दबंग सखी

दबंग सखीमाझ्या शेजारी बसलेल्या थोरात वहिनी म्हणाल्या, ‘‘अगं! त्या पुढच्या सीटवर बसलेला तो पुरुष आहे का स्त्री आहे?’’ मग माझेही कुतूहल चाळवले पण तसं विचारणं असभ्यपणाचं ठरलं असतं म्हणून मी देखील अनभिज्ञता दाखवित गप्प बसले.
दुपारी जेवणासाठी आमच्या गाड्या एका हॉटेलवर थांबल्या आणि सर्वजण वॉशरुमकडे धावले. ‘तो’ किंवा ‘ती’ देखील महिलांच्या रांगेत येऊन उभी राहिली. आता मात्र थोरात वहिनींना राहवले गेले नाही. त्या म्हणाल्या, ‘‘अगं! तो बघ, चक्क महिलांच्या रांगेत उभा राहिलाय. त्याला सांग पुरुषांची रांग पलीकडे आहे.’’

आता मात्र चांगलीच विचित्र अवस्था झाली होती पण ‘तसे’ सांगण्याचे धाडस कोणातच नव्हते. ‘तो’ मात्र बिनधास्त, निर्विकार चेहर्‍याने रांगेबरोबर पुढे-पुढे सरकत होता. आमच्या मनातील खळबळ, प्रश्‍न, आशंका त्याच्या गावीही नव्हत्या. शेवटी ‘वॉशरूम’ मोहीम तशीच आटोपली आणि आम्ही जेवणाच्या टेबलांकडे धाव घेतली. उदरभरण झाल्यावर सर्वजण आपापल्या बसमध्ये, आपापल्या जागी स्थानापन्न झालो आणि माझ्या डोक्यात ती किंवा त्याचे जेंडर शोधून काढण्याची नामी शक्कल निर्माण झाली. गाईडच्या हातातील माईक घेऊन ‘बसमधील सर्वांनी आपापली ओळख करून द्यावी’ असे मी आवाहन केले आणि सर्वात पुढे बसलेल्या त्याने ‘‘मी अल्पना पवार, लेडी बाऊन्सर, अजिंक्य महिला संस्थेची संस्थापक’’ म्हणून ओळख करून दिली आणि आमच्याबरोबरच्या सर्व पुरुषांसह आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि एकच हशा पिकला. त्यात ‘ती’ही सहभागी झाली आणि सकाळपासून जागृत झालेले कुतूहल, शंका निरस्त झाले. वातावरण खेळीमेळीचे झाले आणि मग सुरु झाला मनोरंजनाचा कार्यक्रम. त्यात पुढाकार घेतला आमच्या या मर्दानी बाऊंसरने. मग काय! बसमध्येच धमाल उडवून दिली. झिंग झिंग झिंगाट, रिक्षावाला, शांताबाई काही कोळीगीतानंतर डान्स सुरु झाला.

तिच्याबरोबर आम्हीही ताल धरला. तुफान नाचलो आणि क्षणात बसमधील सारेजण जीवाभावाचे मित्र बनलो. मग पुढील चार दिवस अल्पना आमचा ‘हिरो’ बनली आणि मग बस काय, बीच काय कोठेही जी धमाल केली; तो एक अविस्मरणीय असा जतन करून ठेवण्यासारखं संचित झालं.

अल्पना शंकर पवार! पूर्वाश्रमींची अल्पना प्रतापराव जाधव. लहानपणापासूनच गुटगुटीत, बाळसेदार व्यक्तिमत्त्व! मुलगी असूनही आवड मात्र मुलांच्या पेहरावाची. दंगामस्ती देखील एखाद्या खोडकर व्रात्य मुलासारखी. घरी काय, शाळेत काय सगळीकडेच दादागिरी, मारामारी हे नित्याचेच उद्योग! असतात काही मुलं व्रात्य, उधम करणारे. दंगामस्ती करणं फक्त मुलग्यांचाच प्रांत असतो असं नाही. मुली पण दंगेखोर असू शकतातच ना? शिवाय अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होणे, अत्याचाराविरुद्ध बंड पुकारणे हे तर क्षत्रियत्वाचं लक्षण! वयपरत्वे होईल हा बंडपणा कमी असा घरच्यांना-शिक्षकांनाही विश्‍वास म्हणून फारसा दबाव अल्पनाच्या वर्तनावर कोणी आणला नाही; कारण लहानपणी जरी भांडणे-मारामार्‍या कोणत्याही क्षुल्लक कारणांनी होत असल्या तरी पुढे-पुढे त्याची परिणीती अन्याय, अत्याचार अयोग्य अशा गोष्टींसाठी लढण्यासाठी होऊ लागली. एक मर्दानी व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येऊ लागलं. समाजातील वाईट, विघातक गोष्टींच्या निर्दालनासाठी तसंच कणखर, लढाऊ जरब बसवणारं व्यक्तिमत्व हवं तरच अनिष्ट गोष्टी करणार्‍याला, त्याच्या कारवाईला, कृत्यांना धाक आणि पायबंद बसतो हे अल्पनाला कळून चुकलं होतं. लहानपणीच जीवनाचं उद्दिष्ट निश्‍चित झालं होतं. आपण जे काही करतोय, वागतोय ते एका चांगल्या उद्दिष्टासाठीच करतोय, याची जाणीव अल्पनाला होती, त्याचप्रमाणे तिचं व्यक्तीत्व विकसित होत होतं.

आता अल्पना 14 वर्षांची झाली होती. पुढे शिकायची इच्छा होती. ज्या ठिकाणी तिच्या व्यक्तिमत्वाला साजेसं पोलीस अथवा तत्सम खात्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची तिची इच्छा होती पण आजीच्या इच्छेसाठी म्हणून अल्पनाला शंकरराव पवार यांच्याशी विवाहबद्ध व्हावं लागलं अन् एक धाडसी, मर्दानी, व्यक्तिमत्व कुणाची पत्नी, कुणाची सून, काकी-मामी, वहिनी म्हणून संसारी झाली. थोड्याच दिवसात तिच्या संसारवेलीवर एक फूल उमललं. ती आई झाली. लढवय्यी तरुणी वात्सल्यसिंधू आई बनली. गृहस्थी, बाळाचे संगोपन यामध्ये दिवस व्यतीत होऊ लागले पण मुळचा स्वभाव स्वस्थ बसू देईना. समाजातील स्त्रियांवर होणार्‍या अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढणारी ही दुर्गा स्वस्थ बसूच शकत नव्हती. सातत्याने तिचा संघर्ष सुरूच होता. त्यासाठी मग पोलीस स्टेशनच्या फेर्‍या, कोर्टकचेर्‍या सुरूच होत्या. एका विवाहित स्त्रीला आणि एका आईला अनेक आघाड्यांवर लढाई लढणं शक्यचं नव्हतं. तिला पती आणि त्याच्या घरच्यांवर देखील अन्याय होऊ द्यायचा नव्हता म्हणून तिने आपला वेगळा मार्ग निवडला आणि ‘हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है।’ याप्रमाणे जीवन संघर्षात उडी घेतली. वाईटांचं मर्दन करणे आणि चांगल्याचं रक्षण करण्याचा विडा उचलला आणि तिने ‘लेडी बाऊंसर’ बनण्याचं निश्‍चित केलं.

समाजातील अन्याय सहणार्‍या, प्रताडीत केल्या जाणार्‍या, सासरच्या लोकांकडून छळल्या जाणार्‍या महिलांची ती रक्षक बनली. महिलांच्या समस्या जाणून घेऊन, त्यातील सत्यता पडताळून घेऊन त्यांना न्याय मिळवून देऊ लागली. कधी सामोपचाराने तर कधी जरबेने पती, सासरचे, रोड रोमियो, मुलींना फसवणार्‍यांना वठणीवर आणू लागली. त्यासाठी आपल्या शक्तीचा, युक्तीचा वापर करू लागली. सामान्य माणसांची तक्रार नोंदवून न घेणार्‍या पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडायला भाग पाडू लागली. त्यामुळे तिला पोलिसांचे देखील सहकार्य चांगल्या प्रकारे मिळू लागले. तिच्या हस्तक्षेपामुळे कोणाचा नवरा तर कोणाचे सासू-सासरे, दिर-भावजय, नणंदा सुतासारखे सरळ झाले. कित्येकांच्या नवर्‍यांचे व्यसन सुटले.

काहींचे बाहेरख्यालीपणाचे वर्तन सुधारले तर अनेकांचे विस्कळीत झालेले संसार, मोडणारे संसार वाचले आणि एका विधायक कामासाठी पुढे टाकलेल्या पावलात, मनात आत्मविश्‍वास निर्माण झाला. त्यातूनच 2005 साली ‘अजिंक्य महिला संस्थे’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि समाजातील त्रासलेल्या, पिळलेल्या, अत्याचारीत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक अधिकृत आश्रयस्थान मिळाले. काय करावे? काय करू नये? अशा संभ्रमीत अवस्थेत असणार्‍या पिडीतांना मार्गदर्शन मिळू लागले. जे प्रश्‍न कायद्याने, पोलिसांच्या मदतीने सुटत नव्हते ते प्रश्‍न या संस्थेअंतर्गत येणार्‍यांचे सुटू लागले. अनाथ, अशिक्षित, गरीबांना दिलासा मिळू लागला. कौटुंबिक कलह, वादावादी, महिलांवरील अत्याचार, आपसातील भांडणे, वेळोवेळी होणार्‍या मारामार्‍या या संस्थेमार्फत सोडवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे तक्रारदारांच्या मनात विश्‍वास निर्माण होऊ लागला. अजिंक्य महिला संस्थेकडे सर्वजण आशेने पाहू लागले. हळूहळू संस्थेची व्याप्ती वाढू लागली. अनेक समविचारी महिला या संस्थेत येऊन काम करू लागल्या. कामाच्या जबाबदार्‍या वाटल्या गेल्या. तक्रार घेऊन येणार्‍याच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास होऊ लागला. त्यातील तथ्य, सत्यता पडताळून पाहण्यात येऊ लागली. प्रथम समुपदेशन, संसार जोडण्याचे कार्य, त्यासाठी संबंधित व्यक्तींच्या समोर तथ्थे मांडणे, चुका मांडणे त्या त्यांना स्वीकारायला लावून मानसिकता बदलणे, पुन्हा असे चुकीचे वर्तन होणार नाही याची हमी घेणे, न जमल्यास थोडासा धाक, शक्ती प्रदर्शन करून नाठाळांना वठणीवर आणणे असे कार्य या संस्थेमार्फत होऊ लागले.

कोणत्याही विधायक कामांसाठी जनतेचा पाठींबा मिळतोच. अल्पनालाही असाच पाठींबा मिळत गेला. दिवसेंदिवस वाढणार्‍या गुन्हेगारी जगतात महिलांना देखील सुरक्षतेची गरज भासू लागली. पुरुष सुरक्षा रक्षकांऐवजी महिला सुरक्षा रक्षक पुढे येऊ लागल्या आणि इतर क्षेत्रांप्रमाणे येथेही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा आणि अपूर्व कार्यक्षमतेचा ठसा उमटवला.
आज अल्पनाच्या अजिंक्य महिला संस्थेत 225 महिला कार्यरत असून विविध आघाड्यांवर विविध कामगिरी बजावित आहेत. एखादी केस त्यांच्याकडे आली तर याच महिषासूरमर्दिनी ह्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींशी संपर्क करून तथ्य जाणून घेतात. परिसरातील लोकांजवळ पोहचून कधी जोगव्याचे रुप घेऊन, भविष्य कथन करणार्‍याचा वेश घेऊन तर कधी भाजीवाली, फळवाली अशी वेषांतरे करून त्या केसचा स्टडी करतात. नंतरच अन्यायग्रस्त व्यक्तीच्या पाठी उभे राहून त्याला संरक्षण देतात. कधी कधी एखाद्या विवाहित स्त्रीचे सासरचे थोड्या काळासाठी मौन बाळगतात पण थोड्याच दिवसात; थोडा धाक कमी झाल्यावर परत छळवाद सुरू करतात. अशावेळी जीला सुरक्षितता दिली तिला या संस्थेमार्फत रोज रात्री फोन करून तिची कुशलता विचारली जाते. तिकडून प्रतिसाद मिळाला नाही तर सकाळी या दबंग महिलांची पलटण तिच्या घरी पोहोचते. याप्रमाणे एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्णत्वाला नेणे, त्या समस्येतून त्या व्यक्तीला सोडवणे ही त्यांची नैतिक जबाबदारी त्या समजतात. त्यासाठी अल्पनाने मारूती व्हॅन घेतली असून त्यात झोपण्याची, जेवण्याची सोय केलेली आहे. तिच्याकडे काम करणार्‍या महिलांना ती 500 रू. रोज देते. दररोज 7-8 जणी या कामासाठी कायमस्वरूपी तिची साथ देतात.

अल्पनाच्या जीवनात असे अनेक रंजक आणि जीवावर बेतणारे प्रसंग आले आहेत तर काही विनोदी किस्सेही घडले आहेत. एकदा कोकणातील एका खेडेगावातील मुलीचा प्रेमविवाह झाला. काही दिवसातच तिचा नवरा पळून गेला. हे त्या मुलीला माहेरी कळू द्यायचे नव्हते. माहेरच्यांनी तिच्या नवर्‍याला पाहिले नव्हते. त्यांनी मुलीवरील रोष सोडून दोघांनाही गावच्या जत्रेला बोलाविले. आता त्या मुलीची पंचाईत झाली पण अल्पनाने तिच्या नवर्‍याची भूमिका वठवून प्रसंग निभावून नेला. गावाकडे तिला पुरुष समजून 4-5 दिवस पुरुषांमध्येच उठ-बस करावी लागली. ‘जावईबापू आपल्या पोरीपेक्षा वयाने कमीच दिसतात, अजून मिसरूड बी फुटलं नाय’ अशा गावकर्‍यांच्या कॉमेन्ट ऐकून अल्पनाला हसायला यायचं पण घेतलेलं कार्य, स्वीकारलेली भूमिका तर पार पाडायलाच हवी होती. ती अल्पनाने लीलया पार पाडली.

एकदा एका पुढार्‍याने आपल्या बायकोला सोडून दिले. तिच्या पोटगीची अथवा कोणतीच जबाबदारी घेण्यास तो तयार नव्हता. अल्पनाने त्या पुढार्‍याला निवडणुकीच्या रॅलीमध्ये गाठले आणि त्या परित्यक्तेला न्याय मिळवून देत डोक्यावर छप्पर उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी नवी लढाई अल्पनाला लढावी लागते. प्रत्येक घटनेची कारणे वेगळी, प्रसंग वेगळे त्या समस्या सोडविण्याचे प्रकारही वेगळे पण उद्दिष्ट्य मात्र एकच न्याय मिळवून देणे. अत्याचारांना आळा घालणे, सौख्य, सामंजस्य निर्माण करणे. अर्थात अल्पनाकडे येणारा प्रत्येक क्लायंट प्रामाणिकच असतो, असे नाही म्हणूनच प्रत्येक गोष्टीची शहानिशा करूनच ती त्या प्रकरणात शिरकाव करते.

अल्पना जितकी दबंग आहे, तितकीच ती मोकळ्या स्वभावाची, खेळकर वृत्तीची आणि मिश्कील देखील आहे. ती हसते खळखळून, नाचते बेभान होऊन, बोलते अर्थपूर्ण अन् मैत्री निभावते ‘जी जान से’ तिचे प्रत्येकाशी नाते मग तो पुरुष असो अथवा स्त्री; अगदीच पारदर्शक, विश्‍वासार्ह, आपुलकीचं म्हणूनच ती आमची ‘सखी’ बनली. आम्ही तिला ‘वॉशरूमचा’ किस्सा सांगितल्यावर तर ती खळखळून हसली अन् म्हणाली, ‘‘अहो! हे तर काहीच नाही, एकदा हैद्राबादला मी महिलांच्या रांगेत उभी राहिले तर तेथील महिलांनी मला वॉशरूममध्ये कोंडूनच ठेवले.’’ तसाच अनुभव पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आला. मग काय पुढे-पुढे मी पुरुषांच्याच वॉशरूममध्ये जाऊन यायची. त्याचप्रमाणे एकदा अल्पना आपल्या बहिणीसह मोटरसायकलवर जात होती. तिला भूक लागल्याने बहिण गाडीवरच तिला वेफर्स वगैरे खाऊ घालत होती. नगरसेविका असलेल्या बहिणीच्या पक्षाच्या कार्यकर्त्याने हा नजारा पाहिला आणि धावत-पळत पक्ष कार्यालयात येऊन नगरसेविकेच्या यजमानांना सांगितले की ‘‘साहेब, मॅडम एका मुलाच्या पाठीमागे मोटरसायकलवर बसल्या होत्या आणि त्याला काही काही चारत होत्या. हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितले आहे.’’ कारण अल्पनाचा एकंदरीत आवेश, गणवेश आणि मोटारसायकलवर बसणे पुरुषी थाटाचे होते म्हणून त्याचा गैरसमज झाला होता. अल्पनाच्या मेहुण्यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी अल्पनाला ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि विचारले, ‘‘हाच का तो मुलगा ज्याला माझी बायको चारत होती?’’ यावर तो माणूस अवाक् राहिला होता आणि बाकी सर्वजण खो-खो हसत होते.

अशी ही आमची अल्पना जगासाठी दबंग व्यक्तिमत्वाची झुंजार महिला पण मनाने मिश्कील असणारी, स्वतःच्या फजितीवर न रागवता हसणारी, स्वतःवर कोट्या करून इतरांना हसवणारी, मैत्र जपणारी, सहृदय पण वेळ पडल्यास कणखर वृत्तीची, दृढ निश्‍चयाची, खंबीरपणे, भावनाविवश न होता निर्णय घेणारी अशी लढवय्या प्रवृत्तीची महिषासूरमर्दिनी, साक्षात आदीमाया, आदीशक्तीचेच रूप!

अशाच वीरांगणा, अशाच रक्षणकर्त्यांची आज समाजाला निकडीची गरज आहे. खरंतर समाजातील अराजकता पाहून प्रत्येक महिलेने बलशाली, धाडसी आणि दबंग बनायला हवं पण त्या प्रक्रियेला जरी वेळ लागणार असला तरी अल्पनासारख्या वेगळी वाट चोखाळणार्‍या झुंजारवृत्तीच्या वीरांगना आहेतच आपल्या समाजात. त्याची महती पटल्यावर पुढे अनुकरण होईलच आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करायला आमचा महिला वर्गही सिद्ध होईल. तूर्त तरी अल्पनाच्या या समाजोपयोगी उपक्रमाला आपण भरभरून कौतुकाची थाप आणि तिच्या आगामी आश्रमशाळा, शाळा, रुग्णवाहिका आणि पुरुष-महिला तक्रार निवारण केंद्राच्या उपक्रमाला शुभेच्छा देऊयात!

चंद्रलेखा बेलसरे
पुणे
चलभाष : 9850895051

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “दबंग सखी”

  1. jeevan nikalje

    Alpana Mam.. Hats off.. Khoop chan..

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा