आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद

आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. निरनिराळ्या भाषा आणि संस्कृतींचा सुंदर मिलाफ आपल्या देशातील अनेक राज्यात बघायला मिळतो. असंख्य थोर संत महंतांची परंपरा आपल्याला लाभल्यामुळे लौकिकार्थाने भारतभूमी पावन झाली आहे! अनेक शूरवीर, लढवय्ये, राजे महाराजे यांच्या पराक्रमामुळे जगभरात आपल्या देशाची ख्याती पसरली आहे.

कलिंगाच्या युध्दात भयंकर रक्तपात आणि प्राणहानी झाल्यानंतर पश्चात्तापदग्ध झालेला व नंतर शांतीसाठी बौध्द धर्माचा प्रसार करणारा बलशाली सम्राट अशोक आपल्या देशात होऊन गेल्याचं उदाहरण आहे. मोगल सम्राट जलालुद्दीन अकबराला यशस्वीपणे टक्कर देणारा आणि इतर राजपूत राजांनी अकबराचं मांडलिकत्व पत्करण्याचं धोरण अवलंबलं तेव्हा एकट्याच्या बळावर मेवाडसह अख्ख्या राजपुतान्याचं रक्षण करणारा महाप्रतापी राणाप्रताप सुध्दा आपल्याकडेच होऊन गेला. तसेच अक्षरश: शुन्यातून हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघणारे आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज नावाचे युगपुरुष याच पवित्र भूमीत होऊन गेले!

अशाप्रकारची महान परंपरा लाभलेला आपला देश कालांतराने, इंग्रजांच्या आगमनानंतर गुलामगिरीत जखडला गेला. त्यावेळी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक महापुरुषांनी निकराचे प्रयत्न केले. कित्येक लढे उभारले गेले. चळवळी झाल्या, सत्याग्रह झाले. इंग्रजांच्या विरोधात देशभर जनसागर पेटून उठला. त्यांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी आपल्या असंख्य देशबांधवांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली. कित्येकांनी प्राणांची आहुती दिली! सशस्त्र क्रांतीची ठिणगी भडकली आणि आपल्या जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी लढणारे नीडर क्रांतिकारक उदयास येऊ लागले. क्रांतिकारक हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर नावे येतात ती हसत हसत फाशीचा दोर आपल्या गळ्यात अडकवणारे महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची! त्याचप्रमाणे क्रांतीची मशाल अखंडपणे धगधगत ठेवणारे क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंग्रा, अश्फाक उल्ला खान, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, शंकर महाले इत्यादी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान भारतवासी कदापि विसरू शकणार नाही. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान देऊन ते येणाऱ्या पिढ्यांंसाठी प्रेरणास्रोत ठरले! १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीही आपल्या देशात अनेक सशस्त्र उठाव झालेत. अशा प्रेरणादायी सशस्त्र उठावांसाठी क्रांतीची मशाल पेटवणारे आद्य क्रांतिगुरू ठरले होते… लहुजी वस्ताद साळवे! त्यांच्या आखाड्यातील तालमीत कितीतरी क्रांतिकारक युध्दकलेचं शिक्षण घेऊन तयार झाले. त्यामुळे खर्या अर्थाने लहुजी वस्ताद ‘किंगमेकर’ ठरले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांवर स्वराज्यातील पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच लहुजी वस्ताद यांनी वेळप्रसंगी गनिमी कावा वापरून आपल्या शिष्यांना शस्त्रविद्या शिकवली. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्रांतिकारकांना शस्त्रं पुरवून मदत केली, अगदी तशा प्रकारचेच अद् भूत कार्य लहुजी वस्ताद यांनी त्यांच्या शंभर वर्षे आधी केले होते. त्यामुळेच ते आद्य क्रांतिगुरू ठरले!

लहुजी वस्ताद यांचे पूर्ण नाव लहुजी राघोजी साळवे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या खेडेगावात झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचे नाव राघोजी. लहुजींनी आपले वडील राघोजीबाबांकडून शस्त्रविद्या शिकून घेतली. त्याचप्रमाणे कुस्ती, मल्लखांब, दांडपट्टा चालवणे यातही ते लवकरच तरबेज झाले. त्यामुळे बालपणापासूनच त्यांची शरीरयष्टी मजबूत आणि बांधेसूद होती. ते दिसायला गव्हाळवर्णी होते. त्यांच्या धारदार डोळ्यात समोरच्याचा वेध घ्यायची चमक असायची. हळूहळू राघोजीबाबांकडून लहुजींनी लढाईच्या वेळी वापरात येणार्या शस्त्रांची माहिती करून घेतली. त्यामुळे त्यांच्या स्वभावात एकप्रकारचा करारीपणा आला होता. भित्रेपणाचा लवलेशही त्यांच्या ठायी नव्हता. नंतर काही दिवसातच लहुजी घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे यात पारंगत झाले. ते आपल्या वडिलांसोबत पुरंदर किल्ला पालथा घालायचे. कधीकधी घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात सुध्दा जायचे. तेथे त्यांना हिंस्र श्वापदे दिसायची. राघोजीबाबा सोबत असल्यामुळे ते निर्भय असायचे. काही दिवसातच लहुजींनी जंगली प्राण्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याचं कसब आपल्या वडिलांकडून शिकून घेतलं. त्यामुळे त्यांच्यात धीटपणा मुरत गेला. लहुजी धाडसी होते पण त्यांच्या स्वभावात उर्मटपणा नव्हता.

राघोजीबाबांना अवगत असलेली भिंत चढण्याची अत्यंत अवघड कला त्यांनी आपल्या आवडत्या लहुजींना प्रयत्नपूर्वक शिकवली. त्यासाठी भिंतीतील ओबडधोबड पण मजबूत अशा दगडात आपल्या हाताच्या पंंजाची बोटे एखाद्या घोरपडीसारखी घट्टपणे रोवून मग सरड्यासारखं चढून जावं लागायचं. या अतिशय अवघड कलेत स्वतः राघोजीबाबा तरबेज होतेच. ही अत्यंत जोखमीची आणि दुर्मिळ कला शिकताना छोट्या लहुजींची बोटे कधीकधी रक्तानं माखायची! तरीही त्यांनी वेदना सहन करत निर्धारपूर्वक भिंतीवर चढण्याची अवघड कला सराव करून आपल्या वडिलांकडून शिकून घेतली आणि काही दिवसातच लहुजी त्यात तरबेजही झाले.

कालांतराने राघोजीबाबा साळवे आणि लहुजी वस्ताद यांना पेशव्यांच्या दरबारातून बोलावणे आले. त्यावेळी आपल्या देशात इंग्रजांचा अंमल सुरू होता. पुणे आणि आसपासच्या परिसरात पेशव्यांचे राज्य होते. मात्र इंग्रजांच्या कृपेने दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद मिळाले होते त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय पेशव्यांना कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नव्हता. त्यांच्या जुलमी राजवटीपुढे कुचंबणा होत होती. अस्वस्थ झालेल्या पेशव्यांनी आपले विश्वासू व पराक्रमी सेनापती बापू गोखले यांच्यासोबत सल्लामसलत केली आणि त्यांच्या मदतीने गुप्तपणे युध्दाच्या तयारीला लागले. या युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची व शूर, धाडसी सैनिकांचीही गरज होती. त्यावेळी पेशव्यांच्या शस्त्रागारात बर्याच दिवसापासून हजारो शस्त्रे अक्षरशः गंजत, त्यांचा वापर न होता नुसतीच पडून होती! शस्त्रास्त्रांची ही अतिशय जोखमीची जबाबदारी गुप्तपणे कोण सांभाळणार असा विचारविनिमय सुरू असताना पेशवे, बापू गोखले आणि दरबारातील मंडळींच्या नजरेसमोर एकच धाडसी, पराक्रमी नाव पुढे आले… ते म्हणजे राघोजी साळवे! राघोजींच्या पराक्रमामुळे प्रभावित झालेल्या पेशव्यांनी भरलेल्या दरबारात त्यांची शस्त्रागार प्रमुखपदी नियुक्ती केली. मग राघोजींनी वेळ न दवडता लागलीच कामाला सुरुवात केली. लहुजी आणि इतर काही सहकारी सैनिकांच्या मदतीने त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन रात्रंदिवस काम केले. तलवारी, भाले, दांडपट्टे, कट्यारी अशाप्रकारची विविध शस्त्रे अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करून युध्दासाठी तयार केली. ते बघून पेशव्यांनी राघोजीबाबा आणि लहुजींच्या कर्तबगारीवर समाधान व्यक्त केले.

आता शस्त्रास्त्रे तयार होती. मात्र युध्दात प्रत्यक्ष लढणारे शूर सैनिक आणि योद्ध्यांची कमतरता जाणवायला लागली. इंग्रजांना सुगावा लागू न देता सर्व सरदार, मनसबदार युद्ध पातळीवर कामाला लागले. हे युद्ध परकीय शत्रू इंग्रजांच्या विरोधात होते त्यामुळे तेथे धाडसी, पराक्रमी सैन्याशिवाय आपला निभाव लागणार नाही याची जाणीव पेशव्यांसह बापू गोखले आणि राघोजीबाबांनाही होती. त्यासाठी पेशव्यांना वर्दी देऊन राघोजी साळवे, लहुजीसह भोर, पुरंदर या परिसरात गेले. तेथे त्यांनी गुप्तपणे कर्तबगार, लढवय्ये सैनिक गोळा केले. त्यात प्रामुख्याने मातंग, रामोशी, कोळी अन् भिल्ल इत्यादी मागासवर्गीय सैनिकांचा भरणा होता. ही मंडळी राघोजीबाबांच्या जिवाला जीव देणारी, स्वामिनिष्ठ होती. बघता बघता मराठी मुलुखात एकप्रकारचं चैतन्य पसरलं! जवळपास चाळीस हजार सैनिक पुणे परिसरात जमा झाले. यात लहुजी सुध्दा सामील होते. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं तेवीस वर्षे!

युध्दासाठी सैन्याची जमवाजमव पूर्ण झाली होती. आता इंग्रजी सेनेसमोर दोन हात करण्यासाठी आपण सज्ज आहोत असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहर्यावर झळकत होता. अखेर ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकी येथे भीषण युद्धाला सुरूवात झाली. बापू गोखलेंच्या नेतृत्वाखाली मराठी सैनिकांनी संपूर्ण ताकदीनिशी इंग्रजी सेनेवर जोरदार आक्रमण केले. बंदुका, तोफांचा वापर होऊ लागला. राघोजी, लहुजीसह अनेक सरदार आणि सैनिक जिवावर उदार होऊन शत्रू सेनेवर तुटून पडले. मात्र त्यावेळी इंग्रजी सैन्याकडे आधुनिक शस्त्रे होती. त्यांच्यासमोर मराठी सैन्याचा जास्त वेळ टिकाव लागणार नाही अशी चिन्हं दिसू लागली. तरीही सहजासहजी माघार न घेता सेनापतीसह राघोजी निकराने लढत होते. आणि आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तरणेबांड लहुजी जिवावर उदार होऊन पराक्रम गाजवत होते. काही वेळाने अचानक सूं सूं करत बंदुकीची एक गोळी आली आणि बापू गोखले यांच्या घोड्याच्या मानेत घुसली! घोडा कोसळताच त्याचवेळी दुर्दैवानं गोखलेंनी युध्दातून माघार घेतली. त्यामुळे आपला सेनापती पळताना बघून विचलित झालेल्या मराठी सैनिकांची जिकडेतिकडे पळापळ, धावपळ सुरू झाली. नंतर काही क्षणातच दुसरा आघात झाला… पराक्रमी राघोजीबाबा यांचा इंग्रजांच्या बंदुकीने अचूक वेध घेतला. ते बंदुकीच्या गोळीचे शिकार होऊन घोड्यावरून खाली कोसळले! धारातीर्थी पडलेल्या राघोजींना इंग्रजी सैनिकांनी घेरले आणि बंदुकीच्या दस्त्याने ठेचून ठेचून मारले. त्यावेळी लहुजी समोरच थोड्या अंतरावर लढत होते. आपल्या प्राणप्रिय वडिलांच्या मृत्यूचे विदारक दृश्य त्यांना दिसले. ते बघताच त्यांचा संताप अनावर झाला अन् चपळाईने लहुजी वडिलांना मारणार्या इंग्रजी सैनिकांवर तुटून पडले. आपल्या तलवारीने त्यांना लहुजींनी अक्षरशः कापून काढले!

सेनापती पळून गेल्याने आणि राघोजीबाबांच्या बलिदानाने सैनिक सैरभैर झाले होते. शेवटी मराठी सैन्याने माघार घेतली. अतिशय दु:खद अंत:करणाने लहुजी धारातीर्थी पडलेल्या वडिलांजवळ आले. त्यांनी आपल्या धाडसी व पराक्रमी पित्याच्या छातीवर डोकं टेकवलं तेव्हा त्यांना अचानक रडू कोसळलं! मात्र मनावर ताबा ठेवत स्वतःला सावरत त्यांनी अतिशय संयमाने वडिलांचं निर्जीव शरीर आपल्या घोड्यावर ठेवलं आणि ते घराकडे निघाले.
घरी पोहोचल्यावर त्यांना बघताच त्यांच्या आईने, विठाबाईने हंबरडा फोडला! त्या माऊलीचा आक्रोश बघून इतका वेळ संयम राखून असलेल्या लहुजींचाही बांध फुटला. ते रडत रडत आईजवळ गेले आणि तशा स्थितीतही आपल्या मातेचं सांत्वन करू लागले. आपला पराक्रमी पती अचानक सोडून गेल्याचं विठाबाईना तीव्र दु:ख झालं! मात्र त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, त्याचा नक्की बदला घेणार अशी शपथ त्यांनी लहुजीना घ्यायला लावली.

आपल्या सैन्याचा खडकीच्या युध्दात पराभव झाल्याचं कळताच दुसऱ्या बाजीरावाने शनिवारवाडा सोडून पुण्यातून पलायन केलं. पराक्रमी राघोजी साळवे यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं तो दिवस होता १७ नोव्हेंबर १८१७! त्यावेळी इंग्रजांनी शनिवारवाड्यावर पूर्ण ताबा मिळवला होता. दुर्दैवानं मराठी साम्राज्याच्या इतिहासातील १७ नोव्हेंबर १८१७ हा दिवस इतिहासाला काळिमा लावणारा ठरला! छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय मेहनत घेऊन, अतुलनीय शौर्य गाजवून, अफाट कर्तबगारीने उभं केलेलं मराठी साम्राज्य अशाप्रकारे धुळीला मिळालं होतं! इतके दिवस शनिवारवाड्यावरील डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज इंग्रजांनी खाली उतरवला आणि त्याठिकाणी ब्रिटिश सरकारचा युनियन जॅक उभारण्यात आला. आपल्या प्रिय, आदर्श छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आपल्या डोळ्यासमोर लयाला गेल्याचा दु:खद प्रसंग बघण्याचं दुर्भाग्य तमाम मराठी जनतेवर ओढवलं होतं! शनिवारवाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकताना बघून तरण्याबांड लहुजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते अत्यंत उत्तेजित आणि संतप्त झाले अन् त्याचवेळी त्यांनी शपथ घेतली…

“ही ब्रिटिश राजवट उलथवून टाकल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. या शनिवारवाड्यावर पुन्हा भगवा ध्वज फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही!” नंतर आपल्या वडिलांना श्रध्दांजली अर्पण करताना लहुजींनी “मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी!” अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा घेऊन राघोजीबाबांची समाधी उभारली. ही समाधी आजही पुण्यातील वाकडेवाडी येथे अस्तित्वात आहे.

खडकीच्या युध्दाचा लहुजींच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता. त्या घटनेपासून त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यासाठी झोकून दिले. स्वातंत्र्य मिळवणे हाच आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनवून टाकला. स्वातंत्र्य हेच आपल्या आयुष्याचे एकमेव ध्येय ठरवून ते त्यासाठी शेवटपर्यंत झटले! आपल्या पराक्रमी वडिलांच्या बलिदानाचा बदला घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही. या जुलमी, पाताळयंत्री इंग्रजांना आपल्या देशातून कायमचं हुसकावून लावायचंच असा वज्रनिर्धार लहुजींच्या रोमरोमात संचारला होता! त्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावण्याचं ठरवलं. आपला दृढ निर्धार पूर्ण करण्यासाठी लहुजींनी आयुष्यच पणाला लावलं अन् त्यासाठी जन्मभर ब्रह्मचर्य पाळण्याचा कठोर निश्चय त्यांनी केला. नंतर त्यांनी आयुष्यभर अत्यंत निष्ठेने ब्रह्मचर्य पाळलं… स्वातंत्र्यप्राप्ती हाच त्यांच्या जीवनाचा श्वास बनला!

छत्रपती शिवाजी महाराजांना लहुजी वस्ताद आपले आदर्श मानायचे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दर्याखोर्यात राहणार्या शूर मावळ्यांना गोळा केले, त्यांना युध्दकलेचं तंत्र शिकवून त्यांच्यात आत्मविश्वास जागवला आणि त्यानंतर अतुलनीय पराक्रम गाजवून शौर्याने मोगली सत्तेला यशस्वी टक्कर दिली… तसंच धाडसी आणि जबरदस्त नियोजन करण्याचं लहुजींनी ठरवलं! त्यासाठी त्यांनी डोंगरदऱ्यामधील मातंग, रामोशी, भिल्ल, चांभार, महार, कोळी, लोहार तसेच इतर बलुतेदार युवकांना गोळा करण्याचा सपाटा लावला. मग त्यांचं आपल्या पध्दतीनं समुपदेशन करून इंग्रजांच्या विरोधात संपूर्ण सामर्थ्यासह उभं राहण्याचं लहुजींनी ठरवलं. आता माघार घ्यायची नाही, या ब्रिटिश सरकारला उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हे त्यांनी आपल्या तनामनात ठसवून घेतलं!

राघोजीबाबांनी लहुजींना बंदुका चालवण्यात तरबेज केलं होतं. त्यामुळे लहुजी वस्ताद शस्त्रविद्येचे उत्तम जाणकार होते. नंतर त्यांच्या नियोजनानुसार पुण्यातील गंजपेठेत १८२० मध्ये मोठा आखाडा बांधण्यात आला. त्या आखाड्यात दररोज अनेक युवक येऊ लागले. ‘सामर्थ्यवान होऊनच स्वातंत्र्य मिळवता येते’ हा लहुजींचा मंत्र पटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर युवावर्ग भारावल्यासारखा लहुजींच्या तालमीत येण्यासाठी धडपड करू लागला. त्यांना लहुजी स्वतः दांडपट्टा, छडीपट्टा शिकवायचे. तलवारबाजीचे बारकावे, भालाफेक, नेमबाजी, बंदुका चालवणे अतिशय काळजीपूर्वक शिकवायचे. त्याकाळी लहुजींकडे ‘गुदगुदा’ हे विशिष्ट प्रकारचे हत्यार होते. त्याची मूठ
लाकडी, तर टोकावर पोलादी फाळ होते. या फाळाला टोकदार काटे असायचे. त्यांच्याकडे तोफा सोडून सर्व प्रकारची शस्त्रे उपलब्ध होती. हळूहळू लहुजींचा शिष्यवर्ग वाढत गेला. त्यांचं हे जोखीमपूर्ण प्रशिक्षण कार्य अत्यंत गुप्तपणे सुरू होतं. त्यासाठी त्यांनी गुलटेकडी आणि पर्वतीच्या परिसरातील कडेकपारीत जागा निवडली होती. त्यांचे विश्वासू सहकारी डोळ्यात तेल घालून सर्वत्र लक्ष ठेवायचे. त्याठिकाणी येणाऱ्या आपल्या शिष्यांना सुध्दा लहुजी वारंवार सावधानतेच्या सूचना द्यायचे.

त्यांच्या आखाड्यात मातंग, रामोशी युवकांशिवाय सर्वच जातिधर्मातील युवावर्ग येऊ लागला. स्वातंत्र्य लढ्यासाठी जात, धर्म विसरून त्यावेळी एक होणे ही काळाची गरज होती. स्वतः लहुजींना सुध्दा कोण कुठल्या जातीचा आहे यात अजिबात स्वारस्य नव्हते. सगळ्यांना शस्त्रविद्या शिकवणे हाच त्यावेळी त्यांचा धर्म होता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध यशस्वी लढा देणे हेच एकमेव ध्येय होते! त्यामुळेच त्याकाळी लहुजी वस्ताद यांना मागासवर्गीयांमध्ये जेवढा मान होता तेवढाच आदर त्यांना उच्चवर्णीयांमध्येही होता. त्यांचे त्याकाळातील कार्य स्वार्थासाठी नव्हे तर देशाच्या कल्याणासाठी, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी होते. त्यांच्या तालमीत येणाऱ्या कुठल्याही तरूणाकडून शस्त्रविद्या किंवा मल्लविद्या शिकवण्यासाठी त्यांनी कधीही कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही. लहुजी नेहमी म्हणायचे, “माझी गुरूदक्षिणा म्हणजे प्रत्येकाने आपल्या भारतमातेच्या मुक्ततेसाठी सदैव तत्पर राहून तिची प्रामाणिकपणे सेवा करणे हीच!” हळूहळू लहुजींच्या तालमीत असंख्य क्रांतिकारी तरूण तयार होऊ लागले. ते वेगवेगळ्या जातीधर्माचे होते तरी त्यांच्यात कसलाही भेदभाव नव्हता. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, सदाशिव बल्लाळ गोवंडे, विष्णू विनायक गद्रे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सय्यदभाई उस्मान, मोरो विठ्ठल वाळवेकर, गोपाळ मोरेश्वर साठे, दत्तू दोडके, सखाराम परांजपे, सादू कांबळे, ज्ञानेश्वर सकट अशा कितीतरी गणमान्य व्यक्तींच्या नावांची गणना लहुजी वस्ताद यांच्या शिष्य परिवारात करता येईल. स्वातंत्र्यासाठी समर्पित वृत्तीने झोकून देण्यासाठी तत्पर असलेल्या या असंख्य शिष्यगणातून प्रत्येकाने वेगवेगळ्या मार्गांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोलाचे कार्य केले आहे.

“युध्दकलेत निपुण आणि ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्त्व सध्यातरी लहुजी वस्तादांशिवाय दुसरे कुणी नाही!” असं लोकमान्य टिळक त्यावेळी ठामपणे म्हणायचे. यावरून लहुजींचे कार्य किती महान होते याची आपण कल्पना करू शकतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले होते. सामाजिक एकता, बंधुता, समता या त्रिसूत्रीचे भान ठेवून लहुजींनी तरूणांच्या तनामनात स्वातंत्र्य ज्योत सतत धगधगत ठेवली! त्यांच्या आखाड्यात येणारे युवक हे केवळ पुणे परिसरातील नव्हते. तर ते सातारा, अहमदनगर, भोर, सुपे, मावळ प्रांत इत्यादी भागातूनही मोठ्या प्रमाणात यायचे. या असंख्य तरूणांच्या तनामनात क्रांतीची मशाल पेटवण्याचे आणि ती कायम धगधगत ठेवण्याचे महान कार्य लहुजी रात्रंदिवस करत होते. त्यामुळे देशभक्तीने भारावलेले हे धाडसी तरुण इंग्रजांच्या विरोधात कधीही तुटून पडायला आणि प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी उत्सुक होते. अशा या जाज्ज्वल्य देशप्रेमाने जिवावर उदार होणाऱ्या युवकांची संघटना तयार करण्याचे अत्यंत जिकिरीचे आणि जोखमीचे कार्य लहुजी करत होते! त्यासाठी त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. विवाहबंधनात, संसाराच्या रहाटगाडग्यात ते अडकले नाहीत. त्यांनी फक्त अन् फक्त स्वातंत्र्य हेच ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवले. त्यांनी कधीच स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा विचार केला नाही तर
आपल्या मातृभूमीला गुलामगिरीच्या शृंखलेतून सोडवायचा ध्यास मनी जपला होता!

पुण्यात आखाडा सुरू केल्यापासून लहुजी त्यावेळी लहुजी वस्ताद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याकाळी उच्चवर्णीयांचे वर्चस्व असणाऱ्या पुणे शहरात लहुजींनी पाण्यासाठी विहीर बांधणे आणि ती सर्वांसाठी खुली करणे हे कार्य म्हणजे मोठी सामाजिक क्रांतीच होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्या पारतंत्र्याच्या काळात विषमतेच्या विषारी डोहाकडून समतेच्या नितळ प्रवाहाकडे जाणारी ती अभिमानास्पद बाब होती. स्वातंत्र्य लढ्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यास अस्पृश्य- सवर्ण असा भेदभाव करणे तेव्हा परवडणासारखे नव्हते. कारण फूट पाडून राज्य करणे हाच ब्रिटिशांचा स्थायीभाव होता. त्यात ते कमालीचे वाकबगार होते… तीच त्यांची कूटनीती होती! म्हणूनच लहुजींनी त्याकाळी सर्वांना सोबत घेऊन आपले विधायक कार्य करण्यावर जास्त भर दिला. आपणच आपसात भांडत बसलो तर इंग्रजांचेच फावणार होते. त्यामुळे धर्म, जात असा भेदभाव न करता, अशा क्षुल्लक गोष्टींना तिलांजली देऊन सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी सिद्ध व्हावे असे लहुजींना वाटायचे. त्याकाळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. तसेच मागासवर्गीय मुलांसाठीही शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाची दारे खुली केली. तेव्हा त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. ती गंभीर परिस्थिती बघून त्यावेळी लहुजी वस्ताद आणि त्यांचे शिष्य महात्मा फुल्यांच्या मदतीला धावून आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक तयार करत असतानाच लहुजींनी महात्मा फुले यांच्या सोबत सामाजिक क्रांती करण्यासाठीही अत्यंत तळमळीने त्याकाळी पुढाकार घेतला होता.

उमाजी नाईक आणि लहुजी वस्ताद यांचे त्यांच्या पूर्वजांपासून जिव्हाळ्याचे संबंध होते. उमाजींना लहुजीबद्दल कमालीचा आदर होता. त्यांच्या कार्याचा उमाजींना खूप अभिमान वाटायचा. वेळ मिळेल तेव्हा ते लहुजींच्या आखाड्यात हजेरी लावत. त्यांच्यासोबत कडेकपारीत निशानेबाजीचाही सराव करायचे. उमाजींच्या पूर्वजांना पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना ‘नाईक’ ही पदवी बहाल करून सन्मानित केले होते. त्याकाळी इंग्रजांनी संपूर्ण भारतात आपल्या सत्तेचे जाळे पसरण्यास सुरूवात केली होती. कालांतराने त्यांनी पुण्यावर ताबा मिळविल्यानंतर इतर किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशी, मातंग समाजाकडून काढून घेतली. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. अशा बिकट परिस्थितीत उमाजी नाईक आणि त्यांचे सहकारी उत्तेजित होऊन बेभान झाले. त्यांनी मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याचं तंत्र अवलंबण्याचं ठरवलं… आणि इंग्रजांविरुद्ध बंडाचं रणशिंग फुंकलं! या बंडाला लहुजींचा पाठिंबा होताच. त्यांच्या आखाड्यात तयार झालेले विठुजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळकर या साथीदारांना सोबत घेऊन उमाजी नाईक यांनी कुलदैवत जेजुरीच्या खंडोबारायाला पिवळा भंडारा उधळून शपथ घेतली आणि त्यावेळी इंग्रजांच्या विरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली!

उमाजी नाईक यांना गावागावातून पाठिंबा मिळू लागला. त्यामुळे त्यांनी गोरगरीब जनतेसाठी स्वतः चे प्रतिसरकार उभे केले. परिणामी उमाजींची इंग्रजांवर जबरदस्त दहशत बसली! उमाजी आणि त्यांचे सहकारी गरीब शेतकर्यांना गायी, बैल, शेतीचे सामान इत्यादी घेऊन द्यायचे. तसेच सावकारांनी जुलमाने ताब्यात घेतलेल्या जमिनी आणि दागिने ज्यांचे त्यांना परत मिळवून देऊ लागले. त्यामुळे उमाजींच्या काळात गरीब गावकरी जनता सुखी समाधानी अन् निर्धास्त होती. म्हणूनच उमाजींची वाढती लोकप्रियता इंग्रजांची झोप उडवू लागली. लोकांचीही हिंमत वाढली आणि ते इंग्रजांना शेतसारा द्यायला नकार देऊ लागले. मग चिडलेल्या माॅकिन टाॅस या इंग्रज अधिकार्यानं उमाजींना पकडण्यासाठी पुरंदरच्या मामलेदाराला ब्रिटिश सैन्य देऊन पाठवलं. मात्र लहुजींच्या तालमीत तयार झालेल्या आपल्या साथीदारांसह उमाजींनी इंग्रजांना पुरंदरच्या पश्चिमेस गाठलं. आणि भीमपराक्रम गाजवत त्यांनी इंग्रजी सेनेचा दारूण पराभव केला. नंतर १८२४ मध्ये उमाजींनी विश्वासू साथीदारांसह पुण्यातील भांबुर्डा येथील इंग्रजी राजवटीचा खजिना लुटून नेला. त्यातील बरीचशी रक्कम त्यांनी देवळांच्या देखभालीसाठी आणि गोरगरिबांना वाटप केली. त्यानंतर ३० नोव्हेंबर १८२७ रोजी त्यांनी इंग्रजांना इशारा दिला, ”आज हे एकच बंड तुमच्या विरोधात सुरू असले तरी अशाप्रकारचे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील आणि तुम्हांला हुसकावून लावतील!” इंग्रजांना सळो की पळो करून सोडत डिसेंबर १८३० मध्ये उमाजींनी आपला पाठलाग करणारा इंग्रज अधिकारी ‘बाॅईड’ आणि त्याच्या सेनेला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ केले आणि त्यांना परत जाण्यास भाग पाडले. त्यावेळी काही इंग्रजी सैनिकांना प्राणही गमवावे लागले! नंतर लगेच १६ फेब्रुवारी १८३१ रोजी उमाजींनी इंग्रजांविरुद्ध जाहीरनामा प्रसिद्ध केला.. “आता भारतीयांनी इंग्रजी नोकरी करणे सोडावे. सर्वांनी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजी राजवटीचे खजिने लुटावेत. त्यांना शेतसारा किंवा पट्टी देऊ नये. इंग्रजांची जुलमी राजवट आता जास्त काळ न टिकता ती लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये आणि तसे केल्यास आमचे नवीन सरकार अशा लोकांना कठोर शासन करेल!”

आता कसंही करून उमाजींना जेरबंद करणे हे एकच लक्ष्य इंग्रजांनी ठेवले आणि त्यादृष्टीने त्यांनी आपले धूर्त डावपेच आखायला सुरूवात केली. नंतर त्यांनी एक फर्मानच काढले, “उमाजी नाईक यांची माहिती देणार्यास दहा हजार रुपये रोख आणि दोनशे एकर जमीन बक्षीस म्हणून देण्यात येईल.”

इंग्रजांची ही मात्रा बरोबर लागू पडली आणि घात झाला! उमाजींच्या सैन्यातील काळोजी नाईक आणि नाना चव्हाण हेच इंग्रजांना फितूर झाले! १५ डिसेंबर १८३१ च्या काळरात्री काळोजीच्या माहितीवरून इंग्रज अधिकारी माॅकिन टाॅस याने भोर तालुक्यातील उतरोली गावात बेसावध असलेल्या उमाजींना जेरबंद केले! नंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या प्रिय मातृभूमीसाठी फासावर जाणारा पहिला क्रांतिवीर ठरला नरवीर उमाजी नाईक! ३ फेब्रुवारी १८३२ रोजी तो पुण्याच्या मामलेदार कचेरीत हसत हसत फासावर चढला! त्यानंतर निर्दयी इंग्रजांनी इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजींचं निर्जीव शरीर कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडावर तीन दिवस लटकावून ठेवलं. केवढं हे क्रौर्य! अशा या महापराक्रमी उमाजी नाईकांनंतर जवळपास तेरा वर्षांनी म्हणजे १८४५ मध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.

उमाजींना फाशी दिल्याचं वृत्त ऐकताच लहुजींना अपार दु:ख झालं! त्या रात्री ते खूपच अस्वस्थ होते. रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. आपला जिवाभावाचा साथीदार, जिवलग मित्र अचानक गेल्याने त्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. उमाजीसोबत घालवलेले क्षण आठवताच त्यांना गहिवरून यायचं… त्यानंतर लहुजी कितीतरी दिवस अस्वस्थ होते! इंग्रजांनी फाशी देण्यापूर्वी तब्बल महिनाभर उमाजी आणि त्यांच्या साथीदारांचे अतोनात हाल केले. मात्र त्यांनी ना कुण्या साथीदारांची नावे सांगितली, ना लहुजींच्या आखाड्याची माहिती दिली. किती कणखर अन् बळकट ह्रदयाची माणसं होती ती… म्हणूनच लहुजींना त्यांचा रास्त अभिमान होता. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामापूर्वीच सशस्त्र उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वर्षे सळो की पळो करून त्यांची झोप उडवणारा नरवीर उमाजी नाईक यांना बेसावध अवस्थेत पकडून पुण्यात आणणारा इंग्रज अधिकारी माॅकिन टाॅस त्याच्या चरित्रात म्हणतो… “उमाजीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती किंवा तो पकडला गेला नसता तर तो दुसरा शिवाजी झाला असता!”

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ ला रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी झाला. त्यांना आधीपासूनच कुस्ती, व्यायामाची आवड असल्याने ते पुण्यात आल्यावर चांगल्या तालमीच्या शोधात होते. काही दिवसातच त्यांचा संपर्क लहुजी वस्ताद यांच्याशी आला. वासुदेव बळवंत फडके यांची उंची सहा फूट होती. गौरवर्णीय, सरळ टोकदार नाक, पाणीदार डोळ्यांचे, समोरच्या वर छाप पाडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. रोज ते तब्बल तीनशेपेक्षा जास्त जोर अन् बैठका मारायचे. त्यांनी लहुजींच्या तालमीत मल्लविद्येसोबत शस्त्रविद्येचेही शिक्षण घेणे सुरू केले. त्यातील बारकावे ते लहुजींकडून समजून घेऊ लागले. त्यावेळी दांडपट्टा हे शस्त्र त्यांच्या विशेष आवडीचे होते. त्यामुळे दांडपट्टा फिरवण्यात ते लवकरच तरबेज झाले. क्रांतिगुरू लहुजींचा वासुदेव फडक्यांवर विशेष जीव होता. फडक्यांच्या मनात सुध्दा लहुजीविषयी कमालीचा आदर होता. त्यांचे निर्मळ आणि जिव्हाळ्याचे नाते दिवसेंदिवस वृध्दिंगत होत गेले.

१८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे इंग्रज सरकारने दुर्लक्ष केले. लोकांचे हाल बघवत नव्हते. त्यावेळी फडक्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, दुष्काळग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत केली. त्याचवेळी जुलमी राजवट उलथवून टाकण्याची भाषा वापरून त्यांनी जागोजागी ज्वलंत भाषणे देण्यास सुरुवात केली. त्यांच्या तडफदार ओघवत्या शैलीतले बोल ऐकण्यासाठी त्यावेळी युवापिढी गर्दी करू लागली. लहुजींना त्यांचा खूप अभिमान वाटायचा. त्यांच्यासोबत फडके गुप्तपणे सल्लामसलतही करायचे. इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी त्यांचे तरूण रक्त सळसळत होते! त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसामुग्रीची गरज असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुणे, मुंबई आणि इतर शहरातील धनाढ्य, सुशिक्षित भारतीयांकडे मदतीची मागणी केली. मात्र निराशाच पदरी पडली! त्यानंतर त्यांनी न डगमगता लहुजींच्या सल्ल्याने आपला मोर्चा मागासलेल्या वर्गाकडे वळवला. त्यावेळी मात्र फडक्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात युवावर्ग स्वातंत्र्य लढ्यासाठी मदत करण्यास तयार झाला. त्यांना लहुजींच्या तालमीत युध्दकलेचं प्रशिक्षण देण्याचं कार्य सुरू झालं. सर्व जण उत्साही वातावरणात मनापासून तयारीला लागले.

अशाप्रकारे आपले ‘सैन्य’ तयार केल्यानंतर वासुदेव फडक्यांनी आपल्या पराक्रमी साथीदारांसह इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतपणे युध्दाची घोषणा केली. स्वस्थ न बसता शिरूर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाडी टाकून, लूट जमवून त्यांनी सैन्यासाठी ‘रसद’ जमवली. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांसाठी का होईना अख्ख्या पुणे शहरावर कब्जा मिळवला. त्यावेळी लहुजींच्या तालमीत तयार झालेल्या सर्व जातीधर्मातील युवकांची त्यांना साथ लाभली. स्वातंत्र्यलढ्याचं कार्य सुरू असताना त्याकाळी फडक्यांची रानावनात भटकंती सुरू असायची. त्यामागे उद्देश एकच होता… स्वातंत्र्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा! या भ्रमंतीदरम्यान त्यांची रामोशी लोकांशी गाठ पडायची. अत्यंत धाडसी आणि एकनिष्ठ असलेले हे रामोशी शरीराने काटक अन् बलवान असल्याने त्यांच्याकडे पूर्वी किल्ल्याच्या राखणदारीची जबाबदारी असायची. मात्र इंग्रजांची जुलमी राजवट सुरू झाली आणि कित्येक गडकिल्ले खालसा करून ते त्यांनी आपल्या अमलाखाली आणले. त्यामुळे रामोशी, बेरड जमातीच्या लोकांवर जंगलात भटकंती करत लाकडे गोळा करून कसंतरी आपलं पोट भरण्याची पाळी आली! याच धाडसी आणि शूर रामोशींना एकत्र करून फडक्यांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारला. त्यांच्या मदतीने सतत छुपे हल्ले करून सरकारी खजिने लुटून इंग्रज सरकारला जेरीस आणले. त्यांच्या या सशस्त्र उठावांमुळे त्याकाळी भारतीयांमध्ये नवा जोम संचारला होता! बिकटप्रसंगी कशाप्रकारे डावपेच आखायचे याबाबत फडके लहुजींसोबत सल्लामसलत करून पुढील योजना तयार करायचे. स्वस्थ बसणार्यांपैकी ते नव्हतेच… त्यांच्या डोळ्यांत केवळ अन् केवळ स्वातंत्र्याचं स्वप्न होतं!

इंग्रजांना हुलकावणी देण्यासाठी वासुदेव बळवंत फडके प्रसंग बघून वेषांतरही करायचे. त्यांचं स्वातंत्र्य कार्य जोमात सुरू असताना एके दिवशी हेन्री विल्यम डॅनियल या इंग्रज अधिकार्याला फडक्यांचा सुगावा लागला. तो त्यांना पकडण्यासाठी मागावरच होता. मात्र फडक्यांनी रस्त्यात अक्कलकोटजवळील गाणगापूर येथून इंग्रजांना हुलकावणी देऊन पंढरपूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. रस्त्यात चिखल, दगडधोंड्यांचा सामना करत, अंगात ताप असूनही लढवय्या वृत्तीचे फडके चालतच होते. हेन्री विल्यम डॅनियलचा पाठलाग सुरूच होता. काही वेळानंतर मात्र तीव्र वेदना सहन करत अखंडपणे चालणार्या फडक्यांना ग्लानी आल्यासारखे वाटले… आता त्यांच्यात पुढे चालण्याचे त्राण उरले नव्हते! तरीही ते धैर्याने कसेतरी जवळच्या ‘देवरनावडगा’ गावात पोहोचले. खूप असहनीय वेदनांनी त्यांना ग्रासल्याने काही क्षण विश्रांती घ्यावी असा विचार करून ते एका बुध्द विहारात गेले. त्यावेळी त्यांच्या कंबरेला पिस्तूल होतेच. त्यावर हात ठेवून फडके विश्रांतीसाठी पहुडले. त्यांच्या मागावर असलेला इंग्रज अधिकारी डॅनियल काही वेळातच तेथे पोहोचला. झोपेत असलेले फडके त्याच्या दृष्टीस पडले. ती २० जुलै १८७९ ची मध्यरात्र होती… जणू काळरात्रच! त्या काळरात्री डॅनियलनं आपला डाव बरोबर साधला. फडक्यांना झोपेत असतानाच अटक करण्यात आली.

पुण्यात आणल्यावर फडक्यांना तुरूंगात ठेवण्यात आले. त्यानंतर लगेच त्यांच्यावर ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यावेळी पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी वासुदेव बळवंत फडके यांना आजीवन कारावास आणि हद्दपारीची शिक्षा ठोठावली गेली! लहुजी वस्तादांना ही बातमी कळताच खूप वाईट वाटले. आपल्या प्रिय लढवय्या शिष्याला एवढी कठोर शिक्षा ठोठावण्यात आली याचे त्यांना अतोनात दु:ख झाले! त्यांच्यावर या घटनेमुळे प्रचंड आघात झाला. ते एकांतात असताना एकटेच दु:खात होरपळत राहिले! नंतर फडक्यांना आजीवन कारावास भोगण्यासाठी येमेन या अरेबियन देशाच्या ‘एडन’ शहरातील तुरूंगात ठेवण्यात आले. शिक्षा भोगत असताना फडक्यांनी एके दिवशी संधी साधून आपल्या कोठडीचे दार बिजागर्यांसह उचकटून काढले आणि ते त्या मजबूत तुरूंगातून निसटले. मात्र दुर्दैवाने काही दिवसातच ते पुन्हा इंग्रजांच्या हाती लागले. आता मात्र एडनच्या तुरुंगात त्यांच्यावर कडक पहारे बसवण्यात आले.

इकडे भारतात इंग्रजांनी फडक्यांना साथ देणाऱ्या रामोशी लोकांच्या वस्तीत धाडसत्र सुरू केले. पुण्यातील प्रत्येक आखाड्यात जाऊन इंग्रजांनी चौकशी सुरू केली. याचा सुगावा लागताच लहुजींनी ताबडतोब आपल्या सर्व आखाड्यातील शस्त्रास्त्रे शिष्यांमार्फत सुरक्षित ठिकाणी हलवणे सुरू केले. काही किरकोळ शस्त्रे विहीरीत टाकली. त्यानंतर काही दिवसातच इंग्रज पोलीस लहुजींच्या चौकशीसाठी त्यांच्या कडे येऊन धडकले. त्यांनी लहुजींची सखोल चौकशी केली. त्यावेळी उतारवयामुळे त्यांचं शरीर थकलं होतं मात्र मन अजूनही खंबीर होतं! चौकशीत इंग्रजांना काहीच माहिती मिळू शकली नाही. ते हात हलवत परत गेले.

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके या आपल्या धाडसी, पराक्रमी शिष्याला इंग्रजांनी पकडल्याचं दु:ख लहुजींच्या जिव्हारी लागलं होतं! त्यांच्यावर या घटनेचा खूप मोठा आघात झाला होता. त्यांचं मन सैरभैर होऊ लागलं. कशातच त्यांचं मन लागत नव्हतं. स्वातंत्र्याचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होईल हाच एक आशावाद लहुजींना जगण्याचं बळ देत होता. प्रयत्न करूनही त्यांचं मानसिक स्वास्थ्य डळमळायला लागलं. त्यांना जेवण जात नव्हतं. रात्र रात्र झोप येत नव्हती! रात्री त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या लाडक्या शिष्यांचे चेहरे दिसायचे… कधी त्यांना उमाजी नाईक तर कधी वासुदेव बळवंत फडके दिसायचे! कधीकधी त्यांच्या नजरेसमोर खडकीचं भीषण युद्ध दिसायचं. त्यात त्यांच्या प्रिय वडिलांचं धारातीर्थी पडलेलं रक्तबंबाळ शरीर दिसायचं! मग खूप अस्वस्थ होऊन लहुजी दचकून उठायचे. सततच्या जागरणाने आणि अस्वस्थतेमुळे लहुजींची प्रकृती आता कमालीची ढासळू लागली. आपल्या डोळ्यासमोर इंग्रजांची जुलमी राजवट त्यांना उलथवून टाकायची होती. हा विचार मनात येताच त्यांना अतोनात वेदना व्हायच्या!

त्याकाळी लहुजी वस्ताद एकटेच स्वातंत्र्याचा विचार करत पुण्यातील संगम पुलाच्या परिसरात भटकंती करायचे. आपल्याकडून आता पूर्वीसारखे क्रांतिकार्य होऊ शकणार नाही याचं त्यांना अतिशय वाईट वाटायचं! अतोनात वेदना व्हायच्या. त्यावेळी त्यांनी आपल्या वयाची ८६ वर्षे पूर्ण केली होती.
जागरणाने आणि अस्वस्थतेमुळे त्यांची तब्येतही खूप खालावली होती. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीची महत्त्वाकांक्षा लहुजींना स्वस्थ बसू देत नव्हती. आता शरीर साथ देत नव्हतं तरीही त्यांचं मन खंबीर होतं! आपल्या डोळ्यासमोर जुलमी इंग्रजी राजवटीचा युनियन जॅक उतरताना त्यांना पाहायचा होता. धूर्त ब्रिटिशांना आपल्या प्रिय मातृभूमीतून हुसकावून लावायचं होतं. तेच त्यांचं खरं स्वप्न होतं. या विचाराने लहुजी खूपच अस्वस्थ व्हायचे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या विचाराने त्यांना जणू पछाडले होते! या विचारात असतानाच स्वातंत्र्याची क्रांतिज्योत धगधगत ठेवत अखेर लहुजींनी १७ फेब्रुवारी १८८१ रोजी या नश्वर जगाचा निरोप घेतला! ते येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देऊन गेले. खर्या अर्थाने लहुजी वस्ताद आद्य क्रांतिगुरू ठरले!

८६ वर्षांचं दीर्घ आयुष्य लहुजींना लाभलं. मात्र आयुष्यभर त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. संसारगाड्यात न अडकता ते अखेरपर्यंत मातृभूमीसाठी आपला देह झिजवत राहिले! ते आपल्या निस्वार्थ क्रांतिकार्यामुळे, असीम त्यागामुळे तसेच अचाट साहसामुळे क्रांतिकारकांचे खरे क्रांतिगुरू ठरले. लहुजी वस्ताद यांच्या मृत्यूनंतर जवळपास ६६ वर्षांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र स्वातंत्र्यासाठी सर्वप्रथम शपथ घेणार्या, सशस्त्र क्रांतीसाठी कार्य करणाऱ्या लहुजी वस्ताद या आद्य क्रांतिगुरूंचे स्मरण आज किती जणांना होते? स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही लहुजी वस्ताद दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिले असे खेदाने नमूद करावे लागते! इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे असे अभूतपूर्व, दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवणारे शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या स्मृतिला मानाचा मुजरा! विनम्र अभिवादन!!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे.
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद”

  1. Ganeshrudra

    कोणत्याही पुराव्या विना तुम्ही लहुजी वस्ताद साळवे यांना राजे उमाजी नाईक यांचे शिष्य म्हणून चुकीचा इतिहास पसरवत आहात.राजे यमाजी नाईक यांच्या कोणत्याही पत्रामध्ये वस्तादांचा उल्लेख आढळत नाहीये, किंवा इंग्रजांनी लिहिलेल्या डायरीमध्येहि उल्लेख आढळत नाही. कृपया चुकीचा इतिहास पसरवू नका,पुराव्यांनीशी बोला.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा