निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? – किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक, राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत. काकडे लिहितात, मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती. त्याचा निरीक्षक म्हणून मी हिंगणे परिसरात प्रचार करत होतो. सायंकाळी साडेसहाची वेळ होती. तेथील नगरसेवक शैलेश चरवड यांच्यासोबत आम्ही तुकाईनगर येथील झोपडपट्टीत गेलो. तेथे गेल्यावर नगरसेवक चरवड प्रत्येकाला सांगत होते, ‘‘ताटे करा, ताटे करा…’’

यांना काही समजेना की ताटे कसली करायची? इतक्या लवकर जेवणाची तयारी कशाला? पण चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, ‘ताटे करा’ म्हणजे उमेदवाराला ओवाळण्यासाठी औक्षणाची ताटे करा असे ते सांगत होते.

मग पदयात्रा सुरू झाली. उमेदवार जिथे जाईल तिथे त्याला ओवाळत असत. मग तो प्रत्येकाला शंभर रूपये ओवाळणी टाकायचा. एका घरातील बाई धीट होती. ती म्हणाली, ‘‘अहो, सकाळी जे उमेदवार आले होते त्यांनी 200 रूपये ओवाळणी टाकली. तुम्हीही तेवढीच टाका. आता बिचारा उमेदवार काय करणार? त्याला गपचूप दोनशे रूपये टाकावेच लागले.

याच पुस्तकात त्यांनी लिहिलंय, लोकसभा निवडणुकीत आम्ही एरंडवणा भागात सात चाळीत उमेदवाराबरोर पदयात्रा करत होतो. कार्यकर्ते घाई करत होते. ‘लवकर आवरा, लवकर आवरा, आधीच उशीर झालाय’ असे ते प्रत्येकाला सांगत होते. एका घरात आल्यावर त्या घरातली वयस्कर बाई म्हणाली, ‘‘थांबा, घाई करू नका.’’
तेथील नगरसेवक राजा मंत्री त्यांच्या सोबत होते. त्यांनीही सांगितले, ‘‘साहेब, ही आपली फार जुनी कार्यकर्ती आहे. त्यामुळे यांना थोडा वेळ द्या.’’

बाई आल्या. त्यांनी ओवाळले. उमेदवाराच्या हातावर साखर दिली. उमेदवाराची दृष्ट काढली आणि पुढे म्हणाल्या, ‘‘आता या परत पाच वर्षानंतरच!’’

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

उमेदवाराबरोबर आलेल्या सर्वांचेच चेहरे पाहण्यासारखे झाले.
परिचयपत्रक वाटपाचा कसा घोटाळा होतो याचीही मजेशीर आठवण काकडे यांनी नोंदवली आहे. एका बाईने दोन उमेदवारांची परिचयपत्रके वाटपाचे काम घेतले. ती सकाळी एका उमेदवाराचे परिचयपत्रक वाटे तर दुपारी त्याच भागात दुसर्‍या उमेदवाराचे परिचयपत्रक वाटे. एका मतदाराच्या हे लक्षात आले. त्याने तिला विचारले, ‘‘अहो, सकाळी तुम्ही दुसरेच पत्रक वाटत होता. आता दुसरेच आहे.’’

तिने उत्तर दिले, ‘‘हो, मी 3 ठिकाणी काम करते. सकाळी एकाचे पत्रक, दुपारी दुसर्‍याचे पत्रक वाटते तर सायंकाळी तिसर्‍या उमेदवाराच्या पदयात्रेत जाते. 15 दिवस चांगला रोजगार भेटतो. निवडणुका दरवर्षी का होत नाहीत?’’

निवडणुकीविषयी कोणी काहीही म्हणाले तरी असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना, लघुउद्योजकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यांचे चार दिवस आनंदात जातात. डोक्यावरचं थोडंफार कर्ज हलकं होतं. कोण निवडून येतं? त्याचे काय परिणाम होतात? याच्याशी त्यांना काहीच देणेघेणे नसते. लेकराबाळांच्या तोंडी दोन घास सुखाचे गेले तरी निवडणुकीमुळे त्यांच्या घरी दिवाळी साजरी होते. म्हणूनच तर ते आर्ततेने विचारतात, निवडणुका दरवर्षी का होत नाहीत

लोकशाही व्यवस्थेतील हेच भयानक वास्तव आहे आणि ते आपल्याला स्वीकारावेच लागेल.
– घनश्याम पाटील

7057292092
(दैनिक पुण्य नगरी, बुधवार, दि. 17 एप्रिल 2024)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? – किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील”

  1. Pralhad Dudhal

    खूप छान किस्से

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा