विनोबांची शिक्षणछाया – प्रस्तावना

युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!’’
हे असे क्षत्रिय निर्माण झालेच तर ते काय करतील?
तर मानवधर्माची पताका सर्वत्र डौलात फडकत ठेवतील!


मग धर्म म्हणजे काय?
त्याचेही उत्तर स्वामीजींनीच खूप मार्मिक शब्दांत दिले आहे.
ते म्हणतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’
स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणं हा खरा धर्म!
मग ही ओळख कशी पटेल? आपल्या क्षमतांच्या या जाणिवा कशा लक्षात येतील?
त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे शिक्षण!
हे शिक्षण वर्तमानात नेमकं कसं आहे, कसं असावं?
त्याचीच तर सारासार चिकित्सा, सखोल आणि सुयोग्य मंथन करत आहेत ‘चपराक परिवारा’चे सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे!
स्वामीजींनी सांगितल्याप्रमोण ‘बौद्धिक क्षत्रिय’ निर्माण व्हायचे असतील आणि खरा धर्म समजून घ्यायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, यावर ठाम श्रद्धा असलेल्या संदीपजींनी या विषयावरील पुस्तकमालिका लिहिण्याचा संकल्प करून आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यांनी नुसता संकल्प केला नाही तर विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तिन्ही पातळ्यावर स्वतःला सिद्ध केले आहे. अगदी थोडक्या कालावधीत त्यांची ‘शिक्षण विचार’ या मालिकेतील सहा-सात पुस्तके वाचकांच्या भेटीस आली आणि नजिकच्या काळात आणखी इतकीच पुस्तके याच विषयावर येत आहेत. मराठीच नाही तर सर्व प्रादेशिक भाषांतला हा विक्रम असेल.


त्यांच्या सर्व पुस्तकांची कमान चढती आहे. हा उंचावत गेलेला आलेख समाजाला आणि इथल्या ढिम्म व्यवस्थेलाही खाडकन जागे करणारा आहे. गिजुभाईंचा शिक्षण विचार, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे शिक्षणविषयक चिंतन, कोविडच्या काळातील शिक्षण, नवी शैक्षणिक धोरणे, पालक-बालक-शिक्षक यांची मानसिकता, वर्तमानातील शैक्षणिक आव्हाने, व्यवस्था परिवर्तनाच्या दृष्टिने मूलभूत विचार अशी त्यांची व्याप्ती आहे. या पुस्तकातून त्यांनी आचार्य विनोबाजींचे आणि गांधीजींचे तत्त्वज्ञान मांडले आहे. पुढच्या पुस्तकातून ते जे कृष्णमूर्तींना भेटीस आणत आहेत. इतकेच नाही तर रजनीशांच्या विचारांचीही चर्चा करणार आहेत. शासनाने शैक्षणिक धोरणे ठरवताना ही पुस्तके समोर ठेवली तरी खूप प्रश्न सहजतेने सुटण्यास मदत होणार आहे. मायमराठीच्या अंगावर असे भरजरी अलंकार चढविणार्‍या संदीप वाकचौरे यांची शासनाने, समाजाने दखल न घेणे हा म्हणूनच मोठा करंटेपणा ठरणार आहे. वाकचौरे यांच्या लेखनास प्रोत्साहन देऊन आपल्या मनाचा व्यापकपणा दाखविण्याची संधी आपल्या सर्वांसमोर आहे.
या पुस्तकाचे शीर्षक आहे, ‘विनोबांची शिक्षणछाया!’ आता ‘छाया’ म्हटले की, गारवा आला. तळपत्या उन्हात, अंगाची काहीली होताना या गारव्याचे महत्त्व प्रकर्षाने पटते. आजची यंत्रणेची सगळी वाताहत पाहता या गारव्याची कधी नव्हे इतकी गरज सध्या आहे. आपल्या श्रेष्ठतम परंपरेतील आचार्य विनोबाजींसारख्या महनीय व्यक्तिमत्त्वाचे विचार समजून घेणे अनिवार्य आहे.
विनोबा म्हणतात, ‘‘एक दिवस मी उन्हात फिरत होतो. चहूकडे मोठमोठे हिरवे वृक्ष दिसत होते. मी विचार करू लागलो की वरून इतके कडक ऊन असताना हे वृक्ष हिरवेगार कसे? त्यावेळी लक्षात आले की, जे वृक्ष वरून इतके हिरवेगार दिसत आहेत त्यांची मूळे जमिनीत अति-खोल गेली आहेत आणि तेथून ते पाणी घेतात! याप्रमाणे आम्हाला आतून भक्तिचे पाणी आणि बाहेरून तपश्चर्येचे ऊन मिळाले तर आम्ही उंच वृक्षांप्रमाणे हिरवेगार होऊ!’’
ही भक्ती, ही तपश्चर्या साधायची असेल आणि स्वतःबरोबर राष्ट्राच्याही विकासास हातभार लावायचा असेल तर जगणं समजून घेतलं पाहिजे. शाळेतून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार्‍या माहितीलाच ज्ञान समजून आपण केवळ पोट भरायचा विचार करत आहोत. ही कुपमंडुकता सोडून ज्ञानाची साधना सुरू केली तर असे असंख्य ज्ञानवृक्ष तयार होतील आणि ते समाजावर त्यांच्या आल्हादक आणि आनंददायी छायेचं छत्र धरतील. म्हणूनच या पुस्तकांच्या माध्यमातून संदीप वाकचौरे आतून, मुळांना पाणी द्यायचं काम प्रभावीपणे करत आहेत.
या पुस्तकातील 31 लेख आपली दृष्टी व्यापक करण्याबरोबरच जगणं समृद्ध करतील. ज्यांना आधुनिक संत म्हणता येईल अशा आचार्य विनोबा भावे यांच्या शैक्षणिक विचारांच्या पैलूचा परामर्श घेताना संदीपजी वाकचौरे यांचं भाषिक सामर्थ्य दिसून येतं. आजच्या काळाशी सुसंगत मांडणी करताना त्यांनी विनोबांचे विचार अशा पद्धतीने पेरले आहेत की ते सामान्य वाचकाला समजून घेता येतील आणि प्रकांडपंडितांच्या क्षितिजांचाही आणखी विस्तार करतील. विनोबाजींना अपेक्षित असलेल्या ज्ञानशक्ती आणि प्राणशक्तिचा सुंदर मिलाफ या पुस्तकात घडला आहे.
आपल्या नावामागे किती पदव्या आहेत?, आपल्याला किती गलेलठ्ठ पगार मिळतो? याचा बडेजाव मिरविणार्‍यांना विनोबा सोप्या भाषेत विचारतात की, ‘‘तुझ्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किती गोष्टींची निर्मिती तू करू शकतोस? म्हणजे जे अन्न तू खातोस ते तू निर्माण करू शकतोस का? शेतीत पेरणीपासून ते धान्य काढण्यापर्यंत तुला काय करता येते? मशागत असू दे, किमान ते धान्य हाती आल्यावर तुला तुझा स्वयंपाक स्वतःला करता येतो का? तू जे कपडे घालतोस त्याचा धागा तयार करता येतो की ते कपडे शिवता येतात? पायात चप्पल असेल तर ती तयार करता येते का? निदान ती तुटली तर त्याची दुरूस्ती तर करता येते का?’’
थोडक्यात स्वतःला आवश्यक असलेल्या कोणकोणत्या वस्तुंची निर्मिती आपण करू शकतो? मग इतका अहंकार कसला? प्रेमाइतकीच किंबहुना त्याहून अधिक किंमत श्रमाला मिळायला हवी. पैसे फेकून तुम्ही कामासाठी माणसे ठेवू शकता पण जो रोज किमान काही वेळ शारीरिक श्रम करत नाही त्याच्या शिक्षणाचा समाजाला आणि त्याला स्वतःलाही काहीच उपयोग नाही. या पुस्तकातील विचार आत्मसात करणे आणि ते अंमलात आणणे म्हणजे आपल्या निरोगी, चारित्र्यसंपन्न आणि यशस्वी जीवनाची आखणी करणे आहे.
या पुस्तकातील प्रकरणांच्या शीर्षकातूनही विषयाचे महत्त्व आणि विनोबांच्या विचारांची अथांगता लक्षात येते. वाणगीदाखल काही शीर्षके पाहा – ज्ञानाची भूक हेच शिक्षण, सत्तामुक्त शिक्षण हवे, जीवन हेच शिक्षण, स्वावलंबनातून साधेल समता, शिक्षण ‘दासी’ नको ‘राणी’ हवी, ज्ञानप्रसारासाठी मातृभाषाच हवी, श्रमाची प्रकाशवाट, आनंदाहूनी थोर मज नाही काही, गाव तिथे विद्यापीठ, अनुभवाचे पुस्तक हवे.
हे पुस्तक पालकांनी आणि शिक्षकांनी गंभीरपणे वाचायला हवे. ‘माणूस’ घडण्याच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड ठरेल. असे म्हणतात की, आपण आमदार झालो नाही तरी चालते, खासदार झालो नाहीत तरी चालते पण ‘समजदार’ मात्र असायलाच हवे. ही ‘समज’ निर्माण व्हायची असेल आणि चांगल्या-वाईटातील फरक समजून घेत स्वतःला सिद्ध करायचे असेल तर संदीप वाकचौरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर अलीबाबाची गुहाच उघडली आहे. त्यांनी दिलेला हा ज्ञानरूपी खजिना आपल्या समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही.
सर्व वाचकांच्या वतीने ज्ञानसाधक संदीप वाकचौरे सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या आगामी लेखनसंकल्प सिद्धीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

– घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक

पुस्तक : विनोबांची शिक्षणछाया
पाने : १३६
किंमत : २५०/-
घरपोच मागविण्यासाठी गूगल पे / फोन पे : ७०५७२९२०९२

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा

 

विनोबांची शिक्षणछाया

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा