21 व्या शतकातील दोन द्रष्टे

21 व्या शतकातील दोन द्रष्टे

– अनिल किणीकर
(चपराक दिवाळी विशेषांक 2013)

एक

स्टीव जॉब्झ हे कौटुंबीक असूनही कलंदर असं एक व्यक्तिमत्त्व होतं. स्टीव चर्चला नाकारत होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याने झेन बुद्धिझमचा सखोल अभ्यास केला होता. एकेकाळी तो हिप्पी पंथाचा शिष्य होता आणि त्यावेळी तो हरिद्वारमध्ये मनसोक्त भटकत होता. 1970 च्या सुमारास विद्रोही संस्कृतितील स्टीव हा एक संतप्त तरूण (अँग्री यंग मॅन) होता. शुद्ध शाकाहार प्रेमी स्टीव कित्येक दिवस ऍपल आणि कॅरट (सफरचंद आणि गाजरं) खाऊन राहणारा स्टीव दरिद्री असताना आणि नंतर अत्यंत धनाड्य झाल्यावरही अत्यंत साधेपणाने राहायचा, वागायचा.

‘पैशाने मला घडवले आहे पण बिघडवले नाही’ असं सांगणारा स्टीव बौद्धिकद्रष्ट्या नेहमी असमाधानी होता तरी त्याचे व्यक्तिमत्त्व मात्र स्फुर्तिदायक आणि जोशपूर्ण होते. नवी पिढी हे त्याचे प्रेरणास्थान होते. तरूण पिढीकडून त्याला फार मोठ्या अपेक्षा होत्या.

स्टीवचा मृत्यू पाच ऑक्टोबर 2011 ला झाला. अगोदर म्हणजे म्हणजे 2011 मध्ये त्याची आणि आणखी एक प्रचंड द्रष्टा बिल गेट यांची दीर्घकाळ भेट स्टीवच्या घरी झाली. बिल गेट आणि स्टीव जॉब्झ या दोन महान द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांच्या विचारांची ही ओळख वाचकांना निश्‍चितच अंतर्मुख करेल आणि प्रेरणा देऊन चांगल्या कामासाठी उद्युक्त करेल.

बिल आणि स्टीव हे दोघेही तसे समकालीनच! हे दोघेही तरूण कॉलेज-शिक्षणातील निरर्थकता कळल्यामुळे बाहेर पडले, ‘ड्रॉप आऊट’ झाले. दोघांनीही विसाव्या शतकाच्या अखेरीस आणि एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीस मानवी जीवनात रक्तशून्य अशी क्रांतीच घडवून आणली. माणसांच्या विचारांना एक वेगळंच वळण देऊन त्यांच आयुष्यही आमुलाग्र बदलून टाकले. दोघांनीही वैयक्तिक आयुष्यात मानसिक आणि आर्थिक संघर्ष केला. पण त्या अनुभवांनी जगण्यात कटूता येऊ दिली नाही. उलट त्या संघर्षातून त्यांना जी सामाजिक जाणीव झाली, जगण्यातलं असं एक दाहक वास्तव जाणवलं त्यातून त्यांनी लोकोपयोगी कार्यच केलं. जणू काही ‘जगाच्या कल्याणा’ (म्हणजे कोट्यवधी तरूणांचे अन्नदाते) अशीच त्यांची प्रामाणिक भूमिका होती.

आधुनिक जगातील या दोन महान, क्रांतिकारक आणि द्रष्ट्या प्रतिभावंतांना फक्त सलाम! केवळ सलाम!!

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे…
आलो होतो हासत मी
काही फक्त श्‍वासांसाठी..!

– आरती प्रभू

स्टीव जॉब्झ्
स्टीव जॉब्झ्… तुम्ही थोर आहात
न शिकताही ‘शिकलात’
न शिकताही ‘जगलात’
स्टीव जॉब्झ् तुम्ही थोर आहात…

तुम्ही थोर आहात,
ऍडम आणि ईव्ह थोर आहेत,
एझॅक न्यूटन, थोर आहेत…

ऍपल ते ऍपलच
पृथ्वीवरच उगवणारे
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश
पृथ्वीवरील विश्‍वात,
इथे-तिथे-खिशातही…

खिसे मात्र आमचे, भ्रष्ट…
आम्ही मात्र, नतद्रष्ट…
भ्रष्ट, भ्रष्ट आणि फक्त भ्रष्ट…

तुम्ही माणसं थोर आहात
विचार करून जगता..
आम्ही मात्र,
विचार न करताच जगतो
संस्कृतिचे, परंपरेचे, धर्माचे
ओझे…
माझे माझे, माझे वर्तमान
कुठे हरवले…?

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश
एक नाही, पंच महाभूते
पंचमहाभूतांनाही, केले आम्ही पराभूत
केले आम्ही भ्रष्ट, आम्ही नतद्रष्ट…

आमची बीज, भ्रष्ट..
आमची फळं, भ्रष्ट..

स्टीव जॉब्झ्, तुम्ही थोर आहात
न शिकताही ‘शिकलात’
न शिकताही ‘जगलात’

शिकूनही आम्ही, ‘जगत’ नाही
जगूनही आम्ही, ‘शिकत’ नाही
आम्ही फक्त भ्रष्ट, आम्ही मात्र नतद्रष्ट

आम्ही खातो ऍपल.. मात्र कधीतरी
तेही परवडत नाही, नेहमी नेहमी…
आमच्या खिशाला भ्रष्ट केले तरच
कधीतरी.. केव्हातरी…

तसे आम्ही भूकेलेलेच
‘खातो’ आम्ही केव्हाही, कधीही
एकच बरे..‘बरे’च
नाहीतर, सोमालिया आणि इथोपिया
झाला असता इंडिया…
ही तो ईश्‍वरेच्छा!

उपास तापास करतो कारण प्रसाद असतो
पाच फळांचा, एक असते ऍपल
लक्ष करून खातो तेही.. तेवढेच…

पण स्टीव जॉब्झ,तुम्ही थोर आहात
तुम्हीही लक्ष ठेऊन खाल्ले, ऍपलच..
एक बाईट आणि दृष्टीला दिलीत
अकरावी दिशा…

न्यूटनने फक्त
पाहिले ऍपल पडताना
झाडावरून खाली
आणि रहस्य सांगितलं, सार्‍या अस्तित्वाचे
गुरूत्वाकर्षण, आकर्षण…

ऍडम – इव्हने खाल्ले मात्र ऍपल
आणि निर्माण झाले, आकर्षण एकमेकांत
आणि पृथ्वीवर झाला हाहाःकार
स्त्री-पुरूषांचा, माणसांचा, लोकांचा !

त्याच ऍपलचे वंशज आम्ही
न खाताही केला मात्र हाहाःकार
स्त्री-पुरूषांचा, माणसांचा, नव्हे, लोकांचा…

स्टीव जॉब्झ्, तुम्ही थोर आहात
तुम्ही द्रष्टे आहात,आम्ही मात्र
भ्रष्ट, भ्रष्ट, आहोत फक्त नतद्रष्ट…!

स्टीव जॉब्झ
(1955 ते 2011)
ब्लॅक किंवा ग्रे रंगाचा टी शर्ट आणि ब्लू रंगाची जीन असे नेहमीच साधे म्हणजे कॅज्युअल कपडे घालणारा, स्वतःच्या प्रतिभेने, बुद्धिने आणि जिद्दीने अब्जावधी डॉलर संपत्ती कमावलेला, ऍपल या जगविख्यात कंपनीचा मालक चालक स्टीव जॉब्झ हे 21 व्या शतकातील संगणक युगातील अक्षरशः ‘आवाक’ करणारं एक आश्‍चर्यचं होतं. अवघं 56 वर्षांचं आयुष्य (1855-2011) लाभलेला स्टीव कॅन्सरसारख्या असाध्य आजारानं पाच डिसेंबर दोन हजार अकरा रोजी आकस्मिक निधन पावला. त्याचं आयुष्य म्हणजे मराठी, भारतीय तरूण पिढीला केवळं प्रेरणा देणारं असं नाही तर प्रत्येकातील ‘आत्मविश्‍वासा’ला खडबडून जागं करून प्रत्यक्ष कामाला उद्युक्त करणारं आहे.

अमेरिकेतील ऑरीगॉन येथील रोड कॉलेजातून फक्त सहा महिन्यानंतर ‘ड्रॉप आऊट’ झालेला असा हा पदवीधर नसलेला विद्यार्थी, आपल्या आयुष्यातील शेवटच्या म्हणजे 2005 या वर्षी मात्र जगातील सर्वोत्कृष्ट अशा स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीच्या पदवीदान समारंभात ‘प्रमुख पाहुणा’ म्हणून म्हणाला होता, मी पदवीधर नाही, तरीही मी युनिवर्सिटीच्या पदवीदान समारंभात बोलतोय… आज मी माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे. त्या तीन गोष्टींनी माझं आयुष्यचं बदलून गेलं.

पहिली गोष्ट आहे माझ्या जन्म आणि शिक्षण याविषयीची!
माझी जर्मन, पदवीधर आई जोऍन शायबल आणि सिरीयन वडील अब्दुल फताह यांच्या तरूणपणातील ‘अविवाहीत’ प्रेमातून माझा जन्म झाला. तसा मी त्यांना ‘नकोसा’ होतो, म्हणून आईने मला दत्तक देण्याचे ठरविले. तिची एक अट होती; दत्तक घेणारे पालक पदवीधर असले पाहिजेत. पण ती अट संधी येऊनही पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून यंत्र तज्ज्ञ असलेले वडील पॉल आणि अकाऊंटस् लेखनिक क्लोरा या पदवीधर नसलेल्या विवाहीत जोडप्याला मला दत्तक दिले. माझ्या आईची एकच अट होती, मुलाला पदवीधर करायचे! पण ही अटही मी पूर्ण करू शकलो नाही. दत्तक आई वडिलांनीच माझं नाव स्टीव्हन पॉमे जॉब्झ असं ठेवले.

सतराव्या वर्षानंतर मी कॉलेज निवडलं ते स्टॅनफोर्ड इतकच महागडं होतं. त्यामुळे माझ्या दत्तक आईवडीलांकडील बचत जवळजवळ संपलीच होती. सहा महिन्यानंतरच मला कॉलेज शिक्षणाची नावड वाटू लागली. कारण माझ्या मनात आयुष्यात काय करायचे याची काहीही कल्पना नव्हती आणि कॉलेज शिक्षणातून तशी काही कल्पना, योजना मिळेल असे मला वाटले नाही. त्यामुळे मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःवर विश्‍वास ठेवला, आत्ता नक्की काही चांगला मार्ग मिळेलं; त्यावेळी मनात तशी धाकधूक होतीच. परंतु मागे वळून पाहिल्यावर तो निर्णय योग्यच होता याचा मला अनुभव आला. मला जे करावंस वाटत होतं त्या गोष्टीचा मी विचार करू लागलो.

हा निर्णय तसा सुखकारक नव्हता. मला माझी अशी खोली नव्हती. म्हणून मी मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपत होतो. पाच डॉलरसाठी मी कोकच्या बाटल्या पोहोचवत होतो. त्यातून माझं जेवण व्हायचं. गावापासून सात मैलावर लांब असलेल्या ‘हरे कृष्ण’ मंदिरात मी दर रविवारी रात्री चालत जायचो; कारण तिथं उत्तम जेवण मोफत मिळायचं! मला ते खूप आवडायचं. माझं कुतुहल आणि अंतःप्रेरणा किती अमूल्य होत्या हे नंतर मिळालेल्या यशामुळे सिद्धच झालं आहे.

त्यावेळी रीड कॉलेजमध्ये सर्वोत्तम असा ‘अक्षरलेखन’ म्हणजे सुलेखन-कॅलिग्राफिचा कोर्स होता. कॉलेजच्या कँम्पसमध्ये अनेक उपक्रमांची विविध पोस्टर्स लावली जायची. त्यातील कॅलिग्राफी ही अतिशय सुंदर, कलात्मक आणि विषयाला अनुरूप अशी वळणदार असायची. अशी पोस्टर्स पाहून मी कॅलिग्राफी शिकायचे ठरवले आणि आणि कॉलेजमधील कॅलिग्राफीच्या वर्गाला जाऊ लागलो. कॅलिग्राफी शिकताना मी अनेक प्रकारचे ‘टाईप’ म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्याचे शिकलो. तसेच दोन शब्दात समर्पक असं किती अंतर ठेवायचं, ज्यामुळे चांगल्या कॅलिग्राफीचा परिणाम आणखी जास्त चांगला होऊ शकतो, हेही मी शिकलो.

कॅलिग्राफी शिकताना त्याचा व्यावहारिक उपयोग काय होणार होता याची मला कल्पनासुद्धा नव्हती. दहा वर्षानंतर जेव्हा आम्ही कॉम्प्युटरचे डिझायनिंग करत होतो तेव्हा मला कॅलिग्राफीचे शिक्षण उपयोगात आले. 1984 मधील हा पहिला कॉम्प्युटर होता मॉकिन्टॉश! या पहिल्याच कॉम्प्युटरवर आम्ही वेगळ्या वळणाचा असा जो टाईप तयार केला तो म्हणजे अतिशय सुंदर, वळणदार अशी कॅलिग्राफी केली होती. मी त्यावेळी कॉलेजमधील फक्त कॅलिग्राफीचा कोर्स केला नसता तर आम्ही या कॉम्प्युटरवरचे अनेक प्रकारचे वळणदार, तसेच रूबाबदार असे अक्षरलेखन करू शकलो नसतो, हे तेव्हा जाणवले. प्रत्येक अक्षराला, प्रत्येक शब्दाला एक व्यक्तिमत्त्व असते. अर्थाप्रमाणे ते व्यक्तिमत्त्व व सौंदर्य व्यक्त करणे महत्त्वाचे असते. पर्सनल कॉम्प्युटरचे हे एक वैशिष्ठ्यच ठरले. म्हणून तर विंडोजने फक्त मॅकिन्टॉशची ‘कॉपी’ केली.

थोडक्यात, प्रत्यकानं आपल्या अंतःप्रेरणेवर विश्‍वास ठेवलाच पाहिजे. स्वतःच्या मनाची ‘हाक’ ऐकली पाहिजे. त्यातूनचं तुमचं भविष्य घडत असतं. तुम्ही काही गोष्टीवर विश्‍वास ठेवलाच पाहिजे. तुमच्यातील हिंमत, जिद्द, प्राक्तन, आयुष्य, कर्म, जे काही असेल ते! अशा माझ्या दृष्टीकोनामुळेच मी आयुष्यात कधीही अपयशी ठरलो नाही आणि त्यामुळेच माझं जगणं इतरांपेक्षा वेगळं झालं.

माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि याविषयी-
मी तसा नशिबवानच. आयुष्यात मला काय करायचे आहे हे लवकरच लक्षात आले. आम्ही अक्षरशः ‘अथक’ असे प्रयत्न केले आणि फक्त दहा वर्षातच ‘ऍपल’ कंपनीची वाढ दोन बिलीयन डॉलर आणि चार हजार नोकरदार एवढी झाली. वॉझ आणि मी फक्त दोघांनी घरच्या गॅरेजमध्ये कंपनीची सुरूवात केली होती. साधारण दहा वर्षातच आम्ही मॅकिन्टॉश सारखा क्रांतिकारक संगणक बाजारात आणला होता. त्यावेळी मी फक्त तीशीत पदार्पण केलं होतं आणि त्याच दरम्यान कंपनीतून मला शब्दशः काढून टाकले. त्यामुळे मी खचलो होतो. स्वतःच सुरू केलेल्या कंपनीतून दुसर्‍याने काढून टाकल्यावर कसे वाटेल? मला अगदी जाहीरपणे बाहेर काढले गेले. ऍपल कंपनी चांगली वाढत होती म्हणून मी आणखी एका हुशार, बुद्धिमान व्यक्तिला सोबत घेतले. पहिल्यावर्षी सर्वकाही छान सुरू होते परंतु त्यानंतर मात्र आमचे जे स्वप्नं होते, उद्दिष्ठ होते त्यापासून आम्ही दूर जाऊ लागलो. परिणामी कंपनीची उलट्या दिशेने प्रगती सुरू झाली. संचालक मंडळाने मात्र त्या ‘दुसर्‍याची’ बाजू घेतली आणि वयाच्या तीसाव्या वर्षी मला कंपनीतून काढून टाकले. तरूण वयातच मी लक्ष्य ठरवलं होतं ते उध्वस्त झालं.

नंतर काय करावं हे मला काही महिने सुचतच नव्हतं. मला वाटलं मी मागच्या उद्योजक पिढीला निराश केलं कारण माझ्या हातात जे ‘बॅटन’ आलं होतं ते मी मधेच टाकून दिलं होतं! मी डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नॉईसची झालेल्या नुकसानीबद्दल क्षमा मागितली. समाजाच्या दृष्टीनं मी अपयशी ठरलो होतो. मला अगदी पळून जावस वाटत होतं. पण हळूहळू का होईना पुन्हा माझ्या आयुष्यात नवीन पहाट व्हायला सुरू झाली होती. मी जे काही कर्तव्य केलं होतं त्याबद्दल मी अजूनही निःशंक आहे. मला ऍपलने काढून टाकलं होतं तरी कंपनीबद्दल मला आपुलकी होती. मी पुन्हा नव्याने सुरूवात केली. एका अर्थानं मला ऍपलमधून काढून टाकलं ते बरंच झालं. ‘प्रचंड यशस्वी’ म्हणून माझ्या डोक्यावर जे एक ओझं होतं ते कमी कमी होत गेलं आणि पुन्हा एकदा मी ‘बिगीनट’ झालो. मी तसा ‘असुरक्षित’ झालो पण त्यामुळेच माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा माझा सर्वाधिक असा सर्जनकाळ सुरू झाला आणि मी ‘मुक्त झालो.’

नंतरच्या पाच वर्षातच मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी सुरू केली. त्याचवेळी आणखी एक कंपनी सुरू केली ती म्हणजे ‘पिक्सर.’ त्यावेळी मी एका स्त्रीच्या प्रेमात पढलो आणि पुढे तीच माझी पत्नी झाली. ‘पिक्सर’ने पहिलीच दणदणीत निर्मिती केली ती म्हणजे ‘टॉय स्टोरी’ ही कॉम्प्युटर ऍनिमेटेड फिचर फिल्म. जगातील सर्वात यशस्वी असा ‘ऍनिमेशन स्टुडिओ’ सुरू झाला. खरंतरं ऍपलमुळे नेक्स्ट सुरू झाली आणि ‘टॉय स्टोरी’, ‘पिक्सर’ मुळे ‘नेक्स्ट’ सर्वतोमुखी झाली. मी पुन्हा ‘ऍपल’मध्ये प्रवेश केला. ‘नेक्स्ट’मध्ये आम्ही जे काही तंत्रज्ञान विकसित केलं होतं ते मी ‘ऍपल’च्या अग्रस्थानी आणलं. ‘ऍपल’च्या पुनरूत्थानाचा काळ सुरू झाला. त्यातूनच माझी आणि लॉरेन्सची घट्ट अशी कौटुंबीक मैत्री झाली.

मला ‘ऍपल’ मधून काढून टाकलं नसतं तर हे पुढचं काही घडलं नसतं याची मला मनोमन खात्री आहे. ‘काढून टाकणं’ हे खरं तर ‘भयंकर परीक्षा घेणारं’ जीवघेणं औषध होतं पण ते रूग्णाच्या दृष्टीनं आवश्यक होतं. काहीवेळा आयुष्यच तुमच्या डोक्यावर वीट भिरकावते, मारते पण त्यामुळे श्रद्धा आत्मविश्‍वास गमावू नका. मी जे काही काम केलं होतं ते अगदी मनापासून, प्रेमाने केलं होतं; त्यामुळेच मी पुढची वाटचाल करू शकलो, हे मला जाणवले होेते. तुम्ही कोणावर, कशावर प्रेम करताय, हे तुम्ही शोधल पाहिजे. तेच एक सत्य तुमच्या कामाची प्रेरणा असतं तसंच ते सत्य तुमच्या प्रेमिकांना पे्ररणा देणारे असते. तुमचं काम म्हणजे आयुष्याचा एक फार मोठा भाग असतो (काम म्हणजे आयुष्यातील जगणंच असतं.) आणि म्हणूनच प्रामाणिकपणे समाधानी व्हायचं असेल तर आपण जे काम करतोय ते महान कार्य आहे हा विश्‍वास बाळगण आवश्यक आहे. महान कार्य करण्यासाठी आपण जे काही करतोय त्यावर प्रेम, श्रद्धा ठेवणे हाच एक मार्ग असतो. असं प्रेम, श्रद्धा तुम्हाला वाटत नसेल तरीही लक्ष्य ठेवा, समाधानी राहू नका. ज्या गोष्टी करायच्या मनात आहेत त्या तुम्हाला सापडतील हे तुमच्या लक्षात येईल. वर्षे जात असतात तेव्हा तेव्हा चांगले नातेसंबंध अधिक चांगले होऊन ते घट्ट होत असतात. म्हणून सापडेपर्यंत ‘लक्ष्य’ ठेवा, समाधान मानू नका.

माझी तिसरी गोष्ट आहे ती मृत्यूविषयीची-
मी सतरा वर्षाचा होतो तेव्हा मी एक संदर्भ वाचला होता ‘‘आयुष्यातील प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे असं समजल तर तुम्हाला एके दिवशी ते बरोबर असल्याची पक्की खात्रीच पटेल.’’ या संदर्भाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला आणि तेव्हापासून गेली 33 वर्षे मी जेव्हा दररोज सकाळी आरशात माझा चेहरा पाहतो तेव्हा स्वतःलाच मी विचारतो, ‘‘आजचा दिवस जर आयुष्यातील शेवटचा दिवस असेल तर आज मला जे काही करायचे आहे ते मी आजच करणार आहे का?’’ आणि जेव्हा जेव्हा ओळीने काही दिवस उत्तर ‘नाही’ असे येते तेव्हा मला जाणवते की आपल्याला काहीतरी बदलावे लागेल. तुमच्याकडे गमावण्यासारखं काही आहे या विचाराच्या पिंजर्‍यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणजे ‘आपण एक दिवस मरणार आहोत’ याच स्मरण ठेवणं! एका अर्थाने तुम्ही ‘नागडे’च आहात. स्वतःचं मन काय म्हणतंय त्याप्रमाणे न वागण्यासाठी कोणत्या तरी कारणाची गरजच नाही.

साधारण एक वर्षापूर्वी मला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. सकाळी साडेसात वाजता माझी तपासणी झाली आणि त्यात माझ्या आतड्याला ट्युमर झाल्याच आढळून आलं. आतडं म्हणजे काय हे मला माहितीही नव्हतं. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, हा कॅन्सर काही बरा होणारा नाही आणि तीन ते चार महिन्यापेक्षा मी जास्त जिवंत राहीन याची अपेक्षाही ठेऊ नये. डॉक्टरांनी सल्ला दिला की, ‘‘घरी जाऊन ज्या काही व्यवहाराची सोय लावायची ती लाव.’’

थोडक्यात मरणासाठी तयार रहा. म्हणजेच मुलांना सर्व काही समजावून सांगायचं. पुढील दहा वर्षात जे काही करायचं आहे, ते आता काही महिन्यातच सांगावं लागणार. याचाच अर्थ सर्व प्रकारच्या कौटुंबीक गोष्टींची आणि गरजांची आवश्यक ती सोय करून ठेवणं! म्हणजे आता ‘निरोप’ घ्यायची वेळ आली आहे.

कॅन्सरच निदान लक्षात ठेऊनच मी दिवसभर जगत असतो. परंतु त्याच दिवशी माझ्या आणखी काही वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आणि सर्जरी केली तर माझा कॅन्सर बरा होणारा आहे, हे आढळून आलं. माझी सर्जरी झाली आणि आता मी छान आहे. मृत्युला अगदी जवळून पाहण्याचा हा अनुभव होता आणि आणखी काही वर्षे जिवंत राहणार हा सुद्धा अगदी जवळचा अनुभव मिळून गेला. अशा परिस्थितीत मी जगत होतो. म्हणून आता मी थोड्या अधिक ठामपणे सांगेन की, मृत्यू ही एक उपयुक्त परंतु निखळ बौद्धिक संकल्पना आहे.

कोणालाच मरायचं नसतं. ज्यांना स्वर्ग हवा आहे असे लोकसुद्धा तिथं जाण्यासाठी मरत नाहीत आणि तरीही मृत्यू हे आपण सर्वजण अनुभवणार आहोत असं एक मुक्कामाचं ठिकाण आहे. त्यातून कोणाचीही सुटका नाही. ते तसंच असायला हवं कारण आयुष्यातील एकमेव उत्तम लागलेला शोध म्हणजे मृत्यू होय. मृत्यू हा आयुष्य बदलून टाकणारा घटक आहे. त्यामुळे नव्याला येण्याचा मार्ग मोकळा होतो. आता तर तुम्हीच ते नवीन आहात आणि तो एक दिवस काही फार दूरचा नाही. तुम्हीही हळूहळू जुने होणार आहात आणि पुन्हा संपणार आहात. हे सर्व नाट्यमय वाटावं असंच आहे पण ते एक केवळ सत्य आहे.

तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणून उगाच दुसर्‍या कोणासारखं तरी जगण्यात वेळ वाया घालवू नका. कुठल्यातरी दडपणाखाली जगू नका. दुसर्‍या कोणाच्या तरी विचारांनी प्रभावित होऊन जगू नका. स्वतःचा आतला आवाज बुडवून न टाकता इतरांनी केलेल्या गोंगाटाप्रमाणे जगू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाचं ऐका आणि अंतर्ज्ञानाप्रमाणे जगण्याचं धैर्य ठेवा. तुम्हाला खरोखर नेमकं काय हवंय याची मुलभूत जाणीवच त्यातून होतं असते. या जाणीवेशिवाय बाकी सर्व काही दुय्यम असतं.

मी तरूण होतो तेव्हा ‘द होल अर्थ कॅटलॉग’ या नावाचा एक अद्भूत, भन्नाट असा अंक होता. आमच्या पिढीचं ते जणू बायबलच होतं. स्ट्यूअर्ट ब्रॅन्ड यानं ते आपल्या काव्यात्मक शैलीत प्रसिद्ध केलं होतं. हा अंक 1960 च्या दशकाच्या अखेरीस म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर आणि डेस्क टॉप पब्लिशिंग येण्याअगोदर प्रकाशित केलं होतं. तो साधारण ‘गुगल’च्या स्वरूपाचाच पेपर बॅक अंक होता. म्हणजे गुगलच्या अगोदर जवळ जवळ पस्तीस वर्षे आधी. सर्वप्रकारच्या पुरेपुर माहितीनं परिपूर्ण असा तो आदर्श ग्रंथ होता.

‘द होल अर्थ कॅटलॉग’चे त्यानंतर अनेक अंक प्रकाशित करण्यात आले. हळूहळू तो व्यवस्थित चालू असतानाच स्ट्यूअर्टने त्याचा शेवटचा अंक प्रसिद्ध केला तो साधारण 1970 च्या मध्यात. तेव्हा मी तुमच्याच वयाचा होतो. त्या अंकाच्या मागील कव्हरवर ग्रामीण भागातील सकाळच्या वेळचा फोटो होता. तो जणू तुम्हाला एखादे धाडस करण्याचे आवाहनच करत होता. त्या फोटोखाली शब्द होते, ‘‘नेहमी अतृप्त रहा, वेडे व्हा!’’ नेहमी असमाधानी रहा, काहीतरी प्राप्त करण्यासाठी वेडेपिसे व्हा, त्या शेवटच्या अंकावरचा हा एक संदेश होता. ‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’ या संदेशाप्रमाणे मी स्वतः जगण्याचे ठरविले. आता तुम्ही पदवीधर होऊन एक नवे जगणे जगणार आहात; म्हणूनच तुम्हीही तसेच जगावे हीच माझी इच्छा!
‘‘स्टे हंग्री, स्टे फुलीश…!’’

दोन

बिल गेट (जन्म 1955)

‘जगाच्या कल्याणा’साठी झटणारे, स्वतःचा पैसा देणारे, स्वतः अशा कल्याणकारी योजनांमध्ये सहभागी होणारे उद्योगपती तसे कमीच असतात. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ म्हणजेच आधी केले मग सांगितले असे म्हणणारे सर्वश्रेष्ठ असतात. स्वतःच्या आयुष्यातील आनंद आणि पैसा अनेक देशातील विधायक कार्यासाठी देणार्‍यांमध्ये आज बिल गेट यांचा सर्वात मोठा वाटा आहे. जगातील एक क्रमांकाचे ते अब्जपती आहेत. तसेच ते एक क्रमांकाचे ‘दानशूर’ असामीसुद्धा आहेत.

‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘बिल गेट फाऊंडेशन’चे बिल गेट आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची नुकतीच काही जनकल्याण योजनांविषयी चर्चा झाली. ‘जनकल्याण’ ही संकल्पना, विचार आणि कृती याविषयी बिल गेट यांची ही मुलाखत उद्बोधक ठरेल.

ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला

ऋण फळाफुलांचे असते या धरतीला
ऋण फेडायाचे राहून माझे गेले
ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले!
– रॉय किणीकर

‘अर्थ’, ‘अर्थ’ आणि अर्थ…
अर्थ – पृथ्वी
अर्थ – पैसा, संपत्ती
अर्थ – हेतू-उद्देश.

माणूस पृथ्वीवर पैसा, संपत्ती मिळवतो, त्यामागे काही हेतू असतो आणि काही उद्दिष्ठ असते.

‘फोर्ब्ज’ या अमेरिकन नियतकालिकाने 2011 मधील चारशे जागतिक श्रीमंत माणसांची सूचि आणि परिचय प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये पहिला क्रमांक बिल गेट (मायक्रोसॉफ्ट – 59 बिलीयन्स डॉलर), दुसरा क्रमांक वॉरन बफे (गुंतवणूक गुरू – 39 बि. डॉलर) आणि तिसरा क्रमांक लॅरी एलिसन (ओरॅक्स – 33 बि. डॉलर) यांचा आहे. त्यानिमित्ताने विक्टोरिया बॅरिएट यांनी बिल गेट यांची एक मुलाखत ‘फोर्ब्ज’साठी घेतली होती. त्याचा हा अनुवाद.

बिल गेट यांची एकूण संपत्ती 59 बिलीयन डॉलर्स (अब्ज). पोलीओ, मलेरिया, एडस् निर्मुलन योजना – 28 बि. डॉलर, लसीकरण योजना तरतूद – 1 बि. डॉलर(प्रतिवर्षी), अमेरिकेतील शालेय शिक्षण सुधारणा – 2 बि. डॉलर (2000 ते 2008 प्रत्येक वर्षासाठी.)

बिल गेट – वय 57 वर्षे.

शिक्षण – हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडले (ड्रॉप आऊट)

आणि बिल लगेचच व्यवसायात उतरले. त्यांनी स्वतःचीच ‘मायक्रोसॉफ्ट’ ही कंपनी सुरू करून तिचा विस्तार जगभर केला. सिऍटल येथील त्यांच्या घरी झालेली ही अनौपचारिक मुलाखत.

प्रश्न : बिल, ‘मायक्रोसॉफ्ट’ मधील दैनंदिन कामातून तुम्ही बाजूला झालात. नंतर खरंतरं तुम्ही गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत व्हाल असे वाटले होते पण त्याऐवजी तुम्ही ‘दानशूरता’ या विचाराकडे कसे वळलात?

बिल : 2006 साली मी कंपनीतून निवृत्ती जाहीर केली तेव्हा मी माझ्या फौंडेशनचे काही काम करत होतो. काही शास्त्रज्ञांच्या संशोधन कार्यामुळे मी प्रभावित झालो. हे शास्त्रज्ञ दुर्धर आजारावरील लस संशोधनाचे काम करत होते. काहीजण शेतकर्‍यांसाठी चांगल्या, सकस बियाणांवर संशोधन करीत होते आणि याचवेळी आहे या शिक्षणपद्धतीत आणखी कोणत्या सुधारणा करता येतील याबाबत काम करीत आहेत. अशा प्रकारच्या संशोधनाला ‘सशक्त’ अर्थयसहाय्य करण्याची आवश्यकता आहे असं मला आढळून आलं आणि मला अगदी मनापासून जाणवलं की, त्यासाठी फाऊंडेशनचं काम पूर्णवेळ करण्याची गरज आहे. आर्थिक सहकार्य करताना मी नेहमीच चिकित्सा करत असतो आणि विचारपूर्वक निर्णय घेत असतो. मला अर्थातच उत्तर सापडल ः अशा विधायक आणि समाजोपयोगी कामासाठी यापुढे अर्थसहाय्य करायचे.

प्रश्न : तुम्ही आणि तुमची पत्नी मेलिंदा, दोघे मिळून म्हणजे ‘पार्टनर’ म्हणून हा प्रकल्प पाहता का?

बिल ः अशा प्रकल्पात अनेक आव्हानं असतात. विविध दृष्टीने त्यांचा विचार करणं, अभ्यास करून विश्‍लेषण करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण त्यातून आम्ही कामांची दिशा ठरवत असतो. शिवाय अशा प्रकल्पासाठी जगभर हिंडावं लागतं. म्हणून आम्ही दोघेजण वेगवेगळ्या देशात जाऊन पाहणी करतो, विचार विनीयोग करतो, अभ्यास करतो आणि अर्थ-सहाय्याचे निर्णय घेतो. काहीवेळा आम्ही स्वतंत्रपणेही, एकएकटेही परदेशात जात असतो. परत आल्यावर आम्ही इतर काही जणांबरोबर चर्चा करतो तेव्हा त्या त्या विषयासंबंधीचे विविध पैलू लक्षात येतात. त्यामुळेच ‘अर्थपूर्ण’ सहाय्याचे विधायक मार्ग दिसू लागतात.

प्रश्न : तुम्हा दोघांच्या जगभर हिंडण्यामुळे कौटुंबीक जगणं आणि मुलांकडे लक्ष देणं दुर्लक्षित होत असेल ना?

बिल : तसं काही होत नाही. उलट कित्येकवेळा आम्ही मुलांना मुद्दाम बरोबर नेतो आणि हे खूप आनंददायक असते. आनंददायक अशासाठी की, त्यांनाही लहान वयातच जगाचा परिचय होतो. स्वतःशिवाय असलेल्या जगाची ओळख होते आणि ओळखीतूनच प्रेम निर्माण होते ना…! आम्ही अनेकदा तीनही मुलांना (वय अनुक्रमे 15, 12 आणि 9) आफ्रिकेत घेऊन जातो. आफ्रिकेत काय काय आहे, आहे ते कसं कशाप्रकारे चाललंय याची माहिती देतो. मुलं विचारतात, ‘‘आमच्या भविष्यासाठी बचत न करता इतर प्रकल्पांना पैसे का वाटत सुटता?’’

तेव्हा त्यांच्या प्रश्‍नाला उत्तर मिळते, ‘‘आम्ही इतरं माणसांचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून पैसे का वाटतो?’’ त्यांच्या प्रश्‍नांचं उत्तर प्रत्यक्ष वास्तवात दिसल्यामुळे मुलांनाही पैशाचं आणि जगण्याच भान येतं. मुलांना असं भान लवकरात लवकर येणं गरजेचं असतं. सुसंस्कृत, जबाबदार नागरिक असण्याचं भान हे कुटुंब, समाज, देश आणि जगाच्या दृष्टीने नव्या दिशेकडे नेणारं असतं. काही प्रश्‍नांची उत्तरे शोधणारं असतं.

आम्ही पैसे का वाटतो? असा प्रश्‍न मुलांना पडणं अगदी स्वाभाविक असतं. मनातला हा प्रश्‍न ते विचारतात- किती छान! स्वतःच्या गरजा पूर्ण होतील एवढा पैसा शिल्लक ठेऊन ‘ज्यादा’ पैसा समाजासाठी ‘वाटणे’ याचा अर्थ मुलांना कळतो.

प्रश्न : तुमचे उत्तर मुलांना पटते का?
बिल : ‘‘तुम्ही खूप नशिबवान आहात. हा एवढा ‘आयता’ पैसा तुमचं नुकसान करेल’’ असं मी मुलांना स्पष्टपणे सांगतो. एका ध्येयाने आणि अहोरात्र कष्ट करून मी काम केले नसते तर एवढा प्रचंड पैसा मिळालाच नसता. ध्येयपूर्तीसाठी कष्टाची जोड लागते. कष्टांना पर्याय नसतो. शिवाय मुलांच्या नावे आम्ही प्रत्येकी दहा मि. डॉलर ठेवले आहेत.

प्रश्न : ‘दानशूरता’ ही तुम्हाला आईमुळे जाणवली का? निस्वार्थीपणे ‘अर्थपूर्ण’ सहाय्याची स्फूर्ति कशी मिळाली?
बिल : माझ्या वडिलांची कारकिर्द वकीली व्यवसायात गेली. आईला पैशाचे भान होते. तसे ते अर्थसहाय्य योजनांमध्ये कार्यरत होते. दोघेही एकत्रच काम करायचे.

प्रश्न : आहे यापेक्षा अधिक विशिष्ठ गतीने अर्थसहाय्य करण्यासाठी प्रकल्पांमधील आव्हानांचा विचार करण्यासाठी काही कार्यक्रम, प्लॅनिंग आहे का?

बिल : वयाच्या 45 व्या वर्षीच मी फौंडेशनला भरपूर अर्थसहाय्य केले पण त्याआधी अमेरिकेतील ग्रंथालय, सुधारणा प्रकल्पांनाही आम्ही मदत केली आहे. त्याचवेळी विधायक आरोग्य योजनांनाही मदत केली, शिक्षणाचा एक भाग म्हणून!

आरोग्य विषयात एका गटाने मला सुचवले की, माणसाचे प्रकृतीस्वास्थ्य वाढले, त्यात सुधारणा झाली आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले तर असे लोक ‘छोट्या’ कुटुंबाचा विचार करण्याकडे अधिक प्रमाणात प्रवृत्त होतील. या विचारामुळे जणू आरोग्य प्रश्‍नातील ‘कोंडी’च फुटली! म्हणूनच मी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात अर्थसहाय्य करण्यास उद्युक्त झालो. प्रकल्प प्रत्यक्षात येणे तसे कठीण असते. आरोग्यासारख्या विषयात तर अज्ञान आणि अनास्था असते. 2000 ते 2005 या वर्षात आम्ही खूप काम केले. वॉरेन बफे यांनी फौंडेशनला नेहमीपेक्षा दुप्पट रक्कम दिल्यामुळे कामांची अंमलबजावणी आणि प्रगती झपाट्याने सुरू आहे.

प्रश्न : वॉरेन यांनी काही मुदत दिली आहे का?
बिल : अर्थातच! त्यांनी दहा वर्षांची मुदत दिली आहे. संपत्ती ‘स्थिर’ होईपर्यंत! (त्यांनी गुंतवलेल्या पैशात सतत वाढच होत आहे!) वॉरेन आता 81 वर्षांचे आहेत आणि आपण ‘कायम’चे जगू म्हणजेच ‘अमर’ राहू अशी अपेक्षा आहे. अर्थातच, हा ‘वादाचा मुद्दा’ आहे!

प्रश्न : फौंडेशनचे काम बंद करण्याविषयी तुमचे काय विचार आहेत?
बिल : का ते मला माहीत नाही पण मला वाटतं होतं की फौंडेशन कायम चालू रहावं पण वॉरेन यांनी माझे विचार बदलले. मेलिंदा आणि माझ्या मृत्युनंतर दहा-पंधरा वर्षांनी बंद होईल, अशी तरतूद केली आहे. एखादे कार्य, एखादा हेतू तुम्ही स्वीकारता तेव्हा वाटते ‘हे कार्य फारच महान आहे, त्यासाठी मी कायमचेच सहाय्य देईन.’ आम्ही आमच्या आयुष्यात म्हणजेच आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत जर संसर्गजन्य आजाराचे जास्तीत जास्त प्रमाण कमी करू शकलो नाही किंवा त्या आजाराचं उच्चाटन करू शकलो नाही तर मात्र मी खूप निराश होईन. मलेरिया, टीबी, एडस्सारखे जीवघेणे आजार संपवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इतर अनेक व्यक्ती आणि संस्था कॅन्सरसारख्या असाध्य रोगावर संशोधन करण्यासाठी भरपूर अर्थसहाय्य करीत आहेत. म्हणून आम्ही त्याचा विचार केला नाही.

असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवणं महत्त्वाचं असतं. त्याचा परिणामही मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणून अशा आजारावर लस शोधून काढणं, इंटरनेटच्या सहाय्यानं शिक्षण कसं सुधारायचं हे महत्त्वाचं असतं. हवामानाप्रमाणे नव्या बियाणांचा शोध आरोग्यासाठी आवश्यकच आहे.

प्रश्न : तुम्ही सरकारबरोबर सुद्धा प्रकल्प करताय का?
बिल : आम्ही आमचे असे प्रकल्प करीत असताना, सरकार जे स्वतःच्या पैशातून योजना राबवित आहेत त्यांचा आमच्यावर परिणाम होऊ नये असे वाटते. लसी विकत घेण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारला सांगताना असे आमच्या लक्षात आले आणि म्हणून आम्ही ‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स’ फंडची निर्मिती केली. एडस्ची औषध विकत घेण्यासाठी सुद्धा अधिक पैशांची गरज आहे. त्यासाठी पैसे उभारण्यासाठीसुद्धा आम्ही एक फंड स्थापन केला.

आमचा अर्थसहाय्याचा विचार सुरू झाला त्यावेळी सरकारला किंवा स्वयंसेवी संस्थांना पैसे देण्याविषयी मी अनुकूल नव्हतो. काळ जातोय त्याबरोबर आणखी काही सुधारणा होणे मात्र गरजेचे आहे.

प्रश्न : बिल, तुम्ही तर प्रत्येक गोष्टीची चिकित्सा आणि विश्‍लेषण करणारे उद्योगपती आहात. आफ्रिकेतल्या ग्रामीण भागातले बालमृत्यू पाहून तुम्ही भावविवश होऊन अर्थसहाय्याचा निर्णय घेतलात का?

बिल : जगण्यातली भावविवशता हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. परंतु केवळ भावविवशतेचा विचार करून निर्णय घेणारा माणूस मी नाही. म्हणूनच तर प्रत्यक्ष जाऊन पाहणं, वस्तुस्थिती समजाऊन घेणं, आवश्यक असतं. तुम्ही जर अनुदानित शाळांना भेटी दिल्या नाहीत, आफ्रिकेला गेला नाहीत तर निश्‍चित काही उणीवा राहतील. अशा उणीवाच प्रकल्पाच्या दृष्टीनं हानीकारक ठरू शकतात. सुधारणा होण्यासाठी मानसिक गुंतवणूकही आवश्यक असते. सकारात्मक म्हणजे विधायक असा प्रत्यक्ष अनुभव, त्याचे दृष्य स्वरूप अर्थातच जाणवत असते.

प्रश्न : अजून कोणकोणत्या क्षेत्रात काम करावं असं फौंडेशनला वाटतं? एखाद्या नवीन, तरूण उद्योगपतीने किंवा श्रीमंताने कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक म्हणजे ‘दानशूरता’ दाखवून भरीव कार्य करावं?

बिल : आम्ही सुद्धा अनेक योजनांचा प्रयत्न केला. दहशतवाद हा आजच्या काळातील एक दाहक असे वास्तव आहे. त्याचे अमानवी, उग्र, भेसूर असे उद्रेक लक्षात घेता त्याविषयी तातडीने विचार करून उपाययोजना करण्याची गरज आहे. एखाद्याने मला अण्वस्त्रांची किंवा जैविक दहशतवादाची शक्यता नियंत्रित करण्याची एखादी असांभाव्य अशी (ड्रॅमॅटिक) योजना सांगितली तर मी त्याबाबत मोकळ्या मनाने विचार करेन.

प्रश्न : तरूण असे अब्जपती आहेत का ?
बिल : स्वकर्तृत्वाने संपत्ती मिळवणारी एखादी पिढी आणि वारसा हक्काने संपत्ती मिळवणारी पिढी यांच्या दृष्टीकोनात फार मोठा फरक असतो आणि मला तर वारसा हक्काने अगदी नगण्य अशीच संपत्ती मिळाली आहे.


प्रश्न : दानशूर असण्याविषयी तुम्ही कसे मार्गदर्शन कराल? तुमच्या तत्त्वांचा आणि अनुभवांचा ‘वाटा’ कसा देऊ शकाल?

बिल : प्रत्येकाला आपला असा एक मार्ग शोधावा लागतो. एखादी गोष्ट (म्हणजे पैसा, वास्तू इत्यादी) मोकळेपणाने दिल्यावर आनंद मिळतो तो खरा आनंद. परिणामांच्या विचारांची स्पष्टता असेल तरच आपण ‘मुक्त’ होऊ शकतो. आता ‘दानशूरता’ असणं म्हणजे काही विशेष असणं, असं समजलं जात. परंतु यापूर्वीची अशी काही आदर्श उदाहरणेही आहेत.

टॉकफेलर, कार्नेजी आणि फोर्ड अशांसारख्या अब्जपतींनी फार मोठी भरीव अशी दानशूरता दाखवली आहे, विविध कार्याला अर्थसहाय्य करणारी फौंडेशन स्थापन केली आहेत. वर्षानुवर्षे त्यांच्यातर्फे लोककल्याणाच्या म्हणजे पर्यायाने समाज आणि राष्ट्राच्या सुधारणेच्या योजना चांगल्या प्रकारे चालू आहेत. जीवनाचे उन्नयन करणे हाच सर्वांचा मूलभूत हेतू असतो; तेच त्यांचे ध्येय असते.
(चपराक दिवाळी विशेषांक 2013)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा