राजकीय पक्षांच्या ‘टोळ्या’?

राजकीय पक्षांच्या ‘टोळ्या’?

संसदीय लोकशाहीला सुरूवात होऊन फार काळ उलटला नसल्याने आपल्याकडे राजकीय पक्षांचा इतिहास तसा जुना नाही. राजेशाही संपली, सरंजामशाही संपली, संस्थाने खालसा झाली आणि लोकांच्या कल्याणासाठी त्या त्या ध्येयवादी गटाने पुढाकार घेत आपापल्या विचारधारांचे गट स्थापन केले. त्यांना राजकीय पक्षांचे स्वरूप आले. लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला. किमान तसा भास निर्माण करण्यात आला. त्यातून आपल्या लोकशाहीचा प्रवास सुरू झाला. पूर्वीच्या काळातल्या टोळ्या नष्ट झाल्या आणि विचारसमूह अस्तित्वात आले. आजचे चित्र पाहता या पक्षांच्या पुन्हा टोळ्या झाल्यात की काय? असे वाटावे इतके झपाट्याने हे चित्र बदलले आहे.

आपल्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आपल्या देशात 2334 नोंदणीकृत पक्ष आहेत. त्यात आठ राष्ट्रीय तर सव्वीस राज्यस्तरीय पक्षांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रात 145 नोंदणीकृत पक्ष असून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन राज्यस्तरीय पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसची नोंदणी राष्ट्रीय पक्ष म्हणून झालेली आहे. या प्रत्येक पक्षाची घटना, त्यांचा जाहीरनामा बघितला तर सगळेजणच समाजहितासाठी कार्यरत असल्याचा दावा करतात. असे असूनही आपल्या राज्य आणि राष्ट्रासमोरील अनेक प्रश्न, समस्या वर्षानुवर्षे, पिढ्या न पिढ्या संपायला तयार नाहीत, ही अत्यंत शरमेची बाब आहे.

गेला आठवडा आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची कोणती बातमी गाजत असेल तर ती नारायण राणे यांची अटक! केंद्रीय मंत्री असलेल्या राणे यांना अशाप्रकारे अटक करून सत्ताधारी महाविकास आघाडीने त्यांच्यावरील उट्टे काढले. या घटनेचे दीर्घकालिन गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतील. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही ‘राणेंची अटक ही छोटी गोष्ट आहे, त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही’ असे सांगून विषय टाळला असला तरी यामुळे राणेंना फक्त ओरखडे उमटले नाहीत तर त्याच्या गंभीर जखमा झाल्यात. या वेदनेचे पडसाद नजिकच्या काळात दिसून येतील. नरेंद्र मोदी सरकारमधील एका मंत्र्याला ही जी अपमानास्पद वागणूक मिळाली त्याची किंमत महाविकास आघाडीला मोजावी लागणार आहे. पत्रकार परिषदेसाठी बसलेले असतानाचा फोनवर पोलीस अधिकार्‍यांशी संवाद साधत राणेंच्या अटकेसाठी दबाव आणणार्‍या अनिल परब यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर लगेचच त्यांना इडीकडून चौकशीची नोटीस मिळाली असून भाजपकडून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. नारायण राणे, डॉ. भागवत कराड असे नवे मंत्री जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत असतानाच ही नाट्यपूर्ण घटना घडली. ‘‘भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. क्रोनोलॉजी कृपया समजून घ्या,’’ असे खासदास संजय राऊत यांनी सांगितले असले तरी याचे काय पडसाद उमटतात, काय परिणाम घडतात हे लवकरच दिसून येणार आहे.

लोकशाहीची लक्तरे वेशिला टांगतानाच महाराष्ट्रात हा जो राडा झाला त्यामुळे बळकट नाही तर मळकट चित्र निर्माण झाले आहे. यातून कुणाचेही भले होईल असे दिसत नाही. राणे कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरासमोर ज्यांनी धांगडधिंगाना घातला त्यांचेही कौतुकसोहळे सुरू आहेत. जुहूतील राणेंच्या घराबाहेर पोलिसांनी ज्याला कपडे फाटेपर्यंत बदडून काढले त्या मोहसीन शेखला त्याचे इनाम मिळाले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून त्यांना युवासेनेच्या सहसचिवपदाची बक्षिशी मिळाली आहे. मोहसीन हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यांची पत्नी राष्ट्रवादीची मानकूर शिवाजीनगरची नगरसेविका आहे. ‘मुस्मिम समाजातील हा ढाण्या वाघ राणेंच्या मुलांना जाऊन भिडला,’ असे शिवसेनेकडून सांगण्यात येत असताना यात प्रमोशन मात्र आदित्य यांचे मावसभाऊ वरूण सरनाईक यांचे सुरू आहे. सगळ्याच पक्षात राजकीय घराणेशाही सुरू असताना प्रत्येक घटनेत, घडामोडीत किती मायक्रो पॉलिटिक्स चालते याचेच हे द्योतक आहे.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याविषयी रोष व्यक्त करताना जी भाषा वापरली त्याचे समर्थन कोणीही करणार नाही. अनेक वर्षे तोडफोड संस्कृतीचेच प्रदर्शन घडविणार्‍या शिवसेनेला आपण सत्तेत आहोत याचे विस्मरण होत असावे. त्यातून मग अशा किरकोळ गोष्टींना नको तितके महत्त्व देण्यात येते आणि प्रश्नांचा गुंता वाढत जातो. या प्रकारानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्याविषयी जे अनुद्गार काढले त्याचीही चर्चा झाली. सध्या सगळ्याच पक्षातील नेत्यांना भाषिक असभ्यपणाचा संसर्ग झालेला दिसतो. एकमेकांची उणीदुणी काढताना आणि वैयक्तिक टीकाटिपण्णी करताना मर्यादाभंग होतो. यातून वाद आणि वितंडवाद उद्भवत असले तरी सकारात्मक विषय मात्र बाजूला पडतात. ज्यांना अनुल्लेखाने मारणे सहज शक्य असते त्यांच्यासाठी मोठमोठी कारस्थाने आखून आपल्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा गैरवापर करणारे नेते सगळ्याच पक्षात आहेत. ‘नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे’ अशी त्यांची भूमिका असते. या सगळ्यातून काय कमावले, काय गमावले, महाराष्ट्रापुढे कोणते आदर्श ठेवले याचा विचार करण्याची फुरसतही त्यांना मिळत नसावी.

अनिल देशमुख या शरद पवार यांच्या लाडक्या शिष्याचा बाजार उठवला गेला. सगळ्यात आदर्श गृहमंत्री म्हणून त्यांचा गाजावाजा सुरू असतानाच त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. इतकेच नाही तर त्यांच्यावर काही आरोप ठेवण्यात आले. त्याची चौकशीही सुरू झाली. त्यानंतर दिलीपराव वळसे पाटील हे पवारांचे दुसरे निकटवर्तीय नेते गृहमंत्री झाले. ते अतिशय सुसंस्कृत आणि अभ्यासू आहेत. महाराष्ट्राचे गृहखाते सांभाळत असतानाही ते राणे प्रकरणाबाबत पूर्णपणे मौन बाळगून आहेत. काही गरबड झालीच तर आपलाही अनिल देशमुख होऊ शकतो अशी भीती त्यांच्या मनात असावी. राणे, त्यांची मुले, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस असे सगळेजण या विषयांवरून रान पेटवत असतानाही वळसे पाटील यांचे मौन सूचक आहे.

नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एकेकाळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांचा समाचार घेताना बाळासाहेब म्हणाले होते की ‘‘माझ्या नावावर जी काही संपत्ती असेल ती मी त्याच्या नावावर करायला तयार आहे. त्याच्या नावावर जे काही अधिकृत-अनधिकृत असेल ते त्याने माझ्या नावावर करावे…’’ आता तर राणे मुख्यमंत्री ठाकरे, संजय राऊत यांना उघडपणे धमकावताना कोणी कुणाचे खून केले इथपासूनची माहिती देत आहेत. यात जर एक अंशही तथ्य असेल तर आजवर ही माहिती लपवल्याबद्दल त्यांची चौकशी व्हायला हवी. शिवाय ही माहिती ते उघडपणे सांगताहेत म्हणजे त्याबाबतचे काही ठोस पुरावे त्यांच्याकडे असतील! त्याचीही पडताळणी होणे गरजेचे आहे.

राजकारण म्हटलं की आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे. यातून शह-काटशहाचेही प्रयत्न होतील! पण आपण काय बोलत आहोत आणि त्याचे काय परिणाम होतील याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. यातून राजकीय पक्षांचे रूपांतर क्रूर टोळ्यात झाले तर ते समाजालाही परवडणारे नाही. सत्तेतल्या पक्षाची वर्तणूक कशी आहे? समाजासाठी, राष्ट्रासाठी कोणत्या नेत्याने, कोणत्या पक्षाने काय केले इकडे आपल्या सामान्य माणसाचे बारकाईने लक्ष असते. एखाद्याला उभे करणे आणि त्याला नेस्तनाबूत करणे या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाला खूप चांगल्या पद्धतीने जमतात. तो बोलत नसला तरी मतपेटीतून त्याचे काम चोखपणे पार पाडतो याचा विसर कुणालाही पडू नये!
– घनश्याम पाटील

7057292092

दै. ‘पुण्य नगरी’,
मंंगळवार, दि. 31 ऑगस्ट 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “राजकीय पक्षांच्या ‘टोळ्या’?”

  1. Ramkrishna Adkar

    सामान्य माणूस मतपेटीतून प्रतिक्रिया व्यक्त करतो हे खरे असले तरी आता तिथेही अनैतिकतेची घूसखोरी होताना दिसत आहे. बंगाल मधील निवडणूक, केरळमधील श्रीधरन यांचा पराभव यासारखी उदाहरणे हे स्पष्ट करतील. महाराष्ट्रातील भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिकांची गुंडगिरी, निवडणूक निर्णय सामान्य माणूस मतपेटीतून बदल करु नये यासाठी नक्कीच राडा करेल यात मला तरी शंका नाही !

  2. जयंत कुलकर्णी

    अभ्यासपूर्ण लेख. राजकारणात समाजकारण किंवा समाजसेवा अभावानेच आढळते हे कटुसत्य आहे.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा