यांच्याकडे कोणी लक्ष देणार का?

यांच्याकडे कोणी लक्ष देणार का?

“आजकल सब खामोश है कोई आवाज नही करता,
शायद सच बोलकर कोई किसीको नाराज नही करता!”

आज उद्भवलेली परिस्थिती याहून वेगळी नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण हातावर पोट असणाऱ्यांवर आज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहण्याची भयंकर वेळ येऊन ठेपली आहे! आज काम मिळण्याची मारामार असल्यानं, जे काय मिळालं ते काम मुकाटपणे करायचं आणि येणारा दिवस कसातरी ढकलायचा… जेवढी मजुरी मिळते ती काही न बोलता घ्यायची अन् निघायचं हेच आज मजुरांच्या नशिबी आलं आहे! कामाच्या ठिकाणी त्यांनी मिळणाऱ्या मजुरीवरून साधा ‘ब्र’ जरी काढला तरी मुकादमाचं वाक्य ठरलेलंच असते, “तुम्हारे जैसे हमको छप्पन मिलते है, काम नही करना है तो जा सकते हो!”

एकंदरीतच पोटासाठी, आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी सगळं सहन करण्याचं त्यांच्या नशिबी आलं आहे. आज ही परिस्थिती यांच्यावर का आली?

मार्च महिन्यात संपूर्ण देशभर लाॅकडाऊन सुरू झाल्यानं लहानमोठे हाॅटेल्स, मोठाले माॅल, विविध क्षेत्रातील कंपन्या, अनेक प्रकारच्या फॅक्टरीज् अचानक बंद पडल्या! त्यामुळे या सर्वांशी संबंधित असणारे असंख्य मजूर एका झटक्यात बेरोजगार झालेत. काही कंपन्यांनी त्यांना एक दोन महिन्याचा पगार दिलाही असेल मात्र मोठ्या प्रमाणावर असलेले बांधकाम क्षेत्रातील मजूर, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकांवर फिरून गरजेच्या वस्तू विकणारे, शाळा – महाविद्यालयांबाहेर बसून किरकोळ चीजवस्तू विकणारे, मंदिराबाहेर हार, फुलं तसंच पूजेच्या वस्तूंची विक्री करणारे असे सगळेच हवालदिल झाले आहेत! असं काहीतरी अचानक घडेल याची कोणीही कल्पना केली नसणार. कोरोनाच्या या अनोख्या संकटामुळे कित्येक जण ‘डिप्रेशन’मध्येही गेल्याची अनेक उदाहरणं आहेत!

अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांना हातपाय गाळून बसण्यापेक्षा काहीतरी करण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. त्यामुळे मिळेल ते काम करायला त्यांचा आटापिटा सुरू झाला! त्याचा परिणाम असा झाला… आज अनेक शहरातील मजूर अड्डयावर कधी कुणी पाहिली नसेल एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमू लागली आहे. त्यावेळी ‘सोशल डिस्टन्स’ बाबतचे नियम पाळणं त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. त्याबद्दल मजूर अड्ड्यावर जमलेल्या मजुरांना हटकले असता त्यांच्या तोंडी ‘कोरोना गेला खड्ड्यात’ हीच भावना व्यक्त होताना दिसून येते. पोटाची भूक त्यांना स्वस्थ बसू देत नाही! कारण त्यांच्यावर त्यांचं अख्खं कुटुंब अवलंबून असतं. स्वतः मात्र अर्धपोटी राहून आपल्या कुटुंबासाठी, त्यांची पोटं भरण्यासाठी त्यांची सतत तारेवरची कसरत सुरू असते. त्याकरिता कसंही करून मजुरी मिळावी म्हणून हे मजूर भल्या सकाळीच मजूरअड्डा गाठताना दिसतात. त्यात मग बंद पडलेल्या हाॅटेलमध्ये कधीकाळी काम करणारी तरणीताठी पोरं, विविध क्षेत्रातील कामावरून काढून टाकण्यात आलेले दुर्दैवी मजूर, जीवनोपयोगी किरकोळ वस्तू रोज विकून आपला चरितार्थ चालवणारे असे असंख्य नवशिके मजूर या मजूरअड्ड्यावर गर्दी करताना दिसतात. रोज सगळ्यांनाच काम मिळतं असं मात्र होत नाही. तिथंही जीवघेणी स्पर्धा असतेच असते! त्यावेळी नेमका याच गोष्टींचा फायदा तिथले बेरकी मुकादम घेताना दिसतात. कमी मोबदला देऊनही त्यांना मजूर सहज उपलब्ध होत असल्यानं या मुकादमांची तिथं मनमानी सुरू असते. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नसतो. त्यामुळे कमजोर लोकांना आपल्या दबावाखाली ठेवण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा दुर्दैवानं आजही आपल्या समाजात बघायला मिळत आहे!

अचानक उद्भवलेल्या या कोरोना संकटामुळे अनेक शहरांसोबतच ग्रामीण भागातही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगारी, कोरोनाची टांगती तलवार असतानाच शाळा – महाविद्यालये बंद असल्यानं विद्यार्थ्यांना सध्या आॅन लाईन शिक्षण देणं सुरू आहे. त्यामुळेच जवळपास प्रत्येक पालकाजवळ अँड्राॅईड मोबाईल असणं आवश्यक झालं आहे. मात्र आर्थिक दृष्टीनं निम्न स्तरांवरील सामान्य पालकांजवळ तसंच ग्रामीण भागातील बऱ्याच जणांकडे अशाप्रकारचा अँड्राॅईड मोबाईल उपलब्ध नसतो! आधीच घरात खायची मारामार मग तिथं आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अशाप्रकारच्या मोबाईलची सुविधा उपलब्ध करून देणं शक्य तरी कसं होणार? ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यानं त्यांच्या मुलांचा बराचसा वेळ शेतातच जात असतो. त्यातून कसातरी वेळ काढून शाळेत हजेरी लावण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते! मात्र आताच्या आँनलाईन शिक्षणामुळे त्यांच्यासमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी विशिष्ट वेळ काढून शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित करणं त्यांना शक्य होत नाही. त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागातील खेडेगावातील विद्यार्थी शिक्षणाच्या ओढीमुळे कित्येक किलोमीटर पायपीट करत मोठ्या गावातील किंवा तालुक्याच्या शाळांमध्ये हजेरी लावताना दिसायचे. मात्र आता या कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा , महाविद्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे अशा अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य सुद्धा अंधकारमय झालं आहे! समजा या भागातील विद्यार्थ्यांना अँड्राॅईड मोबाईल कोणी देऊ केला तरी इंटरनेटची सुविधा मिळेलच याची खात्री नसते. अशावेळी त्यांच्या या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी पाच वर्षातून एकदा प्रामाणिकपणे हजेरी लावणारे पुढारी मदतीला धावून जाणार का? हा मोठा यक्षप्रश्न आहे.

महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व चित्रपटगृह, नाट्यगृह, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणारे सभागृह, मंगल कार्यालयं अजूनही बंद आहेत. त्यावर सर्वस्वी अवलंबून असणारे अनेक पडद्यामागचे कलाकार, गेटकिपर, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी, किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे असे कितीतरी आजही बेरोजगार आहेत. तसंच गावागावात जाऊन लोकनाट्य, तमाशा सादर करून गुजराण करणारे, रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ करणारे किंवा पोतराज यांचं भवितव्यही दावणीला लागलं आहे! त्यांच्यावर आज कशाप्रकारचा प्रसंग ओढवला असणार याची कल्पना न केलेलीच बरी! त्यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आजकाल आपली बहुतेक प्रसारमाध्यमं ‘हाय प्रोफाईल’ नेते, अभिनेते यांच्याकडेच जास्त लक्ष देण्यात मश्गूल असतात. त्यात त्यांचंही काही चुकत नाही म्हणा… त्यांना महत्त्वाच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ गोळा करण्यासाठी किती श्रम पडत असणार ना! मग उपरोक्त नमूद केलेल्या वंचित, पीडित लोकांकडे त्यांचंच काय कुणाचंही कसं काय लक्ष जाणार? आज आपण बघतो, नेहमी रस्त्याच्या कडेला पाणीपुरी, भेळपुरी इत्यादी विकणारे तसंच पानटपरी चालवणारे आज पदपथावर किरकोळ भाजीपाला किंवा मक्याची कणसं विकताना आढळतात. त्यांनाही शेवटी पोटासाठी काहीतरी करावंच लागणार ना! मात्र पदपथावर दुकान लावणं हे नियमबाह्य असल्यानं त्यांचं साहित्य उचलून नेण्यासाठी महानगरपालिकेची गाडी कधी येईल याचा काही नेम नसतो. अशा तणावाच्या परिस्थितीत जीव मुठीत धरून चार पैसे कमावण्यासाठी ते रोजच आटापिटा करताना दिसतात. शेवटी पोटाची भूक कोणालाच स्वस्थ बसू देत नाही हेच खरं!

“भूख है मजहब इस दुनिया का और हकीकत कोई नही!
बचके निकल जा इस बस्तीसे करता मोहब्बत कोई नही!!”

विनोद श्रा. पंचभाई, वारजे, पुणे
भ्र.क्र. ९९२३७९७७२५

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

28 Thoughts to “यांच्याकडे कोणी लक्ष देणार का?”

  1. रविंद्र कामठे

    वैचारिक लेख भाई

  2. Vinod s. Panchbhai

    संपादक महोदय, खूप धन्यवाद !

    1. संजय गोळे तपोवन सोसायटी वारजे पुणे

      नमस्कार सर,
      आपण कोरोनाच्या काळातील घरी परिस्थितीची माहिती सर्वासमोर माडली आहे. सर मी फार जवळुन हि परिस्थिती पाहिली आहे. सर फार वाईट वेळ आली आहे. सर्वसामान्य समाजातील परिवाराचे फार हाल झाले आहेत .
      पण आपण या सर्व परिस्थितीतुन लवकरच बाहेर पडु अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुया
      धन्यवाद सर,

  3. रमेश वाघ

    खूपच सुंदर शब्दांत वास्तवाची मांडणी केलीत भाईकका, मनःपूर्वक अभिनंदन

    1. Vinod s. Panchbhai

      खूप धन्यवाद!

    2. Arvind Krishnarao Pant

      “जिनका कोई नही उनका तो विनोद है यारो”

  4. Vijay Bhagawan Phapale

    खूपच छान व वास्तव

  5. जयंत कुलकर्णी

    कोरोना महामारीच्या संकटामुळे रोज मिळवून खाणारे, हातावर पोट असणारे कामगार , कारागीर यांची जी दयनीय अवस्था झाली आहे त्यावर लेखक श्री विनोद पंचभाई यांनी सटीक भाष्य केले आहे. लेख आवडला.

  6. Nagesh S Shewalkar

    कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वास्तव वर्णन केले आहे.

  7. Sanjay Sajjanwar

    खुप वास्तववादी लिखाण..👌🙏

  8. प्रकाश भास्करवार,नागपूर

    वर्तमान परिस्थितीचे विदारक वर्णन वाचतांना अंगावर काटे ऊभे राहतात. परिस्थिती बदलणे आपल्या हाती नाही.
    सहानुभूती पुर्वक वागणे मात्र करु शकतो.तेवढे करावे.
    अप्रतिम लेह,अभिनंदन पंचभाई !!!👍👍👍

  9. जागृती सारंग

    सद्दपरिस्थितीवरील वास्तवदर्शी लेख.. 👍👌👌👌

  10. Ashish Salphale

    फार चांगले! ईश्वराला प्रार्थना करूया की पूर्ववत जीवन सुरू व्हावे!

  11. Ravindra P. Chaudhari

    खूप छान … महत्त्वाचा गरजेचा विषय छेडला आहे … छान मुद्देसूद मांडणी झाली आहे … 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏

  12. संजय गोळे तपोवन सोसायटी वारजे पुणे

    नमस्कार सर,
    आपण कोरोना संकट काळातील जी लेक स्वरूपात एक जिवंत माहिती आपण सर्वासमोर माडली आहे.
    सर कोरोना काळात हि परिस्थिती मी फार जवळुन पाहिली आहे.
    सर्वसामान्य परिवाराचे फार हाल झाले आहेत .
    पन आपण सर्वजन या संकटातून लवकरच बाहेर पडु अशी ईश्वरचरनी प्रार्थना करुया.
    धन्यवाद सर

    1. Vinod s. Panchbhai

      धन्यवाद सरजी, सुंदर अभिप्राय!
      आपण निश्चितच यातून बाहेर पडू! 😊

  13. Sunil

    आज करोना च्या भयावह परिस्थितित लिहिलेला अतिशय वास्तववादी लेख यातून मार्ग नक्कीच निघेल

  14. Vijay fulzele

    सुंदर वास्तव मांडणी तसेच परिस्थिती सोबतचा सामान्य जनतेचा संघर्ष यांचा लेखाजोखा मांडलेला आहे. श्रमिक वर्गाची परिस्थिती भयानक आहे तरीसुद्धा आज सामान्य जनता नेत्यांना अवास्तव महत्त्व देताना दिसत आहे .जे नेते आजही सामान्य जनतेच्या मदतीला धावून न येता घरात बसलेले आहेत त्यांचाही उदोउदो होत आहे.

  15. Sheetal Dhende

    खरी परीस्थिती मांडलेली आहे या लेखाच्या माध्यमातून सर आपण. नक्कीच या परिस्थितीतुन लवकरात लवकर मार्ग निघेल हीच प्रार्थना.

  16. अमोल नागपूरकर

    जीवनातील सत्य आणि सर्व स्तरावरील सध्याचं वास्तव हे अतिशय मार्मिक पणे सादर केले,. धन्यवाद..

  17. R .B.Gharote

    खुप छान शब्दांकन आवडले . Let us fight

  18. Suvarna Waghmare

    खूप छान. वास्तविक परिस्थितीची मुद्देसूदपणे जाण करून देणारा लेख. अभिनंदन भाई काका

  19. Vinod s. Panchbhai

    सगळ्यांचे मनापासून आभार!😊

  20. Yogesh Dethe

    आज देशाची जी परिस्थिती आहे, त्याची सखोल मीमांसा करणारा लेख. उत्कृष्ट लेखन केले आहे सर. आज सत्य परिस्थितीवर बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय..

    1. H B Gaikwad

      Yes,you thinks right.explain actual thing near by.
      Thanks

  21. Sushil

    काळं वास्तव स्पष्ट शब्दात व्यक्त केले आहे 🙏🏻
    आज कोव्हीडच्या भयावह परिस्थितित लिहिलेला अतिशय वास्तववादी लेख.
    सर्वच स्तरावरील लोकांना बरच काही नवीन शिकायला लावणार हा कालखंड.

  22. Arun Kamalapurkar

    कोविडचे समाजातील सर्वच स्तरांवर होत असलेले परिणाम अत्यंत प्रत्ययकारी शैलीत आपण कथन केले आहेत. ही साथ केव्हा ना केव्हा जाईलच पण आज होत असलेले नुकसान भरून यायला काही वर्षे लागू शकतील. कष्टकरी, हातावर पोट असणारे इ.च्या व्यथा समर्पक शब्दात मांडल्या आहेत. 👍👍👍

  23. Ashwini Jibhkate

    आजची परिस्थिति अचूक मांडली आहे. सर्व बाबिंचा खुप खोल जाऊन विचार केलेला आहे. अप्रतिम लेख……खुप छान

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा