ही गोष्ट आहे मराठवाड्यातील एका दुर्गम भागातील. तिथे एक ठेकेदार रस्त्यांची कामे करत होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायातून त्यांनी त्यांची उद्यमशीलता दाखवून दिली होती. नेकीने व्यवहार करताना आपण भले आणि आपले काम भले असा त्यांचा खाक्या! सामाजिक, राजकीय कार्याशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता.
त्यांचे वडील मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी असायचा.
त्यावेळी पदवीधर शिक्षक मतदारसंघातून त्यांच्या मुलाने निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता. मुलानं सांगितलं की, ‘‘मला माझा व्यवसाय करू द्या. राजकारणात मला रस नाही.’’
वडील मात्र ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं, ‘‘तू निवडून आलास तर लोकांची अजून चार चांगली कामे करू शकशील. त्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठिशी राहतील. कोणतंही पद हे मिरवण्यासाठी नसतं तर ते लोकांची कामं करण्यासाठीच असतं. त्यामुळे तू लढायलाच हवं.’’
वडिलांचा असा आग्रह झाल्याने त्यांनी सहमती दिली.
शिक्षक पदवीधर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर झाली. हे उमेदवार कोण हे कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळं निवडून येण्याची किंचितही शक्यता नव्हती.
दुसर्या दिवशीपासून काही शिक्षकांकडे एक माणूस येऊ लागला. तो अतिशय सभ्यतेने स्वतःची ओळख करून द्यायचा. ‘‘नमस्कार, मी अमुक-तमूक… निवडणुकीला उभा आहे. तुमचं अमूल्य मत मला द्या. मी आपल्या सर्वांशी प्रामाणिक राहीन. आपल्या सर्व अडीअडचणी दूर व्हाव्यात, सर्व समस्या सुटाव्यात यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असेल. तुमचे एक मत माझ्यासाठी अनमोल असेल…’’
स्वतः उमेदवार रोज भेटायला येतोय म्हटल्यावर शिक्षकांशीही त्यांची चांगली गट्टी जमली. हा रोज आपल्याकडेच येतोय, त्यामुळे इतरांशी भेटून प्रचार करणे त्याला शक्य नाही असे शिक्षकांना वाटायचे. परिणामी याचा पराभव अटळ आहे, याचीही खूणगाठ त्यांनी बांधली. असे असले तरी आता त्याच्याशी चांगला परिचय झाल्याने मत देणे भाग पडणार होते. आपल्या एका मताने काहीही फरक पडणार नाही, त्यामुळे नाते जपूया म्हणून त्यांनी या उमेदवाराला मत दिले.
मतमोजणीचा दिवस उजाडला आणि हे महाशय विजयी झाल्याची बातमी सर्वदूर पसरली. त्यावेळी समाजमाध्यमे नव्हती. आपला उमेदवार निवडून आला म्हणून त्या ‘ठरावीक’ शिक्षकांना आनंद झाला. ते सगळेजण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.
इथलं चित्र मात्र वेगळंच होतं.
इथं अनेक उमेदवार गळ्यात उपरणं अडकवून हजर होते.
त्यांनी काही कार्यकर्त्यांना उमेदवार म्हणून तयार केलं होतं. त्यांच्याकडे ठरलेल्या शाळांतील शिक्षकांपर्यंत जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी वाटून दिली होती. ‘ओरिजनल’ उमेदवाराला कधीही पाहिले नसल्याने त्यांची गफलत झाली होती. प्रचारासाठी आलेला ‘डमी’ कार्यकर्ता हाच खरा उमेदवार म्हणून सगळे त्याच्याशी तसं वागत होते. प्रत्यक्षात ‘खरा’ उमेदवार आज त्यांच्या समोर होता आणि आजवर त्यांच्याकडे येणारे सगळे डमी एका रांगेत उभे होते.हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
शेवटी विजयी ठरलेल्या खर्याखुर्या उमेदवाराने सुत्रे हातात घेतली. ते म्हणाले, ‘‘आजवर माझा जो कार्यकर्ता तुमच्याकडे माझ्या रूपात येत होता तोच तुमच्या संपर्कात नियमित असेल. तो मीच आहे असे समजून तुमच्या अडचणी मोकळेपणाने त्यांना सांगा. त्या माझ्यापर्यंत पोहोचतील. तुमचं प्रत्येकाचं, प्रत्येक काम व्हावं असा माझा प्रयत्न असेल. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणतात. तुमच्यापर्यंत येण्याचा हा मार्ग चुकीचा होता पण इतक्या कमी कालावधीत माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. इथून एका चांगल्या कामाची सुरूवात आपण सगळे मिळून करू.’’
पुढे याच उमेदवारानं सहकाराचं मोठं जाळं विणलं. सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलं. इतकंच काय तर ते महाराष्ट्राचे मंत्रीही झाले. असंख्य लोकांचा पोशिंदा होऊन त्यांनी मतदारांच्या या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. आजच्या सोशल मीडियाच्या काळात निवडणुकीचे हे किस्से आठवले तरी हसायला येतं.
-घनश्याम पाटील
7057292092