प्रस्तावना – ‘थोडं मनातलं’

विनोद श्रा. पंचभाई लिखित ‘थोडं मनातलं’ या पुस्तकाला ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या shop.chaprak.com या ऑनलाईन शॉपीमधून भारतात कुठेही घरपोच मागवू शकाल.

माणूस निर्भय आणि निर्मळ असेल तर त्याचे विचार निश्चितपणे प्रकाशमार्गी असतात. जे जगतो, जसं जगतो तसं बिनधास्तपणे कागदावर उतरवणारे लेखक कमी होत चाललेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात आश्वासक वाटचाल करणार्‍या सन्मित्र विनोद श्रा. पंचभाई यांनी मात्र ही किमया साध्य करून दाखवली आहे. ते संवेदनशील कवी आहेत, ताकतीचे लेखक आहेत. ‘चपराक’ परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आहेत. आम्ही सर्वजण त्यांना ‘भाई काका’ म्हणतो; मात्र ते आमचे सच्चे आणि जिगरी ‘दोस्त’ आहेत.

या अवलीयाचा ‘याराना’ आमच्या मनातील, विचारातील, जगण्यातील ज्योत कायम धगधगत ठेवतो. त्यांच्या लेखनीतून कायम उत्साहाचे, हास्याचे, चिंतेचे आणि चिंतनाचेही शब्द पाझरत असतात. साप्ताहिक ‘चपराक’मध्ये सातत्याने लिहित असताना वाचकांच्या अभिरूचीची अचूक नस त्यांना सापडलीय. उपदेशाचे अजीर्ण होणारे डोस पाजण्याऐवजी वाचकांशी मैत्री निर्माण करत अतिशय साध्यासोप्या भाषेत ते आपले विचार पटवून देतात. आपल्यावर रूसलेल्या प्रेयसीची समजूत काढत तिला अलगदपणे आपल्या कुशीत घ्यावे, तितक्याच सहजतेने सर्व मनोवृत्तीच्या वाचकांचा ते ठाव घेतात आणि त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. मुद्देसूद आणि ओघवत्या शैलीतील प्रभावी मांडणी, अधेमधे कविता, संत कबीरांचे दोहे, राष्ट्रसंत तुकडोजींच्या ओव्यांची साखरपेरणी यामुळे त्यांच्या लिखाणाला अवीट गोडी प्राप्त झाली आहे.

‘चपराक प्रकाशन’चे हे 44 वे पुस्तक असून यात भाईंच्या 45 लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतांश लेख साप्ताहिक ‘चपराक’मधून प्रकाशित झाले आहेत. परमेश्वर कुठे आहे, इथपासून ते जीवनातील रागलोभ, बालपण, सण-समारंभ, संस्कार आणि संस्कृती, गुरू-शिष्य, शेजारी, वाचनसंस्कृती अशा सर्व विषयांवरील चिंतन त्यांनी या लेखातून प्रकट केले आहे. हे लेख थेट काळजाला जाऊन भिडतात. विचार, निर्णय आणि कृती या परिवर्तनाच्या तीनही पातळ्यावर यशस्वी झेप घेण्यासाठीचा संकल्प दृढ करतात. माणसाला हलवून सोडणारे आणि विचार करायला भाग पाडणारे हे साहित्य मनावर असलेले मणामणाचे ओझे कमी करण्यास मदत करते. विनोद पंचभाई यांच्या लेखणीचे हे सामर्थ्य आहे.

या पुस्तकातील लेख म्हणजे कुणा व्यास-वाल्मीकींची कवीकल्पना नाही. जीवनाच्या विविध टप्प्यांवर एका सामान्य माणसाला पडलेले, पडणारे प्रश्न त्यांनी पोडतिडिकेने मांडले आहेत. तुमच्या कुटुंबावर तुमचे प्रेम आहे का? आपण एकटे का पडतो? माणसं अशी का वागतात? आजची पिढी परावलंबी होत आहे का? आपली उपस्थिती इतरांना खुपते का? ही जीवघेणी लालसा कधी थांबणार? मराठी बोलण्याला कसली आलीय रे आडकाठी? मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे का? बाजारात मिळणार्‍या अन्नाला पूर्णब्रह्म म्हणायचे का? सुखी जीवन कशाला म्हणायचे? ही परिस्थिती बदलेल का? वाचनाचं महत्त्व लोकाना कधी कळणार? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केलाय.

निकोप समाजनिर्मितीसाठी सामान्य माणसाला नेहमी काही ना काही प्रश्न पडायला हवेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्याने प्रयत्नही करायला हवा! तत्त्व, तळमळ आणि तिडिक या त्रिसुत्रीच्या जोरावर कार्यरत असणार्‍या ‘चपराक’ने वाचकांचे अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडविण्यासाठी सातत्याने राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच विनोद पंचभाई यांनी ‘चपराक’च्या माध्यमातून एका वेगळ्या पातळीवर मानवी मनाचा झालेला गुंता ठामपणे मांडलाय. त्यामुळेच या लेखांचे पुस्तक वाचकांसमोर ‘थोडं मनातलं’ या नावानेच येत आहे.

आपले मन कठोर करणे, मोह टाळणे हे आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे असे सांगणारे पंचभाई म्हणतात, तुमच्या कुटुंबावर तुमचे मनापासून प्रेम असेल तर अनावश्यक मोह टाळा! येणारी संभाव्य संकटे टाळायची असतील तर स्वतः व्यसनापासून दूर रहा आणि इतरांनाही त्यासाठी परावृत्त करा. माणसातील देव कुणालाही दिसत नसल्याची खंत व्यक्त करून ते अपेक्षा व्यक्त करतात की तो कधीतरी म्हणेल, ‘तुझ मे रब दिखता है….!’

विनोद पंचभाई, ‘चपराक’चे लेखक

खरंतर कोणत्याही लेखकाचं लिखाण म्हणजे त्याच्या व्यक्मिमत्त्वाचा आरसा असतो. तो कसा जगतोय हे त्यातून प्रतीत होत असते. पंचभाईंचे हे लेख तर त्यांच्या चिंतनातून प्रकटलेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात कधी त्यांच्यातला सुहृदयी देशभक्त डोकावतो, कधी प्रेमळ पिता दिसतो, कधी एखादा समाजसेवक, तत्त्ववेत्ता आढळतो, प्रबोधनाची मशाल हाती घेऊन अंधार्‍या राती गस्त घालणारा जागल्या दिसतो तर कधी उफाळलेल्या सात्विक संतापातून ‘माणूस खरंच बुद्धिमान प्राणी आहे का?’ असा सवाल करणारा सामान्य माणूसही दिसतो. मात्र या प्रत्येक लेखात त्यांनी आशावादाचे बीज पेरलेय. कसदार धान्याची टपोरी कणसं देण्यासाठी आधी एखाद्या बीयाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं, हे जगरहाटीचं सूत्र त्यांना कधीचच कळून चुकलंय. त्यामुळे ते उद्विग्न न होता सध्याच्या अराजकतेतून मार्ग काढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून आहेत.

‘जीवनमार्गावरून चालताना, नव्या जबाबदार्‍या पेलताना, वाटेवरील काट्यांपासून, पोरा तू सावध रहा!’ असं सांगताना त्यांनी लिहिलंय, ‘‘आज नेते-अभिनेते न होता खर्‍याअर्थाने ‘जेते’ व्हा. कुठल्याही भोंदूबाबाला आदर्श न मानता ज्यांनी तुम्हाला हे जग दाखवले त्या स्वतःच्या आईबाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. जीवनात सच्चा आनंद मिळवण्यासाठी देवानंद न होता विवेकानंद व्हा. सुखरामकडे न बघता रामनामातच सुख शोधा!’’ शिवाय ‘जेते’ व्हा असे सांगतानाच त्यांनी एका लेखात ‘जगज्जेता’ सिकंदर ‘जाताना’ मात्र ‘मोकळ्या’ हातानींच गेला होता, याचीही आठवण करून दिलीय. पंचभाईंची हीच वस्तुनिष्ट भूमिका झापडबंद आयुष्य जगणार्‍या अनेकांना मात्र भानावर आणते.

भगवान गौतम बुद्ध, गुरूगोविंदसिंग, राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत एकनाथ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत मीराबाई, साने गुरूजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम, प्राचार्य शिवाजीराव भोसले, सर अल्बर्ट आईनस्टाईन, श्रावणजी पंचभाई अशा अनेकांची मार्मिक उदाहरणे देत, त्यांची वचने आठवत, कथा सांगत, ओव्या पेरत त्यांनी हे लेख फुलवलेत. त्यामुळे ते वाचताना अजिबात कंटाळवाणे होत नाही. शिवाय प्रत्येक लेखातून निश्‍चितपणे ‘हाती’ काहीतरी लागतेच लागते. ‘सुबहका इंतजार कर, सुबह जरूर आएगी’ असे म्हणत त्यांनी अतिशय गांभिर्याने हा ‘आटापिटा’ केला आहे.

‘बालपण देता का बालपण?’ या लेखातील टिंकूचे मनोगत तर प्रत्येकाला हेलावून सोडणारे आहे. आजोबांनी लहानपणी सांगितलेल्या स्वच्छंदी जगण्याच्या सुरस कथा ऐकून ट्विंकल तसे जगण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला खेळायला ना मैदान मिळते ना आईवडिलांचा पाठिंबा! सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी होत चाललेले असताना अशा अनेक ट्विंकल दुर्दैवाने गावोगावी दिसतात. ‘‘मलाही मनापासून वाटतं, आपण आपल्या आजोबांसारखं मनसोक्त मजेत भटकावं, खेळावं, खूप खूप मजा करावी, दमायला होईपर्यंत मैदानात पळावं. मग दूऽऽर जाऊन सूर्यास्त बघत बसावं. आपल्याला शोधत मग मम्मीनं आपल्याजवळ यावं, लाडानं आपल्याला जवळ घ्यावं, डोळे भरून तिनं माझ्या डोळ्यात बघावं, खरंच राहून राहून इतक्यात मला असं मनापासून वाटतंय!’’ हे टिंकूचे आत्मकथन वाचताना आपसूकच डोळे पानावतात. नव्या पिढीला आपण काय देतोय, याची आत्मजाणीव निर्माण होते. केवळ भाषेचे फुलोरे म्हणून या लेखांचे कौतुक नाही; तर समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम विनोद श्रा. पंचभाई यांनी ताकतीने केले आहे. हे लेख वाचून कित्येकांना नवी दृष्टी मिळेल. हरवलेली दिशा गवसेल! समाजातील विसंगती, दुटप्पीपणा, ढोंग याचा पर्दाफाश करण्यात पंचभाईंची लेखणी बर्‍यापैकी यशस्वी ठरलीय!

‘अन्याय सहन करणारा अन्याय करणार्‍याहून जास्त अपराधी असतो’ हे आपण कायम ऐकतो. मात्र भाईंना हे विधान रूचत नाही. ही म्हण सर्वसामान्यांवर अन्याय करणार्‍यांनीच तर रूढ केली नाही ना? असा बिनतोड सवाल ते उपस्थित करतात. आपल्यावर कुठलाही अन्याय झाला तर आपण त्याविरूद्ध आवाज उठवायचाच, असा बंडखोर विचार ते मांडतात. ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने गरीब, दुर्लक्षित, वंचित, वनवासी यांचे प्रश्‍न त्यांनी ठामपणे मांडले आहेत. ‘ही परिस्थिती बदलेल का?’ या लेखातही त्यांनी हा दुटप्पीपणा खोडून काढलाय. खेळाडू, नेते, अभिनेते अशा लोकांची एक दिवसाची कमाई किमान लाखो रूपये असते तर दुसरीकडे वर्षवर्ष प्रामाणिकपणे काम करूनही अनेकांचे वार्षिक उत्पन्न लाख रूपयांपर्यंत पोहोचत नाही, या विसंगतीकडे ते लक्ष वेधतात. शासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचारांमुळे मदतकार्यात येणारे अडथळे दाखवून देतात. चौफेर फटकेबाजी करणारी आणि विविध विषयांना स्पर्श करणारी त्यांची लेखणी वाचकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रत्येकाला विचार करायला भाग पाडते. एका लेखकाला यापेक्षा आणखी काय हवे?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाईकाकांचे वडील स्व. श्रावणजी पंचभाई हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहवासात होते. त्याकाळात त्यांनी त्यांची जमिन विकून टाकली आणि ग्रामगीतेच्या पंचवीस हजार प्रती छापल्या. लोकांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने त्या मोफत वाटल्या. त्याकाळी युवा समाजसेवक अण्णा हजारे विदर्भ दौर्‍यावर असताना त्यांनी उरलेल्या सर्व प्रती अण्णांना दिल्या आणि सांगितले, ‘‘तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असता, तर ग्रामगीता तळागाळात पोहोचवा. या प्रती मी तुम्हाला देतोय, त्या तुम्ही इतरांना भेट द्या!’’ हाच वारसा घेऊन विनोद पंचभाई हे सुद्धा जनप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. विदर्भ, खान्देश, पश्‍चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्य करूनही त्यांनी आपला वसा सोडला नाही. ग्रामगीतेची शिकवण आचरणात आणतानाच त्यांनी अनेकांच्या जीवनात आनंद फुलवला आहे. हेच त्यांच्या मनाचे मोठे यश आहे. जगण्याचे सार आहे!

‘प्रामाणिकपणा म्हणजे काय रे भाऊ?’ असे उपहासाने विचारतानाच ते इथल्या व्यवस्थेचे बुरखे टरटरा फाडतात. ‘उनकी बेईमानीमे आप पुरी इमानदारी से साथ निभाओ’ अशा परिस्थितीमुळे मनात नकळत ठिणगी पेटायला लागते पण आपल्यासमोरील अनेक मजबुरीमुळे त्याचे भडक्यात रूपांतर होत नाही, इकडे ते जाणीवपूर्वक लक्ष वेधतात. ‘घेण्यादेण्याचे’ व्यवहार करताना खाणार्‍याचे पुन्हा नवे घोटाळे करण्यासाठी केवळ ‘खाते’ बदलले जाते, हे वास्तव त्यांनी मांडले आहे. मात्र असे जरी असले तरी ‘जिसका कोई नही उसका तो खुदा है यारों’ या गाण्याची आठवण करून देण्यासही ते विसरत नाहीत. एक अगतिकता, तगमग यापेक्षाही स्वतःतील चांगुलपण शाबूत ठेवण्यासाठीची त्यांची धडपड या लेखनातून दिसून येते.

‘भरूनि सद्भावाची अंजोळी, मिया ओविली फुले मोकळी’ असे संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले आहे. पंचभाई यांनीही त्यांच्या शब्दफुलांची माळ अशीच ओवली आहे. वैविध्यपूर्ण विषयावरील त्यांची ही विचारशृंखला म्हणजे येथील एका सामान्य माणसाच्या मनातील चांगुलपणाची साक्ष आहे. आपली संस्कृती टिकावी, वृद्धिंगत व्हावी म्हणून धडपडणार्‍यापैकी विनोद पंचभाई एक आहेत. अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषेत सांगायचे झाल्यास अशा लोकांत काही ‘सद्गुण विकृती’ असतात; मात्र त्याला इलाज नसतो! समाजातील प्रत्येक चांगल्या-वाईट घडोमोडींचा स्वतःवर परिणाम करून घेणारे आणि समाजाताला त्यातून बाहेर काढण्यासाठी काय करता यईल, याचा विचार मांडणारे असे लोक हेच इथल्या व्यवस्थेचा पाया आहेत.

पंचभाईंच्या चांगुलपणावरील श्रद्धा अढळ आहेत. त्यांचे वाचन सकस आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अनुभवविश्व समृद्ध आहे. त्यामुळे मोजक्या शब्दात पण आपल्याला जे मांडायचे आहे ते थेटपणे मांडण्याचे कौशल्य त्यांना आत्मसात झाले आहे. फक्त प्रश्न उपस्थित करून ते थांबत नाहीत तर त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा मार्गही ते दाखवतात.

राष्ट्रसंत तुकडोजींचा त्यांच्यावर प्रभाव आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलेच आहे, ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या!’ विनोद पंचभाई हे सुद्धा आहे त्यात समाधान मानणार्‍यांपैकी आहेत. त्यांच्या सुखाच्या कल्पना त्यांनी ठरवल्यात. अतृप्ततेवर स्वार होऊन विखुरण्याऐवजी समाधानाने तृप्ततेची ढेकर देऊन आपल्या आजूबाजूच्या बिघडलेल्या लोकांना घडवण्याचा चंग त्यांनी बांधलाय. त्यासाठी त्यांनी शस्त्र म्हणून लेखणीचा आधार घेतलाय! अनेक प्रश्‍नांच्या मुळांशी जाताना शांततेने, सभ्यतेने मार्ग काढण्याकडे त्यांचा कौल असतो. ‘सत्य हे सौंदर्य आहे, त्या सौंदर्यावर प्रेम करा’ हा महात्मा गांधींचा विचार त्यांचे जीवनतत्त्व आहे. त्यामुळेच नव्या पिढीला समाधानी जीवनाचे चार कानमंत्र त्यांनी या पुस्तकातून दिले आहेत.

माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने बर्‍याचवेळा तो एकटा असूनही अनेकांत असतो. आपण अनेकांत आणि अनेकांसाठी असतो, हे मात्र कित्येकदा त्याला कळत नाही. म्हूणनच त्यांनी ‘एकटा’ या लेखाचा समारोप करताना लिहिले आहे, ‘मै तो अकेलाही चला था, लोग मिलते गए, और कारवॉं बनता गया।’

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा संदर्भ देऊन लिहिलेला ‘एक पत्थर तो तबियत से उछालोंे यारो’ हा लेख तर प्रत्येक तरूण – तरूणींनी वाचायलाच हवा! एकदा वेळ निघून गेली तर त्याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी या लेखातून दिलाय. अशक्य ते शक्य करून दाखवण्याचे अफाट सामर्थ्य आजच्या युवा पिढीत आहे. त्यांना फक्त अचूक व योग्य दिशा ठरवण्याची गरज आहे एवढेच…! असे निरीक्षण त्यांनी मांडले आहे आणि ते रास्तही आहे.

एकंदरीत ‘थोडं मनातलं’च्या निमित्ताने पंचभाई यांनी ‘बरचंस’ मांडलंय! आता त्याचं उत्स्फूर्त स्वागत करण्याची जबाबदारी वाचकांची आहे. पंचभाई यांच्या एकूण विचारधारेचा मागोवा घ्यायचा झाला तर संत रामदास स्वामींच्याच चार ओळी सांगतो आणि पंचभाईंना भविष्यात आणखी उत्तमोत्तम लिखाणासाठी शुभेच्छा देतो.

उपासनेला दृढ चालवावे
भू देव संतांशी सदा नमावे;
सत्कर्म योगे वय घालवावे
सर्वामुखी मंगल बोलवावे!!

घनश्याम पाटील
7057292092

या आणि इतरही दर्जेदार पुस्तकासाठी भेट द्या –
www.chaprak.com

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “प्रस्तावना – ‘थोडं मनातलं’”

  1. Vinod s. Panchbhai

    मनापासून धन्यवाद पाटील सर!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा