मना सत्य संकल्प जिवी धरावा!

आचार्य गोविंददेव गिरी यांचा जांब येथील प्रबोधन मंत्र

आचार्य गोविंददेव गिरी यांचा जांब येथील प्रबोधन मंत्र
‘साहित्य चपराक’ मासिक मार्च 2020

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मिकीसारखा मान्य ऐसा
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा

जयजय रघुवीर समर्थ

तुम्हाला असं वाटत असेल की मी काही उपदेश करण्याकरिता, चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने ज्ञानामृताचे डोस पाजण्यासाठी आलोय तर ते मनातून काढून टाका. खरी गोष्ट अशी आहे मी केवळ, केवळ आणि केवळ जांबच्या मातीला वंदन करण्याकरिता आलेलो आहे. हे मी केवळ या ठिकाणी आज बसलोय म्हणून बोलत नाही. सर्वात पहिल्यांदा मी जांबेला आलो ते 1980 या वर्षी आणि मुद्दाम मानवतला असलेल्या भागवत सप्ताहामध्ये तिथल्या लोकांना मी सांगून निघालो की मला फक्त जांबेला जाऊन यायचंय.

का जाऊन यायचंय? माझ्यावरती जे संस्कार आपल्या कोणालाही काही वाटत असतील तर त्या सर्वांमध्ये सर्वात अधिक उपकार माझ्यावर आहेत ते श्रीसमर्थांच्या दासबोधाचे! कसे ते मी नंतर सांगेन पण या मातीला वंदन करण्याकरिता आल्यानंतर मंदिरात तर मी साष्टांग नमस्कार केला खरा पण माती म्हणजे नुसती माती नसते मातीतील माणसं सुद्धा तितकीच मोलाची असतात. देवी भागवतामध्ये देवीच्या क्षेत्रात गेल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या प्रत्येक जीवजंतूचा सन्मान चैतन्याची अभिव्यक्ती म्हणून केला पाहिजे असं सांगितले आहे आणि त्यामुळे जांबेतल्या प्रत्येक नागरिकाचाच मी सन्मान करणं, त्यांना मी नमस्कार करणं आवश्यक आहे. या वस्त्रांची एक मर्यादा असल्यामुळे नमस्कार हा शब्द बाजूला ठेवू पण त्यांची पूजा तर मला करता येईल. कशी करावी? कोणाची करावी? जांबेतल्या सगळ्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून असलेल्या आमच्या माननीय सरपंचताईंचा मी सन्मान करतो. त्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांचाच सन्मान करू इच्छितो.

गंगा नदी खूप विशाल असते. तिचं पात्रही विशाल असतं. आपण काही तिच्या प्रत्येक कणाची पूजा करत नाही तर गंगा किनारी बसून एका स्थानाची पूजा केली म्हणजे ती गंगेची पूजा झाली. तसं या ताईचा सत्कार केल्यावर मला सार्‍या जांब गावाचा सत्कार केल्याचं समाधान लाभलं आहे. म्हणून या मातीला वंदन करण्याकरिता मी आलो. त्यानिमित्तानं थोडं बोलणंही आवश्यक आहे. समारोपाच्या या प्रवचनाची जी माझी वेळ या पत्रिकेत छापलेली आहे ती पूर्ण होऊन गेली आहे. तरीही मी आपला वेळ घेऊन माझं किंचितस चिंतन आपल्यापुढे मांडणार आहे. सात लक्षांहून अधिक खेडी आपल्या देशात आहेत. प्रत्येक ठिकाणची माती मला काही कपाळाला लावाविशी वाटत नाही. तशी भारतमातेच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातील माती ही वंदनीयच आहे. या देशातल्या कणाकणामध्ये देवाचा, दैवी शक्तीचा निवास आहे. त्यामुळे ती भाळी लावताना आपलं मन श्रध्देने भरून येते. हे सत्य असलं तरी काही ठिकाणं विशिष्ठ आहेत. सात लक्ष खेड्यामध्ये सगळी खेडी काही जगाला माहिती नाहीत पण जांब नावाचं छोटसं गाव जगाला आता कळू लागलंय आणि हे लक्षात ठेवा या गावाची पुण्याई तर खूप आहेच पण चैतन्य ज्ञानपीठाच्या परिश्रमाने काही वर्षांच्या पश्चात आपण बघत आहोत की जगात सगळीकडे जांब गावाची ओळख झालेली दिसेल. स्थानं सगळीच सारखी असतात पण काही स्थानांच्यामध्ये विशिष्ठ तेजाचा आविर्भाव होतो आणि तो त्या ठिकाणी जन्माला आलेल्या अध्यात्मिक विभूतींच्या माध्यमातून होतो. संतांच्या माध्यमातून होतो. जगाच्या पाठीवर संतांची परंपरा सगळीकडे आहेच. भारतात तर ती सर्वात जास्त आहे आणि त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे आणि महाराष्ट्रातही ती मराठवाड्यात सर्वात जास्त आहे.

मी हे केवळ इथे आलोय म्हणून बोलत नाही. थोडा इतिहासाचा मागोवा घेतला तरी लक्षात येईल मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीनं दिलेल्या संतांच्या मध्ये संपूर्ण या भागवत धर्माचा ध्वज म्हणून शोभावा अशा प्रकारचा नारायण नावाचा मुलगा या ठिकाणी जन्माला आला. भक्तीमार्गाचं दुसरं नाव आहे भागवत धर्म. आपल्याकडे अशाप्रकारे संतांची परंपरा आहे. अलीकडच्या सहस्त्रकामध्ये महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ इथपासून या परंपरेची आपल्याला माहिती उपलब्ध होते. श्री ज्ञानेश्वर महाराज हे अत्यंत प्रतिभावंत. ज्ञानेश्वरीसारखी प्रतिभा आपल्याला इतर कुठल्याही ग्रंथात मिळणार नाही. ज्ञानेश्वरी हा जगाचा असा ग्रंथ आहे की उत्तमोत्तम ग्रंथांची मोजणी सुरू केल्यानंतर ज्ञानेश्वरीचं नाव घेतल्यानंतर दुसरं नाव घेण्यासाठी त्या तोडीचा दुसरा ग्रंथ नाही आणि पुढेही निर्माण होण्याची शक्यता नाही. अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी प्रतिभेचा विलास विलक्षण आहे. विचार करा आतासुध्दा आपल्याला प्रवास करायचं म्हटलं तर अवघड जातं. 700 वर्षापूर्वी या मराठवाड्यात जन्माला येऊन पंढरपूरला गेलेल्या आणि त्या पंढरीनाथाचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेऊन पंजाबपर्यंत पोहोचलेल्या नामदेवरायांनी जो प्रचार केला त्याला जगाच्या पाठीवर तोड नाही. शुध्द नामदेवांची किती मंदिरं महाराष्ट्रात असतील सांगा? मी स्वतः पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधून 100 पेक्षा अधिक मंदिरांची सूची मला ठाऊक आहे.

केवळ नामदेव आहेत. एखाद्या व्यक्तीनं इतक्या प्राचीन काळी इतक्या दूरवरती जाऊन भक्तीचा डांगोरा पिटणं आणि शिखांच्या असलेल्या गुरूग्रंथसाहेबामध्ये त्यांचे 64 अभंग स्वीकृत व्हावेत असं लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवणं दूरपास्त आहे. संत तुकोबारायांची भक्ती अतिशय विलक्षण आहे. एका शरणागतीच्या बळावरती त्यांनी सद्गुरू नसताना, शास्त्रांचं चिंतन नसताना पंधरा दिसामाजी निराकार विठोबाचा साक्षात्कार झाला. हा त्यांचा अनुभव आहे. या मराठवाड्यातल्या पैठणला गेलात तर नाथांचा प्रपंच बघा कसाय? प्रपंच आणि परमार्थ आणि प्रपंचही अव्यंग आणि परमार्थही परिपूर्ण अशा प्रकारचा. जगाच्या पाठीवर असं उदाहरण मिळणार नाही नाथांच्यासारखं. या चारही संतांच्या सगळ्या भूमिकांना आपल्या कवेत घेऊन जन्माला आलेलं ते बाळ ज्याचं नाव नारायण. ज्याला पुढे लोकांनी रामदास स्वामी म्हणून संबोधिलं त्याची ही जन्मभूमी. समर्थांच्या जीवनामध्ये, समर्थाच्या उपदेशामध्ये सर्वात मोठ वैशिष्ट्य असं की अन्य संतांनी जे सांगितलं ते तर समर्थांनी सांगितलं आहेच पण जे अन्य संतांनी सांगितलं नाही असंही समर्थांनी खूप सांगितलं आहे. समर्थ व्यापक आहेत. त्यांनी सगळं काही पाहिलंय.

हा महाराष्ट्र अन्य संतांच्या कृपेनं वैष्णव मंडळात त्याच्यावर झालेल्या आपत्ती त्या सोसता कशा येतील, त्याच्याकरिता कसा आपला कस वाचवून ठेवायचा आणि आघातातही आपण बिघडायचं नाही, धर्मांतरीत व्हायचे नाही, धर्मापासून विचलित व्हायचे नाही ही सहनशक्ती, सहिष्णुता सर्व संतांनी वाढविली. ज्याने या समाजावरती, देशावरती, धर्मावरती जी संकटं येतील त्याचा निप्पात कसा केला पाहिजे ही प्रतिकारक्षमताच माझ्यामध्ये वाढणं आवश्यक आहे. याला म्हणतात सहिष्णुता. आम्ही केवळ जगलं नाही पाहिजे तर आम्ही विजयी झालं पाहिजे. हा विजयाचा महामंत्र या देशाला देणारा पहिला संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी होय. संतांनी आपल्या साधनेतून, आपल्या देशाटनातून आणि आपल्या सत्संगातून जे काही मिळालं त्या सर्वांच्या पायावरती जे कार्य केलं चाफळपासून त्या कार्यामध्ये आराध्य म्हणून भगवान श्रीराम होते. तुम्हाला सगळ्यांना रामकथा ठाऊक आहे. रावणानं सगळ्या देवांना बंदिवान केलं. देवांना सेवेला ठेवलं. गणपतीला गाढवं चरवण्यासाठी ठेवलं, अग्नीला सगळयांची वस्त्र धुण्याकरिता ठेवलं, वायुला लंका स्वच्छ करण्याकरिता ठेवलं यात मूळ मुद्दा असा की रावणानं सर्व देवांना ताब्यात ठेवलं. सगळे देव ज्याच्या नियंत्रणात असा हा रावण 400 वर्षापूर्वी जेव्हा समर्थांचा, छत्रपती शिवरायांचा अवतार झाला तेव्हा स्थिती अशाच प्रकारची होती. सत्ताधीश यवनांचे गुलाम झालेले होते. विद्वान लोक यवनांचे गुलाम झालेले होते. इतका मोठा विद्वान लेखक पंडितांचा पंडित ‘पंडितराज’ अशी ज्याची पदवी असा तो जगन्नाथ. तो लिहितो काय तर मालक दोनच, एक परमात्मा आणि दुसरा बादशहा. सुशिक्षित कशाप्रकारे विकले जाऊ शकतात त्याचे हे उदाहरण आहे. हे सगळे विकले गेलेले होते. सामान्य जनता पिचली होती. अशावेळी समर्थांनी एक दिवा लावला आणि त्या प्रेरणेच्या दिव्याला समर्थांनी त्यांच्या आराध्याचं नाव दिलंय प्रभू रामचंद्र.

त्यावेळी बंदिवासातील देवांना सोडविण्यासाठी रामचंद्रांनी पुरूषार्थ केला त्या रामाचा दास मी असलो तर मला सुद्धा याकाळी बंदिवासात असलेल्या अनेक लोकांना त्यांना कह्यात ठेवणार्‍या सत्ताधिशांच्या तावडीतून सोडविता येईल. काय गंमत आहे. समर्थांनी दोन देवांचं दर्शन रोज घ्या असं सांगितलंय एक सूर्यनारायण आणि दुसरं हनुमानाचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे तेजाची आणि शक्तीची उपासना केली पाहिजे तरच समाज तरतो हा समर्थांनी मंत्र दिला. जेव्हा समाज पराभवाच्या गर्तेत पडला होता तेव्हा त्याला विजयाच्या दिशेनं नेण्यासाठी ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही घोषणा दिली. देवाला अनेक वचने देता येतात की तो मायाळू आहे, पतितपावन आहे, कनवाळू आहे, शुध्दात्मा आहे सगळं म्हणता येतं पण समर्थांना त्याचा गुण सांगायचाय तो त्याचं सामर्थ्य. देव समर्थ नसेल तर माणसं समर्थ कशी होणार?

समर्थांनी रामाला समर्थ म्हटलंय पण त्यांच्या तोंडून आलेल्या समर्थ समर्थ शब्दामुळे आपण त्यांना समर्थ म्हणायला लागलो. उद्या असं पण व्हायला हवं की समर्थ समर्थ म्हणता म्हणता या जांबेतून लोकांनी ज्यांना समर्थ म्हणावं असे कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत कारण हा या मातीचा गुण आहे. जेव्हा इथे काही नव्हतं तेव्हा समर्थ आले. आता तर पुष्कळ अनुकुलता निर्माण झालीये. या अनुकुलतेचा लाभ घेऊन असा निश्चय करता आला पाहिजे की मी स्वतः माझ्या जन्मभूमीचे पांग फेडीन. हा समाज सावरेन. समाजाचे अनेक प्रश्न आहेत.
आत्ता आपण त्याबद्दल ऐकत होतो. आपल्या देशात प्रश्न अनेक आहेत. सर्वात भेडसावणारा प्रश्न म्हणजे कांदा. एका कांद्याची चर्चा इतकी व्हावी. त्याच्यावाचून आपल्याला राहता येणार नाही असं काही आहे का? मुळात मुद्दा असा आहे की जे लोक अत्यंत क्षूद्र प्रश्नात स्वतःला ओवून घेतात त्यांना मोठमोठ्या प्रश्नांचा विचार करण्याइतका वेळच राहत नाही. म्हणून आपल्याला समाजातील मोठमोठ्या प्रश्‍नांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पाण्याचा प्रश्न आहे. पर्यावरणाचा प्रश्न आहे, आपल्या माता-भगिनींचा प्रश्न आहे.

या सर्व गोष्टींमधून वाट काढायची असेल तर सगळ्यात पहिलं घडवावं लागेल चरित्रवान कार्यकर्ता. कुठल्याही योजना आणून हे प्रश्न सुटत नाहीत. माणसं बदलावी लागतील आणि ती अंतःकरणातून बदलावी लागतील. त्यांच्या सवयी बदलाव्या लागतील. त्यामुळे आपला भविष्यकाळ बदलेल. समर्थांनी समाज घडविला आणि तो घडविण्यासाठी त्यांनी भगवान श्रीराम हे आराध्य आणि हनुमान आदर्श, जय जय ऱघुवीर समर्थ ही गर्जना आणि श्रीराम जय जय राम हा मंत्र दिला. ज्याला सगळीकडे जय जयकार दिसतो त्यालाच देशाचा विजय घडवून आणता येतो. माणसं केव्हा हरतात तर त्यांचे मन हरत तेव्हा ती हरतात. एखाददुसरं येणारं अपयश महत्त्वाचं नसतं. कुस्तीत खाली पडून पाठीला माती लागली की तो खेळाडू आऊट होतो. बॉक्सिंगमध्ये तसं नाही. यात खेळाडू खाली पडला आणि त्याने उठायला नकार दिला तरच तो आऊट होतो. तसं हा समाज खाली पडला असेल पण तो उठायला नकार देणार नाही तर तो परत उठेल आणि जग पादाक्रांत करेल. असा समाज घडविण्याकरिता समर्थांच वाङ्मय उपयोगी आहे. कधी कधी लोक चर्चा करतात शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ होते की नाही? ते होते त्याबद्दल मला शंका नाही. आता मी व्यासपीठावरून शिवाजी महाराज सांगणार आहे. प्रभू रामचंद्रांनंतर श्रीकृष्ण आणि त्यानंतर एकदम शिवाजी महाराजच. समर्थांनी छत्रपतींचं जे वर्णन केलंय त्याला तोड नाही. समर्थांनी त्यांना श्रीमंतयोगी म्हटलंय. मुद्दा असा की समर्थ छत्रपतींचे गुरु होते की नाही ही चर्चा तुम्ही करत रहा. माझा मुद्दा वेगळा आहे. जर छत्रपतींसारखे चरित्रवान वीर निर्माण करावयाचे असतील तर केवळ आणि केवळ समर्थांच वाङ्मय तितकं उपयोगी आहे हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

400 वर्षांपूर्वी 1100 मठ निर्माण करणार्‍या समर्थांनी एक आग्रह धरला की प्रत्येक मठामध्ये तीन गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे हनुमानाचं मंदिर असलं पाहिजे, दुसरी गोष्ट व्यायाम शाळा असली पाहिजे, तिसरी गोष्ट ग्रंथालय असलं पाहिजे. म्हणजे ह्या महापुरुषाला किती दूरदृष्टी होती पहा. कारण त्यांना ठाऊक होतं की या जगात मूल्य केवळ ज्ञानाचं आहे आणि ज्ञानार्जनाचं साधन ग्रंथ आहे. शिवाय तो ठोशास ठोसा देणारा असला पाहिजे. मनुष्याच्या मनगटात शक्ती आणि डोक्यात युक्ती असली पाहिजे. तेव्हा तो काहीतरी करू शकेल. समर्थानी निर्माण केलेल्या वाङ्मयाची तोड जगात कुठेही नाही. जितके विषय समर्थांनी हाताळलेत तितके विषय महाभारतातील व्यासांखेरीज इतर कुणी हाताळले आहेत? किल्ला कसा बांधावा, बोरू कसा तासावा, लिहायला कसं बसावं, रोज काहीतरी लिहावं, वाचावं हे फक्त समर्थ सांगतात. व्यक्तिचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक घर आदर्श बनले पाहिजेत. सगळा समाज सावरला पाहिजे आणि राष्ट्र उभं करता आला पाहिजे.

समर्थांच्या या भूमिकेत कुठेही आक्रमकता नाही. त्यावेळच्या आक्रमक वातावरणात कोण उपासना करू शकेल, कोण ज्ञानार्जन करू शकेल म्हणून अशावेळी समाजाला धीर देणं गरजेचं असतं आणि समर्थांनी ते काम केलं. घाबरू नका, तुम्ही समाप्त होणार नाही, तुम्ही परत उभे रहाल हे सांगितले. त्यासाठी मनुष्यातील आत्मविश्वास जागवला. हे सगळं समर्थांनी दासबोधातून सांगितलंय. दासबोधासारखा ग्रंथ दुसरा झाला नाही. ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ नाहिये. ती भगवद्गीतेवरील टीका आहे. नाथांचं एकनाथी भागवत ही भागवतावरील टीका आहे. तुकारामांची गाथा ही अभंगांचं संकलन आहे. समर्थांना भक्ती हवी होती. हा समाज भक्तीमान बनला पाहिजे. भक्तीमान समाज टिकतो, सर्वांना सुखी करतो. समाजाची अत्यंत वाईट सवय असते, नुसत्या चर्चा करत राहण्याची, एकमेकांचे पाय ओढण्याची. आज मात्र आवश्यकता आहे भक्तीने जगाच्या मांगल्याकरिता एकदिलाने काहीतरी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येकाने तसा संकल्प करायला हवा. असा संकल्प सतत गिरवित राहिलो तर आपले पाय त्या दिशेने आपोआप चालू लागतात. शुद्ध मनाने संकल्प केला तर तो परमात्मा कृपेचा वर्षाव करतो. समर्थ म्हणतात ‘भाग्यासी काय उणे रे प्रयत्ना वाचुनि राहिले’ प्रथम आपण प्रयत्न केला पाहिजे मग देव आपोआप अनुकूल होईल. मला वाटतं या समारंभाची सांगता करताना सगळ्यांनी संकल्प करावा तो असा ‘प्रभू रामचंद्र आणि समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करून आम्ही प्रत्येकाच्या बुद्धी, शक्ती व क्षमतेनुसार तन, मन, धनपूर्वक यथाशक्य संकल्प करतो की रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांब समर्थ हे जागतिक प्रेरणा केंद्र होईल. नालंदा, तक्षशिला या धरतीवर चैतन्य ज्ञानपीठ उभे राहिल व कार्यरत होईल. जय जय रघुवीर समर्थ!’

हा संकल्प आपल्या जीवनाचं सातत्यानं सोनं करत जाईल. हे मी सांगतोय कारण मी लहानपणापासून दासबोधाचे दोन समास वाचत आलो. आधी त्यांचा आग्रह म्हणून व नंतर माझी आवड म्हणून मी ते करत गेलो तसं तसं लक्षात आलं हे तर जीवनाचं सोनं आहे. दसर्‍याला सोनं लुटतात ना पण खरं सोनं लपलंय ते दासबोधात! हे सर्व सोनं सगळ्यांना गवसो. आपलं जीवन सुवर्णमय झळाळीनं तेजस्वी होवो आणि यातून आपल्या राष्ट्राचं, संपूर्ण जगाचं मांगल्य घडो अशी प्रार्थना करतो.
जय जय रघुवीर समर्थ!

‘साहित्य चपराक’ मासिक मार्च 2020

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा