आई – एक महान दैवत

आई - एक महान दैवत

द. गो. शिर्के गुरूजींनी लिहिलेल्या आणि ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या वाचकप्रिय पुस्तकातील हे एक प्रकरण. मातृभक्तीचा यथोचित गौरव करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. हे पुस्तक घरपोहच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क – 87679 41850

हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत; ती म्हणजे आई! लहान-लहान, बोबड्या बाळांच्या ओठातून व अं:तकरणातून दिसून येणारा थोर परमेश्वर म्हणजेच ‘आई’. आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राजराजेश्वराच्या ऐश्वर्यालाही लाजवील. हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत. सुखदु:खाच्या फेर्‍यात अडकलेल्या माणसाला धीर देणारी माता आपल्या पोटच्या गोळ्यासाठी चंदनासारखी झिजते.

आईने कितीही मारले तरी पुन्हा मूल तिच्याच कुशीत शिरते; कारण आईच्या रागापाठीमागे वात्सल्याचा सागर उचंबळत असतो हे त्यास माहीत असते. साने गुरुजी म्हणतात-

फुलामध्ये फूल। हुंगावे जाईचे
सुख भोगावे आईचे। बालपणी।
माऊली माऊली। कल्पवृक्षाची साऊली
तान्हेबाळा लागी दिली। देवाजीने

म्हणूनच माधव जुलिअन आईला प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू आई म्हणतात.

आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही. म्हणूनच कवी यशवंत म्हणतात..

आई म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येई कानी। मज होय शोककारी
नोहेची हाक माते। मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची। चित्ती सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी

जगात आई हीच एक देवता आहे की तिच्याबद्दल कोणी नास्तिक नाही. वि. स. खांडेकर म्हणतात, ‘‘आईचे मन किती वेडे असते! तिला वाटते आपल्या बाळाने लवकर लवकर मोठे व्हावे. मोठमोठे पराक्रम करावेत. विजयी वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे! पण त्याचवेळी तिला वाटत असते की आपले बाळ आपल्या सावलीत सदैव सुरक्षित असावे. कळीकाळाला सुद्धा त्याच्या केसाला धक्का लावता येऊ नये.’’

अशा या मातेचे ऋण कधी फिटेल का? छे! विनोबा म्हणतात, न ऋण जन्मदेचे फिटे! आई या दोन अक्षरात श्रुती, स्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. आई म्हणजे माधुर्याचा सागर नि पावित्र्याचे आगर. फुलांची कोमलता, गंगेची पवित्रता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतात, दृष्टीची क्षमाशीलता. पाण्याची रसता जर तुम्हाला पहायची असेल तर आईजवळ क्षणभर बसा. तुम्हाला सारे मिळेल. म्हणून त्या आईची सेवा करा. मातेची सेवा करणार्‍यांना दीर्घायुष्य, यश, स्वर्ग, कीर्ती, पुण्य, बळ, लक्ष्मी, सुख इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. ग.दि. माडगुळकर म्हणतात,

नको नको रे बाळा, करू मातेची हेळणा
नयनांचा केला दिवा, तळहाताचा पाळणा
.

आईची थोरवी वर्णन करताना महात्मा गांधी म्हणतात, ‘एक चांगली आई शंभर शिक्षकांहून श्रेष्ठ असते!’

साने गुरुजी म्हणतात, ‘आई मुलाला जे अंगाई गीत गाते, त्याला पाळण्यात हलविताना, मांडीवर निजविताना, कुशीत थोपटताना ज्या गोड गोड ओव्या म्हणते त्यात सारा सामवेद असतो. मुलासाठी जी औषधे आई जमा करून ठेवते त्यात सारा आयुर्वेद सामावलेला असतो.’

विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होऊन, डोळ्याचा दिवा करून, तळहाताच्या पाळण्यात हिंदोळून काही मातांनी त्यांच्या थोरल्या बहिणीच्या म्हणजेच भारतमातेच्या अस्मितेसाठी जगाला आश्चर्यकारक करणार्‍या नवरत्नांना जन्म दिला. त्या मातांपैकी एका मातेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे जिजाऊ मातेचा. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेबरोबर सार्‍या विश्वातील मातांवर-स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराचे निर्दालन करण्याचा आदर्श निर्माण करणार्‍या छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातेनेच सावरले ना? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे अप्रतिम सौंदर्य पाहून ते उद्गारले, ‘‘तुमच्यासारखी माझी माता सुंदर असती तर मी तुमच्याप्रमाणे सुंदर झालो असतो.’’ धन्य धन्य त्या मातेची.

शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेत सार्‍या विश्वाला भारतमातेला घडविणार्‍या मातांच्या अलौकिक संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणार्‍या विवेकानंदांची एक आठवण. एका युरोपियन युवतीने विवेकानंदासारखा दिव्य पुत्र व्हावा म्हणून विवेकानंदाकडे विवाहाची याचना केली. तेव्हा ते तिला म्हणाले, ‘‘माझ्यासारखा पुत्र आपल्या विवाह कार्यातून निपजणे कोणत्याही शास्त्रानुसार शक्य नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष मलाच तुम्ही पुत्र मानणे किती सोपे आहे. हे माते मी तुला वंदन करीत आहे.’’ त्यावेळी सार्‍या संस्कृतींनी साश्रूनयनांनी भारतमातेला वंदन केले.

मूल कोणाचे हे सिद्ध करण्यासाठी राजदरबारात दोन माता जातात. दोघीही आपापली बाजू मांडतात. तेव्हा मुलाचे दोन समान भाग करून देण्याचे ठरते. त्यावेळी एक माता गप्प असते. दुसरीच्या अंतःकरणात घालमेल चाललेली असते. ती म्हणते, ‘‘माझ्या जिवंत बाळाचा एक निर्जीव तुकडा घेऊन तरी मी काय करू? नको, माझ्या बाळाचे तुकडे करू नका. माझं बाळ कुठेही असू दे पण जिवंत असू दे. माझं बाळ पाहिजे तर तिला देऊन टाका.’’ अशी कारुण्याने ओथंबलेली, वात्सल्याने भारावलेली ती माता स्वहृदयावर दगड ठेवून स्वतःचे मूल दुसरीला देण्याचा निर्णय घेते. त्यावेळी तिच्या प्रेमाचा कस लागतो कारण ती त्या बाळाची जन्मदात्री आई असते.

आईच्या प्रेमाची आणखी एक छोटीशी गोष्ट. एका वेश्येच्या पूर्ण आहारी गेलेला एक तरुण आपल्या जवळील सर्व संपत्ती तिला देतो. त्याच्याकडे आता देण्याकरिता काहीही नाही असे पाहून ती त्याला धिक्कारते; परंतु तो तिची विनवणी करून तिला काय वाटेल ते देण्याचे कबूल करतो. एके दिवशी ती त्याला त्याच्या आईंचे काळीजच मागते. पडत्या फळाची आज्ञा घेऊन या नरराक्षसाने आपल्या आईचा खून केला व आईचे काळीज हातात घेतले. तो उताविळपणे धावत धावत त्या वेश्येकडे निघाला. त्याचे हात रक्ताने माखलेले होते. रस्त्यातच त्याला ठेच लागते व तो खाली पडतो. स्वाभाविकपणे तो विव्हळतो… आई गं! तेव्हा आईचे काळीज कातरलेल्या आवाजात त्याला म्हणते, ‘‘बाई गं! बाळ तुला फार लागलं तर नाही ना?’’

आई! प्रेमाचा अथांग सागर! मुलांच्या जीवनाला आकार देणारी वात्सल्यमूर्ती. कधी रागावणारी… मारणारी… खस्ता खाणारी! पण मुलांच्या भल्यासाठी अखंड झटणारी! आईचे प्रेम, तिने केलेले संस्कार, तिच्या शिकवणुकीचे चार शब्द या सार्‍याचा आपल्या जडणघडणीत किती मोठा वाटा असतो! ही शिदोरीच जीवनाच्या सोबतीला असते. संघर्षाच्या, सुख-दुःखाच्या कसोटीच्या प्रसंगात मोलाची ठरते.

मातृदेवो भव! पितृदेवो भव! ही आपली संस्कृती. माता म्हणजे पावित्र्याचे आगर! ममतेचे माहेरघर!! ईश्वराचे वसतिस्थान. मंगल, उदात्त, उत्कट भावकल्पांचे उगमस्थान. आईला आई म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही. ईश्वराच्या प्रेमाची कल्पना आणून देणारी जर कोणी असेल तर ती म्हणजे माता होय. आईवडिलांची सेवा करणे म्हणजे मोक्ष मिळविणे. ‘न मातु: परम दैवत:’! आईसारखे दुसरे दैवत नाही.

आपल्या अपत्याला घडवणारी माता. सुसंस्कृत, सुविद्य असे कुटुंबशिल्प घडवणे फार अवघड आणि ते काम करते माता. वर्तमानात राहून मुलाच्या भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी लाभते ती फक्त मातेलाच! परमेश्वराच्या खालोखाल दुसरे स्थान आईचे आहे. आपल्या मुलाचे व्यक्तिमत्व समृद्ध व संपन्न करण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो. ती डोळ्याचा दिवा, तळहाताचा पाळणा करून मुलाला वाढवते.

समुद्राचे औदार्य, चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, पृथ्वीची विशालता यांचा सुरेख संगम म्हणजे आई. लहान मूल पेपरमिंटच्या गोळ्या मागते. आई कामात असेल तर रागावते. मेल्या म्हणते, कार्ट्या म्हणते पण स्टुलावर चढून शेवटी त्या गोळ्या काढून देतेच. म्हणून तर तिला आई म्हणतात. आईच्या प्रेमापुढे त्रिभुवनातील संपत्ती कवडीमोल असते. तिच्या हृदयात जगातील सारी वत्सलता साठवलेली असते. आईचे प्रेम नास्तिकानांही आस्तिक बनवते. आई म्हणजे अनन्यप्रेम. त्या प्रेमात स्वार्थाचा लवलेश नसतो. सात्त्विक, साजूक, स्नेहाचे आगर म्हणजेच माता.

साने गुरूजी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, ‘‘अशी माझी आई होती. तिनेच मला घडविले. माझ्या हृदयात उदात्त विचार रुजविले. सार्‍या मानवजातीविषयीच्या प्रेमाचे, करूणेचे, कधीही न आटणारे निर्झर निर्माण केले तिने माझ्या अंत:करणात. आज मी जो आहे तो तिने मला जसा घडविले तसा.’’

आई, थोर तुझे उपकार या उक्तीप्रमाणेच खरोखर आईचे आपल्या मुलावर फार उपकार असतात. आपण आईच्या कुशीत जन्मतो, वाढतो. आई आपल्यावर चांगले संस्कार करून, शिकवून लहानाचे मोठे करते. मुलाचे अनेक अपराध आई आपल्या पोटात घालते व परत मायेचा हात मुलाच्या पाठीवरून फिरविते. अशा जन्मदात्या आईला कोण बरे विसरेल?

मातेचा महिमा मी किती सांगू? किती गाऊ? प्रत्यक्ष परमेश्वराला तो नीट गाता येणार नाही. मातेचे जीवन सारे मुलांसाठी. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही, बसणार नाही. तिला कोठेही काही मिळो, स्वत:च्या मुलांसाठी ती घेऊन येईल. मुलांचे काही दुखले खुपले की ती लगेच कावरीबावरी होते. तिला मग अन्न गोड लागत नाही. ती दिवसरात्र सेवाचाकरी करते.

आईची माया आकाशाएवढी अमर्याद असते. तिच्या शब्दाशब्दात अमृताचा गोडवा असतो. सासरी जाताना आई आपल्या मुलीला कितीतरी मोलाच्या गोष्टी सांगत असते. आईची शिकवण ती आचरणात आणते. तिला सर्वजण नावाजतात. सासरी वावरताना मागे कौतुक वाट्याला येते. संसारात सारे दिवस सारखे नसतात. कधी सुखाच्या वर्षावाने भिजुन चिंब व्हावं, तर कधी लहानमोठ्या दुःखाशी झगडताना धीर सुटावा, दुखण्याखुपण्याच्या तडाख्यात सापडलं की आधी आईची आठवण येऊ लागते. साहजिकच आईचा आसरा घ्यावा लागतो. मुलगी सासरी गेली की तिला वेळोवेळी आईची आठवण येते. सणासुदीला तिचे डोळे माहेरच्या वाटेने वळतात.

आईच्या प्रेमाच्या कितीतरी गोड गोड गोष्टी ‘श्यामची आई’ मध्ये आहेत. लहानपणी एकदा गुरुजींना त्यांच्या आईने अंघोळ घातली. आपल्या लुगड्यानेच त्यांचे अंग पुसले. आई त्यांना म्हणाली, ‘‘जा, देवाची फुले काढ.’’ गुरुजी म्हणाले, ‘‘माझे तळवे ओले आहेत. त्यांना माती लागेल. तुझे ओचे खाली पसर, त्यावर मी माझे पाय पुसतो.’’ गुरुजी लहानपणी खूप हट्टी होते म्हणून आई अधिक बोलण्याच्या भरीस पडली नाही. तिने आपले ओचे खाली पसरले. गुरुजींनी त्यावर आपले पाय पुसले. गुरुजींच्या पायाला माती लागू नये, त्यांची हौस पुरवावी, म्हणून आईने आपले लुगडे ओले करून घेतले. आई आपल्या मुलासाठी काय करणार नाही? गुरुजी देवघरात गेले. तेव्हा आई म्हणाली, ‘‘बाळ, पायाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून.’’ आईच्या प्रेमाची इतकी कोमल कथा कोणत्या वाङमयात वाचायला मिळेल का?

एकदा एका झाडावरून पक्ष्याचे लहानसे पिलू खाली पडले आणि अर्धमेले झाले. गुरुजींनी त्याला जगवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. काही वेळाने ते मरून पडले. शेवंतीच्या आणि मोगर्‍याच्या वाफ्यामध्ये गुरुजींनी त्याला रडत रडत पुरले. मांजराने उकरू नये म्हणून त्यावर एक दगड ठेवला. नंतर घरात जाऊन ते एका कोपर्‍यात बसले. आईने विचारले, ‘‘का रे? बाजूला का बसलास?’’ गुरुजी म्हणाले, ‘‘मला त्या पाखराचे सुतक आहे.’’ आई हसून म्हणाली, ‘‘हातपाय धुतले म्हणजे झाले. सुतक धरण्याची जरुरी नाही. तू त्याला प्रेम दिलेस. चांगले केलेस. देवही आता तुझ्यावर प्रेम करेल. देवाच्या लेकरास कीडा, मुंगी, पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा तुम्हाला परत करतो. तू या पाखरावर प्रेम केलेस तसे आपल्या भावंडांवर प्रेम कर. तुमची एकच बहीण आहे. तिला अंतर देऊ नकोस.’’ ही गोष्ट ऐकून कोणाचे अंत:करण सद्गदित होणार नाही!

बालकाच्या कोमल मनाची जाण ठेवूनच आई त्यावर संस्कार घडवते. तुकाराम महाराज म्हणतात…

बालकाचे चाली। माता जाणुनी पाऊल घाली॥

आईच्या थोर संस्कारातून आपण घडत असतो. घराघरातून आईच्या रूपाने परमेश्वर आपले अस्तित्व दाखवत असतो. मुलाला कर्तृत्ववान बनविणारी माता साक्षात देवरूप असते.

आईला स्वतःच्या देहाच्या सेवेमध्ये धन्यता वाटत नाही. ती मुलांच्या शुश्रूषेत वाटते. माता मुलांसाठी सर्व दिवस अविश्रांत कष्ट करीत असते. मुले तिचे उपकार मानीत नाहीत. उलट तिच्यावर रागावतात. आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही.’ आई हे दैवताचे दैवत आहे. म्हणून तिला वंदन करून मी म्हणतो,

आई माझा गुरु, आई कल्पतरू
सौख्याचा सागरू, आई माझी
प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार
अमृताची धार, आई माझी

आपल्या जीवनात संस्काराला अतिशय महत्त्व आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते आणि हा शिल्पकार म्हणजे आईच. एका छत्रपतीच्या अतुलनीय यशामागे जिजामातेची तपश्चर्या होती.

मायेच्या वर्षावात न्हाऊ घालणारी ती आई आहे. प्रसंगी कठोरपणे समज देणारी शिक्षिका आहे. दुखलं खुपलं तर काळजी घेणारी परिचारिका आहे. अतिथी देवो भव! म्हणून आल्या गेल्याचं हसतमुखाने स्वागत करणारी यजमानीण आहे. घरातल्या कर्त्या पुरुषाला अडचणीच्या प्रसंगी मदत करणारी सचिव आहे आणि त्याच्या यशापयशात सहभागी होणारी सहचारिणी आहे.

मातेचे अंत:करण किती विशाल असते याविषयी महाभारतातील एक प्रसंग आहे. कौरव-पांडवामधील युद्ध अखेरच्या टप्प्यात आले होते. कौरवामधील युद्धनिपुण सेनापतींसह असंख्य पराक्रमी वीर युद्धात कामी आले. कौरवांचे आव्हान संपल्यासारखेच होते. संख्येने कमी असूनही अखेर सत्पक्षाचा विजय झाला. या आनंदात पांडव सेना मश्गुल होती पण त्यांच्या लक्षात आलं नाही की कौरव पक्षातील एक वीर अश्वत्थामा अजून जिवंत आहे आणि त्याच्या मनातील पांडवांचा सूड घेण्याची आकांक्षा अतृप्त राहिलेली आहे.

महाभारतातील सूडाचा प्रवास अजून संपलेला नव्हता. युद्धामध्ये समोरासमोर पांडवांबरोबर उतरल्यास विजय मिळणार नाही हे अश्वत्थामाला पूर्णपणे माहीत होते. युद्धाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याने मध्यरात्री हातात नंगी तलवार घेऊन पांडवांच्या राहुटीत प्रवेश केला. द्रौपदी आणि तिचे पुत्र गाढ झोपेत होते. काहीही कारण नसताना या निष्पाप बालकांची त्याने झोपेत असताना भ्याडपणे हत्या केली.

सकाळी उठल्यावर द्रौपदीला तिचे पाचही पुत्र गतप्राण झालेले पहायला मिळाले. पुत्रविरहाने ती अक्षरश: वेडी झाली. तिला अन्न गोड लागेना. मन बेचैन झाल्यामुळे निद्रासुखाला ती पारखी झाली. स्वतःच्या मुलांशिवाय तिच्या मनात दुसरा कोणताही विचार येईनासा झाला. मनात एक शल्य होते. एकापेक्षा एक पाच पराक्रमी पती असताना ते मुलांना वाचवू शकले नाहीत. ती सहजपणे बोलून गेली. ‘‘या विश्वासघाताचा बदला घ्यायलाच हवा.’’

भीम आणि अर्जुन यांना हे शब्द आव्हानात्मक वाटले. त्या दोघांनी अश्वत्थामाला पकडून द्रौपदीच्या समोर हजर केले. तिला संतोष झाला. अश्वत्थाम्याचा सूड घेण्यासाठी भीम आणि अर्जुन यांचे हात शिवशिवत होते. त्यांनी तिला विचारले, ‘‘तू सांगशील ती शिक्षा या अश्वथाम्याला करायला आम्ही तयार आहोत. तू नुसती आज्ञा कर.’’

अश्वत्थामा भीतीने थरथर कापत होता. आपण वाचत नाही हे त्याला कळून चुकले होते. द्रौपदीने त्याच्याकडे एकवार करुण नजरेने पाहिले आणि ती म्हणाली, ‘‘तुम्ही याला पकडून माझ्यासमोर आणलंत एवढं समाधान पुरेसं आहे पण याला मारण्याचा विचार जर तुमच्या मनात असेल तर तो मात्र काढून टाका.’’

भीम आणि अर्जुन यांना आश्चर्य वाटले पण द्रौपदी म्हणाली, ‘‘हे पहा, पुत्रविरहाच्या काय यातना असतात हे दोन दिवस मी पूर्णपणे अनुभवलेले आहे. याला जर ठार मारले तर त्याच्या मातेला, कृपिला अशाच यातना भोगाव्या लागतील. माझ्यासारखी आणखी एक माता दु:खी होऊ नये म्हणून तुम्ही याला सोडून द्या.’’ द्रौपदीच्या एका निराळ्याच पैलूचे त्यांना दर्शन घडले. असे असते मातेचे अंत:करण!

आईची थोरवी वर्णन करणारी दुसरी एक कथा आपण पाहू. पौर्णिमेच्या सायंकाळी रायगडाखालच्या वाडीतली एक गवळण दूध घेऊन गडावर आली. शिवाजीराजानं सजवलेला तो गड ती पाहत राहिली. आपलं बाळ खाली वाट पाहतंय हे ती क्षणभर विसरली. गडावर सायंकाळची तोफ कडाडली. ‘कर्र…….’ आवाज करत गडाचे दरवाजे बंद झाले. तोफेच्या आवाजाने गवळण भानावर आली. तिला आपल्या बाळाची आठवण झाली पण दरवाजे बंद झालेले. पहारेकरी दरवाजे उघडायला तयार होईनात. आता काय करायचं? चालत ती वाडीकडील कड्याच्या टोकावर आली. तिथं खडकात तासलेला एक बुरुज होता. त्याच्या कडेनं चालत ती टोकावर आली. हळूहळू ती उतरू लागली. कधी गवताचा झुबका तर कधी खडकातली खोबण पकडत ती हळूहळू उतरू लागली. आपल्या तान्ह्या बाळाच्या मायेच्या ओढीनं तो अवघड कडा पार करून ती खाली आली. धावत धावत त्या बाळाला तिने कवेत घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ते म्हणाले, ‘‘मोरोपंत, भिंत घालून ती वाट बंद करा. तो बुरुज परत खोदा. त्याला नाव द्या हिरकणी.’’ रायगडावर आजही तो बुरुज उभा आहे.

तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘जगातील, इतर माणसे प्रेम करतील, वात्सल्य दाखवतील, जवळ करतील पण त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. दुसर्‍याचे हीत होण्यात त्यांची भूमिका स्वतःच्या हिताय बांधलेली असते पण आईची भूमिका तशी नसते.

लेकुराचे हीत। वाहे माऊलीचे चित्त
ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीती॥

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘‘ज्याला काही कळत नाही. अशा तान्ह्या बाळाला आई अंघोळ घालते, त्याला जरीचे अंगडे, टोपडे घालते, त्याच्या हातात मनगट्या घालते, गळ्यात माळ घालते, कमरेला साखळी बांधते आणि त्याला दृष्ट लागू नये म्हणून आपणच काळी तीट लावते. आपल्या अंगावर मौल्यवान दागिने आहेत, चांगले कपडे आहेत हे देखील त्याला माहीत नसते. आपल्या मुलाला नटविणे आणि तो कसा नटला हे पाहण्याची दृष्टी एकट्या आईलाच असते. त्याला नटवून तो नटल्याचा आनंद सोहळा तीच मोठ्या वात्सल्याने अनुभवत असते.

आयुष्याच्या पाटीवर गिरवलेले मौल्यवान शब्दलेणे म्हणजे आई. या लेण्याची नक्षी मुलाच्या तन-मनावर कोरणारी देवता म्हणजे आई. आई ही आपल्या सगळ्या आशाआकांक्षा आपल्या मुलात न्याहाळीत असते. तसेच आई व मुलगी यांच्यात कमालीचा सुसंवाद असला पाहिजे; कारण या दोघीत अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे नाते असते. ती सासरी सुखात नांदावी म्हणून सासरी आवडीची झालेली आपली कन्या पाहून आईचे हृदय भरून येते. मुलीला केवळ सासरी पाठवून तिला समाधान नसते. ती आयुष्यभर सुखात नांदतेय याकडेही तिचे लक्ष असते. जशी घार कोठेही असली तरी तिचे लक्ष पिलापाशी असते तसे आईचे लक्ष मुलीच्या सुखात गुंतलेले असते.

पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईवडिलांवर अवलंबून असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असताना पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. आई देह देते व मनही देते. जन्माला घालणारी तीच व ज्ञान देणारी तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात.

‘चपराक प्रकाशन’च्या या आणि इतरही सर्वोत्तम पुस्तकासाठी भेट द्या – www.chaprak.com

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “आई – एक महान दैवत”

  1. Vinod s. Panchbhai

    खूपच मर्मस्पर्शी लेखन!😊

  2. Bhakti

    अतिशय सुंदर 👌👌👌

  3. Vedika dnyaneshwar Mundhe

    खूप छान लेख आहे 👌👌🙏👍

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा