दखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह

दखलपात्र : वाचनीय अग्रलेख संग्रह

माझ्या ‘दखलपात्र’ या अग्रलेख संग्रहाच्या दोन आवृत्या संपल्या. अनेक वाचक या पुस्तकांवर अजूनही अभिप्राय कळवतात. या पुस्तकानं मला अनेकांच्या मनात आणि हृदयात स्थान दिलं. आज दैनिक ‘पुण्य नगरी’च्या ‘मी आणि माझं वाचन’ या सदरात ज्येष्ठ लेखक श्री. दिलीप देशपांडे यांनी ‘दखलपात्र’विषयी लिहिले आहे.
दिलीप देशपांडे सर, ‘पुण्य नगरी’चे संपादक श्रीकांत साबळे सर आणि पुरवणी संयोजक स्वप्नील कुलकर्णी यांचे आभार!

– घनश्याम पाटील

दखलपात्र : वाचनीय अग्रलेखसंग्रह
घनश्याम पाटील यांचे ‘दखलपात्र’ हे पुस्तक अलीकडे वाचण्यात आले. साप्ताहिक चपराक आणि चपराक मासिकात त्यांनी वेळोवळी लिहिलेल्या पंचेचाळीस अग्रलेखांचा हा संग्रह आहे.

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब त्या अग्रलेखात उमटलेलं असतं. तसंच घनश्याम पाटील यांच्या लिखाणात आपल्याला दिसून येतंय.

ही लढाई जिंकलीच पाहिजे, सद्गुणांचा स्फोट अटळ, तडकलेली कळी – माणुसकीचा बळी, विधायक विचारांचा जागर घाला, एक पट्टेवाला, भांडकुदळ अप्रिया, वरुन कीर्तन आतून तमाशा, कणा नसलेले पृथ्वीराज, अपने देश का सिस्टिमही ऐसा है, पुण्यभूषण सुधीर गाडगीळ, साहित्य संमेलन, लोककवी मनमोहन हे व यासह सर्वच लेख वाचकांच्या पसंतीला उतरतील असे आहेत.

आपल्या पहिल्याच लेखात ते म्हणतात ‘‘माणसाने माणूस म्हणून जगावे यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत. माणसातील वाढलेली हैवानी प्रवृत्ती आम्हाला अस्वस्थ करते. आजूबाजूच्या परिस्थितीने तो तसा होतो. प्रबोधन आणि संस्कार यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
‘‘महापुरुषांच्या स्मरणाचे आम्ही नाटक करतो पण त्याच्या कार्यातून प्रेरणा मात्र घेत नाही. मग हे नाटक कशाला?’’ असा प्रश्न ते उपस्थित करतात. समाजातल्या विधायक शक्ती सद्हेतुने एकत्र आल्यास सद्गुणांचा स्फोट अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करतात.

आज शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत ब्राह्मण समाजावर टीका केली जाते. झोडपले जाते पण महाराष्ट्रातील दूरदृष्टीचे नेते स्व. यशवंतराव चव्हाणांनी ब्राह्मणांची क्षमता ओळखूनच तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशी याना सांस्कृतिक क्षेत्रात पुरेपूर संधी देऊन कृतीतून ही गोष्ट दाखवली… ही बाब आपल्या ‘ब्राह्मणद्वेष थांबवा राष्ट्र वाचवा…!’ ह्या लेखात नमूद केली आहे, तर साहेबाला खूश ठेवणे हे पट्टेवाल्याचे काम असते. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणार्‍या सुशीलकुमार शिंदे ह्यांच्या एकूणच राजकीय कारकीर्दीवर भाष्य ‘एक पट्टेवाला..!’ ह्या लेखात केले आहे. वरुन कीर्तन आतून तमाशा ह्या लेखात गृहमंत्री आर. आर. पाटलांची शरदनिष्ठा – बेवड्या मल्लाचे बियरबार उद्घाटनाचे प्रसंगातून दाखवली आहे… फाजिल निष्ठेपुढे पदाची जाण विसरणारे पुढारी…

सर्वच लेखातून त्यांची हीच भूमिका आहे की –

समाजात जे काही चांगलं घडतंय ते सर्वांसमोर आणणे आणि वाईटाचा नाश करण्यासाठी त्यावर प्रहार करणे! पण केवळ झोडपणे, प्रहार करणे एवढाच त्यांचा उद्देश नसून चांगलं ते स्वीकारण्याची आणि भरभरुन कौतुक करण्याची गुणग्राहकताही ते दाखवतात. पुण्यभुषण सुधीर गाडगीळ, अण्णा धन्यवाद सारख्या लेखातून हे दिसून येते.

अग्रलेखांची शीर्षकेही समर्पक आहेत. कविता, संतवचनाचा वापरही प्रभावी ठरतो.

मुखपृष्ठही आकर्षक, अर्थपूर्ण आहे.

घनश्याम पाटील आपल्या मनोगतात म्हणतात ‘‘मी कुणाचेही थेट शिष्यत्व स्वीकारले नाही; मात्र हयात असलेल्या, नसलेल्या दिग्गज पत्रकारांची देदीप्यमान कामगिरी समोर ठेवली. त्यांच्याविषयी वाचन केले. बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडिलकर, बाबा शिंगोटे यांच्याविषयी मला अतिशय प्रेम वाटते. हे प्रेम भाषा आणि कर्तबगारी अशा आघाडीवरचे आहे.’’

दखलपात्र हे घनश्याम पाटलांचे पहिलेच पुस्तक. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी वाचनानंतर बक्षीस दिल्याचेही ते आपल्या मनोगतात नमूद करतात. ‘दखलपात्र’ला माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस ह्यांची दीर्घ अशी प्रस्तावना लाभली आहे. इंदापूर येथून राहुल सवणे नावाच्या भंगार विक्रेत्याने ‘दखलपात्र’ व त्याची प्रस्तावना आवडल्याचा आपल्याला व घनश्याम पाटलांना फोन केल्याचे एका कार्यक्रमात श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. त्याचा गुलाबपुष्प व शंभर रूपये देऊन सत्कार केला.

आज चपराक साप्ताहिक, चपराक मासिक आणि चपराक प्रकाशन अशी वाटचाल सुरु आहे. वर्षात 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यात कथा, कादंबरी, शेती, क्रीडा, ऐतिहासिक, ललित, विज्ञान अशा सर्व विषयांचा समावेश आहे.

त्यातील काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चपराकचा वाचनीय साहित्यानी भरलेला भरगच्च असा दिवाळी महाअंक दिवाळीच्या दिवसात एक वेगळाच आनंद देतो. दखलपात्रचा दुसरा भाग लवकर प्रकाशित व्हावा ही अपेक्षा. चपराकच्या वाटचालीस शुभेच्छा..!


दिलीप देशपांडे

कात्रज, पुणे.
9960365201

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा