सुख म्हणजे नक्की काय असतं!!

बालपण आठवले की मला एकच गाव कधीही आठवत नाही. जसं कळायला लागलं आणि मला पहिल्यांदा शाळेत घातलं ते माझ्या वडिलांच्या मूळ गावी असणाऱ्या बालवाडीत. वडील व चुलते नोकरीसाठी मुंबईला आणि आमचे आज्जी आजोबा गावी असल्याने आमचं कुटुंब आणि काकांचे कुटुंब आलटून पालटून काही वर्षे मुंबई तर काही वर्षे गावी राहत. बरं , गावी राहिल्यावर मी वडिलांच्या गावीच राहिलेय आणि एकाच शाळेत शिकले असंही नाही.

माझी पहिली माझ्या आजोळी , दुसरी तिसरी आत्त्याच्या गावी ,चौथी /पाचवी /सहावी मुंबईत तर सातवी ते दहावी मात्र एकाच शाळेत म्हणजे वडिलांच्या गावी असलेल्या माध्यमिक विद्यालयात झाली. आमची ही शाळा एका उंच टेकडीवर आणि पाच सहा गावांच्या मधोमध होती. साहजिकच पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या सर्व गावातून मुले यायची.
मला तो सातवी ते दहावीचा काळ अजूनही जसाच्या तसा आठवतो. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ. आज तीस वर्षे उलटून गेली तरी काही आठवणी मनपटलावरून पुसल्या गेल्या नाहीत.साधारण नव्वदीचे दशक असेल ते. मी, माझे दोन्ही भाऊ ,आई आणि आज्जी गावी राहायचो.( दरम्यानच्या काळात आजोबांचा मृत्यू होऊन ते देवाघरी गेलेले.)
आमच्या कुटुंबाची परिस्थती अगदीच गरीब नसली तरी खूप श्रीमंतीही नव्हती. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने आणि आता आहेत तशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने कोणत्याच बाबतीत खूप लाड व्हायचे नाहीत.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=Ji8ywe8nKtE
सकाळी उठून वाकळा घड्या करुन ठेवायच्या आणि मागच्या अंगणात आज्जीने चूल पेटवलेली असायची तिथूनच चिमूटभर राख तळ हातावर घेऊन दात घासायचे आणि रांजनातून तांब्याने पाणी घेऊन चूळ भरायची.( मला आठवतेय मी राखेने दात घासताना त्यातली राख खायचे. दात घासणे कमी आणि राख खाणे जास्त असा माझा खेळ चालायचा. यासाठी मी बऱ्याच वेळा आज्जीचा ओरडा खाल्लेला आहे ) तोपर्यंत चुलीवरच्या तपेल्यात पाणी गरम झालेलं असायचं ते बादलीत घेऊन अंघोळ उरकायची. 
अंघोळीनंतर नुसता चहा मिळायचा. सकाळचा नाश्ता ( पोहे, उपमा ) हा प्रकार आम्हाला माहीत नव्हता.
जर चुकून आज्जी आठवड्याच्या बाजाराला जाऊन आलेली असेल किंवा जर आज्जीने दहा पैसे दिले तर येशी आत्तीच्या दुकानातून किंवा हनम्या मामाच्या पानपट्टीतून बटर आणायची आणि चहात बुडवून खायची.इतर दिवशी मात्र सकाळी नुसता चहा मिळायचा.
आमच्या शाळेची वेळ सकाळी अकरा ते पाच असल्याने आणि शाळा गावातून लांब असल्याने साधारण साडेनऊ वाजता आम्ही घरातून निघायचो. आम्ही शाळेची तयारी करत असताना आई जेवणाला लागायची.आईने चुलीवर ठेवलेल्या तव्यात भाकरी टाकली की आम्ही ताटली घेऊन तिथंच चुलीजवळ बसायचो. विस्तवावर भाजलेली गरम गरम भाकरी दुरडीत पडायच्या आधी आमच्या ताटलीत पडायची. चुलीच्या वैलावर ( मुख्य चुलीच्या उजव्या हाताला असलेलं मोठं छिद्र )त्या दिवशी समजा आईचे कालवण तयार असेल तर त्यात कुस्करून भाकरी खायची नाहीतर मग त्या भाकरीचा पापुद्रा हळूच एका बाजूने काढायचा ( तो पापुद्रा काढताना आतल्या वाफेने चांगलाच चटका बसायचा) मग फळीवरची चटणीची भरणी ( आता आपण त्याला घाटी मसाला म्हणतो ) आणि बाजूलाच असलेली गोड तेलाची किटली ( त्यावेळी घरच्या भुईमुगाच्या शेंगा घाण्यावर गाळून तयार केलेलं तेल ) घ्यायची आणि आधी तेल भाकरीच्या आतल्या बाजूला लावायचे आणि मग त्यावर चटणी. मग पुन्हा पापुद्रा त्यावर ठेऊन गट्टम् केली जायची ती भाकरी.. कधी कधी चटणी ऐवजी नुसतं मीठ आणि तेल लावण्याचा प्रयोगही आम्ही करायचो.
आमचं खाऊन होईपर्यंत आईच्या भाकरी भाजून होत. मग शाळेत नेण्यासाठी डबे भरायचे. त्यातही एक भाकरी सोबत आठवड्यातून एक दोन वेळा कधी असली तर भाजी नाहीतर पुन्हा तेल चटणी व त्यावर कधी शेंगदाण्याचे कुट नाहीतर कधी कारळ्याचे कुट. अजून एक पदार्थ सर्रास भाकरीसोबत डब्यात असायचा ती म्हणजे बेसनाची पोळी. काहीच नाही भेटलं आणि चटणी भाकरीचा कंटाळा आला की आईकडे बेसनाच्या पोळीचा हट्ट व्यायचा.
बेसनाची थोडी कडक पोळी म्हणजे माझा जीव की प्राण! ती डब्यात असली की मी एकदम खुश. मला आठवते की शाळेच्या रस्त्यात मधेच डबा उघडून मी कितीतरी वेळा पोळीचा तुकडा खाल्ला आहे. संध्याकाळी घरी आल्यावरही चहा हा प्रकार अजिबात नसायचा. अगदीच भूक लागली तर तांदळाची भातवडी चुलीतल्या विस्तवावर भाजून घ्यायची आणि सोबत मुठभर भुईमुगाच्या शेंगा.  नाहीतर गरम गरम भात आणि पुन्हा त्यावर तेल चटणी घालून आम्ही खायचो. तेल चटणी त्यावेळी आमच्यासाठी जणू पंचपक्वान्न होते.
थोडा वेळ अभ्यासाचे पुस्तक घेऊन शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करत बसायचो तोवर आई जेवायला हाक मारायची.
मला आठवतेय मी नेहमी जेवायला चुलीच्या बाजूला पाटावर बसायचे. चुलीतला शिल्लक राहिलेला विस्तव आणि राखेचा वास मला खूप आवडायचा. रात्रीच्या जेवणात ज्या दिवशी घुटं असेल त्या दिवशी माझे अभ्यासात कधीचं लक्ष लागायचे नाही . कधी एकदा मी जेवतेय असं वाटायचं. मस्त घरच्या जात्यावर दळळेली उडदाची डाळ तवलीत शिजवून घ्यायची,तिला फोडणी दिली जायची ती, व्हणात ( गावी शेंगदाणे किंवा मसाला कुटण्यासाठी जमिनीत पुरलेला दगड ) कुटलेली हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या याची. घरात असले तर जिरे . त्यावेळी ना कडीपत्ता असायचा ना कोथिंबीर.
त्यानंतर आजतागायत अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले परंतु ना तेल चटणी भाकरी / भाताची चव ना उडदाच्या डाळीच्या घुट्याची ती चव पुन्हा मिळाली. असे दिवस पुन्हा येणे नाही.ते दिवस काही वेगळेच होते. त्या आठवणी मात्र मनात कायमच्या कोरल्या गेल्या.
डॉ. स्वाती अनिल मोरे
(प्रसिद्धी ‘साहित्य चपराक’ मासिक जून २०२४)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा