जन्मभरी तो फुलतचि होता…

जगातील सर्वाधिक उत्तुंग मनोरे कोणते? असा प्रश्न मला कधी पडतच नाही. हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रानं जगाला अनेक भव्यदिव्य मनोरे दिलेत. या मनोऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वानं त्यांची उंची आपापल्या क्षेत्रात सातत्यानं दाखुवून दिली. महाकवी केशवसुत ते मर्ढेकर या परंपरेचा विचार करता असाच एक बलदंड मनोरा मला खुणावतो, भुरळ पाडतो. या विलक्षण प्रतिभेच्या मनोऱ्याचं नाव म्हणजे लोककवी मनमोहन नातू! ११-११-१९११ ला जन्मलेल्या मनमोहनांनी ७ मे १९९१ ला जगाचा निरोप घेतला; मात्र त्यांच्या साहित्यिक योगदानातून हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी कायम धगधगत आहे.

कुणी शाईने लिहिली कविता
कुणी रक्ताने लिहिली कविता
करी लव्हाळी लवचिक घेऊन
मी पाण्यावर लिहिली कविता

अशा शब्दात आपल्या कवितेच्या वाटचालीचा आढावा घेणारे मनमोहन केवळ ‘अद्भुत या पठडीतले होते. या मनस्वी कविराजानं जगरहाटीची पर्वा न करता आपल्या विचारांसाठी मोजावी लागणारी किंमत कसलीही कुरबुर न करता आनंदानं मोजली. “उद्याचा कालिदास जर अनवाणी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.” असं राज्यकर्त्यांना ठणकावून सांगणाऱ्या आणि कलावंतांची बाजू घेणाऱ्या मनमोहनांनी वैयक्तिक आयुष्यात मात्र मायबाप सरकारची कोणतीही मदत घेतली नाही. परिस्थितीच्या रेट्यानं काहीवेळा जीवाला डागण्या देणाऱ्या समस्या निर्माण झाल्यानंतर आपल्या मित्रांकडं हातउसने पैसे मागायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. असे पैसे मागतानाचा त्यांचा ढंगही अनोखा होता.‘आज मला दहा रुपये उसने देण्याएवढे तुम्ही श्रीमंत आहात काय?’ असं विचारल्यानंतर मित्र हसत हसत खिशात हात घालत. मित्रांकडं अशी मदत मागणाऱ्या मनमोहनांची उतारवयातील  एक आठवण मात्र सांगावीशी वाटते.

त्यावेळी मनमोहन आजारपणानं अंथरुणाला खिळले होते. त्यांना उठून बसता येणंही शक्य नव्हतं. अडखळत सुद्धा बोलता येत नव्हतं. हा सामर्थ्यवान कवी अशा अवस्थेत जगतोय याविषयीचा एक लेख एका वृत्तपत्रात प्रकाशित झाला. महाराष्ट्राचे तेव्हाचे अर्थराज्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या तो वाचनात आला. शिंदेंनी कसलाही विचार न करता पुण्यातील मनमोहनांच्या सदाशिव पेठेतील घराकडे कूच केली. हा ताफा त्यांच्या घराकडे आला. सुशीलकुमारम नमोहनांना भेटायला त्यांच्या घरी आले. मनमोहनांना मात्र ना उठता येत होते ना बोलता. सुशीलकुमारांनी त्यांना पडून राहण्याची विनंती केली आणि ते म्हणाले,”कविराज, तुमच्या आरोग्याची बातमी वाचून मी अस्वस्थ झालो. तुम्हाला भेटायला यायला मला उशीर झाला याचं वाईट वाटतं. माझ्या लहानपणी  मी आकाशवाणीवरून तुमच्या कविता ऐकायचो. जमतील तशा त्या पाठ करायचो. सोलापूर आणि परिसरातील आजूबाजूच्या गावात होणाऱ्या यात्रा-जत्रांत लोकांना म्हणून दाखवायचो. ते ऐकून लोक मला पाच-दहा आणे द्यायचे. त्यातून मी शिक्षण पूर्ण केलं. कोर्टात पट्टेवाला म्हणून कामाला लागलो. जनतेच्या आशीर्वादानं राजकारणात आलो. आज मी अर्थराज्यमंत्री आहे. आपल्याला काय देऊ ते सांगा.”हे ऐकून उपस्थितांना वाटलं मनमोहन कदाचित घर मागतील, मुलीसाठी नोकरी मागतील किंवा एखादा सन्मान मागतील.

त्यांना बोलता येत नसल्यानं त्यांनी खुणेनं कागद आणि पेन मागितला. तो दिल्यावर त्यावर त्यांनी थरथरत्या हातांनी चार ओळी लिहिल्या. आत्ताचे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न म जोशी त्यांच्या शेजारी रहायचे. ते अनेकदा मनमोहनांनी सांगितलेलं साहित्य कागदावर लिहून काढायचे. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे मागणी केलेल्या कागदावर त्यांनी काय लिहिले याचे अक्षर कुणालाही लागत नव्हते म्हणून तातडीने जोशींना तिथे बोलावण्यात आले. जोशींनी तो कागद हातात घेतला आणि मोठ्या आवाजात मजकूर वाचून दाखवला. त्या ओळी अशा होत्या –

मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचे दान नको
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने…

मनमोहनांचा आणखी एक प्रसंग सांगतो. एका सकाळी ते त्यांच्या घरासमोर अंघोळीसाठी पाणी तापवत बसले होते. त्यावेळी तिथला एक नगरसेवक त्याच्या चमचासह मनमोहनांच्या घरासमोरून जात होता.  टॉवेल गुंडाळून बसलेल्या मनमोहनांच्या अंगावर कपडे नव्हते. ते पाहून त्या नेत्याला मनमोहनांची फिरकी घ्यावी वाटली. त्यानं विचारलं, “काय कविराज, अंगावर कपडे का घातले नाहीत?” मनमोहन म्हणाले, “घालावेसे वाटले नाहीत म्हणून घातले नाहीत.” नेत्यानं पुन्हा उपहासानं विचारलं  “घालावेसे वाटले नाहीत की घालायला कपडेच नाहीत? नसतील तर सांगा. मी देऊ शकतो.”त्याचा तो उद्दामपणा पाहून मनमोहनांनी त्याला तिथल्या तिथं चार ओळी सुनावल्या. अजरामर ठरलेल्या त्या ओळी अशा होत्या-

राजकीय पुरुषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायून-बाबरपेक्षा
गालिब हृदय वेधित राही

हुमायून-बाबरसारखे सम्राट नेस्तनाबूत होतात मात्र गालिब काळाच्या ओघात अजरामर राहतो हे कलावंतांचं सामर्थ्य त्यांनी केवढ्या नेमकेपणानं मांडलंय?

मनमोहनांनी आणखी एका कवितेतून राज्यकर्त्यांना जमिनीवर आणलंय. ते म्हणतात-

नवरा मुलगा फिरे नागडा सनईवाला सुटात हिंडे…

म्हणजे लग्नसमारंभात सगळ्यात महत्वाचा असलेला नवरदेव विधी करण्यासाठी पितांबर नेसून उघडा बसलेला असतो आणि त्याचवेळी सनई वाजवणारे बॅंडवाले मात्र सुटाबुटात मिरवत असतात.

अतिशय आक्रमकपणे व्यवस्थेवर असे तुटून पडणारे मनमोहन वृत्तीनं मात्र खूप हळवे होते. त्यांच्या बायकोच्या निधनानंतर त्यांनी जी कविता लिहिली ते एक अजरामर शोकगीत आहे. ‘वृंदावनातली  तुळस जळाली, मागे उरल्या दगड-विटा’ असं  लिहीत पत्नीला वृंदावनातल्या तुळशीचा मान देणारे मनमोहन तिच्या आठवणीनं अक्षरशः वेडेपिसे झाले होते.

आपल्या साहित्यिक वाटचालीचा आढावा घेताना आणि कविकुळाचं श्रेष्ठत्व मांडताना, कवीचं जळणं आणि फुलणं याविषयी मनमोहनांनी सांगितलेल्या चार ओळी देतो आणि या महाकवीला आदरांजली अर्पण करतो.
अक्षरयात्रेचा मनमोहन नावाचा हा उत्तुंग मनोरा लिहितो-

शव हे कवीचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतचि होता
फुले तयावरी उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतचि होता.

 – घनश्याम पाटील
  ७०५७२९२०९२

पूर्वप्रसिध्दी – दै. पुण्यनगरी, १३ मार्च २०२२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “जन्मभरी तो फुलतचि होता…”

  1. Nagesh Shewalkar

    खूप छान लेख आहे.
    नवीन माहिती मिळाली.
    धन्यवाद!

  2. Pradnya Karandikar

    फारच सुंदर यांच्याबद्दल कधी वाचलं नव्हतं आपल्यामुळे अशी जनमानसात उंची गाठणारे व्यक्तिमत्व कळले भावले सुंदर लेख आ.मनमोहनजींना विनम्र अभिवादन

  3. किरण विश्वनाथ भावसार, सिन्नर

    वाचून झाले तरी वाचतच रहावे वाटत होते. खूप सुंदर लेख.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा