संतसाहित्य आणि युवाविश्व 

संतसाहित्य आणि युवाविश्व 

मासिक ‘साहित्य चपराक’ डिसेंबर 2019

संतसाहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असेच चित्र तरुण पिढीच्या मनात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या सर्व नव्या संकल्पना संतसाहित्यात सापडतात. इमोशनल इंटलिजन्सपासून ते इकोफ्रेंडली घरापर्यंत, सकारात्मक दृष्टिकोनापासून ते करिअर निवडीपर्यंत, जलसंधारणापासून ते व्यवस्थापनापर्यंत मानवी जीवनाला उपयुक्त ठरणार्‍या सर्व गोष्टी संतसाहित्यात आहेत. गरज आहे ती संतसाहित्य तरुण वयातच वाचण्याची.

अनेकांच्या बोलण्याचा रोख असा असतो की, संतसाहित्य हे वैराग्याचे आणि परमार्थाचे समर्थन करणारे साहित्य आहे. रसरशीतपणे जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी असतात. निवृत्तीच्या वाटेने जायला सांगणार्‍या संतसाहित्याकडे आम्ही का आकर्षित व्हावे? आम्हाला जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. आम्हाला हातात जपमाळ घ्यायची नाही. गळ्यात तुळशीची लाकडे घालायची नाहीत. भगवी वस्त्रे परिधान करण्यातही आम्हाला स्वारस्य नाही. आम्हाला लोकांतातून उठून एकांतातही जायचे नाही. जीवनातल्या सर्व गोष्टींचा आम्हाला पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. संतसाहित्य वाचायचेच असेल, तर ते आम्ही म्हातारपणी वाचू.

संतसाहित्यात तरुणांना आकर्षण वाटावे असे काय आहे? या साहित्यात शृंगाररस आहे, वीररस आहे, हास्यरस आहे, करुणरस आहे. भक्ती आणि शांत रसाचा सुंदर आविष्कार आहे. कल्पनेच्या उत्तुंग भरार्‍या आहेत. प्रेम, विरह आणि व्याकूळ मनाचे दुःखही आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात,
आतां अभिनव वाग्विलासिनी ।
जे चातुर्यार्थ कलाकामिनी ।
ते शारदा विश्‍वमोहिनी ।
नमस्कारिली मियां ॥

ज्ञानेश्‍वरांची शब्दकळा किती सुंदर आहे. शारदेचे वर्णन करताना अभिनव वाग्विलासिनी, चातुर्य कलाकामिनी, शारदा विश्‍वमोहिनी अशी शब्दांची योजना ते करतात. ज्ञानेश्‍वरीत ते एक सुंदर दाखला देतात.

कीं प्रथमवयसाकाली ।
लावण्याची नव्हाळी ।
प्रकटे जैसी आगळी ।
अंगना अंगी ।
ना तरी उद्यानीं माधवी घडे ।
तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडें ।
जियापरी ॥

तारुण्याच्या स्पर्शाने अंगनेच्या अंगोपांगात लावण्याचा उत्सव सुरु होतो. वसंताच्या स्पर्शाने वनश्री अधिक सुशोभित होते. कलाकाराच्या स्पर्शाने सोन्याला सुवर्णपद प्राप्त होते. त्याप्रमाणे व्यासांच्या प्रतिभास्पर्शाने तत्त्वज्ञानाला अलौकिक सुगंध प्राप्त झाला आहे. सोळा वर्षांच्या माउलीने तारुण्यातले सौंदर्य किती अप्रतिम शब्दांत मांडले आहे. सर्वच संतांनी सौंदर्याचे उद्गान केले आहे. ते समजण्यासाठी उच्च संवेदनशील अभिरुची हवी. हिंसाचाराच्या आणि कामाचाराच्या भडक कथा वाचणार्‍या उथळ मनोवृत्तीला संतसाहित्यातील कोमलता, सौंदर्य समजणार नाही. आपल्याकडे ज्ञानेश्‍वरी, दासबोध किंवा गाथा एकसष्टी किंवा पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात भेट म्हणून दिली जाते, यासारखा दुसरा विनोद नाही. ज्या वेळी डोळ्यांना दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, हाताने एखादी गोष्ट उचलत नाही, पायाने चालवत नाही, वाचलेले स्मरणात राहत नाही अशावेळी संतसाहित्य वाचून काय उपयोग होणार? संतांनी जे ऐन तारुण्यात लिहिले ते म्हातारपणी वाचायचे का? म्हूणन तरुण वयातच संतसाहित्याचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे.

कां आपुला ठावो न सांडितां।
आलिंगिजे चंद्रु प्रकटतां।
हा अनुरागु भोगितां।
कुमुदिनी जाणे ॥

चंद्रविकासी कमलिनी चंद्राचा उदय झाल्याबरोबर त्याला आपल्या जागेवरुन प्रेमालिंगन देते, तसा संतसाहित्याचा आस्वाद रसिकांना घेता आला पाहिजे. संतसाहित्यात जीवनाची आकांक्षा आहे. त्यातला परमार्थ, अध्यात्म या बाबी सोडून द्या; पण भाषेचे सौंदर्य, कल्पनेचे वैभव आणि विचारांची उदात्तता यांचा मोह तरुण वयातच पडला पाहिजे. तारुण्य म्हणजे केवळ भावनांचा जल्लोष नव्हे किंवा वासनांची वावटळ नव्हे. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होण्याचा हा काळ. साहस, प्रेम, मोह, महत्त्वाकांक्षा आणि उत्कट भावना हे तारुण्याचे विषय आहेत, त्यामुळे या वयात जर संतांची कविता वाचली, तर एखाद्या निष्ठावंत प्रेयसीप्रमाणे ती जन्मभर तरुणांच्या मनाभोवती पिंगा घालत राहील. आजच्या तरुण पिढीसमोर जी आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी संतसाहित्यातील विचार निश्‍चितच मार्गदर्शक ठरतील.

संतांचा आरोग्यविचार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन
मनुष्याला लाभलेले जीवन आनंदाने, सुखाने जगायचे असेल, तर मुळात शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. ज्याच्या अंगात बळ नाही, सामर्थ्य नाही अशा माणसांनी संकटप्रसंगी देवाचा धावा केला, तरी त्यांच्या मदतीला परमेश्‍वर धावून येणार नाही, असे संत बजावतात.

कोण पुसे अशक्ताला।
रोगीस बराडी दिसे।
असे समर्थ रामदास सांगतात.
दुर्लभ नरदेह जाणा।
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा॥
असा संदेश देणारे तुकोबा म्हणतात,
शरीर उत्तम चांगले।
शरीर सुखाचे घोसुले।
शरीर साध्य होय केले।
शरीर साधले परब्रह्म॥

अनारोग्याचे मूळ बदलत्या जीवनशैलीत आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीत माणसाचे स्वतःकडे लक्ष नाही. अपॉइंटमेंट डायरीमध्ये सर्व गोष्टींसाठी वेळ आहे; पण स्वतःसाठी नाही. सारे काही स्वतःसाठी करायचे; पण स्वतःसाठी वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. अर्ध्या तासाची योगासने, दहा मिनिटांचे शवासन आणि पंचेचाळीस मिनिटे चालण्याचा व्यायाम जीवनाला नवसंजीवनी देऊ शकतो; पण तेवढे करण्यासाठीही तरुण पिढीकडे वेळ नाही.

जीवनशैली कशी असावी, या संदर्भात तुकोबा सांगतात,
युक्त आहारविहार।
नेम इंद्रियासी सार।
नसावी बासर।
निद्रा बहुभाषण।

समर्थ रामदास बलाची उपासना करण्याचा आग्रह धरतात.
धकाधकीचा मामला।
कैसा घडे अशक्ताला।
नाना बुद्धी शक्ताला।
म्हणोनि सिकवाव्या॥
शक्तीने पावती सुखे।
शक्ती नसता विटंबना
शक्तीने नसता विटंबना।
शक्तीने नेटका प्राणी।
वैभव भोगिता दिसे॥

आजच्या स्पर्धेच्या युगात अस्तित्वासाठीचा संघर्ष तीव्र झालेला आहे. धावपळ हेच जीवन झाले आहे. यातही तणावमुक्तीसाठी एकांताला जवळ करण्याचा आग्रह समर्थ धरतात आणि सांगतात.

काही गलबला कांही निवळ।
ऐसा कंठीत जावा काळ॥

जागतिकीकरणानंतर मध्यवर्गीयांची आर्थिक ऐपत वाढली, साजरीकरणाचे संदर्भ बदलले. आनंद झाला तरी तो साजरा करायचा. दुःख झाले तरी ते साजरे करायचे. त्यातून तरुण पिढीत व्यसनाधीनता वाढीला लागली. व्यसनाधीन समाज हा कधीही उत्कर्षाच्या वाटेने जाऊ शकत नाही म्हणून संतांनी व्यसनमुक्त समाजाचे स्वप्न पाहिले. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा आग्रह संत धरतात. तुकोबा सांगतात,

परस्त्री मद्यपान।
पेंडखाण माजविले।
तुको म्हणे निर्भर चित्ती।
अधोगती जावया॥
समर्थ बजावतात
अतिवाद करु नये।
उन्मत्त द्रव्य सेवू नये।
बहुचकांसी करु नये।
मैत्री करा॥

संतसाहित्य आणि सकारात्मक दृष्टिकोन
दिवसेंदिवस आत्महत्या करणार्‍या सर्व वयोगटांतील लोकांची संख्या वाढते आहे. नकारात्मक मानसिकता वाढते आहे, जीवनाचा प्याला भरलेला आहे की रिकामा, याचा विचार करण्यापेक्षा त्या जीवनप्याल्यातला प्रत्येक थेंब उत्कटतेने शोषून घेतला पाहिजे. सर्व प्रकारच्या अनुभवांना धीराने आणि आनंदाने सामोरे गेले पाहिजे, अशी संतांची भूमिका आहे. दुःखांना सजवू नका, असा संतांचा आग्रह आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उण्या-पुर्‍या त्रेचाळीस वर्षांच्या आयुष्यात किती तरी संकटे आली. दुष्काळ पडला. व्यापार बुडाला. पत्नी आणि मुलाचा करुण अंत झाला, तेव्हा त्यांनाही निराश वाटून गेले. आपले मनोगत खिन्नपणे व्यक्त करताना तुकोबा म्हणतात,

लज्जा वाटे जीवा।
त्रासलो या दुःखे।
व्यवसाय देख तुटी येत॥

पण तेच तुकोबा दुःखांवर आणि संकटांवर स्वार होत म्हणतात,
बरे जाले देवा निघाले दिवाळे।
बरी या दुष्काळे पीडा केली॥
अनुतापे तुझे राहिले चिंतन।
जाला हा वमन सवंसार॥

जीवनात ज्या ज्या वेळी कसोटीचे प्रसंग येतात, त्या त्या वेळी माणसांना कर्तव्यकठोर होऊन कर्मसिद्धांताचे आचरण करावे लागते, अशीच माणसे श्रेष्ठत्वाला पोचतात. तुकोबा सुंदर दाखला देतात,

मढे झाकुनिया करिती पेरणी।
कुणबियाची वाणी लवलाहे॥
तयापरी करा स्वहित आपले।
जयासी फावले नरदेह॥

पाऊस पडल्यावर वाफसा होतो आणि याच काळात पेरणीसाठी पाभर धरावी लागते. या काळात शेतकर्‍याच्या घरात मयत झाली, तर काय करायचे? महाराज सांगतात, की मढे झाकून ठेवा आणि आधी पेरणी करा. मढ्यावर नंतर अंत्यसंस्कार करता येतील; पण पेरणीची वेळ निघून गेली, तर तुमच्यावरच मरणाची वेळ येईल. जीवनातील सकारात्मकता तसूभरही ढळू द्यायची नाही, हे संतसाहित्याचे ब्रीद आहे.

संत ज्ञानेश्‍वरांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात अपमान, अवहेलना, विटंबना सोसली; पण त्याचा पुसटसा उल्लेखही साहित्यात कुठेही नाही. जो जे वांछिल । तो ते लाहो । प्राणिजात ॥ अशीच त्यांची उदात्त भावना आहे.

संतसाहित्य हे आशावादाचे सरोवर आहे. ते सतत बजावत राहते. इतके निराश होण्याचे कारण नाही.

आजच्या बदलत्या जीवनशैलीत सुंदर दिसणे, उंची कपडे, महागडे दागदागिने, सुगंधी द्रव्ये हा आपल्या कौतुकाचा विषय असतो; पण आपली बुध्दी ज्याच्या आदेशाचे पालन करते, त्या मनाकडे, त्याच्या सौंदर्याकडे, सुदृढतेकडे आपण किती गांभीर्याने पाहतो?

प्रकाश आणि अंधाराची शिवाशीव मनाच्या आकाशात अखंड सुरु असते. त्याचे परिणाम आपल्या बुद्धी आणि कर्मेन्द्रियांवर होत असतात. त्यानुसार माणसाचे वर्तन घडत असते. निरोगी माणसांच्या मनात विचारांची दिवेलागण अखंड सुरु असते, त्यामुळे त्यांच्या मनात निराशेचे मळभ दाटून येत नाही. आले तरी त्यातून प्रकाशवाटा शोधण्याची मनोवृत्ती तयार होत जाते. मन हा अक्षय प्रेरणास्त्रोत आहे. तो अखंड प्रज्वलित राहावा यासाठी त्यावर आलेले अविचारांचे, निराशेचे आणि अगतिकतेचे सावट दूर करायला हवे म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,

मन करा रे प्रसन्न।
सर्व सिद्धीचे कारण।
नाही नाही आन दैवत।
तुका म्हणे दुसरे॥

‘इमोशनल इंटलिजन्स’ या संकल्पनेचा उगमही संतसाहित्यातच सापडतो.

समर्थांची पावनभिक्षा, तुकारामांची सुभाषिते आणि सॉफ्टस्किल्स

प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणत, ‘‘चिमणीची पिले चाळीस दिवसांत आकाशात भरार्‍या घेतात, तर माणसे चाळीस वर्षांची झाली तरी उत्कर्ष करु शकत नाहीत. कारण चिमणीच्या पिलांना पंख आतून फुटलेले असतात आणि विद्यार्थ्यांना पदव्या बाहेरुन लावलेल्या असतात म्हणून आतून ज्ञानाचे पंख देणारे शिक्षण ही काळाची गरज आहे.’’ आजच्या विद्यार्थ्यांकडे पदव्या आहेत; पण स्वतःचे पोट भरण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी कौशल्ये नाहीत म्हणूनच ते निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.

घोडे काय थोडे। वागविती ओझे।
भावेविण तैसे। पांठांतर॥

अशा शब्दांत तुकोबांनी पोपटांची शिक्षणाचा धिक्कार केला आहे.

आज विद्यार्थ्यांनी पदव्यांबरोबरच सॉफ्टस्किल्स आत्मसात केली पाहिजेत, असा आग्रह तज्ज्ञमंडळी करतात. आधुनिक युगातली ही जीवनोपयोगी कौशल्ये संतसाहित्यात सापडतात. स्पर्धेच्या युगात टिकून राहणारा माणूस बुद्धिमान असण्यापेक्षा त्याचे व्यक्तिमत्व बहुआयामी असणे जास्त महत्त्वाचे असते. त्यासाठी समर्थांनी सांगितलेली पावनभिक्षा उपयुक्त ठरणार आहे.

कोमलवाचा दे रे राम।
विमलकरणी दे रे राम।
धूर्त कळा मज दे रे राम।
प्रसंगओळख दे रे राम ।
अंतरपारखी दे रे राम।
बहुजन मैत्री दे रे राम।
विद्यावैभव दे रे राम।
शब्द मनोहर दे रे राम।
सावधपण मज दे रे राम।
बहुत पाठांतर दे रे राम।
सज्जनसंगति दे रे राम।
अलिप्तपण मज दे रे राम।
तुका म्हणे जागा हिता।

असे बजावणार्‍या तुकोबारायांची या संदर्भातील सुभाषितेही महत्त्वाची आहेत.
नसावे ओशाळ।
मग मानिती सकळ॥
चणे खावे लोखंडाचे।
मग ब्रह्मपदी नाचे॥
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे।
येरा गबाळ्याचे काय काम॥
तुज आहे तुजपाशी।
परि तू जागा चुकलासी॥
तुका म्हणे तेथे। पाहिजे जातीचे।
येर्‍या गबाळाचे। काम नोहे॥
कोणी निंदा, कोणी वंदा।
आमुचा, स्वहिताचा धंदा ॥
बोल बोलता वाटे सोपे।
करणी करता टीर कापे॥

आजची शिक्षण क्षेत्रातली एकूणच परिस्थिती विद्यार्थी आणि पालकांची सत्त्वपरीक्षा पाहणारी आहे. आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता आपल्या मुलांनी करावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते; पण आपल्या मुलाचा स्वभाव काय आहे? याचा कल कुठे आहे? याबाबत मात्र कोणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. करिअरबाबत मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ सांगत असतात की, मुलांची आवड जाणून घ्या. मुलांना नेहमी सांगितले जाते की, तू अमक्यासारखा हो, तमक्यासारखा होण्याचा प्रयत्न कर; पण तुझ्या रंगाने, गंधाने आणि अंगभूत गुणाने बहरलेले तुझे व्यक्तिमत्व आम्हाला हवे आहे, असा आग्रह मात्र धरला जात नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तुका म्हणे झरा। मूळचाचि आहे खरा॥ या वचनावर श्रध्दा ठेवून वाटचाल केली, तरी प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व बहरुन येईल. करिअर निवडीबाबतचे इतके सुंदर मार्गदर्शन संतांशिवाय कुणीही केलेले नाही.

संतांचा व्यवस्थापन विचार
संतांनी जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे याचे सुरेख मार्गदर्शन केलेले आहे. समाज व्यवहारात समोरचा माणूस कसा आहे, हे पाहून आपल्याला त्याच्याशी वागण्याची रीत ठरवावी लागते म्हणून समर्थ सांगतात,

धटासी आणावा धट।
उद्धटासी पाहिजे उद्धट।
खटनटासि खटनट। अगत्ये करी॥
हुंब्यास हुंबा लाऊन द्यावा।
टोणप्यास टोणपा आणावा।
लौंदास पुढे उभा करावा।
दुसरा लौंद॥
दुर्जन प्राणी ओळखावे।
परि ते प्रकट न करावे।
सज्जना परिस आळवावे।
महत्त्व देउनि॥
करणे असेल अपाये।
तरी बोलून दाखवू नये।
परस्परेचि प्रत्यये।
प्रचितीस आणावा॥

कोणत्याही कामासाठी माणसाची निवड करताना त्या माणसांचा वकूब पाहून, योग्यता पाहूनच केली पाहिजे, असा आग्रह समर्थ धरतात आणि सांगतात,

अधिकार पाहून कार्य सांगणे।
साक्षेप पाहून विश्‍वास ठेवणे।
आपला मगज राखणे।
काही तरी॥

गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी अचूक प्रयत्न केला पाहिजे, याची जाणीव करुन देताना ते सांगतात,

अचूक यत्न करवेना।
म्हणोनि केले ते सजेना।
आपला अवगुण जाणवेना।
काही केल्या॥

आजचे युग जाहिरातीचे आहे. या युगात जाहिरात करताना समाजाची मानसिकता लक्षात घेणे खूप जरुरीचे असते. ज्यांना राजकारण, समाजकारण आणि उद्योगक्षेत्रात कार्यरत राहायचे आहे. त्यांनी लोकमानस जाणून घेतले पाहिजे, तरच यश मिळेल म्हणून समर्थ सांगतात,

मुलाच्या चालीने चालावे।
मुलाचे मनोगते बोलावे।
तैसेच जनास सिकवावे। हळूहळू॥

आजचे युग हे ज्ञानाचे युग आहे, याची जाणीव समाजातील जाणती माणसे करुन देत आहेत.

घालून अकलेचा पवाड।
व्हावे ब्रह्मांडाहून जाड॥

हे समर्थांनी दासबोधातच सांगून ठेवले आहे.

संतांची विज्ञाननिष्ठा
शास्त्रज्ञांचे एक वैशिष्ट्य असते ते प्रयोग करतात आणि हाती आलेल्या निष्कर्षाच्या आधारेच आपली मते मांडतात. संतांचीही भूमिका तीच आहे. तुकोबा म्हणतात,

नका दंतकथा येथे सांगो कोणी।
कोरडे ते मानी बोल कोण॥
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार।
न चलती चार आम्हापुढे॥

तर
प्रत्ययाचे ज्ञान। तेचि ते प्रमाण।
येर अप्रमाण। सर्व काही॥

अशी समर्थांची परखड भूमिका आहे.
आज पाण्याचा प्रश्‍न जटिल झालेला आहे. पाण्याचे व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा बनला आहे. या संदर्भातील मार्गदर्शन करताना समर्थ सांगतात,

नदीचे उदक वाहत गेले।
तो निरर्थक चालले।
जरी बांधोनी काढले।
नाना तिरी कालवे॥
उदक निगेने वर्तविले।
नाना जिनसी पीक काढिले।
पुढे उदकचि जाहले पीक सुवर्ण॥

पाणी ज्या प्रकारच्या पाटातून वाहते त्या प्रकारची चव त्या पाण्याला प्राप्त होते. समर्थ सांगतात,

जरी मुळी उदक निवळ असते।
नाना वल्लीमध्ये जाते।
संगदोषे तैसे होते।
आम्ल तीक्ष्ण कडवट॥

म्हणजेच ऍसिडिटी आणि अल्कलिनिटी या संकल्पनाही संतांना माहिती होत्या. नगरांची रचना कशी असावी या संदर्भात ज्ञानेश्‍वरीत मार्गदर्शन सापडते.

नगरेचि रचावी। जलाशये निर्मावी॥
महावने लावावी। नानाविध।

मारुतीस्त्रोतात समर्थ ‘अणु पोसोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे।’ असे सांगत. ‘अणुरणीया थोकडा। तुका आकाशाएवढा’ असे तुकोबा स्पष्ट करतात या दोघांनाही अणू, रेणू, ब्रह्मांड या संकल्पना माहीत होत्या. पृथ्वीची उत्पत्ती आणि विनाश या संदर्भातले अनेक दाखले दोघांच्याही साहित्यात मिळतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी। वनचरे॥ असे म्हणणारे तुकोबा निसर्ग आणि माणसाचे नाते किती दृढ आहे, याची जाणीव करुन देतात. आज निरनिराळ्या माध्यमांतून सातत्याने बजावले जाते, पडलेली कोणतीही वस्तू घेऊ नका. त्यात बॉंब असू शकेल, तो फुटू शकेल आणि अनर्थ घडू शकेल. हेच वेगळ्या शब्दांत समर्थांनी किती पूर्वी सांगून ठेवले आहे.

वाट पुसल्यावीण जावो नये।
फळ ओळखल्यावीण खावो नये।
पडली वस्तू घेऊ नये।
कोणा एकाची॥

आजच्या जगात भपक्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. बाह्यरुपावरुन अनेकदा व्यक्तींची किंमत केली जाते, त्यामुळे अनेकदा फसगत होते. या भपक्याच्या दुनियेतून बाहेर पडून बाह्यरंगापेक्षा अंतरंगाकडे लक्ष देण्याचा संदेश संत देतात. चोखोबा सांगतात,

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा।
काय भुललासी वरलीया रंगा॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा॥
काय भुललासी वरलीया रंगा॥
नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे।
काय भुललासी वरलिया रंगें॥
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा॥

संतांनी आपल्या साहित्यात निवृत्तिवाद मांडलेला नाही. प्रवृत्तिवाद मांडलेला आहे. माणसाचे जीवन आहे, त्यापेक्षा अधिक उन्नत करणे, समृद्ध करणे हेच त्यांचे ध्येय आहे. उगवत्या पिढीच्या, उमलत्या बुद्धिच्या तरुणांनी संतसाहित्याचा अगत्यपूर्वक अभ्यास केला पाहिजे. तो केला तर त्यांचे जगणे निश्‍चित सुंदर होईल.

तंत्रज्ञानाचे महत्त्व कोणीही नाकारलेले नाही; पण तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपल्याला केवळ यंत्रमानव बनायचे नाही.

ज्यांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात तीच माणसे समाजाचे अश्रू पुसण्याचे काम करु शकतात, त्यामुळे भौतिक समृद्धीबरोबरच भावसंपन्नता मिळवायची असेल, तर तंत्रज्ञानाच्या जोडीला संतांचे तत्त्वज्ञान यांच्या मिलापातूनच संतांना अपेक्षित असणार्‍या विश्‍वकल्याणाचे पसायदान साकार होणार आहे.

– प्रा. मिलिंद जोशी
पुणे. 9850270823
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 

मासिक ‘साहित्य चपराक’ डिसेंबर 2019

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा