हेच खरे जगज्जेते…

हेच खरे जगज्जेते...

– विनोद श्रा. पंचभाई
9923797725
‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’

जगातील सर्वात मोठा क्रीडा स्पर्धांचा सोहळा असं ऑलिंपिक स्पर्धेचं वर्णन करण्यात येतं. यावेळी मात्र कधी नव्हे इतकी आव्हानात्मक परिस्थिती या सोहळ्यावर उद्भवली होती. त्याला कारणही तसंच होतं, अख्ख्या जगाला हादरवून सोडणारी कोरोना विषाणूची महाभयंकर साथ! त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा जवळपास एक वर्ष लांबणीवर पडली. 2020 साली होणारी ऑलिंपिक स्पर्धा प्रत्यक्षात 2021 मध्ये पार पडली! यावेळी ऑलिंपिकच्या आधीच्या घोषवाक्यात पहिल्यांदाच एक महत्त्वपूर्ण शब्द जोडला गेला… तो म्हणजे एकत्र! ‘सिटियस, फोर्टियस, आल्टियस व कोम्युनिस’ अर्थात ‘वेगवान, सामर्थ्यवान, उत्तुंग आणि एकत्र’ हे घोषवाक्य सध्याच्या परिस्थितीत प्रभावी सिद्ध झालं आहे!

जपानची राजधानी टोकियो येथे संपन्न झालेल्या या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकूण 206 देशातील सुमारे अकरा हजार स्पर्धक खेळाडू सहभागी झाले होते. तसंच तेहेतीस प्रकारचे विविध खेळ यात समाविष्ट करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही प्रेक्षकांविना या सर्व स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडल्या. मात्र तब्बल 68 हजार क्षमतेच्या भव्य स्टेडियममध्ये जवळपास हजार व्हीआयपींना तेथे उपस्थित राहण्याची परवानगी होती. तरीही जपानने उद्घाटन सोहळ्याची भव्यदिव्यता कमी होऊ दिली नाही. कोरोनाचं संकट असूनही या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या विरुद्ध लढण्याचा नवा उत्साह, नवी ऊर्जा या सोहळ्याच्या निमित्ताने दिली हे विशेष!

टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या चमूमध्ये मागच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू, सहा वेळा जागतिक विजेतेपद पटकावणारी बॉक्सर मेरी कोम, ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली भारताची पहिलीच तलवारपटू भवानीदेवी, तिरंदाजीच्या स्पर्धेत जागतिक सुवर्ण पदक जिंकणारी दीपीकाकुमारी, कुस्तीपटू मीराबाई चानू, पदार्पण करणारी मुष्टीयोध्दा लवलिना या प्रमुख वीरांगनांचा समावेश होता तर पुरूष खेळाडूंमध्ये रवी दहिया, बजरंग पुनिया या कुस्तीपटूंचा, भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॉक्सर अमित पंघाल यांचा सहभाग होता. बॉक्सर मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय तिरंगा आपल्या खांद्यावर वाहण्याचा मान मिळाला होता.

‘‘पदक जिंकण्याच्या दडपणाचे ओझे घेऊ नका, तुमचा सर्वोत्तम खेळ करा. एक नवी उंची गाठताना तुम्ही आपल्या देशाची प्रतिष्ठाही उंचावाल अशी मला खात्री आहे’’
असा प्रेरणादायी सल्ला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिंपिक स्पर्धांसाठी जाणार्‍या सर्व भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मनोधैर्य उंचावताना त्यांच्याशी पंतप्रधानांनी ऑनलाईन पद्धतीने संवादही साधला. त्यांचा हा संवाद एकतर्फी नव्हता तर त्यांनी खेळाडूंनाही बोलतं केलं होतं.

‘‘तुम्हा सर्वच खेळाडूंमध्ये मला काही गोष्टी सारख्या वाटतात. निडरपणा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता तसेच शिस्तबद्धता, झोकून देण्याची वृत्ती आणि एकाग्रता हे गुण तुमच्यामध्ये दिसून येतात. ही खूप चांगली गोष्ट आहे’’ असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले होते.

भारतीय चमुतील प्रत्येक जण आपापले कलागुण प्रस्तुत करण्यासाठी, खेळांच्या माध्यमातून आपले कसब पणाला लावण्यासाठी उत्सुक होता. ऑलिंपिक सोहळ्याचं उद्घाटन झालं आणि पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू हिने इतिहास घडवला! तिने 49 किलो वजनी गटातील या स्पर्धेत तब्बल 202 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलं. केवळ 1.5 मीटर म्हणजे चार फूट अकरा इंच इतकी उंची लाभलेल्या आणि 48 किलो वजन असलेल्या मीराबाईनं आपल्यापेक्षा चौपट असलेलं वजन उचलून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला! या देदीप्यमान कर्तृत्वाच्या उंचीसमोर आजच्या नेते-अभिनेत्यांची उंचीही खुजी वाटते! मात्र हे यश तिला एका रात्रीत मिळालं नाही तर त्यासाठी तिनं परिस्थितीवर मात करत कठोर संघर्ष केला. अपार मेहनत घेतली, तसंच सरावात तिनं कमालीचं सातत्यही ठेवलं.

निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मीराबाई लहानपणी आपल्या मोठ्या भावासोबत जंगलात जाऊन लाकडं गोळा करायची. नंतर त्याच्यापेक्षा जास्त लाकडाची मोळी तयार करून ती डोक्यावर घेऊन घरापर्यंत आणायची आणि हेच जास्त वजन उचलणं तिच्यासाठी पुढे फायदेशीर ठरत गेलं. त्यावेळी तिचं वय अवघं दहा-बारा वर्ष असेल!
एकदा मीराबाई आईसोबत टीव्हीवरचा कार्यक्रम बघण्यासाठी शेजारच्या घरी गेली. मात्र काही वेळातच वीजपुरवठा बंद पडल्याने त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. मीराबाई वजनदार लाकडी मोळी जंगलातून घरापर्यंत घेऊन येते यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी न राहवून तिची आई म्हणाली, ‘‘बेटा,आज जर आपल्याकडे बैलगाडी असती तर तुला कष्ट करण्याची गरज पडली नसती!’’

तेवढ्यात गावातील एक सुशिक्षित व्यक्ती मध्येच म्हणाली, ‘‘तू तर मुलांपेक्षाही जास्त वजन उचलू शकतेस! जर तू वजन उचलणारी खेळाडू बनली ना तर त्या खेळातून सोन्याचं मेडल सहज जिंकू शकतेस. मग बैलगाडी विकत घेणं काही अवघड नाही!’’

‘‘हो का! असं असेल तर आता मी सोन्याचं मेडल जिंकून दाखवणारच!’’ मीराबाई उत्साहानं म्हणाली. त्यावेळी ती आठव्या वर्गात होती आणि तिच्या पुस्तकातील वेटलिफ्टर कुंजूराणीदेवीवरचा एक धडा तिला अभ्यासक्रमाला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन मग तिनं मनाशी ठरवलं, आपल्या भावासोबत वेटलिफ्टिंग खेळाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना इम्फाळच्या खुमन लंपक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची माहिती मिळाली. मात्र एक अडचण होती… तिथं जाण्यासाठी रोज 60 किमी चा प्रवास करणं गरजेचं होतं! तरीही मीराबाई डगमगली नाही. तिनं आपला निर्धार आईबाबांना बोलून दाखवला. त्यांची संमती मिळताच सुरू झाला, मीराबाई चानूचा वेटलिफ्टर बनण्यासाठीचा अविरत संघर्ष!

घरच्या परिस्थितीवर मात करत तिचा रोजचा प्रवास सुरू झाला. कधी रेल्वेनं तर कधी ट्रकनं ती वेटलिफ्टिंगच्या प्रशिक्षणासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला पोहचायची! काही दिवसांनंतर झालेल्या पंधरा वर्षाखालील वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई पहिली आली. आता तिचा आत्मविश्वास दुणावला होता. नंतर वयाच्या सतराव्या वर्षी ती देशाची ज्युनियर चॅम्पियन ठरली! काही दिवसांनी तिची कुंजूराणीदेवीसोबत प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीचा मीराबाईवर चांगलाच प्रभाव पडला. त्यामुळे वेटलिफ्टिंगमध्ये काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचंच अशी खूणगाठ तिनं मनाशी बांधली. मग कालांतरानं 2016 साली तिनं कुंजूराणीदेवीचा बारा वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यावेळी तिनं 192 किलो इतकं विक्रमी वजन उचललं होतं!

2017 मध्ये अमेरिकेतील अनाहिम, कॅलिफोर्निया येथे जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारतातर्फे मीराबाई चानूला सहभागी होण्याची संधी मिळताच तिनं या संधीचं सोनं करण्याचं ठरवलं. त्यावेळी तिची प्रशिक्षक होती, जिला ती आपला आदर्श मानत आली होती ती कुंजूराणीदेवी! तास न् तास सराव करून जिगरबामीराबाईनं आपलं मन, मनगट, मस्तिष्क स्पर्धेसाठी शंभर टक्के यश प्राप्तीसाठी तयार केलं. या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईनं मानाच्या सुवर्णपदकाला गवसणी घातली! त्यानंतर तिनं मागे वळून न बघता ती आपल्या खेळात उत्तरोत्तर प्रगती करत गेली. परिणामी तिला ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त झालं. तिनं या स्पर्धेत 48 किलो वजनी गटात 196 किलो वजन उचलून नवा जागतिक विक्रम नोंदवला आणि भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं!

माळरानावर जळाऊ लाकडं गोळा करून त्यांची वजनदार मोळी डोक्यावर घेऊन आपल्या घराकडे निघालेली मीराबाई ते मानाच्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विमानानं जाणारी मीराबाई हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे!

ऑलिंपिक पदक जिंकल्यावर तिच्या अभूतपूर्व कामगिरीचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत खूप कौतुक झालं. देशविदेशातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला! त्यानंतर तिनं तिच्या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हातभार लावलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या खडतर काळात मदत करणार्‍या ट्रक चालकांचाही तिनं सत्कार केला. त्यांना सहभोजन दिलं! तिच्या याच कृतज्ञतेचं पंतप्रधानांनी भरभरून कौतुक केलं. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘‘तू ऑलिंपिक पदक जिंकून आपल्या देशाचं नाव आणखी मोठं केलंस! तुझ्या एका कृतीनं मी खूप समाधानी अन् आनंदी आहे… ते म्हणजे तू ट्रक चालकांचा केलेला सत्कार! पदक जिंकण्याचा अभिमान बाळगणं आणि त्यानंतर आठवणीनं जाणीव ठेवून त्यांचा सत्कार करणं हे तुझ्यावर झालेल्या अनमोल संस्काराचं दर्शन आहे. यापासून देशातील सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळेल!’’

मीराबाईच्या कुटुंबात कोणीही वेटलिफ्टर नव्हतं किंवा कुठल्याही खेळाची पार्श्वभूमी नव्हती. अंगणात पत्र्याचं शेड असलेल्या घरात ऑलिंपिक विजेती घडणं यावरून भारताच्या कानाकोपर्‍यात, अतिदुर्गम भागात अजूनही हिरे सापडतील असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात करत, अशक्य ते शक्य करून दाखवत, मनात सतत राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणारी मीराबाई नवीन पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहे.

भारताची ‘बॅडमिंटन क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी पी. व्ही. सिंधू ही सलग दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके पटकावणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू आहे. आईवडिल दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू असल्याने सिंधूला लहानपणापासून खेळाचा वारसा लाभला. ती 2009 पासून म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळू लागली. तिनं 2009 च्या सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर 2010 साली मेक्सिको येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधू अंतिम आठमध्ये पोहोचली होती. 2010 मध्ये च उबेर कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची ती सर्वात लहान सदस्य होती.

अल्पावधीतच सिंधूनं जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा निर्माण केला. 2013 साली झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत तिनं ऑलिंपिक पदक विजेती वान इहान हिचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय ठरली! लगेच 2014 मध्येही तिला कांस्य पदकापर्यंत मजल मारता आली. त्यानंतर 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहचल्यानंतर तिला सुवर्ण पदकानं हुलकावणी दिल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तसंच 2017 आणि 2018 सालच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुद्धा बहारदार खेळाचं प्रदर्शन करत सिंधू अंतिम फेरीत दाखल झाली होती. मात्र दोन्ही वेळेस तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं! 2018 साली जागतिक बॅडमिंटन स्पर्धा संपल्यावर सिंधू प्रचंड निराश झाली होती. इतका सफाईदार खेळ करूनही नेमक्या मोक्याच्या वेळी, अंतिम फेरीच्या सामन्यात आपल्याला काय होतं? हा प्रश्न ती स्वतःला विचारू लागली. आपल्या मनाची अस्वस्थता तिनं घरी आल्यावर आईबाबांना बोलून दाखवली. त्यावेळी तिचे बाबा म्हणाले, ‘‘बेटा, निराश होण्याचं कारण नाही. यश, अपयश या खेळाच्या दोन बाजू आहेत. तुझं भवितव्य उज्ज्वल आहे. आपल्या लक्ष्यापर्यंत तू निश्चितच पोहचणार हे तू तुझ्या मनावर बिंबवून ठेव. मात्र एक गोष्ट ध्यानात ठेव, तू नेमकी कुठे कमी पडतेस यावर आपलं लक्ष केंद्रित कर. मग कुठलेही अडथळे पार करण्यासाठी तुला अडचणी येणार नाहीत आणि गोल्ड मेडल तुझंच असेल!’’

वडिलांच्या आणि प्रशिक्षकांच्या समुपदेशनाने सिंधूचा आत्मविश्वास वाढला. सगळी मरगळ झटकून तिनं आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. इच्छा, आकांक्षांना आवर घालत आहारावर नियंत्रण ठेवलं. आपलं आवडतं आईस्क्रीम खाणं अजिबात बंद केलं. मोबाईलही स्वतः पासून दूर ठेवला. बघता-बघता 2019 सालचा सूर्य उगवला! या नवीन वर्षात जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा दृढ निश्चय करत सिंधू तास न् तास सराव करू लागली. मागील दोन वर्षी अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर, सिंधू अखेरच्या क्षणी डगमगते? तिला हा अखेरचा अडथळा कधी पार करता येईल का? असे प्रश्न विचारले जात होते. झुंजार सिंधूने या सर्व प्रश्नांना आपल्या रॅकेटनं चोख उत्तर दिलं. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावण्याची तिची क्षमता आहे हे तिनं आपल्या जिगरबाज खेळातून सर्वांना दाखवून दिलं आणि 2019 मध्ये सुवर्णपदक पटकावण्याचं स्वप्न पूर्ण केलं!

रिओ ऑलिम्पिक आणि टोकियो ऑलिंपिकच्या दरम्यान सिंधू तिच्या खेळात आणखी प्रगती कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करत होती. मात्र काही कारणांमुळे तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांच्याशी मतभेद झाले. नंतर आईबाबांसोबत चर्चा करून सिंधूनं यापुढे गोपीचंद यांच्याकडून प्रशिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही कालावधी गेल्यावर सिंधूनं कोरियन प्रशिक्षक पार्क टाये साँग यांना आपले प्रशिक्षक म्हणून नेमले. आता तिचं लक्ष्य होते टोकियो ऑलिंपिकमध्ये अजिंक्यपद जिंकून भारतासाठी इतिहास घडवण्याचं! टोकियो ऑलिंपिकमध्ये तुम्हाला नवी सिंधू दिसेल, असं स्वतः सिंधूनं सलामीच्या सामन्यापूर्वी सांगितलं होतं. त्याचा प्रत्यय सिंधू आणि जपानच्या अकेन यामागुची यांच्यामधील उपांत्यपूर्व फेरीत आला. या सामन्यात तिनं कमालीची आक्रमकता दाखवत यामागुचीचा प्रतिकार मोडून काढला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या तई जू यिंग हिच्याकडून मात मिळाल्यामुळे सिंधूचं अजिंक्यपदाचं स्वप्न भंगलं! आता तिला टोकियो ऑलिंपिकमध्ये कास्यपदक जिंकण्याची संधी होती.

प्रशिक्षक पार्क यांनी सिंधूला कास्यपदक जिंकण्यासाठी कसं प्रेरित केलं हे सांगताना ती म्हणाली, ‘‘पार्क यांनी मला, कास्यपदक मिळवणे आणि चौथ्या स्थानावर राहणे यातील सांगितलेला मोठा फरक अजून लक्षात आहे. तुमच्या देशासाठी तुम्ही पदक मिळवणे हा एक वेगळाच गौरवाचा क्षण असतो!’’

नंतर कास्यपदकाच्या लढतीत सिंधूनं बहारदार खेळाचं प्रदर्शन करत चीनच्या बिंग जिआओला 21-13, 21-15 अशा सरळ सेटमध्ये मात देत दिली. टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यामुळे तिच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणाली, ‘‘पदक जिंकल्यामुळे मी खूप आनंदी आहे. या लढतीपूर्वी अनेक भावना मनात येत होत्या. ब्राँझ जिंकल्यामुळे आनंदी असावे की अंतिम फेरीची संधी गमावल्यामुळे दु:खी व्हावे हेच कळत नव्हते! या सामन्याच्या वेळी मी भावनांवर नियंत्रण ठेवले आणि सर्वोत्तम कामगिरी केली. आपल्या देशासाठी पदक जिंकणे हे कधीही अभिमानास्पद असते!’’

आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्याच्या बारामुखिया या खेडेगावात जन्मलेल्या लवलिना बोर्गोहेनचा मुष्टीयोद्धा होण्याचा प्रवास खूपच विलक्षण आहे… एकदा तिच्या वडिलांनी घरगुती कार्यक्रमासाठी मिठाई विकत आणली. मिठाईच्या डब्यावर वेष्टन म्हणून वर्तमानपत्राचा कागद गुंडाळला होता. घरी पोहचल्यावर त्यांनी मिठाईचा डबा छोट्या लवलिनाला दिला. तिनं वर्तमानपत्राचं वेष्टन काढून मिठाई आईकडे दिली आणि ती स्वाभाविकपणे वर्तमानपत्र वाचू लागली. त्यात तिला प्रसिद्ध जागतिक मुष्टीयोद्धा मोहंमद अलीचा फोटो दिसला. त्याखालची बातमी वाचल्यावर लवलिनाची उत्सुकता वाढली. तिनं वडिलांना मोहंमद अलीबद्दल विचारलं. त्यांनी तिला अलीच्या संघर्षाबद्दल, त्यानं मिळवलेल्या यशाबद्दल माहिती दिली. ते ऐकून लवलिना खूप प्रभावित झाली अन् त्याचक्षणी तिनं ठरवलं, आपणही पुढे मुष्टीयोद्धाच व्हायचं!

लवलिनाला दोन मोठ्या जुळ्या बहिणी असून त्या राष्ट्रीय पातळीवर किक बॉक्सिंग खेळलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलींच्या क्रीडा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वडिलांना आर्थिक गणित जुळवताना बराच आटापिटा करावा लागायचा. प्रसंगी त्यांनी पतसंस्थांमधून कर्ज सुद्धा काढले होते. कधीकधी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली आणि आपल्याला एखादी गोष्ट अगदी प्रामाणिकपणे करायची आहे तेव्हा तशी संधी आपसूकच चालून येते! लवलिनाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. ती शिकत असलेल्या शाळेत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) तर्फे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. प्रशिक्षक पदुम बोरो यांनी लवलिनाची उंची आणि फिटनेस बघून तिची मुष्टियुद्ध खेळासाठी निवड केली. लवकरच तिचं प्रशिक्षण सुरू झालं. मात्र तिच्याकडे त्यावेळी धड ट्रॅकसुटही नव्हता. गरजेच्या वस्तू आणि समतोल आहारासाठी तिला आटापिटा करावा लागायचा. आवडत्या क्षेत्रात कारकीर्द आणि जगण्यासाठीचा तिचा संघर्ष सुरू होता! मात्र त्यावेळी जमेची बाजू म्हणजे लवलिनाला घरच्यांचा भावनिक आधार होता. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून एकदा तिची आई म्हणाली, ‘‘बेटा, तू खूप मोठी हो! मात्र तू असं काही तरी करून दाखव की लोकांना दीर्घकाळ तुझं नाव स्मरणात राहील!’’

कालांतरानं लवलिना मुष्टीयोद्धा म्हणून नावारूपाला आली. तिनं विविध स्पर्धेत भाग घेत अनेक पदके आपल्या नावावर केली. तिच्या धाडसी स्वभावामुळे मुष्टीयोध्याच्या ठिकाणी हवा असलेला आक्रमकता हा गुण तिच्यात उपजतच होता. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवल्यानंतर लवलिनानं 2018 साली दिल्ली येथे झालेल्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत वेल्टरवेट श्रेणीत कास्यपदक पटकावलं! त्यानंतर रशियात झालेल्या दुसर्‍या महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेतही तिनं कास्यपदक जिंकलं. मार्च 2020 मध्ये आशिया-ओशनिया मुष्टियुद्ध ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत लवलिनानं उझबेकिस्तानच्या माफ्टुनाखोन मेलिवा हिचा 5-0 असा दणदणीत पराभव केला आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी तिनं आपलं स्थान पक्कं केलं. या स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती आसाम राज्यातील पहिलीच महिला खेळाडू आहे. काही दिवसांनी दुर्दैवानं लवलिनाला कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे रूग्णालयात दाखल होऊन औषधोपचार घ्यावे लागले. नंतर विलगीकरणातही रहावं लागलं! तरीही तिनं आपली मानसिकता सकारात्मक ठेवत काही दिवसातच नियमित सरावावर लक्ष केंद्रित केले. ऑलिंपिक पदार्पणाची चालून आलेली संधी तिला गमवायची नव्हती तर या संधीचं लवलिनाला सोनं करायचं होतं!

‘‘मी तोपर्यंत विश्रांती घेणार नाही, जोपर्यंत मी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकत नाही! या ब्रह्मांडानं माझ्यासाठी पुढे काय योजना केली आहे याने मला फरक पडत नाही. मला काहीही झालं असलं तरी मी मजबूत आहे. मला आणखी चांगला परफॉर्मन्स कसा देता येईल यावरच मी लक्ष केंद्रित करणार आहे. मी आता जिंकण्यासाठीच खेळणार आहे!’’ या लवलिनाच्या वक्तव्यातून तिची मानसिकता, तिची जिगरबाज लढाऊ वृत्ती कशी आहे हेच जाणवतं!

ज्यावेळी भारतातून बॉक्सिंगची टीम टोकियो ऑलिंपिकसाठी रवाना झाली त्यावेळी जाणकारांचं मत होतं, मेरी कोम आणि अमित पंघाल निश्चितच पदक जिंकणार! मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत लवलिनानं ऑलिंपिक पदक जिंकून सर्वांनाच चकित केलं! या स्पर्धेत लवलिनासाठी खूप खडतर ‘ड्रॉ’ होता. जणू तिची अग्निपरीक्षाच होती. त्यातून तावून सुलाखून तिला यशस्वीपणे बाहेर पडायचं होतं! स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तिला आपल्या वडिलांचे शब्द आठवले, ‘‘कोरोनापासून तुझी सुटका झाली, परमेश्वराची कृपाच झाली! त्यालाच तुझ्याकडून काही तरी भव्यदिव्य कार्य करवून घ्यायचं असणार! आणि मला पूर्ण विश्वास आहे तू तुझ्या या कार्यात नक्की यशस्वी होशील!’’

मग लवलिनानं आपल्यापेक्षा जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूंना मात देत उपान्त्य फेरी गाठली आणि ऑलिंपिक पदक निश्चित केलं. जिनं तिला यापूर्वी तब्बल चारवेळा पराभूत केलं होतं, त्या निएन चिन-चेन हिचा चिवट प्रतिकार मोडून काढत डॅशिंग लवलिनानं प्रतिआक्रमण करून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आता उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला टक्कर द्यायची होती, माजी ऑलिंपिक विजेती आणि जागतिक क्रमवारीत सध्या अव्वल असलेल्या बुसेनाझ सुरमेनेली विरूद्ध!

उपांत्य फेरीच्या सामन्यात लवलिनाला सुरूवातीपासून बचाव करणं भाग पडलं कारण बुसेनाझचे ठोसे खूपच ताकदवान आणि अचूक होते. काही वेळानं लवलिनानं प्रतिकार करत चांगले बॉडी शॉट्स मारले आणि सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात सातत्य राखू शकली नाही. परिणामी तिचं या ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न अपुरं राहिलं! तरीही कांस्य पदक मिळवल्यामुळे त्यावर तिला समाधान मानावं लागलं. भारतात परतल्यावर लवलिनानं एका हिंदी दैनिकाला मुलाखत देताना सांगितलं, ‘‘बुसेनाझ के खिलाफ सेमीफायनल मे हार के दौरान मेरे मुक्के कुछ कमजोर पड गये! ऐसा नही की मैने ताकत और अनुकूलन पर काम नही किया, लेकिन ऑलिंपिक जैसी प्रतियोगिता के लिए मेरे पास कोरोना से उभरने के बाद सिर्फ चार महिने थे जो कि पर्याप्त नही थे! मेरी लढाई अभी अधुरी है, पॅरिस ऑलिंपिक मे वो जरूर पुरी होगी!’’

भारताचे पुरूष मुष्टीयोद्धे सलामीलाच शरणागती पत्करत असताना ऑलिंपिकमध्ये पदार्पण करणार्‍या लवलिनानं पदक जिंकून देशात नाव उंचावलं आहे. तिचं भवितव्य उज्ज्वल असून तिची कारकीर्द नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे!

एकदा होळी सणानिमित्त आयोजित एका कुस्तीच्या दंगलीत सहज संधी मिळाल्यामुळे चौदा वर्षांच्या बजरंग पुनियानं आपल्यापेक्षा दीडपट असलेल्या एका धिप्पाड पहिलवानाला चितपट करून अस्मान दाखवलं! तेव्हापासूनच या फ्रीस्टाईल कुस्तीपटूच्या कारकिर्दीला खरी सुरूवात झाली. नंतर या खेळात बजरंगनं लवकरच उभारी घेतली. म्हणूनच जागतिक क्रमवारीत 65 किलो वजनी गटात पहिला क्रमांक मिळवलेल्या बजरंग पुनियाची यशोगाथा नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. वडील कुस्तीपटू असल्यामुळे वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून बजरंगनं कुस्तीचे धडे गिरवले. कालांतराने कुस्तीमध्ये नावारूपाला आल्यावर बजरंग म्हणाला, ‘‘मुझे नही पता कि कब कुश्ती मेरी जिंदगी का हिस्सा बन गयी!’’

ऑलिंपिक कुस्तीपटू योगेश्वर दत्त हे बजरंग पुनियासाठी आदर्श होते. मार्गदर्शक आणि मित्रही होते. 2012 च्या ऑलिंपिकमध्ये योगेश्वर दत्त यांनी पदक जिंकलं होतं. त्याचा प्रभाव बजरंगवर पडला आणि त्याचवेळी त्याने ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याचं स्वप्न बघितलं! नंतर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कसून मेहनत घेण्यासाठी त्यानं कंबर कसली. कित्येक कुस्ती स्पर्धेत पदके मिळवल्यानंतर बजरंगनं 2019 साली जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत मानाचं पदक मिळवत कमाल केली. या स्पर्धेत 65 किलो वजनी गटातील कांस्यपदकासाठी झालेल्या रोमहर्षक सामन्यात त्यानं मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओशीरवर 8-7 अशा निसटत्या फरकाने सनसनाटी विजय मिळवून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं! यापूर्वी बजरंगनं 2013 आणि 2018 साली झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पदके जिंकली होती. त्यामुळे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत तीन वेळा पदके मिळवणारा बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्याला टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरवण्यात आलं होतं!

बजरंगचं आपल्या खेळाप्रती असलेलं समर्पण लाजवाब आहे. मागील दहा वर्षांत त्यानं एकदाही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघितला नाही हे कुणालाही खरं वाटणार नाही. एवढेच नाही तर जवळपास सात वर्षे त्याच्याकडे साधा मोबाईल फोन सुद्धा नव्हता. तो म्हणतो, ‘‘2010 साली मी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळायला सुरुवात केली. त्यावेळी योगीभाई मला म्हणाले होते की सिनेमा, मोबाईल या लक्ष विचलित करणार्‍या गोष्टी आहेत!’’ योगेश्वर दत्त यांच्या सल्ल्याचाच परिणाम आहे, वेगवेगळ्या स्पर्धांसाठी जगभरातील कित्येक देश फिरूनही बजरंगनं एकाही देशातील एकही पर्यटन स्थळ बघितलेलं नाही. संघातील इतर खेळाडू फिरायला जायचे पण बजरंग आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त कुस्तीवरच केंद्रित करायचा!

मागील वर्षी बजरंगच्या गुडघ्याला दुखापत झाली होती! त्याच्या सुदैवाने टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे या दुखापतीतून सावरण्यास त्याला पुरेसा वेळ मिळाला. त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक शाको बेंटिनीडीस यांची साथ असल्याने बजरंगला मोलाचं मार्गदर्शन लाभलं! ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत तीन पदके जिंकलेल्या शाको बेंटिनीडीस यांनी बजरंगवर खूप मेहनत घेतली. डॉक्टरांनी मात्र बजरंगला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्यानं न जुमानता आपला सराव सुरू ठेवला आणि ऑलिंपिक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारलीच! नंतर उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्याने निराश न होता बजरंगनं कास्यपदकासाठी झालेल्या लढतीत धडाकेबाज खेळाचं प्रदर्शन केलं. बजरंग पुनियानं 65 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात कझाकिस्तानच्या दौऊलेत नियाझबेकोव्हचा 6-0 असा धुव्वा उडवत टोकियो ऑलिंपिकच्या कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.

यावेळी कुस्ती स्पर्धेत रवीकुमार दहिया आणि बजरंग पुनिया यांना ऑलिंपिक पदक प्राप्त झाल्यामुळे पुरूष स्पर्धकांचं महत्त्व अधोरेखित झालं. महिला कुस्ती स्पर्धकांची मात्र पाटी कोरीच राहिली. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाचा उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा रवीकुमार दहिया आणि कझाकस्तानचा नुरीस्लॅम सानायेव्ह आमनेसामने उभे ठाकले. रवीकुमारनं 2-9 अशा पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक करताना आपल्या प्रतिस्पर्ध्याला शेवटच्या क्षणी चितपट करून अस्मान दाखवलं आणि धडाक्यात अंतिम फेरीत धडक दिली. आता त्याला सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे वेध लागले होते!

रवीकुमार दहियाच्या वडिलांना कुस्तीपटू म्हणून नाव कमवायचं होतं पण आर्थिक अडचणींमुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. आता रवीकुमारनं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. भारताच्या हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावाचा रवी रहिवासी आहे आणि त्याच गावातील आखाड्यात त्याने कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवण्यास सुरवात केली. याच गावातील महावीर सिंग आणि अमित दहिया यांनीही भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दिल्ली येथील छत्रसाल कुस्ती स्टेडियम हे रवीचे होम ग्राऊंड असून त्यानं तेथे वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षापासून सराव सुरू केला. जागतिक पातळीवर खेळणारे अनेक कुस्तीपटू याच ठिकाणी सराव करतात.

23 वर्षीय रवीकुमारनं 2019 च्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटात पदक जिंकून देशाचं नाव उंचावलं होतं. त्यापूर्वीच्या म्हणजे 2018 सालच्या 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुद्धा त्यानं पदक पटकावलं होतं! तसंच 2020 आणि 2021 मध्ये रवीकुमारनं आशियाई कुस्ती स्पर्धेत बहारदार खेळाचं प्रदर्शन करत पदके जिंकली आहेत. रवीकुमारला त्याच्या कारकिर्दीच्या सुरूवातीलाच 2017 मध्ये गंभीर दुखापत झाली होती. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे कुस्तीपासून त्याला बरेच दिवस दूर रहावं लागलं!

रवीकुमारच्या या यशामागे वडिलांचा दीर्घ संघर्ष आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीचे डावपेच शिकत असलेला आपला मुलगा कमकुवत पडू नये, म्हणून वडील राकेश दहिया हे रोज सुमारे सत्तर किलोमीटरचा प्रवास करून त्याच्यासाठी दूध आणि लोणी घेऊन जायचे आणि त्याच्या सर्व गरजा पूर्ण करायचे! राकेश दहिया हे स्वतःच एक कुस्तीपटू राहिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवावं असं त्यांचं स्वप्न होतं. मात्र घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही! आता त्यांच्या मुलाच्या, रवीकुमारच्या रूपात स्वप्न पूर्ण झालं आहे. यावर्षी जुलैमध्ये एका मुलाखतीत तो म्हणाला होता… ‘‘त्याचं लक्ष्य कांस्य किंवा रौप्यपदक जिंकण्याचं नाही, तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचं आहे!’’

नेमबाज अभिनव बिंद्रा याने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. अशा प्रकारचा दुसरा भारतीय खेळाडू होण्याचा मान कुस्तीपटू रवीकुमार दहियाला मिळणार होता. मात्र दुर्दैवाने अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावण्यात त्याला अपयश आलं. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात रवीकुमारला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला! त्यामुळे रवीकुमारला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या युगूएव्ह झाव्हूरला रवीकुमार दहियानं कडवी टक्कर दिली. मात्र मोक्याच्या वेळी त्याचा प्रतिकार तोकडा पडला. परिणामी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचं त्याचं स्वप्न अधुरं राहिलं! तरीही रवीकुमारनं भारतासाठी रौप्यपदक स्वीकारताना समाधान व्यक्त केलं. आता तीन वर्षांनंतर होणार्‍या पॅरिस ऑलिंपिकसाठी जोरदार तयारी करायला तो उत्सुक आहे.

भारताच्या पुरूष हॉकी संघाने या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, 41 वर्षापासूनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला. कास्यपदकासाठी झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने बलाढ्य जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यापूर्वी भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 1980 साली पदक मिळवलं होतं. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकलं होतं. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताने पुन्हा एकदा हॉकीतील सुवर्णयुगाची सुरूवात केली आहे असंच म्हणावं लागेल. मॉस्को ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर तब्बल आठ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताला एकही पदक जिंकता आलं नव्हतं! आता या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीपटूंनी त्यांच्या धडाकेबाज खेळामुळे पदकांचा दुष्काळ संपवला आहे!

या स्पर्धांमध्ये आतापर्यंत बहारदार खेळ करणारा भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाला. या सामन्यात बेल्जियम संघाने 5-2 अशा फरकाने मात दिल्यामुळे भारताचे सुवर्णपदक तर दूर राहिलं किमान रौैप्यपदक मिळवण्याचं स्वप्नही भंगलं. या अटीतटीच्या सामन्यात 49 व्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघाचा स्कोअर 2-2 असा बरोबरीत होता. मात्र शेवटच्या अकरा मिनिटांत भारताच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या आशा संपुष्टात आल्या! या सामन्याच्या सुरूवातीच्या काही मिनिटातच बेल्जियम संघाने गोल करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली होती. पुढच्या काही मिनिटात भारताच्या मनदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंगने तीन मिनिटाच्या अंतरानं प्रत्येकी एक गोल करत सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही काळ आघाडीवर असलेल्या भारताने आणखी एक गोल खाल्ला आणि सामन्यात 2-2 असा स्कोअर झाला. 49 व्या मिनिटापर्यंत असाच स्कोअर होता. भारतीय संघाने जबरदस्त टक्कर देत बेल्जियमला पुढे जाऊ दिलं नाही पण त्यानंतर शेवटच्या अकरा मिनिटात सर्व बाजी उलटली. 49 व्या आणि 53 व्या मिनिटाला बेल्जियमच्या अलेक्सांद्र हेंड्रिक्सने गोल करत भारताला दोन गोलने मागे टाकलं. त्यानंतर मात्र भारताला आघाडी घेता आली नाही. उलट शेवटच्या मिनिटाला बेल्जियमच्या जॉन डोहमेनने आणखी एक गोल करत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं! परिणामी भारतीय संघाचा 5-2 असा पराभव झाला. 49व्या मिनिटानंतर शेवटच्या अकरा मिनिटांसाठी आपल्या खेळात सातत्य न राखता आल्यानं भारतीय संघातील खेळाडू कमालीचे निराश झाले!

या निराशेनंतर एक शेवटचा आशेचा किरण होता, तो म्हणजे कांस्यपदक पटकावण्याचा!
भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्यानं त्यांना कांस्यपदक मिळवण्याची शक्यता होती. मात्र त्यासाठी केवळ एक विजय मिळवणं गरजेचं होतं.

भारतीय हॉकी संघाचा कांस्य पदकासाठीचा सामना बलाढ्य जर्मनी संघासोबत निश्चित झाला होता. हा निर्णायक सामना 5 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सुरू झाला. दोन्ही संघादरम्यान सुरू झालेल्या या कास्यपदकाच्या लढतीत जर्मनीने दुसर्‍याच मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीकडे 1-0 अशी आघाडी होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटात जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताने जबरदस्त प्रतिकार करत त्यांना गोल करू दिले नाही. जर्मनीने दुसर्‍याच मिनिटाला गोल केल्याने भारताची बचाव फळी अलर्ट झाली होती.

दुसर्‍या क्वॉर्टरमध्ये भारताने सुरूवातीच्या काही मिनिटात गोल करून 1-1 अशी बरोबरी केली पण जर्मनीने एकापाठोपाठ एक गोल करून 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. भारत ही लढत गमवतोय की काय असं वाटत असतानाच पहिला हाफ संपण्याच्या आधी भारतानं प्रतिआक्रमण करत एकामागून गोलचा धडाका लावला आणि 3-3 अशी बरोबरी केली.

तिसर्‍या क्वॉर्टरमध्ये सुरूवातीलाच रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून 5-3 अशी आघाडी केली. तिसर्‍या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारतानं आघाडी कायम ठेवली होती. तसंच चौथ्या क्वॉर्टरमध्येही भारतानं आघाडी कायम ठेवली. अखेरच्या चार मिनिटात जर्मनीनं गोल करण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. शेवटच्या मिनिटाला देखील जर्मनीला गोल करण्याची संधी होती. मात्र भारताने त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही आणि तब्बल 41 वर्षानंतर ऑलिंपिकच्या कास्यपदकावर आपलं नाव कोरलं!

नीरज चोप्रा
यानं भालाफेकीत सुवर्णपदकाला गवसणी घालून भारताच्या दृष्टीने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचा सोनेरी शेवट केला. ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं. सगळ्या भारतीयांच्या नजरा नीरजच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. त्यानं या स्पर्धेत सुवर्णपदक खेचून आणावं म्हणून कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा त्याच्या पाठिशी होत्या आणि नीरजनंही कोणाला निराश न करता ऑलिंपिकच्या इतिहासात अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून दिलं! या पदकासह भारताला यावेळी ऑलिंपिकमध्ये एकूण सात पदके मिळाली असून ही भारताने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचप्रमाणे ऑलिंपिकच्या इतिहासातील नीरजचे हे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. यापूर्वी अभिनव बिंद्रा याने 2008 च्या ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं! निरजचं हे सुवर्णमय यश अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या पाठोपाठ इतर खेळातही ग्रामीण भागातून आलेले कित्येक खेळाडू आपल्या इच्छाशक्ती आणि आकांक्षांच्या जोरावर चमकदार सुवर्णमयी कामगिरी बजावू लागले आहेत. नीरज याच नवीन पिढीचा प्रतिनिधी आहे.

2018 मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत नीरजने 88.06 मीटर दूर भालाफेक केली होती. या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर 2018 मध्ये नीरजच्या खांद्याला दुखापत झाली होती. या कारणाने तो अनेक दिवस खेळापासून दूर राहिला. नंतर 2019 मध्ये त्याला दुर्दैवानं कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याला अनेक स्पर्धांपासून मुकावं लागलं होतं!

अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून शिक्षण आणि खेळाची सांगड घालत नीरज मोठा झाला. नीरज चोप्राचा जन्म 27 डिसेंबर 1997 ला हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातल्या खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. नीरजनं आपलं शिक्षण चंडीगढमधून पूर्ण केलं. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरीही जिद्दीच्या जोरावर नीरजनं या खेळात सातत्य ठेवलं आणि तो चांगली कामगिरी करत राहिला!

2020 मार्च महिन्यात पुनरागमन करताना नीरजने इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 88.07 मीटर भाला फेकत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या निवड चाचणीत नीरजने 87.86 मीटर भालाफेक केला होता. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्यासाठी 85 मीटर भालाफेक करणं आवश्यक होतं. त्यानंतर आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दुसर्‍या फेरीतील थ्रोची आघाडी कायम ठेवत भालाफेकीत नीरज चोप्राने धडाकेबाज सुरूवात केली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर इतकी लांब भालाफेक केली. दुसर्‍या फेरीत नीरजने 87.58 मीटर लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसर्‍या थ्रोमध्ये 76.79 मीटर लांब फेक केली तर नीरजचा चौथा थ्रो फाऊल ठरला. त्यानंतर त्याचा पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला. सहाव्या फेरीत नीरजनं 84 मीटर भाला फेकला आणि त्यानं सुवर्णपदकाचा वेध घेतला. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. आपल्या अप्रतिम प्रदर्शनानंतर बोलताना तो म्हणाला, ‘‘भालाफेकमध्ये टेक्निकही अत्यंत महत्त्वाचे असतं. बर्‍याच काळाच्या मेहनतीवर सर्व अवंलबून असतं. त्यामुळे आता यानंतर माझं लक्ष्य 90 मीटरचं अंतर पार करणं आहे. मी यंदा केवळ ऑलिम्पिकवर लक्ष्य ठेवून होतो. आता मी इतरही स्पर्धांची प्रॅक्टिस करुन त्यातही चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी भारतात परतल्यावर परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व्हीसा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

ऑलिंपिकमध्ये खुपणारा चौथा क्रमांक…

हे खरं आहे की कुठल्याही खेळात जर-तरला काही महत्त्व द्यायचं नसतं! जर पाऊस पडला नसता तर इंग्लंडसोबत झालेला पहिला क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला असता. आता वेळ निघून गेल्यावर या जर-तर ला तरी काय अर्थ? मात्र ही जर-तरची रूखरूख खेळाडूंना आयुष्यभर सलणारी असते! याचं महत्त्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या खेळाडूंना प्रकर्षानं जाणवत असणार. आपल्या महिला हॉकी संघाच्या रणरागिणी प्रत्येक सामन्यात अगदी जिवावर उदार होऊन लढल्या! मात्र कास्यपदकाच्या महत्त्वाच्या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली आणि पदकाविना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. या सामन्यात त्यांना सदोष पंचगिरीचा मोठा फटका बसला, नाहीतर निकाल आपल्या बाजूनंही लागला असता असं अनेक प्रेक्षकांना त्यावेळी वाटलं. मात्र आता वेळ निघून गेल्यावर जर-तरच्या गोष्टी करून उपयोग नाही!

त्याचप्रमाणे गोल्फपटू अदिती अशोक हिचं पदक निश्चित मानलं जात होतं. मात्र मोक्याच्या वेळी थोडक्यात संधी गमावल्याचा अदितीला फटका बसला आणि ती कडव्या झुंजीनंतरही चौथ्या स्थानावर फेकली गेली! त्यावेळी ती म्हणाली, ‘‘कोणत्याही स्पर्धेत दुसरा किंवा चौथा क्रमांक असला तरी फरक पडत नाही पण ऑलिंपिकमध्ये प्रत्येक क्रमांक मोलाचा असतो. या स्पर्धेत मी सर्वस्व पणाला लावले आणि चांगली कामगिरी केली. तरीही या स्पर्धेत तीनच पदके दिली जातात हे कुठेतरी योग्य वाटत नाही!’’

मिल्खा सिंग, पी. टी. उषा, दीपा कर्माकर यांच्याप्रमाणेच अदितीचेही ऑलिंपिक पदक थोडक्यात हुकले हे निश्चितच दुर्दैवी आहे!

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदाचा तब्बल सहा वेळचा विक्रम जिच्या नावावर आहे अशा मेरी कोम हिला सुद्धा कास्यपदकाच्या महत्त्वाच्या सामन्यात सदोष पंचगिरीचा मोठा फटका बसला आणि ती चौथ्या स्थानावर फेकली गेली! त्यावेळी माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी ट्वीट केले, ‘‘ऑलिंपिकमधील निर्णयास आम्ही आव्हान देऊ शकत नाही. त्यास नियम आहेत. दुसरी आणखी तिसरी फेरी जिंकूनही मेरी कोम पराभूत झाली हे दुर्दैवी आहे. ती एका गुणाने पराभूत झाली हे मी समजू शकलो नाही. तिला मी आता एवढंच सांगेल की तू आधीच विजेती आहेस. तू सहा वेळची विश्वविजेती असून ऑलिंपिक पदकही जिंकले आहे. तू आमच्यासाठी यापूर्वीच सुपरस्टार ठरलेली आहेस!’’

‘‘यावरून जर-तरच्या वादात न पडता, एकच मनापासून वाटते इतर स्पर्धांमध्ये जसे पहिल्या तीन क्रमांकानंतर दोन उत्तेजनार्थ पुरस्कार किंवा पदके दिली जातात, त्याच धर्तीवर या चार वर्षातून एकदाच भरणार्‍या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अशाप्रकारे नियोजन केले जावे. जेणेकरून कित्येक वर्षे या स्पर्धांसाठी मेहनत घेणार्‍या खेळाडूंना चौथा आणि पाचवा क्रमांक खूपणार नाही!
’’

आणखी एक गोष्ट येथे नमूद कराविशी वाटते, बरेच क्रीडारसिक या ऑलिंपिकपटूंवर उठसूठ टिका करताना दिसतात. पहिल्याच दिवशी बॉक्सर मीराबाई चानू हिनं रौप्यपदक पटकावून ऑलिंपिक स्पर्धांमध्ये आपल्या देशाचं खातं उघडलं. हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. तिची अभूतपूर्व कामगिरी लक्षात घेऊन मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी एक कोटीचं बक्षीस जाहीर केलं. तसंच अनेक संघटनांनी सुद्धा वेगवेगळ्या रकमांचे पुरस्कार तिच्यासाठी जाहीर केले. त्यावेळी समाजमाध्यमांवर काही महाभागांनी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली! त्याचप्रमाणे टेनिसपटू सिंधू, कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बजरंग पुनिया, भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन आणि हॉकी टीम मधील सदस्यांना अनेक रकमांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. पदके मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम व त्याग, आपल्या कुटुंबापासून महिनोनमहिने दूर राहून भावनांवर ठेवलेले नियंत्रण या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर त्याचं फळ कधी मिळतं तर तब्बल चार वर्षांनी! यावेळी तर कोरोना संकटामुळे पाच वर्षे वाट पहावी लागली. ज्यांची पदके थोडक्यात हुकली, त्यांना पुन्हा पुढील चार वर्षांसाठी वाट बघणं हेही ओघानं आलंच. पदकाविना परत आलेल्या खेळाडूंची मानसिक अवस्था कशी सुदृढ ठेवता येईल यावर सुद्धा बरेच परिश्रम घ्यावे लागतात!

ऑलिंपिक खेळाडूंवर टिका करणार्‍यांना दरवर्षी होणारी झटपट क्रिकेटची आयपीएल स्पर्धा हवीहवीशी वाटते. तिथं तर खेळाडूंची निवड करण्यासाठी होणार्‍या लिलावात त्यांची गुलामाप्रमाणे बोली लागते, हे त्यांना चालतं. तसंच बोली लागल्यावर निवडलेले खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात खेळलेले नसतानाही त्यांना कोट्यवधी रूपये मिळतात याकडेही हे महाभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे या आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर कोट्यवधी रूपयांचा सट्टा, जुगार खेळला जातो. त्यात अनेक दिग्गज गुंतलेले असतात, त्यांचं त्यात मोठं अर्थकारण दडलेलं असतं! या सर्व घडामोडींवर टिका करताना, त्याविरुद्ध आवाज उठवताना कोणी दिसत नाही. उलट असंख्य आयपीएल रसिक रात्री उशिरापर्यंत या निरर्थक सामन्यात आपला अमूल्य वेळ खर्ची घालताना दिसतात. या फक्त धंदा चालवणार्‍या सामन्यांमध्ये अनेक देशविदेशातील खेळाडूंचा सहभाग असल्याने, कसोटी क्रिकेट सामन्यांत दिसणारा आपल्या देशाबद्दलचा राष्ट्राभिमान नावालाही दिसून येत नाही!

ऑलिंपिक स्पर्धांमध्ये जगभरातील तब्बल दोनशेपेक्षा जास्त देश सहभागी होतात तर क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत फार फार तर केवळ चौदा किंवा सोळा देशातील संघ सहभागी होतात. क्रिकेटमध्ये सुद्धा यापूर्वी चार वर्षातून एकदा विश्वचषक स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. मात्र हल्ली पूर्णतः व्यावसायिक आणि बाजारू स्वरूप आल्याने या स्पर्धा वर्षातून एकदा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये भरवल्या जातात आणि यातून विश्वविजेते घोषित केले जातात. यावरून विचार करताना प्रश्न पडतो… खरे जगज्जेते कोण? ऑलिंपिकमधील प्रवेशासाठी धडपडणारे आणि नंतर पदके जिंकणारे की लिलावातून निवड झालेले क्रिकेटपटू?
(‘हेच खरे जगज्जेते’ हे विनोद श्रा. पंचभाई यांचे पुस्तक ‘चपराक’तर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे.)

‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021, पृष्ठ – 40

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “हेच खरे जगज्जेते…”

  1. good information to broaden my horizons but if there is any other information if you can let me know

  2. thanks for your information

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा