प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा

प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा


देवेंद्र रमेश राक्षे
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021


‘प्लॅस्टिक,
थर्माकोल शाप नाहीत, ते आधुनिक विज्ञानाचे वरदान आहेत’, ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’ असे सांगणारा जगातला मी पहिला ‘वेडा पीर’ ठरू द्या! पण अतिशय गांभीर्याने मी हे वाक्य लिहीत आहे आणि हे वाक्य लिहिण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी अतिशय कष्ट, मेहनत आणि प्रशिक्षण देखील घेतले आहे. ‘साधन’ या संस्थेतील माझे गुरु आणि शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव गाडगीळ यांच्या हाताखालील माझी साधना यांना स्मरून मी हे गंभीर वाक्य पुनः पुन्हा व्यक्त करीत आहे – ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’, प्लॅस्टिक, थर्माकोल शाप नाहीत, ते आधुनिक विज्ञानाचे वरदान आहेत.

अतिशय गंभीर आणि विज्ञान, पर्यावरण या दृष्टिकोनातून थोडा क्लिष्ट असलेला हा विषय मांडताना मी संवादातून या विषयातील क्लिष्टता घालविण्याचा प्रयत्न करणार आहे. साध्या सोप्या भाषेतून एखादा कठीण विषय सांगितला की तो समजणे सोपे जाते पण सांगणार्‍याबद्दल आदर राहत नाही, लेखकाची वा वक्त्याची भाषा जितकी दुर्गम तितका तो लेखक वा वक्ता थोर असा समज दृढ असल्यामुळे त्याबाबतची जोखीम अंगावर घेऊन मी साध्या सोप्या भाषेत हा विषय मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

तर प्लॅस्टिक, थर्माकोल शाप नाहीत, ते आधुनिक विज्ञानाचे वरदान आहेत. फक्त दोन गोष्टींचा विचार करूयात नि त्यानंतर माझे विचार तपासून घेण्याचा प्रयत्न करू.

बाब क्र.1 –
पल्स पोलिओ योजनेद्वारे भारतातील सर्व लहान मुलांना एकाच दिवशी पोलिओचे थेंब (डोस) पाजण्याची मोहिम राबवली गेली. पोलिओविरोधी प्रतिकारक्षम औषध भारतातील कानाकोपर्‍यात सर्वदूर पोहोचविण्यात आले. हे औषध ठरविक तापमानात ठेवणे जरूरीचे होते. एकसारखे तपमान राखण्यासाठी साधारणपणे बर्फाचा उपयोग केला जातो पण बर्फ वापरण्यासाठी वेळेचे बंधन राहते अन्यथा तो बर्फ वितळतो. यावर उपाय म्हणून थर्माकोलचे डबे वापरले गेले. पल्स पोलिओ मोहीम अगदी दुर्गमातल्या दुर्गम ठिकाणी असलेल्या बालकांपर्यंत पोहोचली तेव्हा कुठे त्या योजनेचे यश मोजता आले. दुर्गमातल्या दुर्गम अशा काही ठिकाणी आरोग्यसेवकांना अगदी दुचाकीवरून पोहोचायला देखील अठरा तासांपर्यंतचा कालावधी आवश्यक होता. अशावेळी आवश्यक ते तपमान सातत्याने टिकविण्यास केवळ थर्माकोलशिवाय इतर दुसरा कोणताही पर्याय सोयीचा नव्हता. थर्माकोलमुळे वैद्यकीय आणि अन्नप्रक्रिया उद्योगात अनेक आव्हाने पार शक्य होत गेले. अशा या बहुपयोगी थर्माकोलला नाकारून प्रतिगामी होण्यात काय नेमके हशील?

पुण्यात श्री. रामदास माने नावाचे उद्योजक आहेत. ते थर्माकोलपासून घरे तयार करतात. थर्माकोलपासून न्हाणीघर, शौचालय तयार करतात. ही घरे जोडण्या-तोडण्याच्या सोयीची म्हणजे ‘प्लग आणि प्ले’ अशा बांधणीची असतात. म्हणजे वेगवेगळे भाग एकत्र जोडता येण्याजोगे. अशी ही घरे श्री. रामदास माने थेट जपानला निर्यात करतात. जपानच्या भूकंपप्रवण भागात अशा घरांना मोठी मागणी. आता सांगा पाहू, थर्माकोलला का बरे नाकारावे?

बाब क्र.2 –
आता दुसरे उदाहरण तुमच्या आमच्या अवतीभोवती मुबलक प्रमाणात आढळते. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण जी वीज (इलेक्ट्रिसिटी) वापरतो त्याचे आवरण प्लॅस्टिकपासून तयार होते. प्लॅस्टिक नसेल तर वीजवहन कसे व्हावे? प्लॅस्टिक वापरू नका म्हणणे म्हणजे विज्ञानाच्या आविष्कारांना अव्हेरणे नव्हे काय? प्लॅस्टिकला नाकारणे म्हणजे विज्ञानापासून दूर पळणे होय.

ही दोन्ही उदाहरणे प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापराचे महत्त्व विशद करतात. तेव्हा मी त्यास समर्थन करतो हे पाहता प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरामुळे होणार्‍या पर्यावरणाची हानी आणि प्रदूषणाची बिकट समस्या असा प्रतिवाद समोर उभा ठाकतो. त्या प्रतिवादाला उत्तर देण्याचा हा लेखप्रपंच! पण केवळ वाद-प्रतिवादाला प्रश्नोत्तरे यापेक्षा पर्यावरण हानी रोखण्यासाठी पर्यायी योजना केवळ विज्ञानाच्या आधारे मांडण्याचा देखील हा प्रयत्न होय.

एका मराठी चित्रपटात पोलीस अधिकारी गुंड टोळीतल्या म्होरक्याला सांगतो की ‘जगात कुणाचीच मक्तेदारी कायम टिकत नाही, जगात फक्त प्लॅस्टिक टिकून राहते’, यावर तो गुंड उत्तर देतो की, ‘मग मला प्लॅस्टिक समजा’. खरे तर त्या पोलीस अधिकार्‍यास हे माहीत नाही की आता प्लॅस्टिकदेखील टिकत नाही.
प्लॅस्टिकचे देखील विघटन करता येते. तीच गोष्ट थर्माकोलची. थर्माकोल देखील पूर्णपणे विघटित करता येते आणि तेच समजून सांगताना मी माझे विचार मांडतो आहे की ‘प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा’, प्लॅस्टिक, थर्माकोल शाप नाहीत, ते आधुनिक विज्ञानाचे वरदान आहेत.

प्लॅस्टिक हे एक पेट्रोलियम उत्पादन, जे नॅफ्ता या पेट्रोलियम खनिजापासून तयार करतात. या प्लॅस्टिकपासून पेट्रोल, डिझेल, ग्रीस, व्हॅसलीन असे पदार्थ पुन्हा मिळवता येतात तर थर्माकोलपासून रेझीन मिळवता येते. इपॉक्सी-रेझीन याबद्दल आता सर्वांना माहीत झाले आहे. इपॉक्सी-रेझीनच्या आविष्कारातून स्थापत्यकार (आर्किटेक्ट) अंतर्गत सजावटीकरिता (इंटेरीअर डेकोरेशन) अनेक सुंदर कलाकृती, भिंतीवरचे लेपण, जमिनीवर फरशीचे गालीचा साकार केली जातात. इपॉक्सी व रेझीन ही दोन वेगवेगळी रसायने. त्यातल्या इपॉक्सी या वाहत्या द्रव रसायनाला घट्ट करणारे (थीकनर) रेझीन हे दुसरे रसायन तर थर्माकोलपासून रेझीन तयार करता येते.

या विघटनादरम्यान प्रदूषण किती होते?

यावर माझे उत्तर आहे, शून्य टक्के! होय, प्लॅस्टिक आणि थर्माकोलचे प्रदूषणमुक्त असे पूर्ण विघटन करता येते.

प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून विघटन करून किती पदार्थ तयार होतात?

पेट्रोल, डिझेल, ग्रीस, व्हॅसलीन, रेझीन, कोळसा ई.

विघटन करून प्राप्त होणार्‍या पदार्थात कोळश्याचे प्रमाण किती असते?

100 किलो प्लॅस्टिक पासून 100 लीटर डिझेल आणि 20 किलो कोळसा साधारणपणे तयार होते. कोणताही विषारी वायू बाहेर वातावरणात फेकला जात नाही.

तयार झालेल्या कोळश्याच्या गुणवत्तेचे काय?

या कोळशाचे ज्वलनक्षमतामूल्य (कॅलोरीफिक व्हॅल्यू) दगडी कोळशापेक्षा जास्त असते. (दगडी कोळसा तयार व्हायला भूगर्भात कित्येक शतके कालावधी आवश्यक असतो.)

या उत्तरात केले गेलेले दावे खरे असल्याचे प्रमाण काय?
मी वरील प्रश्नांना दिलेल्या उत्तरातील सर्व दावे प्रयोगशाळेत केलेल्या अनेक वर्षांच्या संशोधनातून सिद्ध केले गेले आहेत.

प्लॅस्टिक आणि थर्माकोलची समस्या बिकट आहे का?

वारंवार उत्तर देऊनही हा प्रश्न पुनः पुन्हा विचारला जातो. त्यासाठी आवश्यक आहे जनप्रबोधन आणि जनसहभागातून साकारलेला ठोस उपाय.

ही प्रश्नोत्तरे मांडताना माझ्या ज्ञानाबद्दल देखील विचारणा वाचक करू शकतात. माझा या क्षेत्रातील अनुभव, माझी शैक्षणिक पात्रता याबाबत देखील सांगायला हवे.

मी एक संगणक अभियंता आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो. खाद्यपदार्थ निर्मिती आणि खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतो. यंत्रनिर्मिती करण्याचा उद्योग देखील चालवतो. युरोपमध्ये काही वर्षे व्यवस्थापक म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्या पाठी आहे. 2017 सालात श्री. उदय ओक हे एक हरहुन्नरी, अवलिया असे माझे स्नेही मला पुणे विद्यापीठातील एका रासायनिक प्रयोगशाळेत घेऊन गेले. ही प्रयोगशाळा भारतीय वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी सुरू केली. 2016 साली डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या पश्चात डॉ. जयंतराव गाडगीळ हे शास्त्रज्ञ यांनी या प्रयोगशाळेची धुरा सांभाळली आहे. डॉ. जयंतराव गाडगीळ हे वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर यांना गुरूस्थानी मानतात आणि मी स्वत: डॉ. जयंतराव गाडगीळ यांना गुरूस्थानी मानतो. विज्ञान शोधास वाहून घेतलेली ‘साधन’ ही डॉ. जयंतराव गाडगीळ यांनी स्थापन केलेली एक संस्था. डॉ. जयंतराव गाडगीळ यांच्याबरोबर मी 2016 पासून काम करतो. प्रयोगशाळेतले शोध समाजाभिमुख करण्यासाठी नि त्यांना व्यावहारिक पातळीवर दूरगामी स्थिर करण्यासाठी अर्थसक्षम करणे हे माझे काम. त्यासाठी डॉ. जयंतराव गाडगीळ यांच्याद्वारे मला प्रदीर्घ प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणातून पर्यावरण, पुनर्वापर, विघटन या सर्व संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होत गेल्या.

भारतीय वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर

शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव गाडगीळ म्हणतात की सरकार पातळीवरून एकच निर्बंध घालण्याची गरज आहे, ते म्हणजे कोणत्याही उत्पादनाआधी त्याच्या पुनर्वापरासाठीची योजना कार्यान्वित करण्याची सक्ती हवी. मग ते कृषिउत्पादन असो, खाद्यनिर्मिती वा आणखी काही. पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण खात्याची नजर उत्पादन करणार्‍या प्रत्येक उद्योगावर हवी. साधे उदाहरण म्हणजे बांबूपासून केलेल्या कलाकृती, बांबू वापरून शाकारलेली छपरे, अंतर्गत गृहसजावटीसाठी केला जाणारा बांबुचा वापर. त्या त्या गोष्टी वापरात असेपर्यंत सगळे ठीक असते पण बांबुचा वापर करून केलेल्या गोष्टी जेव्हा जुन्या झाल्या म्हणून टाकून देण्याची वेळ येते तेव्हा त्याचे विघटन ही देखील एक समस्या म्हणून पुढे उभी राहते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा वापर करताना विघटन अथवा पुनर्वापर यासाठी ठोस विचार प्रत्यक्ष कागदावर उतरवून त्याची योजना प्रत्यक्षात आणून कार्यान्वित केली जाणे बंधनकारक ठरवले गेलेच पाहिजे.

अगदी घरात दुरूस्तीपश्चात टाकून दिलेल्या नळ्या (पाईप), प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे वा सिमेंटचे लगदे, फोडलेल्या नि टाकून दिलेल्या फरशा या सर्वांचा राडारोडा ही देखील समस्या नाही का?

शहाळी, शहाळ्यातील पाणी प्यायल्यानंतर व आतली मलईदार खोबरे खाऊन झाल्यानंतर कचर्‍यात जाते. ही कचर्‍यातली शहाळी कचरा डेपोत जाऊन त्याचे ढिगारे बनतात. नारळाच्या करवंट्या आणि ही शहाळी यांचे विघटन व्हायला शेकडो वर्ष देखील पुरेसे पडत नाहीत.

मुळात कचरा या शब्दाची देखील व्याख्या करणे गरजेची ठरते. उपयोगातून गेलेल्या अथवा उपयोगातून निवृत्त झालेल्या वस्तू कचरा म्हणून ओळखल्या जातात. तर सध्या उपयोगी नाही परंतु भविष्यात उपयोगी म्हणून जतन केलेल्या पण नाशवंत नसलेल्या वस्तू ‘अडगळ’ (क्लटर) म्हणून ओळखल्या जातात. माझ्या पतवंडाच्या पतवंडाला उपयोगी पडेल म्हणून लाकडी पाळणा जतन करण्यात येतो, हे अडगळीचे खूप प्रातिनिधिक म्हणता यावे असे उदाहरण झाले. अडगळीचे सामान जतन करण्याच्या खोलीला साहजिकच ‘अडगळीची खोली’ असेच संबोधले जावे यात नवल ते कोणते?

उपयोगातून निवृत्ती यातला पुढचा प्रकार म्हणजे मला उपयोगी नसणे, इतरांना उपयोगी असेल कदाचित पण मला, माझ्या कुटुंबाला, माझे शेजार-पाजार, माझे सगे-सोयरे यांना देखील ती वस्तू उपयोगी पडणारी नसेल तरी त्याला कचरा असेच समजले जाते. अशा वस्तू कितीही बहुमोल असल्या तरी मला-आम्हाला त्याचा फायदा नसेल आणि ज्याला त्याचा फायदा त्याच्यापर्यंत मला-आम्हाला पोहोचता येत नसेल तरी ती वस्तू कचरा म्हणूनच मानली जाते.

ओला खाद्य कचरा, पाला पाचोळा कुजवून त्यापासून खत तयार केले जाते. गांडूळ प्रकारातील कृषीजिवांचा वापर करून वर्मीकल्चर पद्धतीने खत तयार केले जाते. ते खत शेतीसाठी बहुमोल, त्याला विक्रीमूल्य देखील खूप चांगले! पण ते शेतकरी बांधवांपर्यंत, त्यांच्या शेतातल्या बांधापर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा हाती नसेल तर असे गांडूळखत देखील उपयोगाअभावी कचराच होऊन जाते ही परिस्थिती विचार करण्यास क्लेशदायी पण वस्तुस्थिती म्हणून सत्य. पुणे, मुंबई अशा विशाल महाकाय शहरांमधील सुशिक्षित पर्यावरणप्रेमींच्या कष्टातून साकारलेले सुक्या कचर्‍यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने सोन्याच्या खाणी म्हणून यशस्वी होतात पण त्यातून या बहुमूल्य सोन्याचे असे कचर्‍यात रूपांतर होते तेही वितरणाची परवडणारी अशी यंत्रणा हाताशी नसल्याने ते खत शेतकर्‍यांच्या हाती पोहोचत नाही त्यावेळी.

कचरा या शब्दाची व्याख्याच आपण वेगवेगळी उदाहरणे लक्षात घेऊन केली आहे. तो कचरा ओला आणि सुका असे ढोबळमानाने दोन प्रकारात विभागला जातो. ओला आणि सुका कचरा सेवकांना वर्गीकरण करूनच त्या कुटुंबाने वा व्यावसायिकाने करून देणे सरकारी पातळीवरून बंधनकारक केले गेले आहे पण सुक्या कचर्‍याचे देखील पुन्हा पुढील पातळीपर्यंत वर्गीकरण केले जायला हवे.

सुक्या कचर्‍यात रद्दी, भंगार, वेष्टणे अशा वस्तू येतात. त्यातील भंगार, रद्दी व्यवसाय करण्यार्‍या मंडळींसाठी वेगळे वर्गीकरण करून देणे देखील गरजेचे ठरते. भंगार आणि रद्दीसाठी विक्रीयोग्य वस्तू विकल्या गेल्या की राहतो तो विक्री न होऊ शकलेला कचरा. त्या कचर्‍याचा अभ्यास केल्यानंतर त्याची आकडेवारी करण्यात आली. त्या आकडेवारीवरून पुढील एक निष्कर्ष सामोरा आला.

कचरा विघटनातील एकूण घटकांपैकी प्लॅस्टिक हे केवळ एक टक्क्याहून कमी प्रमाणात असते पण गाजावाजा मात्र होतो केवळ प्लॅस्टिकचा. एकवेळ प्लॅस्टिक चालवून घेतले जाते, थर्माकोल म्हणजे तर शांतं, पापं अशी अवस्था.

प्लॅस्टिकवर बंदी घाला, थर्माकोलला खलनायक ठरवा, बघता काय सामिल व्हा, अशा झुंडगीरीतली निर्बुद्ध मानसिकता कचर्‍यासारख्या त्याज्य प्रकारात देखील व्हावी यात प्रामुख्याने लोकशिक्षण आणि पर्यावरणसाक्षरता यातील उणिवा समोर आणल्या जायला हव्यात. त्या उणिवांच्या अभ्यासाची पार्श्वभूमी आणि पर्यावरण साक्षरतेची तोंडओळख म्हणजे देखील हा लेख लिहिण्याची प्रेरणा.

तर मूळ मुद्दा म्हणजे विघटन आणि पुनर्वापर यासाठीची मानसिकता याच्या जोडीला प्रयत्न, योजना, यंत्रणा आणि यंत्रसामुग्री यांची तरतूद महत्त्वाची ठरते. त्याही पेक्षा विघटन आणि पुनर्वापर हा व्यवसाय म्हणून अशा संधीच्या स्वरूपात सामोरा आल्यास त्याचे ‘कचर्‍यातून सोने’ हे गोंडस नाव सार्थ ठरण्यासाठी व ठरविण्यासाठी आम्ही काही योजना हाती घेऊन कार्य आरंभले आहे. त्याचे हे बैजवार (सविस्तर) विवरण.

प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या विघटन आणि पुनर्वापर या प्रक्रियेत मुख्य अडथळा ठरतो तो म्हणजे वाहतुकीचा. वाहतुकीमध्ये अडचण ठरतो प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा आकार. अगदी आकड्यात बोलायचे तर 20 टन वजनाची वाहतूक करण्याची क्षमता असलेला भला थोरला ट्रक केवळ 300 ते 400 किलो प्लॅस्टिक अथवा थर्माकोल वाहून नेऊ शकतो. म्हणजे प्लॅस्टिक आणि थर्माकोल वाहून नेताना अनेक गाड्या, अनेक मनुष्यबळ यांची आवश्यकता भासणार. याचाच अर्थ खर्च बेसुमार वाढणार. हे कशासाठी तर नगण्य किमतीचा प्लॅस्टिक कचरा वाहून नेण्यासाठी. म्हणजे कचर्‍याची किंमत एक आणा आणि वाहतुकीचा खर्च बारा आणा.

यावर उपाय हाच की वाहतूकखर्च पूर्णपणे थांबवणे. एक आण्याच्या काचर्‍यातून किमान पंचवीस रुपये मिळवणे! ते कसे शक्य आहे हेच तर आपण पाहणार आहोत.

प्लॅस्टिक आणि थर्माकोलचे विघटन त्या-त्या विभागातच व्हायला हवे. म्हणजे महापालिकेच्या एका प्रभागातील प्लॅस्टिक आणि थर्माकोल त्याच प्रभागात विघटित केल्यास त्या प्रभागात कचरा वाहून नेणारी महाकाय वाहने दिसणार नाहीत. प्लॅस्टिक आणि थर्माकोल विघटन करणारा एक छोटासा उपक्रम त्या प्रभागात राबवला जायला हवा. एक छोटेसे केंद्र (यूनिट) त्याचा परीघ किती तर हातगाडीने कचरा त्या केंद्रापर्यंत वाहून नेणे सोपे जाईल इतपतच दूर, त्याहून लांब नाही. एखाद्या इमारतीतील सेवक हाताने त्या इमारतीतील कचरा जास्तीत जास्त 300 ते 400 मीटर अंतरावर वाहून नेऊ शकतो. त्यापलीकडे हातगाडी ओढणे अवघड जाऊ शकते. तर अशा केंद्राची सीमा वर्तुळाकार 300 ते 400 मीटर अंतराची, ज्यात सुमारे 5000 घरटी (कुटुंबे) सामाऊन जाऊ शकतात.

या कचरा प्रक्रिया केंद्रात ओला कचरा, सुका कचरा वेगळा करूनच दिला जायला हवा. ओल्या कचर्‍याचा बारीक चुरा करून त्यातील पाणी वेगळे करून कोरड्या कचर्‍याच्या इंधनविटा (व्हाईट कोल) करता येतो. वेगळे केलेले पाणी प्लॅस्टिकच्या डब्यात (कॅनमध्ये) साठवून ते शेतीसाठी कृषिसंजीवनी म्हणून पाठवता येते. इंधन विटा (व्हाईट कोल) भट्टीमध्ये इंधन म्हणून लाकडाला योग्य पर्याय ठरतो.

सुक्या कचर्‍यामध्ये कागद, लोखंड, लाकूड, कापडी वस्तू इत्यादी गोष्टी भंगारविक्री करणार्‍यांना देता येतात. ते त्यातून त्यांचा व्यवसाय चालवतात. राहता राहिला प्लॅस्टिक, फोम, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि थर्माकोलचा विषय.

प्लास्टर ऑफ पॅरिसचा राडारोडा यंत्रात दळून, भाजून प्रक्रिया करून त्यातून पुन्हा नव्या स्वरूपात पूर्णपणे नवे असे प्लास्टर ऑफ पॅरिस मिळवता येते. तीच गोष्ट गणपती, दुर्गा आणि देवादीकांच्या मूर्तींची. या मूर्ती स्थापन करताना त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्याचप्रकारे त्या मूर्ती विसर्जित होताना त्यातील प्राण आवाहनाने काढले गेल्यामुळे त्या मूर्तींना शास्त्रमान्यतेनुसार केवळ ‘पार्थिव’ असे संबोधले जाते. त्यामुळे त्या मूर्ती विघटित करून पुन्हा त्यातील प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून नव्याने तयार झालेल्या मूर्ती अतिशय पवित्र मानल्या जातात.

देव-देवतांच्या मूर्तीचे विघटन करताना देखील चुकीच्या धार्मिक धारणा आणि अंधश्रद्धा आडकाठी ठरतात.
मला आठवते लहानपणी आम्ही भावंडं एकत्र मिळून वडीलधार्‍यांसोबत गणपतीची मूर्ती विकत आणायला जायचो. त्यावेळी मूर्ती ज्याच्या हातात दिली जायची त्या भावंडाचा मान मोठा. गणपती हातात घेताना पायात चप्पल ठेवावी की नाही यावरून मुला-मुलांत चर्चा होई, चप्पल काढून घरी मूर्ती घेऊन जाणे खरेतर जीवावर येई कारण पावसाळी दिवस, चिखल नि ओले रस्ते, हे एक आणि मूर्ती हातात घेतली तर त्या भावाची वा बहिणीची चप्पल हातात घेणारे भावडांपैकी कुणी तरी तयार व्हायला हवे ना. हे सगळे वादविवाद होत असताना वडीलधार्‍यांपैकी कुणीतरी समजूत काढीत त्यामागचे शास्त्र समजून सांगत. गणपती देवतेच्या मूर्तीमध्ये ठराविक मुहूर्तावर मंत्रोपचाराने विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. महाराजाभिराजाय अशा शब्दात महाभिषेक केला जातो. तेव्हा कुठे मूर्तीत देवता प्राण ओतून त्यात विराजमान होते. तीच गोष्ट विसर्जणाच्या शेवटी, जेव्हा मंत्रोपचाराने विधिवत मूर्तीवर अक्षता टाकून त्या मूर्तीतले प्राण विसर्जित केले जातात तेव्हा राहते ते पार्थिव, जे मृत्तीकेसमान म्हणजे मातीचे होते. त्या मातीच्या मूर्तीला तेव्हा मातीपेक्षा वेगळी काहीच किंमत नसते, अशावेळी ती मूर्ती हातात विराजमान होताना पायात पादत्राण असो काय किंवा नसो काय, काहीही फरक पडत नाही. याच दृष्टीने विसर्जन केलेल्या मूर्तीच्या विघटनाकडे पहायला हरकत नसायला हवी.

आता पुढचा मुद्दा, मूर्तीसाठी वापरल्या जाणार्‍या घटकांचा. शाडुच्यामूर्ती तरमुळीच वापरू नयेत. शाडू पाण्यात विसर्जित होत नाही आणि शाडूमिश्रित पाणी शेतात वाहून आल्यास शाडूची माती शेतातल्या मातीला हानीकारक ठरते. जी गोष्ट शाडूच्या मातीची तीच तर्‍हा चिकनमातीची. शाडूची माती आणि चिकनमाती यांच्या उपलब्धतेच्या बाबतीत देखील मर्यादा जाणवते. त्यामुळे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे पूर्णपणे विघटन करणे शक्य असल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचाच मूर्ती तयार करण्यासाठी वापर करणे मूर्तिकार मंडळींसाठी उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी लाभदायक ठरतेच पण ते पर्यावरणासाठी देखील उपकारक आहे हे आता आम्ही आमच्या प्रयोगशाळेत सिद्ध केले आहे आणि आम्ही प्रस्तावित केलेले प्रतिरूप (मॉडेल) आता व्यावसायिक मंडळींना देखील आत्मसात करण्यासाठी मान्यता पावत आहे.

सुक्या कचर्‍यात आता काय राहिले तर प्लॅस्टिक, थर्माकोल, फोमचा कचरा. थर्माकोल, फोमचा बारीक चुरा करायचा नि यंत्रात टाकून त्याचे विघटन करायचे. त्यातून रेझीन प्राप्त करता येते.

प्लॅस्टिकचे एकूण सहा प्रकार पडतात. त्यात सातव्या स्वरूपात भर पडते ती प्लॅस्टिकचे पोते यात अगदी एक क्विंटलपर्यंत माल बसू शकतो. त्यास रफीया प्लॅस्टिक असेही संबोधले जाते. या विशिष्ट प्रकारच्या रफीया प्लॅस्टिकमध्ये मजबूतीकरिता चुना मिसळला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकचे विघटन करताना मोठ्या प्रमाणात कार्बन बाहेर फेकला जातो. प्रदूषण टाळावे म्हणून आम्ही त्यात दुसरा पर्याय निवडला, त्यापासून प्लॅस्टिकच्या विटा, प्लॅस्टिकचे ठोकळे (पेव्हिंगब्लॉक), घराच्या छपराची कौले, पन्हाळी तयार केली जातात. साधारणपणे 170 ते 180 अंश तपमानात अशा प्रकारचे प्लॅस्टिक वितळून त्यापासून या टिकाऊ वस्तु तयार केल्या जातात.

बाकी उरलेल्या सहा प्रकारातील प्लॅस्टिकपैकी पीव्हीसी, पीईटी आणि एच.डी.पी.ई. या प्रकारातील प्लॅस्टिकचा बारीक चुरा करून आम्ही तो विकतो. बारीक चुरा करण्याच्या प्रक्रियेला इंग्रजीत एग्लोमरेशन असे म्हटले जाते आणि चुरा करणार्‍या यंत्राला एग्लोमरेटर असे संबोधले जाते.

पीव्हीसी, पीईटी प्रकारचे प्लॅस्टिक भंगारात विकले जाते. साधारणपणे 15 रुपये किलो असा त्याला भाव मिळतो पण बारीक चुरा करून दिल्यास अगदी 25 रुपये असा जास्तीचा भाव देखील प्राप्त होतो.

एच.डी.पी.ई. या प्रकारातील प्लॅस्टिकचा बारीक चुरा करून त्यापासून प्लॅस्टिकचा धागा (फिलामेंट) तयार केला जातो. हा धागा त्रिमीतीय यंत्रासाठी (थ्री-डी प्रिंटरसाठी) वापरला जातो. या थ्री-डी प्रिंटरपासून प्रतिरूप (मॉडेल) तयार केली जातात. अस्थि शल्यचिकित्सक (अर्थोपेडिक सर्जन) धातूचे अवयव (इंप्लांट्स) तयार करण्याआधी थ्री-डी प्रिंटरद्वारे प्लास्टिकमधला नमुना प्रात्यक्षिकासाठी प्रतिरूप (मॉडेल) म्हणून तयार करतात. दंतवैद्य (डेंटिस्ट) देखील प्रत्यक्ष शल्यचिकित्से (सर्जरी) आधी प्लॅस्टिकच्या दातांचे प्रतिरूप तयार करून त्याचे प्रात्यक्षिक केले जाते. वास्तुविशारद संपूर्ण इमारतीची त्रिमीतीय प्रतिकृति थ्री-डी प्रिंटरच्या आधारे नमुन्यादाखल सादर करू शकतो. या थ्री-डी प्रिंटरचा वापर आता सर्वमान्य होत वाढू लागला आहे. प्लॅस्टिक धाग्याचा (फिलामेंट) वापर देखील त्याबरोबर वाढतो आहे.

उरलेल्या तिन्ही प्रकारच्या प्लॅस्टिकचे विघटन करून आम्ही वेगवेगळे पदार्थ तयार करतो त्याला भारताचे वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी ‘हायड्रोकार्बन’ असे संबोधले आहे आणि हायड्रोकार्बन तयार करणारी प्रक्रिया डिस्टीलेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेत घनरूप पदार्थ उष्णतेने द्रवरूप पदार्थात रूपांतरीत होतात. त्या द्रवरूपाचे वायूरूपात परावर्तन होत असताना त्या वायुला पुन्हा थंड करीत द्रवपदार्था तरूपांतरीत केले जाते व आपल्याला ईप्सित असे विशिष्ट प्रकारचे ‘हायड्रोकार्बन’ तयार केले जातात. हे वेगवेगळे पदार्थ तयार होताना त्याच्या प्रक्रिया (रेसिपी) वेगवेगळ्या असतात. यात उष्णता (तपमान) हा महत्त्वाचा घटक, साधारणपणे साडेआठशे ते साडेनऊशे तपमानाला प्लॅस्टिकचे विघटन होते. आमच्या प्रयोगशाळेने डॉ.जयंतराव गाडगीळ यांच्या प्रदीर्घ संशोधनाच्या प्रेरणेने एक उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट)तयार केला. त्याचा फायदा तपमानाची (उष्णतेची) गरज अडीचशे ते साडेतीनशे पर्यंत खाली नेता आली. या प्रक्रियेला मी ‘कॅटॅलिटीक रियाक्टिव्हडिस्टीलेशन’ असे संबोधले आहे.

प्लॅस्टिकचे विघटन करताना त्याचे वर्गीकरण करण्याच्या भानगडीत न पडता सरसकटपणे त्याला एकत्र करून वितळवून उष्णतेच्या झोतात त्याचे रूपांतर डिझेलमध्ये करता येते. उष्णता म्हणजे ग्रीक भाषेत पायरो. त्यामुळे उष्णतेच्या तप्त झोतात केल्या जात असलेल्या या प्रक्रियेला पायरॉलिसिस असे संबोधले जाते. या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे विघटन केले जाते. या मोठ्या प्रकल्पांची क्षमता प्रती दिनी सुमारे 5 टन ते 100 टनपर्यंत देखील असू शकते पण क्षमतेच्या तुलनेत हवा तेवढा प्लॅस्टिक कचर्‍याचा पुरवठा या प्रकिया केंद्रावर होऊ शकत नाही. त्यात वाहतुकीसाठी लागणारी महागडी साधने आणि मनुष्यबळ यांचा देखील ताळमेळ बसत नाही.

पायरॉलिसिससाठी भली थोरली यंत्रणा हाताशी लागते. मोठी जागा, मोठे भांडवल, त्यासाठी अनेक परवाने, शासकीय, स्थानिक परवानग्या यांची गरज असते. अशा जागा शहरापासून दूर किमान पंचवीस किलोमीटर दूर अंतरावर उभ्या केल्या जातात. म्हणजे या दूर अंतरावरील केंद्रापर्यंत पूर्ण शहराचा प्लॅस्टिक कचरा वाहून नेण्यासाठी करोडो रूपये बरबाद होतात.

अशा प्रकल्पाचे विकेंद्रीकरण करणे महत्त्वाचे आणि त्याहून महत्त्वाचे ठरते त्याचे लघुत्तम असे प्रारूप (स्केलडाउनव्हर्जन). कमीत कमी भांडवली खर्चात, कमीत कमी क्षेत्रफळात, कमीत कमी कष्टात, कमीत कमी रोजकीर्दीत पण जास्तीत जास्त रोजगार निर्मितीतून साकारले जाणारे असे लघुत्तम प्रारूप आम्ही विकसित केले आहे. एका महानगरात या प्रारूपाचे असे हजारो केंद्र स्थापित झाल्यास महानगराभोवतीचे कचरा डेपो नष्ट करू शकण्याची क्षमता हे प्रारूप प्राप्त करून देते. कचरा विघटनाचे हे छोटेखानी प्रारूप छोटेखानी असल्यामुळेच ते देशभरातली कोणत्याही प्रकारच्या लोकवस्तीसाठी उपयुक्त ठरते.

कचरा विघटनाचे हे छोटेखानी प्रारूप सादर करताना मला महानगराभोवतीचे कचरा डेपो नष्ट करण्याचे हे माझे जीवितकार्य आहे असेच वाटते. अशाप्रकारे कचराडेपो नष्ट झाले तर महानगराभोवती कचराडेपो असलेल्या गावांची होणारी मुस्कटदाबी बंद होऊ शकते. या गावांवर या महानगरांची एकप्रकारे दादागिरी-गुंडगिरी या कचराडेपोच्या अस्तित्वाने चालते.

एरवी नागर जीवनालाच (शहरी जीवनमानालाच) सभ्य अशी संस्कृती मानले जाते. सिव्हिक सेन्स म्हणजे सभ्यता असाच इंग्रजी शब्द देखील रूढ आहे पण कचराडेपो प्रकरणात या महानगरापासून दूर असलेल्या गावी असणारे कचराडेपो आणि त्यांच्या अस्तित्वाने त्या गावातील जीवनमान किती खालवते हे पाहता, या शहरी दंडगाईला जवळ करणार्‍या तथाकथित सभ्य (?) नागर जीवनाला ‘संस्कृती’ असे तरी का म्हणावे हा देखील प्रश्न पडतो.

एकप्रकारे अशी असंस्कृती नष्ट करायची असेल तर या महानगरांभोवती असणारे कचराडेपो बंद पाडायला हवेत. त्यासाठी शहरातील कचरा त्या शहराबाहेर वाहून नेण्यावर पूर्णपणे बंदी हवी. एवढेच नाही तर शहरातील उपनगरातील एक प्रभागातून त्याच प्रभागातील दुसर्‍या भागात देखील कचर्‍याची वाहतूक बंद करायला हवी.

त्यासाठी मग नियंत्रण ठेवणारी भली थोरली यंत्रणा हवी. खरे तर त्याची देखील फारशी मोठी गरज नाही. केवळ एकच निर्बंध पुरेसे, ते म्हणजे कोणतेही इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज, बॅटरी इ.) वापरणार्‍या स्वयंचलित वाहनांना कचरा वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घालावी आणि हाताने तेही बाईमाणसाने ओढून नेता येणार्‍या दोन चाकांच्या हातगाडीने कचरा ओढत नेऊन जवळच्या कचरा निर्मूलन केंद्रात जमा करायचा व त्या केंद्रातच तो विघटन करून वेगवेगळ्या विक्रीयोग्य पदार्थात रूपांतरीत करायचा.

असे उत्पादन केंद्र नफ्यात आणण्यासाठी खाजगी गुंतवणूकदार पुढे येतील, ते त्यातून भरभक्कम नफा काढतील, एक केंद्र किमान पन्नास लोकांना रोजगार निर्माण करण्याची ताकद या केंद्रात आहे. पंचवीस (25) महिलांना प्रत्यक्ष रोजगार आणि पंचवीस (25) महिलांना अप्रत्यक्ष रोजगार असे एकंदर (50) जनांचा रोजगार, अशी किमान 5,000 (पाच हजार) केंद्रे पुण्यात, किमान 25,000 (पंचवीस हजार) केंद्रे मुंबई महानगर परिसरात निर्माण झाली तर किमान 15,00,000 (पंधरा लाख) लोकांना रोजगार निर्माण होऊ शकतो.

यातले महिनाभराचे अर्थचक्र किमान हजारो कोटींचे आहे पण सुरूवात वार्षिक एका कोटीची आर्थिक उलाढाल असलेले एक केंद्र आणि अशी हजारो केंद्रे त्या शहराला कचर्‍याच्या समस्येतून बाहेर काढू शकतात. कचरा डेपो नष्ट होऊ शकतात.

या प्रकल्पाला आम्ही ‘शून्य कचरा निवासी-अनिवासी वसाहत’ अर्थात ‘झीरो गारबेज व्हिसिनिटी’ असे शीर्षक दिले आहे. 5,000 कुटुंबे अधिवास करीत असलेला भाग ही या प्रकल्पाची सीमा. कचरा त्या भागातून या सीमेबाहेर जाणारच नाही. त्यासाठी केवळ अर्धा दिवस काम करणार्‍या किमान 50 महिला रोजगारक्षम होणार. महिला सक्षमीकरण देखील यातून साध्य होणार आहे.

हे सर्व करताना कोणतीही धर्मादाय मदत न घेता, मी नि माझ्या सहकारी स्नेह याद्वारे मला प्राप्त झालेल्या शक्तीतून हे कार्य पुढे कार्यरत करीत आहे. यात उद्देश एकच की हे केंद्र स्वत:चा खर्च भागवित पुन्हा गुंतवणुकीसाठी भरभक्कम नफा कमविणारे असावे. जेणेकरून या केंद्राचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तिकडे त्या व्यक्तिच्या कुटुंबाने ‘लष्कराची भाकरी’ या दृष्टिकोनातून मुळीच पहायला नको. याउलट नफा कमविणारे हे केंद्र त्या कुटुंबियांच्या स्नेहाला देखील पात्र व्हावे.

असे पहिले-वहिले केंद्र आम्ही कोथरूड येथे कर्वे रस्त्यावरील करिश्मा चौकानजिक शिलविहार वसाहतीत सुरू केले आहे. या केंद्राला लागणारी यंत्रसामुग्री मी स्वत: निर्मित केलेली आहे. ही यंत्रे सुस्थापित करताना अनेक निराशांना मला सामोरे जावे लागले आहे. अनेक वेळा घडणे, जोडणे, पडणे, मोडणे, धडपडणे आणि पुनः पुन्हा उभे राहणे यातून मी, माझे सहकारी आणि माझी यंत्रे या सर्वांचा प्रवास झाला आहे.

या प्रवासाचे अंतिम ध्येय एकच, ते म्हणजे ‘शून्य कचरा निवासी-अनिवासी वसाहत’ अर्थात ‘झीरो गारबेज व्हिसिनिटी’द्वारे कचराडेपो विसर्जित करण्यासाठी पर्यायी आर्थिक सक्षम अशी नफा देणारी व्यवस्था कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सामाजिक धर्मादाय मदतीशिवाय उभी करणे. यात सहभागी होण्यासाठी आमच्या कोथरूड निवासी केंद्राला कोणत्याही दिवशी माध्यान्हापूर्वी भेट द्यावी हे सांगून साठा उत्तराची ही कहाणी पाचा उत्तरी सुफल संपन्न होत सर्वांनी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा वसा हाती घेऊन तो आपल्या पिढीकडून आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त करताना त्यांना आर्थिक पाठबळाची उत्तम सोय करीत असाच पुढे शतकानुशतके अखंड भारत राष्ट्राला सूजलाम् सुफलाम् करीत जावा ही मनोमनी कामना व्यक्त करतो.

कचरा विघटनाचे हे छोटेखानी केंद्र सर्व प्रकारच्या पण फक्त घरगुती कचर्‍याचे विघटन करते. मोठमोठ्या उपाहारगृहांचा कचरा, रूग्णालयांचा कचरा, औद्योगिक टाकाऊ रसायने, औद्योगिक कचरा, टाकाऊ काच व काचसामान, खाद्यप्रक्रिया-खाद्यनिर्मिती उद्योगातील कचरा, शेतीतील कचर्‍याच्या समस्येवर आमच्या तूर्तास काहीही योजना नाहीत. सध्या तरी केवळ घरगुती कचर्‍याचे विकेंद्रीत स्वरूपात पण मोठ्या प्रमाणात विघटन करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे. या क्षेत्रातील यश, अनुभव, अपयश असे जे काही आम्ही शिकणार आहोत, त्याचा फायदा नव्याने आणखी अचूक योजना आखण्यात आणि इतर अनेक प्रकारच्या (वर उल्लेख केलेल्या) कचरा निर्मूलन आणि विघटनासाठी होणार आहे.

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021, पृष्ठ 91

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “प्लॅस्टिक भरपूर वापरा, थर्माकोल भरपूर वापरा”

  1. preeti phadke

    khupach mahitipurna ani mahatvapurna lekha. lekhakacha phone number milel ka?

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा