पोलीस सेवेतला माणूस

2004 साली मी हैदराबादला ई टीव्ही मराठीमध्ये कामाला होतो. त्यावेळी आमचं कार्यालय रामोजी फिल्म सिटीत होतं. तेलुगु राज्यात, ती ही राजधानी हैदराबादमध्ये मराठी माणसांची संख्याही तशी मर्यादितच होती. कोटी परिसर सोडला, तर तशी फारशी मराठी माणसं हैदराबादमध्ये दिसायची नाहीत. पण, जी माणसं भेटायची ती खूपच जीव लावणारी असायची. त्यापैकीच एक होते, आयपीएस अधिकारी महेश भागवत.

Mahesh Bhagwat Police Officer
Mahesh Bhagwat Police Officer

अत्यंत उमदे व्यक्तिमत्व! त्यांच्यासोबतची मैत्री म्हणजे नात्यांचा घट्ट बंधच. महेश भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे. पुण्यातल्या आनंद पाटील यांच्या स्टडी सर्कलमधून त्यांनी स्पर्धा परीक्षेचे धडे गिरवले आणि आज तेलंगणातल्या अनेक पोलीस अधिकार्‍यांचे ते आदर्श बनलेत. त्याला कारणही तेच, मैत्रीतल्या नात्यांचा घट्ट बंध…! अशा माणसांचा सहवास म्हणजे आपल्या जीवनात होणार्‍या महत्त्वाच्या बदलांमधला एक टप्पा असतो. त्याबाबतीत मी नशीबवान आहे की, अशी वेगवेगळी माणसं आयुष्याच्या टप्प्यावर मला भेटत गेली आणि त्यांच्या विचार संस्कारांची शिदोरी मला नेहमीच मिळत गेली.

ई टीव्ही मराठीसाठी काम करत असताना महेश भागवतांची माझी ओळख झाली ती माझे मित्र मेघराज पाटील यांच्यामुळे. पहिल्यांदा भागवतांना भेटलो त्यावेळी असं वाटलं होतं की, एवढा मोठा आयपीएस अधिकारी आपल्याला भेट देईल का? भेटलो तरी आपल्याशी नीट बोलेल का? यासारख्या असंख्य प्रश्नांनी मनात घर केलं होतं. जेव्हा आमची भेट झाली, तेव्हा मनात आलेले असे असंख्य प्रश्न काचेची भिंत कोसळावी तसे खळ्ळकन कोसळून पडली. कारण महेश भागवतांनी केलेल्या स्वागतातलं प्रेमच एवढं होतं की, आमच्यामध्ये असलेली असंख्य प्रश्नांची काचेची भिंत एका क्षणात कोसळून गेली. माणूस समोर दिसला की, त्यांच्या चेहर्‍यावरचं स्मितहास्यच तुमच्यातल्या मैत्रीचं नातं अधिक घट्ट करून जातं. अशी माणसं तीही पोलीस असतात, या विचारातच मनाची समजूत घालत आम्ही आमच्या रूमवर परतलो होतो.

2004 साली ते सायबराबाद क्षेत्राचे पोलीस उपायुक्त होते. सायबराबाद हा हैदराबादमधील एक महत्त्वाचा भाग होता. याच सायबराबाद पोलिसांच्या अंतर्गत हैदराबाद शहरातील अतिसंवेदनशील समजला जाणारा भाग चारमिनार याचा समावेश होतो. त्याठिकाणी असलेल्या हिंदू-मुस्लिम यांच्यात महेश भागवतांनी जो एकोपा तयार केला होता, त्याला तोड नव्हती. शेवटी त्यालाही कारण तेच होतं. एकमेकांमधला विश्वास मैत्रीच्या अतूट बंधातून घट्ट करायचा. जेव्हा कधी भागवत साहेबांची नाईट शिफ्ट असायची, त्यावेळी ते आमचे मित्र मेघराज पाटील यांना फोन करायचे. मेघराज आणि मी एकाच रूमवर राहायचो. भागवत साहेबांचा फोन आला की, मेघराजचा आम्हाला फोन, ‘‘अरे, आपल्याला भागवत साहेबांनी बोलावलंय.’’  बस्स! मग झालं…!! आम्ही आपले चारमिनारला जायला मिळणार म्हणून खुश व्हायचो. भागवत साहेबांच्या एरियात म्हणजे चारमिनारला बिर्याणी खायला मिळणार, म्हणून अधिक उत्साही असायचो. भागवत साहेब ऑफिसला पोहोचले की, आम्हाला फोन करायचे. आम्ही दिलसुखनगर परिसरात राहायचो. त्यांची गाडी घ्यायला यायची. पोलिसांची गाडी आम्ही ज्या घरात भाड्याने राहायचो, तिथं घ्यायला आल्यानंतर मालकाच्या चेहर्‍यावर भीतीचं सावट पसरायचं; पण, ही गाडी नेहमीच आम्हाला घ्यायला यायची. त्यानंतर मालकाची भीती जरा जास्तच वाढली होती. महेश भागवतांच्या कामाची ख्याती इतकी होती की, त्यांच्या कामामुळं लोक त्यांना ओळखायचे. आम्ही त्यांचे मित्र आहोत, असं जेव्हा घरमालकाला समजलं, त्यावेळी त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला.

1995 साली ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. त्यापूर्वीपासून सामाजिक कामाचा त्यांनी घेतलेला वसा ते जपतच होते. सीडीएसए या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पाणलोट विकासाचं काम केलं आहे. मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.

एवढंच नाही तर, त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचं कामही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत केलेलं आहे. इतका मोठा सामाजिक कामाचा अनुभव आणि त्यानंतर भारतीय पोलीस सेवेत काम करण्याची मिळालेली संधी, याचं महेश भागवत यांनी खर्‍या अर्थानं सोनं केलं. 1996 साली ते भारतीय पोलीस सेवेत रूजू झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पदावर! मणिपूरमध्ये 1997 ते 1999 याकाळात त्यांनी काम केलं. 1999 साली ते विवाहबद्ध झाले आणि त्यांची बदली आंध्रप्रदेशमध्ये झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली आहे.
आंध्रप्रदेशातील 4 जिल्ह्यात त्यांनी पोलीस अधीक्षक पदावर काम केलंय. शिवाय हैदराबाद शहरात हैदराबाद आणि सायबराबाद या भागात पोलीस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावलंय. त्यांनी उत्तमरित्या बजावलेल्या कामामुळं आंध्रप्रदेश सरकारनं त्यांना पोलीस महानिरीक्षकपदी बढती दिली. सध्या आंध्रप्रदेशचं विभाजन होऊन नवीन झालेल्या तेलंगणा राज्यात राचकोंडा इथं ते पोलीस आयुक्त म्हणून काम करताहेत.

2004 साली त्यांची नलगोंडा पोलीस अधीक्षक पदी बदली झाली होती. नलगोंडा जिल्ह्यामध्ये नलक्षवाद्यांचा मोठा प्रभाव होता. महेश भागवतांनी नक्षलवाद संपवण्यासाठी वेगवेगळ्या मोहीमा राबवल्या होत्या. त्याला चांगलं यशही मिळालं होतं. नक्षलवाद संपवायला निघालेला अधिकारी म्हणून नक्षलवाद्यांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीचा राग होता. तसं पाहता नलगोंडा जिल्हा हा घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. याच जंगलातून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी कारवाया चालायच्या. याच काळात महेश भागवतांनी कम्युनिटी पोलीस ही संकल्पना राबवली. नक्षलवादाच्या विरोधात लढताना स्थानिकांची मदत घ्यायची आणि त्या चळवळीला संपवायचं ही अशी ही संकल्पना. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अशा अनेक बाबींवर त्यांच्याशी भेटल्यानंतर चर्चा व्हायची. सरकारची, खास केंद्रसरकारच्या गृहखात्याची नक्षलवादाबाबतची भूमिका यावर आमची चर्चा रंगायची. त्यातून अनेक गोष्टी एक पत्रकार म्हणून समजून घेताना, कधी-कधी त्यांच्याकडून चांगले बातम्यांचे विषयही आम्हाला मिळायचे. वर्दीतला अधिकारी माणसात मिसळून काय करू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश भागवत.

नक्षलवादाच्या विरोधात लढताना 2004 सालच्या अगदी शेवटच्या महिन्यात भागवतांनी नक्षलवाद्यांचा मोठा प्लान उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर नक्षलीं भयंकर संतापले होते. भागवतांचं कुटुंब हैदराबादला राहायचं. महिन्यातून एक – दोनदा ते त्यांना भेटण्यासाठी हैदराबादला यायचे. असेच एकदा हैदराबादला येताना, त्यांच्या गाडीवर समोरून एक मोठा ट्रक नक्षलवाद्यांनी घातला. तो अपघात इतका भयंकर होता की, बस्स…. आजही त्याची आठवण काळजाचा थरकाप उडवते. या अपघातात भागवतांची गाडी समोरून अक्षरशः चेपून गेली होती. त्यांच्या गाडीचा चालक जागीच ठार झाला होता. हे पाठीमागे बसले होते. भागवतांच्या चेहर्‍याला खूपच जबर मार लागला होता. बरगड्या तुटल्या होत्या. ही बातमी आमच्यापर्यंत आली, त्यावेळी मी ऑफिसात होतो. बातमी कळल्याबरोबर मन सुन्न झालं होतं. आमच्या डेस्कच्या बाजूलाच आमचं चोवीस तास चालणारं तेलुगु चॅनल होतं. आम्ही आमचं काम सोडून तिथं जाऊन बसलो. प्रत्येक मिनिटाची अपडेट आम्ही घेत होतो. त्यांना हॉस्पिटला उपचारासाठी दाखल करेपर्यंत आमच्यापर्यंत भागवतांबद्दलची वाईटच बातमी यायची. मन आणखी खिन्न होत गेलं; पण, म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी…!’ अगदी तसंच झालं. अशा भयंकर अपघातातून भागवतांचे प्राण वाचले. देवाने, त्यांच्या शरीरात नवप्राण फुंकले होते, ते समाजाच्या उरलेल्या भल्या कामासाठीच.

अपघातानंतर भागवतांना निजाम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं. नंतर जेव्हा त्यांची तब्येत सुधारत गेली, त्यानंतर आम्ही त्यांना भेटण्याचं ठरवलं. जेव्हा आम्ही भेटायचं ठरवलं तेव्हा ते हॉस्पिटलमध्येच होते. आम्ही त्यांना एक मोबाईलवर मेसेज पाठवला. त्याला तात्काळ रिप्लाय आला. ‘या भेटायला, मी वाट पाहतोय.’ भागवत साहेबांचा मेसेज आला, या मोठ्या आनंदातच आम्ही त्यांना भेटण्यासाठी निजाम हॉस्पिटला गेलो. त्यांना ज्या वॉर्डात ठेवलं होतं तिथं तगडा पोलीस बंदोबस्त होता; पण हॉस्पिटलच्या बेडवर हलता येणार नाही, अशा अवस्थेत असलेल्या महेश भागवतांनी आमच्या नावासहित वॉर्डाच्या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला सांगून ठेवलं होतं. आम्ही तिथं पोहताच तरण्याबांड सुरक्षा रक्षकांनी आम्हाला नावं विचारली आणि हातात एके-47 अशा बंदुका असणार्‍या पोलिसांच्या गराड्यात आम्ही भागवतांना ठेवलं होतं, त्या रूममध्ये पोहोचलो. अपघातामध्ये त्यांच्या जबड्याला जबर मार लागला होता. त्यांना बोलता येत नव्हतं, पण तशाही अवस्थेत त्यांना हसून आमचं स्वागत केलेलं पाहून आमच्या डोळ्यातले अश्रू काही थांबले नाहीत. त्यांच्या हातालाही खूप मार लागला होता. तरीही त्यांनी आम्हाला पाहून तिथल्या तिथं हात उचलण्याचा केलेला प्रयत्न हे आमच्या नात्यातल्या घट्ट बंधाचं प्रतीक होतं. आम्ही भेटलो, तेव्हा त्यांनाही आपली माणसं येऊन भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. बराचवेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो.

जगण्यातली इच्छाशक्ती वाढते ती, आपल्या माणसांशी भेटून झालेल्या संवादातून… हाच संवाद भागवतांनी कायम ठेवला. नक्षलवादाविरोधात त्यांनी केलेल्या कामाची दखल संयुक्त राष्ट्रांनीसुद्धा घेतलीय. पोलीस दलातल्या त्यांच्या कामाबाबत आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेच्या चार नामांकित पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं आहे. आदिलाबाद जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त भागात लोकसहभागातून आणि श्रमदानातून त्यांनी 12 किलोमीटरचा रस्ता बांधला होता. त्यालाही अमेरिकेतल्या संस्थेनं पुरस्कार देऊन गौरवलं होतं. एवढंच नाही तर मानवी तस्करीविरोधातही त्यांनी पोलीस दलात राहून मोठं काम केलंय. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात मानवी तस्करीच्या अभ्यासक्रमात महेश भागवत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा समावेश आहे. ही त्यांच्या कामाची प्रतिमा आणि प्रतिभा म्हणता येईल.

Mahesh Bhagwat With President
Mahesh Bhagwat With President

आयुष्यातले एकेक टप्पे पार करत असताना, त्या टप्प्यावर जर आपल्याला अशी प्रतिभावान माणसं भेटली की, आपलं आयुष्य अधिक समृद्ध व्हायला लागतं. समृद्धी केवळ पैशातून, झालेल्या कामाच्या समाधातूनच मिळते असं नाही, तर अशा माणसांच्या सहवासातूनही ती निश्चितपणे लाभत असते. मराठी माणसाच्या प्रेमातला ओलावा काय असतो, हे भागवतांना भेटलं, फोनवर बोललं तरीसुद्धा अगदी सहजतेने जाणवतं. म्हणूनच मराठीबरोबर आपली समर्थता आणि समृद्धता वाढते. खाकी वर्दीची नेहमीच लोकांना भीती वाटत असते. कोर्टाची पायरी चढायला नको आणि पोलीस स्टेशनचा दरवाजा उघडायला नको, अशी सर्वसामान्यांच्या मनातली समजूत असते; पण सर्वसामान्यांच्या मनातला हाच न्यूनगंड काढून टाकून महेश भागवत तुमच्या माझ्यासाठी पोलीस सेवेतला माणूस बनले !!

चपराक अंक घेतेवेळी महेश भागवत आणि समवेत घनश्याम पाटील

– राजेंद्र हुंजे (सुप्रसिद्ध पत्रकार), मुंबई
9930461337

(पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’, एप्रिल 2017)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा