असहिष्णुता चांगली की वाईट?

सध्या प्रसारमाध्यमांद्वारे सर्वात जास्त चर्चिल्या जाणार्‍या ‘असहिष्णुता’ या शब्दाच्या मुळाशी जाताना आधी हा ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्या ‘सहिष्णुता’ या शब्दाकडे लक्ष द्यायला हवे. मुळात इंग्रजी प्रसारमाध्यमांनी चर्चेत आणलेल्या ‘टॉलरन्स’ या इंग्रजी शब्दाचे हे मराठी भाषांतर आहे. सध्या भारतात असहिष्णुता आहे की नाही, यावर मोठा वाद चालू आहे आणि नजिकच्या भविष्यकाळात हा वाद संपुष्टात येण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही. यातही वैशिष्ट्यपूर्ण भाग असा की, दोन्ही बाजूंचे प्रतिद्वंद्वी असहिष्णुता आहे की नाही यावरच मोठ्या हिरीरीने वाद घालत आहेत.


असहिष्णुता चांगली की वाईट यावर ते काहीच भाष्य करीत नाहीत.  म्हणजे भारतात असहिष्णुता आहे/वाढली आहे असे म्हणणारे तिला वाईट समजताहेत तसेच भारतात असहिष्णुता नाहीच/वाढलेली नाही असे म्हणणारेही तिच्या चांगले/वाईट असण्यावर काहीच भाष्य करीत नाहीत.  म्हणजे असहिष्णुता ही वाईट असल्याचे विरोधी गटाचे मत त्यांना मान्य असावे.

आता मुद्दा असा की, असहिष्णुता ही वास्तवात वाईट आहे का? म्हणजेच सहिष्णुता किंवा टॉलरन्स ही बाब चांगली मानावी का? कुठल्याही इंग्रजी शब्दाचे जनतेच्या सोयीकरिता प्रादेशिक भाषेत भाषांतर केले जाते तेव्हा कायदेशीर बाबींकरिता मूळ इंग्रजी शब्दच विचारार्थ घेतला जाईल अशी तळटीप अध्याहृत असते. येथेही टॉलरन्स या मूळ इंग्रजी शब्दाचाच विचार करू! मुळात हा शब्द तांत्रिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तिंकडून इतक्या प्रचंड प्रमाणात वापरला जातो की त्याचे भाषांतर करताना देखील त्यांना प्रादेशिक पर्यायी शब्द चटकन सुचत नाही. म्हणजे वाक्यात बाकी शब्द मराठी (किंवा स्थळवैविध्यानुसार इतर प्रादेशिक) असले तरीही टॉलरन्स हा शब्द तसाच इंग्रजी रूपात वापरला जातो. अगदी गेल्या दोन वर्षापर्यंत तर सहिष्णुता/असहिष्णुता हे शब्द व्यवहारी जगात कुठे वापरातही नसल्यामुळे जेव्हा कार्यस्थळावरील (शॉप फ्लोअर) उत्पादनासंदर्भात कर्मचार्‍यांच्या सोयीकरिता मी कार्य सूचनांचे (वर्क इंस्ट्रक्शन्स) भाषांतर करीत असताना टॉलरन्स करिता सहिष्णुता /तितिक्षा हे शब्द योजले तेव्हा ह्या मराठी शब्दांपुढे चांदणी टाकून खाली उत्पादनाच्या नेमक्या/अचूक/तंतोतंत अपेक्षित मापात मान्य असलेली फारकत/तफावत अशी तळटीपही द्यावी लागली होती.

इथे टॉलरन्स म्हणजे उत्पादन व्यवस्थापनाला कर्मचार्‍यांकडून काय अपेक्षित होते; तर समजा एखादा धातूचा तुकडा तासून 200 मिमी लांबीचा करावयाचा आहे तर प्रत्येक कर्मचार्‍याच्या हातून तो प्रत्येकच वेळी तंतोतंत 200 मिमी लांब होईलच असे नव्हे. अशावेळी त्या उत्पादनाची रचना जर मान्यता देत असेल तर तो तुकडा 199 मिमी किंवा 201 मिमी लांब असला तरी स्वीकारला जातो; परंतु 199 मिमी पेक्षा कमी अथवा 201 मिमी पेक्षा अधिक लांबीचा तुकडा स्वीकारता येत नाही. अशा वेळी पर्यवेक्षक कर्मचार्‍याला सूचना देतो की 200 मिमी लांबीचा तुकडा तास व त्यात टॉलरन्स +/- (अधिक अथवा उणे) 1 मिमी पर्यंत चालेल. या मर्यादेच्या बाहेर लांबी असल्यास (कमी अथवा जास्त) तो तुकडा स्वीकारला जाणार नाही.  ही टॉलरन्सची मर्यादा पाळली गेली तर तयार होणारे अंतिम उत्पादन हे दोषविरहित आणि गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार असण्याची शक्यता वाढते. ही मर्यादा जितकी कमी म्हणजे  +/- (अधिक अथवा उणे) 1 मिमी ऐवजी  +/- (अधिक अथवा उणे) 0.5 मिमी किंवा अगदी मायक्रॉनपर्यंत संकुचित केली असेल तितक्या अधिक प्रमाणात अंतिम उत्पादन देखील अधिक अचूक/नेमके/तंतोतंत मापात बनते. अर्थातच रचनाकारांच्या अपेक्षेच्या जवळपास पोचल्याने त्याचा दर्जादेखील उच्चतम असतो.

चार पाच दशकांपूर्वी वाहन उत्पादन क्षेत्रात मागणी जास्त व पुरवठा अतिशय कमी असे कमालीचे व्यस्त प्रमाण होते.  पाच ते सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बजाजची स्कूटर, एम-50 ही वाहने ग्राहकाला उपलब्ध होत असत. अशा वेळी उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर तयार होणारे जॉब्ज हे अपेक्षित मापात तंतोतंत नसले तरी टॉलरन्स लिमिट्स वाढवून ते स्वीकारले जात असत.  रिजेक्शन टाळण्याकडे व्यवस्थापनाचा कल असे. परिणामी एका स्कूटरची इंधन कार्यक्षमता 50 किमी प्रतिलीटर असेल तर त्याच कारखान्यात त्याच कालावधीत बनलेल्या तशाच दुसर्‍या एखाद्या स्कूटरची इंधन कार्यक्षमता 35 किमी प्रतिलीटर इतकी भिन्न देखील असू शके. याचे कारण उत्पादनाच्या अचूक मापाशी असलेली टॉलरन्स लिमिट जितकी जास्त तितकी अंतिम उत्पादनात येणारी भिन्नता अधिक. आज तीच बजाज कंपनी आपल्या एखाद्या मॉडेलसाठी इंधन कार्यक्षमता 50 किमी प्रतिलीटर जाहीर करते तेव्हा त्या मॉडेलच्या हजार वाहनांमध्येदेखील ही इंधन कार्यक्षमता तपासली तर 50 किमी प्रतिलीटरच भरेल त्यात +/- अर्धा किमी पेक्षा जास्त फरक पडलेला आढळणार नाही. याचे कारण मोजमापाची साधने आधुनिक झाली. तंत्रज्ञान सुधारले. जास्तीत जास्त अचूकता साध्य केली जाऊ लागली. त्यामुळे टॉलरन्स लिमिटस अतिशय कमी ठेवली जाऊ लागली.  अर्थातच वाहनाच्या दर्जात सातत्य येऊ लागले. या उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येईल की टॉलरन्स लिमिट म्हणजेच सहिष्णुतेची मर्यादा संकुचित केल्यास दर्जा सुधारतो. सहिष्णुतेची मर्यादा संकोचणे किंवा अजिबातच सहिष्णुता नसणे याचा अर्थ जर इंटॉलरन्स अथवा असहिष्णुता होत असेल तर निदान उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्राकरिता तरी ही असहिष्णुता अजिबातच वाईट नव्हे.

टॉलरन्स किंवा टॉलरन्स लिमिट हा शब्दप्रयोग गेल्या कित्येक दशकांपासून उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात वापरला जातोय.  जागतिकीकरण झाल्यापासून म्हणजे गेल्या दोन अडीच दशकांपासून तर त्याला अधिकच महत्त्व आलेय आणि ही टॉलरन्स लिमिट किंवा  सहिष्णुतेची मर्यादा मोठ्या प्रमाणावर संकोचली आहे आणि तिचे पालन देखील काटेकोरपणे होते आहे, परंतु गेल्या एक दीड वर्षांपासून प्रसारमाध्यमात चर्चेत असलेल्या इंटॉलरन्स किंवा असहिष्णुता या शब्दाला किंवा त्या शब्दाच्या वापरकर्त्यांना  उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्राचा संदर्भ अपेक्षित नाहीये. ते  हा शब्द वापरत आहेत तो सामाजिक,  धार्मिक,  राजकीय आणि  साहित्यिक  क्षेत्रांकरिता! आता या बाकीच्या  क्षेत्रांकरिता असहिष्णुता चांगली की वाईट ते तपासून पाहू.

सामाजिक क्षेत्राचा विचार करू पाहता प्रामुख्याने आपल्या समोर येते ते कायदेपालन.  समाज व्यवस्थित चालावा याकरिता आपण काही लोकांना इतर लोकांचे वागणे तपासायचा अधिकार देतो. तो त्यांनी समाजाने बनविलेल्या कायद्यांच्या निकषावर वापरायचा असतो. उदाहरणार्थ शहरातील रस्त्यांवर हेल्मेट वापरावे असा कायदा आहे. शहरांतर्गत कुठल्याही चारचाकी वाहनाने ताशी 50 किमी पेक्षा अधिक वेग घेऊ नये आणि शहराबाहेरील हमरस्त्यांवर  हीच वेगमर्यादा ताशी कमाल 80 किमी असावी (उत्तरेकडील  काही  राज्यात ही ताशी 90  किमी देखील आहे) असाही  कायदा आहे. तर शहर असो की शहराबाहेरील हमरस्ते दुचाकीने कायमच 50 किमी प्रती तास ही वेगमर्यादा पाळावी असाही कायदा आहे. समजा एखाद्या चारचाकी वाहनचालकाने शहराबाहेर ताशी 80 किमी ऐवजी ताशी 120 किमी वेगाने वाहन चालविले तर पोलिसांनी काय करावे? कायद्यानुसार दंड करावा की नाही? अजून एखाद्या वाहनचालकाने चक्क  ताशी 160  किमी वेगाने  वाहन चालविले तर पोलिसांनी काय करावे? आता यात गमतीचा भाग असा की ताशी 120 किमी  वेगाने  वाहन  चालविणार्‍या  चालकाला  असे वाटते की, 160 कमी वेगाने वाहन चालविणार्‍या चालकावर जरूर कारवाई करावी परंतु आपल्यावर मात्र करू नये. आपण वेगमर्यादा अगदी जराशीच ओलांडली असे त्याला वाटत असते.  इतक्या कमी मर्यादाभंगाकरिता आपल्यावर कारवाई होऊ नये अशी त्याची अपेक्षा असते. म्हणजे ताशी 80 किमी ही वेगमर्यादा असताना त्यावर +40 (अधिक चाळीस किमी) इतकी टॉलरन्स लिमिट किंवा सहिष्णुतेची मर्यादा त्या पोलिसाकडून वाहनचालकाला अपेक्षित असते. याउलट पोलिसाचे म्हणणे असे की वेगमर्यादा ताशी 80 असली प्रत्येक वाहनाच्या स्पीडोमीटरची अचूकता वगैरे तांत्रिक बाबी ध्यानात घेता  ताशी 85  किंवा 90 किमी प्रती तास इतकी वेगमर्यादा ही टॉलरन्स लिमिटमध्ये असू शकते परंतु त्यापेक्षा अधिक वेग हा कारवाईपात्रच ठरेल. वास्तवातही पोलीस 85 किंवा 90 किमी प्रतितास वेगाने जाणार्‍या वाहनचालकांवर कारवाई न करता ताशी 100 किमी अथवा अधिक वेगाने जाणार्‍या वाहनचालकांवरच कारवाई करतात असे दिसून येते. जर एखादा  पोलीस अगदीच काटेकोरपणे स्पीडगन वापरून अगदी ताशी 81 किमी वेगाने जाणार्‍यालाही दंड ठोठावत असेल तर तो नियमाचा अतिरेक करतोय असे आपण म्हणू शकतो. परंतु ताशी 120 किमी वेगाने जाणार्‍या वाहनचालकावर कारवाई करणार्‍या पोलिसाकडून आपण अधिक सहिष्णुतेची अपेक्षा करणे उचित ठरेल काय? असो! पण ताशी 80 किमी पेक्षा 10 किमी अधिक वेगाने जाणार्‍या वाहनचालकावर कारवाई न करण्याची सहिष्णुता  दाखविणारा  पोलिसही दुसर्‍या एखाद्या नियमात तितकीही सहिष्णुता दाखवू शकणार नाही.  जसे की पाच आसनक्षमतेच्या वाहनात सहा जण बसले असतील आणि त्यातही चालकाशेजारी एकाऐवजी दोन प्रवासी बसले असतील.  अशा ठिकाणी जराही सहिष्णुता दाखविता येणार नाही.  आवश्यक तो दंड तर भरावाच लागेल शिवाय चालकाशेजारील अतिरिक्त प्रवाशाला वाहनातून उतरवावे देखील लागेल.

त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण द्यावयाचे तर रॉयल एंफिल्ड मोटर्स या वाहन उत्पादकाचे. त्यांनी त्यांच्या बुलेट 350 सीसी या वाहनाची वर्तमानपत्रात छापील जाहिरात करताना नव्वदच्या दशकात बिनधास्त असे विधान केले होते की खराब रस्त्यावर अथवा जिथे रस्ता नाही तिथे ताशी 80 किमी वेगाने चालवा आणि चांगल्या रस्त्यावर ताशी 120 किमी  वेगाने चालवा. हे कायद्यात बसणारे नव्हतेच; शिवाय ही जाहिरात लाखो वाचक वाचणार आणि त्यांच्या वाहन चालविण्याच्या सवयीवरही  त्याचा परिणाम होणार.  समूहाची मानसिकता बिघडवू शकणार्‍या या जाहिरातीवर नंतर अजिबात सहिष्णुता न दाखविता कारवाई  करण्यात आली आणि तिची पुढील प्रसिद्धी थांबविली गेली. याशिवाय राज्यभरात मोटार वाहन कायद्याचे नियम सर्वत्र सारखे असले तरीही त्यांची अंमलबजावणी करताना पोलिसांकडून  दाखविल्या जाणार्‍या सहिष्णुतेची मर्यादा स्थळ, काळ, परिस्थिती व कृतीनुसार बदलली देखील  जाते. जसे की, मुंबईपासून पाचशे किमी अंतरावर एखाद्या खेड्यातील अजिबात वर्दळ नसलेल्या रस्त्यावर एखाद्या दुचाकीवर तीन प्रवासी असतील, त्यांनी हेल्मेट देखील वापरले नसेल तरी त्यांच्यावर कारवाई होणारही नाही. तसेच एखादे चारचाकी वाहन राज्य परिवहन मंडळाच्या बसथांब्याजवळ थांबून एखाद्या प्रवाशाला आपल्या वाहनातून प्रवास ऑफर करत असेल तरी या बाबीची दखलही घेतली जाणार नाही. कारण मुंबईत जशा सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहेत तशा त्या खेड्यात नाहीत. तिथे दिवसातून एकदा बस येणार असेल तर इतर वेळी सामान्य नागरिकांनी दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे किंवा बसथांब्यावर खासगी प्रवासी वाहनाने थांबून प्रवासी भरणे हे कायद्याने मान्य नसले तरीही सहिष्णुतेच्या मर्यादेखाली कारवाईतून सूट देण्यास पात्र ठरू शकते. परंतु भर मुंबई शहरात हेल्मेट न घालता दुचाकीवरून प्रवास किंवा बसथांब्यावरून खासगी वाहनाने प्रवासी पळविणे हे जबरी कारवाईस पात्र ठरू शकते. तिथे नियमांच्या तंतोतंत पालनात सहिष्णुतेची (टॉलरन्स) अपेक्षा कशाकरिता? जिथे शासन सुविधा देण्यास अपुरे पडते तिथे मात्र शासनाने नागरिकांकडून तंतोतंत नियमपालनाची अपेक्षा करणे हेदेखील अन्याय्यच ठरावे.

पूर्वी पुणे शहरातील जंगली महाराज मार्गावर वर्षातून ठरवून व वर्तमानपत्रातून आधी जाहीर करून एकदा अथवा दोनदा एक सप्ताहाकरिता वाहतूक पोलिसांकडून नो टॉलरन्स झोन हा उपक्रम पाळला जायचा.  म्हणजे त्या सप्ताहात या मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जायची. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा व मूळ नोंदणी दस्तऐवज सोबत बाळगावे लागत. यांच्यापैकी एकही कागदपत्र नसल्यास दंड भरावा लागे. यामुळे अर्थातच वाहनचालकांना शिस्त लागे व वर्षातून एकदा किंवा दोनदा जरी अशी तपासणी होत असली तरी त्यामुळे कागदपत्रे व्यवस्थित शोधून वाहनात ठेवली जात.   विमा अथवा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढले नसल्यास तेही काढले जाई. त्यामुळे नावातच नो टॉलरन्स असे शब्द असलेला हा उपक्रम कधीही असहिष्णुतेच्या नावाखाली टीकापात्र ठरत नसे. आजही अनेक वाहनचालक धुळे, अहमदनगर सारख्या अप्रगत शहरात वाहन परवाना नसतानाही बिनदिक्कत वाहन चालवितात. परंतु तेच लोक मुंबईत काही कामानिमित्त वाहन न्यावयाचे असल्यास सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक सोबत बाळगतात. तिथे कायद्याची कडक अंमलबजावणी होते.  त्याबाबतीत अजिबात सहिष्णुता दाखविली जात नाही याचा त्यांना आदरयुक्त धाक वाटतो.

सामाजिक स्वच्छतेबाबतही असेच म्हणता येईल. जिथे महिनोनमहिने साफसफाई होत नाही अशा खेड्यातल्या रस्त्यांवर लोक बिनधास्त कचरा टाकतात. इतकेच काय पण मलमूत्र विसर्जनही करतात. मुंबईसारख्या शहरात रस्त्याच्या कडेला मलविसर्जनाचे धाडस  कदाचित कोणी करतही नसेल परंतु सिगारेटची थोटके, रिकामी पाकिटे टाकणे अथवा तंबाखूजन्य पदार्थ चघळून  थुंकणे हे सर्रास घडताना दिसते.  बहुदा तिथली सहिष्णुतेची मर्यादा कचरा टाकणे किंवा थुंकणे इतकी ताणली गेलेली असावी तर खेड्यातल्या रस्त्यांवर हीच मर्यादा मलमूत्र विसर्जनापर्यंत देखील ताणली जाता येत असेल.  अर्थात हेच नागरिक जेव्हा सिंगापूरसारख्या स्वच्छ देशात जातात तेव्हा तिथे हीच स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी कुठलीच सहिष्णुतेची मर्यादा न दाखविता किती काटेकोरपणे पाळली जाते याचा अनुभव घेतात आणि तिथे थुंकायला देखील परवानगी नाही हे मोठ्या कौतुकाने परतीच्या प्रवासानंतर मुंबईत उतरल्या उतरल्या थुंकताना सांगतात.

चकाचक रस्ते, पुरेशी सार्वजनिक वाहनव्यवस्था, जागोजागी कचरा टाकायला कुंड्या, देहधर्म उरकायला स्वच्छ आणि पुरेशी प्रसाधनगृहे आणि कुठे धुळीचा लवलेशही असू नये याकरिता रस्त्याच्या कडेला हिरवळ वगैरेंची व्यवस्था करणारे प्रशासन! मग तिथली स्वच्छता टिकविण्याकरिता कायद्याच्या अंमलबजावणीतही कुठलीच सहिष्णुता दाखवीत नाही हे नागरिकांना पटते.  किंबहुना ही असहिष्णुता कौतुकास्पदच ठरते. आता एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीशी कसे वागावयाचे याबाबतीतली सहिष्णुता – असहिष्णुता विचारात घेऊ. समजा एक हजार नागरिक एका वसाहतीत राहत आहेत. प्रत्येकाने आपापल्या घरात कुठलीही वाद्ये इत्यादींचा आवाज करताना तो आपल्या घराच्या मर्यादेतच राहील  असे पाहिले, सणसमारंभ साजरे करताना मंडप इत्यादी देखील आपल्या हद्दीच्या बाहेर लावले नाहीत आणि सार्वजनिक जागा, रस्ता यांवर अतिक्रमण केले नाही तर ती व्यक्ती वसाहतीतल्या इतर व्यक्तिंकडूनदेखील अशीच अपेक्षा ठेवणार. अशाप्रकारे सर्वच जण आपापल्या मर्यादेत राहिलेत तर कुणाचाच एकमेकाला त्रास न होता सारेच सुखी जीवन जगतील, पण तेच एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक रस्ता अडवीत मंडप टाकला, रात्री उशीरापर्यंत गोंगाट करीत ध्वनिवर्धकावरून आवाज केला आणि वर पुन्हा कोणी तक्रार केल्यास ‘काय राव आज एक दिवस आमच्या घरी कार्यक्रम आहे तर तुम्ही सहन करा. उद्या तुमच्या घरी कार्यक्रम असेल तर आम्ही सहन करू’ असा युक्तिवाद केल्यास काय होईल? प्रत्येक जण वर्षातला एक एक दिवस असे उद्योग करीत इतरांकडून सहिष्णुतेची मागणी करणार.   त्यात प्रत्येकाची सहिष्णुतेची मर्यादा वेगळी. काही जणांमध्ये लग्नाचा कार्यक्रम तीनचार तासांत आटोपतो तर काही जण तीन तीन दिवस हा कार्यक्रम चालू ठेवतात. अनेकजण तर लग्नाच्या रात्री पूर्ण वेळ अगदी दुसरा दिवस उजाडेपर्यंत मोठ्याने वाद्ये वाजवीत जागरण गोंधळ घालतात. प्रत्येकजण आपल्याला लोकांनी किती आणि कुठल्या मर्यादेपर्यंत सहन करावयाचे हे स्वतःच ठरविणार. शिवाय हे कुठेही स्थायी अथवा लिखित स्वरूपात नसणार. त्यात बदल होत जाणार. म्हणजे अशा सहिष्णुतेचा सगळ्यांनाच त्रास होणार. त्यापेक्षा असे नियम ठरविले की स्वतःच्या कुंपणाबाहेर मंडपाचे खांब उभारायचे नाहीत,  रात्री दहापेक्षा अधिक काळ गोंगाट करायचा नाही की मग ते सोपे आणि सोयीचे ठरते! पण एकदा नियमांमध्ये टॉलरन्स (सहिष्णुता) ने शिरकाव केला की मग दहाचे साडेदहा वाजले तरी अर्धाच तास जास्त झाला म्हणत गोंगाटावर कारवाई होत नाही आणि पुढे पुढे या अर्ध्या तासाचा एक तास आणि दोन तासही कधी होतात ते कळत नाही. तेव्हा टॉलरन्स असावा का? असल्यास त्याची लिमिट्स काय असावीत?  ह्याचा विचार करायची वेळ आली आहे.

वेगमर्यादेच्या उल्लंघनावर कारवाई करण्याच्या उदाहरणात ताशी 120 किमी वेगाने वाहन चालविणार्‍या वाहनचालकावर कारवाई केली तर त्याला वाटणार ताशी 100 किमीने वाहन चालविणार्‍या चालकावर कारवाई का केली नाही? त्यालाही सोडायचे नाही ठरविले तर तो ताशी 90 किमी वाल्याकडे बोट दाखविणार. त्याच्यासह पोलिसाने अगदी ताशी 81 किमी वेगाने वाहन चालविणार्‍या वाहनचालकावरही कारवाई केली तर तो म्हणणार ‘पोलिस असहिष्णू आहेत.’ एकवेळ ते असहिष्णू म्हटलेले चालेल पण थोड्या मर्यादेत नियमभंग चालेल असे म्हटले म्हणजे ती मर्यादा किती आणि ती कोणी ठरवायची असा प्रश्न पडतो. एकदा आपण तंतोतंत किंवा काटेकोरपणे नियम पाळणार असे प्रशासनाने जाहीर केले की नागरिकच टॉलरन्स लिमिट उणे प्रमाणात पाळतील म्हणजे वेगमर्यादा ताशी 80 किमीची आहे काय मग चुकूनही तिचा भंग होऊ नये म्हणून चालक वाहनाला ताशी 70 ते 75 किमीच्या वर पळविणारच नाहीत. पूर्वी वाहन चालविताना एखाद्याने प्रमाणात मद्यपान केल्यास ते कायद्याने मान्य होते. म्हणजे पोलिसांनी वाहनचालकाच्या श्वासातील अल्कोहोलचे प्रमाण मोजले आणि ते ठरविलेल्या मर्यादेत असले तर तो गुन्हा नसे. अर्थात सामान्य नागरिकांकडे ब्रिथ ऍनालायझर कुठून असणार? त्यामुळे ते स्वतःच्या हिशेबाने ’थोडी’ पिऊन वाहन चालवीत. आता ही ‘थोडी’ म्हणजे नेमकी किती हे त्यांचे त्यांनाही कळत नसे.  त्यामुळे पोलिसांनी श्वासातील अल्कोहोल मोजले आणि ते प्रमाणापेक्षा जास्त आहे असे सांगितले की त्यांचा वाहनचालकाशी वाद होत असे. नवीन कायद्याने ही कटकट मिटली.  आता अल्कोहोलचे प्रमाण श्वासात अजिबात असता कामा नये.  ते थोडे जरी असेल तर तुम्ही वाहन चालवू शकत नाही. थोडक्यात हा ‘झिरो टॉलरन्स’ किंवा ‘इंटॉलरन्स’ झाला.

इंटॉलरन्स किंवा असहिष्णुतेला घाऊक प्रमाणात बदनाम करण्याआधी हा शब्द इतका वाईट असता तर पोलिसांनी नो ‘टॉलरन्स झोन’ ही  संकल्पना इतक्या उत्साहात राबविली असती का या मुद्याचा देखील जरूर विचार करावा. सहिष्णुता म्हणजे सहन करणे! एकाने दुसर्‍याला सहन करावेच का व कशाकरिता? एखाद्या व्यक्तीची एखादी त्रासदायक बाब किंवा कृती दुसर्‍या व्यक्तीला सहन करावी लागू नये. जर व्यवस्थेच्या दोषामुळे तसे होत असेल तर व्यवस्थेतच बदल करावे. पूर्वी बससारख्या सार्वजनिक वाहनांमध्ये बेंच टाईप किंवा बाकड्यासारखी आसनव्यवस्था असायची. एका बाकड्यावर सलग दोन किंवा तीन आसने  व त्यांचे  क्रमांक मुद्रित केलेले असायचे. एखादा स्वतःच्या हिश्यापेक्षा जास्त जागा अडवून बसायचा आणि दुसरा त्याला सहन करायचा. अर्थातच हे सहन करायला लावणे किंवा सहन करणे हे शारीरिक क्षमतेच्या निकषावर ठरायचे. आता अनेक ठिकाणी ही आसनव्यवस्थाच बदलली गेली आहे.  बेंच टाईप ऐवजी बकेट टाईप सीटस आल्या. प्रत्येकाची जागा ठरविली गेली. मध्ये दांडा टाकून पद्धतशीर विभाजन केले गेले. त्यामुळे कोणी कोणाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच राहिला नाही आणि पर्यायाने कोणी कोणाला सहन करण्याची गरजच नाही. अशाच प्रकारे सर्वच ठिकाणी व्यवस्थेत असे बदल केले गेले तर सहिष्णुतेची अपेक्षा करण्याची गरजच राहणार नाही.

आपण स्वतः काटेकोरपणे वागत समोरच्याकडून अजिबात सहिष्णुतेची अपेक्षा करू नये आणि त्यासही तशी सहिष्णुता दाखवू नये
किंवा
स्वतः अंदाधुंद वागून समोरच्याकडून सहिष्णुतेची अपेक्षा बाळगावी आणि नंतर त्याच्या वागणुकी बाबतही अशीच सहिष्णुता दाखवावी
यापैकी कुठला पर्याय निवडणे एखाद्या सुजाण समाजाकरिता उचित ठरू शकेल?

चेतन गुगळे, निगडी, पुणे – 44
भ्रमणध्वनी – 9552077615

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा