स्वकर्तुत्वाने सन्मान मिळवताना – शिरीष चिटणीस

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या लिखाणात म्हटलेय, “माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून माझा भाऊ सहा महिन्यांचा असताना आईच्या अंगाखाली चिरडून झोपेत कधी मेला ते कळलेच नाही. त्याला पाजीत असताना आईला गाढ झोप लागून मुलाचा दम कोंडून सकाळी तो मेलेला आढळला! मग त्या एकांताला आणि आईच्या हालाला कोण सीमा असणार!”

हा प्रकार १८७०-७१ मधील! त्यांच्या आईला एकंदर वीस मुले झाली. (एक खंडीभर अशी म्हण आहे) त्यापैकी एकावेळी पाचाहून जास्त केव्हाच नव्हती. याचा अर्थ निदान १५ तरी मुलांचा शोक आईला करावा लागला. त्यांची आई अतिशय प्रेमळ होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे लिहून ठेवले कारण त्या काळात घरचे काम सासुरवासामुळे इतके पडे की त्याचा हा हृदयद्रावक परिणाम होता. महिला इतक्या थकायच्या की अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागायची. झोपेमध्ये मुलगा अंगाखाली आलेला त्या माउलीला समजलेच नाही. या काळात रामजी शिंदे सरकारी नोकरीत होते. पैसा-अडका, सोने-नाणे भरपूर होते पण रूढी परंपरांनी भारतीय समाज ग्रासला होता. महिलांना शिक्षण मिळत नव्हते. शिकण्यास बंदी होती पण याच काळात महात्मा जोतिबा फुले यांनी १८४८ मध्ये पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या शाळेत अस्पृश्यांच्या मुलीही शिकत असत. स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा तत्कालीन समाजाच्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा होता. त्यामुळे जोतिबांच्या कार्याला चोहोबाजूंनी फार मोठा विरोध झाला पण कितीही संकटे कोसळली तरी आपल्या निश्चयापासून ढळायचे नाही, असा निर्धारच त्यांनी केला होता. त्यांच्या शाळेत स्वतः जोतिबा फुले शिक्षक म्हणून काम करीत होते. तथापि अस्पृश्य मुली शिकत असलेल्या शाळेत काम करण्यासाठी त्यांना दुसरा शिक्षकही मिळेना तेव्हा जोतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वतः घरी लिहिण्या-वाचण्यास शिकविले. नंतर त्यांचीच शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक केली. त्यांना पहिल्या ‘भारतीय शिक्षिका‌’ म्हणता येईल.

अग्निदिव्य

विठ्ठल रामजी शिंदे यांची बहीण जनाक्का यांचा जन्म १८४८चा. पहिली मुलगी असल्याने घरात सर्वांची लाडकी. जास्त लाडकी त्यांच्या वडिलांची. जमखंडी येथे त्यांचे शिक्षण चौथ्या इयत्तेपर्यंत झालेले होते. जनाक्का शिंदे यांचे वडील रामजी शिंदे यांचे शिक्षण मुलकी परीक्षा पास झाले होते. रामजी शिंदे फुले पोहोचविण्यासाठी दप्तरदार नावाच्या गृहस्थांच्या घरी जात पण त्यांची लहान मुले ओसरीवर अभ्यासास बसलेली असत. त्यांच्याबरोबर तेही बसत आणि अभ्यास करीत. वडिलांना न सांगताच ते त्या मुलांबरोबर शाळेत जाऊ लागले पण फुले पोहोचवण्याच्या कामात खंड पडू लागल्याने तक्रारी रामजी शिंदे यांच्या वडिलांपर्यंत गेल्या आणि रामजी शिंदे यांना शाळेत जात असल्याचे खरे कारण सांगावे लागले. त्यांच्या वडिलांनी रामजी शिंदे यांची खरडपट्टी काढली आणि रामजी शिंदे यांना म्हणाले, “शाळेत जाण्यास तू काही ब्राह्मणाचा मुलगा थोडीच आहेस? मराठ्याच्या मुलाला शाळा शिकून काय करायची?”

पण अखेरीस रामजी शिंदे यांनी आपला हेका पूर्ण करून शिक्षण घेतले. रामजी शिंदे यांच्या शिक्षणामुळे विठ्ठल शदे, जनाक्का शिंदे व इतर भावंडांचे शिक्षण झाले. रामजी शिंदे यांचे वाचन पुष्कळ असल्याने त्या काळात म्हणजे साधारणतः १८६५ पासूनच जातीभेदांबाबत ते उदार धोरण स्वीकारत. म्हणूनच त्यांच्या मित्र-परिवारात ब्राह्मणापासून ते महारापर्यंतचे लोक असत. अगदी जैन, लगायत, ब्राह्मण, मराठा, मागासवर्गीय असे एकत्रपणे जेवण करीत. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या लग्नाबरोबरच जनाक्का यांचे लग्न झाले. रामजी शिंदे यांचे मित्र गोपाळराव यांचे सुपुत्र कृष्णराव कामते यांच्याशी जनाक्का यांचे लग्न वयाच्या पाचव्या वर्षी झाले. त्यावेळी विठ्ठल रामजी शिंदे आणि कृष्णराव कामते यांचे वय दहा वर्षाचे होते. कृष्णाराव कामते शिकले नाहीत पण माहेरीच जनाक्का बारा वर्षापर्यंत शिकल्या आणि त्यानंतर सासरी गेल्या. जनाक्का यांचे सासू-सासरे आणि सर्वजण कौतुक करीत पण त्या घरात एक व्यक्ती अशी होती की, जिला जनक्काच्या स्तुतीची चीड येई, मत्सर करी. ती म्हणजे त्यांचे पती कृष्णराव! कृष्णराव यांच्या आग्रहामुळे, त्रासामुळे जनक्काला माहेरी पाठवण्यात आले. तिची कर्मकहाणी बघून विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या बहिणीला सासरी न पाठवता पुण्यात शिक्षणासाठी नेले. पुण्यासारख्या शहरात तर त्यावेळी मराठी तिसऱ्या इयत्तेपासून इंग्रजीत सुरुवात केली जाई पण जनाक्का यांचे गणित आणि भाषा विषय बरे असल्याने त्यांनी पुण्यात तिसऱ्या इयत्तेपासूनच अभ्यासास सुरुवात केली. गरिबी असल्यामुळे जनाक्का यांच्या शिक्षणाची मोफत कुठे सोय होईल इकडे विठ्ठल रामजी शिंदे पाहत होते. त्याकाळी सदाशिव पेठ चिमण्या गणपती जवळ ख्रिस्ती मिशनची मुलींची शाळा होती. ही शाळा अमेरिकन मिशनच्या खर्चाने चालत असल्याने शाळा अधिकारी शिक्षणाच्या नावाखाली अनाथ स्त्रियांना त्यांच्या आपतप्रसंगी मदत केल्याचा देखावा करून त्यांना ख्रिस्ती धर्माच्या कळपात ओढीत. या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर शिक्षण प्रसाराऐवजी धर्मप्रसाराचे स्त्रोत या शाळेत असल्याचे जनाक्का शिंदे यांच्या अनुभवास आले. हा प्रकार विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ध्यानात येताच त्यांनी जनाक्का यांना सहा महिन्यानंतर या शाळेतून काढून टाकले. सदाशिव पेठ येथील ख्रिस्ती मिशनच्या शाळेत जाण्यापूर्वी ‘शारदा सदन‌’ या संस्थेत जनाक्का यांना शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता पण या संस्थेत सुट्टीमध्ये मुलींना घरी जाण्यास मोकळीक न देता ती सुट्टी संस्थेत घालवावी लागे.

“विद्याखात्याच्या नियमाप्रमाणे मुलीला सुट्टी मिळणे अगदी वाजवी आहे. मुलीच्या हिताची काळजी संस्थेइतकीच तिच्या पालकांनाही असते. तुमच्या शिक्षणाने माझी बहीण आपखुशीने व अक्कल हुशारीने ख्रिस्ती होऊ लागल्यास निदान मी तरी अडथळा आणणार नाही पण तिच्यावर तिच्या नकळत भुलभुलवणाने जर ख्रिस्ती धर्माची सक्ती होऊ लागली तर ते मात्र मी कधीही सहन करणार नाही,” असे विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले.
शारदा सदनात जनाक्का शिंदे यांना घालण्याचा प्रश्न निकालात निघाला. सदाशिव पेठेतल्या शाळेतून काढल्यावर हगणे येथे नुकत्याच स्थापन झालेल्या ‘अनाथ बालिकाश्रमा‌’त जनाक्का शिंदे यांना घालण्याचा प्रयत्न विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला पण संस्थेचे चालक प्रोफेसर धोंडोपंत कर्वे यांनी “ब्राह्मणेतर मुलींना या आश्रमात घेण्याचा काळ नाही” असे त्या काळात अडचणींमुळे सांगितले. अखेरीस विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुधोळ संस्थानातर्फे दरमहा दहा रुपये स्कॉलरशिप जनाक्का शिंदे यांना मिळवून देण्यात यश मिळाले आणि त्यांना हुजूरपाग शाळेमध्ये दाखल करण्यात आले. या शाळेतही पालकांची संमती आवश्यक होती आणि त्यांचे पतीच कायदेशीर पालक ठरत असल्याने संमती दाखल्यावर त्यांच्या सहीची जरुरी होती पण त्यांनी ती नाकारली. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका मिसहरफर्ड या युरोपियन बाई आणि शिक्षिका मिस मेरी भोर यांना विठ्ठल रामजी शिंदे यांनी जनक्काची कर्मकथा सांगितल्यावर तसेच विठ्ठल रामजी शिंदे यांची स्त्री शिक्षणाची उत्कटता, त्यांनी रूढाचाराविरुद्ध जनाक्का यांना माहेरी ठेवून घेण्यात दाखवलेले अपूर्व धाडस आणि त्यांची सुधारक मते प्रत्यक्षात आचरून दाखवण्याची आंतरिक तळमळ लक्षात घेऊन जनाबाईंना माहेरचे नाव लावण्यास सांगून जनाक्का रामजी शिंदे या नावाने १८९६-९७ साली पुन्हा शिक्षण चालू झाले. त्यांना हे नाव लागले ते कायमचेच. विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन समाज व अस्पृश्य समाजासाठी जे काम उभे केले त्यात जनाक्का शिंदे यांचाही मोठा सहभाग होता पण त्यांना हे शिक्षण मिळाल्यामुळेच घडले. सावित्रीबाई फुले यांच्यानंतर शिक्षणासाठी योगदान देण्यामध्ये जनाक्का यांचेही योगदान महत्त्वाचे.

मुंबईहून पुण्यात शारदा सदनामध्ये आलेल्या गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविधवा वेणू या मामे-बहिणीला दाखल केले होते. वास्तविक पंडिता रमाबाई यांचे धर्मांतर आगरकर यांना पसंत नव्हते पण तरीही पंडिता रमाबाई यांची देशाशी, देशाच्या प्रश्नांशी, मराठी माणसांशी, स्त्रियांच्या विविध प्रश्न आणि विकासाशी बांधिलकी त्यांना महत्त्वाची वाटली. आगरकर शारदा सदनचे उत्साही पाठीराखे बनले. शारदा सदनमधील मुलींवर ख्रिस्ती धर्माकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जातात, अशा माहितीमुळे ते अस्वस्थ झाले. धीर धरून विचारांती आगरकर यांनी पंडिता रमाबाई यांना पत्र लिहिले आणि विचारणा केली. न्यायी असणारे आगरकर यांना मात्र “यापुढे मुली धर्मांतर करणारच नाहीत अशी मी हमी देत नाही,” असे पंडिताबाईंनी कळवले. “मी माझ्या धर्माप्रमाणे प्रार्थना करणार आणि तिथे मुलींनी येऊ नये असे म्हणणार नाही तसेच ख्रिस्ती धर्माविषयी कोणी इच्छा दर्शविल्यास त्यांना माहिती देणारच” असेही सांगितले.


सदनातल्या मुलींचे वय, त्यापैकी बहुतेकीचं निराधार असणं आणि आश्रयदात्यांविषयी आत्मियता व कृतज्ञता वाटणं याचा विचार करता पंडिताबाईंची भूमिका अयोग्य वाटल्याने त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ज्याप्रमाणे जनाक्का शिंदे यांना शारदा सदनातून काढले तसेच आगरकरांनी आपली मामेबहीण वेण्ुाला शारदा सदन येथून काढून हुजूरपाग या ख्रिस्ती मुख्याध्यापिकेच्या तसेच अनेक ब्रिटिशा अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरू झालेल्या शाळेमध्ये शिकायला पाठवले. सव्वाशे वर्षांपूर्वी मुलींना शिक्षणासाठी किती यातायात करावी लागत होती हे या प्रसंगावरून लक्षात येते.

१८८९ सालची घटना. ज्यावेळी रवीन्द्रनाथ टागोर हे बंगाली साहित्यातील उगवते, तळपते सूर्य होते. प्रतिभासंपन्न अठ्ठावीस वर्षाचे हे व्यक्तिमत्त्व यासाली पुण्यात आले होते. पुण्यात एका सभेला पंडिता रमाबाईंचे भाषण ऐकण्यास ते गेले असताना पंडिता रमाबाईंनी स्त्री-पुरुष समानतेचा विषय घेऊनच सुरुवात केल्यावर सनातन मंडळींनी ताबडतोब सभा उधळून लावली. यानंतर रमाबाईंनी स्त्री पुरुष समानतेचा जो मुद्दा मांडण्यास सुरुवात केली त्यावर रवीन्द्रनाथ टागोर यांनी एक लांबलचक पत्र ‘भारती‌’ मासिकाकडे पाठविले, जे बंगाली भाषेत होते आणि निनावी होते. हे पत्र त्यांच्याच बहिणीने अक्षरावरून आणि भाषेवरून ओळखले. ते पत्र रवीन्द्र रचनावलीच्या सहाव्या खंडात समाविष्ट आहे. या पत्राच्या मराठी अनुवादाचा काही भाग असा आहे.
“स्त्रिया रुपाच्या बाबतीत व हृदयातील कोमल भावनांच्या बाबतीत पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात पण त्यावर त्यांच्यात पुरुषांचेही सर्व गुण बरोबरीचे असले तर मग या मानव समाजात आपली काय प्रतिष्ठा राहिली? स्त्री शिक्षणाची आवश्यकता पटवून देताना स्त्रियांची व पुरुषांची बुद्धी समान प्रतीचे असते असे विधान इतक्या आक्रमकतेने ठासून करण्याची गरज नाही. स्त्रियांमध्ये ऊर्जा असते. स्त्रियांमध्ये प्रतिभा कुठेच दिसत नाही याचं कारण हे की प्रतिभा ही एक प्रकारची ऊर्जा असते. तिच्यासाठी खूप शक्ती लागते आणि ही सगळी शक्ती शरीरातून खर्च होते. त्यामुळे स्त्रियांमध्ये एक प्रकारची ग्रहणशक्ती असली तरी सृजनशक्तिची ताकद नसते. मेंदूमध्ये फक्त बुद्धी असून चालत नाही त्याबरोबर मेंदूचे बळही असावे लागते. स्त्रियांनी घराबाहेरची कामे करू नयेत अशी योजना निसर्गानेच करून ठेवलेली दिसते. स्वामीभक्ती धर्म मानला तर मनात हीनतेची भावना येत नाही. साध्वी पत्नीशी एखाद्या पुरुषाने पशुवत आचरण केले तर त्यामुळे पत्नीची थोरवीच वाढते पण एखाद्या इंग्रजांनी पंख्याची दोरी ओढणाऱ्या नोकऱ्याला लाथ मारली तर त्याची थोरवी वाढत नाही कारण रमाबाई म्हणतात की स्त्रियाही पुरुषांची कामे करू शकतात. स्त्रियांना जर गर्भधारणा व बालसंगोपन करावे लागले नाही तर त्याही पुरुषांची अनेक कामे करू शकतील पण हा जो जर आहे तर ते मिटवून जमिनीत गाडून टाकणे रमाबाईंना कवा कुठल्याही विद्रोही महिलेला शक्य नाही. त्यामुळे असे उल्लेख करणे हा निव्वळ वाचाळपणा.”
ज्या काळात त्यांनी हे पत्र लिहिले त्या काळात त्यांची बहीण कर्तृत्ववान यशस्वी संपादिका, लेखिका, कादंबरीकार आणि शिवाय स्वतःच्या मुलाबाळांसकट पती श्री. जानकीनाथ घोषाल यांचा विस्तृत परिवार समर्थपणे सांभाळणारी गृहिणी. भारती मासिक जेव्हा १८७७ साली रवीन्द्रनाथ टागोर यांच्या वाड्यातून प्रकाशित होत होते त्यावेळी त्यांचे भाऊ ज्योतीरिद्रनाथ व त्यांच्या पत्नी कादंबरीदेवी याच सांभाळत असत. या त्यांच्या वहिनी कल्पक व अभिरुचीसंपन्न होत्या. स्त्री स्वातंत्र्यविरोधी मत मांडणाऱ्या रवीन्द्रनाथ टागोर यांनी पुढील काळात आपल्या या शोकसंपन्न अवस्थेला विचारमग्नतेने मोकळी वाट करून दिली. निसर्गाचे व ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण करीत निसर्गाचे अलौकिक रूप आणि ग्रामीण जीवनातलं कठोर वास्तव बघून आजकालचे ठरलेल्या कथा-कविता-गीते रचली. उदार व वैश्विक विशुद्ध अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी मनोनिग्रहाने चित्तशुद्धीची साधना करून समाजासाठी साहित्यनिर्मिती केली. आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये बदल घडवून आणला. स्त्री स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले.
अशा प्रकारच्या बदलाने आज एकविसाव्या शतकात बऱ्याच क्षेत्रात स्वतंत्रपणे, ठामपणे उभे राहून पुरुषाबरोबर देशाच्या विकासामध्ये आघाडीवर आहे. महिलांसाठी शिक्षणाचे दार खेडोपाडी खुले झाले आहे. परिस्थितीला सामोरे जात आत्मविश्वासाने स्त्रीने स्वतःचा सन्मान स्वकर्तृत्वाने मिळवला आहे.

– शिरीष चिटणीस

पूर्वप्रसिद्धी – साहित्य चपराक मार्च २०२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा