जात जात जाईल जात!
समता, स्वातंत्र्य आणि न्याय यापासून दिशाहीन राहिलेल्या सामाजिक प्रवाहाविरुद्ध बंड केला तरच इतिहास आपली दखल घेतो. आज आपल्यासमोर किंवा आपल्याकडून काही चुकीचे होत असताना किंबहुना आपल्याला काही चांगले काम करण्याची संधी असताना, आपण मूग गिळून म्हणा किंवा मूग न गिळता म्हणा गप्प राहतो, गप्प बसतो हे वेगळे सांगायची गरज नाही परंतु, काही दिवसापूर्वीच असा बंड केला आहे तामिळनाडूतील तिरुपाथुर या शहारातील एका स्त्रीने! एम. ए. स्नेहा यांनी! या अशा पहिल्या भारतीय नागरिक आहेत ज्यांना कसली जात नाही आणि कसला धर्म नाही! तामिळनाडूमध्ये वकीली करणार्या स्नेहाताईंनी देशातील पहिले ‘नो कास्ट, नो रिलीजन’ प्रमाणपत्र मिळविले असून देशातील अनेक भागातून त्यांचे कौतुक होत आहे.
माणसाची ’जात’ हा तसा खूप संवेदनशील विषय आहे. त्यावर प्रहार करायला आणि त्यावर यश मिळवायला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षाहून अधिक काळ लागावा ही आश्चर्याची गोष्ट आहे किंबहुना भारताला अजून त्यात यश मिळालेले नसले, तरी जे आज कोणालाच जमले नाही, ते काम एका स्त्रीने केलेले आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण त्यामागची त्यांची दृढ आणि सकारात्मक इच्छाशक्ती. स्नेहाताईंनी जातीनिहाय प्रमाणपत्र मिळविले आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रमाणपत्र मिळवणे त्यांच्यासाठी खूप कठीण काम होते. त्या स्वतःला केवळ भारतीय समजतात. गेली 9 वर्षे त्या यासाठी लढा देत होत्या. स्नेहाताईंच्या आईवडिलांनीही त्यांच्या लहानपणापासून शाळेचा दाखला किंवा कोणताही अर्ज भरताना धर्म आणि जात हे रकाने रिकामे ठेवले होते. जातीनिहाय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी 2010 मध्ये पहिला अर्ज केला. त्यांचे वेळोवेळी अर्ज करणे आणि त्याचा पाठपुरावा करणे हे काम चालूच होते. शेवटी स्नेहा यांनी अधिकार्यांना हे पटवून दिलं की या प्रमाणपत्राच्या आधारे त्या कसलाही फायदा उचलणार नाहीत किंवा शासनाकडून कुठलेही अधिक अधिकार मिळवणार नाहीत. या प्रमाणपत्राद्वारे त्या कुणाच्याही अधिकारांवर गंडांतर आणणार नाहीत. हे प्रमाणपत्र केवळ त्यांची ओळख असेल असेही त्यांनी पटवून दिले आणि जातीनिहाय प्रमाणपत्र त्यांना 2019 मध्ये मिळाले. या प्रवासात त्यांना अशा बर्याच अडचणींचा सामना करावा लागला.
खरे म्हणजे, जाती प्रत्येक समूहवर्गाच्या कामाच्या प्रकारामुळे पडल्या आहेत. आज बहुसंख्य लोक जातीनिहाय व्यवसायातून बाहेर पडले असले तरी जातींची बंधकता आपल्याच वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्थेमुळे तोडता येत नाही हे खरे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, बर्याचजणांना आपल्या जातीवर भलताच गर्व असतो आणि प्रत्येक जात ही जातीअभिमानाने भारलेली असते. ते अन्य कोणत्याही जातींपेक्षा आपलीच जात कशी श्रेष्ठ आहे याचे गोडवे गातात. आजवर जातीवर बरंच काही लिहिलं गेलं. आज जातीवर अभ्यास करणारे विचारवंत भरपूर आहेत. जातीभेदाविरुद्ध प्रचारही होतो. तरीही जातीसंस्थाविरोधी असणारा कथित वर्ग लग्नासाठी ब्राह्मण बोलावतो. स्वजातियांचे कसेही असले तरी स्वीकारायचे आणि इतर जातियांचे धिक्कारायचे किंवा दुर्लक्षीत ठेवायचे ही प्रवृत्ती एकविसाव्या शतकात कळसाला पोहोचली आहे. दुसर्या बाजूला त्यांच्याचकडून ‘जातीभेद हा अमानवीय आहे’ असाही प्रचार होतो.
खरे तर भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे, एखाद्या पिस्टनवर तुम्ही जितका दाब द्याल त्याच्या अनेकपट तो दाब बाहेर फेकतो. असेच चित्र जातीच्या बाबतीत आहे. आज आपण जितके जाती नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तितक्याच प्रमाणात त्याला खतपाणी मिळत असताना आपणास आढळते. आज जातीवर एवढे राजकारण होत असताना, त्यात स्वतःची जात कायमचीच नाकारणे ही एक प्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल. या सकारत्मक कार्याची सुरुवात एका महिलेकडून होणं ही देखील अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा क्रांतीची इतिहास कायम दखल घेत आला आहे. याउलट आज प्रत्येक जातीच्या आणि पोटजातींच्या अनेक संघटना आहेत. प्रत्येक संघटना आपापल्या जातीच्या संतांची व महामानवांची तळी उचलत जातीअंतर्गत विवाहांसाठी वधु-वर मेळावे घेत असताना आपण पाहत आहोत. स्वार्थापोटी प्रत्येक संघटना आपल्या जातीच्या महापुरुषांचा वापर करत राजकारण करतात. अर्थात याला अपवादही असतील परंतु मोठ्या प्रमाणातले आजचे चित्र असेच आहे. बहुतांशी जातीच्या संघटना आपापल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक मागण्यांसाठी पुढे सरसावत आहेत आणि यात अशा एका आव्हानात्मक आणि सकारात्मक बदलाला सुरुवात होत आहे आणि त्यात आपल्यालाही सामील होण्याकरताची चाहूल देणारी ही गोष्ट आहे.
आज आपण आधुनिक जगात जगत आहोत. भारत सॉफ्टवेअर निर्मितीत अग्रेसर आहे. अमेरिका, रशिया, कोरिया आणि इतर प्रगत देशाप्रमाणे भारतातही तंत्रज्ञान जोर घेत आहे. म्हणूनच तर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी ’जय जवान, जय किसान’ या घोषवाक्याला ’जय विज्ञान’ हाही जयघोष जोडला होता. बदलत्या जगाबरोबर पुराणपंथीपणा झुगारत सकारात्मक गोष्टी स्वीकारल्या पाहिजेतच. भारतासारख्या देशाला हे जातीविरुद्धचे बंड भविष्यासाठी आमूलाग्र परिवर्तन ठरेल, असा विश्वास आहे.
स्नेहाताईंच्या या धाडसी पावलाचा विचार करताना आजतागायत राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून जातीव्यवस्था नष्ट करण्याचे प्रयत्न अयशस्वी का झाले? यावर गंभीर विचार व प्रयत्न करण्याची करण्याची ही वेळ आहे, हे जाणवते. असे झाले तरच जात नष्ट होईल. जात नसलेले प्रमाणपत्र मिळवता येते आणि जातीतून बाहेर पडून माणूस म्हणून जगता पण येते हे स्नेहाताईंनी अवघ्या देशाला दाखवून दिले. खरोखरच आपण स्नेहाताईंचे अभिनंदन करूया आणि आपल्या देशात ही क्रांती मोठे रूप धारण करेल अशी अशा बाळगूया.
– गणेश आटकळे
पंढरपूर
8087999894