दीक्षितसाहेब…

दीक्षितसाहेब...

साहित्य चपराक दिवाळी 2020

हा अंक घरपोच मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

बातमीवर, कामावर प्रेम असणारा असा झपाटलेला संपादक आम्ही पाहिला. माणूस पाहत पाहत शिकतो. आम्हीही त्यांच्याकडून हे गुण घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे काही सहकारी ग्रामीण भागातून आलो होतो. साहेबही ग्रामीण भागातूनच आले असल्यानं त्यांना बहुदा आमच्याबद्दल विशेष आस्था वाटत असावी. शिवाय साहेबांचं माणसांवर प्रेम होतं. माणूस जपला पाहिजे, असं ते नेहमी म्हणत.

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना विसरू शकत नाही. आपल्या आयुष्याला आकार देण्यात, आपलं ‘कच्चं मडकं’ घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्या त्या वेळी कदाचित या शिकवणीचंं महत्त्व फार काही जाणवत नाही. मात्र, काही काळानंतर त्याचं महत्त्व लक्षात येतं. आपल्याला शिकवणार्‍या अशा माणसांविषयी मनात कायम कृतज्ञतेची भावना दाटून येते. सकाळ’चे माजी संपादक दिवंगत अनंत दीक्षित यांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व असंच आहे.

मी 1997 मध्ये ‘सकाळ’मध्ये ट्रेनी पत्रकार म्हणून रुजू झालो, तेव्हा माझा पहिला इंटरव्ह्यू घेणार्‍या चौघा वरिष्ठांमध्ये दीक्षितसाहेब होते. मी त्यांना प्रथम पाहिलं ते तेव्हाच! ते तेव्हा कोल्हापूर आवृत्तीचे संपादक होते. त्यामुळे रोज भेट व्हायची नाही. मात्र, 1999 मध्ये मला अकल्पितपणे बेळगावचं साहित्य संमेलन कव्हर करायला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा दीक्षितसाहेब पुन्हा भेटले. ते सहकुटुंब कोल्हापूरहून आले होते. अंजली मॅडम व त्यांच्या दोन्ही मुली यांना मी तेव्हाच प्रथम पाहिलं. त्या मुली तर अगदी लहान होत्या. बेळगावची प्रसिद्ध साडी खरेदी करायला त्यांच्यासोबत गेलो होतो. पुढच्याच वर्षी दीक्षितसाहेब पुण्यात संपादक म्हणून रुजू झाले. त्यांच्या संपादक म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांची ओळख आम्हाला हळूहळू पटत गेली. मी आणि माझ्यासोबत असलेल्या अनेक नव्या सहकार्‍यांना दीक्षितसाहेबांनी कायम प्रोत्साहन दिलं. अनेक संधी दिल्या. प्रख्यात अभिनेते जसपाल भट्टी यांची मुलाखत घेण्याची संधी त्यांनीच मला दिली. यामुळंच पुढं माझा भट्टींसोबत दीर्घकाळ स्नेह निर्माण झाला. नंतर भट्टींचा एक कॉलमही आम्ही सुरू केला. तो मराठीत भाषांतरित करायची जबाबदारी माझी होती. दीक्षितसाहेबांनी तेव्हा गुलजार यांचंही एक सदर पुरवणीत सुरू केलं होतं. दोन्ही मजकूर अनेकदा शेजारीशेजारी प्रसिद्ध व्हायचे. माझ्या मजकुरावर नाव भट्टींचं असलं, तरी तो मीच लिहिलेला आहे या जाणिवेनं सुख वाटायचं. दीक्षितसाहेबांचं आमच्यावर बारकाईनं लक्ष होतं. अनेकांना त्यांनी दौर्‍यावर पाठवलं, लिहायला प्रोत्साहित केलं. सन 2001 च्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा त्यांनी दीनदयाळ वैद्य, योगेश कुटे व सिद्धार्थ खांडेकर यांच्यासह मला या राज्यांच्या दौर्‍यावर पाठवलं. वयाच्या पंचविशीत मला मिळालेला हा अनुभव फार मोलाचा होता, हे सांगायला नकोच.

त्याच वर्षी जानेवारीत नगर जिल्ह्यात कोठेवाडी बलात्काराचं भयंकर प्रकरण घडलं होतं. या बातमीचं तर संपूर्ण श्रेय दीक्षितसाहेबांना जातं. आमचे पाथर्डीचे बातमीदार अविनाश मंत्री यांना ही घटना घडल्यावर दोन-तीन दिवसांनी त्यातले भयानक तपशील समजले होते. त्यांनाही या बातमीचं गांभीर्य उमगलं. त्यांनी संपादकांना फोन केल्यावर त्यांनी मंत्रींना पुण्यातच बोलवून घेतलं. सर्व तपशील जाणून घेतले व स्वत: ती बातमी लिहिली. मी तेव्हा नेमका मित्राच्या लग्नाला लातूरला गेलो होतो. तिथल्या अंकात दुसर्‍या दिवशी ही आठकॉलमी बातमी बघितली आणि हादरलो. नंतर पुण्यात आल्यावर रीतसर या बातमीचा फॉलोअप साहेब घेताना मी बघितलंय. काही काळानंतर मीही कोठेवाडीला जाऊन आलो. त्या गावाला अविनाश मंत्रींसोबत प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मला त्या घटनेचं गांभीर्य आणखी उमगलं. तिथल्या काही अत्याचारित महिलांशी मी बोललो. त्यातल्या एक तर साठीच्या होत्या. एवढी भयंकर घटना स्वत:बाबत घडूनही त्या महिलांमधली माणुसकी जागी होती. त्यांनी आम्हाला चहा, सरबत विचारलं, तेव्हा तर मी शरमून गेलो. त्या आजींचा सुरकुतला हात मी हातात घेतला आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. डोळ्यांतलं पाणी थांबेना. पत्रकाराच्या आयुष्यातले असे काही क्षण कायम मनावर कोरले जातात, एवढं खरं!

नंतर सन 2002 मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत होतं. त्या वेळी दीक्षितसाहेबांनी मला दिल्लीला जाऊन या हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस जवानांच्या नातेवाइकांच्या मुलाखती करायला सांगितलं. ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असाइनमेंट होती. मी दिल्लीत राहून हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये राहणार्‍या या लोकांच्या नातेवाइकांना भेटून ‘सप्तरंग’मध्ये दोन भागांत ती स्टोरी केली. या संपूर्ण असाइनमेंटनं मला खूप काही शिकवलं. माझ्या अनुभवविश्वात मोठी भर पडली. मी त्या सर्व लोकाना भेटलो आणि त्यांच्याशी बोललो, याचं त्या मंडळींनाही अप्रूप वाटलेलं दिसलं. या संपूर्ण अनुभवाचं श्रेय दीक्षित सरांनाच!

मी दिल्लीहून आलो आणि माझं लग्न ठरलं. ती बातमी सांगायला मी साहेबांकडं गेलो. माझ्या सासुरवाडीच्या सर्व लोकाना साहेब दीर्घकाळ ओळखत होते. ‘जतकर’ म्हटल्यावरच ‘श्यामची मुलगी का?’ असं त्यांनी विचारताच मी खरं तर आश्चर्यचकित झालो होतो. मी ‘हो’ म्हटल्यावर सरांनी सर्वांची नावं सांगितली. बार्शीच्या ओळखी सांगितल्या. माझ्या लग्नाला साहेब आले होते आणि माझ्या सासुरवाडीच्या मंडळींसोबत बराच वेळ गप्पागोष्टींमध्ये रमले होते. साहेबांशी कौटुंबिक स्नेहाचा धागा अशा रीतीनं गुंफला गेला.

पुढे 2004 मध्येही लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी मला ओडिशात पाठवलं. तिथला अनुभवही कायम लक्षात राहणारा होता. ओडिशा राज्यात मी एरवी कधी गेलो असतो, असं वाटत नाही. मात्र, त्या दौर्‍यात नानाविध अनुभवांचं संचित माझ्या शिदोरीत जमा झालं. त्याच काळात मी आमच्या नगर आवृत्तीचं काम काही काळ बघत होतो. नगर जिल्ह्यात त्यांच्यासोबत केलेला दौराही असाच संस्मरणीय ठरला. राजस्थानमध्ये प्रिन्स चार्ल्स आले होते, तेव्हा त्यांनी आमचा सहकारी सुभाष खुटवडला तिकडं पाठवलं. वीरप्पन मारला गेला, तेव्हा दुसरा एक सहकारी सुनील माने याला तिकडचं वार्तांकन करण्याची संधी साहेबांनी दिली. त्सुनामी आली होती, तेव्हा आमचे ज्येष्ठ सहकारी अरविंद तेलकर यांना थेट अंदमानला जाऊन वार्तांकन करण्याची संधीही त्यांनीच दिली.

त्याच काळात सातारा जिल्ह्यात काळूबाईचं देवस्थान असलेल्या मांढरदेवीची दुर्घटना घडली होती. त्या दिवशी मी डेस्कवर नुकताच आलो होतो. तेव्हा साहेब डेस्कवर आले व मला म्हणाले, ‘‘काय करतोयस?’’ मी डेस्कवर मी तेव्हा करीत असलेलं काम सांगितलं. मला म्हणाले, ‘‘चल लगेच. आपल्याला सातार्‍याला जायचंय…’’

मग साहेबांच्या गाडीतून ते, मी आणि त्यांचे पीए चंद्रकांत आणि ड्रायव्हर असे चौघे लगेच सातारा ऑफिसमध्ये दाखल झालो. आमचे सातारा प्रतिनिधी श्रीकांत कात्रे मांढरदेवीला गेले होते. पुण्याहून पराग करंदीकर, मिलिंद वाडेकर हेही थेट मांढरदेवीला पोचले होते. अशा वेळी त्या छोट्याशा ऑफिसमध्ये बसून सर्व सूत्रं हलवायला साहेब निघाले होते. रात्री आठच्या आत सर्व आवृत्त्यांना आपली मुख्य बातमी गेली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. कात्रेंकडून त्यांनी स्वत: बातमी घेतली आणि स्वत: डिक्टेट करून, मला एकदा वाचायला सांगितली. आठच्या ठोक्याला आमची बातमी सगळीकडे पोचली होती. नंतर मग आम्ही सातार्‍यात जेवून रात्री लगेच पुण्याला परतलो. तोवर पुण्याच्या मुख्य आवृत्तीची वेळ झाली होती. मग ती सगळी पानं बघूनच आम्ही ऑफिस सोडलं.

बातमीवर, कामावर प्रेम असणारा असा झपाटलेला संपादक आम्ही पाहिला. माणूस पाहत पाहत शिकतो. आम्हीही त्यांच्याकडून हे गुण घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे काही सहकारी ग्रामीण भागातून आलो होतो. साहेबही ग्रामीण भागातूनच आले असल्यानं त्यांना बहुदा आमच्याबद्दल विशेष आस्था वाटत असावी. शिवाय साहेबांचं माणसांवर प्रेम होतं. माणूस जपला पाहिजे, असं ते नेहमी म्हणत. याशिवाय त्यांचं पुस्तकप्रेमही अफाट होतं. मात्र, ते खरे रंगायचे ते गप्पांच्या फडात आणि जाहीर भाषणांत. त्यांचं ओघवतं वक्तृत्व ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असायचा. पुण्यात नवीन आले, तेव्हा पुण्यावर व पुणेकरांवर ते खूप टीका करायचे, टोमणे मारायचे; पण त्यांनी आम्हा सगळ्यांना जिव्हाळाही तितकाच दिला. माझ्या लग्नात आलेल्या ऑफिसच्या सहकार्‍यांनी साहेबांचं आणि आमच्या सासुरवाडीच्या लोकांचं जमलेलं मेतकूट बघितलं आणि मला साहेबांचा जावई’ अशी पदवी देऊन टाकली. मी ती गमतीत घेतली; कारण साहेबांनी कधीही मला विनाकारण झुकतं माप दिलं नाही. सर्वच नवीन मुलांवर त्यांचा लोभ होता. सन 2004 नंतर मात्र ऑफिसमधलं वातावरण बदलू लागलं. साहेबांना त्याचा त्रास होऊ लागला. साहेबांनी राजीनामा देण्याच्या काही दिवस आधी माझा मित्र व सहकारी मंदार कुलकर्णी याचं सातार्‍यात लग्न होतं. माझा मुलगा नील याचा पहिला वाढदिवसही त्याच दिवशी होता. सरांनी तोवर त्याला पाहिलं नव्हतं. नंतर माझ्या हातातल्या नीलला बघून म्हणाले, त्याला सांग, मोठा होऊन काहीही हो, पण संपादक होऊ नकोस!’ साहेबांचं ते बोलणं ऐकून आम्ही तिथे उपस्थित असलेले सगळेच वरकरणी हसलो, पण मनातून चरकलो!

अखेर जे व्हायचं तेच झालं. काही दिवसांतच साहेब राजीनामा देऊन संस्थेतून बाहेर पडले. माझ्या पत्नीच्या आजोबांवर, दादांवर त्यांचा विशेष लोभ होता. काही काळानंतर दादा गेले, तेव्हा मी साहेबांना फोनवर कळवलं. त्या वेळी त्यांच्या मुलीचं आजारपण सुरू झालं होतं. त्यामुळं ते अस्वस्थ होते. पण तरीही त्यांनी समाचाराचा फोन केला…. मधल्या काळात अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं आणि कधी तरी त्यांचं टीव्हीतील चर्चेत दर्शन घडायचं. त्यांची कन्या अस्मिता गेली, त्या दिवशी वैकुंठ’मध्ये साहेबांना पाहिलं. हातात डायलिसिसच्या सुया होत्या. दोन जणांनी आधार देऊनच साहेबांना तिथं बसवलं. त्या असहाय अवस्थेतल्या साहेबांकडं बघवत नव्हतं. भडभडून आलं… मी निघताना गाडीत त्यांचा हात हातात घेतला. ते सर्वांनाच शून्यवत नजरेनं थँक्यू थँक्यू’ म्हणत होते… मला फार वेळ तिथं उभं राहता आलं नाही…

साहेब आठवतात ते दिलखुलास हसणारे, मोठ्यांदा गप्पांचा फड रंगवणारे, एकही शब्द न बोलता आमच्यावर माया करणारे… आमच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी होता होईल ते सगळं करणारे… असे संपादक होणे आता दुर्मीळच… त्यांचं ऐहिक अस्तित्व संपलं, त्याला आता सहा-सात महिने होऊन गेले… होळीच्या दिवशी सर गेले… त्या वेळी लगेच खूप जणांनी खूप काही लिहिलं… मग मी मुद्दामच मागं थांबलो… आता मात्र लिहिल्याशिवाय राहवलं नाही. साहेब, तुम्ही कायम स्मरणात राहाल… मनातल्या कृतज्ञभावासह!

श्रीपाद ब्रह्मे, पुणे
9881098050

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा