हातात डोकं गच्च धरून, जोर जोरात आदिती ओरडत होती. ‘‘जा इथून सगळे जण… कोणी नकोय मला… मला एकटं राहू द्या…. मला थोडी तरी शांतता हवीय… जाऽऽऽ… प्लिज… जाऽऽ… हात जोडते… पाया पडते…’’ पण तिचा आक्रोश कोणी ऐकायलाही तयार नव्हतं. आई, बाबा, ताई, मैत्रिणी सगळेजण तिच्या भोवती गोळा होऊन तिला विचारत होते, ‘‘काय केलंस तू हे? डॉक्टर ना तू? का? कशासाठी?’’ आणि आदितीकडे कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. खरंतर उत्तरं देता येऊ नयेत कोणाला असे प्रश्न तरी आयुष्यात का निर्माण व्हावेत?
सगळं घर तिच्याभोवती फिरत होतं. कितीतरी वेळ ती विनवण्या करत राहिली. रडत राहिली. हात जोडत राहिली… आणि अचानक भयाण शांतता पसरली. सगळ्यांचे आवाज येणं बंद झालं. कानावरचे दोन्ही हात बाजुला करत, केव्हाचे गच्च मिटलेले डोळे तिने सावकाश उघडले पण समोर कोणीच नव्हतं. ओहऽऽऽ स्वप्न होतं तर…
चेहर्यावरून हात फिरवत तिने घड्याळाकडे पाहिलं. संपूर्ण चेहरा घामाने डबडबला होता. पहाटेचे साडेतीन वाजता आले होते. आपण रात्रभर या कोपर्यात बसून आहोत याची जाणीव तिला झाली. समोर कोणीच नव्हतं. आपण स्वप्न पाहत होतो पण ही वेळ दूर नाही जेव्हा घरातले, बाहेरचे एक एक जण येऊन आपल्याला असे प्रश्न विचारतील. तेव्हाही आपल्याकडे कोणाच्याच प्रश्नाचं उत्तरं नसेल. मला देता येत नाहीयेत उत्तरं की माझ्याजवळही ती नाहीयेत? मनात घोंगावणार्या विचारांच्या वादळासहीत ती बाथरूममध्ये शिरली. तोंडावर थंडगार पाण्याचे हाबके मारून बाहेर आली. दोन ग्लास पाणी पिऊन पुन्हा बेडरूममध्ये खिडकीजवळ उभी राहिली. खिडकी उघडताच गार हवा आत शिरली. आता जरा हुशारी आल्यासारखी वाटत होती. लांबूनच कुठून तरी कुत्री भूंकण्याचा आवाज येत होता. घड्याळीच्या टिकटिकी बरोबर हृदयाच्या ठोक्यांचा अन् धपापणार्या श्वासांचाही आवाज जीवघेणा वाटत होता त्याक्षणी! दुपारपासून अन्नाचा कणही पोटात गेला नव्हता. आता मात्र तिला भुकेची जाणीव झाली पण त्याच जाणिवेसरशी पुन्हा एक विचारांचं वादळ निर्माण झालं. भुकेची जाणीव विसरून ती पुन्हा विचारांच्या गर्दीत हरवली.
आपल्या आजच्या स्थितीला नक्की जबाबदार कोण? आपण स्वतः की परिस्थिती?
फुग्यात हवा भरलेली असताना किमान तो वार्याच्या दिशेने आणि त्याच्याच गतीने पुढे सरकतो पण दाबून भरलेली हवा जेव्हा अचानक सोडून देण्यात येते तेव्हा त्याचं त्याच्यावरही नियंत्रण राहत नाही आणि बाजूची हवाही त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. ना कोणती गती तो प्राप्त करू शकतो. अधांतरी असंबद्ध हालचाली करत सरतेशेवटी खाली पडतो!
वयाच्या चोवीस वर्षापर्यंत संस्काराच्या आणि चालीरीतीच्या पागड्याखाली वाढलेली ती, वैद्यकीय सेवा सुरू करत जेव्हा मुंबईसारख्या मायानगरीत आली तेव्हा तिला मुक्त श्वास घेऊ शकतो आपण असं वाटायला लागलं होतं पण मोकळा श्वास घेणं वेगळं, हा मोकळा श्वास स्वैराचार कधी झाला हे तीचं तिलाच कळालं नाही!
या मायानगरीत पाऊल ठेवलं तेव्हा कसे होतो आपण? निरागस आणि सालस! हुशार… मेरिट स्टुडंट्! पण सगळं कसं बदलत गेलं? परिस्थिती आणि आपणही….
जे निरागस, निर्मळ मन घेऊन आपण इथे आलो होतो तेच निरागस मन आहे का आता?
पुन्हा ती विचारत हरवली.
सगळं सगळं मिळालं होत आता. डॉक्टर म्हणून मान होता. शासकीय नोकरी, पैसा सगळंच होतं. कमी होती ती फक्त एका रेलेशनशिपची!
इतर मैत्रिणीसारखं आपलाही कोणी प्रियकर असावा असं तिलाही का वाटू नये? ज्यानं मला समजून घ्यावं… माझे लाड पुरवावेत… माझा रुसवा काढावा… असंच असतं ना प्रेम? होय, असंच असतं!
तो तसा एक आलाही आयुष्यात पण… पण… असं सिनेमात दाखवतात तसं काहीच नव्हतं!
मग… पुढे काय…? पुढे ब्रेकअप!
व्यसन कोणतंही असो वाईटच! मग ते आम्ली पदार्थांचं असो किंवा व्यक्तिचं. नशा चढते आणि उतरल्यावर हँगओव्हर निश्चित!
आणि मग हँगओव्हरच्या डोकेदुखीपेक्षा नशा बरी वाटायला लागते!
आजवर ढिगाने रिलेशनशिप झाल्या होत्या पण सगळ्या चुकार ठरत गेल्या. अर्थातच दोष पार्टनरचाच!
कुणी कधी समजूनच घेतलं नाही.
त्यांना कळायला नको? त्यांनी तिच्या मनातलं ओळखायला नको? तिने शब्दात कशाला सांगायला हवंय सगळं? आणि ती चिडली की काहीही बोलणारच. अगदी जीव देईलपासून जीव घेईलपर्यंत सगळं…. आदळआपट होणार…. मग? त्यांनी समजून घ्यायला हवंय.
यासाठीच तर हक्काचे पार्टनर असतात. नाही म्हणायला अनेकांनी जुळवून घेतलंही पण तिला अनलिमिटेड डेटाप्रमाणे अनलिमिटेड टॉलरन्स असलेला पार्टनर हवा होता. यालाच तर प्रेम म्हणतात!
ती कशीही वागली त्याच्याबरोबर तरी तिला न सोडणारा पार्टनर तिला हवा होता. नाहीच तसा कोणी भेटला तिला!
आणि काही दिवसानंतर… शोध संपला एकदाचा!
किती छान होता तो…! देखणा, रुबाबदार… राजबिंडा म्हणतात तो तसा… आणि समजदार सुद्धा!
त्याचे लाघवी शब्द, मधाळ आवाज, नजरेत जादू आणि त्याच्या दिलखेच अदा… शायराना अंदाज!
हेच हेच सगळं हवं होतं तिलाही. त्यानेही तिची नस अचूक ओळखली होती! तिला फक्त आश्वासकता हवी होती. तीही त्याने दिली.
सकाळ-संध्याकाळ त्याच्या शायरीची उधळण… बस्स! अजून काय हवं?
आपल्याला सावरणारा, आपल्या वेडेपणातही साथ न सोडणारा पार्टनर हवाय! पार्टनरपेक्षा सोय हवी. साथीच्या व्यसनाची!
त्याच्या अदांनी, शब्दांनी तिचं मन जिंकलं होतंच. आता फक्त त्याच्या प्रेमात तिला चिंब भिजायचं होतं.
त्याची एकच अट होती. तिला जे हवं ते मिळणार होतं. तिला तो कधी सोडूनही जाणार नव्हता पण त्यालाही बरंच काही हवं होतं.
ती हो म्हणाली…
ती त्याला पैसे देऊ लागली. कधी मित्रांसाठी, कधी बिझनेससाठी, कधी पार्ट्यासाठी! बर्याचदा ड्रिंक्स होऊ लागलं. तिला नको असून सुद्धा. त्याच्या अवैध गोष्टी तिच्या कपाटात लपवल्या जाऊ लागल्या आणि तिच्या अनेक प्रश्नांना उत्तरादाखल फक्त एक दीर्घ चुंबन आणि विषय संपला!
जेव्हा देण्यासारखं काही उरलंच नाही तेव्हा तो गायब. अगदी कायमचा!
त्यानं फसवलं मला…
पण खरंच तिला फसवलं होतं तिच्याच प्रेम आणि रोमान्सच्या चुकीच्या संकल्पनेनं…
नक्की काय चुकलं माझं?
खरंतर साथ प्रत्येकाला हवी असते. भावनिक आधार हवा असतो. दमल्यावर विसाव्यासाठी एक हक्काचा खांदा हवा असतो. प्रेमाचे दोन शब्द हवे असतात पण कशासाठी? त्या प्रेमाच्या अन् सहवासाच्या उबेत ताजंतवानं होऊन पुन्हा आयुष्यातले लढे देण्यासाठी! पण अशी साथ तिला हवी होती का?
नाहीच….!
कोणी दिलेला हात धरायचा होता की त्याचा चावा घेऊ पहायचं होता? कोणी हक्काचा खांदा दिल्यावर त्याच्या डोक्यावर बसू पहायचं होत? मायेचे बंध हवे होते की त्याला बंधनात ठेवायचं होतं? तिच्याच असंख्य प्रश्नांची उत्तरं आज तिच्याकडे नव्हती!
आज तिच्याजवळ केवळ उत्तरं नसलेले प्रश्न होते… आधारच लगिरं झालं तरच नातं गोजिरं होतं…
साथ सोडण्याचं वचन केवळ चौघे देतात. आईवडील… बर्न आऊट होण्याचं अनुभव नसलेले प्रेमवीर… आणि लांडगे…
आत्मसन्मान जिवंत असलेला व्यक्ती कधीही नाटकी प्रेमाचा पोरखेळ सहन करत नसतो…
त्यामुळे साथ मागणं वेगळं आणि एखाद्याच्या उरावर बसणं वेगळं… नात्यात विसावा घेणं वेगळं आणि नातं ओलीस धरणं वेगळं…
त्यामुळे नात्यात घेण्या बरोबर देणंही आलं. त्यामुळे नात्यात प्रेम, आनंद आणि भावनिक व्यवस्थापन असायला हवं आणि ते आपल्यापासून सुरू व्हायला हवं.
उत्तरं तिची तिलाच मिळत गेली आणि एक नवीन प्रवास सुरू झाला.
नात्यांचा पोरखेळ नसलेला…!
सायली कस्तुरे
पुणे
9405075222
खूपच वास्तववादी लेख ताई
छान