
भूतकाळ इतका जिवंत होऊन सरकला होता डोळ्यांपुढून की त्याला क्षणभर वाटलं आपण अजून तिथेच आहोत. त्याने दरवाजा उघडला. दामूअन्नाने चहा दिला. अण्णा आपला चेहरा निरखून बघत आहे असं त्याला वाटलं म्हणून तो पाठमोरा झाला.
‘‘साहेब…’’
‘‘हं’’
‘‘सांच्याला जेवायला काय बनवू?’’
‘‘अळूच्या वड्या… म्हणजे काहीपण बनवा.’’
‘‘अळूच्या वड्या… हं वाटलंच होतं मला.’’
‘‘काय वाटलं होतं?’’
‘‘काही नाही काही नाही साहेब’’ असं म्हणत दामूअण्णा निघून गेला.
त्याला आपण चुकल्यासारखं वाटलं कारण कौसलला खूप आवडायच्या अळूच्या वड्या. आपली ओळख आपण लपवली पाहिजे. इथे जर कळलं की मी तोच पुरूषोत्तम आहे तर…? जुना काळ आठवून त्याच्या अंगावर काटा आला.
चहा पिऊन तो बाहेर पडला. हवेलीच्या आवारात शुकशुकाट होता. किती गजबजलेली असायची हवेली पण आज कुणीच नाही इथे. जणू काही हा शापित परिसर आहे. बाहेर येऊन त्याने सभोवताल नजर टाकली. ते टुमदार घर दिसलं आणि त्याचे पाय आपसूक तिकडे वळले. त्याला क्षणभर वाटलं कौसल आपली वाट बघत असेल पण तो विचार त्याने झटकला. वीस वर्षे उलटून गेली. लग्न झालं असेल तिचं. रमली असेल तिच्या संसारात. दारापुढच्या पायरीवर पाय ठेवणार तोच एक भारदस्त आवाज आला, ‘‘कोण आहात तुम्ही, तिकडे काय करता?’’
तो थबकला. आवाजरूनच त्यानं ओळखलं, मोठे मालक सर्जेराव जमीनदार आहेत. तो मागे फिरला. त्यांच्या घार्या डोळ्यात डोळे घालायची त्याची हिम्मत झाली नाही.
ते पुन्हा गरजले, ‘‘दामू, दामू’’ तसा दामू धावत बाहेर आला.
‘‘जी मालक?’’
‘‘कोण आहेत हे आणि इकडे काय करतात?’’
‘‘मालक… ते कलेक्टर सायेबाने पाठवलेले साहेब हे.’’
‘‘मग त्यांना सांगितलं नव्हतं का तिकडे जायचं नाही म्हणून!’’
‘‘सांगितलं ना आल्या आल्या, सांगितलं होतं ना साहेब?’’
‘‘हो सांगितलं होतं पण मला वाटलं…’’
‘‘तुमचं वाटणं तुमच्याजवळ ठेवा… इथे आलात गुमान तुमचं कामाशी काम करा’’ आणि तडक निघून गेले.
‘‘काय काम साहेब तुमचं? तुम्हाला सांगून पण ऐकलं नाही.’’ दामू कपाळाला हात लावत बोलला आणि परत फिरला. चार-पाच पावलं जाऊन मागे फिरून बघत पुन्हा बोलला, ‘‘का तुमचं काही राहिलं त्या घरात?’’ आणि कसातरी हसत किचनकडे निघून गेला.
त्याच्या अशा हसण्यानं क्षणभर याला कसंनुसं झालं, आपली चोरी पकडली जाते की काय असं वाटलं. त्या घरावर एक नजर टाकून तो फाटकाकडे वळला. सूर्य परतीच्या प्रवासात गाभूळ झाला होता. त्याला ओढ्याकडून फेरफटका मारून यावं वाटलं. फाटक उघडायला त्याने हात लावला तोच तो मंजुळ आवाज त्याच्या कानावर आला.
‘नावाशिवाय त्याच्या झाले जणू निनावी
हाकेस साद माझ्या केव्हातरी मिळावी’
तो थरथरला, मागे वळून बघितलं. गाणं थांबलं. कौसलचा आवाज होता. त्याला काही सुचेना. त्याला ओरडावं वाटत होतं.
‘‘कौसल… कौसल…’
पुन्हा त्याने त्या घरावर नजर टाकली. कुणी नव्हतं तिथे. आपल्याला भास झाला असावा असं वाटलं त्याला पण तो कासावीस झाला होता. फाटक उघडून तो बाहेर पडला. तांबूस किरणे झाडीतून डोकावत होती. तो कुठे चालला त्याला माहीत नव्हते. सारखी डोक्यात कौसल घोळत होती. आपसूक तो त्या खडकावर आला जिथे तो कौसलसोबत तास न् तास बसायचा. तिथे बसत त्याने ती मारायची तसा दगड मारला डोहातल्या पाण्यावर. तवंग बाजूला झाला. तरंग उठले…
आपल्याही आयुष्यावर असाच तवंग साचला आहे. कुणीतरी दगड मारायला हवा… कुणीतरी म्हणजे? कौसलनेच! ह्या कल्पनेने त्याला हसू आलं… तो पुन्हा भूतकाळात रमला…
तिच्या खांद्यावरचे हात कधी तिच्या कमरेवर गेले त्याला कळलंच नाही. तिने मान अधिक मागे झुकवत हात पुढून मागे घेत त्याच्या मानेवर ठेवला… अवस्था अलवारपणाच्या उंबरठ्यावर आली… श्वास पेटू लागले. त्याने मान झुकवत तिच्या मानेचं चुंबन घेतलं… पाऊस थयथय नाचू लागला… ती गर्रकन वळली… अन दोन्ही हात त्याच्या कानशीलावर ठेवून त्याचे ओठ ओठांच्या चिमटीत पकडले… पुरू… पुरू… कौसल… कौसल… दोघे एकमेकांना घट्ट बिलगले… पहिला पाऊस… पहिली मिठी… पहिलं प्रेम… हे आक्रस्ताळं असतं… एक धुंदी दोघांच्या देहभर दौडत होती… अन् काडकन वीज कडाडली… दोघे नागनागीनिचा जोडा कुणीतरी दगड मारून विलग करावा तसे ते विलग झाले… तो भानावर आला… अन् तसाच पळत सुटला… भर पावसात… मागून हाक येत राहिली… पुरू… पुरू… पण त्याने मागे बघितलं नाही… ती दिवाणावर बसली. बुचड्यातला मोगरा काढला अन् त्याला हुंगत गुणगुणू लागली…
झाडा तुझ्या मिठीने आला बहर जिवाला
कोणी म्हणू नका रे वेलीस जाग यावी
हाकेस साद माझ्या…
तो धावत धावत ओलाचिंब होऊन त्याच्या खोलीत खाटेवर जाऊन पडला… भय, हर्ष, आनंद सगळं काही दौडत होतं अंगात. क्षणात आनंद होत होता अन् क्षणात भीती वाटत होती… आपण चुकत तर नाही ना? किंवा चुकतोय याची जाणीव होती. दरवाजावरच्या टकटकीने त्याची तंद्री भंगली…
‘‘तू… कशाला आलीस?’’
ती नुसतच हसून आत आली. तो पाठमोरा झाला. आता त्याचं हृदय अजून धडकू लागलं होतं. दोघेही ओले झाले होते. तिने हळूच त्याच्या पाठीवर हात ठेवला. तो हवासा स्पर्श इच्छा असूनही अंग चोरत टाळला.
‘‘नको कौसल.’’
‘‘का…?’’
‘‘योग्य नाही हे…’’
‘‘म्हणजे…?’’
‘‘म्हणजे तुला माहीत आहे मी कोण तू कोण?’’
‘‘माणसाचं आहोत ना आपण?’’
‘‘तुला कसं कळत नाही कौसल..? तू जमीनदाराची मुलगी मी एक कारकून.’’
‘‘प्रेमाला नसतो रे संपत्तीचा मोह.’’
‘‘तू का समजून घेत नाहीस कौसल? तू मोठीसुद्धा आहे माझ्यापेक्षा.’’ भीतीने त्याला प्रौढ केलं होतं.
‘‘मी आवडत नाही का तुला?’’
‘‘तसं नाही.’’
‘‘मग?’’
‘‘पुढं काय होईल आपलं हे…’’ तिने त्याचं वाक्य त्याचे ओठ ओठाने आवळत गिळून घेतलं…
पाऊस अचंबित नजरेने तो सोहळा बघत होता.
पाऊस पडून गेल्यावर आभाळ जसं मोकळं होतं तसे झाले होते दोघे… आता त्यांच्या नात्याला नाव मिळालं होतं… ती तशीच त्याच्या मिठीत कितीतरी वेळ पडून होती… तृप्तीचा आनंद तिच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. पुरूचंही काळीज आता शांत झालं होतं.
तो तिच्या केसातून बोट फिरवत होता. सारे क्षण सुवर्णमय झाले होते. ती उठली. त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं अन् जायला निघाली. त्याने तिचा हात धरून तिला मागे खेचलं… एक झोंबाझोंब सुरू झाली… दरवाजा वाजला अन् आवाज आला.
‘‘कौसे…’’ दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली होती. तो आवाज दादासाहेबांचा होता. पुरूच्या कमरेत लाथ मारून त्याने कौसलचा हात धरून फरफटत मोठ्या मालकाकडे घेऊन गेला… पुरूचं काळीज बसलं होतं. कौसल नुसती रडत होती. ही बातमी हवेलीभर पोचली होती. नोकर-चाकर, मोठी मालकीण, गडी सगळे गोळा झाले होते. पुरूला अन् त्याच्या आईवडिलांना बोलवण्यात आलं. तो भीतीने थरथरत होता. तो दिसताच मोठ्या मालकाने त्याच्या खाडकन थोबाडात मारली. त्याचे आईवडील गयावया करू लागले. त्याच्या वडीलानेही त्याला बेदम मारायला सुरूवात केली. रागाच्या भरात दादासाहेबांनी बंदूक घेतली अन् पुरूवर ताणली.
‘‘दादासाहेब’’ रडणारी कौसल एकदम गरजून उठली, ‘‘त्याचा काही दोष नाही. गोळी घालायची तर मला घाला’’ अन् ती पुरूच्या अन् बंदुकीच्या मध्ये येऊन उभी राहिली.
‘‘नालायक कार्टे’’ म्हणत मोठ्या मालकाने तिच्या कानशिलात भडकावली.
‘‘हिला घेऊन जा अन् डांबून टाका बाहेरच्या घरात.’’ तसे दोन गडी पुढे आले. तिला फरफटत घेऊन जाऊ लागले. ती पुरू पुरू म्हणून रडत होती. पुरूच्या तोंडून मात्र शब्द निघत नव्हता… त्याला कौसल म्हणून ओरडावं वाटत होतं. त्याचे वडील मोठ्या मालकांचे पाय धरून रडत होते. दादासाहेब मोठ्या मालकाच्या इशार्याची वाट बघत होते. मोठे मालक गरजले…
‘‘तुम्ही आजपर्यंत इमानेइतबारे सेवा केलीत म्हणून सोडतो… ह्या कारट्याला घेऊन जा कुठेही. पुन्हा ह्या गावाच्या परिसरात जरी दिसलात तर गोळ्या घालण्यात येतील’’ अन् लालबुंद डोळ्याने ते बाहेर पडले. दादासाहेब दातओठ खात होते. त्याने पुरूच्या कमरेत पुन्हा लाथ घातली आणि ते सुद्धा रागात बाहेर पडले. दामूअण्णा कोपर्यात उभा राहून सगळं बघत होता. पुरूची आई रडत होती. मोठी मालकीण त्याच्याकडे रागाने बघत होती. तिघे मायलेक खालमानेने बाहेर पडले.
फाटकातून बाहेर पडताना त्याने डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घरावर नजर टाकली. कौसल खिडकीतून रडतरडत बघत होती. पुरूचे डोळे आरोळ्या देत होते ‘कौसल कौसल.’
‘‘साहेब’’ दामूअण्णाच्या आवाजाने तो भानावर आला.
‘‘तुम्ही इकडे?’’
‘‘आलो तुम्हाला शोधायला.’’
‘‘मोठ्या मालकांनी तुमची आठवण काढली.’’
‘‘बर! चला’’ दोघेही परतु लागले.
‘‘एक विचारू साहेब.’’
‘‘विचारा.’’
‘‘तुम्हाला ह्या परिसराबद्दल माहिती दिसते.’’ दामूअन्नाच्या त्या प्रश्नावर तो चरकला. त्याला क्षणभर वाटलं सगळं खरं सांगून द्यावं अन् विचारावं काय झालं पुढे कौसलचं? पण तो फक्त ‘‘नाही’’ असं म्हणाला. अंधार घर जवळ करू लागला होता.
दामूअन्नाशी जास्त न बोलता तो हवेली जवळ करू लागला. त्या केवड्याच्या झाडाजवळ तो क्षणभर थबकला. ओंजळ भरून घ्यावी वाटत होती त्याला त्या फुलांची पण त्याने मोह टाळला.
‘‘केवड्याची फुलं आवडतात तुम्हाला?’’
‘‘नाही’’ अन् तो पुन्हा चालू लागला.
दामुचा सहवास त्याला आता नकोसा वाटू लागला होता. हवेलीत आल्यावर मोठ्या मालकांशी थोडी हितगुज झाली अन् तो त्याच्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेला.
रातकिडे ताल धरू लागले होते. याचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. कुणालातरी विचारायला हवं काय झालं कौसलचं?
त्याने बळजबरीने डोळे लावायचा प्रयत्न केला. थोडी गुंग लागली अन् त्याला अंधाराचे हात आपला गळा आवळत आहेत असे वाटू लागले. त्याला दरदरून घाम फुटला. तो बिछान्यावर उठून बसला. कंदिलाची वात थोडी वाढवली. उठून गडवाभर पाणी प्याला. थोडं हायसं वाटू लागलं अन् त्याच्या कानावर तेच सूर परत आदळले,
‘‘रानात केवड्याचे यावे भरून डोळे
माझी तुझी कहाणी इतकी तरी उरावी
हाकेस साद माझ्या केव्हातरी मिळावी’’
तोच आवाज! तोच आवाज कौसलचा! कुणीतरी काहीतरी लपवतंय आपल्यापासून आणि ती बोलावतेय आपल्याला. आपण गेलं पाहिजे, शहानिशा केली पाहिजे असा विचार करत तो खोलीच्या बाहेर पडला. बाहेर अंधार भर तारूण्यात होता. रातकिड्यांची स्पर्धा जोरात सुरू होती. तेवढ्या अंधारात तो त्या घराकडे निघाला. त्याला वाटत होतं कौसल असेल त्या घरात. हुरहूर अन् भीती एकाचवेळी त्याच्या काळजात दौडत होती. पायरीवर पाय ठेवणार तोच आवाज आला,
‘‘साहेब…’’ एकदम काळजात धस्स झालं त्याच्या. तो आवाज दामूअण्णाचा होता पण अनपेक्षित अन् एक जरब होती त्या आवाजात. कंदील घेऊन दामूअण्णा जवळ आले. भीती थोडी निवळली.
‘‘काय करताय एवढ्या रात्री इकडे?’’
‘‘काही नाही झोप येईना म्हणून…’’
‘‘म्हणून या घराकडे आलात, तुम्हाला सांगितलं होतं ना इकडे फिरकायचं नाही म्हणून!’’ दामूअन्नाचा बोलण्याचा रोख वेगळाच होता. आपली चोरी पकडली गेली म्हणून पुरू थोडा खजील होता.
‘‘मी आपला सहज बाहेर…’’
‘‘सहज की कोणी बोलावतंय तुम्हाला…?’’
‘‘म्हणजे…? मी समजलो नाही.’’
दामूअण्णा हसले. कंदील त्याच्या चेहर्याजवळ नेत त्याचा चेहरा निरखला अन् म्हणाले, ‘‘डोळे खोटं बोलत नसतात पुरू!’’
‘‘पुरू…! कोण पुरू…?’’
‘‘पुरूषोत्तम ना तू…?’’
खरंतर त्याला नाही म्हणायचं होतं तरी तो दबक्या आवाजात अन् घाबरत हो म्हणाला.
दामूअण्णा कपाळाला हात लावत खालीच बसला.
‘‘तिचा शब्द खरा ठरला तर…?’’
कंदिलाच्या उजेडात दामूच्या चेहर्यावरचं ते विचित्र भय स्पष्ट दिसत होतं.
‘‘काय झालं ते मला स्पष्ट सांगा अण्णा… मलाही इथं आल्यापासून विचित्र भास होताहेत.’’ त्याच्या हातापायातलं त्राण गेल्यासारखं झालं अन् तोही त्याच्याशेजारी बसला.
बाजूचा काळोख अधिक गडद वाटत होता अन् एवढ्या रात्री एक टिटवी टीव टीव करत त्यांच्या डोक्यावरून गेली. दामूने कंदिलाची वात थोडी वाढवली. दोघात जरासा उजेड रांगू लागला. उजेड म्हणजे निदान काही काळापुरतं औषध असतं भीतीवरचं.
‘‘कोणत्या तोंडाने सांगावं तुला काय घडलं?’’ दामूच्या चेहर्यावर एक अपराधी भाव होता.
‘‘मला सगळं सांगा नेमकं काय काय झालं?’’
‘‘तू गेलास अन् कौशल्याने तुझ्या नावाचा जप सुरू केला. रात्री बेरात्री ह्या घरातून तुझ्या नावाच्या किंकाळ्या उठू लागल्या. हवेलीत अशांतता पसरली. ह्या घराच्या सगळ्या भिंती तिने तुझ्या नावाने रंगवून दिल्या… पुरू पुरू ऐकून हवेलीच्या कानठळ्या बसल्या. तिला कधी घरातून बाहेर येऊ दिलं की ओढ्या नाल्याकडे धावायची तुझं नाव घेऊन… खूप प्रेम केलं होतं तुझ्यावर तिने… खूप!’’
‘‘मग पुढे काय झालं?’’
‘‘पुढे… आम्ही सगळे शापित झालो रे तिच्या शापाने…’’
‘‘म्हणजे…? कुठे आहे ती आता…?’’ त्याची जिज्ञासा चळली.
‘‘म्हटलं तर इथे, म्हटलं तर कुठेच नाही!’’
‘‘स्पष्ट सांगा ना.’’
‘‘पंचक्रोशीत चर्चा होऊ लागली होती. दादासाहेबांना अपमान सहन होत नव्हता. आईसाहेबांनासुद्धा मुलीची थेरं आवडत नव्हती. मोठे मालक घराबाहेर पडत नव्हते. कौशल्या रात्री बेरात्री गाणे गात असायची. अशी कोणती जादू केली होतीस तू तिच्यावर देव जाने.’’
‘‘प्रेम होतं ते अण्णा! पण मी नाही करू शकलो तिच्याइतकं, हिम्मत नव्हती माझ्यात.’’
‘‘हं… तू तेव्हा बोलवायचं होतं तिला कौसल म्हणून… ती थोडी तरी तृप्त झाली असती. अतृप्तांना भटकंतीचा शाप असतो रे!’’
‘‘हो चुकलंच माझं, मन विव्हळत होतं पण ओठांची हिम्मत नाही झाली. तिचं काय झालं पुढं मग?’’
‘‘त्या रात्री आम्ही ठरवलं तिला खरं खरं सांगून द्यायचं. मी, मोठे मालक अन् दादासाहेब ह्या घरात गेलो. तिच्या डोळ्यात आर्जव होतं. ओठात तुझ्या नावाच्या हाका. मन घट्ट करून मीच पुढाकार घेतला अन् सांगितलं तिला खरं. तेव्हा तिचा रुद्रावतार बघून आम्ही तिघे घाबरून घराबाहेर पडलो. दार बाहेरून लावून घेतलं. ती खिडकीतून बरळत होती, ‘‘माझा पुरू येईल. नक्की येईल. तुम्ही सगळे शापित व्हाल. इथलं सुख करपून जाईल… तुम्हाला चैन मिळणार नाही’’
‘‘असं काय सांगितलं होतं तिला तुम्ही?’’
‘‘तुझा खून केल्याची बातमी.’’
‘‘क्काय…? माझा खून? पण का? मी तर गेलो होतो निमूट निघून!’’
‘‘हं, पण दादासाहेबांना भीती होती की तू परतून येशील! त्यांना ही उबळ पुन्हा उठू द्यायची नव्हती. म्हणून पाठवले पारधी तुमच्या मागावर. त्या कटात आम्ही सर्व सामील होतो. पारध्यांनी तुम्हा तिघांना संपवल्याची बातमी दिली. तू वाचलास हे कळलं असतं तर शोध घेतला असता तुझा आम्ही पण आम्ही कर्मदरीद्री माणसं! हे भोग भोगायला उरलो मागे.’’
‘‘किती अवघड करून ठेवलं तुम्ही हे एका साध्या गोष्टीसाठी…’’
‘‘हं, अशा चुकांना उशाप नसतो. त्या बातमीनंतर तिने अन्नपाणी घेणं सोडून दिलं. खूप विनवण्या केल्या पण नाही बधली ती कुणाला. झटक्यात येणारा मृत्यू दयाळू असतो. तडफडून मारणारा क्रूर अन् असा मृत्यू बघावं लागणं हे कुठल्यातरी जन्मीचं पाप असतं. कौशल्या तडफडून मेली.’’
‘‘नाही अण्णा! नाही! ती आहे. इथेच आहे. मला बोलावते ती.’’ तो झटक्यात उठून उभा राहिला. अन्नाचे डोळे भरून आले. कमरेच्या चाव्या त्याच्या हातात देऊन अण्णा बोलले, ‘‘बघ जाऊन, तुम्ही भेटलात तर आम्ही तरी शापमुक्त होऊ. अपघातात गेलेल्या दादासाहेबांच्या अन् आईसाहेबांच्या आत्म्यास शांती मिळेल. बघ जाऊन…’’ अन् अण्णा डोळे पुसत हवेलीकडे परतले. सैरभैर झालेल्या पुरूला काय करावं ते उमजत नव्हतं. आपल्याच मारेकर्यांचा आपल्याला राग का येत नाही, की काळ उलटला की दुःखाची तीव्रता कमी होत असावी? याच विचारात तो पायर्या चढून वर आला. आता त्याची भीती निवळली होती. दरवाजा उघडला अन् तो आत डोकावला. त्याने घरात पाऊल टाकले. घरभर नजर फिरवली. अंधाराशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. आता उरात थोडी धडधड चालू झाली. त्याने दबक्या आवाजात आवाज दिला, ‘‘कौसल… कौसल…’’ अन् आरशाच्या बाजूने आवाज आला,
‘‘केवड्याची फुलं आणली का पुरू?’’ त्याची नजर तिकडे वळली. अंधारात एक आकृती त्याला आपल्याकडे येताना दिसली. ती आकृती हात दोन हात अंतरावर उभी राहिली अन् पुन्हा विचारती झाली,
‘‘केवड्याची फुलं आणली का पुरू?’’
‘‘नाही, तू आहेस की नाही इथे माहीत नव्हतं.’’
‘‘हं. तुलाही पटलं तर मी मेले म्हणून!’’
‘‘नाही… पण…’’
‘‘मी कशी जाईल तुला भेटल्याशिवाय? तू येशील खात्री होती.’’
‘‘इतकं प्रेम करत होतीस माझ्यावर?’’
‘‘हो. खूप.’’ बोलता बोलता दोघे सराईतपणे बसावे तसे दिवाणावर जाऊन बसले. दरवाजा सताड उघडा ठेऊन. प्रहर उलटत होते अन् दोघे एकमेकांना मिठीत घेत आपापली दुःखे सांगत होते. शेवटी ती म्हणाली, ‘‘तू आलास! तृप्त झाले मी! जायला मोकळी झाले!’’ तिच्या मांडीवर त्याचा केव्हा डोळा लागला हे त्याला कळलं नाही. तिने त्याला विचारलं, ‘‘जाऊ का रे?’’ त्याने गुंगीतच ‘‘हं’’ म्हटलं.
दिवस उजाडला तरी तो बाहेर आला नाही म्हणून अण्णा त्या घराकडे गेला. दार उघडेच होते. भीत भीत त्यांनी आत डोकावून बघितलं. पुरू दिवाणावर झोपलेला होता. सर्वत्र जाळे अन् धूळ होती. त्याच्या अंगाखांद्यावर सर्व जाळे चिकटले होते. त्यांनी त्याला हलवून उठवलं, ‘‘पुरूषोत्तम… पुरूषोत्तम!’’
तो उठला अन् अचंबित नजरेने बघू लागला. त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. मी इथे कसा आलो? आणि तुम्ही मला पुरूषोत्तम का म्हणताय?
दामूअण्णा गोंधळला. त्याला काय म्हणावे ते सुचेना. त्यालाही तिथून बाहेर निघायचं होतं. त्याने त्याचा हात धरला अन् त्याला बाहेर काढलं. कोणती भीती काळजात होती काय माहीत. त्याने दरवाजा पुन्हा लावून कुलूप लावले… हा झपाटला काय? की आपल्याला उगाच भीती दाखवतो? असे प्रश्न थैमान घालू लागले त्याच्या मनात… तो एका निश्चल शरीराला बाहेर घेऊन आला… पायर्या उतरून तो खाली बसला तेव्हा… अण्णाचा धीर खचला… अण्णाने भीत भीत विचारलं…
‘‘कोण आहात तुम्ही साहेब…?’’
त्याने फक्त त्याच्याकडे पाहिले. त्याचे डोळे लालबुंद होते… दामुअण्णा घाबरला… दूर झाला.
‘‘सांगा ना साहेब… माझं काही चुकलं का? तुम्ही नेमके कोण आहात?’’
ते लालबुंद डोळे पुन्हा वटारले त्याने.
‘‘मी कोण आहे? कोण आहे मी… यापेक्षा तू कोण आहे ते सांग मला…?’’
‘‘मी दामूअण्णा… माहीत आहे की तुम्हाला!’’ दामूच्या कपाळावर सकाळच्या शीत हवेत पण घाम जमा झाला…
‘‘खरं का नाही बोलला मग…?’’
‘‘खरंच बोललो की साहेब.’’
‘‘खरं बोलला असतास तर नसतो राहिलो मी असा अतृप्त.’’
‘‘म्हणजे…? नाही समजलं मला?’’
‘‘तुला सगळं समजत होतं. सुरूवातीपासून तरी तू नाही बोललास… अन् वागला धन्याच्या मर्जीने…’’
‘‘असं काय बोलता साहेब तुम्ही? मी सगळं खरं सांगितलं होतं ना तुम्हाला रात्री?’’
‘‘सगळं खरं सांगितलं…?’’
‘‘हो… सगळं खरं… धनाईची शप्पथ…!’’ घाबरून त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. अंग थरथरत होतं. तो हळूहळू पाऊलं मागे घेत होता अन् हा गरजला…
‘‘थांब…’’
‘‘बोला साहेब!’’ त्याची जीभ चाचरत होती.
‘‘खरं खरं सांग कौसलचं काय झालं?’’ आता त्याच्या पायाखालची जमीन सरकली… अन् त्याने ओरडत धूम ठोकली…. ‘‘मालक… मोठे मालक वाचवा मला.’’
हा हसत उठला अन् त्याच्या खोलीकडे वळला… एक क्रूर हास्य त्याच्या चेहर्यावर होतं.
दामूअण्णाने सगळी हकीकत थरथरत्या जिभेने मोठ्या मालकाला सांगितली. मोठ्या मालकाचे घारे डोळे भयचकित झाले. तरी सावध होऊन त्यांनी त्यांचा आब सांभाळला.
काठी उचलत ते भारदस्त आवाजात म्हणाले, ‘‘चल.’’
‘‘कुठे..?’’
‘‘त्याच्या खोलीकडे.’’
‘‘कशाला…?’’
‘‘चल म्हटलं ना’’ त्यांचा राग अनावर झाला.
‘‘जी मालक.’’
दोघे खोलीपुढे आले. दामूने दरवाजा ढकलला. दरवाजा आतून उघडा होता. तो दिवाणावर सुन्न अवस्थेत खाली मान घालून बसलेला होता. त्याला कळलंही नाही हे दोघे आत आल्याचं. दामू मालकाच्या मागे उभा राहिला. मालक खाकरले तसा तो भानावर आला. त्याचे डोळे अधिक लालसर झाले होते. दामू भयभीत झाला. मालकाने काठी आपटत विचारलं…
‘‘कोण आहेस तू?’’
त्या अवस्थेतही त्याने विचारलं,
‘‘कौसलचं काय झालं? खरं खरं सांगा?’’
मालक निश्चल होते, दामू थरथरत होता.
‘‘तुला सांगितलं ना सगळं दामूने…?’’
मग तो गडगडाटासारखा हसला…
‘‘अजूनही खरं सांगा.’’
आता मालकाच्या डोळ्यात भयाने उडी मारली होती. त्यांना काय बोलावं ते सुचेना. त्यांनी छडी आपटत पुन्हा विचारलं, ‘‘अरे पण कोण आहेस तू?’’
त्याने लालबुंद डोळ्यांनी दोघांकडे बघितलं. दामू पुरता भेदरला होता. तो दोघांवर झेपावणार तोच दोघे मागे सरकले. दरवाजा बाहेरून लावला आणि तेथून निघाले.
खडखड वाजणार्या दरवाजाआडून तो बरळत होता, ‘‘जोवर सत्य स्ततःहून तुम्ही कबूल करत नाही तोवर तुम्हाला मुक्ती नाही.’’ त्यांच्या कानावर असा आवाज पडला. दोघे क्षणभर थांबले. एकमेकांकडे बघितलं. काय करावं सुचेना त्यांना. आता पर्याय नाही म्हणून ते दोघे मागे फिरले. खोलीच्या दरवाजाजवळ आले.
‘‘तू कोण आहे ते माहीत नाही पण आता सत्य कबूल केल्याशिवाय पर्याय नाही.’’ मालक दरवाजाजवळ जाऊन बोलू लागले, ‘‘कुठलाच पर्याय उरला नव्हता. मग त्या रात्री आम्ही सर्वांनी ठरवलं तिचा खून करायचा.’’ मालकाच्या डोळ्यातून अश्रू आले.
‘‘ह्या हातांनी पाय धरले होते हो तिचे’’ असं म्हणत दामू रडत रडत तोंड बडवू लागला.
‘‘दादासाहेबांनी हात दाबून धरले. आईसाहेब दरवाजात शांत उभ्या होत्या आणि मी जगातला सगळ्यात पापी बाप! मी गळा आवळला तिचा स्वतःच्या हाताने… मी गळा आवळला तिचा… मी’’ आणि ते खाली बसून रडू लागले.
‘‘मी पाय दाबून धरले तिचे’’ असं म्हणत दामू वेड्यासारखा फाटकाकडे धावत सुटला.
‘‘मला जगण्याचा अधिकार नाही… येतो मालक’’
‘‘दामू… दामू’’ मालकाने हाका मारल्या पण तो परतला नाही. आत धुमसणारा तो शांत झाला होता. मालकाने कडी उघडली अन् ते बैठकीकडे जड पावलाने गेले.
बराच वेळ गेला. हलती खुर्ची आता स्तब्ध झाली होती. तो बैठकीत आला. मालक खिडकीकडे तोंड करून हलत्या खुर्चीवर बसलेले होते. त्यांच्या पाठमोरा उभा राहून तो त्यांच्याशी बोलू लागला.
‘‘मी अंशुमन कोळी! अठरा वर्षाचा असेल मी! वडिलांबरोबर मासे धरायला जायचो नदीत. एक दिवस सायंकाळच्या वेळेला एक मुलगा नदीच्या थडीवर अर्धमेल्या अवस्थेत आढळला. आम्ही त्याला घरी घेऊन आलो. त्याचं औषधपाणी केलं. शुद्धीवर आला तेव्हा फक्त तो कौसल कौसल असं बरळायचा. त्याने त्याची तोडकी मोडकी ओळख सांगितली. त्याच्या आईवडिलांचा खून झाला तेही सांगितलं. तो नशिबाने वाचला होता. त्या रात्री त्याला खूप ताप भरला होता. माझ्या मांडीवर डोकं ठेवून तो बरळत होता, ‘‘अंशुमन, मी जाईल रे कधीतरी कौसलला भेटायला, ती माझी वाट बघत असेल, कधीतरी जाईल मी’’ अन् त्या रात्री त्याचा जीव गेला. मी विसरून गेलो होतो ही गोष्ट. कामानिमित्त इथे आलो अन् या गावात पाय पडला तेव्हापासून मी पण शुद्धीवर नाही. मी संभ्रमात होतो मी नेमका कोण? दोन दिवस तो होता माझ्या शरीरात. काल रात्री त्यांची भेट झाली. मी होतो तिथे त्रयस्थ शरीर म्हणून. ती मुक्त झाली आणि आता तुम्ही कबुली दिली अन् तोही मुक्त झाला. जे झालं ते वाईट झालं पण असो! दोन जीव मुक्त झाले याचा आनंद आहे.’’
मालक काहीच प्रतिसाद देत नाहीत म्हणून तो थोडा पुढे गेला. बघतो तर काय त्यांच्या तोंडून फेस आला होता. हे सगळं ऐकण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तो स्वतःशीच हसला आणि परतला. फाटकातून बाहेर पडताना त्याने हवेलीवर एकवार नजर टाकली. त्या टुमदार घराभोवतालच्या दाट धुक्यावर जणू काही ओळी उमटल्या होत्या…
‘हातातूनी निसटला अपुल्या उजेड आता
शापीत चांदण्यांची झोळी कुणी भरावी’
– जयदिप विघ्ने
बुलढाणा
७९७२४४९६९१
पृष्ठ क्र. ७२
‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 ७०५७२९२०९२
उत्सुकता वाढवणारी सुंदर कथा!
तू जादुगार आहेस जैदा… खिळवून ठेवतोस शेवट पर्यंत ❤️❤️❤️❤️