विद्यार्थ्यानो, अपयश म्हणजे तात्पुरती माघार असते, तो अंतिम टप्पा नसतो.

देशात दहावी-बारावीच्या निकालादरम्यान हजारो विद्यार्थी आत्महत्या करतात. अपयश आल्याने किंवा अपयश येण्याच्या भीतीने.
अपयश ह्या शब्दातच यश आहे. तुम्ही अपयशी झालात म्हणजे तुमचं ते पूर्णपणे अपयश नसतं, त्या अपयशातूनही तुम्ही काहीनाकाही यश मिळवलेलं असतं, नक्कीच. अपयश हा अंतिम टप्पा नसतो, तो फक्त एक अडथळा असतो तात्पुरता. कुठल्याही अपयशावर आत्महत्या हा तोडगा नाही, अपयश पचवायला शिकलं पाहिजे. तुम्ही हारलात हे बघू नका, तुम्ही खेळलात हे बघा.
कुठल्याही परीक्षेत नापास होणं म्हणजे आयुष्यातलं सगळं संपलंं असं नाही. तुम्हाला जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं आहे… तेव्हाच खरी सुरुवात झालेली असते.
परीक्षा रद्द करणे हा या समस्येवरचा तोडगा नाहीये. परीक्षा असायलाच हव्यात; पण ह्या परीक्षांचे दडपण विद्यार्थ्यांवर येऊ नये ह्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे.
अपयश आलं म्हणजे सगळं काही संपलं असं नव्हे. मान्य आहे की प्रयत्नांच्या पराकाष्टेवरचा भरवसाच तुटल्याने आत्महत्येचा विचार मनात येतो; पण त्यावेळी आम्हा अपयशी विद्यार्थ्यांसमोर जीवनभर अपयशातून मार्ग काढणारा, 52 व्या वर्षी अमेरीकेचा राष्ट्रपती बनणारा अब्राहम लिंकन का उभा राहत नाही? लिंकन म्हणतो, ‘‘अपयश म्हणजे तात्पुरती माघार असते, तो अंतिम टप्पा नसतो.’’
आत्महत्या केल्याने प्रश्न कधीच सुटत नसतात.
पालकांनी आणि शिक्षणसंस्थांनी ही समस्या गंभीरपणे घेण्याची गरज आहे. पालक मंडळी अभ्यासात कमजोर असलेल्या आपल्या मुला-मुलीची, आपल्याच किंवा शेजारच्या हुशार मुला-मुलींशी तुलना करून हिणवतात. असं करू नये. ह्याने मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि मग तो वाढतच जातो. ह्या न्यूनगंडातूनच आत्महत्येकडे विचार वळतात. म्हणून पालकांनी दुसर्‍या कुणाही अगदी भावंडातील देखील मुलामुलींशी तुलना करू नये.
अभ्यासाव्यतिरिक्त घरातील कामात आपल्या मुलाला सामील करून घ्यावे. मुलांचे छंद जोपासावेत. घरात सकारात्मक वातावरण असू द्यावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्या मुलामुलींशी मनमोकळेपणाने बोलावं, त्यांचे मित्र व्हावं. काही चांगलं काम केल की त्याचं कौतुक करावं, प्रोत्साहन द्यावं. आपल्या कौतुकाची थाप त्यांना जगायला आणि प्रगतीच्या पथावर पुढे जायला अजून बळ देते.
शेवटी एकच नमूद करावसं वाटतं, मरायला जेवढी हिंमत लागते त्यापेक्षा खूप कमी हिंमत जगायला लागते. जगा! मस्त, मजेत, मनसोक्त!!!

(साप्ताहिक ‘चपराक’)

-वनेश माळी
9975621222

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा