जे सानुकूळ श्रीगुरु

जे सानुकूळ श्रीगुरु

Share this post on:

एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. सोबत पत्नी होती. वर्हाड आलेलं होतं. त्या वर्हाडामध्ये त्या मित्राचे आणि आमचे दोघांचेही शिक्षक लग्नासाठी आले होते. मी त्यांच्या पायावर वाकून नमस्कार केला. तितक्यात मला एका मित्राने हाक मारल्यामुळे मी त्याच्याकडे गेलो नि माझी पत्नी आणि सर गप्पा मारत बसले.

सायंकाळी घरी परत आल्यानंतर पत्नीला विचारलं, “काय म्हणाले सर?”

त्यावेळेस ती म्हणाली, “तुमचे सर खूप भावूक आहेत. ते म्हणाले, की तुम्ही त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात उत्तम विद्यार्थी होतात. तुमची सगळी जीवनकहाणी सरांनी सांगितली. तुमच्याविषयी सांगता सांगता सरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं.”

हा प्रसंग मला माझ्या बालपणात घेऊन गेला. लहानपणीची गरिबी. आईवडील ऊस तोडायला जायचे. दहा-बारा वर्षांचा झाल्यानंतर मलाही ते काम चांगलं जमू लागलं होतं. वडिलांनी ठरवलं आता याला ऊस तोडायला घेऊन जाऊ. शेतांमधली कामं, गुरु सांभाळणं हेही चालूच होतं. त्यामुले वारंवार शाळा बुडू लागली. शाळेला दांड्या पडू लागल्या. एक दिवस हेच आमचे भुसे सर आमच्या घरी आले.

वडिलांना म्हणाले, “तुम्ही काहीही करा; पण जोपर्यंत गावात शाळा आहे तोपर्यंत त्याला शिकू द्या. मुलगा हुशार आहे. शिक्षणाने नक्कीच काहीतरी फायदा होईल.”

आमचे वडील अत्यंत साधे. सरळ. अगदी संत तुकारामांसारखा त्यांचा स्वभाव. वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून मला पुन्हा शाळेत पाठवायला सुरुवात केली. कदाचित शिक्षकांनी वडिलांना केलेल्या विनंतीमुळेच आज हा लेख लिहिण्याचे भाग्य मला मिळत असावे.

वास्तविक पाहता त्या काळामध्ये विनाअनुदानित तत्त्वावर काम करत असल्यामुळे त्या सरांना पगार नव्हता. ‘मला पगार मिळत नाही, तर मी सुट्टीच्या दिवशी या मुलाच्या घरी जाऊन कशाला त्याच्या घरच्यांना समजावे?’ असा विचार त्यांनी केला असता तर?

हे सर खूप मारकुटे होते. इंग्रजी विषय शिकवायचे. रोज दहा स्पेलिंग पाठ करून आणायला सांगायचे आणि जेवढ्या स्पेलिंग येणार नाहीत तेवढ्या हातावर छड्या द्यायचे. एखाद्याला जर हातावर छडी घेताना काही दुखापत झाली तर ते त्याच्या तळपायावर छड्या मारायचे. त्यामुळे आम्ही मुलं त्यांना पत्री सरकार म्हणत असू. त्यांच्या या पत्र्यांमुळेच आज आमचे पाय मजबुत आहेत कोणत्याही निखार्याला तुडवण्याइतके!

आज आमच्या वर्गातील प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आपापल्या पायावर उभा आहे. बोलताना सगळेजण हे कबूल करतात, की सरांनी जर मार दिला नसता तर आज आपण सेटल झालो नसतो. आज सर त्याच शाळेवर आहेत. त्यांना कदाचित कुठला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नसेल; परंतु आज त्यांचे विद्यार्थी मात्र सगळ्या क्षेत्रांमध्ये नाव कमावत आहेत. सरांची आवर्जून आठवण काढत आहेत. आजही सरांना भेटायला जातात. न विसरता चौकशी करतात. सरही त्या मुलांच्या घरच्या सर्व कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थिती लावतात.

सध्या शाळा बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये शाळेत जाऊ नये असा सरकारी आदेश; पण शाळा माझ्या घरापासुन जवळ आहे. एकच किलोमीटर. मी शहरात जात नाही. आमच्या गावांमध्ये संसर्ग नाही. शासनाने जरी बंदी घातली असली तरीही मी शाळेत गेल्यामुळे काही बिघडत नाही. म्हणून मनाई केली असतानाही दररोज जाणारे आमचे जाधव सर. लोकांच्या दृष्टीने जाधव सर अबोल परंतु त्यांचं मुलांवरचं असणारे प्रेम, शिकवताना त्यांची लागणारी समाधी, त्यांची तल्लीनता या गोष्टी त्यांना उत्तम शिक्षक बनवतात. ह्या गोष्टी आपल्याला अशा शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय लक्षात येणार नाहीत.

देवदत्त चौधरी नावाचे अत्यंत उपक्रमशील शिक्षक. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी कुठलेही काम सांगा, कायम हजर! त्यांनी या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांशी नाळ तुटू दिली नाही. दररोज शाळेत(म्हणजे मुलांच्या ओट्यावर, बांधावर. कुठेही!) जातात. दररोज मुलांना शिकवतात.अनेक प्रकारचे उपक्रम राबवतात. या गोष्टीची दखल कदाचित कुठले चॅनल घेणार नाही, वर्तमानपत्र घेणार नाही; तरीही त्यांचं काम मात्र ते हिरीरीने आणि तितक्याच नेटाने करत आहेत. सर प्रसिध्द लेखक आहेत. त्यांचे चार कवितासंग्रह आणि दोन कादंबर्या प्रकाशित आहेत, पैकी एक कादंबरी नांदेड विद्यापीठात एम.ए. च्या अभ्यासक्रमाला आहे. तरीही सरांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही अहंकार नाही. अशा शिक्षकांविषयी बोलताना मन भरून येतं.

आमच्याकडे एक पाडा आहे, तिथे ठाकरे सर नावाचे एक शिक्षक होते. या पाड्यावरची परिस्थिती अशी आहे की हाता-तोंडाची गाठ पडायची असेल तर तुम्हाला गाव सोडावंच लागेल, नाहीतर खायलाच मिळणार नाही. साधारण पाच दहा एकराचा गावाचा विस्तार असेल. शेती तोकडीच. एकदम लहान दुसरी-चौथीची मुलं घरामध्ये टाकून लोक कामावर जायचे. (अजूनही जातात). ही लेकरं दिवसभर शाळेच्या भातावर आणि रात्र जमेल त्या स्वयंपाकावर काढायची. लक्ष द्यायला घरात कोणीच नसायचे.

या शिक्षकाने दर शनिवारी सकाळची शाळा असली की, त्या मुलांना नदीवर नेऊन स्वतःच्या हातामध्ये दगड घेऊन त्यांचा अंगावरचा मळ घासावा, त्यांचे केस कापावेत, त्यांचे नखे कापावेत, त्यांच्या तुटलेल्या शर्टाची बटण जोडावीत. हा शिक्षकाचा जॉबचार्ट असतो का? हे डी. एड. ला शिकवतात का? तरीही हे काम आईच्या ममतेने करणारे खूप शिक्षक आहेत. हे प्रातिनिधीक उदाहरण. ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ हे अशा शिक्षकांना उद्देशूनच म्हटलं असावं कदाचित.

उत्तम शिक्षक होण्यासाठी काय हवं नेमकं? शिक्षकाठी ज्ञान महत्त्वाचं आहे की प्रेम? माझ्यामते विद्यार्थी हा शिक्षकाच्या ज्ञानामुळे शिकत नाही तर तो शिक्षकाच्या प्रेमामुळे शिकतो. भुसे सर, जाधव सर, चौधरीसर, ठाकरे सर ही नमुन्यादाखल उदाहरणं आहेत. अशी खूप माणसं आहेत. जी जीव तोडून काम करतात. ही प्रकाश पेरणारी माणसं आहेत. आपल्या तेजानं झळाळणारी प्रकाशाची बेटं आहेत. ही लोक समाजाला माहीत नाहीत. प्रवाहाला माहीत नाहीत. यांच्या कष्टांच्या खतावरच समाजाचं पोषण घडतंय. त्यांच्यामुळेच उद्याच्या भारताचे भविष्य सुरक्षित आहे.

मी जिथे काम करतो तिथे ऑनलाईन शिक्षण शक्यच नाही. तिथे दररोज शाळेतजाणारे, लॉकडाऊन मध्येही प्रत्येकाच्या वस्तीवर जाऊन शिकवणारे शिक्षक मी बघितलेत. आपली भाकरी घेऊन जावं, कुठेतरी झाडाखाली बसून डबा खावा. डबा खाऊन झाला की कुठल्यातरी बांधावर जाऊन मुलांना एकत्र करून शिकवावं हाच नित्यनेम. शिक्षणाचा वसा घेऊन त्या व्रताला जागणारी माणसं आहेत हे शहरात कोणाला खरेतरी वाटेल का? त्यांच्या कामाचा लेखाजोखा कुठल्याही बातमीमध्ये येणार नाही. त्यांना कुठलाही पुरस्कार कोणी देणार नाही; परंतु त्यामुळे त्यांची समर्पण वृत्ती मात्र कमी होत नाही. त्यांची सेवा वृत्ती मात्र अक्षुण्ण राहते. याला कारण नेमकं काय असेल? त्यांच विद्यार्थ्याविषयीचं प्रेम.

शिक्षकाविषयीचा आदर कमी होण्याचे हे दिवस आहेत. द्रोणाचार्यांसारखा महान शिक्षक इतिहासात झालेला नाही. परंतु त्यांनी कौरवांना शिकवण्याचं कंत्राट घेतलं आणि शिक्षक एकदा कंत्राटी झाला की त्याला दमदाटी सुरु होते. दमदाटी सुरू झाली की त्याच्या मागे आटाआटी लागते आणि मग त्याच्या हातामध्ये भिक्षेची नरोटी येते.

द्रोणाचार्यांना मनात असूनही एकलव्याला शिक्षण का नाकारलं? त्याला कारण आहे त्यांचं कंत्राट. ते कुरूंसोबत कराराने बांधलेले होते. एकलव्य ज्या राज्याचा मांडलिक होता ते मगधाचं राज्य हे कुरूंच्या शत्रुचं राज्य होतं; म्हणून शत्रूपक्षाच्या राजकुमाराला मला शिकवता येत नाही. मी कंत्राटाने बांधला गेलेला आहे; म्हणून द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवायला नकार दिला. (आज काही कथित विद्वान(?) द्रोणाचार्यांवर अभिजन विरुद्ध बहुजन अशा प्रकारच्या भेदभावाचे लांछन लावतात. हीन कुळातील असल्यामुळे द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिक्षण नाकारलं असा जावईशोध लावतात.) वास्तविक करारबध्द असल्याने त्यांना आपल्या मनाप्रमाणे निर्णय या बाबतीत घेता आलेला नाही. पगारी शिक्षक परतंत्रच असतो हा इतिहास आहे. जिथे द्रोणाचार्यांची ही अवस्था तिथे आजच्या काळातल्या आमच्या शिक्षकांची काय कथा?

शिक्षकांविषयी नकारात्मक बोललं जात असताना, जिकडेतिकडे नकारात्मक वातावरण असताना त्याचा परिणाम स्वतःवर न होऊ देता त्या नकारात्मकतेच्या वादळामध्येही आपला इवलासा प्रकाश देणारे हे पणतीरूप गुरूजण आपल्या मनामध्ये घर करतात. व्रतनिष्ठ शिक्षकांचं चांगुलपण कोणी पाहत नाही. चांगला शिक्षक कधी अधिकाऱ्यांच्या मागे पुरस्कारासाठी हिंडत नाही, कधी पत्रकारांच्या मागे बातमी यावी म्हणून फिरत नाही; पण म्हणून चांगले शिक्षक नाहीतच असा त्याचा अर्थ नाही.

असे कितीतरी शिक्षक आहेत की ज्यांची नावे इतिहासाला माहित नाहीत; पण त्यांनी समाजासाठी खूप काही केलेले आहे. समाजाची संस्कृती आणि समाज शिक्षकांमुळेचउभा आहे. चाणक्याने विचारांच्या आधारावर चंद्रगुप्त उभा केला. चाणक्याला विचार देणारे शिक्षकइतिहासाला माहीत नाहीत. वेद ऋषींनी लिहिले असे आपण म्हणतो पण हे ऋषी म्हणजे तरी कोण? शिक्षकच. महाकाव्य लिहिणारेही शिक्षकच. नवनवीन शोध लावणारे, मानव्याला अधिक उंचीवर नेणारे, मानवी संस्कृतीचे उत्थान घडवून आणणारे शिक्षकच. शिक्षक दिनाच्या निमित्ताने या निस्वार्थ शिक्षकांनाही नमस्कार करायला हवा. त्याच शिक्षकांची परंपरा आज अनेक अनामिक शिक्षक चालवत आहेत. त्यांना कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा नाही. खरंतरं सच्च्या शिक्षकाचा सन्मान करण्याचं सामर्थ्य कोणत्याच पुरस्कारात नाही. त्याना कृतज्ञतापूर्वक नमस्कार हाच खरा पुरस्कार.

म्हणूनच माऊली म्हणतात, “म्हणोन जाणतेनो गुरू भजिजे | तेणे कृतकार्य होईजे||”

अशा अज्ञात, अनामिक, निरपेक्ष, निरकांक्ष शिक्षकांच्या चरणी हे छोटेसे वाङमयीन पुष्प समर्पित.

– रमेश वाघ, नाशिक
९९२१८१६१८३

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

8 Comments

  1. श्री रमेशजी वाघ सर यांच्या भावनिक लेखनीतून पांढऱ्या शुभ्र पटलावर उमटलेला एक एक शब्द वास्तविकतेचे दर्शन घडवतो. त्यांची जशी लेखणी आहे तशीच वाणी पण आहे आणि अगदीच विचार सुद्धा.
    निरपेक्ष सेवा करणाऱ्या या विचारवंत गुरूस मानाचा मुजरा…

  2. व्व्व्वा! खूपच मर्मस्पर्शी लिहलंय सर!
    मनापासून अभिनंदन! !
    विद्यार्थ्यांना केवळ शिक्षित, सुशिक्षित न करता सुसंस्कृत विद्यार्थी घडवणाऱ्या सेवाभावी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
    🙏🙏

  3. छान लेख लिहिला सर. मानवी जीवनात गुरुचे स्थान फार मोठे आहे. तो निस्वार्थीपणे सेवा करीत असतो.

  4. खूप खूप सुंदर असा लेख आहे. आजच्या युगात जे पुरस्कार दिले जातात ते बहुतेक जे पुढारी असतात त्यांचे काम शून्य असत त्यांना ही खरोरच चपराक आहे.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!