‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

‘अर्धशतकातला अधांतर’ आणि ‘काळीजकाटा’चे धडाक्यात प्रकाशन

मुंबईत ब्राह्मण उद्योजक परिषद संपन्न

मुंबई : येथे पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई, गोविंद हर्डीकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम स्वित्झर्लंडचे चेअरमन योगेश जोशी, भालचंद्र कुलकर्णी, संजय ओर्पे, ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील अशा अडीचशे उद्योजकांच्या उपस्थितीत ‘ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स’ पार पडली. यात ‘चपराक’तर्फे सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातला अधांतर-इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाचे आणि वाचकप्रिय लेखक सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

भाऊ तोरसेकर यांनी 1964 ते 2014 या कालखंडातील देशाच्या राजकारणाचा राजकीय पट या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवला आहे. मोदींचा उदय, त्याला पोषक परिस्थिती व आज त्यांच्या विरोधात दंड थोपटणारे लहान-मोठे पक्ष व आघाड्या यांचे कोडे सोडवायचे झाले तर इंदिराजी समजून घेणे भाग आहे आणि तो सगळा घटनाक्रम 2014 पूर्वीच्या पन्नास वर्षात म्हणजे अर्धशतकात सामावलेला आहे. त्याची सुसुत्र, संगतवार मांडणी भाऊंनी या पुस्तकात केली आहे. राजकीय घडामोडींच्या चोखंदळ, चिकित्सक वाचकांना स्वतःचे आकलन शोधायला हे पुस्तक मदत करू शकेल.

तुमची प्रत आजच सुनिश्चित करा. भाऊ तोरसेकर लिखित ‘अर्धशतकातला अधांतर’ पुस्तकाची नोंदणी करून हे पुस्तक ऑनलाईन विकत घ्या.

सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीची पहिली आवृत्ती अवघ्या वर्षभरात संपली. या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रामीण कादंबरीचा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाला. आत्मिक प्रेमाचे तरल चित्र रेखाटणार्‍या या कादंबरीला सर्व वयोगटातील वाचकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

मुंबईत झालेल्या या परिषदेत उद्योजक, व्यावसायिक, प्रोफेशनल्स अशा सर्वांचा सहभाग होता. यात मुख्यत्वे नेटवर्किंग, बिझनेस टाय अप, सक्शेशन, इन्व्हेस्टमेंट, बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग अशा विषयांवर तज्ज्ञांनी आणि अनुभवी उद्योजकांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या खास शैलीत देशाच्या राजकारणाचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. सतीश मराठे यांचे ‘फायनान्शियल प्लॅनिंग ऍन्ड ग्रोथ ऑफ बिझनेस’ या विषयावर बीज भाषण झाले. योगेश जोशी यांनी ‘बिझनेस ग्रोथ ब्रॅन्ड बिल्डिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. रवींद्र प्रभुदेसाई यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी ‘चपराक’तर्फे येत्या आर्थिक वर्षात येत असलेल्या 365 पुस्तकांच्या निमित्ताने घनश्याम पाटील यांची विशेष मुलाखत झाली. पाटील यांच्यासह विशेष उल्लेखनीय उद्योजक म्हणून अनुप पुराणिक, निर्मल देशपांडे, अन्नदा रानडे यांच्याशी संयोजक आणि ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी संवाद साधला.

सुहास हर्षे, श्री. सोहोनी आणि सहकार्‍यांनी ‘सक्सेसफुल सक्सेशन’ या विषयावर मांडणी केली. हिमांशू ठोसर यांनी ‘बिझनेस टायअप’ या विषयावर मते मांडली. विश्‍वास कुलकर्णी यांचे ‘कार्पोरेट कीर्तन’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल ओर्पे यांनी केले.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा