चपराक दिवाळी 2020
हा अंक मागविण्यासाठी आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092
ती होती म्हणून मी आहे. हे मला माहिती आहे पण ती जी होती ती नेमकी कोण होती, कशी होती हे मात्र मला माहीत नाही. ती जी अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अगदी शंभरावी सुद्धा कोणालाच ओळखत नाही मी! पण खरंच ती होती आणि मी आज आहे. तिच्याच चिवट धाग्याला पकडून माझ्यातून उद्या पुन्हा ती असणारच आहे. उद्याची तीही कदाचित अशीच लिहिणार आहे. विचार करणार आहे.
आत्मनिर्भर स्वतंत्र असं तिचं अस्तित्व पेरत राहणार आहे. जिने ओळखलं स्वतःला, मांडलं स्वतःला. विचार करते कधी कधी कशी झाली असेल तिची स्वतःशी ओळख. कसं निभावलं असेल स्वतःशी सख्य. स्वतःचा जीव, स्वतःचं शरीर कसं जाणलं असेल सारं. तहानभूक मनाची, जिवाची, शरीराची कशी ओळखली असेल तिनं.
तसं तर इव्हलाच आपण ओळखतो पहिली ती म्हणून. स्वतःला समजून घेताना किती दमछाक झाली असेल तिची. कसं समजून घेतलं असेल शरीर आणि मनाचं शास्त्र. आदमशी खेळता खेळता कधीतरी जाणवले असतील तिला तिच्या शरीरातले आकार, उकार, उभार. भारावून गेली असेल, संकोचली असेल की मोहोरली असेल? आपण वयात येत आहोत हेही तिला कदाचित समजले नसेल. ती शिकारीही असेल किंवा तिची शिकार देखील झाली असेल. नक्की काय झालं असेल जेव्हा पृथ्वीवर मानवाचा पहिलाच गर्भ वाढू लागला असेल तिच्या गर्भात! तान्ह्या जिवाच्या जिवणीतून वाहिला असेल तिचा पान्हा. झाली असेल तृप्त तृप्त ती. जन्माच्या वेदना, यातना सुरू झाल्या आहेत आणि ती बाई आहे हे तिच्यानंतर नक्की कितव्या ‘ती’ने जाणलं असेल पृथ्वीचा दिवसरात्रीचा वेग पकडून धावताना. चंद्राची शीतलता, सूर्याची उष्णता कशी, कोणत्यावेळी वापरायची याचं निसर्गदत्त ज्ञान होतं की निसर्गाशी मैत्री करून मिळवलं तिने. खरं तर अनेक निसर्गसुक्ते तिच्यामुळेच लिहिली गेली असतील. पुरुषानं निर्माण केलेल्या भौतिकात ती तेव्हाही निसर्ग होती. आजही निसर्गच आहे. तिच्या जाणिवांचे स्तर कधी होत गेले असतील विस्तारित.
विचार करता करता पोहोचले तशी बरीच अलीकडेच. पंचसती, पंचकन्यापर्यंत. त्यातला प्रत्येकीचा विचार करू लागले.
पंचसतीतल्या सती (पार्वती), सीता, सावित्री, अरुंधती, दमयंती, तारामती.
आणि पंचकन्या मधल्या अहल्या, तारा, कुंती, मंदोदरी, द्रोपदी यांचा. तर लक्षात अजून एक गोष्ट आली की काही श्लोकांमध्ये सीता तर काही श्लोकांमध्ये कुंतीचा उल्लेख पंचकन्यांमध्ये येतो. मात्र इथे मी कुंतीलाच पंचकन्यामध्ये घ्यायचं ठरवलं. त्याचंही स्पष्टीकरण देतेय पुढे.
तर या पंचसतींना अभ्यासताना जाणवलं, या चालत राहिल्या आपल्या नवर्यासाठी नवर्यापाठी. त्यांची जाणिवांची ज्ञानेंद्रिय वेगळी नव्हतीच. त्या पतिनिष्ठेतच विरघळून गेलेल्या होत्या. त्यांच्या जगण्याचा आशय आणि विषय एक झाला होता. सती कर्पूरगौरात, सीता रामात, सावित्री सत्यवानात, दमयंती नलात, तारामती हरिश्चंद्रात, अरुंधती वसिष्ठात. हे असं असलं तरीही त्यांची प्रीती मात्र अंधभक्तीतून आलेली नक्कीच नव्हती. त्या सगळ्याच थोर तपस्विनी, ज्ञानी आणि आत्मज्ञानी देखील होत्या आणि त्या त्यांची कर्तव्येही जाणत होत्या. या प्रत्येकीची स्वतंत्र ओळख होती. या मेधावी स्त्रियांनी आपली नाममुद्रा अशी उमटवली आहे की अगदी आजही काळाचा पडदा त्यांची प्रखरता पुसू शकलेला नाहीये. ना त्यांचं सतित्व लोप पावलं आहे.
जगण्याचं त्या त्या वेळचं वास्तव, परिस्थिती याचं भान जपणारं त्यांचं अस्तित्व, सत्त्व आणि स्वत्व अभ्यासलं तर भौगोलिक, सामाजिक, नागरिक, वैज्ञानिक अशा अनेक शास्त्रांचे स्तर आपल्याला पार करावे लागतात आणि लक्षात येतं आजच्याही काळात त्यांचं महत्त्व अधिक अधोरेखित होऊ शकेल. फक्त त्यांना दैवी संकल्पनेतून बाहेर काढणे फार गरजेचे आहे. म्हणजे मग अनेक संदर्भ बदलतील आणि त्यांची खरी ओळख जी गरजेचीच आहे ती होण्यास मदत होईल. आपण त्यांना मिथकात बंद केलं. त्यांच्याभोवती आपमतलबी कथा लिंपून टाकल्या. सावित्रीची खरी कथा आणि आज परंपरेनी निर्माण झालेली कथा यातही कितीतरी तफावत आहे. वाल्मिकी रामयणातली सीता आणि लोककथांमधून हतबल केलेली सीता यातूनही तिची प्रतिमा बदलत गेली आहे. खरं त्या आधुनिक, स्वनिर्णीत कशा होत्या यावर प्रकाश पाडणारं साहित्य निर्माण झालं तर आज ज्या म्हणतात सीतेलाही वनवास चुकला नाही त्या अनेकींना समजेल, सीतेने स्वेच्छेने पतीच्या सहवासासाठी वनवास स्वीकारला होता. तिच्या आयुष्यात घडणार्या अनेक गोष्टींची जबाबदारी तिने स्वतःची स्वतः उचलली होती. असो यावर विस्ताराने लिहिन पुन्हा.
तर पुढे जाऊया.
एकपुरुषी आणि बहुपुरुषी असा भेद मला सती आणि कन्यामध्ये जाणवला. वर उल्लेखलेल्या या पाचही जोड्या एकमेकांसाठीच होत्या. यांच्या आयुष्यात अन्य कोणी दुसरी स्त्री किंवा पुरुष त्यांच्यामध्ये नव्हता. म्हणून सीता सतीमध्ये घेतली आहे तर कुंती पंचकन्यांमध्ये घेतली आहे. या पंचकन्या देखील विलक्षण देखण्या, प्रचंड बुद्धिमान तर होत्याच पण आपल्या अंतर्मनात उमटणारे नाद कृतीतून उमटवणार्या अशा या नायिका होत्या. आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर स्वअस्तित्वाचं भान भोवतालाच्या जाणिवेतून विकसित होऊ पाहणारं रसायन जे आजच्याही स्त्रीतून वाहू पाहतंय. तिचा स्रोत या पाचजणी आहेत असं मला नेहमीच वाटतं.
आपल्या आतल्या आवाजाला ऐकण्याची क्षमता आणि त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचं धाडस त्यासाठी प्रसंगी शिळा होणंही मान्य करणं. स्त्रीवादी चळवळीच्या आद्य कार्यकर्त्याच आहेत या.
आत्मवंचना न केल्यामुळे निखळ, नितळ खर्या असणार्या या देहातीत होऊन देहातला निसर्ग भोगणार्या म्हणून यांना आजन्म कुमारी म्हणत असतील का? स्त्रीचं, स्त्रीत्वाचं सार सांगणार्या यांच्याकडे मानवीय संकल्पनेतून पाहताना यांच्यातले असामान्यत्व ओसंडून वाहताना दिसून येतं.
या पाचजणींचा अभ्यास केल्यावर, यांचे वेगवेगळ्या ग्रंथातले दाखले अभ्यासल्यानंतर, व्यक्तिरेखा म्हणून यांना समजून घेतल्यानंतर जाणवतं यांना भूमिकेत उतरवून यांच्यावर लेखकू महर्षींनी अन्याय केला आहे का? वाटतं यातली प्रत्येकजण विचारत असेल का, म्हणत असेल का महर्षी वाल्मिकींना, महर्षी व्यासांना की –
मी म्हणजे मी नाहीच,
तुम्ही निर्माण केलेलं एक पात्र,
नावही तुम्हीच दिलेलं,
जीवही तुम्हीच ओतलेला,
मी फक्त जगत गेले,
तुम्ही लिहाल तसं,
कधीतरी झाले हाडामासाची,
लौकिक भूमिकांपार अलौकिकात अक्षर ओळीतून उगवत,
काळाच्या शाईला सांभाळत,
शब्दांना आधार देत,
अंतस्थ एकलेपणाचे कोष विणत,
जगलेल्या क्षणांवर ओरखडे उमटत,
तुम्हाला हवा तसा शेवट आमच्यापुरत्या अखेरच्या पानावर करत,
सर्वसाक्षीच्या साक्षीनं भोगांच्या अभिशापांचे क्षण जगत…या माझ्याच कवितेच्या काही ओळी यांच्यावरच्याच चिंतनातून आलेल्या. समजायला लागल्यापासून या सगळ्या विलक्षण पौराणिक स्त्रियांचं आकर्षण गप्प बसू देत नाही.
या प्रत्येकीची कथा वेगळी. तिघी जणी त्रेतायुगातल्या तर दोघी द्वापारयुगातल्या. अहल्या सोडली तर बाकी जणी राजघराण्यातल्या. सत्ता, श्रीमंतीतल्या. कशाकशाचीच ददाद नसणार्या. कुंतीकडे तर दुर्वास मुनींकडून मिळालेले वशीकरण मंत्र देखील होते. ज्याचा कुतूहलापोटी वापर करून, सूर्याशी असं म्हणतात पण माहिती नाही खरा कोण असेल तो तेजस्वी पुरुष, ज्याचाशी कुंती रत झाली. त्या वयाची स्त्रीसुलभ भावना अबोधपणे जगली. बदल्यात पोळता निखारा गाठीशी बांधून घेत राहिली. त्या निखार्याशी अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहिली. दुःखाचे, आत्मक्लेशाचे किनारे ती कधीच पार करू शकली नाही. धर्म, न्याय, नीती, सामाजिक संकेत यांचा त्या काळातला विचार केला तर रामायणातल्या तारा आणि मंदोदरी यांचे संदर्भ बघावेच लागतील कारण हे वेगळे सामाजिक भान देणारे आहेत.
तारा समजून घेताना तिची कर्तव्यबुद्धी, हुशारी आणि भूमिकेतली लवचिकता जाणवत राहते. वालीवधानंतर ती सुग्रीवाशी विवाह करते. सुग्रीव सीतेला शोधण्यात मदत करण्यात कुचराई करतोय हे जाणवल्यामुळे संतापलेला लक्ष्मण सुग्रीवाच्या शोधात जेव्हा त्याच्या अन्त:पुरात पोचतो त्यावेळी तारा सुग्रीवाचे लक्ष्मणाच्या क्रोधापासून रक्षण करते.
तर रावणाला दुष्कृत्ये न करण्याचा वारंवार सल्ला देणारी मंदोदरी ही देखील अत्यंत रूपवती, राजनीतिज्ञ, विचारी स्त्री होती. तिने रावणाला सीतेला रामाकडे परत पाठवण्याबद्दल बर्याच वेळेस विनविले होते पण रावणाने तिला जुमानले नाही. अर्थात मंदोदरीच्या धाकामुळे त्याने सीतेशी कधी गैरवर्तनही केले नाही. मात्र रावणाच्या मृत्युनंतर मंदोदरी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांच्या सांगण्यावरून बिभीषणाशी लग्न करते. इथे तारा आणि मंदोदरी या दोघींचेही विवाह आपल्या दिराशी झालेले आहेत. म्हणजे तत्कालीन समाजाची या विवाहांना मान्यता होती हे दिसून येतं. सामाजिक प्रश्नांसाठी केलेली ही तडजोड असेलही पण या दोघींचे राज्ञीपद मात्र अबाधित राहिले होते.
लढाईत पती मारले गेल्यानंतर दिराशी होणारा विवाह ऐकल्या-वाचल्यानंतर मला शेक्सपिअरच्या ‘रिचर्ड द थर्ड’ या नाटकाची आठवण येते. या नाटकात एक प्रसंग आहे, आपल्याच भावाचा खून करून कुबडा कुरूप रिचर्ड राजा होतो. आपणच खून केलेल्या आधीच्या राजाच्या म्हणजेच स्वतःच्याच भावाच्या शवयात्रेत सामील होतो. नुकतीच विधवा झालेली राणी एना पण यात्रेत असते आणि अशा अवघड प्रसंगी रिचर्ड विधवा एनाला लग्नाची मागणी घालतो. तीही ही मागणी स्वीकारते.
हे वाचल्यानंतर वाटतं शेक्सपिअरनी आपल्या रामायण, महाभारत यांचाही अभ्यास नक्कीच केला असणार.
मन आणि शरीर समप्रमाणात पाचांना देणारी द्रौपदी ही फक्त महाभारतकालीन व्यक्तिरेखा म्हणून तिच्याकडे कधीच बघता येणार नाही कारण आजही जगताना प्रत्येकीच्या जगण्यात कोणत्या न कोणत्या कारणानं तिच्या जगण्याचे कोणते तरी प्रसंग येत राहतात. एवढं विविधांगी जगणं तिच्या वाटेला आलेलं. त्यामुळे तिची मानसिक आंदोलनं (जी अनेक कादंबरीकारांनी, कवींनी स्वतंत्रपणे रंगवली आहेत) नकळत प्रत्येकीच्या मनाचा भाग होतात. द्रौपदीबद्दलच्या चिंतनासाठी परत माझ्याच कवितेचा आधार घेते.
माझ्या आयुष्यातला पाचवा पुरुष म्हणून
वर्णन केलं असेल का सहदेवाचं द्रौपदीनं?
पाचामधल्या ज्याच्यावर तिचं सगळ्यात जास्त प्रेम होतं,
तो हवा तेव्हा असायचा का तिच्याजवळ?
का जो असेल त्याच्याबरोबर
तिनं साजरं केलं असेल स्वतःला,
आतल्या सुखदुःखासहीत?
पाच स्वतःचे पुरुष असतानाही
सहावा सखा का हवाच असायचा?
एवढं अवघड होतं,
पावलापावलावरचं जगणं
का तिच्यातलं दिव्यत्व पाचांनाही कळलंच नाही,
की झेपलं नाही?
व्यासांनी तिच्या हातात लेखणी दिली असती
तर कदाचित
सगळ्याच विटंबना टळल्याच असत्या
आणि ती असली असती सगळ्या दुःखांपार
अनभिषिक्त सम्राज्ञी,
पंचपतिव्रतात तिचं नाव असलंही नसतं
पण तिचं जगणं तर तिचं तिचंच असलं असतं!अगदी लोक महाभारतात सांगितल्या जाणार्या जांभूळ आख्यानात कर्णाबद्दलच्या आकर्षणामुळे लज्जित झालेली द्रौपदीही असली नसती आणि असे जांभूळ आख्यानही लागले नसते. स्त्रीचे सहजस्फूर्त नैसर्गिक क्षण, भावना यांच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले नसते. कोणाबद्दल वाटणार्या आकर्षणाचं पापात रूपांतर झालं नसतं. नैतिकअनैतिक असे वर्गीकरणही झाले नसते.
अहल्येलाही शिळा व्हावे लागले नसते.
स्त्रियांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक अशा सर्वच बाजूंनी होणार्या शोषणावर आधारित ‘स्त्री-पुरुष तुलना’ या 1882 साली प्रकाशित झालेला ताराबाई शिंदे यांच्या ग्रंथाचा संदर्भ जर आपण अभ्यासला तर त्या काळातही किती रोखठोक आणि अभ्यासपूर्ण दाखले त्यांनी दिले होते. पुराणातील स्त्रियांबद्दलचे त्यांचे दृष्टिकोन देखील महत्त्वाचे आहेत. अहल्येबद्दल त्यांनी लिहिलेले होते, ‘अहल्या सुरेंद्रच्या अंकारूढ होऊन शिळा पडली’. अहल्या ही ब्रह्मदेवाची मानसकन्या. अतिशय सुंदर. त्यामुळे अनेक लोक तिच्या प्राप्तीसाठी धडपडत. हल म्हणजे कुरुपता आणि हल्य म्हणजे कुरूपतेमुळे प्राप्त होणारी निंदा. जिच्या सौंदर्याची कोणीही निंदा करू शकत नाही अशी ती अहल्या. ब्रह्मदेवाने केलेले हे नामकरण. ब्रह्मदेवाने तिला गौतमाजवळ ठेवले होते. गौतमानेही तिला अगदी सुरक्षित ठेवले म्हणून मग ब्रह्मदेवाने तिचे त्याच्याशीच लग्न लावले. इंद्राचे तिच्यावर फार प्रेम होते त्यामुळे इंद्राला वाईट वाटले. गौतम आश्रमात नाहीत अशी संधी साधून इंद्र वेषांतर करून तिच्याकडे येतो आणि त्यांचे मीलन होते. पुढेही इंद्र बरेच दिवस येत राहिला. तो इंद्र आहे हे कळूनही ती त्याच्याशी रत होत राहिली. पुढे गौतमाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अहल्येला शिळा होण्याचा शाप दिला. ‘रामाकडून तुझा उद्धार होईल’ हा उ:शापही दिला. (या संदर्भातील वेगवेगळ्या कथा आहेत, दुमत देखील आहेत. काही ठिकाणी मी इथे वापरलेला संदर्भ आहे तर काही ठिकाणी अहल्या इंद्राबाबत पूर्ण अनभिज्ञ होती असे दाखले देखील आहेत) या सगळ्या ग्रंथापलीकडे जाऊन त्या व्यक्तिरेखेचा म्हणून विचार केला तर अहल्या ही त्या काळातली बंडखोर स्त्री होती का? स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या सुखासाठी तिने स्वतःच शिळा होणंही मान्य केलं होतं का? आपल्या आतून येणार्या आवाजाशी ती प्रामाणिक होती का? या प्राचीन स्त्रियांपासून ते आजच्या आत्माविष्कार करणार्या स्त्रियांचा जर आपण वेध घेतला तर लक्षात येईल, मानवी सृष्टी निर्माण झाल्यापासून प्रहरांची ओझी स्त्री प्रामाणिकपणे सांभाळत आहे, सांभाळत राहील. अस्तित्वाच्या अंतापर्यंत.
यांचा कथाभाग आपल्याला माहिती आहेच म्हणून विस्तार मी टाळतेय. कथेवरून पण कथेशिवाय हे चिंतन मांडतेय. यासाठी की आजचा वर्तमान आपण पाहिला आणि आजची स्त्री समजून घेतली तर ती कोणत्याही सत्ते, श्रीमंतीशिवाय, कोणत्याही शस्त्राअस्त्राशिवाय फक्त मिळवलेल्या ज्ञानाच्या, कष्टाच्या आधारावर आणि स्वकर्तृत्वावर केवढं तरी आयुष्य जगतेय, भोगतेय. आपलं स्वत्त्व निर्माण करतेय. कुटुंब पोसतेय. समाज आणि ती यांचा तोल सांभाळतेय. भलेही तिची नोंद तिचं कुटुंब देखील घेत नसेल पण तीही या पंचकन्यांएवढीच तेजस्वी आहे.
अनेक जणी रूढार्थाचे सामाजिक संकेत उल्लंघून मनस्वी जगत आहेत पण त्या उच्छृंखल, स्वैराचारी नक्कीच नाहीयेत. त्यांना काय हवंय, त्यांना त्यांच्या आयुष्यात काय करायचं आहे हे भान त्यांना आलेलं आहे पण अशी स्त्री कुटुंबाला आणि तिच्या पतीला देखील पेलवत नाही. मग तिला विलग होण्याशिवाय पर्याय उरत नाही. अगदी सर्वसंघर्षानिशी एकल माताही ती होते. त्यातल्या एखादीला इमरोज सापडतो आणि एक अमृता शब्दातलं अमृत कागदावर सांडत अमर होते. दंतकथा वाटावी इतकी सहज तिला आपणही स्वीकारतो. प्रीतम यांना तर तिने कधीच सोडलेलं असतं. मग ही साहिरमय अमृता साहिरची की इमरोजची, हाही विचार कधीच मागे पडतो आणि समोर उरतं ते तिचं संघर्षातून तिनं निर्माण केलेलं झळाळतं जगणं आणि लक्षात येतं अरे, ही तर प्रत्येक रसिक मनाची झाली आहे, वाचकांची झाली आहे. किती तरी ‘तिला’ आपलं जगणं समजून घेण्यासाठी अमृता बळही देतेय. अमृता प्रीतम कधीच बेदरकार किंवा स्वैर नव्हत्या. बेजबाबदार सुद्धा नव्हत्या. म्हणून तर वाटतं वर्तमान काळात जर अशा पंचकन्या निवडायच्या असतील तर अनेक जणी सापडतीलही पण माझ्यासाठी मात्र प्रातिनिधिक म्हणूनही त्यातली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवीही अमृताच असेल. आपल्या भावना, जाणिवा खरेपणानी सादर करणारी. खूप खरी. म्हणूनच निर्भय, निरभ्र आणि खूप पवित्र. अमृताला समजून घेताना लक्षात येतं या प्रतिनिधित्त्व करणार्या पाचजणी म्हणजे पौरुषाला, पौरुषार्थाला ओलांडून, पत्नीरूपापार, मातृरूपापार जाऊन स्वतःला धारण करणार्या म्हणून या कौमार्याला प्राप्त झालेल्या आणि म्हणूनच या कन्या. अशा या पंचकन्या अधिक निखरून समोर येतात. स्वतःला धारण कर सांगणार्या अशा अर्थानं नित्य स्मरणात असाव्यात या अर्थानेच हा श्लोक वाचताना-
‘अहल्या कुंती द्रौपदी
तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेत नित्यं महापातक नाशन्म’आता श्लोकाचे आणि नवे अनुभूत अर्थ उलगडू लागतात.
– प्रिया धारूरकर, औरंगाबाद
9890922089आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.