इन्सान ढुंढने मै चला…

इन्सान ढुंढने मै चला...

माणूस हा जगाच्या पाठीवर एकच असा प्राणी आहे, ज्याला वाटतं आपण सगळं काही करु शकतो. आपण अख्ख्या जगावर नियंत्रण ठेवू शकतो, एवढा तो महत्त्वाकांक्षी होत चालला आहे. बटन दाबताच त्याला सर्व कसं समोर हजर पाहिजे असतं. सगळ्या यंत्रणांंचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असावं अशीच त्याची अपेक्षा असते. सर्वांनी आपलंच ऐकून घ्यावं, असा त्याचा सतत आग्रह असतो!

दुर्दैवानं हा माणूस इतर मनुष्यप्राण्यांचं म्हणजे आपल्याच बांधवांचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसतो. त्यामुळे माणसातलं मनुष्यत्व कुठं हरवत तर चाललं नाही ना? असा प्रश्न आपसूकच उपस्थित होतो!
माणूस चंद्रावर पोहचला. मंगळावरही त्यानं यशस्वी स्वारी केली. तेथील जीवसृष्टीचा शोध घेणं आजही सुरूच आहे. तसेच अंतराळात आणखी कुठं कुठं जीवन अस्तित्वात आहे का? यासाठी सुद्धा त्याची अविरतपणे धडपड सुरुच आहे. मात्र स्वतःच्या अमूल्य जीवनाचं सौख्यच तो आज हरवून बसला आहे ही खरंतर आजची शोकांतिका आहे! अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. दुर्दैवाने या मूलभूत गरजाही ज्यांच्या पूर्ण होऊ शकत नाहीत अशा लोकांची संख्या आज जगात खूप मोठी आहे आणि ती वाढतच आहे. याउलट गरज नसतानाही अत्याधुनिक सुख सुविधांंचा उपभोग अनेकांच्या नशिबी येतो, एवढी भीषण विषमता आज दिसून येत आहे!
दररोज भल्या सकाळी उठल्यावर आपण काय बघतो…? कुणी सहज फेरफटका मारायला बाहेर पडतात, कुणी आपल्या आरोग्यासाठी व्यायाम करताना दिसतात तर कुणी आपल्या कामावर जाण्याच्या घाईत असतो. कुणी आपली कुत्री फिरवण्यात मग्न असतात तर कुणी आपली महागडी गाडी घेऊन ‘लाँग ड्राईव्ह’साठी बाहेर पडलेले दिसतात आणि ज्यांचं हातावर पोट असतं, ते काही काम मिळतं का? म्हणून मजूर अड्ड्यावर हवालदिल होऊन मोठ्या आशेनं आशाळभूत नजरेनं आपल्याकडे बघत उभे असतात! कुणी कचर्‍याच्या ढिगार्‍यावर काही ‘मौल्यवान वस्तू’ हाती लागते का याचा शोध घेत असतात. ‘त्या’ कर्त्याकरवित्याने बनवलेली अशी निरनिराळ्या माणसांची विविध रुपे रोजच आपल्या बघण्यात येतात.
एक किस्सा येथे आवर्जून नमूद करावासा वाटतो. परगावाहून निघालेला एक वाटसरू एका मोठ्या नगरात पोहचतो. खूप तहान लागल्यामुळे तो समोरच दिसणार्‍या एका हवेलीत शिरतो. तेथे त्याला दिवानखाण्यात आरामात बसलेले एक शेठजी दिसतात. मग तो वाटसरू मोठ्या आशेनं त्यांना म्हणतो,
‘‘शेठजी थोडं पाणी मिळेल का? खूप तहान लागलीय हो…’’
तेव्हा शेठजी त्याला आपल्याच तोर्‍यात उत्तर देतात,
‘‘अरे बाबा सध्या माणूस नाही इथं… जा जरा वेळानं ये!’’
अधीरतेनं वाटसरू विनंती करतो, ‘‘शेठजी, थोड्या वेळासाठी तुम्हीच माणूस बनून मला पाणी द्या ना… बघा जमतं का तुम्हाला माणूस बनायला!’’

या किस्स्यावरुन असं दिसून येतं, आज ‘माणूस बनणं’ किती अवघड झालं आहे! मानव हाच जणू यंत्रमानव झाला आहे. त्याला ना मन आहे, ना भावना आहे!
मेरे शहर मे खूदा की कमी नही यारो।
दिक्कत मुझे इन्सान ढुंढने मे हो रही है…!

अशीच सर्वसाधारण परिस्थिती आज सर्वत्र बघायला मिळत आहे. संकटात सापडलेल्या कुणाला काही मदत करणं तर दूरच, त्याच्याकडे बघायला सुद्धा आज लोकांजवळ वेळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही ‘वेळ’ का आली? हा संशोधनाचा विषय निश्चितच नाही तर तो सर्वांसाठी आत्मचिंतनाचा विषय झाला आहे हे कुणीही मान्य करेल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या एका भजनात म्हणतात…
माणूस द्या मज माणूस द्या…
ही भीक मागता प्रभू दिसला!
लोक दर्शना जाती…
देव दिसावा म्हणूनिया
तर देव बोले मज माणूस न दिसे
अजब तमाशा हा कसला?
माणूस द्या मज माणूस द्या!
हृदयाचा जो सरळ असे…
सर्वांवरी जो प्रेम करी
कुटील नको असला तसला!
माणूस द्या मज माणूस द्या!

आज आपल्याला जिकडे जावं तिकडे सर्वत्र गर्दीच गर्दी दिसते. एवढ्या प्रचंड गर्दीत पायाला जणू भिंगरी लागल्यासारखे लोक यंत्रवतपणे ये-जा करत असतात. मध्येच कुठं कुणाचा अपघात झाला किंवा कुणाचं पाकीट मारलं गेलं तरी त्याकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष केलं जातं कारण कुणाला कुणाशी काही घेणंदेणं नसतंच. माणूस म्हणून जगताना लोकांमध्ये निर्ढावलेपणा अंगी भिनत चालला आहे, हे दुर्दैवच! एवढ्या मोठ्या विश्वाच्या पसार्‍यात सरळ साधा माणूस मिळणं आज खरंच दुरापस्त झालं आहे का?
-विनोद श्रा. पंचभाई
पुणे
9923797725

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “इन्सान ढुंढने मै चला…”

  1. जयंत कुलकर्णी

    एकवेळ देव मिळेल पण माणूस मिळणे कठीण झाले आहे. जो तो स्वतःमध्येच मग्न आहे. इतरांच्या सुख दुःखाशी त्याला काहीच देणे घेणे राहिले नाही. पंचभाईंचा लेख आवडला.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा