देखणी

माखी नाव तिचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली एका झोपडपट्टीत ती, तिच्या तीन बहिणी, आई व सदा न कदा दारुच्या नशेत धुंद राहणारा तिचा बाप एवढे कुटुंब एकाच खोलीत, खोली म्हणण्यापेक्षा झोपडी काट्याकुट्या, रबर, कागद, गोणपाटाने तयार झालेली झोपडी अशा ठिकाणी जन्म घेतला.

घरात अठरा विश्वे दारिद्य्र. आईला दारु पिऊन मार मार मारणारा बाप व त्याला कुठलाही प्रतिकार न करु शकणारी परंतु चार मुलींना जगवण्यासाठी धडपड करणारी तिची आई! वस्ती अतिशय घाणरेडी. जिकडे तिकडे कचराकुंड्या, दारुच्या भट्ट्या, पत्ते खेळणारी, टवाळकी करणारी पोरं, अशा वस्तीत तिचा जन्म झाला. आईला दिवसभर मेहनत करुन जेमतेम वीस-पंचवीस रु. मिळणार व ह्यातच कुटुंबाचे सर्व काही चाले. एखादे वेळी पैसे मिळाले नाही, काम मिळाले नाही तर पाणी पिऊन किंवा फक्त पाव खाऊन झोपावे लागे. पोटात भुकेचा डोंब पेटलेला व दारु पिऊन आलेला बाप आईला काहीही कारण शोधून मारणार हे ठरलेले. अशा ह्या वस्तीत देवाला चेष्टा करावीशी वाटली की काय म्हणून माखीचा जन्म झाला. गोरीपान, कुरळ्या केसांची माखी वर घारे डोळे व कुणाच्याही नजरेत भरावी अशी देहयष्टी घेऊन देवाने ह्या दुर्गंधीत तिला जन्म दिला. माखीला बघून असे वाटे की कुणी तिला हात लावला तरी ती मळकी होईल. इतकी ती सुंदर होती.

रोज कचर्‍यातील प्लास्टिकच्या थैल्या गोळा करणे, कचरा गोळा करणे, कुणा मोठ्या लोकांचे धुणी-भांडी करणे, पडेल ती कामे माखी व तिच्या तिघी बहिणी करत असत. माखी सर्वात लहान होती. अंगावर कुणीही दिलेले कपडे घालत असे. मळक्या कपड्यात देखील ती इतकी सुंदर दिसे की कुणीही तिचा हेवा करावा. हळूहळू माखी मोठी होत होती. तिने दिवसभर काम करुन जे पण काही मिळवले ते पैसे ती रात्रीच्या शाळेत जाण्यासाठी वापरे. बापापासून लपून माखीने सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. हळूहळू तारुण्यात पदार्पण करणारी माखी सर्वांचे आकर्षण झाली होती. ती जिथे पण जात असे पुरुषांच्या नव्हे पण स्त्रियांच्या नजरा देखील तिच्यावरच रोखलेल्या तिला दिसे. पुरुष अधाशीपणाने व स्त्रिया हेव्याने तिच्याकडे बघत.

ती जेव्हा एखाद्या सधन कुटुंबात कामासाठी जात असे तेव्हा या लोकांचे खाणे, पिणे, घर, कपडे ह्या गोष्टींचे तिला खूप आकर्षण वाटे. तिला वाटे की मला देखील हे जीवन जगण्याचा संपूर्ण अधिकार आहे मी पण काही तरी असे करेन की हे लाजिरवाणे जगणे संपेल.

एकदा माखी किराणाच्या दुकानात काही आणायला गेली तर मालकाने तिचा हात धरला. तिला एकदम भीती वाटली पण तिने हात त्याच्या हातात तसा राहू दिला. तर त्याने तिने घेतलेल्या वस्तूंचे पैसे देखील घेतले नाही. तिला काही कळले नाही परंतु आपल्याकडे लोक अशा नजरेने का पाहतात हे तिला कळतच नसे. एकदा तिला एक आरशाचा तुकडा सापडला. त्यात तिने स्वत:ला पाहिले व तीच स्वत:च्या प्रेमात पडली. त्यानंतर त्या फुटक्या आरशात तासन्तास स्वत:ला न्याहळत बसण्याचा तिला नादच लागला. माखीच्या आईला ह्या सर्व गोष्टींची खूप काळजी वाटे. ती माखीला म्हणे, ‘‘अग, तोंडाला काळं लावून बाहेर पडत जा. जग खूप खराब आहे. तुझ्या भोळेपणाची व ह्या अतिसौंदर्यांची मला खूप भीती वाटते.’’

माखी फक्त हसे खूप हसे. एकदा ती काम करत होती त्या घराच्या मालकाने तिला शंभर रूपयाची नोट दिली. माखीने इतके पैसे कधीही पाहिले नव्हते. ती त्या नोटेकडे अगदी निरखून बघत असताना त्याने तिला गच्च मिठी मारली. त्याच्या ह्या वागण्याचे तिला आश्चर्य वाटले. तिने त्या शंभर रुपयांचे सर्व खाण्याचे पदार्थ घेतले व आईला दिले. आईने विचारले की, ‘‘माखी इतके पैसे कुठून आणले?’’ तर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा आई खूप चिडली. तिने सर्व पदार्थ फेकून देण्यास सांगितले. तेव्हा माखी व तिच्या सर्व बहिणींनी ते पदार्थ पटापट फस्त करण्यास सुरुवात केली. त्यांची भूक बघून आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. आईने माखीला पुन्हा कधीही त्या घरात काम करायला पाठवले नाही.

 एके दिवशी माखी अशीच प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करत असताना एक अगदी उत्तम कपडे परिधान केलेली व्यक्ती गाडीतून तिच्याकडे पाहत असल्याचे तिला दिसले, परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु ती व्यक्ती सारखी तिच्याकडे पाहत होती. माखीने तिकडे पाहणे टाळले व ती पुन्हा आपल्या कामात मग्न झाली. ती व्यक्ती गाडीतून उतरली व माखीच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. पायात बाटाचे जोडे, उंची वस्त्र, हातात सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची चेन व डोळ्यावर गॉगल. अगदी उच्च कुटुंबातील असा तो तिच्या समोर आला. ती त्याला पाहतच राहिली. त्याची नजर देखील आपल्यावर खिळलेली आहे हे तिने ओळखले. ती तिथून उठून दुसरीकडे जायच्या विचारात असतानाच त्याने अचानक तिचा हात पकडला. तिला विचारले ‘‘तुम्हारा नाम क्या है?’’

तिला त्याचा तो स्पर्श वेगळाच भासला. हवाहवासा वाटणारा. ती एकदम स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली. तिच्या तोंडातून ‘मा..खी..’ हे दोनच शब्द बाहेर पडले. त्याने तिला एका गाड्यावरुन खायला आणून दिले. तिनं पटापट सर्व संपवले. त्याने बरोबर हेरले होती की अन्न ही तिची कमजोरी आहे. हळूहळू तो तिच्याशी बोलू लागला. त्याने तिची संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर रोजच तो तिला भेटत असे. असाच कुठेतरी कधी तिला खायला देई, कधी नवे कपडे, कधी थोडे फार पैसे देई. बदल्यात त्याने कधीच तिला काही मागितले नव्हते. परंतु तो तिला सारखा न्याहळत असे व त्याची ती नजर तिला असह्य वाटे. तिला खूप घाबरल्यासारखे वाटे. गेल्या 15-20 दिवसापासून तो अधूनमधून तिला भेटत असे. तो एक मोठा निर्माता होता. त्याने माखीला एके दिवशी विचारले, ‘‘माखी माझे नाव अभिजित सावंत आहे. मी पिक्चर बनवतो. तू माझ्या चित्रपटात हिरॉईन म्हणून काम करशील का? मी तुला खूप पैसे देईन पण त्यासाठी तुला माझ्यासोबत मुंबईला यावे लागेल.’’ माखी अवाक होऊन त्याच्याकडे बघतच राहिली. तिने त्यावेळी त्याला काहीच उत्तर दिले नाही. तिने पटापट खाऊन घेतले व ती घराकडे निघाली.

तिच्या मनात विचार चालू झाले. ‘खरंच मी इतकी सुंदर आहे? मी चित्रपटात काम करु शकेन का? जर प्रत्येक पुरुष माझ्याकडे वाईट दृष्टिनेच बघतो तर ह्या माझ्या बाह्य सौंदर्यांच्या बळावरच मी आयुष्यात काही तरी करु शकेन.’ आज प्रथमच तिला तिच्या सौंदर्यांचा अभिमान वाटू लागला. अभिजित तिला ज्या नजरेने न्याहाळत असे ते तिला आठवू लागले. तिच्याही नकळत ती त्याच्याकडे आकर्षिली गेली. तिने ठरविले की आपण अभिजित सोबत मुंबईला जायचे व तिथे आपले नशीब आजमावयाचे परंतु आई ह्या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाही हे देखील तिला माहित होते. अभिजित म्हणाला होता की, ‘‘माखी तुझी भाषा, राहणीमान ह्या सर्वच गोष्टींमध्ये बदल आणण्याची गरज आहे व त्यासाठी तुला मुंबईला येणे भाग आहे.’’

माखीला त्याची प्रत्येक गोष्ट पटत होती परंतु घरातून परवानगी मिळणे अत्यंत अवघड होते. म्हणून ती विचार करु लागली की पुढे काय करावे? त्या दिवसापासून ती कसे जावे, काय करावे हाच विचार करु लागली.

एके दिवशी ती रस्त्यावरच्या पिशव्या गोळा करीत असताना अभिजित एकदम तिच्या समोर येऊन उभा राहिला. तो म्हणाला, ‘‘माखी, मी आज रात्री मुंबईला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा कदाचित आपली भेट होणार नाही. तेव्हा काय तो निर्णय घे.’’

माखी त्याच्या ह्या बोलण्याने एकदम विचारात पडली. ती घाईघाईने त्याला म्हणाली, ‘‘नाही.. नाही.. असं करु नका. मला खूप पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी मी तुमच्या सोबत यायला तयार आहे परंतु मी रात्री 10 वाजेनंतर सगळे झोपल्यावरच घरातून पळू शकते. फक्त मी तुम्हाला कुठे भेटू? तेवढे मला सांगा.’’

तेव्हा अभिजित व माखी यांनी थिएटरच्या बाहेर रात्री 12 वाजायच्या आत भेटू असे ठरविले. माखी लगेचच तेथून निघाली. घरी आली तेव्हा तिच्या बहिणींमध्ये खाण्यावरुन काही तरी भांडाभांडी चालू होती व त्या दोघी पोळीच्या एका तुकड्यावरुन एकमेकींशी भांडत होत्या हे कळाले. ते दृष्य बघून माखीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तेव्हा तिने ठरविले की, ‘आपण मुंबईला जाऊ व आपल्या कुटुंबासाठी खूप पैसे कमवू. त्यानंतर घरातले दारिद्य्र कायमचे नष्ट करु.’ असे विचार तिच्या मनात येऊ लागले. तिने निश्चय केला की आईला झोप लागली की आपण घराबाहेर पडू. सोबत घेण्यासारखे काहीच नव्हते त्यामुळे बांधाबांध करायची नव्हती. परंतु आता खूप दिवस तरी आईबाबा आपल्याला दिसणार नाही म्हणून ती त्यांना डोळ्यात साठवून घेऊ लागली. तिचे आईबाबा व बहिणी यांच्याकडे ती प्रेमाने किती तरी वेळ बघत बसली. जेवण उरकल्यावर ती लगेचच झोपली. रात्री अकराच्या सुमारास तिने हळूच उठून बघितले. दिवसभर कष्ट करुन तिची आई अगदी गाढ झोपून गेली होती. माखी हळूहळू उठली. आईच्या पाया पडली. तिला डोळ्यात साठवून ती निघाली. पुन्हा कधी या गावाचे दर्शन होईल की नाही, असा विचार मनात येताच तिने पटकन तो विचार पुसून टाकला. ती अभिजित सोबत मुंबईला जायला निघाली. वाटेत असंख्य विचार तिच्या मनात येत होते. आपण काय करणार आहोत हे देखील तिला नीटसे माहीत नव्हते. अनोळखी व्यक्ती सोबत अनोळखी रस्त्याने ती निघाली होती. शंका कुशंका, भीती व अश्रू यांचा संगम जणू तिच्या डोळ्यात दिसत होता व ह्याच गोष्टीच्या विचाराअंती तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही. तिला जाग आली ती थेट मुंबई आल्यावरच. अभिजितने तिला जागे केले तेव्हा ती अगदी घाबरुन उठली. त्याने तिला थेट एका हॉटेलमध्ये नेले. मुंबई मधील मोठमोठ्या इमारती, भव्य रस्ते, मोठमोठाले दिवे व अफाट गर्दी बघून ती अगदीच भांबावून गेली. ती गाडीतून हॉटेलकडे जाताना खिडकीतून वाकून वाकून चौफेर पाहत होती. सारे काही तिच्यासाठी अगदीच नवे होते. ती अगदी वेडी होऊन जिकडे तिकडे पाहत होती. अभिजित मात्र भान हरपून तिच्याकडे पाहत होता. मनातल्या मनात तिच्या सौंदर्यांची स्तुती करत होता. तिचे घारे डोळे, तिचे सुंदर केस, तिचा बांधा, तिचा वर्ण सारेच कसे देवाने हिला भरभरुन दिले. तिच्यासारख्या सौंदर्यवतीने झोपडीत जन्म घ्यावा हा खरंच अन्याय आहे, असे त्याला वाटले. त्याने गाडी थेट हॉटेलात नेली. तिला ते एवढे मोठे हॉटेल बघून अगदीच नवल वाटले. ती अगदी भान हरपल्या सारखी अभिजितच्या मागोमाग चालू लागली. प्रत्येकजण त्याला सलाम ठोकत होता. म्हणजे तो कुणी मोठा माणूस असेन असे तिला वाटले. त्याने तिला एका रुममध्ये आणले. त्यानंतर त्याने तिला कपाटातून कपडे दिले. तिला स्नान वगैरे उरकून, कपडे करुन एक-दोन तासात तयार व्हायला सांगितले. तिला खूप दिवसानंतर यथेच्छ पाणी, प्रशस्त न्हाणीघर, कधी नव्हे ते साबण वगैरे मिळाला होता. तिने आंघोळ करायलाच एकदोन तास लावला. त्यानंतर तिने व्यवस्थित कपडे केले व ती तयार झाली. एवढ्यात तिला दारावर टकटक ऐकू आली. तिने दार उघडले. एक वेटर खाण्याचे पदार्थ घेऊन आला. ती त्याला म्हणाली, ‘‘भाऊ मी तर काहीच मागवले नाही.’’

इतक्यात अभिजित बाहेरुन आला व तिला म्हणाला, ‘‘हे सर्व मी मागवले आहे.’’

वेटरने त्याला जोरदार सलाम ठोकला. सर्व सामान टेबलावर व्यवस्थित मांडून तो निघून गेला. माखीला एव्हाना खूप भूक लागली होती. ती खाण्याकडे अगदी लालसेने पाहत होती व अभिजितने सांगताच ती एकदम खाण्यावर तुटून पडली. तिचे सुंदर रुप आंघोळ करुन व स्वच्छ कपडे केल्यावर अधिकच खुलून दिसत होते. अभिजित तर अगदी डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता परंतु माखीचे ह्या गोष्टीकडे लक्षच नव्हते. ती खाण्यातच गुंग होती. अगदी पोटभर खाल्यावर तिने वर मान केली व तिच्या एकदम लक्षात आले की अभिजित एकसारखा तिच्याकडे पाहत आहे. त्याची नजर तिच्या संपूर्ण शरीरावर फिरत होती. हे पाहून तिला कसेसे झाले. तिने लवकर सगळे आवरले व ती त्याला विचारु लागली, ‘‘आता पुढे काय करावयाचे आहे?’’

तो फक्त हसला व म्हणाला, ‘‘आता काही नाही करायचे. आज मी तुला संपूर्ण मुंबई दाखवणार व उद्यापासून तुझी ट्रेनिंग सुरु, काम सुरु. ती खूप खूश झाली. तिने मुंबईचे फक्त नाव ऐकले होते परंतु आज मोहनगरी तिला स्वत:च्या डोळ्यांनी बघायला मिळणार होती. तिने आनंदाने अगदी उडीच मारली. त्यानंतर अभिजितने तिला संपूर्ण मुंबई दाखवली. समुद्र किनारा दाखवला. मुंबई महानगरी एका दिवसात बघणे शक्यच नाही परंतु त्याने तिला जे जे शक्य होते ते सर्व दाखविले. तिच्यासाठी खूप कपडे, दागिने वगैरे घेतले. रात्री दोघे जेवण वगैरे उरकून जेव्हा हॉटेलात परत आले त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. सगळीकडे सामसूम झाली होती. माखीला रुममध्ये घेऊन अभिजित देखील आत आला. त्यावेळी माखीला थोडी भीती वाटली परंतु त्याच्या उपकाराच्या ओझ्याने ती दबली होती. तिला त्याला काही विचारण्याचे धाडसच झाले नाही. माखीने सर्व सामान कपाटात व्यवस्थित ठेवल.े त्यानंतर तिला काय करावे सुचत नव्हते. ती एका खुर्चीत जाऊन बसली कारण अभिजित पलंगावर झोपला होता. परंतु त्याची नजर मात्र फक्त माखीवरच होती. त्याने तिला इशार्‍यानेच जवळ बोलावले. माखी घाबरत घाबरत त्याच्या जवळ गेली. त्याने एकदम तिचा हात आपल्या हातात घेतला व तो म्हणाला, ‘‘माखी तू खूप सुंदर आहेस. माझ्यासोबत लग्न करशील का? मी तुला पाहताक्षणी तुझ्या प्रेमात पडलो. मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही.’’

त्यावर काय उत्तर दयावे हे तिला कळलेच नाही. ती फक्त खाली मान घालून तिथे बसून राहिली. तिच्यासाठी अभिजितचा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. तिला देखील मनोमन अभिजित आवडत होता परंतु तिला आयुष्यात काही तरी करुन आपल्या कुटुंबासाठी, विशेषत: आईसाठी सुंदर जीवन, पोटभर खायला व अंगभर कपडे घालायला मिळेल एवढे पैसे तरी कमवायचे होते. अशावेळी लग्न वगैरे गोष्टींना तिथे स्थान नव्हते.

अभिजित उठून बसला. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. ती घाबरुन एकदम उठून जाऊ लागली. काय करावे तिला कळेनासे झाले. ती म्हणाली की, ‘‘कृपया मला थोडा वेळ द्या. मी विचार करुन काय ते सांगेन.’’ पंरतु तो तिच्या अधिक अधिक जवळ येत गेला व तिने खूप प्रयत्न करुन, पळापळ करुन, शेवटी ओरडून तिथून पळण्याचा प्रयत्न केला परंतु काही फायदा झाला नाही. अभिजितने तिच्या भोळेपणाचा, तिच्या गरिबीचा गैरफायदा घेतला. तिची जी मोलाची संपत्ती होती तीच हिरावल्यावर आता जगण्याचे काहीच कारण नाही म्हणून तिने आत्महत्या करण्याचे ठरविले. तिला आता जीवन नकोसे वाटत होते. अभिजितने खोटे बोलून तिचे सर्वस्व लुटले होेते. तिला वाटले सरळ आत्महत्या करावी व संपवून टाकावे स्वत:ला. आता जगण्याला अर्थ नाही. म्हणून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तिची तसे काही करण्याची हिम्मत झाली नाही. पुन्हा परत जाऊन आई प्रमाणेच मार खाऊन हालअपेष्टांचे जीवन जगणे तिला नको होते. तिच्या मनातून आवाज आला की, ‘मी का आत्महत्या करु? मी काय पाप केले? मी काय चूक केली? ईश्वराने निर्माण केलेल्या ह्या जगात माझ्याच सारख्या एका माणसावर मी विश्वास ठेवला व त्यानेच माझा गैरफायदा घेतला. त्यात माझा काय दोष? जगाच्या बाजारात आंतरिक सौंदर्याला, भोळेपणाला, संस्कारांना काहीच महत्त्व नाही. प्रत्येकजण माझ्या ह्या बाह्यसौंदर्याने आकर्षित होतो व माझे शील भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांना दंड का मिळू नये? मी का हा अत्याचार सहन करावा? जर प्रत्येकाला माझे बाह्यसौंदर्यच मोलाचे वाटते तर  का मी ते कॅश करु नये? का मी हे लाचारीचे जिणे जगावे?’ एक मन म्हणे, ‘‘माखी, ह्याच गोष्टीला आई घाबरत होती. तिला माहीत आहे की स्त्रीचे सत्व फक्त चौकटीच्या आतच शाबूत राहते. म्हणूनच ती आपल्याला कुणाकडे कामाला जाऊ देत नव्हती. बाहेरच्या जगातील हे सारे नराधम आपल्या मुलीचे सत्त्व टिकू देणार नाही हे माहीत होते आईला.’’

ते मनोमन आठवू लागले व तिची माफी मागू लागले. त्यानंतर अभिजितची जेव्हा इच्छा असे तेव्हा तो तिचा वापर करु लागला. त्याचे हे बिभत्स रुप माखीला अगदी नकोसे झाले होते परंतु तिच्याजवळ तिथे राहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. लग्न वगैरे करण्याचे वचन सारे काही खोटे होते. ते तिला फसविण्यासाठी तो बोलत होता हे तिला कळून चुकले होते परंतु असे किती दिवस चालेल, हा विचार करुन करुन डोके अगदी फुटायची वेळ आली होती. इतक्यात अभिजित आला. त्याच्या सोबत आज कुणीतरी होते. ती दोघे आत आली. अभिजितने माखीला बोलवले व सांगितले, ‘‘हे शेठजी तुला भेटायला खास आले आहेत.’’

माखी म्हणाली, ‘‘मी तर त्यांना प्रथमच बघते आहे.’’

‘‘परंतु हे तुला कित्येक दिवसांपासून पाहत आहेत.’’

शेठजी मात्र अगदी अधाशासारखे माखीला पाहत होते. पुढे काय होणार हे माखीला कळून चुकले होते. अभिजित तिला व शेठजीला खोलीत एकटे सोडून निघून गेला होता. शेठजी अगदी उतावीळ होऊन तिच्याकडे पाहत होता. त्यावेळी माखी अचानक त्याच्या शेजारी जाऊन बसली.

‘‘माझा किती रुपयात सौदा केलाय ह्या नराधमाने?’’ ह्या प्रश्नाने शेठ भानावर आला व म्हणाला पूर्ण पाच हजार दिलेत मी त्याला परंतु पाच हजार मी काम झाल्यावर देणार आहे. माखी म्हणाली, ‘‘मी तुमचे काम करेन परंतु ते पाच हजार मला दयावे लागतील व दुसरी अट अशी की मला इथून बाहेर काढा. मला अभिजित बरोबर रहायचे नाही.’’

त्यावर शेठ खूश झाला व त्याने पाच हजार रुपये काढून माखीच्या समोर ठेवले. इतके रुपये तिने आयुष्यात प्रथमच पाहिले होते. त्यामुळे ती त्या रुपयांकडे आशाळभूतपणे पाहत होती व शेठजी तिच्यावर तुटून पडले. माखी विचार करु लागली. माझ्या स्वप्नांच्या पूर्तिचा अर्थात दोन वेळा चांगले अन्न, वस्त्र व निवारा मिळवण्याचा हाच मार्ग विधात्याने मला दाखवला तर हाच खरा! स्वप्नपूर्ती महत्त्वाची! चारित्र्य, संस्कार, शील ह्या गोष्टी तर केवळ आभास आहेत आणि ह्या आभासमय गोष्टींच्या सहाय्याने जीवन जगणे अशक्यच आहे. ती त्याच दिवशी शेठजींसोबत तेथून पळून गेली. शेठजींनी काही दिवस पैश्यांच्या जोरावर माखीला जवळ ठेवले व नंतर एका डान्स बारमध्ये आणून सोडले.

जिकडे तिकडे दारु पिऊन धुंद झालेले नराधम, दिव्यांचा झगमगाट, समोर अर्धवस्त्र अवस्थेत फक्त दोन पैसे मिळवण्यासाठी नाचणार्‍या नर्तिका अर्थात बाला बघून तिच्या मनात धस्स झाले. परंतु तिने लवकरच स्वत:ला सावरले. शेठजींच्या ओळखीने तिला तिथे नाचण्याची परवानगी मिळाली. अर्थात काम मिळाले. हळूहळू माखीला तिचा निर्णय योग्य वाटू लागला. झोपडपट्टीचे घाणेरडे वातावरण, खाण्याची धडपड, अन्नासाठीची कुतरओढ, उपासमार करत, शिव्या खात, फाटके तुटके घालून जिवाची होणारी तगमग, आयुष्यभर कष्ट उपसले तरी आयुष्याच्या शेवटी पोटभर खायला मिळेल की नाही याची काहीही खात्री नाही. त्यापेक्षा स्वत:च्या बाह्य सौंदर्याला कॅश करुन मिळविलेले घर, गाडी, पैसे पोटभर जेवण व बहिणींना, आईवडिलांना मदतीसाठी पाठवलेले पैसे आयुष्यात तिला कधीही मिळाले नसते. जर ती चारित्र्य व संस्कार ह्या आभासातच जगत राहिली असती. त्यामुळे तिला तिचा निर्णय योग्य वाटला.

आयुष्याच्या संध्याकाळी कदाचित मी एकटी असेन, परिवार नसेन, मुलबाळं नसतील, आपलं म्हणावं असं कुणी नसेन परंतु दारिद्य्राच्या वाटेवर कुत्र्यासारखं जिणं व जगातल्या उच्चभू्र म्हणवणार्‍या मानवाच्या रुपातील राक्षसांच्या नजरा, त्यांचे ओरबाडणे सहन करणे हे जगणे नसेन. त्यांनी माझ्या आयुष्याचे पोतेरे करण्यापेक्षा, त्यांनी लज्जाहरण करण्यापेक्षा मीच हा लज्जेचा दागिना का काढून ठेवू नये? मी घेतलेला निर्णयच योग्य, होय अगदी योग्य…! शेवटी मनाशीच चाललेले तिचे द्वंद्व संपले. तिने बारबाला म्हणूनच जगण्याचे निश्चित केले. प्रथम तिला खूप मानसिक त्रास होत असे परंतु जेवणाचे भरलेले ताट जेव्हा तिच्या समोर ठेवले जाई तेव्हा ती सर्व काही विसरत असे. आता हे सारे काही रोजचेच झाले होते. तिला आता असेच जगायचे होते. हे जिवंतपणाचे मरण क्षणोक्षणी अनुभवायचे होते. रोजचेच सरणावर चढणे, रोजच आगीतून होरपळून निघणे, रोज एक नवे युद्ध पेलण्यास तयार व्हायचे होते. मनात कुठेतरी एक आशा होती जी तिला आनंदी करी. स्वत:च्या जीवनाचे जरी मी मातेरे केले तरी पण माझे आईवडील, बहिणी तरी निदान चांगले, स्वच्छ, सुंदर व पवित्र असे जीवन जगत असतील…!

ही कथा लेखिका शिल्पा जैन यांच्या ‘चपराक’ प्रकाशित ‘आभास’ या कथासंग्रहातून घेतली आहे

ह्या कथासंग्रहात अनाथाश्रमातून जीवनप्रवासाला सुरूवात करून शेवटी वृद्धाश्रमात दाखल झालेली सायली, निसर्गाच्या क्रूर चेष्टेने मातृत्व हरवून बसलेली अस्वस्थ दीपाली, पोटाची खळगी भरण्यासाठी, कुटुंबाचे पालन करण्यासाठी नटी होण्याच्या नादात स्त्रीजीवनाचे सर्वस्व गमावून बसलेली देखणी माखी, प्रेमाच्या आभासाला बळी पडलेली चारूलता, नवर्‍याचा अधमपणा डोळ्यांनी पाहूनही नातिचरामि म्हणणारी स्मिता, मुलीचा जन्म नाकारणार्‍या विचाराचा बळी ठरलेली व तिची सासू असे का वागली? असा प्रश्न जिला भेडसावत आहे ती गीता, स्वत:च्या संसारातील अंधारासोबत समाजातील अंधार नष्ट करावयास सिद्ध झालेली स्वयंप्रभा उषा, समर्पण हा स्त्रियांचा निसर्गदत्त गुणधर्म आहे हे सांगणारी सीमा या कथानायिका सार्‍या स्त्रीजातीचे प्रतिनिधित्व करणार्‍या आहेत.

‘आभास’ आता जगभरातील वाचकांसाठी ई-पुस्तक स्वरूपात ऍमेझॉनवर उपलब्ध!

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा