‘चपराक’चे संपादक आणि माझे मित्र घनश्याम पाटील यांचा फोन आला. तसे आमचे नियमित संभाषण आणि फोन असतो; पण त्या दिवशी घनश्याम थेट म्हणाले, ‘‘आबा, तुम्ही पक्षपाती आहात काय…?’’
त्यांचे हे शब्द कानावर पडले आणि काळजात चर्रर… झालं. क्षणभर घनश्याम माझ्यावर आरोप करताहेत असं वाटलं. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, असा प्रश्नही डोक्यात चमकून केला.
अर्थात हे काही सेकंदात झालं. काही सेकंदात मन कुठे, कुठे भटकत जातं, याचा प्रत्यय पुन्हा आला. शरीर थरथरायला लागलं. त्यावरून तरी आपण भरकटोय असं जाणवत होतं. त्यानंतर घनश्याम यांनी ‘‘तो दिवाळी अंकासाठी विषय आहे, त्यावर लिहा,’’ असं सांगितल्यानं मन टाळ्यावर आलं; पण शरीराचं थरथरणं काही थांबलं नाही. सुमारे पाच मिनिटं संभाषण झालं आणि मी घनश्याम यांना होकार कळवला.
मन स्थिर झालं होतं पण शरीर अजूनही मार्गावर येत नव्हतं. डोक्यात अनेक विचार सुरू झाले आणि त्याचे परिणाम शरीरावर होऊ लागले. पत्रकारिता हा पेशा मी स्वेच्छेने स्वीकारला होता. भौतिकशास्रात पदवी घेतल्यानंतर ‘पत्रकार व्हायचंय,’ असं मी जेव्हा सांगे तेव्हा मला लोक वेड्यात काढत. प्रामाणिकपणे पत्रकारिता करायची या एकाच ध्येयानं पछाडलो होतो आणि आजही ते मानेवरील भूत गेलं नाही. माझ्या तीस वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत, ‘‘आबा तुम्ही पक्षपाती आहात काय?’’ असा प्रश्न मला कोणीच विचारला नव्हता. कदाचित ते धाडस कोणाला झाले नव्हते; कारण मी माझ्या पेशाशी प्रामाणिक होतो. घनश्याम यांनी प्रश्न उपस्थित केला आणि माझ्या पत्रकारितेवर माझा असलेला विश्वास, कदाचित अतिविश्वासाला ठेच पोहचली. माझ्या पत्रकारितेबद्दल मी प्रामाणिकपणे मीमांसा करायला सज्ज झालो. त्यामुळे घनश्याम यांचे आभार मानायलाच हवेत.
दहाव्या इयत्तेपासूनच मी पत्रकारितेत जाण्याचं मनाशी निश्चित केलं होतं. पत्रकारिता करायला पदवी हवी आणि विज्ञान हा माझा आवडता विषय, म्हणून विज्ञान शाखेत गेलो; मात्र त्यासंबंधी मला कुठलेही करियर करायचं नव्हतं. पदवी मिळाल्यानंतर एक-दीड वर्षातच माझं स्वप्न साकार झालं. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हाताखाली शिकावू पत्रकार म्हणून नोकरी मिळाली. तेव्हापासून पत्रकारितेत आपण निःपक्षपातीपणे लेखणी हातात धरायची हे निश्चित केलं. त्यात माझ्या सद्विवेकबुद्धिप्रमाणे तरी त्यात खंड पडू दिला नाही. विवेक, तरूण भारत, महानगर अशा विशिष्ट विचारसरणीला वाहिलेल्या वर्तमानपत्रात काम केलं पण माझ्यात बदल होऊ दिला नाही.
मी खरंच जी पत्रकारिता करत होतो ती निःपक्षपाती होती का, याचा विचार आता करतोय तर मला ती निःपक्षपाती होती, असं वाटत नाही. पत्रकारितेत नवीन असताना उपसंपादक म्हणून डेस्कवर काम करत होतो. बातम्यांचं भाषांतर, वार्ताहरांनी आणलेल्या बातम्या दुरूस्त करणं असं कामाचं स्वरूप! भाषांतर करणार्या अनेक बातम्यांबाबत मनात संशय निर्माण व्हायचा. ती बातमीच पक्षपाती वाटायची. तर कधीकधी वार्ताहरांनी दिलेल्या बातम्याही पक्षपाती होत्या; पण मी त्याविरोधात काहीच करू शकत नव्हतो. भाषांतर, दुरुस्ती करून त्या छापायला मीच द्यायचो. त्यावेळी झालेल्या पक्षपातात मी सहभागी होतो, म्हणून मी दोषी होतो का?
एका वर्तमानपत्रात काम करताना माझ्याकडं मुंबई महानगरपालिकेच्या बातम्यांचं वार्तांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली. सुरूवातीला माझी उडी प्रेसनोटच्या बातम्या करून पाठवणं इतकीच मर्यादित होती. संपादकांनी काही दिवस ते चालवून घेतलं. मग मला ‘महापालिकेच्या अधिकार्यांना विशेषतः आयएएस अधिकार्यांना भेट, त्यांच्याकडून माहिती घेऊन बातम्या कर’ असा सल्ला दिला. तेव्हा महापालिकेत एक आयएएस अधिकारी होते. पत्रकार त्यांना भेटत आणि ज्याला ‘एक्सक्ल्युझिव्ह’ म्हणतात त्या बातम्या देत. मीही त्यांच्याकडं जाऊ लागलो. तेव्हा त्यांनी मला दुर्लक्षित केलं. एकदा-दोनदा तर अवमानही केला. मग एक दिवस त्यांना काय वाटलं माहीत नाही… त्यांनी मला आतल्या गोटातील माहिती दिली. मी त्याची बातमी केली. बायलाईनसकट ती बातमीही खूप गाजली. त्यानंतर ते मला वारंवार अशी एक्सक्ल्युझिव्ह माहिती देत होते. आज मी त्याबद्दल विचार करतो तर ते मला कोणती माहिती देत होते? त्यांच्या कामात अडथळा आणणार्यांची किंवा त्यांना एखाद्या व्यक्तिनं अडचणीत आणलं तर त्या व्यक्तिच्या विरोधातील माहिती ते मला वेगळ्याप्रकारे देत होते. म्हणजे ते पक्षपात करत होते आणि एक्सक्ल्युझिव्ह बातम्यांच्या नादात मीही त्या पक्षपातीपणाचा बळी ठरत होतो. मग मी खरंच निःपक्ष होतो का…?
माझ्या नकळत माझा कोणीतरी वापर करून घेत होते आणि मी मात्र निःपक्षपाती असल्याचा खोटा अभिमान बाळगून होतो. आपण जेव्हा एखादी माहिती खोदून काढली असं अभिमानानं सांगत होतो तेव्हा ती माहिती देणार्या व्यक्तिचा उद्देश साध्य करून देण्यासाठी त्याला हातभार लावत होतो. मग हा पक्षपातीपणा नाही का? महानगरपालिकेत वार्तांकन करताना अनेक खात्यातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभारावर पत्रकार बातम्या करायचे. त्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणायचे; पण सेक्रेटरी खात्यातील अनागोंदीबद्दल कोणीच लिहित नव्हतं. तेथील ‘आतली माहिती’ उजेडातच यायची नाही. कारण काय होतं…? सर्व पत्रकारांना तेथूनच अन्य खात्यात काय चाललं आहे हे कळायचं आणि त्यामुळं खुद्द त्या खात्यात काय चाललं आहे याकडं कोणाचंच लक्ष नसायचं. इतकंच काय त्या खात्यातील बातम्या दिल्या तर आपल्याला एक्सक्ल्युझिव्ह माहिती मिळणार नाही, यामुळं जाणूनबुजून त्याकडं दुर्लक्ष केलं जायचं. ती पत्रकारिता मग कितीही मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला तरी पक्षपातीच होती.
पक्षपात म्हणजे विशिष्ट विचारसरणी, राजकीय पक्ष यांच्या बाजूनंच बातम्या, लेख लिहिणं, त्यात कितीही मोठी चूक असेल तर त्यावर पांघरून घालणं हेच केवळ नव्हे तर कोणाच्या फायद्यासाठी लेखणी झिजवणं याला देखील पक्षपातीपणाच म्हणतात आणि तो पक्षपातीपणा मी नकळत का होईना केला आहे, अशी प्रांजळ कबुली येथे द्यावीच लागेल. मी पत्रकारिता करताना कुठल्याही विचारसरणीला बांधलो नाही. त्यामुळं कट्टर हिंदुत्त्ववादी, कट्टर हिंदुत्त्ववादविरोधी आणि पूर्णतः व्यावसायिक वर्तमानपत्रातही मी काम करू शकलो. त्यामुळंच वर्तमानपत्र पत्रकारिता करताना माझ्यावर कुठलाही ठपका बसला नाही; पण नकळत का होईना मी पक्षपाती होतो.
मध्यंतरी मुंबईत एन्काऊंटर स्पेशालिस्टचा बोलबाला होता. त्यापैकी काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट ओळखीचे होते. त्यामुळे अगदी आतल्या गोटातल्या बातम्या मिळायच्या; पण त्या एन्काऊंटर स्पेशालिस्टनं इतर काय धंदे केले हे कधी जाणून घ्यावंसं वाटलं नाही किंवा एक्सक्ल्युझिव्ह बातम्यांच्या नादात त्याकडं दुर्लक्ष करावं लागलं हा देखील पक्षपातीपणाच होता. अर्थात त्याचा कोणताही आर्थिक, व्यावसायिक फायदा करून घेण्याचा विचारही मनात आला नाही. त्यामुळं असेल कदाचित पण 30 वर्षांच्या पत्रकारितेच्या करियरमध्ये आपण पक्षपाती आहोत याचा स्पर्शही झाला नाही.
राजकीय पत्रकारिता करताना असा पक्षपातीपणा वारंवार झाला याची कबुली आता द्यावीच लागेल. एका देशव्यापी राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष मित्र होता. महाराष्ट्रातही त्या पक्षाची सत्ता होती. त्यांचा मुख्यमंत्री होता. त्या प्रदेशाध्यक्षाला मुख्यमंत्रीपद हवं होतं; पण मिळणार कसं? मुख्यमंत्र्याचं एक प्रकरण त्या प्रदेशाध्यक्षाला माहीत होतं. त्यानं मला ते सांगितलं. ‘कुठं बोलू नको, लिहू नको,’ असंही म्हटलं; पण प्रकरण खळबळजनक होतं. मी नाही लिहिलं मात्र त्यानं सांगितलेल्या त्या प्रकरणाची बातमी एका मोठ्या दैनिकात पहिल्या पानावर छापून आली तेव्हा मला आश्चर्य वाटलं. हे प्रकरण तर माझ्याकडंच होतं पण त्या रिपोर्टरला ते कसं मिळालं? ज्यानं ही बातमी दिली होती, त्याला मी खोदून विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं, ‘‘त्या प्रदेशाध्यक्षानंच दिली.’’ त्यावेळी मला एक नवा धडा मिळाला.
राजकीय क्षेत्रात कोणी माहिती दिली आणि ‘छापू नको,’ असं सांगितलं की ती छापायची! कारण ती माहिती देणार्याचा त्यात इंटरेस्ट असतो. अर्थात ही देखील पत्रकारिता होती. ती माझ्या आधी, माझ्यावेळी आणि अगदी आजही आहे. पत्रकारिता म्हणून त्या धर्माचं पालन योग्य असलं तरी त्यात अधर्म आहे हे मान्य करावंच लागेल. अशी पत्रकारिता ही पक्षपाती नाही, असं बोलण्याचं धाडस मी निदान आज तरी करू शकत नाही.
पुढं मुख्य वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक, निवासी संपादक, संपादक म्हणून वेगवेगळी पदं भूषवली; पण मी ज्या पद्धतीनं बातम्या गोळा केल्या त्याचेच धडे माझ्या हाताखाली काम करणार्या सहकार्यांना देत होतो. त्यातून पत्रकारिता हा धर्म पाळला जात असला तरी तो धर्म नव्हता कारण त्यात कोणाच्या तरी फायद्यासाठी असलेली माहिती आम्ही एक्सक्ल्युझिव्ह म्हणून, भ्रष्टाचार, अनागोंदी बाहेर काढली म्हणून अभिमानानं छापत होतो. त्यात पक्षपात नाही, असं कसं म्हणू शकत होतो? पत्रकारिता करताना ती पक्षपाती होणार नाही, याची काळजी घेत होतो पण ती केवळ विचारसरणीसापेक्ष होती. पक्षपात हा होताच! एखाद्यावर टीका, भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्या व्यक्तिचं काय म्हणणं आहे हे न चुकता छापलं जात होतं पण मुळात जी मूळ माहिती हाती लागत होती, ती का आणि कशाला कोण देतंय याकडं मात्र ढुंकूनही कधी पाहावंसं वाटलं नाही. त्याबद्दल विचारही करावासा वाटला नाही. कदाचित तो विचार तेव्हा झाला असता तर पत्रकारिता सोडावीही लागली असती कारण मग बातमी छापणार काय, हाच व्यावसायिक जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला असता.
त्यामुळं एका अर्थानं झालं ते बरं झालं, असं म्हणावंसं वाटतंय पण घनश्याम पाटील यांनी आरसा दाखवला आणि जो विचार आतापर्यंत कधी केला नाही तो विचार झाला. पत्रकारितेच्या धर्मात पक्षपातीपणाचा अधर्म नकळत का होईना झाला हे मान्य करावंच लागेल.