सुखायु… हितायु!

सुखायु... हितायु!

चपराक दिवाळी 2020
‘साहित्य चपराक’ मासिकाचा हा दिवाळी अंक मागविण्यासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांच्या घराण्यांमध्ये एक रीतीरिवाज होता. राजवाड्यामध्ये पुत्ररत्न प्राप्त झाले की त्याची जन्मकुंडली मांडली जात असे. त्याबरोबरच त्याची आयुर्मर्यादा कशी असेल? त्याचे आरोग्य कसे असेल? यांचे त्या नवजात अर्भकाच्या शरीरयष्टीवरून परीक्षण केले जाई.

‘नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये चक्रवर्ती बाळाची चिन्हे दिसत आहेत’ अशी भाकिते कित्येक पौराणिक कथांमध्ये वाचायला मिळतात. चरकसंहिता या संपूर्ण आयुर्वेद विश्वाला शिरस्थानी आणि प्रातःस्मरणीय असलेल्या ग्रंथातही नवजात बालकाचे आयुर्परीक्षण करण्यासाठी काही लक्षणे वर्णन केली आहेत. याचा विज्ञानाशी काय संबंध आहे? यात काही तथ्य आहे का? हे जाणून घ्यायचे असेल तर सुखायु आणि हितायु या शब्दांचा मागोवा घेणे उचित ठरेल.

सन 2020 या वर्षात ‘कोरोना’च्या साथीने संपूर्ण विश्वाला हादरवून सोडले. जगभरातून येणार्‍या बातम्यांमुळे प्रत्येक माणूस आतून जरासा हलला. विचलित झाला. या परिस्थितीत काही सत्यं समोर आली. एकतर कोरोना व्याधीवर अजून तरी (हा लेख लिहून होईपर्यंत तरी) एकही हुकमी औषध उपलब्ध नाही. दुसरे म्हणजे कोरोनामुळे एकीकडे काही जणांचा अल्पावधीतच मृत्यू होत असताना दुसरीकडे कोरोनाची चाचणी होकारात्मक (पॉझिटिव्ह) आलेले परंतु एकही लक्षण नसलेले जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर टक्के रूग्ण आहेत. त्यांना काहीही त्रास नाही. अनेक डॉक्टर्स, नर्सेस, परिचारक, सफाई कामगार कोविड रूग्णांच्या सतत संपर्कात आहेत. काहींना कोरोनाची बाधा देखील झाली आहे परंतु कित्येकजण त्या व्याधीपासून बचावले आहेत. याचा अर्थ काय? तर प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती ही कमी-अधिक असते. त्यावर एखाद्या रोगाचे संक्रमण त्या त्या व्यक्तीला होईल का? झाला तर तो किती तीव्र असेल हे ठरते.

कोरोनाचेच उदाहरण द्यायचे झाले तर ज्या व्यक्तिंमध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, स्थौल्य विद्यमान होते त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्तीतजास्त धोका होता. त्याप्रमाणेच जे अतिशय बारीक, किडकिडे आहेत, ज्यांचे पोषण व्यवस्थित झालेले नाही, जे कुपोषित आहेत त्यांना देखील याचा संसर्ग अधिक प्रमाणात झाला. याचा अर्थ शरीराचे पोषण सुयोग्य होणे, शरीर व्याधीरहित असणे हे एखाद्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक आहे.

आता शरीरपोषणाचा विचार करू. रोजच्या चौरस आहारावर, व्यायामावर, दैनंदिन बाबींवर आपले पोषण अवलंबून असते, हे खरे आहे पण खरे तर त्याची सुरूवात होते ती मातेच्या गर्भाशयात असताना किंवा त्याच्याही पूर्वी. म्हणजे माता व पित्याचे आरोग्य उत्तम स्थितीत असेल, त्यांचे पोषण चांगले झालेले असेल तर त्यांच्या शरीरात तयार होणारे स्त्रीबीज व पुरूषबीज हे उत्तम प्रतीचे असते. अशा उत्तम बीजांच्या संयोगातून तयार होणारा गर्भ देखील उत्तम प्रतीचा असतो. त्यानंतर मातेच्या उदरात गर्भ वाढवताना तिचा आहार, विहार, मानसिकता आणि आरोग्य याचा गर्भपोषणावर परिणाम होतो. त्यानुसार त्या गर्भाची वाढ होते. जर गर्भिणी अवस्थेत असताना मातेचा आहार व इतर बाबी योग्य नसतील तर गर्भ कुपोषित असा तयार होतो. त्या गर्भाचे किंवा गर्भापासून पुढे तयार होणार्‍या नवजात बालकाचे आरोग्य गर्भाशयात होणार्‍या पोषणावर ठरते. सुयोग्य पोषण किंवा कुपोषण झाले तर तसतशी लक्षणे प्रसूतीनंतर नवजात बालकामध्ये दिसतात. ही केवळ बालक या अवस्थेपुरतीच मर्यादित नसतात तर आयुष्यभरातील अगदी तरूण-प्रौढ-वृद्धावस्थेपर्यंतच्या आरोग्याची बीजे ही गर्भावस्थेमध्ये रूजतात. याला आधुनिक विज्ञानाचा व संशोधनाचा आधार आहे.

आता तुमच्या लक्षात येईल की माता-पिता यांचे आरोग्य गर्भाधान होण्यापूर्वी उत्तम असणे किती आवश्यक आहे. यात विशेषतः स्त्रीचे तिच्या बाल्यावस्थेपासूनचे आरोग्य उत्तम बीजनिर्मितीसाठी व प्रजनन संख्या सक्षम व सुदृढ होण्यासाठी गरजेचे आहे. आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये, समाजामध्ये स्त्रियांना कायम दुय्यम स्थान दिले जाते. उत्तमोत्तम पदार्थ घरातील मुलांना, पुरूषांना दिल्यानंतर उरलेले मुलींना व स्त्रियांना देण्याची प्रथा होती. यामुळे अनेक बालिका व स्त्रिया कुपोषित राहिल्या. घरातील ‘नकुशां’चे तर हाल त्याहूनही अधिक होते. याची किंमत कोणाला मोजावी लागली? तर येणार्‍या पुढच्या पिढ्यांना, समस्त स्त्री-पुरूषांना! कारण मातेकडून निसर्गतःच मिळणारे आरोग्य, व्याधीप्रतिकारशक्ती, जी पुढच्या पिढीत संक्रमित होते ती कुपोषित माता-पित्यांच्या मुलांना कमी पडली. समाजात कितीतरी अशी उदाहरणे आपल्याला दिसतात की कितीही कसोशीने पथ्यसेवन करूनही काही व्यक्ती सतत आजारी पडतात. मात्र काही व्यक्तींनी कितीही कुपथ्यसेवन केले, जीवनशैली कशीही ठेवली तरी त्यांना विशेष आजार होत नाहीत. याचे उत्तर मातेच्या गर्भाशयात असताना त्यांच्या झालेल्या पोषणामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे शरीरबल हे जन्मापासूनच उत्कृष्ट असते. यांनाच ‘सुखायु’ असे म्हटले आहे.

आता व्यक्तींच्या जन्मानंतर त्यांच्या वाढीच्या काळात जे पोषण होते त्याला काहीच महत्त्व नाही का? निश्चितच आहे. बालकांचे पोषण, त्यांच्या कुमारअवस्थेतील पोषण हे गरजेचे आहेच पण या वयातील वाढीवर देखील गर्भावस्थेतील वाढीचा परिणाम होतो. गर्भावस्थेत गर्भाची लांबी व्यवस्थित वाढली नाही तर हात-पाय-छाती-पोट- डोके व इतर इंद्रिये यांची प्रमाणबद्ध वाढ झाली नाही तर जन्माला येणारी व्यक्ती ही उंचीने लहान, चण लहान अशी जन्माला येते. बाल्यावस्थेत हाडांची व स्नायूंची वाढ होण्याच्या काळातही पोषण व्यवस्थित नाही झाले तर ती खुजीच राहते. मग प्रौढावस्थेत कितीही उत्तम आहार घेतला, व्यायाम केला तरी हाडांची लांबी वाढत नाही. वाढते ती फक्त चरबी. अशा व्यक्ती उंचीने बुटक्या, पोट सुटलेल्या, मान आखुड असलेल्या, हाता-पायांची बोटं आखूड असलेल्या, गोबर्‍या गालांच्या आणि थुलथुलीत शरीराच्या अशा दिसतात. अशा व्यक्तींनी व्यायाम केला नाही, गोड-तळलेले मैदायुक्त पदार्थ भरपूर खाल्ले की मग स्थौल्य, मधुमेह, हृदयविकार यांना आमंत्रण मिळते. विविध आजारांनी ग्रस्त होतात. अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते हे आपण सुरूवातीलाच म्हटले आहे. या विरूद्ध ज्या व्यक्ती योग्य चौरस आहार, योग्य व्यायाम व संतुलित जीवनशैलीचे पालन करतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यांना शक्यतो रोगांचे संक्रमण सहजच होत नाही आणि झाले तरी त्यांची तीव्रता कमी असते. त्या पटकन् बर्‍या होतात. त्यांना ‘हितायु’ असे म्हणतात.

वर वर्णन केल्याप्रमाणे व्यक्ती ‘सुखायु’ म्हणजेच जन्मतःच उत्तम रोगप्रतिकारशक्ती प्राप्त झालेली असेल आणि ‘हितायु’ असेल म्हणजे आपल्या आहार-विहारातून आरोग्याचे नियम पाळल्यामुळे तिने रोगप्रतिकारकशक्ती वाढवली असेल तर कोरोनासारख्या भयंकर संसर्गजन्य व्याधींचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. त्यातून त्या सहीसलामत सुटतील. व्यक्ती सुखायु जरी नसली परंतु हितायु असेल तर रोगजंतू शरीरात प्रवेश करतील परंतु तीव्र असा संसर्ग त्या व्यक्तीला होणार नाही.

एखाद्या व्यक्तीचे आरोग्य, आयुर्मान कसे असेल याची लक्षणे नवजात बालक या अवस्थेत तपासून बघता येतात. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण उगीच रूढ झाली नसावी. त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींना बालकामध्ये चक्रवर्ती राजाची लक्षणे दिसली हे तरी आपण का नाकारावे?

‘सुखायु’ असणे हे माता-पित्यांवर अवलंबून असते पण ‘हितायु’ असणे म्हणजेच आयुष्याला, आरोग्याला हितकर अशा गोष्टींचा अवलंब करणे हे तर आपल्याच हातात असते ना? हितायु कसे राहता येईल? याचे उत्तर आहे आपल्या दिनचर्येमध्ये आणि ऋतुचर्येमध्ये. वेळच्या वेळी, योग्य प्रमाणात, आपल्या पचनशक्तीनुसार आहार घेणे, पुरेसा शारीरिक व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे ही हितायुची त्रिसुत्री आहे. भूक नसताना मुके प्राणी अन्नांकडे ढुंकूनही बघत नाहीत परंतु मनुष्यप्राणी मात्र भूक नसली तरीही आणि गरजेपेक्षा कितीतरी अधिक खातो आणि सर्व ऊर्जा अधिक मात्रेत खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यात घालवतो किंवा अजीर्णाला सामोरे जावे लागते. पुरेशी विश्रांती आणि झोप मिळाली नाही तर शरीराची झालेली झीज भरून निघत नाही. ऊर्जा कमी पडते. यात मनाचाही उत्साह कमी पडतो. अशी स्थिती दीर्घकालासाठी राहिली की त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो. अपेक्षित यश मिळत नाही. मन निराशेने ग्रस्त होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सर्व शरीराचे तंत्र बिघडते व रोगजंतुंना वाढीसाठी सुपीक भूमी मिळते. त्यातच दर दोन महिन्यांनी निसर्गातील ऋतुचक्र बदलत असते. बदलत्या ऋतुचक्रांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यानुसार आपल्या आहार-विहार-जीवनशैलीमध्ये बदल केला नाही तर अनेक ऋतुकालोद्भव व्याधींना तोंड द्यावे लागते.

स्त्रियांच्या बाबतीत बाळंतपणामध्ये घ्यावयाच्या विशेष काळजीकडे दुर्लक्ष केले, सूतिका परिचर्येचे पालन केले नाही तर प्रतिकारशक्ती कमी होणे, थकवा येणे, रक्तातील हिमोग्लोबीन कमी होणे, हाडामध्ये कॅल्शिअमची कमतरता अशी परिस्थिती निर्माण होते. अशा शरीरामध्ये एखाद्या व्याधीचा संसर्ग झाला नाही तरच नवल! वृद्ध माणसांमध्ये पोषणक्रम खालावलेला असतो. त्यात जोडीला रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार सोबतीला असतील तर प्रतिकारशक्तींचे तीन-तेरा वाजतील. शरीर संसर्गजन्य व्याधींना बळी पडते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची कशी याचे उत्तर ही गोळी घ्या, हे व्हिटॅमिन घ्या या क्षणमात्र केलेल्या कृतीत नाही तर ते सुखायु आणि हितायु यात दडलेले आहे. पुढच्या पिढीला ‘सुखायु’ प्राप्त होण्यासाठी स्वतःचे आरोग्य जपायचे आणि स्वतःला आरोग्यप्राप्तीसाठी ‘हितायु’ व्हायचे. ह्या दोन्हीसाठी अगदी कळत्या वयापासून आरोग्यसाधना करावी लागते. ती पुढच्या पिढीमध्ये बिंबवावी लागते येणार्‍या तिसर्‍या पिढीच्या भवितव्यासाठी. सात पिढ्या पुरेल एवढी संपत्ती जमवण्यापेक्षा आपल्या आरोग्यसाधनेमुळे येणार्‍या तीन पिढ्यांचे आयु व आरोग्य निश्चितच जपले जाईल.

शेवटी आरोग्य म्हणजे तरी काय? ऊर्जा, रोगप्रतिकारशक्ती आणि उत्साह यांचा त्रिवेणीसंगम. हे तिन्ही जिथे आहेत तिथे कोरोनाच काय कोणताही विषाणू प्रवेश करणार नाही. जसे म्हटले आहे की ‘‘अतृणे पतितो वहिनेः स्वयं एव उपशाम्यति।’’ म्हणजे, गवताचा भारा नसेल तर पडलेली ठिणगी आपोआप विझते. ती आग भडकू शकत नाही. त्याप्रमाणेच जर आपण ‘सुखायु’ आणि ‘हितायु’ या दोहोंनी युक्त असलो तर कोरोनाच काय त्याहूनही भयंकर विषाणू आला तरी तो आपले काही वाकडे करू शकणार नाही.
जय आयुर्वेद!!

– वैद्य ज्योति शिरोडकर, पुणे
9822352497

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा