उमद्या मराठवाड्याची नवी उमेद

उमद्या मराठवाड्याची नवी उमेद

मराठवाडा हे महाराष्ट्राचं हृदय आहे. आपल्या राज्यात जे काही चांगलं आहे त्यातलं सर्वोत्कृष्ट मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रातलं जागतिक कीर्तिचं पर्यटनस्थळ कोणतं असेल तर अजिंठा-वेरूळच्या लेण्या! जगभरातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक या लेण्या हमखास बघतात. महाराष्ट्रात या लेण्याइतकं बघण्यासारखं आकर्षक दुसरं काही नाही. महाराष्ट्राची कुलदेवता असलेली आई तुळजाभवानी मराठवाड्यात आहे.

महाराष्ट्राला वंदनीय असणार्‍या छत्रपती शिवाजीमहाराजांचं मुळचं भोसले घराणं मराठवाड्यातलं वेरूळचं आहे. महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक ज्याला म्हणता येईल असं ठिकाणही मराठवाड्यात आहे ते म्हणजे औरंगजेबाची खुलदाबाद येथील कबर! शिवाजीमहाराजांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष ही कबर देते. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून तर सुपरिचित आहेच. त्यामुळं समृद्ध इतिहासाचा, समृद्ध परंपरेचा आणि समृद्ध धार्मिक संस्कृतीचा वारसा मराठवाड्याला आहे.

इतकं सगळं असूनही मराठवाड्यातला माणूस नेहमी विवंचनेत असतो. मराठवाड्यात असलेल्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचं की मराठवाडा विद्यापीठ असंच ठेवायचं? मराठवाड्याची अस्मिता असलेल्या शहराला औरंगाबाद म्हणायचं की संभाजीनगर? या अशा अनेक वादातून मराठवाड्यातील नव्या पिढीनं बाहेर पडण्याची गरज आहे. मराठवाड्यातला माणूस पुण्यात जातो, मुंबईला जातो, दिल्लीत जातो. तिथं जाऊन काहीतरी व्यापार करतो, उद्योग करतो, नोकरी करतो. मग ज्या शहरात तो स्थायिक झालाय तिथंच मराठवाडा संमेलनं भरवायला सुरूवात करतो. तिथंच मराठवाडा मित्रमंडळं सुरू करतो. अशी मराठवाडा मित्रमंडळं सुरू व्हायला हवीत ती मराठवाड्यातच! या प्रदेशाला जोडणारा दुवा इथंच रहायला हवा. मराठवाड्यातल्या आमच्यासारख्या असंख्य लोकांना मोठं होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी मराठवाडा सोडायला लागणं हे या पुढच्या काळात बंद व्हायला हवं.

तसं बघितलं तर मराठवाडा हा दुष्काळी पट्टा असताना कुणाच्या नादाला लागून आपल्या लोकांनी साखर कारखाने काढले हे समजत नाही. आपल्याकडं पाण्याचं एवढं दुर्भिक्ष्य असताना सगळ्यात जास्त बिअरच्या कंपन्या आपल्याकडं कशा? पाण्याची उधळपट्टी करणारे असे उद्योग आधी बंद करायला हवेत. केवळ पर्यटनाच्या दृष्टिने मराठवाड्याचा विकास केला तरी मराठवाडा हे भारतातलं सर्वात मोठं पर्यटनस्थळ होईल, एवढी सांस्कृतिक विविधता आणि ऐतिहासिक परंपरा आपल्याकडं आहे. हे सगळं असताना मराठवाड्यात जे पिकेल तीच पिके आपण घ्यायला हवीत. पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आलमट्टीत वाहून जात असताना इथल्या नद्या मराठवाड्याला जोडून ते पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल यासाठी काम करणारे पाणीदार युवक यापुढच्या काळात हवेत. आधुनिक तंत्रज्ञान एवढं प्रगत असताना आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असताना असा एखादा ‘भगिरथ’ आपल्याकडं का तयार होऊ नये? मराठवाड्यातला पाणीप्रश्न सुटला तर मराठवाडा हा खर्‍याअर्थी सांस्कृतिक वैभव असलेला प्रदेश म्हणून भविष्यात पुढे येईल.

‘आपण मराठवाड्याचे आहोत’ असं सांगत असताना आपण महाराष्ट्राचा भाग आहोत आणि भारताचा तिरंगा आपल्या हातात आहे, याचं भान मराठवाडी माणसानं कधीच सोडलं नाही. हे मराठवाड्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मराठवाडी माणूस दिलदार आहे. मोकळाढाकळा आहे. राजकारणात करावे लागणारे डावपेच, खोटारडेपणा, लबाडी, लफंगेपणा हा मराठवाड्यातल्या माणसाच्या स्वभावात नाही, अंगात नाही आणि खरं सांगायचं तर रक्तातही नाही. त्यामुळं मराठवाड्यातला माणूस केंद्रीय राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात फार काळ सत्तास्थानी राहू शकत नाही. हा दुर्गुण न समजता आता सद्गुण समजायला हवा. जर व्यापारासाठी, उद्योगासाठी मराठवाड्यातल्या माणसाला बाहेरच जायचं असेल तर त्यानं पुण्याचा आणि मुंबईचा रस्ता न धरता आता परदेशाचाच रस्ता कसा धरता येईल याबाबतचं प्रशिक्षण त्याला मिळायला हवं.

सगळ्यात चांगली संशोधन केंद्रं आणि ज्ञानशाखा मराठवाड्यात उभ्या राहणं आवश्यक आहे. ‘नवी उमेद’ हा विचार करत असताना आणि सांस्कृतिक व भौगोलिक इतकी विविधता असताना नवे प्रयोग करायला हवेत. आपल्याकडं चांगला सूर्यप्रकाश असताना कोल्हापूर आणि मुुंबईची चित्रनगरी मराठवाड्यात का स्थलांतरित होऊ शकत नाही? मराठवाड्यात किमान मराठी चित्रनगरी उभी करायला काय हरकत आहे? असं काही मांडल्यावर लक्षात येतं की बाहेरच्या लोकांकडून या विचारांचं स्वागत होतं पण आपल्याच मराठवाडी माणसांच्या मनात याबाबत मोठा न्यूनगंड आहे. ‘इकडं येऊन काय करताय? इथं कसं जमेल?’ असाच त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन असतो. त्यामुळं त्याला इथं सगळं उजाड, करपलेलं, कोमेजलेलं, उदास चित्र दिसतं. आम्ही पुण्यातून जाऊन लातूर-उस्मानाबादला काही प्रयोग केले तर ते आम्हाला विचारतात, ‘‘अरे तुम्ही इकडं येऊन काय करताय? इकडं काही चांगलं होऊच शकत नाही… इथं येऊन तुम्हाला काय मिळणार काय?’’ ही जी कमीपणाची भावना आहे त्यातून आपली तरूण पिढी आधी बाहेर पडायला हवी. ज्ञानाची, विद्वत्तेची केंद्रं ही फक्त पुण्या-मुंबईत आहेत, आपल्याकडं काही नाहीच, ही भावना आधी दूर सारायला हवी. जर विद्वत्तेचा, गुणवत्तेचा, कर्तृत्वाचा वारसा हा मराठवाड्यानं महाराष्ट्राला वारंवार दिला असेल तर आपण असा विचार का करतो? छत्रपती शिवरायांचं घराणं हे एकमेव उदाहरण महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला मराठवाड्याचा पराक्रमी वारसा दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. नरसीचे संत नामदेव, पैठणचे संत एकनाथ, तेरचे गोरोबा काका, जांबचे श्री समर्थ रामदास, अंबेजोगाईचे मुकुंदराज हे व असे अनेकजण आपल्याला कोणता संदेश देतात? यापेक्षा वेगळं काही दाखवायची आवश्यकता नाही.

मराठवाडा राजकीय दृष्टीनं किती दुभंगलेला आहे आणि किती पक्षांच्या किती भागात विभागलाय यापेक्षा मराठवाड्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची आवश्यकता आहे. एकविसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात आता आपल्याला आपल्या विसरत चाललेल्या सुप्त शक्ती शोधायलाच हव्यात. ऊसतोडणी मजूर पुरवणारा परिसर म्हणजे मराठवाडा, ही आपली ओळख पुसून नवनवे उद्योग इकडं आणायला हवेत. केवळ पर्यटनाच्या दृष्टीनंही मराठवाडा विकसित करता येईल एवढं वैविध्य आपल्या प्रांतात आहे. इतर प्रांतातले अनेक नेते मोठे झाले तसा त्यांचा परिसरही संपन्न झाला, मोठा झाला. असा प्रकार दुर्दैवानं आपल्याबाबत घडला नाही. आपले नेते मोठे झाले पण आपण आहोत तिथंच आहोत. त्यामुळं इतरांना ‘वाटण्या’ची वृत्ती आपण कमी केली पाहिजे आणि आता आपल्याही वाट्याला काही भरघोस कसं येईल याचा विचार केला पाहिजे.

राजकारण, समाजकारण, नेहमीचे छक्केपंजे बाजूला ठेवून मराठवाड्यात नव्यानं काय निर्माण करता येईल याचा विचार करणारी तरूणाई आपल्याला हवीय. चित्रनगरी ही एक गोष्ट सांगितली, पर्यटन ही दुसरी गोष्ट सांगितली. तसंच अनेक शैक्षणिक संकुल कसे निर्माण होतील हेही बघायला हवं. जसा स्पर्धा परिक्षांसाठी कोटा पॅटर्न तयार झाला होता तसा लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आणखी प्रभावी व्हायला हवा. हा प्रांत एज्यूकेशन हब व्हावा यासाठीचे आपले प्रयत्न कमी पडतात. चांगलं शिक्षण घेण्यासाठी, मोठं होण्यासाठी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईतच का यावं लागतं? मराठवाड्यात राहूनच मराठवाडा मोठा करता येणं शक्य आहे हे ध्यानात घ्यायला हवं. त्यासाठी कोणतंही राजकीय नेतृत्व आपल्याला सहकार्य करणार नाही हे समजून युवक-युवतींनी संघटित व्हायला हवं, नवा विचार करायला हवा. तशा आकांक्षा बाळगून नियोजन केलं तर अशक्य असं काहीच नाही.

मराठी सिनेमात पश्चिम महाराष्ट्र दिसतो, कोकण दिसतो, बहिणाबाईंमुळं उत्तर महाराष्ट्रही दिसतो पण मराठवाडा चित्रपटात कुठंही ठळकपणे दिसत नाही. मराठवाडा असा स्पष्टपणे मराठी साहित्यात, सिनेमात दिसला पाहिजे. ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’ हा लक्ष्मण देशपांडेंचा प्रयोग सोडला तर आपल्या मातीतून फुलून आलेलं साहित्य खूप कमी प्रमाणात दिसतं. असं कर्तृत्व असलेले अनेकजण मराठवाड्यात आहेत पण यांची रोपटी तिकडं तयार होतात आणि दुसरीकडं नेऊन लावल्यावरच त्यांना फुलं, फळं येतात. त्यानंतर आपण त्यांचं कौतुक करतो. हे आधी बंद झालं पाहिजे. मराठवाड्याच्या मातीत रूजलेल्या रोपट्यांचा वटवृक्ष मराठवाड्याच्याच मातीत झाला पाहिजे, अशी नवी उमेद मराठवाड्यातल्या सामान्य युवकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

लातूर पॅटर्न पुण्यात, मुंबईत, ठाण्यात आला पण आपण एखादं एज्यूकेशन हब निर्माण करण्याची संधी गमावली. जर औरंगाबादच्या, नांदेडच्या, लातूर-उस्मानाबादच्या मुलांना शिक्षणासाठी म्हणून पुण्यात यावं असंच वाटत असेल तर तो आपला अक्षम्य पराभव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, परभणीचं कृषी विद्यापीठ या सगळ्यांचं हे अपयश नाही का? ‘जे जे नवे, ते मराठवाड्याला हवे’ असा विचार झालाच पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं आपल्याकडं अधिकाधिक कशी होतील याचा विचार केला पाहिजे. किती दिवस अंबेजोगाईच्या संमेलनाच्या आठवणी सांगत बसणार आणि कौतुक करणार? मराठवाड्यात मोठ्या प्रकाशन संस्था उभ्या राहणं, साहित्यिक चळवळीला गती येणं गरजेचं आहे. किती कथा-कादंबर्‍यातून मराठवाड्याचं प्रभावी चित्र मांडलं गेलंय? मराठवाड्यातल्या लेखकानं जर असा समर्थ मराठवाडा साहित्यातून उभा केला, आपला परिसर, चाली-रीती, रूढी-परंपरा, भाषा, पेहराव, खाद्यसंस्कृती, छोटी-मोठी गावे, त्यांची वैशिष्ट्ये, नवे प्रयोग असं काही मांडलं तर ते महाराष्ट्रभरच नाही तर जगभर प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी वैयक्तिक मी मराठीतला एक आघाडीचा प्रकाशक या नात्यानं घेतो. आहे का तुमच्यात अशी धमक? तुमचं लेखन, तुम्ही रंगवलेल्या स्थळांचं वर्णन वाचून अमेरिका-इंग्लंडचा माणूस मराठवाडा शोधत यायला हवा.

विद्यार्थ्यांचं-तरूणांचं पक्षातीत संघटन झालं तर खूप मोठ्या संधी उपलब्ध होतील. आपला गाव, तालुका, जिल्हा सोडून इतर ठिकाणी जायचं, स्वतःला सिद्ध करायचं आणि तोपर्यंत कोणीही त्याला मोठेपणाचे आयाम द्यायचे नाहीत, त्याला स्वीकारायचं नाही हे ताबडतोब बंद झालं पाहिजे. आपल्याकडं आपल्या भागाची ओळख निर्माण होतील असे साहित्यिक, सांस्कृतिक उत्सव व्हायला हवेत. पुण्यात नाटक चाललं पाहिजे असं कलावंतांना वाटतं. त्याप्रमाणे मराठवाड्याची एखादी ओळख झाली पाहिजे. एखादा वक्ता जर मराठवाड्यात बोलू शकला तर महाराष्ट्रभर त्याला स्वीकारलं जाईल, असं सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे.

आपली पारंपरिक पिकं आणखी चांगली कशी येतील? ती भारतभर कशी पोहोचतील? यावर काम केलं पाहिजे. अशी क्षमता असणारे, दृष्टी असणारे पोरंपोरी गावागावात हवीत. पुण्या-मुंबईतल्या लोकांना वाटलं पाहिजे की आपण तिकडं जाऊन आपलं भवितव्य आजमावून बघूया. आपल्या लेकीबाळींची सोयरिक मराठवाड्यात जमवूया! रझाकाराविरूद्ध लढणारा एक लढाऊ परिसर अशी आपली ओळख आहे. आपल्या भूमिनं सांस्कृतिक इतिहास दिलाय. संत परंपरा जपलीय. परळी वैजनाथ, औंढा नागनाथ अशी ज्योतिर्लिंगं आपल्याकडं आहेत. लेण्या आहेत, देवगिरीचा किल्ला आहे. यापेक्षा भारताला आणि जगाला आणखी काय द्यायला हवं? आपला इतिहास इतका गौरवशाली असूनही आपण जर वर्तमानात चाचपडत असू तर आपण आधी आपली स्वतःची ओळख करून घेणं हेच गरजेचं आहे. आपण कोण होतो हे जर स्वतःला विचारलं तरी आपल्याला आपल्या उज्ज्वल भवितव्याकडं जाता येईल.

आपल्या आठही जिल्ह्याला स्वतःची वेगळी परंपरा आहे. ती आपण जपली पाहिजे. इथल्या प्रत्येक तालुक्याची, गावाची समृद्ध ओळख महाराष्ट्रभर गेली पाहिजे. आपली चवदार तूर, ज्वारी, मटकी गेली कुठं? याचा विचार झाला पाहिजे. अनावश्यक गोष्टी बंद करून सकारात्मक विचार झाला तर काहीतरी भव्यदिव्य घडू शकेल. ऊसाचा कोयता जाऊन लेखणी हातात आली तर आपण हे सगळं प्रत्यक्ष आणू शकतो. कर्नाटकातला अण्णा, पुण्यातला दादा, कोल्हापुरातला भाऊ, कोकणातला बापू याप्रमाणे आपला ‘बप्पा’ महाराष्ट्रभर रूजला पाहिजे. बोरकरांनी साहित्यात गोवा मांडला, अण्णा भाऊंनी वारण्याचा पट्टा मांडला, पाडगांवकरांनी वेंगुर्ल्याचा पाऊस मांडला, पेंडश्यांनी गारंबीचा बापू मांडला, कोल्हापूरात राजाराम कॉलेजातील फडक्यांच्या तत्त्वज्ञानाच्या तासाला दारूवाल्यापासून अगदी कोणीही येऊन बसायचं इतकं त्यांचं प्रभावी शिकवणं होतं असे उल्लेख येतात. आपल्याकडचं असं काही वर्णन आपल्या सिनेमात, कथा-कादंबर्‍यात येतं का? साहित्यातील परिसर, पात्रं याचा धांडोळा घेत वाचक तिथपर्यंत यायला हवेत. ते साहित्याचं खरं यश असतं. जर शेक्सपिअरचं घर बघायला लोक इंग्लंडला जात असतील तर मराठवाड्याचं वर्णन वाचून ते आपल्याकडं का येणार नाहीत? मग हे सगळं उभं करण्यात कोण कमी पडतंय? मराठवाडा साहित्यात जिवंतपणे उभं करण्याची क्षमता असलेले आपल्याकडं अनेजण आहेत. त्यांनी ताकदीनं पुढे यायला पाहिजे.

महाराष्ट्राला ज्यांनी सर्वस्व दिलं, ओळख दिली असे बहुतेक लोक मराठवाड्यातले आहेत. गाव आणि घर न सोडता मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. नवी उमेद घेताना मराठवाड्यातल्या माणसानं स्वतःच्या अस्तित्त्वावर प्रेम केलं पाहिजे. मराठवाडा या शब्दावर आणि या परिसरावर प्रेम केलं पाहिजे. स्वतःमधला न्यूनगंड दूर सारला पाहिजे. साहित्यात-सिनेमात मराठवाडा आणून आपल्याकडं जे अस्सल आहे ते मांडलं पाहिजे, पुण्या-मुंबईत असलेल्या मराठवाड्यातील मंडळींनी त्यांनी उर्वरित महाराष्ट्राला मराठवाड्यात नेण्याचा, हे वैभव दाखवण्याचा उद्योग केला पाहिजे, अष्टविनायकाइतकं किंबहुना त्यापेक्षा देखणं बरंच काही मराठवाड्यात आहे, याचा कुणालाही विसर पडू नये. छत्रपती शिवाजीमहाराजांचं कुलदैवत मराठवाड्यात आहे यापेक्षा तिकडं जायला आणखी काय हवं?
– घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी – दै. ‘पुण्य नगरी’, मराठवाडा आवृत्ती
गुरूवार, दि. 5 ऑगस्ट 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “उमद्या मराठवाड्याची नवी उमेद”

  1. Vaishali Ritesh Deshmukh

    छान लेख

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा