…आणि पवारांना तिकीट मिळाले

शरद पवार 1967 साली सर्वप्रथम वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी उमेदवार ठरवण्याचा आणि तो जाहीर करण्याचा अधिकार काँगेस वर्किंग कमिटीच्या अध्यक्षांचा असायचा. प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांना निवडणूक लढवण्याची विचारणा केली. त्यावेळी पवार युवक काँग्रेसचे काम सक्रियपणे करायचे.
पवारांची उमेदवारी जाहीर होताच त्यांना बारामतीतून कडाडून विरोध झाला. सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, “आम्ही 12 उमेदवार इथून इच्छुक आहोत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तरी त्याला आम्ही निवडून आणू पण अतिशय नवख्या आणि अनअनुभवी असलेल्या शरदला उमेदवारी दिली तर आम्ही त्याला पाडू!”
या सगळ्या ज्येष्ठांनी एकत्र येत मालिनीताई शिरोळे यांच्या उमेदवारीची मागणी केली होती.
पवारांच्या उमेदवारीवरून असा पेच निर्माण झाल्याने काँग्रेसच्या संसदीय सदस्य मंडळाची बैठक झाली. त्यात 12 पैकी 11 सदस्यांनी शरद पवार यांच्या नावावर आक्षेप घेत त्यांना तीव्र विरोध केला.
संसदीय सदस्य समितीने मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना याची कल्पना दिली आणि शरद पवार पडतील म्हणून उमेदवार बदलायचा असल्याचे कळवले. त्यावर यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना एकच प्रश्न विचारला, “यंदा आपल्या काँग्रेसच्या किती जागा निवडून येतील असे आपल्याला वाटते?”
त्यावर त्यांनी सांगितले की, “दोनशेहून अधिक उमेदवार नक्कीच निवडून येतील.”
ते ऐकल्यावर यशवंतराव म्हणाले, “मग बारामतीची एक जागा गेल्याने असा काय फरक पडतो? आपले सरकार तर जाणार नाही. द्या शरदलाच उमेदवारी.”
त्यांच्यापुढे बोलायची अर्थातच कुणाचीच हिंमत नव्हती.
शरद पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात राजीनामा सत्र सुरू झाले. सगळे तरुण पवारांच्या पाठीशी होते तर ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन बंड केलं होतं. तरुणाईमध्ये शरद पवार प्रसिद्ध होते. अनेक भाजीपाला विक्रेत्यांपासून ते पथारी कामगारांपर्यंत सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला. ज्येष्ठ मंडळींचा धुरळा उडाला आणि शरद पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
पुढे वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी मोठं योगदान दिलं. महिलांना राजकीय आरक्षण देणे असेल किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न असेल त्यांनी त्यात महत्त्वाच्या भूमिका घेतल्या. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ म्हणत ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 10 जून 1999 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यांच्या कार्यशैलीविषयी अनेकांची मतमतांतरे असू शकतात पण राज्याच्या, देशाच्या विकासात त्यांनी मोठं योगदान दिलं. आजही वयाच्या 84व्या वर्षी ते राज्यात 84 सभा घेण्याचा निर्धार करतात. यशवंतराव चव्हाण ठामपणे त्यांच्या पाठीशी राहिले त्यामुळे हे नेतृत्त्व बहरलं, फुललं. होतकरू तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आज खरी गरज आहे. त्या भूमिकेतून कार्यरत असलेले यशवंतराव लाभले तर अजूनही अनेक यशस्वी शरद पवार निर्माण होऊ शकतील.
घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 21 एप्रिल 2024

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “…आणि पवारांना तिकीट मिळाले”

  1. Pralhad Dudhal

    खूप छान

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा