भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू

भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू

सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बंद खोलीतील भेट तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीतील अर्धातासाची चर्चा या परस्पर विरोधी घटना नक्की कशाचे द्योतक आहेत हे अनेकांना न समजणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या वळणावर आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

एकीकडे राजकारणात धुरंधर असलेल्या दोन दिग्गज नेत्यांची भेट म्हणजे राजकारणात मोठ्या घडामोडीची नांदी असू शकते हे वेगळे सांगायला नको. कारण गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांनी विविध दावे केले होते. त्याचाच हा परिणाम असू शकतो का? तर निश्चितच नाही. कारण सर्वसाधारणपणे विरोधी पक्षात असलेली भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते जे दावे मागील वर्षभरापासून करत आहेत. त्यात फारसे तथ्य असल्याचे भासत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे.

कारण या दोन्ही भेटींचा अन्वयार्थ पाहायचा झाल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की, महाविकास आघाडीतील नेत्यांची घालमेल वेगळी आहे. कारण ही सर्व धडपड केवळ मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. एक घटना म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या भेटीने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली. अनेक तर्कवितर्क लढविले गेले. त्यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्याबाबत वेगवेगळे स्पष्टीकरण दिले. मात्र यातील दुसर्‍या घटनेने मोठी खळबळ माजली ती म्हणजे, पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंद खोलीआडची अर्धा तासाची भेट.

यातील पहिल्या घटनेचा अन्वयार्थ लावायचा झाल्यास, शरद पवारांनी नेहमीप्रमाणे आपली गुगली टाकत फडणवीसांना भेटीसाठी वेळ दिला आणि त्याद्वारे शिवसेनेवर आपला दबाव निर्माण केला. कारण त्या दबावातून त्यांना अडीच वर्षासाठी राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे आणि आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना राज्याची पहली महिला मुख्यमंत्री होण्याची संधी देणे हा त्यांचा मानस असल्याचे बोलले जाते. त्यासाठी फडणवीस भेटीचे औचित्य असावे.

मात्र राजकारणात हळूहळू मुरब्बी होऊ लागलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे दबावतंत्र पवारांच्याच स्टाईलने परतवून लावल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण पवार-फडणवीस भेटीनंतर अवघ्या आठवडाभरातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची आपल्या शिष्ठमंडळासोबत दीड तास चर्चा केली. मात्र त्यांनतर पुढील अर्धा तास त्यांनी मोदींशी व्यक्तिगत भेट घेतली. अर्थात व्यक्तिगत भेटीतील तपशील त्यांनी गुलदस्त्यातच ठेवला. मात्र पवार-फडणवीस भेटीच्या चर्चेचा धुरळा विसावतो न विसावतो तोच ठाकरे-मोदी भेटीने वेगळाच सूर आवळला. त्यामुळे शरद पवारांनी भेटीद्वारे निर्माण केलेल्या दबावाला उद्धव ठाकरेंनी भेटीनेच उत्तर दिले आहे.

शरद पवारांच्या खेळीने महायुतीतील भाजप-सेनेत दरी कशी निर्माण झाली?

2019 साली महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात चांगलीच उलथापालथ झाली आणि अशक्य ते शक्य झाले. कारण दोन भिन्न टोकाच्या विचारधारेचे पक्ष आणि पक्षाच्या स्थापनेपासून एकमेकाविरोधात टोकाचे मतभेद असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. अर्थात त्यांच्यात नक्की काय बोलणी झाली हे बाहेर आले नसले तरी, एका विशिष्ट उद्देशानेच ही महायुती झाली आहे हे नक्की.

मुळात हे असे अशक्य ते शक्य घडलेच कसे असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र मुळात असे घडलेच कसे असा प्रश्न भाजप नेत्यांना पडला असावा तर हे घडू शकते असे महाविकास आघाडीतील नेत्यांनाही वाटले नव्हते पण राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या शरद पवारांनी ते शक्य करुन दाखवले.

अर्थात राजकारणात कोणत्यावेळी कोणती खेळी करायची हे शरद पवारांना चांगलेच कळते कारण 2014 साली निवडणुकीचे निकाल हाती येण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरुन बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. पवारांची ती खेळीही अनेकांच्या लक्षात आली नसावी मात्र, त्यांच्या या खेळीने शिवसेनेच्या वाघाची शेळी केली हे नक्की. त्यामुळे शिवसेनेचा राजकीय दबावच राहिला नाही.

तरीही शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा बाणा दाखवला आणि विरोधी पक्षनेतेपदही स्वीकारले. मात्र अखेरीस सत्तेच्या सारीपाटावर तडजोड करत सत्तेच्या वळचणीला जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र शिवसेनेची मागील सत्ताकाळात झालेली हेटाळणी उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार शिवसेना पाच वर्ष सहन करत राहिली कारण जर सत्तेत गेलो नाही तर आमदार फुटण्याची भीती सेनेला होती त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याची वाट स्वीकारली.

या घडामोडीत महत्त्वाची बाब म्हणजे 2014 साली शरद पवारांनी बाहेरुन दिलेल्या पाठिंब्यामुळेच फडणवीसांचे सरकार बनले होते आणि टिकले होते. तर 2019 मध्ये शरद पवारांच्याच युक्तीमुळेच ठाकरे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे शरद पवार हे दोन मित्रांना, दोन विरोधकांना सत्तेत आणू शकतात हे सिद्ध केले.

आता मुळात आजच्या घडीला महाविकास आघाडीतील धुसफूस स्पष्टपणे दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची घेतलेली भेट हे आहे. अर्थात दोन राजकीय पक्षाचे नेते विविध कारणासाठी एकमेकांना भेटू शकतात मात्र ही भेट निश्चितच अस्वस्थता पसरवणारी होती यात शंका नाही.

पवार-फडणवीस भेटीने महाविकास आघाडीतील नेत्यांना चांगलीच बोचली आहे. त्यामुळे शिवसेनेने मौन बाळगले असले तरी काँग्रेस मात्र चवताळलेली पाहायला मिळते आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

-सागर सुरवसे
सोलापूर
9769179823

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू”

  1. जयंत कुलकर्णी

    सागर सुरवसे यांचा राजकीय अभ्यास सखोल आहे. बाकी प्रेम, युद्ध आणि राजकारण यामध्ये काहीही शक्य आहे!

  2. Ravindrakamthe

    सागरदादा छान अभ्यासपूर्ण लेख

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा