विचारांचा दरवळ

विचारांचा दरवळ

– संजीवनी घळसासी

पत्रकार, लेखक, प्रकाशक, संपादक अशा अनेक जबाबदार्‍या एका विशिष्ठ ध्येयाने, निष्ठेने, पूर्ण क्षमतेने, उत्साहाने व आनंदाने पार पाडणारे ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक वाचले. हे पुस्तक त्यांच्या अनेक पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. हे पुस्तक अनेक विषयांना स्पर्श करते व त्यातुन लेखकाचा आदर्शवाद अधोरेखित करते.

प्रसिद्ध साहित्यिक प्रा. द. ता. भोसलेसरांची उत्तम प्रस्तावना म्हणजे या पुस्तकरुपी राऊळाचे तोरणच म्हणावे लागेल. तोरण जितके सुंदर व सुबक तितकीच त्या राऊळाच्या अंतर्गृहाच्या संपन्नतेची कल्पना येते व त्याची प्रतिष्ठाही वाढते. ही प्रस्तावनाही अशाच पद्धतीने पुस्तकाला अलंकृत करते. सुरुवातीला ही प्रस्तावना वाचताना वाचकाला अतिशयोक्तीही वाटु शकते परंतु आपण जसजसं हे पुस्तक वाचत जातो तसतसे ही अतिशयोक्ती नसुन भोसलेसरांनी वास्तवाची करुन दिलेली जाणीव आहे हे समजते. या पुस्तक-प्रस्तावनेच्या निमित्ताने भोसलेसरांनी, समाजातील अपप्रवृत्तींवर, सत्ताधीशांच्या मनातील विकृतींवर, माणसाच्या गुलामगीरी वृत्तीवर, धर्माच्या खोटेपणावर घनश्याम पाटील यांनी आपली जी लेखणी चालवली आहे तिचे भरभरुन कौतुक तर केले आहेच परंतु याबरोबरच स्वत:चे विचारही मोकळेपणाने मांडले आहेत.

किल्लारीसारख्या भूकंपग्रस्त-उद्ध्वस्त गावातुन येत पुण्यासारख्या ठिकाणी शिकत असताना पत्रकारिता करणे, लहान वयात प्रकाशन व्यवसाय सुरु करुन मुद्रक-संपादक-प्रकाशक होणे ही सामान्य गोष्ट नाही! खोल जीवननिष्ठा व मूल्यनिष्ठा असलेली व्यक्तीच हे शिवधनुष्य पेलू शकते. हे सगळे करत असतानाच स्वत:मधील लेखकाला न्याय देणे हेही तसे अवघड काम परंतु घनश्यामजींनी स्वत:मधला लेखक जपलाय हे या लेखांमधुन सतत जाणवत रहाते.

या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे एकेक अमूल्य विचार आहे असे वाटते. प्रत्येक लेख म्हणजे तरुण पिढीला दिलेली एकेक शपथच आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर दुर्बलास सबल करावे, स्त्री भृण हत्येने पुढील काळ खडतर येईल तेव्हा सावधान, स्त्रियांचे सामाजिक स्थान आदराचे असावे, विवाहसंस्थेत स्त्री-पुरुष नात्याचा सन्मान व आदर करताना स्त्रियांनीही कायद्याचा गैरवापर करु नये, विवाह संकल्पना म्हणजे निष्ठा व जबाबदारी असे असताना क्षणिक मोहापायी तिचा अनादर करु नये, सामाजिक प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना आपल्याला खरंच त्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे की केवळ समाजमाध्यमांवरील जहरी टीका वाचुन आपण आपलं मत बनवलंय ते तपासुन पहावे, जीवनाचा गंभीरपणे विचार करावा व कोणत्याही संकटावर आत्महत्या हा उपाय नसतो असे अनेक संदेश हे पुस्तक वाचकांना देते.

या पुस्तकात धर्म व धर्मातील दहशतवाद यावरही परखडपणे विश्लेषण केलेले आहे. सावरकरांनी गायीला उपयुक्त पशु म्हटले कारण त्यावर त्यांनी सर्वंकष विचार केला होता. असे असताना धर्मांधपणा करत गोहत्येचा विपर्यास केला जातो व मानवी हत्या केली जाते. यातील विरोधाभासावर बोट ठेवत, गोहत्याबंदी या कारणास्तव उन्माद करणार्‍यांनी संपूर्ण शाकाहार करावा असा उपरोधिक सल्ला घनश्यामजी या पुस्तकातुन देतात. संपत्तीचे अघोरी केंद्रीकरण करणार्‍यांना भस्म्यारोग जडला आहे, त्यांना भूकम्हणजे काय हेही या पुस्तकात समजावले आहे. समाजात तरुणांना मार्गदर्शक असे साहित्यिक जीवनव्रती निर्माण झाले पाहिजेत असे लेखकाला प्रकर्षाने वाटते. यासोबतच समाजात त्या त्या वेळी घडणार्‍या खळबळजनक घटना, सणवार, सत्तेतील राजकारण्यांची मुक्ताफळे यांचा चांगलाच समाचार वेगवेगळ्या लेखांमधुन घेत त्या त्या विषयांवरील आपली मते लेखकाने निर्भयपणे मांडली आहेत. या पुस्तकाचे वाचन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली व ती म्हणजे यामध्ये लेखकाला छ. शिवाजी महाराजांचा हिंदुत्त्ववाद, स्वामी विवेकानंदांचा ध्येयवाद व स्वातंत्र्यवीरांचे शौर्य अभिप्रेत आहे.

अशा या ‘दरवळ’मध्ये लेखक घनश्याम पाटलांची विचारसरणी प्रतिबिंबीत झाली आहे. म्हणून सहर्षपणे असे म्हणावे वाटते की हा ग्रंथ म्हणजे, ‘विचारांचा दरवळ, मूल्यांचा दरवळ व कर्तबगारीचा दरवळ आहे!!

हे पुस्तक घरपोहच मागवण्यासाठी भेट द्या – www.chaprak.com
अधिक माहितीसाठी संपर्क – ८७६७९ ४१८५०
संजीवनी घळसासी, पुणे

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

6 Thoughts to “विचारांचा दरवळ”

 1. Nagesh S Shewalkar

  खूप छान, अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.

 2. Vinod s. Panchbhai

  व्व्व्वा! अगदी समर्पक अभिप्राय!

  1. धन्यवाद भाई काका

 3. Radhika Moharil

  Excellent

 4. पुस्तक परिचय:
  ‘दरवळ’ म्हणजे पंचवीस लेख, पंचवीस फुलांनी गुंफलेली माला आणि त्याचा येणारा सुगंध. तो पुण्यातून बेंगळुरू पर्यंत पोहोचला हे नक्की. गेल्या एका आठवड्यात बाहेरगावीच्या कामातूनही मी वेळ काढत झपाट्याने हे पुस्तक वाचून संपवलं. प्रत्येक लेख वाचून झाल्यावर मी अंतर्मुख होत गेलो.
  प्रत्येक लेखामध्ये तटस्थपणे, दोन्ही बाजूंनी विचार करत निरीक्षणे व मते नोंदविण्याची लेखकाची हातोटी उत्तम आहे. यामध्ये जगभरातील जाती, नेते, लोक, स्त्री-पुरूष यांच्या किश्शांची रेलचेल आहे. श्रेष्ठ नेत्यांचे चांगले गुण दाखवताना, त्यांचे कानहीं पकडले आहेत. त्यांना बेधडकपणे चपराकसुध्दा लगावली आहे. थोर राजे, संत महात्मे यांच्या शिकवणीचे भरपूर दाखले दिले आहेत. महापुरुषांचा त्यांच्या अनुयायांनी करत असलेला पराभव वाचून शिकण्यासारखे आहे.
  वारी, साहित्य मेळावे, स्त्री-सशक्तीकरण, शेती व शेतकरी, शाकाहार, भूक, देशभक्ती, पुरोगामी व प्रतिगामी यातील फरक; अपघात, रस्ते नियम व जनजागृती, जातियवाद; कट्टरतावादातून घडणारा दहशतवाद – असे असंख्य विषय, त्यातील बारीक निरीक्षणे लेखकाने सर्व बाजूंनी मांडले आहेत.
  चालू घडामोडींतून लोकांनी केलेला विपर्यास, नाहक बळी जाणारी जनता, आणि त्यातून पुढच्या पिढीने शिकण्यासारखे आहे. जेष्ठ साहित्यिकांचा सुरुवातीचा खडतर काळ, आताचे दुर्लक्षित साहित्य क्षेत्र, आणि लेखकाने नवलेखकांना दिलेली साथ वाचून कृतज्ञ व्हायला होते.
  प्रत्येक लेखाच्या शेवटी वाचकांनी काय करायला हवे, हे लेखकाने उत्तमरीत्या सांगितले आहे. वाचाच!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा